यशोगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यशोगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ जानेवारी, २०२१

धनाजीरावांची ‘देशी बियाणे बँक’


 उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील शेतकरी, ग्रामविकास समितीचे कार्यकर्ते धनाजी धोतरकर यांनी गेल्या सोळा वर्षांपासून विविध दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण अशा 125हून अधिक देशी पीक वाणांचे जतन केले आहे. त्यासह सेंद्रिय शेतीला चालना देत ते देशी बियाणांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

शेतीचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये बियाणे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या ओवीत संत तुकाराम महाराजांनी बियाणांचे महत्त्व सांगितले आहे. पेरणीच्या वेळी अंकुरक्षम व अधिक जोमदार असलेल्या बियाणांची उपलब्धता हे अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आधुनिक शेती पद्धतीत कृषी पर्यावरणीय दृष्टीकोनातून शुद्ध व देशी बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात शेतीतील पारंपरिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे आणि त्याचे दस्तऐवजीकरण करणे किती गरजेचे आहे, या संदर्भात पर्यावरण लेखक हर्षद तुळपुळे यांचा सा. विवेकच्या 30 नोव्हेंबर 2020 ते 6 डिसेंबर 2020च्या अंकातील ‘पारंपरिक ज्ञानसंकलन व्हावी राष्ट्रव्यापी चळवळ’ या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला होता. प्रस्तुत लेखही ‘पारंपरिक ज्ञानसंकलन’ या विषयाला पुढे घेऊन जाणारा आहे.

देशी बियाणांचा संग्रह

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावातील धनाजी धोतरकर हे 2004 सालापासून देशी बियाणांवर काम करत आहेत. या कामात त्यांना समाधान मिळते आहे. पारंपरिक बियाणे शेतीसाठी उपयुक्त असून त्याच्या लागवडीतून शेतीचे अनेक प्रश्न निकाली लागतील, असा त्यांचा विश्वास आहे.

देशी वाणांविषयी काम करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगताना धनाजीराव म्हणाले, “बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. भारतीय शेतीचा अभ्यास केला, तर आपला देश, शेतकरी बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. इथला शेतकरी देशी बियाणांची लागवड करत होता. हल्ली पारंपरिक बियाणांची जागा हायब्रीडने (रासायनिक बियाणांनी) घेतली आहे. त्यामुळे पारंपरिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी बियाणांच्या बाबतीत शेतकरी परावलंबी झाला आहे.

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे. त्यामुळे घरीच बियाणे बनवली जायची. त्यामुळे शेतकर्‍यांना दोन प्रकारचे फायदे व्हायचे - एक म्हणजे बियाणांवरचा खर्च वाचायचा आणि दुसरे म्हणजे देशी अस्सल बियाणांमुळे त्यांची फसवणूक व्हायची नाही. माझा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आमची दहा एकर शेती आहे. माझे वडील शेतात पेरणीच्या वेळी पारंपरिक बियाणे वापरायचे. मिश्र शेतीतून विविध बियाणांचे जतन व संवर्धन करायचे.

मला लहानपणापासून शेतीचे वेड होते. गाय, बैल, वासरू, शेळी यांना चारण्यासाठी रानात घेऊन जात असे. रानात विविध प्रकारची कडधान्ये व पालेभाज्या दिसायच्या. अशा कडधान्यांची व पालेभाज्यांची बियाणे आमच्या शेतात असावी, म्हणून मी धडपडत असे. गाईगुरांचे खत असल्याने हे बियाणे शेतात एकदा पेरले की चांगले उत्पन्न निघायचे. करड, तीळ, अंबाडीच्या उत्पादनातून तेल निघायचे, शिवाय या तेलाची पेंड निघायची, हाच गाईगुरांचा पौष्टिक आहार असायचा.

सध्या शेतकरी नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे स्थानिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपली पारंपरिक शेती जगावी यासाठी मी गेल्या 16 वर्षांपासून धडपडत आहे. पुण्यातील ‘अफार्म’ व ‘बायफ’ संस्थेमुळे मला देशी बियाणे संकलन करण्याची अधिक आवड निर्माण झाली. माझी नाळ शेतीशी जुळलेली असल्याने या कामात मी झोकून देऊन काम केले. आज माझ्याकडे 125हून अधिक बियाणांचे संकलन आहे.

हुलगे, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, मूग, गहू, बाजरी, पिवळी साळी, हरभरा अशा सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या व पालेभाज्यांच्या बिया इतरत्र कुठे मिळत नाहीत, त्या आमच्याकडे आहेत.”

धनाजीरावांनी ही सर्व पारंपरिक बियाणे मोठ्या कष्टाने संकलित केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात हा सर्व ठेवा जतन करून ठेवला आहे. हे कार्यालय म्हणजे धनाजींचे संशोधन केंद्रच आहे. अनेक शेतकरी कार्यालयात येऊन धनाजीरावांचा सल्ला घेऊन आपल्या शेतीसाठी देशी बियाणे घेऊन जातात.

देशी बियाणांची वैशिष्ट्ये

1. देशी बियाणांत उच्च दर्जाची पोषणमूल्ये असतात. खाण्यास चवदार.

2. हवामान बदलात तग धरण्याची क्षमता.

3. बदलत्या हवामानाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण पीक जातींच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन, तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. हुलगे, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, मूग, गहू, बाजरी, पिवळी साळी, हरभरा अशा सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या व पालेभाज्यांच्या बिया इतरत्र कुठे मिळत नाहीत, त्या आमच्याकडे आहेत.”

धनाजीरावांनी ही सर्व पारंपरिक बियाणे मोठ्या कष्टाने संकलित केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात हा सर्व ठेवा जतन करून ठेवला आहे. हे कार्यालय म्हणजे धनाजींचे संशोधन केंद्रच आहे. अनेक शेतकरी कार्यालयात येऊन धनाजीरावांचा सल्ला घेऊन आपल्या शेतीसाठी देशी बियाणे घेऊन जातात.

पाच हजार लोकांपर्यंत प्रचार, प्रसार

 पारंपरिक बियाणे शेतकर्‍यांच्या उपयोगाची आहेत. त्या दृष्टीने विचार करता ही बियाणे केवळ चार भिंतीत बंदिस्त न ठेवता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धनाजीरावांची प्रयत्नशील आहेत.

धनाजीराव सांगतात, “ग्रामविकास सेवा मंडळ व लोकप्रबोधन संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार करत आहे. आतापर्यंत मी पाच हजार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलो आहे. राज्यातील व परराज्यातील कृषी प्रदर्शनांतून, कृषी कार्यशाळेतून देशी बियाणांचा प्रसार केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी के.एम. नागरगोजे व दीपा मुधोळ-मुंडे यांनी देशी बियाणे दालनास भेट देऊन प्रशंसा केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के गावांत देशी बियाणे व सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन केले आहे. देशी बियाणे, दुष्काळ, पाणी व शेती क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन मला 2014 साली ‘कृषिमित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रचार-प्रसाराच्या कामात टाटा सामाजिक संस्था व अभिव्यक्ती संस्था नाशिक यांचे सहकार्य लाभले. सह्याद्री वाहिनीवरील ‘आमची माती, आमची माणसं’ या टाटांच्या कार्यक्रमात, तर अभिव्यक्ती संस्थेमुळे केरळ येथे झालेल्या जागतिक ऑरगॅनिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये, तर हिमाचल प्रदेशातील बीर येथे झालेल्या कृषी कार्यक्रमात सहभाग नोंदवता आला.

शेतकर्‍यांच्या सहभाग पद्धतीतून पारंपरिक बियाणांचे पुनरुज्जीवन करणे, पुनरावृत्ती करणे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांच्या संपर्कात राहण्याचे, देशी बियाणांची देवाणघेवाण करण्याचे काम करत आहे.”

सेंद्रिय शेतीची कास

धनाजीराव आपल्या शेतात पारंपरिक बियाणांचा वापर करतात. त्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. धनाजीराव सांगतात, “राष्ट्राच्या हिताचा विचार करून मी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. आज माझ्याकडे 10 गावरान गाई, 10 खोंड, 4 बैल आहेत. माझ्या सर्व शेतात दशपर्णी, पंचामृत, गोमूत्र, जीवामृत व गांडूळ खताचा वापर करतो. त्यामुळे माझ्या शेतातील मातीचा पोत टिकून राहिला आहे. पारंपरिक बियाणांचा व सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने माझ्या शेतीचे उत्पादन तीन पट वाढले आहे. विशेष म्हणजे आरोग्यावरचा खर्चही कमी झाला आहे. एकूणच मिश्र व जीववैविध्य शेती पद्धत पुनरुज्जीवित करण्याकडे माझा कल आहे.”

