गुरुवार, १५ मार्च, २०१८

गावकडचा माणूस



पोटासाठी माणसाला मजल दरमजल करताना, माणूस आपल्या गावापासून, माणसापासून दूर जातो, तिथली माती, तिथली माणसं आणि तिथल्या खुणावणाऱ्या गोष्टी विषयी एक आत्मियता बाळगत असतो.
गावाकडचं पाखरू जरी भेटले तरी जितका आनंद होतो,तितका आनंद शब्दांत शब्द व्यक्त करता येत नाही. माणूसच माणसाला खेचत असतो. इतकी गावकडच्या माणसात ताकद असते. मग तो आपल्या जातीचा असो वा कोणत्या धर्माचा अन् कोणत्या रंगाचा आहे. ही सर्व विशेषणे गळून पडतात, त्यातला आपलेपणा आणि सच्चेपणा हा मातीशी घट्ट नाते निर्माण करत असतो.
आज माझ्या मातीतल्या,माझ्या गावाच्या माणसाशी नाते अधिक घट्ट झाले. ध्यानीमनी नसताना, हा आलोवा निर्माण झाला तो व्यक्ती म्हणजे शंकरराव दुपारगुडे(मूळ गाव अणदूर ता.तुळजापूर).ते दैनिक 'प्रभात'साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी म्हणून चार वर्षापासून काम पाहतात. कोपरगाव मध्ये त्यांचे गेल्या दहा वर्षापासून वास्तव्य आहे.कोपरगाव तालुक्यात स्थानिक सी न्युज वाहिनी सुरू करण्यात सिंहाचा वाटा आहे.
आज दिवसभर कोपरगाव शहरात काही महनीय व्यक्तींच्या भेटीसाठी फिरत असताना अचानक शंकररावांचा फोन आला. त्यांना पाहताच या अनोळखी शहरात आपले तरी कोणी आहे याची जाणीव झाली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
शंकररावांनी दुपारच्या सुमाराला अस्सल कोपरगावी भोजनाचा बेत रचला आणि सुरू झाल्या गप्पा. गावमाती,शेती आणि माणसांवर भरभरून बोललो.
शंकररावांनी, तालुक्याच्या ठिकाणी राहून सुसज्ज दैनिक प्रभात आणि सी न्युज चँनलचे कार्यालय निर्माण केले आहे.
गावकडे असताना दुसऱ्याच्या शेतात पडेल ते काम करणाऱ्या शंकररावांनी अचंबित असे काम केले आहे. या शहरात कसलीही पार्श्वभूमी नसताना, कोणीही नातेवाईक वा जवळची माणसे नसताना त्यांनी आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
शेवटी कोपरगावचे ऐतिहासिक आणि महत्त्व सांगितले. तपस्वी शुक्राचार्य यांना 'संजीवनी'विद्या ज्या ठिकाणी प्राप्त झाली ते ठिकाण म्हणजे कोपरगाव. कच आणि देवयानी यांचे हे ठिकाण. कच यांनी संजीवनी विद्या प्राप्त ठिकाणी ही हेच शहर. हे ऐकून आणि स्थळे पाहून आवाक झालो.


शेवटी रघोबादादांना ज्या वाड्यात कैद करून ठेवण्यात आले होते तो वाडा ही याच शहरात आहे. पुरातत्व खात्याने डागडुजी जे काम हाती घेतल्याने वाड्यात प्रवेश बंदी आहे. 'ध'च 'मा' हा शब्द ही इथेच रूढ झाला. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी, कोपरगावच्या वाड्यात असताना आनंदीबाईने एका माणसाला पकडून माझ्यासमोर पकडून हजर करण्याचा आदेश सैनिकाला दिला होता,तेव्हा सैनिकांनी त्या माणसाला पकडून आणण्या ऐवजी मारुन टाकले. त्यामुळे 'ध'चा 'मा' झाला. असा शब्द इथून रूढ झाला,अशी माहिती शंकररावांनी दिली.
गावाकडच्या माणसांकडून केवळ भोजन मिळाले नाही तर इथल्या सांस्कृतिक,ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पाऊलखुणाचे दर्शन झाले. त्यामुळे आजचा दिन अधिक सार्थकी लागला.
© विकास पांढरे
स्थळ: कोपरगाव जि.अहमदनगर
१३ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...