शनिवार, १३ एप्रिल, २०२४
महामानवाचे 'कृषी माॅडेल'
गुरुवार, ५ जानेवारी, २०२३
समरसतेचा वारकरी
‘सा.विवेक’ चे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांना सावित्रीबाई फुले एकात्म समाज विकास मंडळ ( डॉ.हेडगेवार रूग्णालय) यांच्यावतीने दिला जाणारा डॉ.भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा.
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
दुष्काळी भागावर फळतेय ‘ड्रॅगन फ्रूट’ शेती
जत तालुक्यातील जालिहाळ ब्रद्रुक येथील ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या सामाजिक संस्थेतर्फे शेतकर्यांना कमी पाण्यात येणार्या ‘ड्रॅगन फ्रूट’ या विलायती फळाच्या माहितीसह लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात 750 एकरांवर ‘ड्रॅगन फ्रूट’चे क्षेत्र विस्तारले आहे. शेतीतला हा नवीन प्रयोग शेतकर्यांना ‘आर्थिक वरदान’ ठरत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याची ओळख कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी आहे. येथे ना पूर्णपणे फुललेली शेती पहायला मिळते, ना निसर्गरम्य वातावरण. आढळते ते दगड-गोटे, काटेरी खुरटी झाडी. एकूणच दुष्काळसदृश परिस्थिती. अशा या वातावरणात जीवन कंठत असणार्या शेतकर्यांच्या जीवनात आनंदाची पालवी फुटली ती ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या संस्थेमुळे. 1972 सालच्या भीषण दुष्काळात संस्थेचे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यांनीच एकत्र येऊन 1976 साली सांगली शहरापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जालिहाळ बुद्रुक (ता. जत) या ठिकाणी ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ची स्थापना केली. सध्या ही संस्था जत तालुक्याच्या दुष्काळी भागातील 22 गावांत शेती, पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आदी क्षेत्रांत काम करीत आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या तीस एकर हलक्या पडीक जमिनीवर पथदर्शक पीक प्रात्यक्षिके होत असतात. कडधान्ये, फळबागा, ठिबक व तुषार सिंचन पद्धत, सौर ऊर्जा, हायड्रोपोनिक चारा याची प्रात्यक्षिके संस्था प्रथम आपल्या शेतात राबविते. त्यानंतर ते शेतकर्यांपर्यंत पोहोचविले जाते. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादकता कशी मिळेल यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते.
ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग
डाळिंब आणि द्राक्ष या भागाची हुकमी पिके. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि बागांवर पडणारे रोग यांमुळे इथला फळ बागायतदार मेटाकुटीला आला होता. दरम्यान, येरळा संस्थेचा पर्यावरणाला अनुकूल पर्यायी पीक-फळाचा अभ्यास सुरू होता. या संदर्भात अनुभव सांगताना संस्थेचे सचिव नारायण देशपांडे म्हणाले, “ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारे पीक समजले जाते. व्हिएतनाम, थायलंड, तैवान देशांत याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कमी खर्चात परवडणारे हे पीक आहे, शिवाय शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळावे हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने जालिहाळ बुद्रुक येथील दीड एकरावर ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी सहा वर्षे संशोधन केले. 2014 साली प्रायोगिक तत्त्वावर ड्रॅगन फ्रूट शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकर्याकडून रोपे मागविण्यात आली. एका एकरात 550 पोल बसले. सहा बाय दहाचे अंतर करून प्रत्येक पोलवर चार रोपांची लागवड केली. एकरी 2800 रोपे लागली. रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे म्हणून ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केला. त्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होत गेली. जानेवारी ते मे या कालावधीत फळाला अतिशय कमी पाणी लागते. त्यामुळे 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानातही तग धरू शकणारे आणि रोगप्रतिकारक्षम फळ असल्याचे आमच्या लक्षात आले. एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. पहिल्या वर्षी रोपांची चांगली उगवण झाली. दुसर्या वर्षापासून फळधारणा सुरू होते आणि चौथ्या वर्षापासून एकरी जवळपास सहा ते सात टन उत्पादन निघाले.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही लागवड ते काढणीपर्यंतची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले. हजारो शेतकर्यांना ते वितरित करण्यात आले. संस्थेने स्वत: रोपवाटिका तयार करून रोपे उपलब्ध करून दिली आहेत. संस्थेच्या प्रक्षेत्रावरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर तो पाहण्यासाठी आले आणि बघता बघता जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील 750 एकर क्षेत्र ड्रॅग्रन फ्रूटखाली आले आहे. त्यासाठी ‘इंडियन ड्रॅगन फ्रूट ग्रोअरगट स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे 400 ड्रॅगन फ्रूट शेतकर्यांची नोंदणी झाली आहे.”