रासायनिक शेतीमुळे होणारी मातीची हानी टाळण्यासाठी, तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची अनुपब्धता पाहता पारंपरिक सेंद्रीय शेती फायदेशीर ठरणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढील दिशा

 “स्थानिक बियाणांचे महत्त्व लक्षात घेता येत्या काळात राज्यातील विविध जातींच्या बियाणांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यामध्ये अडचणी आहेत.

अनेक बियाणांमध्ये चांगले गुणधर्म असूनही काही अडचणींमुळे त्यांची लागवड कमी झाली आहे. राज्यात शुद्ध बियाणे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे उत्पादन नवीन सुधारित/संकरित जातीपेक्षा कमी येते. काही जातींमध्ये फुटवा कमी येतो. तसेच काही जाती उंचीने जास्त असल्याने पीक शेवटच्या टप्प्यात जमिनीवर लोळते, त्यामुळे त्याचे नुकसान होते. या अडचणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करणार आहे” असे धोतरकर यांनी सांगितले.

जागतिकीकरणाच्या काळात धनाजीरावांसारखा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. देशी वाणांच्या माध्यमातून हवामान बदलाला तोंड तर देता येईल, तसेच शेतकरी स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहतील, यासाठी धनाजीरावांसारखे असंख्य देशी बियाणे संकलक निर्माण होणे आवश्यक आहे.

विकास पांढरे,9822998827


शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कष्टाची कमाई


स्व.मोहन धारिया यांच्या 'वनराई' संस्थेला भेट देण्याचा योग आला. दुपारची वेळ.. वातावरणात थंडी जाणवत होती.. वनराई बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या नाल्याच्या कोपऱ्यात चप्पल दुरुस्तीचे काम करीत असलेल्या महिलेवर नजर गेली. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातले हे दृश्य पाहून कुतूहल निर्माण झाले. चप्पल शिवणे हे खरे तर पुरूषांचे काम पण जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीही नाही हे या महिलेने दाखवून दिले आहे. मंजुषाताई कैलास रावखंडे असे या महिलेचे नाव आहे.
गोरा रंग, कपाळावर कुंकू, काळेभोर डोळे असलेल्या मंजुषाताईचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. मंजुषाताईंच्या घरात चप्पल शिवणे परंपरेने चालत आले आहे. त्यामुळे घरातल्या माणसांकडून त्यांना या व्यवसायाची आवड निर्माण झाली. व्यवसायातील बारकावे त्यांना शिकता आले. यानिमित्ताने मंजुषाताईंची जीवनाची कहाणी थोडक्यात का होईना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मंजुषाताई सांगत होत्या.. "माझं शिक्षण सातवी पर्यंत झालं. पुढं शिकावं वाटत होतं पण तसं घडलं नाही!"
"आम्ही मुळचे सातारचे. मंगळवार पेठेत आमचं घर आहे." सासऱ्यानं पोटासाठी पुण्याची वाट धरली. पर्वती दर्शन शेजारी सासऱ्यानं घेतलेलं घर आहे आम्ही तिथेच राहतो.. नवरा ड्रायव्हर आहे. चपलाचा व्यवसाय करणे त्यांना जमलं नाही.. त्याला आजची परिस्थिती कारणीभूत आहे."

" पूर्वीसारखा आमचा व्यवसाय राहिला नाही. गावाकडं बलुतं मिळायचं! आता कुठंय आलंय बलुतं-फलुतं? नव्या यंत्रानं तर आमचं जीणचं मुश्किल केलयं."
"मी धीटपणे उभी राहिली! हातात चप्पल शिवायला घेतली.. लाज कसली यात? घरातली चूल बंद झाली तर कोणी मदतीला येतं का? कष्टाची कमाई करायला लाजायचं कशाला?
मंजुषाताई मनातून बोलत होत्या.. मी ही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो.
(नुसत्या 'चांभार चौकशा'करत नव्हतो! 😊)
"गेल्या पंधरा वर्षांपासून मी इमानेइतबारे हा व्यवसाय करतीय, सरकारच्या मदतीने टपरी मिळालीय. मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. थोरला मुलगा विरेन एमसीए झालाय. तो नोकरीच्या शोधात आहे. धाकटा दहावी शिकलाय. तो टू व्हिलर गाड्यांना कव्हर बसवून देण्याचं काम करतोय. मुलगी दहावीत शिकत आहे."

"रोजच्या कामातून मला दोन-तीनशे रूपये मिळतात, मुलांचे शिक्षण, घरखर्च सांभाळणे कठीणच आहे. त्यात नवऱ्याला कधी काम मिळते कधी नाही! सासऱ्याने घेतलेलं घर आहे पण ते फारच छोटं आहे. बाहेरची चार माणसं आली तर अवघडच होतं. त्यासाठी स्वतःचं हक्काचं घर असावं! असं मला वाटतं.. मुलामुलींचे शिक्षण, लग्न, संसार यामुळे स्वतःचं घरं होईल की नाही हे सांगणं कठीणच आहे."
"आज आमची कला यांत्रिकीकरणामुळं हातून निसटून मोठमोठ्या व्यावसायिकांच्या हातात गेली आहे. त्यातून मूठभर लोकांनी संपत्तीचा डोंगर उभा केलाय, त्याचवेळी या कलेचा खरा मानकरी मात्र दारिद्रयाच्या अंधारात चाचपडत आहे."
मंजुषाताईचे शेवटचे बोल ऐकून अंगावर काटा उभा राहिला. कारण इतरांच्या पायांची काळजी घेणाऱ्या चर्मकाराचे आयुष्य आज यांत्रिकीकरणामुळे मातीत जाण्याची वेळ आली आहे. या समाजाला आज पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे समाजाचे, शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे.

पोटाच्या वीतभर खळग्यासाठी नाल्याच्या कडेला ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या कुटुंबाचा चरितार्थ पेलवत असणाऱ्या मंजुषाताई रावखंडे यांचे कार्य निश्चितच प्रंशसनीय आहे.
©विकास पांढरे, पुणे

रविवार, १० मार्च, २०१९

माझ्या जन्माची कहाणी -भाग २



माणसाचं आयुष्य हा फार कुतूहलाचा विषय असतो, हे सत्यच आहे. कारण ज्या गोष्टींच्या मागे असलेल्या रहस्यांची उकल आजवर होऊ शकलेली नाही, अश्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटणे अगदी साहजिकच आहे. एखाद्या वस्तूच्या मागे काही रोचक कथा आहे असे कळल्यानंतर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते,  जुन्या आठवणींचे गाठोडं डोळ्यांसमोरून जाता जात नाहीत. २६-२७वर्षांपूर्वीं घडलेली ही गोष्ट आहे.

एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला.आम्ही चौघेजण भावडं.दोन बहिणी,दोन भाऊ आणि मी शेंडेफळ. शेतकरी असलेले आमचे वडील म्हणजे नाना फारच कष्टाळू. नाना आणि आईचे कष्ट बघत,अनुभवत आम्ही मोठे झालो. हणम्या आणि नाग्याची शेतात नांगर मारणारी बैलजोडी होती. सात एकराच्या बरड जमिनीत जे पिकेल त्यात समाधान मानून आमचा सुखाचा संसार सुरू होता. पाच चुलते, चुलत भावडं एकाच वाड्यात गुण्यागोविंदाने राहत होतो, शेरडं, म्हशी, गायी, कुत्र्यांनी वाडा भरून जायचा. झाडलोट करायला बायांना दुपार व्हायची. शेतात गेल्यावर रम्य वाटायचं, पावसाळ्यात लवनातून पाणी झुळझुळ वाहतं असायचं, रानात साळीचं पिकं डोलत राहायचं, असे रम्य आणि मनोहर वातावरणाचा हेवा वाटायचा. सारं काही ठीक असताना माझ्या बाबतीत नियतीनं वेगळचं लिहीलं होतं.

