मंथन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंथन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

गाथा अखंड होळकरशाहीची

=

पत्रकार, लेखक उज्ज्वलकुमार यांनी माने आपल्या लिखित 'अखंड होळकरशाही' समग्र होळकरशाहीचा पट उभा केला आहे. विशेष म्हणजे या राजघराण्यातील व्यक्तींचे चरित्र, त्यांचे जीवन समजून घेणे आणि ते मोजक्या शब्दांत मांडणे तसे कठीणच आहे. हे कठीण कार्य लेखक माने यांनी लिलया पेलले आहे.

इतिहासाचा मानवी जीवनाशी अतिशय निकटचा संबंध आहे. गतकालीन मानवी जीवनाचा आरसा असतो. त्यातील महत्त्वपूर्ण लक्षवेधी घटनांचा इतिहास हा सामाजिक शास्त्राचा आलेख असतो. देशात व राज्यात अनेक व्यक्ती,घराणे आपल्या कार्याने महान झालेले आहेत. या महानतेमध्ये होळकरशाहीचा मोठा सहभाग आहे. या घराण्याचा आलेख सुसंगत व एकत्र मांडण्याचा प्रयत्न लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'अखंड होळकरशाही' या ग्रंथात मांडला आहे.

उज्ज्वलकुमार माने मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा गावचे. गेल्या दोन दशकापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यामुळे  त्यांना शब्दांची धार आणि मोजकेपणा अवगत आहे. 'रणरागिणी अहिल्यादेवी' या चरित्र पुस्तकातून माने यांनी आपल्या अभ्यासूपणाचे दर्शन घडवले आहे.

मराठेशाहीत होळकर घराण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळकर घराण्यात अनेक पराक्रमी व्यक्ती होऊन गेले आहेत. ज्याला जे गवसले तसे ते त्याने दाखवले आहे. अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर यांच्यावर जितके विपुल संशोधन व लेखन झाले तितके मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर आदी व्यक्तींकडे इतिहासकाराचे दुर्लक्ष राहिले. होळकर राजघराण्यातील सुभेदार मल्हारराव होळकर, सरदार खंडेराव होळकर, मालेराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार तुकोजीराव होळकर, सुभेदार काशीराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी तुळसाबाई होळकर, क्रांतिकारक भीमाबाई होळकर आदींचा अभ्यास करून, ऐतिहासिक पुरावे गोळा करुन, संदर्भ ग्रंथ वाचून, स्थळांना भेट देऊन उज्ज्वलकुमार माने यांनी अत्यंत सोप्या भाषेत होळकरशाहीची गाथा सांगणाऱ्या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

खरेतर, होळकर राजघराण्यातील व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना एका संचात बांधून वाचकांसमोर सादर करण्याचे अवघड कार्य आहे. हे एकच पुस्तक वाचून 'होळकरशाही' कळलेच असे नाही. त्यासाठी जाणकार ,अभ्यासू वाचकांनी त्यासाठी इतर ग्रंथाचा, ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करावा, ज्याला होळकर घराण्याचे मर्म समजून घ्यायचे आहे, अशा प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे या ग्रंथाची चिकित्सा करण्याइतपत लक्षणीय आहे.

हे पुस्तक का वाचावे?  मराठेशाहीत होळकर घराण्याचे काय स्थान आहे? योगदान दिले आहे?  हे वाचण्यासाठी हे पुस्तक वाचावे. मुख्य म्हणजे  या पुस्तकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची गाथा वाचायला मिळतेच या शिवाय तुळसाबाई होळकर व भीमाबाई होळकर या रणरागिणीचा धगधगता इतिहास वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. इंदौर संस्थानात रेल्वेचे जाळे निर्माण करणारे, महापालिकेची स्थापना करणारे दुसरे तुकोजीराव होळकर, दुष्काळात धान्याचे कोठार लुटण्यास मुभा देणारे महाराजा शिवाजीराव होळकर, शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठ्याची सोय करणारे तिसरे तुकोजीराव होळकर, धनगर-मराठा यांच्यात रोटी-बेटी व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे दुसरे यशवंतराव होळकर यांच्या जीवनाची, कार्याची गाथा या ग्रंथात वाचायला मिळते.

माने यांनी आपल्या ग्रंथात होळकर घराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यातील यशस्वीपणाची,चढउताराची, मानवतावादी धोरणाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या घराण्यातील प्रत्येक पुरुष व स्त्री ही आदर्शवादी, उदारमतवादी आणि विधायक मार्गाने जाणाऱ्या आहेत हे पुस्तक वाचताना लक्षात येते.

चरित्र व्यक्तींचा इतिहास समजून घेताना माने यांनी शक्य आहे तिथे ऐतिहासिक घटनांचा, संदर्भ ग्रंथांचा दाखला दिला आहे. हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. एकूणच हे पुस्तक वस्तुनिष्ठ चरित्र ग्रंथ झाले आहे. या ग्रंथातील चरित्र नायकाची जीवन कार्याची माहिती पुराव्यानिशी देण्याचा प्रयत्न माने यांनी केला आहे. त्यामुळे होळकर घराण्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी, इतिहास संशोधकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

विकास पांढरे, ९९७०४५२७६७

अखंड होळकरशाही

लेखक : उज्ज्वलकुमार माने

पृष्ठसंख्या :३०४

मूल्य : ४०० रूपये

प्रकाशक :यशोदीप पब्लिकेशन,पुणे

संपर्क :९९२२४२४६९९,९०२८७३६०

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव

 


वाघ म्हणजे रुबाब, वाघ म्हणजे सौंदर्य, वाघ म्हणजे जंगलची शान. निसर्गाच्या अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांचे जगणे सुकर करण्यासाठी जंगलतोडीवर कडक निर्बंध आणणे क्रमप्राप्त आहे. आपले क्षेत्र सोडून वाघ दुसरीकडे अतिक्रमण करत नाही. या गोष्टी माणसासाठीही बोधप्रद आहेत.  महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पाविषयी थोडक्यात करून दिलेला हा परिचय.

२९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून जगात आणि आपल्या देशात वाघाचे जतन व संवर्धन होण्यासाठी अनेक पावले उचलली गेली. आज वाघांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २०१०मध्ये पारंपरिक औषध तयार करण्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आले. जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या जंगलाच्या राजाला वाचवणे ही काळाची गरज आहे. सध्या भारतात ५० वाघ प्रकल्प आहेत. भारतात बंगाल टायगर्स ही सर्वाधिक आढळणारी वाघांची प्रजाती आहे. त्यांना रॉयल बंगाल टायगर्स असेही संबोधले जाते. जगातील सर्वात जास्त वाघ प्रजाती या भारतात आढळतात. २०१८च्या गणनेनुसार २१६७ वाघ भारतात होते. सध्याच्या घडीला (मार्च २०२१पर्यंत) भारतात '२९६७ इतकी वाघ लोकसंख्या' नोंदली गेली आहे.

महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. मेळघाट, ताडोबा -आंधारी, पेंच, नवेगाव, सह्याद्री, बोर या प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी इथला निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देश-विदेशी पर्यटक वाघ प्रकल्पात गर्दी करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली आहे. शिवाय वाघ रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष वाघ दलाची स्थापना करण्यात आली आहे.

१) ताडोबा– आंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी प्रकल्प (जिल्हा चंद्रपूर) म्हणजे वाघांचे राज्य असलेली भूमी. येथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पाची निर्मिती झाली. या वाघ प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.

याठिकाणी वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. शिवाय वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही पहायला मिळतात.

२) मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प (जि.अमरावती) फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठ्या वाघ प्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट वाघ प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे.

याठिकाणी पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील पहायला मिळतात.

३) पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प (जि.नागपूर) हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा जैवविविधतेने संपन्न प्रदेश आहे. याठिकाणी वाहत असणाऱ्या पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला वाघ प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.

या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यासारखे प्राणी बघायला मिळतात.

४) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. हा प्रकल्प कान्हा, पेंच आणि ताडोबा वाघ प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. २०१३ साली हा प्रकल्प अस्तित्वात आला. नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौ.कि.मी), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौ.कि.मी), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौ.कि.मी), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौ.कि.मी) आणि कोका वन्यजीव अभयारण्या (९७.६२४) चे क्षेत्र मिळून तयार झाले आहे.

या प्रकल्पात ढाण्या वाघासमवेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर आदी वन्यजीवांचे दर्शन होते.

५) बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्प हा बोर धरण यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बोर व न्यू बोर अभयारण्याचा भाग असून हे वर्धा व नागपूर जिल्ह्यात व्यापलेले आहे. या प्रकल्प १३ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.किमी) क्षेत्रावर वसलेला आहे. बोर वाघ प्रकल्पाची सफारी करताना पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वले, रानडुकर, नीलगाय, सांबर, चितळ, भेडकी, रानकुत्री, खवले-मांजराचे दर्शन होते.

६) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. त्यातून सह्याद्री वाघ प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्याद्री वाघ प्रकल्प तयार केला आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे १ हजार १६६ चौरस किलोमीटरचे सह्याद्री वाघ प्रकल्पाचे क्षेत्र आहे.

येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी नजरेस पडतात.

 आपण सर्वांनी जंगलाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय अवैध शिकार करणाऱ्यांवर कडक निर्बंध घालणे तसेच कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे.

- विकास पांढरे,९९७०४५२७६७ 

शनिवार, २१ मार्च, २०२०

'प्लेग ते कोरोनापर्यंतचा प्रवास'


काही वर्षीपूर्वी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हाँकींग यांनी सांगितले होते, ‘‘मानवजातीसह जीवसृष्टीला शंभर वर्षांपेक्षा जास्त भवितव्य आहे असे वाटत नाही.’’

एका मुलाखतीत बिल गेट्स म्हणतात, "रोगराई मुख्यत्वे साथीचे रोग. पोलिओ, मलेरिया, एचआयव्ही, क्षयरोग इत्यादी सारखे असे रोग ज्यांना आम्ही समूळ घालविले आहे किंवा निंयत्रणात आणले आहे. त्यांना शुन्यवत करण्यासाठी दृढसंकल्प केला पाहिजे जोवर त्यावर आम्ही पूर्ण नियंत्रण प्राप्त करत नाही."

ही त्यांना वाटणारी चिंता म्हणजे जगातील विचारशील माणसाची अस्वस्थ अभिव्यक्ती होती.

विज्ञानाने मानवी जीवन सुखी आणि आनंदी बनवले आहे तसेच मानवासमोर आव्हाने देखील निर्माण केले आहेत. एड्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू यासारखे आजार वैद्यकशास्त्रासमोर आव्हान बनून उभे आहेत.
आज कोरोना’  या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला भयभयीत करून टाकले आहे. चीनमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा रोग आता जगभरातील दीडशेहून अधिक देशात पसरला आहे. विषाणूजन्य रोगामुळे भारतालाही फटका बसला आहे. देशात शंभरहून अधिक नागरिक या रोगाने बांधित झाले आहे. महाराष्ट्रात पुणे शहरात सर्वांधिक संख्या आढळून आली आहे. याबाबत केेद्र व राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. या रोगामुळे जागतिक अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे.  चालू आर्थिक वर्षाच्या या शेवटच्या तिमाहीत जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोसळेल अशी भीती ओईसीडीने (आर्थिक सहयोग व विकास संघटना) व्यक्त केली आहे.'

कोरोना हा रोग चीनमधून आला आहे म्हणून अमेरिका व इतर राष्ट्रे चीनला दोषी ठरवत आहेत, चीन हा तसा धूर्त आणि लबाड देश म्हणून ओळखला जातो. असो, आपला देश आजाराने ग्रस्त असावा,असं कोणत्याही देशाला वाटत नाही, तसे चीनलाही वाटत नसावे. आरोग्याच्या बाबतीत हा देश तसा सजग समजला जातो.

 सन १९४५ मध्ये झालेल्या परिसंवादात प्रथम ब्राजील आणि चीनच्या प्रतिनिधींनी युनोत आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना स्थापन करावी असा विचार मांडला होता. त्यानंतर १९४८ साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली.

हा सर्व इतिहास अभ्यासताना माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले. चीनवर अशी कोणती आपत्ती कोसळली होती, जेणेकरून चीनला आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा वाटला, हा शोध घेता घेता प्लेग ते कोरोनापर्यंतचा इतिहास जाणून घेता आला.

जागतिक पटलावर गेल्या २० वर्षांमध्ये एक प्रबळ महासत्ता म्हणून चीनचा उदय झाला आहे.  आर्थिक महासत्तेबरोबरच सामरिक महासत्ता बनण्याच्या दिशेनेही चीनने दमदार पावले टाकली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर या देशाने जगाची बाजारपेठ काबीज केली आहे. चीनच्या मॉडेलचे अनुकरण करण्याचा अनेक देशांना मोह अवरला नाही. सध्या हा देश 'कोरोना आणि बर्ड फ्लूने' ग्रस्त आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

आता आपण माहिती करून घेऊया अशाच काही महाभयंकर साथीच्या आजारांबद्दल...

प्लेग, देवी, पटकी, टायफॉईड, डेंग्यू, पोलिओ,एड्स आशा विविध साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला चितेंत टाकले होते. यातील प्लेग आणि देवी या दोन रोगांवर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. १९७५ साली देवी रोगाचा भारतात रूग्ण आढळला होता. २००१ सालानंतर दूषित पाणी पिण्याने होणारा नारू हा रोग सापडलेला नाही. मार्च २०१४साली जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे.आता एड्स, चिकुनगुनिया आदी साथी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

‘प्लेग’ हा रोग ऐकताना आणि वाचताना अंगावर काटा उभा राहतो. युरोप खंडात तिसर्‍या शतकापासून या साथीचा डंका वाजत आला आहे. जगाच्या इतिहासात या रोगामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. १८९० पर्यंत आपल्या भारतात या रोगाचा शिरकाव झाला नव्हता. १८५५मध्ये चीनमध्ये सुरू झालेली प्लेगची साथ सर्वांत मोठी समजली जाते. ती सुमारे आठ वर्षे चालली आणि त्यात सुमारे एक कोटी नागरिकांचा जीव गेला. चीनमध्ये आलेली ही साथ भारतभर पसरली. या रोगाने युरोपमध्ये २५ टक्के जनता दगावली,  १८६४मध्ये वर्षभरात पाऊणलाख रुग्णांचा जीव गेला.

 पुण्यात प्लेगची साथ १८९७ मध्ये पसरली होती. त्यात असंख्य रूग्णांचा जीव गेला. संपूर्ण पुण्यात जीवघेणी साथ पसरल्यानंतर ब्रिटिशांनी १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू केला. 
( कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महामारी रोग कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे.COVID-१९ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी संशयितांवर पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने आदेश दिला आहे.)
पुण्यातील कॅन्टोनमेंट क्षेत्र आणि उपनगरातील उंदीर नष्ट करण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वाँल्टर चार्ल्स रँडने लष्कराची मदत घेतली. इंग्रज जवान घरात जबरदस्तीने फवारणी करून घेऊ लागले. आरोग्याच्या दृष्टिने ही जबरदस्ती योग्य वाटत असली तरी, दुसरीकडे फवारणीच्या नावाखाली इंग्रज घरातील संपत्ती लुटत, आयाबहिणीच्या अब्रुवर हात घालत असे अनेक पुरावे इतिहासात आढळतात. 

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून इंग्रजांच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे’ हा अग्रलेख याच संदर्भातला आहे.. पुढे काय झाले ? हे तुम्हाला माहितच आहे. रँडच्या जुलमी कारभाराचा बदला चाफेकर बंधूंनी घेतला.

सामाजिक, शैक्षणिक कार्यात हिरहिरीने सहभागी असणार्‍या सावित्रीबाई फुले यांना प्लेगपीडितांचे हाल पहावले नाहीत. त्यासाठी त्यांनी पीडितांसाठी पुणे शहराजवळ असलेल्या ससाणे यांच्या शेतात दवाखाना सुरू केला. स्वतः सावित्रीबाई फुले यांनी पीडितांची सेवा केली, एवढेच नव्हेतर पीडितांग्रस्तांच्या कुटुंंबांना धीर देण्यासाठी घरोघरी जात. ही सेवा करता करता सावित्रीबाईंनाच प्लेगची लागण झाली यात त्यांचा अंत झाला. समाजाची सेवा करताना सावित्रीबाईंना एकप्रकारे वीरमरणच आले.

९०चे दशक. महाराष्ट्रात १२ आँगस्ट १९९४ साली बीड जिल्ह्यातील मामला गावात प्लेगचा रुग्ण सापडला होता. तत्कालीन सचिव एन.रघुनाथ यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या ८१ होती. त्यात मामला गावात ४७ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली होती. याचकाळात शेजारच्या गुजरात राज्यात असे रूग्ण आढळून आले होते.

‘डेंग्यू’ हा चीनमधून शिरकाव झालेला हा विषाणू जन्य आजार आहे. हा आजार प्रथम चीनमधील ‘जीन’ या राजवंशात आढळून आला. इतिहासाच्या दप्तरात १७ व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे सापडतात इ.सन १७७९आणि १७८०मध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आले.  या आजारामुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या खंडांत मोठी जीवित हानी झाली होती. हा आजार जगभरातील १०० हून अधिक देशात पसरला आहे.

