‘सा.विवेक’ चे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांना सावित्रीबाई फुले एकात्म समाज विकास मंडळ ( डॉ.हेडगेवार रूग्णालय) यांच्यावतीने दिला जाणारा डॉ.भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा.
रवींद्र विष्णू गोळे हे मराठी समरसता साहित्य प्रवाहातील महत्त्वाचे कार्यकर्ता, लेखक आहेत. साहित्यातील विविध प्रकार हाताळून त्यांनी समसरता साहित्य प्रकारात मोलाची भर घातली आहे. गोळे हे पेशाने पत्रकार आहेत,पण त्यांच्यामध्ये एक प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ता दडलेला आहे याची प्रतिची त्यांच्या साहित्य लेखनातून प्रकट होताना दिसते. 'माणूस' हा साहित्याचा केंद्रबिंदू ठेवून ते लिखाण करताना दिसतात. भटक्या समाजातील स्त्रिया, जनजाती समूहाचे प्रश्न आणि जीवन त्यांनी आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केले आहे. पत्रकरिता आणि साहित्यातील आजपर्यंतचे त्यांचे हे कार्य जरी उल्लेखनीय असले तरी, त्या पाठिमागे त्यांचे संघर्षमय जीवन आहे. त्यांच्या या संघर्षमय जीवनातून त्यांची साहित्यनिर्मिती उभी राहिलेली दिसते.
रवींद्र गोळे यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९७४ साली सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील हातगेघर या छोट्याशा गावात झाला. घरची परिस्थिती बेताची होती. वडील मुंबईत टपाल खात्यात काम करीत. आई गावाकडे शेती आणि घर सांभाळायची. रवींद्र यांचे प्राथमिक शिक्षण हातेघरमध्ये, तर तांत्रिक हायस्कुलचे शिक्षण साताऱ्यात झाले. बाल वयात त्यांना देशपांडे काकूमुळे पुस्तक वाचनाचे वेड लागले. विविध विषयांवरील शेकडो पुस्तके त्यांनी हातावेगळी केली. बालवयातच त्यांच्या वाचनात ‘उपरा’ हे पुस्तक आले. या पुस्तकानी त्यांना वेगळी दृष्टी दिली. या वयातच अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुलंच्या कथा, नारायण सुर्वेच्या कविता त्यांच्या मनावर परिणाम करत होत्या. पुढे ते संघ विचारांच्या सानिध्यात आले. या विचारधारेतील बिनीचे शिलेदार, लेखक, विचारवंत रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर, गिरीश प्रभुणे यांच्या बरोबरच बन्सिधर घोडेस्वार, विजयराव कापरे यांच्या सहवासात जीवनाची घडण झाली. भीमराव गस्ती यांच्या ‘बेरड’ या आत्मकथनाने त्यांना समाजाकडे बघण्याची दृष्टी विकसित झाली. भीमराव गस्ती समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष असताना कार्यवाह म्हणून काम करण्याची संधी रवीद्र गोळे यांना लाभली, दोघांचा स्नेह संबंध निर्माण झाला.
दोन दशकांपूर्वी शिक्षण पूर्ण करून रवीद्र गोळे मुंबईत आले. त्यानंरतचा वायरमन ते सा.विवेक चे कार्यकारी संपादक पर्यंतचा हा त्यांचा अनोखा प्रवास ध्येयपथावर अविरत चालणाऱ्या पथिकांसाठी प्रेरक आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने चळवळीकडे प्रवास सुरू झाला. वायरमन म्हणून महानगरातला भवताल त्यांच्या नजरेत भरत होता.त्याच बरोबर सामाजिक समरसतेच्या चळवळीत त्यांच्यातला एक सच्चा कार्यकर्ता घडत गेला. डोंगराएवढी' माणसे त्यांना भेटीत गेली. त्यांच्या विचारांनी ते अधिक संघाकडे ओढले गेले.
सा. विवेकचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रभर फिरू लागले, उपेक्षितांचे अंतरंग समजून घेऊ लागले. नाकारलेल्या, गावकुसाबाहेरच्या माणसाच्या सुख: दुखाची कहाणी ऐकून त्यांच्यातला संवेदनशील कार्यकर्ता, लेखक घडत गेला. त्यामुळेच सामाजिक विषयांना हात घालण्याची ताकद मिळाली असावी. या कामाचे फलित म्हणजे ‘आयाबाया’ व ‘यमरगवाडीची गोष्ट हे दोन पुस्तक होय.