***

पावसाळी दिवस होते...  सतत कोसळणार्‍या पावसाने आमच्या घरात एक वादळ घेऊनच आलं,त्या पावसात माझा जन्म झाला.. त्या रात्री घरी कुणीच नव्हतं, आईनं सर्व कळा सोसून मला जन्म दिला. नव्याचे नऊ दिवस संपले होते. मी थोडा चालू लागलो होतो. धरती हिरवी शाल पांघरून पावसाची मजा लूटत होती.आमच्या घरातल्या माणसाच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

काय ओ?ऐकताय का? "राच्याला पोराचं अंग तापानं फणफणलं होतं. तरीबी सरकारी दवाखान्याल्या सिसटरीन बाईनं त्याला इंजेक्शन दिलं.तीन-चार वरसतल्या लेकरासनला इंजेक्शन करत नसत्यात म्हणं? तरीबी माझ्या पोराला तिनं इंजेक्शनचं डोस दिल. सवा,आंबा (माझे चुलत भावड-सविता आणि आंबा ऊर्फ अनिल) अन् गावतली पोरं बघा त्यासनी डोस देऊनही ठणठणीत हायती. माझचं पोरगंच का लुळ होऊन पडलयं?" अश्या आर्त स्वरात आई नानाला म्हणाली.

नाना खाली मान घालून विचार करत होता. अस काय झालं असावं?  पोरगं लुळ होऊन का पडलंय? कुणाची चुक झाली? याचं उत्तर शोधत होता.

"गरीब माणूस हा नियतीच्या जात्यात भरडला जातो असं म्हणतात ते खरंच आहे. ह्या गरीबीमुळेचं ज्यांनी मला डोस दिला 'त्या'
सिसटरीन बाईला बोलण्याची हिंमत नानाकडं नव्हती. शेवटी जी गोष्ट घडून गेली तिचे परिणाम जाणवत असताना मग दाद कुणाकडे मागयची?

माझ्या कपाळावर हात ठेवत नाना म्हणाला,"माझ्या पोरानं कोणतं पाप केलंय की देवानं त्याला लुळ केलयं?" घर, शेत  विकू अन् पोराला बरं करू", असा धीर देत नानांनी आईला शांत करण्याचा प्रयत्न केला.

कणगीच्या बाजूला माचोळी होती. तिथं पोतं टाकून मला झोपवण्यात आलं होतं. माझा डावा पाय पूर्णपणे लुळा होऊन पडला होता. पायातली संवेदना संपली होती. आमचा वाडा वेशीत असल्यानं गावातल्या आयाबाया मला बघायचा यायच्या. कुणी पायाला हात लावलं तरी जाणीव होत नसायची.  ज्या त्या बाया माझ्या पायाला बघून डोळ्यातून पाणी काढायच्या. "पोराला दवाखान्यात दाखवा म्हणायच्या."

"काय ओ? तुमी दोन घास खा! अणदुर्‍याला सुभाष डॉक्टरकडं जावा. पोराला काय झालं इचारा."

"आई काळजीत नानाला बोलली."

नाना आईला होकार देत अणदूरला जायची तयारी करू लागला. नानाच्या खिश्यात पैशाची एक दमडी नव्हती. कोण हात उसणे पैसे द्यायला तयार होत नव्हतं. दुपार झाली होती. दिस माथ्यावर आला होता. नाना चितागत होऊन बसला होता. आईनं कुणाकडून तरी ३०रूपये आणले,तवा मग दवाखान्यात जाता आलं.

नानांनी मला उचलून खांद्यावर घेतलं. गावाच्या बसस्टॉपवर आलो, पण गाड्या थांबतच नव्हत्या. तासाभरानं एक गाडी थांबली. उमरग्याला जाणार्‍या माल ट्रकमध्ये बसून आम्ही अणदूरला आलो. अंगात मळकट शर्ट, दाढीचे खुंट वाढलेली, बारीक पांढरे केस, केविलवाणी डोळे, चेहर्‍यावरचा तणाव घेऊन डॉक्टर कस्तुरे ह्यांच्या समोर नाना उभा राहिला.

 दत्ता, कसं काय आलास? असं डॉक्टर सुभाष कस्तुरे म्हणाले.

डॉक्टर कस्तुरे आणि नानांची अगोदरची ओळख होती.
आमच्या गावातले बरेच लोक उपचारासाठी कस्तुरे डॉक्टरकडं येत. त्यामुळं डॉक्टर कस्तुरे हे बर्‍याच जणांना नावानिशी ओळखत.

पोरगं, "कालच्यापासनं लुळं होऊन पडलंय, डावा पाय उचलतच नाय, दोन पाऊल चाललं तर लगीच खाली पडतं. आमचा जीव भांड्यात पडलाय. काय करावं कायबी कळत नाय. माझं पोरगं चालेल पाहिजे,डॉक्टर? कितीबी खर्च येऊ द्या अगुदर पोरगं नीट करा?". असं नाना केविलवाण्या स्वरात डॉक्टरला बोलू लागला.

कधीपासून पोराचा पाय लुळा झाला? डॉक्टर कस्तुरे ह्यांनी माझ्या पायाला हात लावत नानाला विचारलं.

नाना गप्प.

नानाला काय बोलावं कळत नव्हतं. फक्त माझं पोरगं नीट करा?एवढचं पुटपुटत होता.

डॉक्टरानी मला तपासले, त्यांनी मला पोलिओ झाल्याचं सांगितलं. "ह्या आजारावर कुठलाच इलाज होत नाही. पोराला कायमच अपंगत्व आलंय. पण घाबरून जायची गरज नाही" असं डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांच्या उत्तरानं नानाचा चेहरा आणखीन उतरला. काय करावं? नानाला समजत नव्हतं. दुपारचं उन्हं तापत होतं.घसा कोरडा पडूनही नाना पाणी पीत नव्हता. माझ्या पोराचं कसं होईल? हाच प्रश्न नानाला छळत होता.

***

त्यादिवशी नाना उपाशीच होता. घराकडं आल्यावर रानातही गेला नाही. जनावरं दावणीला बांधली होती. चुलत्यानं चारापाणी केलं.

काय ओ? डोळे कशानं एवढं भरलं तुमचं?
काय झालं सांगा की,  डॉक्टरनी काय सांगितलं ? आई म्हणाली.

नाना शांत .

नाना दोन्ही पायात मुडकं घालून रडत होता. "आपला इक्याचा पाय नीट होणार न्हाय.कायमचा तो लुळाचं राहणार ह्याय" असं डॉक्टरनं सांगितलं. असं नाना रडक्या आवाजात आईला बोलू लागला.

सगळं आक्रीत घडल्याचं पाहून आईही ढसाढसा रडायला लागली. तिची वेदना कमी होत नव्हती, घरातला रडायचा आवाज ऐकून सगळ्या चुलत्या गोळा झाल्या. गावातली मालन आत्या आली. काल तरातरा चालणारं पोरगं, अचानक लुळं होऊन पडल्यानं त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.

आईला आधार देत सुभाकाकून डोळ्यांवरून पाणी शिंपडाला सांगितलं. बराच वेळ बाया-माणसं घरात बसली होती. नियतीच्या हातात हाय सगळं ?आपुण काय करावं? पोराच्या  वाट्याला आलेलं भोग हाय? असं आयाबाया बोलू लागल्या. अमुक करा, तमुक करा असं बाया एकमेकीत बोलत होत्या. मी ठिक व्हावं, खेळावं, चालावं ह्यासाठी आई आणि नाना पूर्णत: प्रयत्न करत होते. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी माझ्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले.

गावातल्याच एका वयोवृद्ध महिलेच्या सांगण्यावरून मला उकिरड्यात छातीपर्यंत पुरून ठेवण्यात आलं होतं. उकिरड्यातील ऊब पायाला चांगली असते ह्या समजुतीनं माझ्यावर काही दिवस हा प्रयोग सुरू होता. ह्या प्रयोगाचा माझ्या पायावर कसलाच असर झाला नाही शिवाय नीट चालूही शकत नव्हतो. माझा पाय नीट व्हावा यासाठी कुणी गाढवाचं दुध पाजा, कुणी डुकराचं तेल लावा असा सल्ला देऊ लागले. तेही प्रयत्न करून पाहिले, काही महिने माझ्या पायाला डुकराचं तेल लावण्यात होतं. मी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा यासाठी आईने अनेक रात्री जागून काढल्या होत्या. ती रात्रभर माझ्या पायाची मालीश करत बसायची, माझ्यामुळे तीन भावडांचे हाल झाले .