भारतात १९६३ साली कोलकाता येथे डेंग्यूची पहिली मोठी साथ आली होती. त्यानंतर संपूर्ण देशात या रोगाचा प्रादुर्भाव झाला. चार वर्षांपूर्वी आपला महाराष्ट्र डेंग्यूंचा विळख्खात सापडला होता. हजारोहून अधिक नागरिक डेंग्यूने ग्रसले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात डेंग्यूचे १९०दशलक्ष रुग्ण आहेत, त्यापैकी ९६ दशलक्ष रुग्णांना उपचारांची आवश्यकता आहे. आपल्या भारत देशात डासांची पैदास रोखण्यासाठी योग्य ते उपाय न केल्यामुळे दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २५टक्क्यांनी वाढ होते, अशी आकडेवारी सांगते.

‘स्वाइन फ्लू’  ह्या रोगाचा मुद्दामहून उल्लेख करत आहे, रोग तसा अमेरिकेतून आला आहे.  २००९साली भारतात या रोगाने हाहाकार माजवला होता. पुणे व मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने या रोगाने ग्रसले होते.

चीन हा जगात डुकराच्या मांसाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावरचा देश आहे. सन २०१८साली या देशात आफ्रिकन स्वाइन ताप पसरण्याच्या भीतीने १४५०० डुकरांची कत्तल करण्यात आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये चीनमध्ये आफ्रिकन स्वाइन तापाचा रुग्ण सापडला होता तेव्हापासून चीनमधील अनेक शहरांत डुकरांमध्ये हा विषाणू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी संसर्ग झालेले पशुधन व डुकरे नष्ट करणे हा एकमेव मार्ग असतो. चीन सरकारने ही काळजी घेत निर्जन जागी डुकरांची कत्तल केल्या आहेत,

तात्पर्य असे की, चीन हा आपला शेजारच्या देश आहे, त्यामुळे इथून कोणत्याही हा रोग आपल्याकडे शिरकाव करू शकतो.

‘नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल’ मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या माहितीनुसार १ डिसेंबर २०१९पर्यंत महाराष्ट्रात २ हजार २७९रूग्णांना स्वाइन फ्लूवर उपचार करण्यात आले . त्यापैंकी  २४२रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर राजस्थान २०८आणि मध्य प्रदेश मध्ये १६५ रूग्ण स्वाइन फ्लूने दगावली गेल्याची माहिती आहे.  १जानेवारी ते १डिसेंबर २०१९ दरम्यान पुणे शहरात १७५रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती.

‘बर्ड फ्लू’ हा चीनमधून प्रादुर्भाव झालेला रोग आहे. हा रोग प्रथम चीनी बदकांमध्ये आला आणि त्यानंतर कोंबड्यांना याची लागण झाली. २००३-०४ साली चीनमध्ये या रोगाने थैमान घातले होते. बाधित पक्ष्याचे विषाणू मानवाच्या शरीरात जात असल्यामुळे असंख्य नागरिक या रोगांने ग्रस्त झाले होते. या रोगांमुळे भारतातला पोल्ट्री व्यवसाय कोलमोडून पडला होता. लाखो कोंबड्यांना ठार मारण्यात आले होते. आजची परिस्थिती लक्षात घेता भारतातील  छोट्या-मोठ्या पोल्ट्री धारक व्यावसायिकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या १ फेब्रुवारी २०२० च्या बातमीनुसार, हुनान प्रांतामधील शायोयांग शहरातील एका पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लूची लागण झाल्याची चीनच्या कृषी व ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. फार्ममधील ७८५०कोंबड्यांपैकी ४५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून तसेच बर्ड फ्लूमुळे एकूण १७हजार ८२८ प्रांण्याना ठार करण्यात आले, अशी बातमी आहे.

सध्या जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे वायू प्रदूषण. जर्मनीतील मेन्झ येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे प्रमुख लेखक जोस लेलीवेल्ड यांच्या मते, "वायू प्रदूषणाचा एक (साथीचा रोग) सर्वत्र जगभरात जगण्याचे प्रमाण तीन वर्षांनी कमी होते आणि यामुळे दरवर्षी ८.दशलक्ष लोक अकाली मृत्यू होतात."पुढे म्हणतात, सर्वाधिक फटका बसणारा भाग आशिया आहे, जिथे सरासरी आयुष्यमान चीनमध्ये १.२ वर्षे, भारतात ९.९ वर्षे आणि पाकिस्तानमध्ये ८वर्षे कमी होते.

२०१४ सालच्या सुमारास मुंबईत दररोज सरासरी वीसजणांचा टीबीने मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने प्रसिध्द केला होता. टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूची मुंबई ही भविष्यात राजधानी होईल, असा निष्कर्षही या संस्थेने काढला होता.

या जगात असे अनेक आजार आहेत जे ऐकूनही आपल्याला आश्‍चर्य वाटेल. ते आपल्या सामन्य आजारांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यावरचे उपाय देखील. 

 कोरोना' आजारातून संपूर्ण जगाची सुटका होण्यासाठी  प्रार्थना करूया.
सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय

©विकास पांढरे

संपर्क :-९९७०४५२७६७
संदर्भ माहिती : आंतरजालावरून 

(तळटीप - मी आरोग्य क्षेत्रातील जाणकार नाही. अथवा इतिहास अभ्यासक देखील नाही. त्यामुळे वरील उपलब्ध माहिती, आकडेवारीमध्ये चुका झाल्या असतील तर क्षमा असावी.)

सोमवार, २१ मे, २०१८

स्मरण एका महानायकाचे..!



तारुण्यात उत्साह आणि जोश असतो. याकाळात जीवनाची टेकडी चढताना समोर मृत्यू दिसत नसतो. तो पलीकडच्या बाजूला पायथ्याशी असतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबतीत असेच घडले. राजीवजीच्या मृत्यूला २५ वर्षे उलटली तरी त्याचे कार्य आजही उपयोगी पडते आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृती दिन.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची पैलू उलगडून दाखवणारा हा लेख.

स्वातंञ्योत्तर भारतीय राजकारणातील चाणाक्ष नेते, विज्ञानाचे पुरस्कर्ते, परराष्ट्र धोरणाचे अचूक ज्ञान, जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती लाभलेल्या राजीव गांधी यांना आपल्या देशातील सर्वाधिक तरूण पंतप्रधान म्हणून पंतप्रधान होण्याचा मान मिळविला. जेव्हा ते पंतप्रधान बनले तेव्हा ते चाळीस वर्षाचे होते. त्यांची हत्या झाली तेव्हा ते ४६ वर्षाचे होते. इतक्या छोट्या आयुष्यात त्यांनी विविध कार्य करून देशाला नवी दिशा आणि आशा प्राप्त करून दिली. त्यामुळेच ते अजब रसायन ठरतात. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी आयुष्यात जे मिळवले ते आठवण्याचा दिवस. राजीवजी भूतकाळात रमणारे पंतप्रधान नव्हते. भविष्याकडे आशेने पाहत बसणारे ते एक चिरतरुण पंतप्रधान होते. राजीवजी जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा देशाची सद्यस्थिती व वर्तमानकाळ केविलवाणा होता. 

 १९८७-८८ च्या काळामध्ये देशांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी 'भारतीय माकडाच्या लष्कराला हाकलून लावा' हा "पीपल्स लिबरेशन फ्रण्ट"चा लोकप्रिय नारा होता. सिंहल लोक भारताकडे वाकड्या नजरेने पहात होते. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मुळे संपूर्ण पंजाब आगीत भडकून निघाले होते. भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी धर्मत्याग करून दहशतवाद स्वीकारला होता. अशा परिस्थितीत राजीव गांधी यांनी चाणाक्षपणाने पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख नेते संत हरचंद सिंग लाँगवाले यांच्या सहमतीने उग्रवाद्यांसोबत सामंजस्य करार केला. परंतु, संत लाँगवाले यांच्या हत्येमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. पण राजीवजी शीख नेत्यांचे समर्थन जिंकण्याचा प्रयत्नात होते. अशा अंदाधुंदीच्या काळात राजीव गांधी यांना २१ व्या शतकाचा सुवर्णकाळ स्वस्थ बसू देत नव्हता. या तरूण पंतप्रधानाने आपले लक्ष नवनिर्मितीकडे वळवले. त्या प्रकाशात व आशेवर ते जगत होते.