शेतकर्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन
संस्थेने सर्व शेतकर्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केला आहे. ड्रॅगन फ्रूट हे नवीन पीक आहे. त्यामुळे या पिकांची सविस्तर माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. या पिकांची शास्त्रीय माहिती संस्थेने संकलित केली आहे. संस्थेचे अनुभवी शेतकरी नवीन शेतकर्यांना ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती देत असतात. संस्थेने फळाविषयीचे तंत्रज्ञान विकसित करून लागवडीपासून काढणी, छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन याविषयी शेतकर्यांना प्रशिक्षित केले आहे.
विक्री व्यवस्थापन
नारायण देशपांडे सांगतात, “या नवीन फळासाठी ग्राहक मिळविणे एक मोठे आव्हान होते. त्याचे आहारातील महत्त्व पटवून देणारी हजारो घडीपत्रके संस्थेने थेट किरकोळ फळविक्रेत्यांपर्यंत व ग्राहकांपर्यंत वितरित केली. सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, वाशी येथील व्यापार्यांशी संपर्क साधून विक्रीचा प्रश्न सोडविला.”
विक्रमी उत्पादन व निर्यात
उत्तम व्यवस्थापन व मशागत असल्यास ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे संस्थेच्या शेतकर्यांनी दाखवून दिले आहे. 2018-19 या काळात 400 टन, 2019-20मध्ये 525 टन, तर 2020-21 साली 700 टन ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन एकट्या जत तालुक्यातून घेण्यात आले. यातून सात कोटी रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या वर्षी लागवडीचा खर्च साडेतीन लाख रुपये एकरी आला. खते, छाटणी, पाणी व्यवस्थापन याचा एकरी खर्च 32 हजार रुपये आला. सरासरी 80 ते 100 रु. किलो रुपये असा भाव मिळाला आहे. या भागातून युरोपमध्ये व अरब राष्ट्रात प्रथमच फळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली.
उत्कृष्ट रोपवाटिका
महाराष्ट्राच्या विविध भागांत ड्रॅगन फ्रूटची लागवड होत असली, तरी बहुतांश ठिकाणी या फळाच्या रोपवाटिका उपलब्ध नाहीत, ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्कृष्ट सहा रोपवाटिका विकसित केल्या आहेत. यामुळे संस्थेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. वर्षभरातून एका रोपवाटिकेतून दहा हजारांपेक्षा अधिक रोपांची विक्री होते.
शेतकरी समाधानी
कमी श्रम, कमी पाणी, एकदाच गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 25 वर्षे नफा मिळवून देणारी ही शेती आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत.
लागवडीबद्दलचा अनुभव नोंदवताना वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी राजाराम देशमुख म्हणाले, “मी पूर्वी द्राक्ष व ऊस शेती करत होतो. नवीन पीकपद्धतीचा अभ्यास करून व येरळा संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर 2015 साली 25 गुंठ्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यातून 11 टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सरासरी आठ लाखाचे उत्पन्न मिळाले. 2020 साली पुन्हा ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढवले. सध्या मी दीड एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे.”
तडसर (ता. कडेगाव) येथील शेतकरी व महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव पवार सांगतात, “2014 साली येरळा संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांचा फोन आला. पिलीव (ता. माळशिरस) येथील शेतकरी जाधव यांनी दोन एकर ड्रॅगन फ्रूट शेतीतून 27 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या शेतीला भेट देऊन चर्चा करण्याची विनंती देशपांडे यांनी केली. पुढे आम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीला भेट दिली. एक-दोन वर्षे या शेतीचा अभ्यास केला.