माझ्या अपंगत्वामुळं आई आणि नाना अधिकच चिंतेत पडले होते. आई शेताकडं जायची बंद झाली होती. शेतात काढणीला आलेलं हायब्रीड, बाजरी आणि तुरी नाना एकटाच काढायचा अन् रास घरी आणायचा. सगळं मिळून दोन तीन पोत्यांच्यावर धान्य निघायचं नाही. काही दिवस गेल्यानंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून मला सोलापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे  दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण परिस्थिती माणसाला हतबल करते ह्याची जाणीव माझ्या कुटुंबाला होत गेली. कारण घरात नानाशिवाय कमवत कुणीच नव्हतं.शेतात जे पिकेलं,त्यावर सर्वांचे पोट भरायचं. धान्य विकून खाणार काय? तरीही माझ्यावर उपचार करण्यासाठी नानांनी कोणतीही कसर सोडली नाही.
***
(उर्वरीत कहाणी पुढच्या भागात)

©विकास पांढरे ,९९७०४५२७६७

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

शाहीर पठ्ठे बापूराव

मराठी शाहीर परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव. बापूराव यांची यंदा दिडशेवे जयंती वर्ष सुरु आहे. या शाहीराच्या कलेचे स्मरण व्हावे म्हणून हा प्रपंच.

शाहीर पठ्ठे बापूराव
 मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि परंपरा म्हटले की,संत, पंत आणि तंत परंपरेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. शाहीर पठ्ठे बापूराव हे मराठी शाहीर परंपरेचे मुकुटमणी समजले जातात. असंख्य लावण्या, कवने, पदे भेदिक लिहून मराठी साहित्य परंपरेच्या दालनात मोलाची भर घातली. संत साहित्याच्या खालोखाल लावणीतून, अध्यात्माची जाणीव देणारे पठ्ठे बापूराव हे खरे 'लावणीसम्राट' होत.
पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांना ताला-सुरांचा साज चढून  त्याला तमाशात पेश करायचे काम पवळाने केले म्हणून १९ शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्याकडे पाहिले जाते.

 पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे वाळवे तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या छोट्याशा गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले हे पोरं. लाडाने त्याला बापू म्हणत. पुढे हाच बापू तमाशा क्षेत्रातला तेजस्वी तारा बनला. जेमतेम चौथी पर्यंत शिकलेले हे पोरं शब्दरचना करण्याच्या नादात औंध संस्थानातील नोकरी सोडून तमाशाच्या फडात कवने करू लागला. बापू ( श्रीधर) ने तमाशाचा नाद सोडवा, यासाठी त्याच्या कुटुंबाने खूप प्रयत्न करून पाहिले. यातून बाहेर काढण्यासाठी शिंगणापूरच्या शंभू महादेव बडव्याची मुलगी सरस्वती हिच्याशी श्रीधरचे  लग्न उरकून टाकले. लग्नानंतरही संसाराच्या जबाबदारीत बापूला आपले कवित्व स्वस्थ बसू देत नव्हते. त्याकाळी त्याने सरळ मुंबई गाठून किसनदादा गवळी,  आशन्ना कामाठी यांच्या तालमीत काम करू लागला. बालपणापासून कवितेची आवड असलेल्या बापूचे नाव अल्पावधीतच मुंबापुरीत गाजू लागले. बापू अनेक लढती जिंकू लागल्याने रसिक प्रेक्षकातून 'शाब्बास पठ्ठे ! बापूराव शाब्बास' अशी आरोळी ऐकू येऊ लागली.

 तेव्हापासून मराठी लोक परंपरेत पठ्ठे बापूराव हे नाव परिचित झाले. याच काळात हिरकणी पवळा हिच्याशी त्याची ओळख झाली.  तमाशात हे दोघे जोडीने काम करू लागले. पुढे हीच जोडी १९ व्या शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. संगमनेरजवळील हिवरगावच्या तबाजी महाराची ही मुलगी. देवाला मुरळी म्हणून सोडलेली पवळा दिसायला गोरीपान होती.
पवळा

ऐन तारुण्यात पठ्ठे बापूराव आणि पवळा यांची जोडी जमली. बघता बघता या दोघांची अदाकारी पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होऊ लागली. पुढे एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रितीरिवाज पाळण्याच्या काळात बापूराव आणि पवळाची प्रेमकहाणी गाजत होती. बापूराव ब्राह्मण तर पवळा महार. यामुळे लोकांत वितंडवाद झाला. भारतीय जातीव्यवस्थेची बळी पवळा ही सुद्धा ठरली.

 या प्रकरणामुळे बापूराव - पवळाचा फड काही दिवस बंद पडला. हातावरचे पोट असलेल्या बापूरावांनी कंञाटदारांना एकञ बोलावून शेवटी म्हणाले, "आम्हाला विकत तरी घ्या किंवा आमचा लिलाव करा" शेवटी एल्फिन्स्टन थिएटरचे मालक अबुशेट यांनी बापूराव -पवळा यांचा दरमहा नऊशे रूपयांवर लिलाव घेतला. कलावंत साथ देत नसल्याने बापूराव हतबल झाले. बापूराव,अबूशेटला म्हणाले, आम्हाला नुसते बघायलाही लोक फार येतात.  तेव्हा आम्हा उभयतांना पाहाण्यासाठी तिकिट लावले तरी गल्ला जमेल, असे सांगितले.अबूशेटने तसेच केले आणि दोन आण्याच्या तिकिटांची दररोज दोन चारशे रुपयांचा गल्ला जमू करू  लागले. गर्दी वाढू लागल्याने बंदोबस्ताची गरज भासू लागली.  त्यातच लोकात बाटला की न बाटलाचा वाद चालू होता. पोलिसात तक्रारी गेल्या आणि या सार्‍याला कारणीभूत तुम्ही आहात, तुम्हाला हद्दपार का करू नये, अशी नोटीस होऊन खटला कोर्टात गेला. ११ आॅक्टोबर १९०५ पर्यंत हा खटला चालला. पुढे कोर्ट स्वतः बापूरावांचा तमाशा बघायला आले. बापूरावांनी यावेळी स्टेजवर स्वतःचे जीवन चरित्रे सांगितले.

 "ब्राह्मणाचे महार होता येईल ; पण महाराचा ब्राह्मण होता येणार नाही. नामचंद पवळाने मला महार होण्याची अट घातली आणि ती मान्य केली, हे फक्त जाणते लोकच जाणतील. मग ती आता महार झालो आहे, तो ठीक आहे". याची प्रचिती म्हणून काय, पवळाने बापूरावाला आपल्या हाताने जेऊ घातले. मग हा वाद संपला. पुढे या दोघांनी मिळून  'मिठराणी' हा सुप्रसिद्ध वग तयार केला. कोल्हापूरात छञपती शाहू महाराजांच्या समोर हा वग सादर करून महाराजांचे मन जिंकले. या दोघांनी पुण्यात काही काळ राहून रेठर्‍यात आले. पवळाने बापूला बाटवले म्हणून तिचा तिरस्कार होऊ लागला. पवळा नाराज होऊन पुण्याला निघून गेली. गावकर्‍यांनी वर्गणी करून तीन हजार जमा करून  बापूरावाला काशीला जाऊन धर्मांतर शुध्द होऊन जातीत यावे म्हणून पैसे दिले. बापूराव काशीला न जाता पुण्याला आले. त्यांनी ते तीन हजार रूपये पवळाला दिले आणि म्हणाले, "एकदा महार झालो तो झालो. आता धर्मांतराची जरूरी काय? पण पवळाचे मन विटले होते. या दर्दभरी कहाणीचा शेवट शोकात्म होत होता.  दोघांमध्ये चिडचीड सुरू होऊ लागली आणि एकदिवशी हे दोन पाखरे विभक्त झाली. पवळाने तमाशाला रामराम ठोकून आयुष्य जगू लागली. पुढे हे दोघेही अत्यंत हलाखीत जीवन कंठीत होते.स्वतःचे जीवन लावणीत सांगताना पठ्ठे बापूराव म्हणतात :-
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण, असूनी सोवळे ठेवले घालून घडी !
मशाल धरली हाती तमाशाची लाज लाविली देशोधडी !
असे जीवन चरित्र असलेल्या पठ्ठे बापूरावाची लावणीरचना दोन लाखांहून अधिक आहे. तर रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्या. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली.
संग्रहीत चित्र

पवळा हिच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. पवळाच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते. तमाशाप्रेमी बाबूराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात  याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तर बापूरावविषयी प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील म्हणतात, शाहीर पठ्ठे बापूराव-ज्यांचा उल्लेख सार्थपणे 'लावण्यांचे विद्यापीठ' असा केला जातो, त्या बापूरावांच्या एका गौळणीतील शृंगार तर मला 'ओलेती' या चित्रकृतीच्या दर्जाचा वाटतो. ज्या अवीट गौळणीत शृंगाराच्या तप्त ज्वाला आहेत; मात्र तीत छछोर बाजारूपण नाही. रंगाची उधळण आहे, खुलेपणा आहे, पण बीभत्सपणाचा लवलेशही नाही. त्या गौळणीची धुंदावणारी चाल, पारंपरिक स्वरसाज... सारेच काही और!
"श्रीरंग सारंगधरा, लाजुनी धरिते उरा
चला नेते माझ्या मंदिरा
हो, उडवा रंग, रंग, रंग
तुम्ही माझ्या महाली चला ना
थाट विलासी केला भला ना
गुलाबाच्या फुलांचा झेला
जागोजागी मी खोविला पहिला
तुम्हा पचला, तर मग उचला
नचला नंग नंग नंग, उडवा रंग रंग रंग...'
त्या निःसंग, ढंगदार रात्रीचे वर्णन करता करता बापूराव राधा-कृष्णाचा हा शृंगार "मग आनंद मारील चिपळ्या, करील दंग दंग दंग' अशा बेहोषीच्या उंचच उंच झुल्यावर नेऊन ठेवतात.
यावरून तमाशा क्षेत्रातील पहिल्या अजरामर जोडीचे महत्त्व लक्षात येते.

