बुधवार, २४ मे, २०१७

मी पाहिलेला साहेबराव...



२००२ ते २००३ वर्ष असावं,तेव्हा मी सोलापूर व देवगिरी तरुण भारत मध्ये स्फूट लिखाण करत असे. त्याकाळी माझा शालेय टप्पा पूर्ण झाला नसेल, त्यामुळे लिखाणात धार नव्हती. तसं आजूबाजूचे वातावरण पोषक नव्हतं. न कळत्या वयात काहीतरी लिहायची सवय लागली होती. या सवयीला प्रेरणा दिली ती साहेबराव घुगे या मित्रानी.

            अणदूर हे तसं काँग्रेस विचासरणीचं गाव.या गावाने दोन आमदार दिले आहेत . अशा वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधलिकी म्हणून काम करणाऱ्या धडपड्या युवकांशी माझा संपर्क आला. त्यामध्ये साहेबरावांचा अग्रक्रम लागतो. साहेबरावाचे वडील हाडाचे शिक्षक. घरात संघ वातावरण. त्यामुळे ते घडत गेले. त्याकाळी साहेबराव सा.'विवेक' साठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे काम पाहत होते. ते आजही तेच काम पाहतात. प्रचंड जनसंपर्क आणि माणसं पारखण्याची कला या माणसाकडे आहे. या गुणाचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव राहिला.

  मी अकरावीत शिकत असतानाच तरुण भारत साठी पूर्णवेळ वार्ताहर म्हणून काम पाहू लागलो.  या भागातील महत्त्वाचे विषय, बातम्या व लेख दैनिकासाठी पाठवत असे. त्याकाळी आमच्याकडे ईमेलचा जन्म ही झाला नव्हता. कोऱ्या - करकरीत पानावर समास ठेवून बातम्या फँक्स करून पाठवावं लागायचं. आता स्वहस्ते लिहिण्याची सवय मोडली आहे. मोबाईल मुळे लिहायला आणि बातम्या पाठवायला सोपे झाले आहे.

त्याकाळी मला कोणतेही मानधन मिळत नव्हते. त्यामुळं माझी तारांबळ व्हायची. सगळ्या बातम्या फॅक्स करून पाठवणं हे माझ्या ऐपतीत नव्हते. पोस्टाने पाठविलेल्या बातम्या उशिरा लागायच्या. एकदा साहेबरावनी माझी ही धडपड पाहिली. त्या धडपड्याला आकार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तब्बल तीन ते चार वर्षे आम्ही एकमेकांच्या सहवासात राहिलो. एकमेकांच्या विचारातून एकमेकांना घडवणारा असा हा माणूस मला भेटला. संकटात  दिलासा देणारा,समजून घेणारा, निस्वार्थी भावनेने आपुलकीचे दोन शब्द प्रेमाने बोलणारा साहेबराव मला खूप भावला.

 अणदूर व परिसरातील असह्याला मदत करणारा, बुडत्याला हात देणारा, वृद्धांना आधार देणारा, सतकर्म करून फक्त आशीर्वाद घेणारा साहेबराव ही मी पहिला. माणसांना श्रीमंतीत न तोलणारा, माणसातील माणूसकी जागा ठेवणारा,  माणुसकीच्या धाग्यात माणसांना गोवाणारा, हातात हात देणारा हीच साहेबरावची जीवन जगण्याची खुबी.

सा.विवेकसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल साहेबरावचा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, सरसंघचालक सुदर्शनजी आदीच्या हस्ते गौरव करण्यात आला. अणदूर व परिसरातील युवक व विद्यार्थ्यांमध्ये वैचारिकता वाढावी यासाठी केशव वाचनालयाची केलेली निर्मिती, त्यासाठी साहेबरावला करावा लागलेला संघर्ष हे मी जवळून अनुभवला आहे. आज ते पक्षीय संघटनात्मक बांधणीत अग्रेसर असतात.२०१२ साली पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अणदूर सारखा काँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांचा विरोधक माजी आमदारच्या घरातील असल्याने साहेबराव विजयी होईल अशी कुणाला खात्री नव्हती. प्रामाणिक व सच्चा कार्यकर्त्याला जनता भरभरून मत देते हे साहेबरावच्या विजयानंतर लक्षात आले.

 तुळजापूर पंचायत समितीमध्ये त्यांनी केलेले काम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. साहेबरावच्या सहवासामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन झाले. त्याचबरोबर पदवीधर आमदार श्रीकांत जोशी यांची 'तरुण भारत' साठी पान एकसाठी मुलाखत घेता आली.

अन् मी 'विवेक' शी जोडलो

     माझ्या वाचनात जी जी मराठी मासिके आणि साप्ताहिके वाचनात आलीे, त्यामध्ये सा.विवेकचे स्थान मोठे आहे. नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथीेल बालाघाट कॉलेजमध्ये शिकत असताना तिथे 'विवेक'चा 'तुमचा नातू हिंदू राहील का' विशेषांक वाचण्यात आला. त्या अंकामुळे 'विवेक' नियमित वाचू लागलो. या  विशेषांकाची धाराशिव जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त नोंदणी त्यांनी केली होती. प्रत्येक गावात, शाळा-महाविद्यालयात आणि वाचनालयात हा अंक पोहोचण्यात साहेबरावचा मोठा वाटा आहे. 'विवेक' वाढावा यासाठी साहेबरावनी घेतलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे.

साहेबरावबद्दल एक किस्सा  सांगितला जातो - मे २००५मध्ये साहेबरावांचे लग्न झाले. याच काळात 'विवेक'च्या वतीने पू.सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. साहेबराव हा ग्रंथ तामलवाडी ( ता.तुळजापूर) येथील एका कंपनीत द्यायचा होता. साहेबरावच्या अंगावरची हळदही निघाली नव्हती, येणाऱ्या
 परिणामांची पर्वा न करता तो अणदूरहून तामलवाडीला निघाला. तामलवाडीत आल्यानंतर त्यानी एक भाड्याने सायकल घेऊन कंपनीच्या दिशेने निघाला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य आग ओकत होता, शरीर  घामाघूम झालं होतं. कसल्याही परिस्थितीत हा ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्याचा हेतू होता.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एँड. मिलिंद पाटील हे आपल्या कारने सोलापूरकडे जात होते,   ऍड. मिलिंद पाटलांची नजर साहेबरावकडे गेली. त्यांनी लागलीच आपली गाडी थांबवली. ते साहेबरावांना म्हणाले, ''एवढ्या उन्हात सायकलीवरून कुठे निघालात?" साहेबरावनी सर्व  हकीकत सांगितली.
त्याच दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ बटू यांना ग्रंथ देण्यासाठी साहेबराव धाराशिवला पोहोचला.

"अरे,साहेबराव! तुझं लग्न होऊन आठ दिवसही झाले नाहीत, अंगावरची हळदही निघाली नसताना तू उन्हातान्हात कुठे निघालास? गुरुजींचा ग्रंथ नंतरही पाठवला असता'' साहेबराव,तू घेत असलेल्या मेहनतीबद्दल मला अभिमान वाटत असल्याचे उद्गगार संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ बटू यांनी काढले.

साहेबरावचा हा किस्सा अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळतो. काळाच्या ओघात आज अनेक वैचारिक मासिके आणि साप्ताहिके बंद पडत आहेत. पण आज सत्तरीतही सा.विवेक तग धरून आहे. दिवसेंदिवस 'विवेक' कलाकलाने वाढतोय तो अशा निःस्पृहपणे काम करणाऱ्या व्यक्तीमुळे. विवेक वाढण्यासाठी असे अनेक निःस्पृह हात मदत करत आहेत. अशा व्यक्तींच्या सहवासात मला राहता आल्याने मी आज 'विवेक' चा उपसंपादक होऊ शकलो.

कुठेही मोठेपणा न  मिरवणारा हा साधा माणूस मला सदैव मोठ्या भावासारखा पाठीराखा राहिला.  मी देवाला प्रार्थना करतो की, साहेबराव सारखा माणूस सदैव माझ्या डोळ्यासमोर असू दे. हे देवा माझ्या या भावाला उदंड आयुष्य लाभो दे.

©विकास पांढरे, ( उपसंपादक, सा.विवेक)

२ टिप्पण्या:

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...