शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

दीड एकरांतून घडविली क्रांती


धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली बाळासाहेब घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड एकरात मिश्र पीक पद्धतीचे उत्कृष्ट मॉडेल उभे केले आहे. महिला शेतकर्‍यांना एकत्र आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची निर्मिती करून जणू क्रांती घडवून आणली आहे. शेती आधारित अन्य उपक्रमात व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे त्या अनेकींना आत्मनिरर्भरतेची प्रेरणा देत आहेत.

ही कहाणी आहे. जिद्दीची आणि मेहनतीची. अतिशय गरीब परिस्थिीतही शेतीतून प्रगती साधली, त्यासाठी आतोनात त्रास, अडचणी सहन केल्या, पण थांबल्या नाहीत, ध्येयापर्यंत पोहोचल्या, अशा प्रगतशील महिला शेतकरी वैशाली बाळासाहेब घुगे यांची ही कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील अणदूर हे वैशालीताईंचे सासर. लग्नापूर्वी पुण्यात काकांच्या घरी वाढलेल्या, तिथेच नववीपर्यंत शिकल्या. सोळाव्या वर्षी त्याचं बाळासाहेबांशी लग्न झालं. नवरा (बाळसाहेब) पदवीधर असूनही त्याच्या हाताला काम मिळत नव्हते.  त्यातच संसाराच्या रहाटगाड्यात सासरांनी चार एकर शेती विकली. पुढे परिस्थितीत हतबल होत गेली. पुढे वैशालीताईंनी संसार सावरला. अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण  केले.
आत्मनिर्भरतेचा असा एक प्रवास
अतिशय हलाखीचे दिवस सहन करीत पुढे आलेल्या वैशालीताई जीवनातील अनुभव सांगताना म्हणाल्या,‘‘ घरात कुणीच कामाला जात नव्हते. त्यामुळं घरखर्च कसा करायचा? त्यात नवरा कमवता नव्हता, या विचारानं सासर्‍यानं दीड एकर शेत, एक म्हैस आणि चार पत्रे देऊन आम्हाला घराबाहेर (विभक्त केले) काढले. शेतात दगडाची खिळपट रचून आणि त्यावर पत्रे टाकून घर उभे केले. पदरात मूल होतं. नवरा कमवत नव्हता, पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. म्हैशीचे दूध व शेतातील भाजीपाला विकून संसाराला चार पैसे मिळत होते. अशातच काळोख्या रात्री, वादळी वार्‍यात घराववरचे पत्रे उडून गेले.
लहान बाळाला पोटाशी धरून भयभीत अवस्थेत बाहेर पडले. या भीषण प्रसंगामुळं मी जगणं शिकले. खंबीर होऊन पुढे आले. संसार सांभाळला, शेतात भाजीपाला लावला, बाजारात, वस्तीवर, गल्लीत भाजी विकू लागले, घरंदाज, दिसायला चांगली रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचं पाहून आयाबाया माझ्याकडं टकमक बघायच्या, हसायच्या, बोलायच्या, माझ्यापुढं काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, काही महिलांचं मार्गदर्शन मिळालं.. वस्तीवरच्या महिलांचा गट बनवला.. चार पैसे मिळत गेले, शेतीत सूर गवसू लागला. खर्‍या इथूनच माझ्या ‘आत्मनिर्भरते’ला सुरवात झाली.’’

मिश्र पिकांतून फुलवली शेती
शहरात वाढलेल्या वैशालीताईंना शेतीमातीचा कसलाही गंध नव्हता. शेती समजून घेण्यासाठी त्यांनी चार वर्ष खर्ची घालवली. वैशालीताई सांगतात,‘‘२०११-१२ पासून मी शेती करू लागले.  शेती समजून घेत होते. पहिल्यांदा शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यात पूर्वांपार पासून पिकाची एक पद्धत होती. या पद्धतीत मी बदल केला. ऊस, सोयाबीन पिकांऐवजी मिश्र पीक पद्धत अंगीकारली. पहिल्यांदा घरच्यांनी विरोध दर्शवला. नंतर या पीक पद्धतीतून मिळालेल्या समाधनाकारक उत्पन्नातून विरोध मावळला.  उडीद,तूर,बाजारी, मूग,चवळी, सोयाबीन आदी कडधान्याच्या लागवडीतून दीड एकरांची शेती फुलवली आहे.’’
 कमी पाण्यात व कमी कालावधीत येणार्‍या पिकांची लागवड हे त्यांच्या शेतीचे सूत्र आहे. कडधान्याबरोबर गहू, ज्वारी आदी देशी बियांणापासून समाधानकारक उत्पन्न काढतात. स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेत घेतलेल्या शेती प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. यामुळे सभेत बोलू लागल्या, महिलांना, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करू लागल्या.
दुष्काळ निमुर्लनात सहभाग
२०१३, २०१४ आणि २०१५ हे सलग तीन वर्षे दुष्काळाचे होते. मराठवाड्यात चारापाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. शेतकरी आपले जनावरे चारा छावणीत पाठवित होते.  शासनाकडून दुष्काळ निर्मुलनासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू झाले होते. या अंतर्गत तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘निकृष्ट चार्‍यातून उत्कृष्ट चारा निर्मिती’ कशी होते.  या संदर्भात वैशालीताईंना प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणातून त्यांनी आपल्या शेतात हायड्रोपोनिक चारा बनवायला सुरवात केली. या चार्‍यातून त्यांनी स्वतःची १०जनावरे जगवली.  मुख्य म्हणजे वाड्या वस्त्यातील महिला शेतकर्‍यांना  कमी पाण्यातील चारा निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