लेखक - विकास पांढरे,९९७०४५२६७
       
शाहीर पठ्ठे बापूराव
जन्म नोव्हेंबर ११, १८६६
रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली
मृत्यू२२ डिसेंबर १९४५
पुणे


संदर्भ :-
 १)मराठीचे लोकनाट्य तमाशा  कला आणि साहित्य : लेखक नामदेव व्हटकर
२) प्रतिष्ठान खंड २

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

जेव्हा माणूस जागा होतो..!


 गावगाड्यात स्थान नाही, गावकुसाबाहेरही जागा नाही,  गावाशिवाय अस्तित्व नाही,  गावाच्या शुष्क माळावर झोपडी टाकून राहणारा पारधी समाज आजही प्रवाहापासून दूर आहे. इंग्रजांनी माथी मारलेला गुन्हेगारचा शिक्का आजही ठळक आहे.  या समाजाच्या झोपडीत अजूनही लाईट पोहोचली नाही, ना नळाला पाणी, ना गॅस, ना शेंगडी.. मातीवरच्या चुलीवर आयुष्याचा संसार मांडलेल्या आणि चोरीचा शिक्का मारलेल्या या समाजाला ना हक्कानं काय करता येतं, पण हा बदल घडवून दाखवलाय याच समाजातील ज्ञानेश्‍वर भोसले या तरूणाने.

जेव्हा सगळचं संपून गेलयं, असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी  करून दाखवण्याचे. हे ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या कथेतून समोर येते. विठूरायाच्या पंढरपूर नगरीमधील ताडगावच्या जंगलात त्यांचा जन्म झाला. आई- वडील जंगलातील शिकार करून पोटाची खळगी भरायचे. दारिद्रय ही या समाजाची परवड. हातावर मागून घ्या, हातावरचा खा आणि त्यासाठी अनेकविध ताणतणाव सहन करा.  आयुष्यभर भूकेचे जाळे विणत असताना, जीवनाला स्थैर्य नाही, स्थैर्य नसल्याने उत्पन्नाची साधनं नाहीत, त्यामुळे वेळप्रसंगी चोरी करणे, चलाखी करून अन्न मिळविणे हे त्यांच्या जीवनात अपरिहार्य होऊन बसले होते. समाजाचे अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करा, हे त्यांच्या वाट्याल्या समाज व्यवस्थेने दिलेली भयानक वागणूक.  
या चौकटीनेच ज्ञानेश्‍वरच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. त्यात त्यांना सात वर्षांची जेल झाली. वडिलांच्या तुरूगांत जाण्यानं त्यांच्या आईनं आपले बस्तान गुंडाळले अन दामाजी पंथाची मंगळवेढा नगरी गाठली. 

अज्ञानाच्या अंधारात असणार्‍या भोसले कुटुंबात ज्ञानेश्‍वरची शाळा सुरू झाली. आई-वडिलांनी लावलेले शिक्षणाचे वेड, दारिद्रय आणि त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत ज्ञानेश्‍वरने दहावीपर्यंतचे कसे बसे शिक्षण पूर्ण केले. अश्‍वत्थाम्यासारखी दु:खाची भळभळती जखम आणि अंत:करणामध्ये अनुभवांची आग घेऊन शिकणे आणि जगणे चालू होते. अशातच बुध्दीची भूक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी त्याचा संघर्ष चालूच होता. अशातच पोलिसांकडून या समाजावर होणार्‍या अत्याचाराला सीमा नव्हती. पोलिसांनी ज्ञानेश्‍वरला एका गुन्ह्यात अडकवले. केसमध्ये अडकल्याने विद्येचा लळा तुटू लागला. पुढे त्याच्यावर डबल मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला या गुन्ह्यात तेरा महिने चौदा दिवसांची शिक्षा झाली.

 अशा विचित्र कोंडीत ज्ञानेश्‍वर अडकला गेला. जो गुन्हा त्यांने केलाच नव्हता, त्याची शिक्षा ज्ञानेश्‍वरला भोगावी लागली. वकिलाची फी जमा करण्यासाठी बहिण दारोदारी फिरली. अपर्णा रामतीर्थकर, दादा इदाते, अरूण करमरकर, गिरीश प्रभुणे आदींनी मोलाची साथ दिल्यामुळे ज्ञानेश्‍वरची सुटका झाली.

आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का का आणि कुणी मारला व पशुतुल्य जीवन आमच्यावर का लादले? या प्रश्‍नापासून असंख्य प्रश्‍नांचे मोहोळ उठवीत ज्ञानेश्‍वराला अस्वस्थ करून सोडले. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, खोट्यानाट्या केसेस टाकून नाडल्या गेलेल्या जातीबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी 1997 मध्ये भारतमाता आदिवासी पारधी समाज आणि भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या समाजाला मानाचे स्थान मिळवण्यासाठी ज्ञानेश्‍वर धडपड करू लागला. सन 2008 मध्ये सोलापूरमध्ये दोनशे चौर्‍याऐंशी गावांत पारधी समाजाचे शिबिर लावून चाळीस हजार लोकांना मतदार ओळखपत्रे, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखले अशी विविध कागदपत्रे मिळवून देण्यास ज्ञानेश्‍वरने  मोलाचा वाटा उचलला. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर विधायक सहकार्य केले.

माणसाला शिक्षण मिळाले की,  माणूस बदलून जातो.  त्याच्यात परिवर्तन होते. या भावनेने प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे, असे ज्ञानेश्‍वरला वाटले. जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांच्या सहकार्याने मोहोळमध्ये दहा गुंठ्यावर पारधी मुलांची  शाळा सुरू केली.  शहरातल्या कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल असे दर्जेदार शिक्षण इथे मुलांना दिले जात आहे. शिक्षणाचा कोणताही गंध नसलेल्या, जन्मतारीख नाही, गाव माहीत नाही, आई-वडील काय करतात याचा पत्ता नसलेल्या या समाजातील मुले-मुली  शिक्षण घेऊन त्यांच्यात उमेद निर्माण करण्याचे कार्य त्यांच्याकडून होत आहे. अनेक मुले चांगले शिक्षण घेऊन उच्चपदावर पोहोचत आहेत. गावकुसाबाहेरच्या ते  आदर्शवत काम करतायेत. शिवाय शिक्षण, आरोग्य, बचतगटाच्या माध्यमातून या समाजाला  नवी आशा, नवी दिशा प्राप्त करून देण्याचे कार्य ज्ञानेश्‍वर भोसले करत आहेत.

दारिद्रय, दु:ख, लाचारी, अन्याय, अत्याचार या अनुभवाने होरपळून गेलेल्या या समाजाला स्थिरता देण्यासाठी शिक्षण देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पारधी या भटक्या विमुक्त जमातीमध्ये शिक्षणाची कोणतीही परंपरा नाही. शाळेत जाण्यासाठी कुटुंब एका ठिकाणी स्थिर असावे लागते आणि पारधी समाजाला स्वत:चे गाव नाही. रोज या गावाहून त्या-त्या गावाला भटकणारा हा समाज आहे. कुठल्या तरी गावी पालं टाकायची आणि  पोलिस पाटलाकडे नोंदी करून तीन दिवस राहायचे असा शिरस्ता असलेल्या या समाजातील मुलांना ज्ञानेश्‍वर शिक्षण देत आहे. गरज आहे शासनाच्या अनुदानाची. यास अनुदान मिळाल्यास अभियानाला आणखीन फलित मिळेल. 