लेखक म्हणून गोळे यांचे कर्तृत्व मोठे आहे.'माणूस' हा साहित्याचा, पत्रकरितेचा केंद्रबिदू ठेवून ते लिखाण करताना दिसतात. माणूस समजून घेणे, माणसाला चेहरा प्राप्त करून देणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्यै. 'आयाबाया’ हे भटक्या जाती-जमातीतील महिलांच्या वेदनेची व कर्तृत्वाची कहाणी सांगणारे असेच एक पुस्तक आहे. भारताबाई देवकर, सखुबाई बंडीधनगर, जयश्री भोसले, राजश्री काळे, कांचन मालन काळे, सुजाता गणवीर, सरस्वतीबाई माने, अयोध्याबाई उपाध्ये आदी या नवदुर्गेची गाथा 'आयाबाया'त आली आहे. यात केवळ त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दु:खाच्या करुण कहाण्या नाहीत तर उमेदीच्या, यशाच्या कथा वाचताना अंगावर काटा उभा राहतो. महाराष्ट्रातील भटक्या समाजाचे चित्र सकारात्मक रितीने रेखाटलेले मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे.
‘आयाबाया’ काय किंवा अलीकडे प्रकाशित झालेले ‘यमरगवाडीची गोष्ट’ या पुस्तकातून ते माणसातल्या माणुसकीला साद घालतात. त्यामुळे त्यांचे लिखाण काळजाला भिडते. मराठी साहित्याचा अभिरूचीचा पोत बदलण्याचे काम या दोन पुस्तकाने केले. मानवतेच्या, समरसतेच्या अंगाने ही दोन्ही पुस्तके प्रत्येकांनी वाचावित, समजून घ्यावीत.
गोळे यांच्या साहित्ययात्रेतील आणखीन एक महत्त्वाचे विशेष म्हणजे बालसाहित्य. महामानवाचे कर्तृत्व, विचार लहान मुलांना समजेल, उमजेल अशा भाषेत त्यांनी बालकांसाठी चरित्र लिखान केले आहे. याठिकाणी ही 'माणूस' हेच त्यांच्या साहित्याचे प्राणत्व असल्याचे दिसून येते. चरित्र लेखनाद्वारे ते मानवतावादी, शोषित, पीडित, उपेक्षित माणसांचे भावविश्व सााकारताना दिसतात. ‘प्रिय बराक ओबामा, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘सयाजीराव गायकवाड’, ‘संत गाडगेबाबा’, ‘माणुसकीच्या गोष्टी, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ संताची समरसता त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकांनी बालसाहित्यात मोलाची भर टाकली आहे.
गोळे हे विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संपादन करणारे संपादक आहेत. ‘राष्ट्रद्रष्टा दिनदयाळ उपाध्याय’, ‘वनजन गाथा’, ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’,‘समर्थ भारत, स्वप्न विचार-कृती’, ‘सहकारातून सामाजिकतेकडे’, ‘कर्मवीर दादा इदाते गौरव ग्रंथ’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’, आदी महत्त्वपूर्ण ग्रंथाचे गोळे यांनी संपादन केले आहे.
‘दीपस्तंभ’, ‘पथिक’, ‘अष्टपदी’, ‘कृतार्थ’, ‘झंझावत’, ‘समाज धन्वंतरी’, ‘जनता जनार्दन वामनराव परब’, ‘प्रेरणादीप’ या व्यक्तिचरित्रात्मक पुस्तकांतून गोळे यांच्या लिखाणाचे आणखी विशेष समोर येते. अशा प्रकारे चरित्रात्मक साहित्यलेखनापासून ते संपादित ग्रंथापर्यंतचा असा भिन्न विषय, आशयाच्या वैविध्येतून रवींद्र गोळे यांच्यातील लेखक, पत्रकार, संपादक, कार्यकर्ता वाचकांसमोर येतो.
रवींद्र गोळे यांच्याकडे लेखनशैलीप्रमाणे वक्तृत्वशैली पहायला मिळते. अवघड विषय ते सहज आणि सोप्या भाषेत सांगतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक महत्त्वाच्या व्याख्यानात, समारंभात प्रमुख वक्ता म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. आंबेडकरी साहित्य- विचार, समरसता साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संविधान आदी विषयांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणांना,व्याख्यानास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे रवींद्र गोळे हे एक साहित्यिक व उत्कृष्ट वक्ता म्हणून समाजाला परिचित झाले आहेत.
रवींद्र गोळे यांनी साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान पाहता त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महात्मा फुले चरित्र साहित्य साधन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. समरसता साहित्य परिषद चे कार्यवाह म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्यवाह म्हणून काम केले आहे.साहित्यासाठी आणि पत्रकरितेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार (२०१६), भारतीय स्त्री शक्तिचा काव्य लेखनासाठी पुरस्कार (२००१) प्राप्त झाला आहे. यासह विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. सध्या ते मराठी साहित्य समरसता साहित्य पत्रिकेचे संपादक पदाची धुरा सांभाळत आहेत.
गोळे यांच्या साहित्याचा, पत्रकारितेचा अभ्यास करताना त्यांच्या लेखनशैलीचे वेगळेपण स्पष्ट होते. त्यांचे सर्व साहित्य हे अनुभवावर, वास्तवावर आधारलेले आहे. शोषित समाजातील माणूस हाच त्यांच्या साहित्याचा प्राण आहे.
- विकास पांढरे, ९९७०४५२७६७




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा