गावगाड्यात स्थान नाही, गावकुसाबाहेरही जागा नाही, गावाशिवाय अस्तित्व नाही, गावाच्या शुष्क माळावर झोपडी टाकून राहणारा पारधी समाज आजही प्रवाहापासून दूर आहे. इंग्रजांनी माथी मारलेला गुन्हेगारचा शिक्का आजही ठळक आहे. या समाजाच्या झोपडीत अजूनही लाईट पोहोचली नाही, ना नळाला पाणी, ना गॅस, ना शेंगडी.. मातीवरच्या चुलीवर आयुष्याचा संसार मांडलेल्या आणि चोरीचा शिक्का मारलेल्या या समाजाला ना हक्कानं काय करता येतं, पण हा बदल घडवून दाखवलाय याच समाजातील ज्ञानेश्वर भोसले या तरूणाने.
जेव्हा सगळचं संपून गेलयं, असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी करून दाखवण्याचे. हे ज्ञानेश्वर भोसले यांच्या कथेतून समोर येते. विठूरायाच्या पंढरपूर नगरीमधील ताडगावच्या जंगलात त्यांचा जन्म झाला. आई- वडील जंगलातील शिकार करून पोटाची खळगी भरायचे. दारिद्रय ही या समाजाची परवड. हातावर मागून घ्या, हातावरचा खा आणि त्यासाठी अनेकविध ताणतणाव सहन करा. आयुष्यभर भूकेचे जाळे विणत असताना, जीवनाला स्थैर्य नाही, स्थैर्य नसल्याने उत्पन्नाची साधनं नाहीत, त्यामुळे वेळप्रसंगी चोरी करणे, चलाखी करून अन्न मिळविणे हे त्यांच्या जीवनात अपरिहार्य होऊन बसले होते. समाजाचे अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करा, हे त्यांच्या वाट्याल्या समाज व्यवस्थेने दिलेली भयानक वागणूक. या चौकटीनेच ज्ञानेश्वरच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. त्यात त्यांना सात वर्षांची जेल झाली. वडिलांच्या तुरूगांत जाण्यानं त्यांच्या आईनं आपले बस्तान गुंडाळले अन दामाजी पंथाची मंगळवेढा नगरी गाठली.
अज्ञानाच्या अंधारात असणार्या भोसले कुटुंबात ज्ञानेश्वरची शाळा सुरू झाली. आई-वडिलांनी लावलेले शिक्षणाचे वेड, दारिद्रय आणि त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत ज्ञानेश्वरने दहावीपर्यंतचे कसे बसे शिक्षण पूर्ण केले. अश्वत्थाम्यासारखी दु:खाची भळभळती जखम आणि अंत:करणामध्ये अनुभवांची आग घेऊन शिकणे आणि जगणे चालू होते. अशातच बुध्दीची भूक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी त्याचा संघर्ष चालूच होता. अशातच पोलिसांकडून या समाजावर होणार्या अत्याचाराला सीमा नव्हती. पोलिसांनी ज्ञानेश्वरला एका गुन्ह्यात अडकवले. केसमध्ये अडकल्याने विद्येचा लळा तुटू लागला. पुढे त्याच्यावर डबल मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला या गुन्ह्यात तेरा महिने चौदा दिवसांची शिक्षा झाली.
अशा विचित्र कोंडीत ज्ञानेश्वर अडकला गेला. जो गुन्हा त्यांने केलाच नव्हता, त्याची शिक्षा ज्ञानेश्वरला भोगावी लागली. वकिलाची फी जमा करण्यासाठी बहिण दारोदारी फिरली. अपर्णा रामतीर्थकर, दादा इदाते, अरूण करमरकर, गिरीश प्रभुणे आदींनी मोलाची साथ दिल्यामुळे ज्ञानेश्वरची सुटका झाली.
आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का का आणि कुणी मारला व पशुतुल्य जीवन आमच्यावर का लादले? या प्रश्नापासून असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठवीत ज्ञानेश्वराला अस्वस्थ करून सोडले. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, खोट्यानाट्या केसेस टाकून नाडल्या गेलेल्या जातीबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी 1997 मध्ये भारतमाता आदिवासी पारधी समाज आणि भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या समाजाला मानाचे स्थान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वर धडपड करू लागला. सन 2008 मध्ये सोलापूरमध्ये दोनशे चौर्याऐंशी गावांत पारधी समाजाचे शिबिर लावून चाळीस हजार लोकांना मतदार ओळखपत्रे, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखले अशी विविध कागदपत्रे मिळवून देण्यास ज्ञानेश्वरने मोलाचा वाटा उचलला. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर विधायक सहकार्य केले.