2016 साली मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. दोन ओळींतील अंतर 12 फूट व दोन रोपांतील अंतर 7 फूट अशी रचना करून 30 गुंठ्यांत लागण केली. प्रारंभी कमी पाणी दिल्यामुळे म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे 2017 साली कमी उत्पन्न - म्हणजे 400 किलो उत्पादन मिळाले. त्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत व जीवामृत यांचा वापर केला. 2018 साली 1309 किलो, 2019 साली 2460 व 2020 साली 7389 किलो व 2020-21 या काळात 8541 किलो उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता 6 लाख 44 हजार 145 रुपयांचे उत्पन्न मिळाले. फेब्रुवारी 2021मध्ये 2 एकरांमध्ये रेड रेड व जंबो रेड या व्हरायटीची लागवड केली आहे. कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देणारे हे नगदी पीक आहे. उसाएवढा खर्च केला, तरी उसाच्या दुप्पट उत्पन्न देणारे हे पीक आहे. शिवाय द्राक्षासारखी फार रिस्क घ्यावी लागत नाही.”
देशमुख व पवार या दोन्हीही शेतकर्यांनी प्रथमच दुबईला ड्रॅगन फ्रूट निर्यात केली आहे. या निर्यातीमुळे त्यांना 110 रुपये प्रतिकिलो किलो भाव मिळाला आहे.
आगामी योजना
ग्राहकांपर्यंत ड्रॅगन फ्रूटचे महत्त्व पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी शीतगृहातील साठवणक्षमता वाढवण्यासाठी परदेशी संस्थांशीदेखील संपर्क केला आहे. या फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सातासमुद्रापार पिकणार्या ड्रॅगन फ्रूटची अनोखी शेती असा दुष्काळग्रस्त भागात फुलविला गेलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. त्यामुळे हा प्रयोग शेतकर्यांसाठी नवा आदर्श ठरला आहे.
शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२
दीड एकरांतून घडविली क्रांती
धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली बाळासाहेब घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड एकरात मिश्र पीक पद्धतीचे उत्कृष्ट मॉडेल उभे केले आहे. महिला शेतकर्यांना एकत्र आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची निर्मिती करून जणू क्रांती घडवून आणली आहे. शेती आधारित अन्य उपक्रमात व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे त्या अनेकींना आत्मनिरर्भरतेची प्रेरणा देत आहेत.
ही कहाणी आहे. जिद्दीची आणि मेहनतीची. अतिशय गरीब परिस्थिीतही शेतीतून प्रगती साधली, त्यासाठी आतोनात त्रास, अडचणी सहन केल्या, पण थांबल्या नाहीत, ध्येयापर्यंत पोहोचल्या, अशा प्रगतशील महिला शेतकरी वैशाली बाळासाहेब घुगे यांची ही कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील अणदूर हे वैशालीताईंचे सासर. लग्नापूर्वी पुण्यात काकांच्या घरी वाढलेल्या, तिथेच नववीपर्यंत शिकल्या. सोळाव्या वर्षी त्याचं बाळासाहेबांशी लग्न झालं. नवरा (बाळसाहेब) पदवीधर असूनही त्याच्या हाताला काम मिळत नव्हते. त्यातच संसाराच्या रहाटगाड्यात सासरांनी चार एकर शेती विकली. पुढे परिस्थितीत हतबल होत गेली. पुढे वैशालीताईंनी संसार सावरला. अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले.
आत्मनिर्भरतेचा असा एक प्रवास
अतिशय हलाखीचे दिवस सहन करीत पुढे आलेल्या वैशालीताई जीवनातील अनुभव सांगताना म्हणाल्या,‘‘ घरात कुणीच कामाला जात नव्हते. त्यामुळं घरखर्च कसा करायचा? त्यात नवरा कमवता नव्हता, या विचारानं सासर्यानं दीड एकर शेत, एक म्हैस आणि चार पत्रे देऊन आम्हाला घराबाहेर (विभक्त केले) काढले. शेतात दगडाची खिळपट रचून आणि त्यावर पत्रे टाकून घर उभे केले. पदरात मूल होतं. नवरा कमवत नव्हता, पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. म्हैशीचे दूध व शेतातील भाजीपाला विकून संसाराला चार पैसे मिळत होते. अशातच काळोख्या रात्री, वादळी वार्यात घराववरचे पत्रे उडून गेले.