पारधी समाजातील अज्ञानाच्या अंध:कारात आणि गुन्हेगारीच्या कोंडीत सापडलेल्या जमातीमध्ये जन्मलेल्या ज्ञानेश्‍वर भोसले यांनी आपले जीवन तसेच न ठेवता बदलून घेतले आहे. त्यांनी या समाजातील अन्याय, अत्याचाराविरूध्द, दैन्य दास्याविरूध्द संघर्ष केला आहे. समाजात त्यासाठी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पारधी समाजाच्या मुक्ततेच्या अशा चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ज्ञानेश्‍वर भोसले यांना पाहणे आवश्यक आहे. कारण या समाजातील तरूण तरूणींना आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानेश्‍वर प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. त्यामधून हजारोंना रोजगार मिळाला आहे. याशिवाय इंदिरा आवास योजनेतून आदिवासींसाठी असलेल्या प्रकल्पांतर्गत अनेकांना घरे मिळवून देण्यात त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या विधायक कामामुळे या समाजाला जगण्याचे बळ मिळाले आहे. एकमेकांचे सुख-दु:ख जाणून घेतात आणि त्यावर मात करतात. जसजसे या समाजात जागृती वाढत आहे, तेव्हापासून हा समाज प्रवाहात येण्याची संख्या वाढू लागली आहे. या समाजाला आत्मसन्मानाने जगता  यावे यासाठी सरकार दरबारी बावीसशे हेक्टर जमीन मिळावी यासाठी ज्ञानेश्‍वर प्रयत्न करत आहे.

 सोलापूर जिल्ह्यात पारधी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानेश्‍वर यांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. हेच त्यांच्या अभियानाचे फलित होय. राज्य सरकारने ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेला अनुदान देऊन आत्मसन्मान करणे गरजेचे आहे.   

 (दैनिक पुढारी, सोलापूर १३ एप्रिल २०१७)
लेखक- विकास पांढरे,९९७०४५२७६७।                   
  सामाजिक कार्यकर्ता- ज्ञानेश्वर भोसले - ९९२३९६९१९८


गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

पारधी मुलांत तिने जागवली 'उमेद'

आजच्या तरूणाईला सामाजिक भान नाही, समाजाच्या प्रश्‍नांविषयी संवेदनशील नाही अशी ओरड ऐकावयास मिळत असते. पण काही तरूण प्रसिध्दीपासून दूर राहून सामाजिक कार्याचा वसा चालवत असतात. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. त्यातच महिलांच्या सामाजिक कार्याला माध्यमांतून क्ववचित प्रसिध्दी मिळत असते. महिला आर्थिक विकास महामंडळात उच्च पदाचा राजीनामा देऊन पारधी समाजातील मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणार्‍या मंगेशी मून या तरूणीची कहाणी प्रेरणादायी आहे.

 मंगेशी मून या मूळच्या वर्धा जिल्ह्यातला. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक होत्या. लहानपणापासून समाजसेवेची त्यांना आवड. नोकरीत राहून समाजाचे म्हणावे तसे काम करता येत नसल्याची खंत त्यांना वाटत होती. त्यातच मुंबईतील रस्त्यावर दिसणारी वंचित घटकातील मुलांविषयी काही तरी करायचे असा मनोमनी दृढनिश्‍चय करून ते साध्य होत नव्हते. त्यामुळे मंगेशी मून यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पारधी समाजातील मुलांच्या कार्यकर्त्या बनल्या आहेत.

 समाजात नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या पारधी समाजाची आजही परिस्थितीत बदलली नाही. ना हक्कांचे घर आहे ना जागा, कोणतेही अघटित घटना घडली की पोलिसांची नजर या समाजाकडे जात असते. अशा या वंचित समाजातील मुलांची अवस्था तर फार बिकट असते. या निरागस बालकांना जगात काय चालले आहे, याचे भानही त्यांना नसते. बाजारपेठा, बसस्थानक, सिग्नल जवळ भीक मागत फिरणे  एवढेच त्यांच्या नशिबी असल्याची जाणीव होत असते. हा समाज रानावनात भटकणारा आहे. तो कुठेही स्थिर नाही. 

समाजातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे सर्व बदल घडविण्यासाठी शिक्षण आणि संस्काराची गरज आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंगेशी मून ही तरूणी मुंबई येथील महिला आर्थिक महामंडळातील नोकरीचा राजीनामा देऊन व सुखी जीवन सोडून पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्धा (रोठा) येथे उमेद फाऊंडेशनची स्थापना केली आहे. कोणतीही सरकारी मदत न घेता पारधी समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यात यश मिळाले आहे. ती आपल्या गावापासून सुरूवात केली आहे.

त्याचबरोबर या समाजातील महिलांच्या अंगी उमेद जागविण्याचा प्रयत्न केला आहे. वर्धात पारधी समाजाच्या  मुलांसाठी काम करण्यासाठी आल्या आहेत. आपल्या गावात पारधी समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. असे कळल्यावर त्यांनी येथील पारधी वस्तीवर गेल्या वर्षापासून काम करत आहेत. वस्तीवरचा त्यांचा अनुभव भयानक आहे. तितकाच संवेदनशील. 
जेव्हा त्या वस्तीत गेल्या तेव्हा दारूचा वास येत होता. सुरूवातीला नाकाला रूमाल लावून त्या काम करू लागल्या. 

आजूबाजूला सर्व मंडळी दारूच्या नशेत बोलत असे. तरीही एक महिला विचित्र अवस्थेत होती. त्यामुळे तिच्या जवळ जाऊन बसल्या असत्या. त्या पारधी महिलेच्या तोंडात तंबाखूचा गोळा होता. अंगावर मळकट साड्या, केस न विंचरलेले असं काही चित्रविचित्र अनुभव होता, असे मंगेशी मून यांनी सांगितले. बर्‍याच मुलांना अक्षरांचा गंधही नव्हता. अशा मुलांना शिक्षणाची गोडी लागत नव्हती. अनेकांनी शिव्या दिल्या. पण जिद्द न हारता दीडशे मुलांचे पालकत्व र्धेर्याने त्या स्वीकारल्या आहेत. या मुलांना आजच्या समाजाशी समरस होण्यासाठी वसतिगृह काढण्याचा प्रयत्न करतायेत. त्यासाठी देवराजी पुसाटे यांनी दोन एकर जागा उमेद संस्थेला दान केली आहे.

  आजच्या तरूणाईसमोर आदर्श

कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न मानता समाजासाठी कार्य करता येते. याचे ज्वलंत उदाहरण मंगेशी मून आहे. पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिची धडपड उमेद निर्माण करणारी आहे. वर्धा जिल्ह्यात तिचे सुरू असलेले काम आजच्या तरूण-तरूणीसमोर प्रेरणादायी आहे. मंगेशी मून हिच्या कार्यासाठी संवेदनशील  तरूण-तरूणींच्या हातांची गरज आहे.

( दैनिक पुढारी, सोलापूर ६ एप्रिल २०१७ )
लेखक-विकास पांढरे, सोलापूर-9970452767
मंगेशी मून, वर्धा -9987156930

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

समाजसेवेचा वसा घेतलेले गुरुजी




ज्याला काही करून दाखवयाचे असते तो, कुणाची वाट पाहत बसत नाही. दृढनिश्‍चयी मनुष्य आणि धबधबा हे आपला मार्ग आपणच काढत पुढे जात असतात.हेच पहा ना नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक विश्‍वनाथ बुक्के गुरूजी हे सामाजिक भान असलेले हाडाचे शिक्षक.  नांदेड आणि आष्टुर परिसरात लोक त्यांना 'गुरूजी' नावाने ओळखतात. समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन, आपले जीवन समाजासाठी वाहिलेले आहे. संत गाडगेबाबा महाराजाचा वसा चालण्याचे काम ते गेल्या साठ हून अधिक वर्षापासून करतात. प्रसिध्दीपासून चार हात लांब राहणारे विश्‍वनाथ बुक्के गुरूजी यांचे कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारे आहे.

 नांदेड जिल्ह्यातील आष्टूर या गावात एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्मा झाला. वडील तिसरी असताना वारले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठे आभाळ कोसळले. जगण्याची परवड न करता त्यांच्या आईने मोठ्या हिंमतीने आपल्या मुलांना शिक्षण शिकवले. विश्‍वनाथ हे तिसरे अपत्य. मुलांचे पाय पाळण्यात दिसावे, तसे त्यांचे व्यक्तिमत्व दिसून येत येते. शाळेत ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचे. गावात भजन असो इतर धार्मिक कार्यक्रम त्यात ते सहभागी असायचे विशेष: म्हणजे संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज हे आष्टूर व परिसरात प्रवचनास आले की, ते नेहमी हजर असायचे.त्यामुळे त्यांना लहानपणीच वैचारिक भान आले. 