ज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सॅम पिञोदा एका लेखात म्हणतात." राजीव गांधी यांच्याकडे दूरदृष्टी होतीच. परंतु त्याशिवाय त्यांचाकडे उत्कृष्टता देखील होती. त्यांना राजकारणाविषयी आत्मविश्वास होता. भारताला २१ व्या शतकात नेण्याची दूरदृष्टी आणि आपल्या देशातील गरज आणि आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत त्यांना खूप चांगली समज होती. जेव्हा कोणीही या गोष्टीचा विचार देखील करत नव्हता. भारतासारख्या विकसनशील देशात तंञज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावेल, हे त्यांच्या लक्षात आले. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी तंत्रज्ञान प्रमुख भूमिका बजावेल याबाबत ते आश्वस्त झाले होते. दूरसंचार ही विकासाची किल्ली ठरणार हे त्यांना समजले होते. कॉम्प्युटर उपयोगासाठी मुख्य प्रवाहात त्यांनीच आणले. सरकारच्या व्यवस्थापन पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवून देखील त्यांनीच आणले. नवीन उपकरणांच्या मदतीने ते बैठका घेऊ लागले. संपूर्ण व्यवस्थापनामध्ये त्यांनी बदल घडवून आणलेल्या परिवर्तनामध्ये आधुनिक विचार आणि नवीन गोष्टी होत्या." यावरून राजीवजीच्या दूरदृष्टीची कल्पना लक्षात येते. एवढेच नव्हे तर जागतिक पातळीवर सुध्दा राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला.

एक नमूद करण्यासारखे योगदान म्हणजे त्यांनी वैश्विक अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी योजना तयार केली होती. 'राजनैतिक' बाबतीत बोलायचे झाले तर राजीव गांधी यांनी यांची १९८८ सालची चीनची भेट महत्त्वाची ठरली. दौर्‍यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंध चिघळलेले होते. अशा परिस्थितीत राजीवजींना स्वस्थ बसू वाटत नव्हते. बीजिंगमध्ये राजीव गांधी यांनी देंग झायोपिंग यांची भेट घेतली. यावेळी जोरदार वाटाघाटी आणि चर्चा केल्यामुळे संघर्ष आटोक्यात आला. त्यातून देशाला नव्या संधी उपलब्ध झाल्या. राजीव गांधी यांनी हा वाटाघाटीचा मार्ग तयार केल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीन भेट यशस्वी होऊ शकली. एवढेच नव्हे तर राजीव गांधी यांची सार्क परिषदेवर विशेष छाप होती.  कठीण प्रसंगात आणि प्रश्नांमध्ये सहभागी होण्याची आणि ते हाताळण्याची त्यांची  तयारी असायची. वंशिक प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेचे जे.आर.जयवर्धने यांच्याशी बोलणी केली होती. पण फारसे यश मिळाले नाही. 
राजीव गांधी यांच्या काळात भारतात दूरदर्शन संच घराघरात पोहोचला. त्यांनी दूरदर्शन आणि माहिती व प्रसारण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन पारंपरिक दर्शन घडवले आणि समाजातील चांगल्या मूल्यांचे कार्यक्रम तयार करण्याची सूचना दिल्यामुळे 'रामायण आणि महाभारत' सारख्या लोकप्रिय मालिकाची निर्मिती होऊ शकली. 

देशात उच्चस्तरीय आणि आधुनिक पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी १९८६ साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचे जीवन उंचावण्यासाठी आणि त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारची संस्था असलेली जवाहर नवोदय विद्यालय पध्दत त्यांनी सुरू केली. देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विरोधी पक्षातील अर्थतज्ज्ञ डॉ. मधु दडवंते यांचे मार्गदर्शन घेत. विकासासाठी येणाऱ्या एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे खर्च केले जातात हा अंदाज व्यक्त केला होता. आज भारतात जो तांत्रिक विकास झाला तो राजीवजींनी केलेल्या अथक प्रयत्नामुळेच शक्य झाले आहे.

राजीवजीच्या काळात एका स्विडीश कंपनी कडून बोफोर्स बंदूक खरेदीसाठी देण्यात आलेल्या कंञाटामुळे राजकीय सत्तेला धक्का बसला होता. जनतेच्या मनात चूकीची भावना झाली होती. त्यातच राष्ट्रपती गियानी सिंग यांच्याशी वाद घातल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शाहबानो प्रकरणात पारंपरिक मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हिंदुत्व असलेली जनता भडकली आणि जनतेचे मन वळविण्यासाठी त्यांनी राम मंदिराचा मुख्य गाभारा खुला करून रामलल्लाचे दर्शन घडविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजीवींजीना जागतिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी दक्षिणेकडे गेले असताना एका महिला (एलटीटीईने )आत्मघातकी बाॅम्बरने राजीवजींचा जीव घेतला. भारताला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणाऱ्या महानायकाचा शेवट असा झाला असला तरी त्यांनी देशाला नवा राजमार्ग तयार करून दिला. याच मार्गावरून भारताचा प्रवास सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभरात ' विरोधी दहशतवाद दिन' म्हणून साजरा केला जातो. मानवजात विरूद्ध असणाऱ्या प्रत्येक प्रवृत्ती विरूद्ध सर्वांनी पुढे येऊन उभे राहिले पाहिजे. हाच या दिनाचा संदेश होय.
©विकास पांढरे,९९७०४५२७
( सदर लेख दैनिक सुराज्य,सोलापूर मध्ये २१ मे २०१५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)

बुधवार, ७ मार्च, २०१८

तिची कहाणी


रोजच्या जगण्यातून, ओळखीचा,अनोखेळीचा रास्ता पार करताना मला आयुष्यात ध्येयाने वेडावलेली,अफाट संघर्ष करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या आयाबाया भेटल्या, विशेष,स्वतःची बुध्दी व ऊर्जा समाज हितासाठी वापरणाऱ्या सुजाण महिलांही नजरेस पडल्या. या प्रत्येक महिलांची एक स्वतंत्र अशी कहाणी आहे, गाथा आहे. ही गाथा विस्ताराने मांडणे आवश्यक आहे. पण आज फक्त या आयाबायांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करेन. या आयाबाया स्वतः तर मोठे कार्य घडवतातच पण दुसऱ्यासाठीही एक मोठा आदर्श निर्माण करतात.

दीड एक वर्षापूर्वी मयुरी खैरे ही तरूणी भेटली. गंभीर आजाराला तोंड देत असतानाही सकारात्मक दृष्टीने आनंदी आयुष्य जगणारी आणि मध्य प्रदेशात शिंपल्याची यशस्वी शेती करणाऱ्या मयुरीने भुरळ घातली. मयुरीची कहाणी संघर्षशील आहे.

बुलढाणा जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात मयुरीचा जन्म झाला. अकरावीत असताना तिला किडनीच्या दुर्दम्य आजारांनी ग्रासले.ऐन उमेदीचे चार पाच वर्षे आजारपणात निघून गेली.  आजारपणात तिने काँलेलजा न जाता पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात मयुरीने अनेक महनीय व्यक्तीचे चरित्रे वाचून काढली. समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकाने तिच्यातली ऊर्जा बाहेर पडली,आणि दिशाच बदलली.

पदवी नंतर ती आजारपणाला विसरून गेली. पुण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्गाला जाऊ लागली. इथेच तिला समविचारी मित्रांची ओळख झाली. या तरुणांनी ऊर्मी नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. ही संस्था समाजाच्या हितासाठी काम करु लागली. एकदिवशी तिच्या वाचनात 'मोत्याची शेती' हा लेख आला. या लेखाने ती झपाटून गेली. तिच्या घरी शेती नव्हती,शेतीबद्दल तिला फारसे काही माहिती ही नव्हते. तरीही तिने ही नवी वाट धरली.

एक ते दीड वर्षाच्या रिसर्च  नंतर तिने मध्य प्रदेश मधील नर्मदा नदीच्या काठी मोत्यांची शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी शुभम पाटीदार युवकाने मोलाची साथ दिली.


मयुरी सांगत होती, "आम्ही, आता पर्यंत एक मोत्याच पिक यशस्वीरित्या काढलं आहे. बाजारात डिझायनर मोत्यांची प्रति नग सरासरी किंमत २५०-३०० रुपये आहे. आमचा आज पर्यंतचा खर्च वजा करता चागल्या प्रकारे प्रॉफिट राहिल आहे. अगदी काही हजारांच्या भांडवलावर सुरु होणारी ही मोत्यांची शेती लाखोच्या घरात प्रॉफिट कामवून देते.

मार्गदर्शन करताना मयुरी खरे


त्यामुळे "low investment and high profit चा हा bussiness" आहे असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे आणि आपली आर्थिक स्थिती सुधारावी हा आमचा प्रयत्न आहे."