लहान बाळाला पोटाशी धरून भयभीत अवस्थेत बाहेर पडले. या भीषण प्रसंगामुळं मी जगणं शिकले. खंबीर होऊन पुढे आले. संसार सांभाळला, शेतात भाजीपाला लावला, बाजारात, वस्तीवर, गल्लीत भाजी विकू लागले, घरंदाज, दिसायला चांगली रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचं पाहून आयाबाया माझ्याकडं टकमक बघायच्या, हसायच्या, बोलायच्या, माझ्यापुढं काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, काही महिलांचं मार्गदर्शन मिळालं.. वस्तीवरच्या महिलांचा गट बनवला.. चार पैसे मिळत गेले, शेतीत सूर गवसू लागला. खर्या इथूनच माझ्या ‘आत्मनिर्भरते’ला सुरवात झाली.’’
मिश्र पिकांतून फुलवली शेती
शहरात वाढलेल्या वैशालीताईंना शेतीमातीचा कसलाही गंध नव्हता. शेती समजून घेण्यासाठी त्यांनी चार वर्ष खर्ची घालवली. वैशालीताई सांगतात,‘‘२०११-१२ पासून मी शेती करू लागले. शेती समजून घेत होते. पहिल्यांदा शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यात पूर्वांपार पासून पिकाची एक पद्धत होती. या पद्धतीत मी बदल केला. ऊस, सोयाबीन पिकांऐवजी मिश्र पीक पद्धत अंगीकारली. पहिल्यांदा घरच्यांनी विरोध दर्शवला. नंतर या पीक पद्धतीतून मिळालेल्या समाधनाकारक उत्पन्नातून विरोध मावळला. उडीद,तूर,बाजारी, मूग,चवळी, सोयाबीन आदी कडधान्याच्या लागवडीतून दीड एकरांची शेती फुलवली आहे.’’
कमी पाण्यात व कमी कालावधीत येणार्या पिकांची लागवड हे त्यांच्या शेतीचे सूत्र आहे. कडधान्याबरोबर गहू, ज्वारी आदी देशी बियांणापासून समाधानकारक उत्पन्न काढतात. स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेत घेतलेल्या शेती प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. यामुळे सभेत बोलू लागल्या, महिलांना, शेतकर्यांना मार्गदर्शन करू लागल्या.
दुष्काळ निमुर्लनात सहभाग
२०१३, २०१४ आणि २०१५ हे सलग तीन वर्षे दुष्काळाचे होते. मराठवाड्यात चारापाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. शेतकरी आपले जनावरे चारा छावणीत पाठवित होते. शासनाकडून दुष्काळ निर्मुलनासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू झाले होते. या अंतर्गत तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘निकृष्ट चार्यातून उत्कृष्ट चारा निर्मिती’ कशी होते. या संदर्भात वैशालीताईंना प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणातून त्यांनी आपल्या शेतात हायड्रोपोनिक चारा बनवायला सुरवात केली. या चार्यातून त्यांनी स्वतःची १०जनावरे जगवली. मुख्य म्हणजे वाड्या वस्त्यातील महिला शेतकर्यांना कमी पाण्यातील चारा निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
गांडूळ खत, गांडूळ कल्चर व गांडूळ पाणी या संदर्भातील विविध प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. हे प्रयोग करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या बाबत बोलताना वैशालीताई म्हणाल्या,‘‘२०१३ साली मी सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च ही माझ्या आवाक्याबाहेरचा होता. प्रशिक्षणानंतर गांडूळ खत बेड टाकण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी अडीच हजार रूपये खर्च अपेक्षित होते. याला पर्याय म्हणून मी जुने पोती (गोनी) फाडून व्यवस्थित बेड तयार केला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हसायचे आणि पुढे जायचे. बेडमधील पहिला खात माझ्या शेतात टाकला. शेतातून चांगले उत्पन्न निघू लागले. पुढे गांडूळ खताचे बेड वाढवले. आज माझ्याकडे गांडूळाचे दहा बेड आहेत. गांडूळाचे व्हर्मीबेड वाढवले. त्यातून मिळणार्या व्हर्मीवाशची द्राक्ष व फळबागायतदारांकडून मागणी वाढली आहे. यातून वर्षांकाठी १०टन गांडूळ खत तयार होतोय. शून्य गुंतवूणकीतून मला वर्षाकाठी मी दीड लाख रूपये उत्पन्न मिळू लागले आहे.’’