गांडूळ खत निर्मिती
गांडूळ खत, गांडूळ कल्चर व गांडूळ पाणी या संदर्भातील विविध प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. हे प्रयोग करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या बाबत बोलताना वैशालीताई म्हणाल्या,‘‘२०१३ साली मी सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च ही माझ्या आवाक्याबाहेरचा होता. प्रशिक्षणानंतर गांडूळ खत बेड टाकण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी अडीच हजार रूपये खर्च अपेक्षित होते. याला पर्याय म्हणून मी  जुने पोती (गोनी) फाडून व्यवस्थित बेड तयार केला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हसायचे आणि पुढे जायचे. बेडमधील पहिला खात माझ्या शेतात टाकला. शेतातून चांगले उत्पन्न निघू लागले. पुढे गांडूळ खताचे बेड वाढवले. आज माझ्याकडे गांडूळाचे दहा बेड आहेत. गांडूळाचे व्हर्मीबेड वाढवले. त्यातून मिळणार्‍या व्हर्मीवाशची द्राक्ष व फळबागायतदारांकडून मागणी वाढली आहे. यातून वर्षांकाठी १०टन गांडूळ खत तयार होतोय. शून्य गुंतवूणकीतून मला वर्षाकाठी मी दीड लाख रूपये उत्पन्न मिळू लागले आहे.’’


शाश्वत शेतीचा पर्याय

शेतीला जोडधंदा म्हणून वैशालाताईंनी आपल्या शेतीपुढे गावरान कुक्कुटपालनाचा पर्याय ठेवला आहे. २०१४-१५ साली ९०हजारांची गुंतवणूक करून त्यांनी शंभर कोंबड्याचे शेड उभा केले. पहिल्या वर्षी त्यांना ३५हजार रूपयांचा नफा मिळाला. आज त्यांच्याकडे ४५० गावरान  कोंबड्या आहेत. यातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांनी  दोन हजार कोंबड्याचे शेड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
या शिवाय त्यांच्याकडे १४म्हशी व दोन देशी गायी आहेत. शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट बांधला आहे. गोमोत्रापासून जीवामृत तयार करतात.  बयोगॅस, मुरघास, कडबाकुट्टी, जीवामृत, नर्सरी, पिठाची मशिन अशा विविध शेतीपूरक उद्योगातून वर्षांला सात ते आठ लाखांचे उत्पन्न त्या मिळवितात.
विविध फळझाडांची लागवड
वैशालीताई आपल्या दीड एकरांच्या शेतात विविध प्रयोग करतात. फळबाग हा त्यातील एक भाग. पूर्वी त्यांच्याकडे केशर आंब्याचे ९ झाडे होती. यातून त्यांना वर्षांकाठी २५ते३० हजार रूपये उत्पन्न मिळते.  हे उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर गतवर्षी एक एकरांत केशर आंब्याची ३५० झाडे लावली आहेत.याशिवाय शेवगा १५, लिंबू २५, नारळ ५, पपई २, पेरू २, हदगा २, अशा झाडांची बाग त्यांनी तयार केली आहे. पिक व फळझाडांना आच्छादन, ठिंबकचा जास्तीत जास्त वापर त्या करतात.

विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची उभारणी
वैशालीताईंनी २०१७साली तुळजापूर तालुक्यातील २० गावातील महिला शेतकर्‍यांना एकत्रित आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीच्या १हजार महिला सभासद आहेत. कंपनीमार्फत महिला शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, बियाणे साठवण, उगवणक्षमता, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक विषयी मार्गदर्शन केले जाते. कंपनीने शेतीमाल खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेती पूरक व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. कंपनीच्यावतीने भाजीपाला साठवण शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
डाळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी
कडधान्याची लागवड करणे व त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यासाठी  प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. उडीद, मूग,हरभरा डाळीवर काम होत असते. या अंतर्गत कंपनीकडून‘उरवा’ या ब्रॅडखाली केरळ येथे १०टन डाळ निर्यात करण्यात आली होती. डाळीपासून पापड निर्मिती तर हळदीपासून पावडर तयार करण्यात काम सुरू आहे.
एक लाख शेतकर्‍यांना प्रशिक्षण
वैशालीताई यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संस्था, पुणे) या संस्थेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत २७ जिल्ह्यातील १लाखाहून अधिक शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती,गांडुळखत निर्मिती, विक्री, गांडुळ कल्चर, गांडुळपाणी, दाळ प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला लागवड आदी विषया संदर्भात प्रशिक्षण दिले आहे.

शेती, शेतीपूरक व्यवसायातील यशाचे गमक स्वतः पुरते मर्यादित न ठेवता इतरांना त्याचा लाभ मिळावा, या हेतूने त्यांनी २०१८ साली आपल्या शेतात वैशाली महिला शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी एकाच वेळी ५०प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात.अतिशय हलाखीतून शेती व्यवसायला सुरूवात केलेल्या आणि त्यात नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून शेती व्यवसायात यशस्वी झालेल्या वैशालीताईंची कहाणी सर्वांना प्ररेणा देणारी आहे.
-विकास पांढरे -९९७०४५२७६७
साभार : एकता मासिक (आत्मनिर्भर भारत विशेषांक- आँगस्ट २०२२)
संपर्क
वैशाली बाळासाहेब घुगे
मु.पो.अणदूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव
मो.नं. : ७९७२८०६०५५
ईमेल : Vaishalighuge112@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...