सातवी आठवीत असतानाच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन, विश्‍वनाथ गुरूजी यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन ’भारत वाचनालय’ची स्थापना केली. गीता, रामायण, दासबोध, हरिपाठ, ज्ञानेश्‍वरी या धार्मिक ग्रंथाबरोबरच महापुरूषांचे चरित्र व इतर वैचारिक ग्रंथ याठिकाणी वाचनात आल्यामुळे विश्‍वनाथ गुरूजीचे जडणघडण होत गेली. "आधी केले मग सांगितले" या उक्तीनुसार महाराष्ट्रातील ज्या संताने जनसमूहाला हाती टाळ- मृदृग नव्हे तर झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले ते म्हणजे संत गाडगेबाबा. गाडगेबाबांचे स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन त्यांनीही गाव स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला. दहावीत शिकणारा हा पोरं. शिकून मोठे व्हायचं सोडून हातात झाडू घेऊन गावभर हिंडत असल्याचे पाहून बुक्के कुटुंबिय वैतागून गेले होते.

अशिक्षित आणि सुशिक्षित दोन्ही समाजाला खर्‍या अर्थाने सुसंस्कृत करण्यासाठी विश्‍वनाथ बुक्के गुरूजीचे ही धडपड आजही अविरत चालू आहे. शिक्षकी पेशीतून सेवानिवृत्त होऊन, त्यांना वीस वर्षे झाले,  आज त्याचे वय 79 आहे. प्रकृती मात्र ठणठणीत आहे. प्राणायाम, योगासन ते न चुकता रोज करतात.  नांदेडहून दर सोमवारी आष्टुर मध्ये येऊन खराटा घेऊन गाव स्वच्छ करण्याचे अखंड वृत्त ते आजपर्यंत जोपासत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आष्टूर गावातील महिला घरातील कचरा रस्त्यावर कधीच टाकत नाहीत. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर आहे. गावात एकीचे वातावरण आहे. एवढेच काय राजकीय पुढारी देखील त्यांचे शब्द प्रमाण मानून गावाचा विकास कसा होईल, विचार करतात. गावातील प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होत असतात. त्यामुळे ते कधीच पेरके वाटत नाहीत. 

 'स्वाध्याय'परिवाराच्या माध्यमातून गावातील लोकांना संस्कारित करण्याचा प्रयत्न ते करतात. बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून बाल मनावर चांगले संस्कार रूजवण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. कोणत्याही विषयाच्या मनात भय न आणता विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे असे ते सांगतात. विविध महापुरूषांच्या गोष्टी, संस्कारक्षम विचार, लोकगीते, साने गुरूजींच्या कथा अत्यंत रसाळपूर्ण वाणीत ते सांगत असल्यामुळे आबालवृध्दाचे लाडके बनले आहेत. गुरूजींच्या सहवासामुळे गावात भक्तींचे वातावरण निर्माण झाले आहे. एकादशीचे भजन, भक्तिफेरी, भगवद्गीतेवरील प्रवचन असे विविध कार्यक्रम होत असतात. गावातील तरूणांना एकत्रित करून, त्यांनी विधायक कामात कसे झुकून द्यावं याविषयी मागदर्शन करतात. अनेक तरूण गुरूजींच्या कार्याची प्रेरणा घेऊन श्रमदान, व्यसनमुक्ती चळवळ अंधश्रध्दा चळवळीसह राजकारणात यशस्वीपणे काम करत आहेत. आष्टुर गावाला बुक्के गुरूजीमुळे वैचारिक परिपक्वता आली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही हतबल न होता दोन हात करण्याची प्रेरणा बुक्के गुरूजींच्या प्रेरणेतून मिळत असल्याचे गावात समाजसेवा करत असलेला तरूण बाबासाहेब पाटील बाबर यांनी सागितले.



प्रत्येकाने आपले तीर्थक्षेत्र स्वत:च शोधायचे असते आणि तेही अंतस्थताच तोच आपला अंतर्यामी गाभारा आहे, असे साधं तत्वज्ञान सांगतात. सध्या प्रसिध्दीचा जमाना आहे. कणभर काम करायचे आणि मणभर प्रचार करायचा असा नवा पायंडा अनेकांनी आपलासा केला आहे. परंतु विश्‍वनाथ बुक्के गुरूजींनी प्रसिध्दीपासून दूर राहून आयुष्यभर निरपेक्षपणे समाजजागृतीचे मणभर काम करत आहेत. साठ वर्षापूर्वी हातात झाछू हाती घेतला. परंतु,फोटो कधी काढला नाही, कुणी काढला तर त्यास विरोध केला. कुणी बातमी करण्याचा प्रयत्न केला असता, मला प्रसिध्दीची हौस नाही, कृपया वर्तमानपत्रात माझ्या कार्याचे वृत्त प्रसिध्द करू नका, असे गावातील लोकांनाा तेे सांगतात. हे एक महान कार्य आहे. लोकांनी यात स्वच्छेने सहभागी व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. समाजाकडून तसेच मुलांकडून शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षक हा सर्वांगीण विकास आणि विविध जबादार्‍यांच्या भाराने दबल्याचे आज दिसत आहे. त्यामुळे आजचा शिक्षक बहुआयामी असला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. 

आज शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त होऊन, घरी बसणारे भरपूर आहेत. अनंत काणेकरांच्या दोन मेणबत्ता लघुनिबंधात वाक्य आहे, स्वत:साठी जगलास तर मेलास, दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, जगणं आणि मरणं म्हणजेच माणुसकी. सतत दुसर्‍याच्या सुखासाठी झटणारे, प्रसिध्दीपासून दूर राहून समाजासाठी व्रतस्थपणे काम करीत राहणारे विश्‍वनाथ बुक्के गुरूजी कार्य प्रेरणादायी आहे. 32 वर्षे नोकरी सांभाळली असली तरी संत गाडगेबाबा महाराज यांचा कार्यकर्ता म्हणून काम पाहले. गुरूजींच्या कार्याममुळे आष्टूर गावाला एक नवी दिशा मिळाली आहे.आदर्श समाजसेवक कसा असावा याचे मूर्तीमंत उदारहण सर्वासमोर ठेवले आहे.

लेखक - विकास पांढरे, 9970452767
विश्‍वनाथ बुक्के गुरूजी : 8605028190
(पूर्वप्रसिध्द ज्येष्ठपर्व त्रैमासिक)


शनिवार, ११ मार्च, २०१७

माझ्या जन्माची कहाणी




      गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा नाही. म्हणजे दुःखाला कंटाळून बसणे हे मला आवडत नाही. पण आज मन मोकळं करतोय. यात मी कुठेही कल्पनाविलासाचा वापर केला नाही.

माझ्या जन्माची तारीख काय आहे ? वार कोणता ? वेळ काय ? याबाबची माहिती मला काय माझ्या जन्मदात्यानाही नीट सांगता येणार नाही. कारण संपूर्ण जीवन खूप गुंतागुंतीच्या प्रक्रियांनी बनलेले आहे. अठराविश्व दारिद्र्यात जन्माला आलेल्या माझ्या सारख्या इसमाला मास्तरांनी लावलेल्या जन्मतारीखवरच विसंबून राहावं लागतंय.

 १९८८चे वर्ष असावं.. श्रावण महिना..नागपंचमी जवळ आला होती..... वार शनिवार... अमावस्येची रात्र.... पाऊस धो धो कोसळत होता... वडील कुटुंबाची खळगी भरण्यासाठी शहरात कामाला गेले होते... त्या रात्रीच्या पावसाने तीन पञ्याच्या खोलीत पाण्याचा डोह उभारला होता... चिमणी मधेमधे बंद व्हायची.... अशावेळी आईची प्रसृतीची वेदना ही तीव्र झाल्या होत्या.... अशा या घरात आईला आधार देणारा माणूसच नव्हता.

आईनं कळा सोसत वाड्यातल्या चुलतीला खूप हाका मारल्या.. पण कुणीही जागं झालं नाही... तो पाऊसचं इतका भयानक होता...की घरातला आवाज बाहेर पडत नव्हता... नुसताच रिपरिप पावसाचा आवाज सुरू होता..आईची घालमेल झाली होती... काय करावं तिला कळेनासं झाले.. शेवटी सर्व वेदना सहन करून तिनं मला जन्म दिला.

