गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

पारधी मुलांत तिने जागवली 'उमेद'

आजच्या तरूणाईला सामाजिक भान नाही, समाजाच्या प्रश्‍नांविषयी संवेदनशील नाही अशी ओरड ऐकावयास मिळत असते. पण काही तरूण प्रसिध्दीपासून दूर राहून सामाजिक कार्याचा वसा चालवत असतात. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. त्यातच महिलांच्या सामाजिक कार्याला माध्यमांतून क्ववचित प्रसिध्दी मिळत असते. महिला आर्थिक विकास महामंडळात उच्च पदाचा राजीनामा देऊन पारधी समाजातील मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणार्‍या मंगेशी मून या तरूणीची कहाणी प्रेरणादायी आहे.

 मंगेशी मून या मूळच्या वर्धा जिल्ह्यातला. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक होत्या. लहानपणापासून समाजसेवेची त्यांना आवड. नोकरीत राहून समाजाचे म्हणावे तसे काम करता येत नसल्याची खंत त्यांना वाटत होती. त्यातच मुंबईतील रस्त्यावर दिसणारी वंचित घटकातील मुलांविषयी काही तरी करायचे असा मनोमनी दृढनिश्‍चय करून ते साध्य होत नव्हते. त्यामुळे मंगेशी मून यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पारधी समाजातील मुलांच्या कार्यकर्त्या बनल्या आहेत.

 समाजात नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या पारधी समाजाची आजही परिस्थितीत बदलली नाही. ना हक्कांचे घर आहे ना जागा, कोणतेही अघटित घटना घडली की पोलिसांची नजर या समाजाकडे जात असते. अशा या वंचित समाजातील मुलांची अवस्था तर फार बिकट असते. या निरागस बालकांना जगात काय चालले आहे, याचे भानही त्यांना नसते. बाजारपेठा, बसस्थानक, सिग्नल जवळ भीक मागत फिरणे  एवढेच त्यांच्या नशिबी असल्याची जाणीव होत असते. हा समाज रानावनात भटकणारा आहे. तो कुठेही स्थिर नाही. 

समाजातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे सर्व बदल घडविण्यासाठी शिक्षण आणि संस्काराची गरज आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंगेशी मून ही तरूणी मुंबई येथील महिला आर्थिक महामंडळातील नोकरीचा राजीनामा देऊन व सुखी जीवन सोडून पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्धा (रोठा) येथे उमेद फाऊंडेशनची स्थापना केली आहे. कोणतीही सरकारी मदत न घेता पारधी समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यात यश मिळाले आहे. ती आपल्या गावापासून सुरूवात केली आहे.

त्याचबरोबर या समाजातील महिलांच्या अंगी उमेद जागविण्याचा प्रयत्न केला आहे. वर्धात पारधी समाजाच्या  मुलांसाठी काम करण्यासाठी आल्या आहेत. आपल्या गावात पारधी समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. असे कळल्यावर त्यांनी येथील पारधी वस्तीवर गेल्या वर्षापासून काम करत आहेत. वस्तीवरचा त्यांचा अनुभव भयानक आहे. तितकाच संवेदनशील. 
जेव्हा त्या वस्तीत गेल्या तेव्हा दारूचा वास येत होता. सुरूवातीला नाकाला रूमाल लावून त्या काम करू लागल्या. 

आजूबाजूला सर्व मंडळी दारूच्या नशेत बोलत असे. तरीही एक महिला विचित्र अवस्थेत होती. त्यामुळे तिच्या जवळ जाऊन बसल्या असत्या. त्या पारधी महिलेच्या तोंडात तंबाखूचा गोळा होता. अंगावर मळकट साड्या, केस न विंचरलेले असं काही चित्रविचित्र अनुभव होता, असे मंगेशी मून यांनी सांगितले. बर्‍याच मुलांना अक्षरांचा गंधही नव्हता. अशा मुलांना शिक्षणाची गोडी लागत नव्हती. अनेकांनी शिव्या दिल्या. पण जिद्द न हारता दीडशे मुलांचे पालकत्व र्धेर्याने त्या स्वीकारल्या आहेत. या मुलांना आजच्या समाजाशी समरस होण्यासाठी वसतिगृह काढण्याचा प्रयत्न करतायेत. त्यासाठी देवराजी पुसाटे यांनी दोन एकर जागा उमेद संस्थेला दान केली आहे.

  आजच्या तरूणाईसमोर आदर्श

कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न मानता समाजासाठी कार्य करता येते. याचे ज्वलंत उदाहरण मंगेशी मून आहे. पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिची धडपड उमेद निर्माण करणारी आहे. वर्धा जिल्ह्यात तिचे सुरू असलेले काम आजच्या तरूण-तरूणीसमोर प्रेरणादायी आहे. मंगेशी मून हिच्या कार्यासाठी संवेदनशील  तरूण-तरूणींच्या हातांची गरज आहे.

( दैनिक पुढारी, सोलापूर ६ एप्रिल २०१७ )
लेखक-विकास पांढरे, सोलापूर-9970452767
मंगेशी मून, वर्धा -9987156930

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...