माणसाला शिक्षण मिळाले की, माणूस बदलून जातो. त्याच्यात परिवर्तन होते. या भावनेने प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे, असे ज्ञानेश्वरला वाटले. जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांच्या सहकार्याने मोहोळमध्ये दहा गुंठ्यावर पारधी मुलांची शाळा सुरू केली. शहरातल्या कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल असे दर्जेदार शिक्षण इथे मुलांना दिले जात आहे. शिक्षणाचा कोणताही गंध नसलेल्या, जन्मतारीख नाही, गाव माहीत नाही, आई-वडील काय करतात याचा पत्ता नसलेल्या या समाजातील मुले-मुली शिक्षण घेऊन त्यांच्यात उमेद निर्माण करण्याचे कार्य त्यांच्याकडून होत आहे. अनेक मुले चांगले शिक्षण घेऊन उच्चपदावर पोहोचत आहेत. गावकुसाबाहेरच्या ते आदर्शवत काम करतायेत. शिवाय शिक्षण, आरोग्य, बचतगटाच्या माध्यमातून या समाजाला नवी आशा, नवी दिशा प्राप्त करून देण्याचे कार्य ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.
दारिद्रय, दु:ख, लाचारी, अन्याय, अत्याचार या अनुभवाने होरपळून गेलेल्या या समाजाला स्थिरता देण्यासाठी शिक्षण देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पारधी या भटक्या विमुक्त जमातीमध्ये शिक्षणाची कोणतीही परंपरा नाही. शाळेत जाण्यासाठी कुटुंब एका ठिकाणी स्थिर असावे लागते आणि पारधी समाजाला स्वत:चे गाव नाही. रोज या गावाहून त्या-त्या गावाला भटकणारा हा समाज आहे. कुठल्या तरी गावी पालं टाकायची आणि पोलिस पाटलाकडे नोंदी करून तीन दिवस राहायचे असा शिरस्ता असलेल्या या समाजातील मुलांना ज्ञानेश्वर शिक्षण देत आहे. गरज आहे शासनाच्या अनुदानाची. यास अनुदान मिळाल्यास अभियानाला आणखीन फलित मिळेल.
पारधी समाजातील अज्ञानाच्या अंध:कारात आणि गुन्हेगारीच्या कोंडीत सापडलेल्या जमातीमध्ये जन्मलेल्या ज्ञानेश्वर भोसले यांनी आपले जीवन तसेच न ठेवता बदलून घेतले आहे. त्यांनी या समाजातील अन्याय, अत्याचाराविरूध्द, दैन्य दास्याविरूध्द संघर्ष केला आहे. समाजात त्यासाठी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पारधी समाजाच्या मुक्ततेच्या अशा चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ज्ञानेश्वर भोसले यांना पाहणे आवश्यक आहे. कारण या समाजातील तरूण तरूणींना आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानेश्वर प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. त्यामधून हजारोंना रोजगार मिळाला आहे. याशिवाय इंदिरा आवास योजनेतून आदिवासींसाठी असलेल्या प्रकल्पांतर्गत अनेकांना घरे मिळवून देण्यात त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या विधायक कामामुळे या समाजाला जगण्याचे बळ मिळाले आहे. एकमेकांचे सुख-दु:ख जाणून घेतात आणि त्यावर मात करतात. जसजसे या समाजात जागृती वाढत आहे, तेव्हापासून हा समाज प्रवाहात येण्याची संख्या वाढू लागली आहे. या समाजाला आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी सरकार दरबारी बावीसशे हेक्टर जमीन मिळावी यासाठी ज्ञानेश्वर प्रयत्न करत आहे.
सोलापूर जिल्ह्यात पारधी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानेश्वर यांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. हेच त्यांच्या अभियानाचे फलित होय. राज्य सरकारने ज्ञानेश्वर भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेला अनुदान देऊन आत्मसन्मान करणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्ह्यात पारधी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानेश्वर यांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. हेच त्यांच्या अभियानाचे फलित होय. राज्य सरकारने ज्ञानेश्वर भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेला अनुदान देऊन आत्मसन्मान करणे गरजेचे आहे.
(दैनिक पुढारी, सोलापूर १३ एप्रिल २०१७)
लेखक- विकास पांढरे,९९७०४५२७६७।
लेखक- विकास पांढरे,९९७०४५२७६७।
सामाजिक कार्यकर्ता- ज्ञानेश्वर भोसले - ९९२३९६९१९८

You're doing great job sir we are always ready to work with you just call us if there is need
उत्तर द्याहटवा