शिंपल्याची शेती उद्योग

सध्या हा प्रोजेक्ट मध्य-प्रदेश आणि गुजरात मध्ये सुरु आहेत. लवकरच महाराष्ट्रात हा प्रोजेक्ट सुरु करण्याचा तिचा मानस आहे.

इंचलकरंजी इथल्या दिव्या मगदूमची कहाणी तर अफलातून आहे.  दोन वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. नवऱ्याने सोडून दिलेली बायको म्हणून समाजाकडून मिळालेली अवहेलना पाहून त्या अस्वस्थ व्हायच्या.

भय,भीती,भोग, बाईपण तिने सर्व सोसले, यातनेतून तिला सूर गवसला. न डगमगता, समाजाची तमा न बाळगता त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या. रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना करून अनेक परित्यक्ता, घटस्फोटित, पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे.

मोर्चाचे नेतृत्व करताना दिव्या मगदूम

"आईबापाची परिस्थिती हालाखीची.नीट शाळा ही शिकता आलं नाही. न्हानं आलं तवा बापानं लगीन लावून दिलं.तव्हा १४ वर्षाची असेन. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाचं काय माझं नशीबचं फुटकं. नवऱ्याकडून चांगली वागणूक कधीच मिळाली नाही. तीन-चार महिन्याचे गरोदर होते तव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आईबापाचं अस्सं..कुठं जायचं ठरवलं तर जवळ पैसे नव्हते. कधी कधी जीव देऊन मरुन जावं,असं वाटायचं. पोटात गोळा होता.त्याला वाढवयाचं ठरवलं. 'सोडलेली बाई' म्हणून आयाबायाकडून हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांची नजर ही वाईट असायची. न डगमगता पुढे जात राहिले, सूर गवसला, विस्कटलेली घडी सावरू लागली. बचत गटाची कामे करू लागली. पैसे मिळत गेले, बचत होत गेली. माणसे भेटत गेली. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला आहेत, त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले, तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. पीडित महिलांचा मोर्चा काढले,जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना केली. १३०० बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केले आहे. २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला आहे. निराधार महिलांसाठी 'जिव्हाळा' आश्रमाची निर्मिती करण्यात आली असं दिव्या मगदूम यांनी सांगितले.

पुरस्कार स्विकारताना दिव्या मगदूम


रणरागिणी क्रांती सेनेचे काम १३ जिल्ह्यात चालते. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी हक्कांचे व्यासपीठ बनले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्या हस्ते त्यांना महिलेचा पुरस्कार मिळाला आहे.

अमरावती (मोर्शी) येथील महिला पत्रकार संगीता ढोके यांची यशोगाथा प्रेरणा देणारी आहे. पाच वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. त्या 'हिंदुस्थान समाचार' ला महिला रिपोर्टर काम करत होत्या.

 पत्रकारितेत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आणि मानधनावर ती समाधानी नव्हती. पत्रकारितेवर कुटुंबांचा सांभाळ होऊ शकत नाही, ही जाणीव तिच्यात निर्माण झाली. मुक्त पत्रकारिता करत करत ती शेळीपालन व्यवसायाकडे वळली. ही नवीन वाट पार करताना खडतर सामना करावा लागला. शिकली-सवरलेली मुलगी शेळीपालन करत असल्याचे पाहून त्यांना बघून आजूबाजूच्या बाया हसायच्या. संगीताने या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या हिंमतीने शंभर शेळ्यांचा शेड उभा केला अन्  व्यवसायाला कलाटणी मिळाली. आज त्यांचा व्यवसाय अर्ध्या कोटीत गेला आहे.निव्वळ नफा म्हणून वर्षाला ती २० ते २५ लाख रूपये मिळवत आहेत.
संगीता ढोके

"पत्रकारिता सोडून शेळी व्यवसायाचा मार्ग पत्कारले तेव्हा आजूबाजूचे लोक नावं ठेवू लागली. घरातला पाठिंबा असल्यामुळे सर्व गोष्टीवर मात करत गेले. अमरावती, यवतमाळ, पुसद,नागपूर, वर्धा येथील जनावर बाजारात मी सारखी दिसू लागली तेव्हा व्यापारी लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघत. काही लोक धंद्यात फसवणूक करत. जनावर बाजारात एकटी बाई काय करत आहे हे पाहून बायामाणसं ठकमक बघत. या व्यवसायात मी समाधानी असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरावे, यासाठी मी प्रयत्न करत आहे." असं संगीता ढोके यांनी सांगितले.

आटपाडी, बार्शी, अहमदनगर, नांदेड, वाशीम आदी ठिकाणी ती शेळ्या विकण्यासाठी आणि घेण्यासाठी येत असते. संगीता हिच्या कामाची दखल घेऊन विविध संस्थेकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

औरंगाबादची सविता काळे यांची ह्दयद्रावक कहाणी आहे. त्यांचा जालना शहरातल्या एका घरंदाज कुटुंबात झाला. पाच वर्षापूर्वी यांची ओळख झाली.

सविता काळे

तिला एक भाऊ व तीन बहिणी आहेत. सविता ही शेवटची मुलगी. घरचा डोलारा सांभाळण्यासाठी  आजी -आजोबांना मुलगा हवा होता. पण त्यांच्या आईला मुलगाच होत नव्हता. सवितांच्या आजी आजोबांनी अनेक मुली जिवंत पुरल्या आहेत. हा भोग सविता हिच्या वाट्याला आला. पण तिच्या भावाने त्यांना वाचवले. सविता जन्माला आल्या त्यादिवशी, प्रसुत आई झोपेत असताना घरातल्या मोठ्या लोकांनी ( वडील सहभागी नव्हते) तिला कापडात गुंडाळून दूर खड्ड्यात पुरत असताना तिच्या मोठ्या भावाने आरडाओरडा करून त्यांना वाचवले. सवितांच्या मोठ्या भावाला समज आली होती, आजपर्यंत आपल्या एक दोन बहिणी आपल्याच लोकांनी पुरल्या आहेत याची जाणीव त्याला झाली होती. आता आपली जन्माला आलेली बहिण मारू द्यायची अशी हिंमत बाळगली. त्यामुळे सविता त्या दुर्देवी प्रसंगातून वाचल्या नसत्या तर आज एका नामांकित वसतिगृहाची अधिक्षका झाल्या नसत्या.

आई समवेत सविता काळे


"आज मी ज्या ठिकाणी आहे, समाधानी आहे. यामध्ये माझ्या भावाचा मोठा वाटा आहे. भावामुळेच मी वाचू शकले. आपल्या समाजात मुलींना किती दुय्यम स्थान आहे. हे माझ्या बालपणीच्या कटू प्रसंगातून लक्षात येते. आजही आपल्या समाजात मुलींचा जन्म झाला की, तिचा बळी दिला जातो.
दहावीत असताना माझं लग्न झाले. वडिलांचे अकाली छत्र हरपल्याने मला प्रेम मिळाले नाही. पण माझ्या भावाने मला कधीच काही कमी केले नाही. मला मरणाच्या दांडेतून वाचवले,तो माझ्यासाठी देवच होता.देवानेही त्याला लवकर वर बलावले. आज तो असता तर खूप आनंदी झाला असता."अशी सविता आपली आपबीती सांगत होत्या.

सविता या संवेदनशील व्यक्तीमत्व असून, तिने अकाली निधन पावलेल्या भावाच्या मुलांचे संगोपन करून लग्न लावून दिले आहे.
बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

अँड. विंदा यांनी सावित्रीबाई विद्यापीठ, पुणे येथून एल.एल.एम चे शिक्षण पूर्ण केले आहे. स्वतः उच्चशिक्षित असूनही ती आदिवासी महिलांसाठी काम करत आहे. दोन वर्षांपासून तिच्या संपर्कात आहे.

  • नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कोलाम व पानशेत भागातील कातकरी या दोन आदिवासी जमातातील महिलांचे प्रश्न,समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

                                                 आदिवासी महिला समवेत अँड.विंदा
  • या महिलांच्या समस्येचा मूळापासून शोध घेण्यासाठी त्या किनवट,पानशेत व इतर आदिवासी भागात फिरत असतात. पानशेत भागातील कातकरी समाजाला जमीन उपलब्ध करण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत आहेत.
"माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये महत्त्वाचा संबंध आहे. आदिवासी बांधवांचा निसर्गाशी अधिक नातं आहे. तो जंगलात जन्मतो आणि जंगलातच मरतो. या समूहाचा बाह्य जगाशी संबंध आला नाही, म्हणून तो मागे आहे. आज जंगलतोड वाढत आहे. माणूस आणि निसर्गाचे अंतर कमी झाले आहे. आदिवासी बांधवांचे जगण्याची उमेद आपण हिरावून घेतलो आहे. या समाजाच्या विकासासाठी हातभार लागला पाहिजे, या मानवी भावनेतून या समाजाशी माझे नाते निर्माण झाले आहे."असे विंदा यांनी सांगितले.
अँड. विंदाचा अनेक समाज संस्थाशी परिचय आहे. त्यातून त्या संशोधन करत आहेत.