शाश्वत शेतीचा पर्याय
शेतीला जोडधंदा म्हणून वैशालाताईंनी आपल्या शेतीपुढे गावरान कुक्कुटपालनाचा पर्याय ठेवला आहे. २०१४-१५ साली ९०हजारांची गुंतवणूक करून त्यांनी शंभर कोंबड्याचे शेड उभा केले. पहिल्या वर्षी त्यांना ३५हजार रूपयांचा नफा मिळाला. आज त्यांच्याकडे ४५० गावरान कोंबड्या आहेत. यातून मिळणार्या उत्पन्नातून त्यांनी दोन हजार कोंबड्याचे शेड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
या शिवाय त्यांच्याकडे १४म्हशी व दोन देशी गायी आहेत. शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट बांधला आहे. गोमोत्रापासून जीवामृत तयार करतात. बयोगॅस, मुरघास, कडबाकुट्टी, जीवामृत, नर्सरी, पिठाची मशिन अशा विविध शेतीपूरक उद्योगातून वर्षांला सात ते आठ लाखांचे उत्पन्न त्या मिळवितात.
विविध फळझाडांची लागवड
वैशालीताई आपल्या दीड एकरांच्या शेतात विविध प्रयोग करतात. फळबाग हा त्यातील एक भाग. पूर्वी त्यांच्याकडे केशर आंब्याचे ९ झाडे होती. यातून त्यांना वर्षांकाठी २५ते३० हजार रूपये उत्पन्न मिळते. हे उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर गतवर्षी एक एकरांत केशर आंब्याची ३५० झाडे लावली आहेत.याशिवाय शेवगा १५, लिंबू २५, नारळ ५, पपई २, पेरू २, हदगा २, अशा झाडांची बाग त्यांनी तयार केली आहे. पिक व फळझाडांना आच्छादन, ठिंबकचा जास्तीत जास्त वापर त्या करतात.
विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची उभारणी
वैशालीताईंनी २०१७साली तुळजापूर तालुक्यातील २० गावातील महिला शेतकर्यांना एकत्रित आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीच्या १हजार महिला सभासद आहेत. कंपनीमार्फत महिला शेतकर्यांना सेंद्रिय शेती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, बियाणे साठवण, उगवणक्षमता, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक विषयी मार्गदर्शन केले जाते. कंपनीने शेतीमाल खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेती पूरक व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. कंपनीच्यावतीने भाजीपाला साठवण शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
डाळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी
कडधान्याची लागवड करणे व त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. उडीद, मूग,हरभरा डाळीवर काम होत असते. या अंतर्गत कंपनीकडून‘उरवा’ या ब्रॅडखाली केरळ येथे १०टन डाळ निर्यात करण्यात आली होती. डाळीपासून पापड निर्मिती तर हळदीपासून पावडर तयार करण्यात काम सुरू आहे.
संपर्क
वैशाली बाळासाहेब घुगे
मु.पो.अणदूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव
मो.नं. : ७९७२८०६०५५
ईमेल : Vaishalighuge112@gmail.com
सोमवार, २० जून, २०२२
‘परिसांचा संग’-
गोड उसाची कडू कहाणी
दरसाल उसाचा हंगाम सुरू झाला की दोन प्रश्न नेहमी ऐरणीवर येतात - पहिला ऊस दर आंदोलनाचा आणि दुसरा अतिरिक्त ऊस गाळपाचा. यंदा राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ऊस गाळप हंगाम संपूनही मराठवाड्यात एक ते दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना आहे. या समस्येला नेमके जबाबदार कोण? याचे मूळ शोधणे गरजेचे आहे.
‘ऊस’ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक. राज्यात आर्थिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यात या पिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकतेमध्ये आणि साखरेच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल राहत आला आहे. महाराष्ट्रात एकूण 95 सहकारी आणि 93 खाजगी कारखाने आहेत, तर जवळपास 48 कारखाने बंद अवस्थेत आहेत. 1 जून 2022 अखेर राज्यात 1316.8 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 1369.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती मिळते. उसाचा सर्वसाधारण बारा महिन्यांचा कालावधी संपूनही मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आदीसह काही जिल्ह्यांतील ऊस फडातच आहे.