पहाटेच्या वेळी पाऊस ओसरला होता... तेव्हा माझी आई बाहेर का येत नाही ? म्हणून चुलतीनं घरात डोकावून पाहिलं तर प्रसृतीचं चित्र दिसले. माझ्या अंगावर पावसाचं पाणी पडलं होतं. त्यामुळं मी थंडगार होऊन पडलो होतो. अंगावरची नाळ तशीच होती. आई ही त्या वेदनेतून बाहेर पडल्यानं माझ्याकडं पाहण्याची तिची शक्ती उरली नव्हती.

आयाबाया घरात आल्या.. मी जानवं घेऊन जन्माला आल्यानं खूप भाग्यवान आहे ? असं आयाबाया म्हणाल्या तर कुणी अमावस्येची राञ.... त्यात शनिवार त्यामुळं पोरगं चांगलं निघणार नाही ? असं त्या आतल्या आवाजात बोलू लागल्या.

पहाटे पाच सहा वाजता गावतल्या आत्याला कुणीतरी बोलावून घेतलं. तव्हा माझ्या अंगावरचं जानवं आणि नाळं तिनेचं काढलं.... चुलीवर गरम पाणी तपाला ठेवली पण सरपन पावसात भिजल्यानं चुल पेटतच होती.. कसबसं घासलेट टाकून तिनं पाणी तपावलं.. तिनंच दोघांना अंघोळ घातली. आईला चिमूटभर भात घातला.. घरातही पिठाचा कण नव्हता.. आईला त्या भाताच्या कण्या सुद्धा गोड लागत नव्हत्या..

त्या भयाण रात्री माझा जन्म झाला,असं माझ्या आईनं वीस वर्षापूर्वी सांगितलेली ही माझ्या जन्माची कहाणी. आज या गोष्टीचं स्मरण करताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

घरात शिकलेलं कुणीच नव्हतं.. पंचांग, जन्मकुंडली, नावरस नावं, शनि या गोष्टी पाहायच्या तर लांबच राहिल्या, त्यावेळी माझी जन्मतारीख लिहायलाही कुणाला वेळ मिळाला नाही ? कारण संपूर्ण कुटुंबचं अशिक्षित... तिथं कुठलं आलं ज्ञान ?

शेती पिकत नाही म्हणून नाना (बाप ) मिळेल ते काम करायचा. घरात दोनाची चार हात झाली होती. त्यामुळं पोटाची खळगी भरावी म्हणून तो महिना महिना बाहेर असायचा..

चार लेकरं सांभाळायची चिंता.. शेतात मूठभर दाणे निघायची नाहीत.. आई ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं कामाला जायची. मिळेल त्या पैशातून आपल्या पिलांना घास भरवित.. दिवाळी, दसरा कसा असतो ? माहीत सुद्धा नव्हता.

 पुढं मी रांगायला लागलो.. धडाधडा धावत होतो.. खेळत होतो,बागडत होतो.. अचनाक १९९२-९३ साली माझ्या अंगात भयंकर ताप आला... माझ्या गावात सरकारी दवाखाना होता पण डॉक्टर कधीच वेळेत नसतं.. आईनं, माझ्या अंगावरून मीठ मिरची उतरवली तरी काही झालं नाही...! परगावच्या, खासगी दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जवळ पैसेही नव्हते.

अंगात ताप वाढतच होता.. अन् मला पोलिओ झाला ! एक दोन काय झालं नाही ? काल धावणार पोरगं आज चालताना लगडत आहे हे पाहून त्यावेळी आई खूप रडली होती.

अन् उपाय करायला सुरुवात झाली.. मोठ्या दवाखान्यात दाखवण्यात नेण्यात येऊ लागले. बापानं,माझ्या पायासाठी लवकर इलाज व्हावा म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे शेअर्स अवघ्या पाच सहा हजारला विकले. आज या शेअर्सची किंमत तीन लाखाच्या घरात आहे, असो मी चांगलं चालावं यासाठी माझ्या पायाला राञराञ शेखत बसायची..! कुणाच्या तरी सांगण्यावरून माझा लंगडा पाय दोन तास उकिरड्यात पुरला होता. एवढं करूनही इलाज झाला नाही.

आजही ती माझ्या पायाला खूप जपते. कधी ओझं उचलू दिली नाही. माझ्या कुटुंबांचा आयुष्याचा बारोमास पावसावर अवलंबून असल्याने कधी पाऊस यायचा कधी नाही. त्यामुळं नानांनी शेताचा नांद सोडून दिला होता. आई आणि नानांनी मला खूप शिकवलं..

खूप हलाकीतून शिक्षण घ्यावं लागलं. माझ्या बहिणीला आणि भावाचं प्राथमिक शिक्षण देता आलं.मला ही कधी, पुस्तक, वह्या, कपडे कधी मुबलक मिळू शकले नाही. आठवीत असताना फक्त सहा वह्या मिळाल्या. दहावी कसाबसा पास झालो. अकरावी ते एम. ए पर्यंत एकाच कपड्यावर दिवस काढावे लागले. घासलेटच्या दिव्यावर एम.ए पर्यंत अभ्यास आणि वाचन केलो. एवढं असूनही महाविद्यालयात पहिला नंबरनी पास व्हायचो. याकाळात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. स्कॉलरशिपच्या पैशातून जवळपास ६०० पुस्तके खरेदी केली त्यातून लिखाणाची आवड निर्माण झाली. 

नानांना मी मास्तर व्हावं, अशी इच्छा होती. बी.एड च्या परीक्षेसाठी प्रयत्न करू लागलो. त्या अगोदर सेट नेटच्या सात आठ परीक्षा दिल्या होत्या. प्रत्येकी वेळी ८ -१० गुणांचा फरक पडत गेला. त्यामुळे बी.एड कडे वळलो. सीईटी परीक्षा दिली. चांगले मार्क मिळाले. पहिल्याच यादीत पुण्यातील एस.पी.महाविद्यालयाच्या आवारातील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नंबर लागला. 
महाराष्ट्रातलं सर्वात जुनं महाविद्यालय म्हणून लौकिक होता. प्रवेश अर्ज, फीसची तजबीज करु लागलो. त्याकाळी ८ हजार फीस होती. इतरांच्या दृष्टीनं ही फीस फार किरकोळ होती. माझ्या दृष्टीनं डोंगराएवढी होती. २०११-१२ चं वर्षे असावं. आमच्याकडं भयानक दुष्काळ पडला होता. शेतातून चिपटभरं दाणे सुध्दा निघाले नाहीत. त्यामुळे बीएड ला प्रवेश घ्यायचं नाही. असं मनोमनी ठरवलो.

नानांनी एका व्यापाऱ्याला माझ्या शिक्षणासाठी एक बैल सहा हजाराला विकल्याची बातमी कळली. मी रानात जाईपर्यंत व्यापाऱ्यानं तो बैल घेऊन गेला होता. नानांनी त्या बैलाचे सर्व पैसे माझ्या हातात दिले आणि पुण्याला जाण्यासाठी मनधरणी करू लागले. नाईलाजाने मी बीएडला प्रवेश घेतला. इकडून तिकडून पैशाची तजबीज करून कसाबसा बीएडला प्रवेश घेतला. पुण्यात शिक्षण घेताना खूप हाल झाले. इथल्या आठवणी नंतर कधी तरी सांगेन.

बीएडला चांगल्या गुणांनी पास झालो, माझा मुलगा मास्तर होणार मी आई आणि नाना खुश असतं. पण कुठलं काय ? कशात काय आणि फाटक्यात पाय? अशी गत झाली. दोन वर्षे सलग सगळीकडे अर्ज करत होतो. मास्तर होण्यासाठी १५-२० वीस लाख रूपये मोजावी लागतात, असा वाईट अनुभव मिळाला. ताण-तणाव वाढत गेला.

तीन वर्षापूर्वी सोलापुरात पूर्णवेळ पञकार झालो.
इथे माणसं ओळखायला शिकलो. मान्यवर संपादक आणि पञकाराची वाहवा वाहवा मिळवत लिहीत राहिलो. काहींनी इथेही घाण्याच्या बैलासारखा वापर केला. काहींना माझा कमकुवतपणा सांगून ही त्यांनी गैरविश्वास दाखवला.या क्षेत्रात काम करताना खूप तणाव येतो हे लक्षात आले. बस्स आता प्रामाणिकपणे काम करत रहायचं,पुढे दिवस काढत राहिलो.

सध्या आयुष्याला वेगळे वळण लागतं आहे. ते म्हणजे चांगले काहीतरी सकारात्मक लिहायचं. त्यासाठी चांगले व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे हीच माझी ऊर्जा आणि जन्मकुंडली असणार आहे. हीच माझ्या आयुष्याची कहाणी असणार आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( ११ मार्च २०१६ )
     

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...