मुंबईत आल्यावर वैदू समाजातील  दुर्गा गुडिले या तरूणीची ओळख झाली. वैदू समाजातील जातपंचायतीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वर्षभरापूर्वी दुर्गाने बंड पुकारला होता. ठरलेला बालविवाह मोडीत काढून तिने पंचाचा फतवा धुडकावून लावला होता. दुर्गा मुंबईत राहणाऱ्या वैदू समाजासाठी काम करत आहे.

विदेशी नागरिकांनी वैदू वस्तीला भेट दिली

समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी झटत आहे. जनजागृती करत आहे. समाजातील ११२ शाळा बाह्य मुलांना मुख्य प्रवाहात तिने आणले आहे. बचतगटाच्या माध्यमातून ५८ महिलांना एकत्र आणून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रात्रीच्या वेळी ती प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवते. स्विझरलँड येथील नागरिकांकडून वैदू समाजातील काही मुलांना शैक्षणिक मदत मिळाली आहे.
                                                       पुरस्कार स्विकारताना दुर्गा
दुर्गा हिच्या कामाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा मानाचा रुक्मिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नागपूरचे महिला क्राईम रिपोर्टर नीता सोनवणे हिचे कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. महाविद्यालयात असताना तिने हे क्षेत्र निवडले. दहा पंधरा वर्षापूर्वी फिल्डवर जाऊन पत्रकारिता करणाऱ्या महिला निगैण्य असायच्या. क्राईम पत्रकारितेमध्ये महिलांना संधी नसायची. नीताने सर्व आव्हाने स्विकारून आपली पत्रकारिता यशस्वी करून दाखवली. उपराजधानी नागपुरात ती एकमेव महिला क्राईम रिपोर्टर असावी. कायद्याचा प्रचंड अभ्यास, प्रचंड जनसंपर्क, अधिकाऱ्यांशी,आरोपींशी संवाद साधण्याची शैली लाजवाब आहे. तिचे ओळख पाच सहा वर्षापूर्वी झाली.

                                                              नीता सोनवणे
दक्षता, पोलीस टाइम्स आणि कालीगंगा सारख्या नामांकित दैनिक व साप्ताहिकात तिच्या गुन्हेगारी जगताविषयीच्या स्टोऱ्या प्रसिद्ध होत असतात.
क्राईम जगतात महिला पत्रकार म्हणून नाव कमावलेल्या नीताने आपली संवेदनशीलता जपत अनेक पिडीत महिला व पुरूषांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्टीग करत असते. लोकांना कायदा म्हणजे काय? कलमे, पोलीस ठाण्याचा संपर्क, अशी माहिती मिळावी म्हणून तिने एक पुस्तक लिहिले आहे.

  .                                                 पुस्तक प्रकाशन करताना नीता व इतर
या सर्व महिलांना आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले. कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या कर्तुत्ववान महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सलाम..!

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
Vikaspandhare3@gmail.com

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

मुखवट्यांचे जग







ठिकाण तुळजापूर वेस,वार मंगळवार, सकाळची वेळ,  थोडीशी घाईबडीची, नोकरदार, कामगारांना कामांवर जाण्याची गडबड ... रस्त्यात एक चारचाकी बंद पडलेली...  अचानक दोन पोलिस येतात... गाडीला परवाना नाही... तुमच्याकडे लायन्सेस नाही, अटक व्हा नाहीतर लाच द्या... नाष्टा माझ्याकडे बील तुमच्याकडे.... मोबाईल नंबर 99 सतरा कुठेही उतरा... लोकसंख्या दीडशे पुढारी तीनशे..... दंगल झाली की चाललो घरला... अशा एकाहून एक हजरजबाबी विनोदाने तुळजापूर वेस मधील नागरिक पोटभरून हसत होते, बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद मिळत होती. हा प्रसंग दोन वर्षापूर्वीचा सोलापूर शहरातला आहे.

महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या ४२जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. कुठेच हक्काची जमीन नसलेल्या,पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजनातू प्रबोधन करणाऱ्या बहुरूपी समाजाच्या लोककलेला शिवकाळापासून मानाचे स्थान आहे. छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला.

हा समाज संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरी राज्यवार आणि विभागवार यांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत नाही. या सर्व गटांसह महाराष्ट्रात विखुरलेल्या बहुरूपी जमातीची लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ हजार असावी असा अंदाज आहे.

 छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला
मराठवाडय़ात या बहुरूपींना राईरंग म्हणतात, नळदुर्ग शहराच्या बाजूला येडोळा गावात हा समाज मोठ्या प्रमाणात राहतोय. उमरगा चौरस्ता वर समाजाचे दर्शन होते. सोलापूर शहरात समाजाचे वास्तव आहे. भंडारा जिल्ह्य़ात यांना भिंगी म्हणतात. पात्राला (भूमिकेला) अनुसरून आपला वेश जलदपणे बदलण्यात हे पटाईत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. काही गट हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माचे आचरण गुण्यागोविंदाने करतात. अमरावतीचे बहुरूपी यांच्यापैकीच आहेत. या जमातीच्या बहुतेक महिला ठिगळांच्या साडय़ा नेसलेल्या दिसतात. पुरुषांच्या वेशाचे धोतर व बंगाली टोपी हे वैशिष्टय़ आहे. बहुरूपी समाजातील महिलांचे स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येते पण चर्चेत सहभागी होता येत नाही.


बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता.

शिवशाही काळापासून आपल्या कलेमधून लोकांचे मनोरंजन करत असलेल्या बहुरूपी समाज आज दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वीची काळी अभंग, भारूड हे जरी यातून मनोरंजन होत असले तरी, यामध्ये अधात्म जास्त होत असे, त्यामुळे सर्वसामान्य, अडाणी लोकांना बहुरूपी समाजाचे विविध रूपे हेच मनोरंजनाचे मुख्य साधने होती. सकाळ, दुपार अन संध्याकाळची एखाद वेळ साधायची नि घराघरात, दुकानात थेट धडक द्याचयी, अन गावचा पोलीस पाटील,सरपंच, कारभारी यांना गोळा करून, उपस्थितांचे मनोरंजन करायचे, कधी हनुमान तर कधी वाघ, पोटात खुपसलेल्या सुरा आणि विविध मुखवटे धारण करणारा हा बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता. 
 बहुरूप्यांच्या सोंगाना तितकीच दाद मिळायची अन बिदागी ही.आज गाव असो, वा शहर बहुरूप्यांना सोंगाना कुणी विचारत नाही. कारण आजच्या आत्याधुनिक मनोरंजनाच्या दुनियेत बहुरूप्यांची पारंपारिक कला जवळजवळ लोप पावत असून, केवळ हा सोंगात बाद झाला नाही तर गावगाडयातील या समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. हा समाज फिरस्ता असला तरी, त्याला हक्काचे घर आहे ना जागा, पोटासाठी सतत स्थलांतर होत असल्याने, ना कुटुंबाकडे लक्ष देता येत ना मुलांच्या शिक्षणाकडे. उपजत कलागुणांचा कलाविष्कार असताना चित्रपट माध्यमकर्मींचे लक्ष ही त्यांच्याकडे जात नाही. त्यातच मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे बहुरूपी समाज आणि त्याच्या कलेकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


बहुरूपी सुदाम साळुंखे,संतोष शिंदे

शतकानुशतकापासून कलेवर पोट भरणाऱ्या बहुरूपी समाजाला आज अनेक संकटांना तोंड दयावं लागत आहे. स्वत:चे दु:ख लपवून लोकांचे मनोरंजन करणे ठीक आहे. या कलेतून पूर्वीसारखी बदागी मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे प्रश्न सोडवणे कठिण जात आहे. विशेष म्हणजे मुलं हुशार असूनही त्यांना म्हणावे तसे शिक्षण देता नाही अशी खंत बहुरूपी सुदाम साळुंखे यांनी व्यक्त केली.



बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद 
  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाचे साधने वाढली असली तरी, आमच्या मुलांना पारंपारिक कला जिवंत राहावी यासाठी आम्ही त्याना धडे देत असतो, नवव्या पिढीपासून ही परंपरा जोपसण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया बहुरूपी संतोष शिंदे यांनी दिली.
 मागील ६५ वर्षापासून हा समाज विशिष्ट भागात स्थायिक झाला नाही. भटक्या अवस्थेत राहिल्याने शासन दरबारी या समाजाची नोंद नव्हती.समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला पण यानंतरही शासकीय योजनांपासून हा समाज वंचित आहे. अद्यापही या समाजाला सरकारकडून कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. यामुळे हा समाज आजवर उपेक्षित राहिला आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( सदर लेख सोलापूर तरुण भारत मध्ये दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

दंगलीतले दोन दिवस


मंगळवार,२ जानेवारी २०१८

कार्यालयीन कामासाठी मी १ जानेवारी पासून नगर जिल्ह्याच्या (उत्तरेला) ग्रामीण भागात फिरत होतो. मजल-दरमजल करत या गावाहून त्या गावात जाऊन काही महनीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन पुढचा रस्ता शोधत होतो. रात्रभर प्रवास सुरु होता. रात्री श्रीरामपूरला मुक्काम ठोकला. सकाळी सात वाजताच उठलो. अंघोळ केली. पुन्हा शहरातील काही व्यक्तींची भेट घेऊन पुढच्या प्रवासाचा बेत आखला.  श्रीरामपूर बसस्थानक समोरच्या कँटीनमध्ये नाष्टा केला. सोबत स्थानिक जिल्हा दैनिक जिल्ह्यातील घडामोडी नजरेत भरत होतो. चहावाला चहा करत होता, पानवाला पानाला कात लावत होता, भज्जीवाला कडईत भजी तळत होता, बाजारहाटसाठी परगावचे लोक येत होती, शाळा,काँलेजला जाण्यासाठी विद्यार्थी एसटीमधून उतरत होती,अशी काही लगबग सुरु होती. खरेतर, श्रीरामपूर हे व्यापारी पेठ. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच. 

दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात मध्यमगती गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या झहीर खानचे हे गाव. त्यामुळे या शहराविषयी उत्सुकतेने  कँटीन चालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. "झहीर खान हा आमच्या गावचा आहे,त्याचा मला अभिमान आहे." सध्या झहीरचे कुटुंब मुंबईत राहते, काही वर्षांपूर्वी त्याचे वडील श्रीरामपूरला आले होते, असे ऐकायला मिळते.
खरे,सांगायचे झाले तर श्रीरामपूरला ना मोठा इतिहास आहे ना भूगोल. इंग्रजी काळात  मध्य रेल्वेचे जंक्शन (बेलापूर) निर्माण झाल्यामुळे येथे मानवी वस्ती वाढली. पुढे साखर कारखाना सुरु झाल्याने झपाट्याने श्रीरामपूरचे गावात,शहरात, तालुक्यात आणि आता जिल्ह्याचे रूप धारण करत आहे. गुजरात, मध्यप्रदेश मधून मारवाडी जैन आले,गुजरात, राजस्थान च्या सीमाभागातून काही मुसलमान आले,  ख्रिश्चन मिशनाऱ्याने आपले बस्तान बसवले, पंजाब हरियाणा मधून शीख बांधव आले असे हे संमिश्र शहर आहे.

 महाराष्ट्रीयन समाजाचे स्थान क्वचित मोठे आहे पण आर्थिक स्थिती सक्षम नाही,असे तो कँटीनचालक सांगत होता. बघता बघता घड्याळात दहा वाजून गेले हे कळलेच नाही. मला ऊसतोड कामगार हाँस्पिटल परिसरात एकाची भेट घेऊन मुलाखत घ्यायची होती. मी संभाषण कमी करून रस्ता धरला. अचानक भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली असून एका युवकाचा बळी गेला असल्याची वार्ता हाहा म्हणताच श्रीरामपूर मध्ये धडकली. सकाळी अकरा वाजपर्यंत शांत असलेले शहर अचानक अशांत झाले. भीमा कोरेगावचे पडसाद श्रीरामपूर मध्ये उमठले. या प्रकरणाची शाहनिशा न करता काही  तरूणांनी दगडफेक केली. शहरातील मध्यवर्ती (शिवाजी चौकात) ठिकाणी काही तरूण एकत्र जमा होऊन घोषणाबाजी करत होते. श्रीरामपूर शहर बंद करत आले. टिव्ही चँनल आणि समाज माध्यमात भीमा कोरेगाव प्रकरणावरून तुंबळ वादसंगर चालू झाला. कोण, कुणाची डोके भडकवत होता? कोण,कुणाला शांत करत होता ? कुणी, पराचा कावळा करून दोन मने दुभंग करत होता. यामागचा हेतू काय आहे  कळायला मार्ग नव्हता.

    शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. चौकाचौकात पोलिसांचा पहारा उभा होता. हा गोंधळ लक्षात घेऊन मी बसस्थानकात येऊन बसलो शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसस्थानकात जमले होते. एसटी विभागाने बससेवा बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थी मित्राच्या घरी,काही विद्यार्थी होस्टेलवर,कुणी नातेवाईकांकडे राहण्याचा बेत करत होते. ज्याला कुणीच नाही, असे बसस्थानकात ताटकळत बसले होते. गावावरुन कुणी तरी आपणाला न्यायला येईल, या विचारात काही विद्यार्थी मग्न होते. शहर रिक्षा बंद असल्यामुळे इच्छित स्थळी कसे पोहोचावे, असाही प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.दंगलीबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने काही काळ शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दुग्ध संस्था व आरोग्य सेवा वगळता तातडीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. संपूर्ण शहरात कफ्यू लावण्यात आली होती. त्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते पण अनामिक भीती वाटत होती. पण सर्व जण जीवाच्या आकांताने सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. एक ज्येष्ठ नागरिकांनी श्रीरामपूर मध्ये १९८६ साली झालेल्या दंगलीचे कथन केले. तर एकाने २०१६ साली श्रीरामपूर दंगलीत ३४ दुकाने कशी जाळली गेली, आणि ती धग संपत असताना अचानक घडलेल्या अघटीत घटनेचे भाव त्या इसमावर उमठले होते. एक महिला आपल्या शेतातील भाजी विकण्यासाठी श्रीरामपुरात आली होती. दंगलीच्या पडसादामुळे ती ना बाजारात पोहचली ना तिची कुणी भाजी घेतली. गावाकडे कसे जायचं हा तिच्यापुढे उभा राहिला होता. जसजशा सूर्य माथ्यावर येऊ लागला तसतसे रस्तावर कुणी नजरेस पडत नव्हते. दुकाने बंद झाली होती, घोटभर पाणी प्यावे म्हटले तर हाँटेल ही बंद झाली होती. दिवसाढवळ्या रस्ते ओस पडू लागली होती. मी एका रिक्षाचालकास आगाऊ पैसे देऊन एका घरी पोहोचलो.

बुधवार, ३ जानेवारी २०१८

भीमा कोरेगावची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला. आदल्या दिवशीच श्रीरामपूरहून बेलापूरला जायचे ठरवले. दुपारचे चार वाजले असतील शहरात बंद शांतता होती. श्रीरामपूरहून बेलापूर आठ किलोमीटरवर आहे. त्यामुळे हा प्रवास सोयीचा वाटला. एका खासगी वाहन चालकास विणवणी केल्यामुळे तो मला बेलापूरला सोडायला तयार झाला. त्या आठ किलोमीटर अंतरासाठी शंभर रुपये मोजावे लागले,असो. रात्रीचा मुक्काम पुण्यनगरीचे वार्ताहर विष्णु डावरे यांच्याकडे केला. सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक जिल्हा दैनिक वाचत असताना एक बातमी नजरेत भरली. त्या बातमीने मी खूप अस्वस्थ झालो.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे श्रीरामपूर मध्ये शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. मॉडेल इंग्लिश स्कूल मधील तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रद्धा आदिक (८वर्ष) ही विद्यार्थिनी घरी पोहचलीच नसल्याची ती बातमी होती.
शाळेतील स्कूल बसने संबंधित मुलीला खानापूर येथे सोडले होते. शाळा लवकर सोडल्याची कल्पना शाळा प्रशासनाने पालकांना दिली नाही. तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेत या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता ही मुलगी पनवेल येथे सुखरूप सापडली,असे बातमीचे शेवट आहे. एका दंगलीचा या निरागस बालिकेने कसा सामना केला असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे राहताना अंगावर काटा उभा राहतो.