ही समस्या केवळ बिगर सभासदांची नाही, तर जे कारखान्याचे सभासद आहेत, त्याचीही हीच गत आहे. या समस्येमुळेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतरही काही भागात साखर कारखाना ऊस नेत नाही म्हणून काहींनी ऊस पेटवून दिला. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत गेली. सध्या त्या त्या भागातील कारखान्यांकडून तोडणीचे आश्वासन दिले जात असले, तरी मान्सून सुरू झाल्याने शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे.
अतिरिक्त ऊस गाळपासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून पडणार्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 2022-23 या हंगामातही उसाचे क्षेत्र वाढेल, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केलीे. एक कारखानदार म्हणून उसाखाली किती क्षेत्र आणायचे? बंद पडलेले साखर कारखाने कसे सुरू करायचे? याविषयी ते बोलणे आवश्यक होते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी मूळ समस्येकडे दुर्लक्षच केले.
अतिरिक्त ऊस प्रश्न - एक अन्वयार्थ
सध्या प. महाराष्ट्रातील अतिरिक्त उसाचा प्रश्न संपला असला, तरी मराठवाड्यात हा प्रश्न गंभीर बनला आहे. अवर्षणग्रस्ततेचा कायमचा शाप असलेल्या या भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळेच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खात्रीचे उत्पन्न, उसाची ‘एफआरपी’ (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर) निश्चितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शेतीकडे वळत आहेत. 2021-22 हंगामात या विभागात सहा लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. या संपूर्ण उसाची भिस्त केवळ 58 कारखान्यांवर अवलंबून आहे.
यंदा सभासदांइतकीच बिगरसभासदांनी उसाच्या एकरी लागवडीत वाढ केली आहे. त्यामुळे कारखानदारांना ऊस तोडणीचे व गाळपाचे नियोजन करता आले नाही. त्याचबरोबर ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. परिणामी, मजुराअभावी शेतकर्यांचा ऊस फडातच राहिला. वाढत्या तापमानात काळात उसाला तुरे फुटले. पावसामुळे शेतकर्यांसमोर उसाच्या शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उभा राहिला असला, तरी आता गोड ऊस ‘कडू’ वाटत आहे. संपूर्ण ऊस गाळप झाला, तरीही यातून उत्पादन खर्च निघेल की नाही, याविषयी शंका आहे.
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथील ऊस उत्पादक शेतकरी नारायण देवकाते म्हणाले, “गोदावरी पट्ट्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे राजेटाकळी, भादली, मंगू जळगाव परिसरात जवळपास 25 हेक्टरहून अधिक ऊस गाळपाविना शिल्लक आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस नाही झाला, तर बर्याच प्रमाणात ऊस गाळप होईल.”
एकूणच, अतिरिक्त ऊस गाळपाचे चक्र पावसावर अवलंबून आहे. येत्या काळात बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाले, तर अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उसाला कालव्याने पाणी दिले. मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण, उसासाठी होणारा पाण्याचा अपव्यव लक्षात घेता, या भागातील शेतकर्यांनी उसाशिवाय इतर नगदी पिके कशी घ्यावी, याविषयी धोरणकर्त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
विकास पांढरे
https://www.evivek.com/Encyc/2022/6/14/Sweet-sugarcane-The-story.html
शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१
गाथा अखंड होळकरशाहीची
इतिहासाचा मानवी जीवनाशी अतिशय निकटचा संबंध आहे. गतकालीन मानवी जीवनाचा आरसा असतो. त्यातील महत्त्वपूर्ण लक्षवेधी घटनांचा इतिहास हा सामाजिक शास्त्राचा आलेख असतो. देशात व राज्यात अनेक व्यक्ती,घराणे आपल्या कार्याने महान झालेले आहेत. या महानतेमध्ये होळकरशाहीचा मोठा सहभाग आहे. या घराण्याचा आलेख सुसंगत व एकत्र मांडण्याचा प्रयत्न लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'अखंड होळकरशाही' या ग्रंथात मांडला आहे.
उज्ज्वलकुमार माने मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा गावचे. गेल्या दोन दशकापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना शब्दांची धार आणि मोजकेपणा अवगत आहे. 'रणरागिणी अहिल्यादेवी' या चरित्र पुस्तकातून माने यांनी आपल्या अभ्यासूपणाचे दर्शन घडवले आहे.
मराठेशाहीत होळकर घराण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळकर घराण्यात अनेक पराक्रमी व्यक्ती होऊन गेले आहेत. ज्याला जे गवसले तसे ते त्याने दाखवले आहे. अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर यांच्यावर जितके विपुल संशोधन व लेखन झाले तितके मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर आदी व्यक्तींकडे इतिहासकाराचे दुर्लक्ष राहिले. होळकर राजघराण्यातील सुभेदार मल्हारराव होळकर, सरदार खंडेराव होळकर, मालेराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार तुकोजीराव होळकर, सुभेदार काशीराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी तुळसाबाई होळकर, क्रांतिकारक भीमाबाई होळकर आदींचा अभ्यास करून, ऐतिहासिक पुरावे गोळा करुन, संदर्भ ग्रंथ वाचून, स्थळांना भेट देऊन उज्ज्वलकुमार माने यांनी अत्यंत सोप्या भाषेत होळकरशाहीची गाथा सांगणाऱ्या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
खरेतर, होळकर राजघराण्यातील व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना एका संचात बांधून वाचकांसमोर सादर करण्याचे अवघड कार्य आहे. हे एकच पुस्तक वाचून 'होळकरशाही' कळलेच असे नाही. त्यासाठी जाणकार ,अभ्यासू वाचकांनी त्यासाठी इतर ग्रंथाचा, ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करावा, ज्याला होळकर घराण्याचे मर्म समजून घ्यायचे आहे, अशा प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे या ग्रंथाची चिकित्सा करण्याइतपत लक्षणीय आहे.
हे पुस्तक का वाचावे? मराठेशाहीत होळकर घराण्याचे काय स्थान आहे? योगदान दिले आहे? हे वाचण्यासाठी हे पुस्तक वाचावे. मुख्य म्हणजे या पुस्तकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची गाथा वाचायला मिळतेच या शिवाय तुळसाबाई होळकर व भीमाबाई होळकर या रणरागिणीचा धगधगता इतिहास वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. इंदौर संस्थानात रेल्वेचे जाळे निर्माण करणारे, महापालिकेची स्थापना करणारे दुसरे तुकोजीराव होळकर, दुष्काळात धान्याचे कोठार लुटण्यास मुभा देणारे महाराजा शिवाजीराव होळकर, शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठ्याची सोय करणारे तिसरे तुकोजीराव होळकर, धनगर-मराठा यांच्यात रोटी-बेटी व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे दुसरे यशवंतराव होळकर यांच्या जीवनाची, कार्याची गाथा या ग्रंथात वाचायला मिळते.
माने यांनी आपल्या ग्रंथात होळकर घराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यातील यशस्वीपणाची,चढउताराची, मानवतावादी धोरणाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या घराण्यातील प्रत्येक पुरुष व स्त्री ही आदर्शवादी, उदारमतवादी आणि विधायक मार्गाने जाणाऱ्या आहेत हे पुस्तक वाचताना लक्षात येते.
चरित्र व्यक्तींचा इतिहास समजून घेताना माने यांनी शक्य आहे तिथे ऐतिहासिक घटनांचा, संदर्भ ग्रंथांचा दाखला दिला आहे. हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. एकूणच हे पुस्तक वस्तुनिष्ठ चरित्र ग्रंथ झाले आहे. या ग्रंथातील चरित्र नायकाची जीवन कार्याची माहिती पुराव्यानिशी देण्याचा प्रयत्न माने यांनी केला आहे. त्यामुळे होळकर घराण्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी, इतिहास संशोधकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
विकास पांढरे, ९९७०४५२७६७
अखंड होळकरशाही
लेखक : उज्ज्वलकुमार माने
पृष्ठसंख्या :३०४
मूल्य : ४०० रूपये
प्रकाशक :यशोदीप पब्लिकेशन,पुणे
संपर्क :९९२२४२४६९९,९०२८७३६००१
कुशल व्यवस्थापक
असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...
-
'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ...
-
गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा न...
-
साहेबराव :- हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय... सरकार : ......




