बेलापूरहून मला पुणतांब्याला यायचे होते. बेलापूर सारखे छोटे गाव बंद होते. विष्णुपंत डावरे यांच्या दुचाकीवरून कोल्हारला गेलो. तिथे  आदल्यादिवशी बंद पुकारण्यात आला होता.  दुपारचे तीन वाजले होते.हळूहळू रस्त्यावर वाहने दिसू लागली होती. त्या जिल्हा रस्त्यावर दंगलीची धग तेवढी जाणवत नव्हती. मला पुणतांबा येथे जाण्यासाठी श्रीरामपूरला यावे लागले. श्रीरामपूर ते पुणतांबा अंतर १८ किलोमीटर आहे. हे अठरा किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार तास लागले. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतली असल्याची बातमी समाज माध्यमातून कळली,तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

ऐसी कलाकृती होणे नाही


आज वि.वा.शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' नाटकाच्या प्रयोगाला ४३ वर्षे पूर्ण झाले. नाटकांविषयी मी २७ मार्च २०१६ रोजी सोलापूर तरूण भारत मध्ये लिहिलेला लेखाची ही एक आठवण.


 मराठी नाटयसृष्टीतील अजरामर नाटक म्हणजे  नटसम्राट  टू बी ऑर नॉट टू बी... जगावं की मरावं, कुणी घर देता का घर असा जबरदस्त मर्मभेदी संवाद अनेक अभिनयाची जुंगलबंदी असलेल्या, मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक नटसम्राट 23 डिसेंबर 1970 रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.



सत्तरच्या दशकात  वि.वि.शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यानंतर या नाटकाने एक नवा  इतिहास निर्माण केला.नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर  या पात्राला अधिक उंची मिळाली.  ख्यातनाम अभिनेता डॉ.श्रीराम लागू यांनी अप्पासाहेब बेलवकर यांची भूमिका साकारली होती. लागू यांनी अभियनातला मानदंड निर्माण केला. वि.वा.शिरवाडकर यांनी निर्माण केलेल्या नटसम्राट या नाटकाचा मूलाधर शेक्सपिअरच्या किंगलेअर नाटकाचा आहे. सत्तरच्या दशकातील हे नाटक मराठी नाटय रसिकांचा ठाव घेते. डॉ.श्रीराम लागू, दत्ता भट या रंगकर्मींनी हे नाटक एका उंचीवर नेउन ठेवले. सतीश दुभाषी,चंद्रकांत गोखले, यशवंत गोखले,मधुसूदन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे, उपेंद्र भट यांनी ही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. गणपतराव बेलवलकर या व्यक्तिरेखेला आयाम दिला तो लागू यांनीच. वृध्द नायकाची होणारी होरपळ आणि परवड सांगणारे हे नाटक आहे.  कावेरी,नलू, नंदा, शारदा, सुधाकर, विठोबा, सुहास ही पात्रे देखील तितक्याच ताकदीची आहेत.



अभिनयाची कारकीर्द ऐन भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा नट उतारवायत प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशीबी अंधारवाट येते. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक -प्रेक्षकच नव्हेतर त्याची 

स्वत:ची मुलेही त्याला स्वत:पासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीला सोबत घेवून या जगापासून दूर जात हालखीचं जीवन जगतो. या वृध्द नायकाची शोकांतिका म्हणजे नटसम्राट नाटक. डॉ.श्रीराम लागू यांनी वृध्द नायकाची केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहे.

1970-80 च्या दशकात या नाटकाचे विक्रमी प्रयोग झाले. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रयोग झालेले हे एकमेव नाटक. लागू यांनी आपला जिवंत अभिनय ओतून नटसम्राट आणि आप्पासाहेब ऊर्फ गणपतराव बेलवलकर या पात्रास घरोघरी नेले. लागूंच्या तोडून निघणारे स्वगत प्रेक्षकांना घायाळ करून सोडले होते इतके नाटक लोकप्रिय झाले. मुळातच लागू हे रंगभूमीवरचे कलाकार. लागू यांनी आकाश पेलताना, आंधळयाची शाळा, इथे ओशाळला मृत्यू, आधे अधुरी, एकच प्याला, उद्याचा संसार,कन्यादान, किरवंत, गिधाडे, दूरचे दिवे,पुण्यप्रभाव, वेडयाचे घर उन्हात, सुंदर मी होणार, राजमुकुट, सूर्यास्त अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केली. प्रसिध्द दिग्दर्शक जब्बार पटेल  लागू यांच्या अभिनयाविषयी म्हणतात.


"पाहिलेला माणूस,हिमालयाची सावली या नाटकात  महत्वाची भूेमका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता यर्इिल. भूमिका जिवंत करणारा  हा वाडमयप्रचार लागूंच्या बाबतीत  अगदी खरा ठरतो.डॉ. लागू हे आमचे  गुरू आहेत". त्यांचा रंगमंचावरील वाघासारखा वावर,त्यांची स्वगते, आवाजाची गोलकार परंगणी,देहबोली ओतून टाकतात. जीवंत अभिनयविश्व उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभिनयात आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने ते जागतिक रंगभूमीवरचे तोडीचे कलाकार आहेत असा नट होणे नाही.शिरवाडकर यांच्या लेखनात म्हणजेच संवादात जी ताकद आहे, त्याचा प्रभाव नाटकावर जाणवाते. या नाटकाची नुसती स्वगते अंगावर रोमांच उभे करतात. डॉ.जब्बार पटेल यांनी केलेल्या वर्णनावरून लागू यांच्या अभिनयाची महती लक्षात येते.

या वृध्द नायकाची शोकांतिक रूपेरी पडद्यावर आणण्याचे कार्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. जगावं की मरावं हाच एक खरा प्रश्न आहे. मी आप्पासाहेब बेलवकर. उभा आहे इथा हिमालयासारखा अभद्य. या दमदार संवादाने नाना पाटेकर यांनी आप्पासाहेबांना आणखीन अमर केले. हा संपूर्ण चित्रपट वेगवेगळया  सौंदर्याने नटला आहे.


 शिरवाडकरांच्या भाषेचा कणा नादमय आहे. प्रसंगानुसार, पोट तिडकीनुसार, वैतागानुसार, क्रोधानुसार,आनंदाने तर कधी तर दु:खाचे  उद्गार उमटतात. त्यामुळे हा चित्रपट रसिकांना  अस्वस्थ करून जातो. नानाच्या तोंडून निघणारा  संवादच  पाहा ना.
 " आता फक्त म्हणून उरला आहे. आपली पोरं चांगली आहेत.सरकार आपलं म्हातारपण वाईट आहे. वय झालेली म्हातारी माणसं पिशाच्चंच असतात. माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. दोष तुमचा नसेल,तुमच्या वयाचाही असेल.....मी पैसे चोरले सरकार? सरकार, तुला माहीत आहे. माझ्या क्रोधाला पाय नाहीत. हात नाहीत, लुळापांगळा आहे... गटरात तडफडणारं. मी पैसे चोरले?नाही. सरकार, मी रागवणार नाही नी तुम्हाला सांगून ठेवतो. मी रडणार नाही. डोळयांत आसवं जमायला लागली तर खेळ मारून डोळयांच्या खाचा करीन संभाजीसारखा. तुझ्यासारख्या आळयीसमोर रडणार नाही. मी पैसे चोरल? मी पैसे चोरले?". नानांनी आपल्या अभिनय कुशलतेने हा संवाद अधिक जिवंत केला आहे. त्यामुळे हा चित्रपट शोकात्मिक तेच्या उंचीवर नेउन पोहोचला आहे. हा चित्रपट पाहताना रसिकांना कुठेही कंटाळा येत नाही. मुळात नाना तस मराठी रंगभूमीवरचा शिलेदार नट. पाहिजे जातीचे, हामिदाबाईची कोठी, महासागर,अडाण्याचा गाडा,पुरूष, भाउ मुरारराव या नाटकात नानाची अभिनयाची कस लक्षात येते.   नानाच्या अभिनयाबाबत नाटयसमीक्षक वि.भा.देशपांडे एके ठिकाणी म्हणतात, "त्याच्या कारकीर्दकडे बघताना असं वाटत की त्यांचं सामर्थ्थ कशात आहे? किंवा बलस्थान कशात आहे? याचा विचार केला  नानाचा जो स्वर आहे तो स्वर खर्जात लावण्याची जी पध्दती आहे. ती त्याचं बलस्थान आहे आणि असा खर्जातला स्वर, खालच्या पट्टीतला लियाया पेलणारा नट असू शकतात असं नाही.संथ लयीनं, सहजतेने नाना अभिनय करतो हेच त्याच्या अभिनयाचे बलस्थान आहे".



एकूणच नाना हा कितीही मोठा नट असला तरी तो मूळ रंगभूमीवरचा माणूस आहे. डॉ.श्रीराम लागू हे जागतिक रंगभूमीवरचे महत्वाचे शिलेदार आहे. नटसम्राट नाटकांनी मराठी नाटकांना दिलेली मोठी शिदोरी आहे.

लेखक विकास पांढरे,९९७०४५२७६७

(साभार २७  मार्च २०१७ रोजी सोलापूर तरूण भारतमध्ये प्रसिध्द झालेला हा लेख.)

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...