मराठीत स्त्रीवादी साहित्याने फार मोठी मोलाची भर घातली आहे यात शंका नाही. २०१० नंतर स्त्री जीवनाची घुसमट प्रकर्षाने मांडणारी नवोदित लेखिका म्हणून अर्चना डावखर- शिंदे यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या 'सुरवंट' या कादंबरीने असंख्य वाचकांचे मन जिंकले आहे. जे पुस्तक वाचताना तहान, भूक विसराला लावते, अशीच कलाकृती ही अभिजात असते. आजच्या फेसबुक आणि व्हाँटसअपच्या दुनियेत 'सुरवंट' ही वाचकाला पहिल्या पानापासून ते शेवटपर्यंत खेळवून ठेवते. २६४ पानाची कादंबरी वाचताना मला पंधरा दिवस लागले, यातच या कादंबरीची गुणवत्ता लक्षात आले.
कादंबरीच्या सचित्रावरुन 'सुरवंट' ही कशावर आधारित आहे हे लक्षात येते. रूढ अर्थाने सुरवंट हा फुलपाखराचा अळी अवस्थेतील किड्याचा प्रकार होय. त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान असते. किड्यामुंगासारखेच स्त्रीचे जीवन आहे, असं अर्चना डावखर-शिंदे यांनी आपल्या 'सुरवंट' या कादंबरीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी 'मी' या आत्मनिवेदन प्रकारची सर्व वैशिष्ट्ये दर्शवणारी आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील छोटेसे विळद गावाच्या चंदाच्या जीवनाची शोकांतिका म्हणजे सुरवंट होय.
विळद हे गाव शहरापासून जवळ आहे. मुख्य म्हणजे आर्मीचे प्रशिक्षण केंद्र जवळच असल्यामुळे तोफांचा आवाज, बंदुकीचा सराव हा नेहमीच ऐकू येतो. या छोट्याशा परिघात घडणारी ही कहाणी. या कहाणीची नायिका आहे ती चंदा. तिचा बाप देशमुखांच्या घरातच चंदाचं लग्न लावून द्यायचं ठरवतो। त्यासाठी वर मुलगा चाळीशी पर्यंत जावूनही चंदाचं विवाह लावतो. आपल्या खोट्या इंभ्रतीपुढे निरागस चंदाकडे न पाहणारा बाप समोर येतो. तर दुसरीकडे चंदाचा नवरा श्रीनिवासराव वयाने खूप मोठा, वेडसर आहे पण रात्रीच्या वेळी बायको म्हणून चंदाच्या कोवळ्या देहाची चिरफाड करणारा आहे. तिसरीकडे तिचा सासरा हा वारकरी आहे. दिंडीत हजारोंच्या पंगती करणारा आहे पण घरातील उपाशी सूनेकडे दुर्लक्ष करणारा सासरा नजरेस पडतो, असे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.
मानव हा चंदाचा दुसरा पती. जातीपातीच्या भिंती तोडून नव्या समाजरचेनेचे भाग बनतात. मानव हा चंदाचा योगटिचर. पुढे ते दोघेही एम.ए.च्या पहिल्या वर्षाला अँडमिशन घेतात. इथेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मानवला माहीत आहे तिचे लग्न झाले आहे. तिला एक मुलगी आहे. चंदा मोठ्या घरची आहे. चंदाचं वागणं, बोलणं, शांत स्वभाव, तिचे राहणीमान हे मानवला मनापासून आवडत. पुढे हे दोघे एकमेकांशी बिलगतात. मानव हा ध्येयवेडा आहे. लहानपणी सोसलेले गरिबीचे चटके मानवला स्वस्थ बसू देत नाहीत. चंदाला मानवचा आधार हवाहवासा वाटतो. तर दुसरीकडे तिला स्व- जाणीव होऊ लागते. अशा द्विधा मनस्थितीत ती अडकते. तिच्या मनाची स्थिती अगदी झाडात गुंतलेल्या पतंगाच्या दोराला जणू पंख गुंतून जीवन मरणाशी झुंज देणाऱ्या चिमणीसारखी होते. चंदाची होणारी घुसमट हे कथेचे दुसरे सूत्र.
लेखिका अर्चना डावखर-शिंदे आपल्या कादंबरीतून महिलांची होणारी हेळसांड, विविध गुंतागुंती, ताण- तणाव चित्रित करतात. चंदाच्या जगण्यातील हरवलेली नैसर्गिकता आणि त्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक पातळीवरचा खोटेपणा चंदाला कसा तिला छळू लागतो हे प्रकर्षाने मांडले आहे.
सगळी नाती मेली असली तरी तिच्यात एका बायकोचं नातं तग धरून होतं.अगदी सुकलेल्या सरोवरातलं शेवटच्या क्षणालाही त्या खडकाला धरून बसलेलं शेवाळ जसं", आयुष्याच्या शेवटी जर्जर झालेल्या क्षणी
त्या सोसाव्या लागलेल्या वेदनांच्या जखमांचा हिशोब कोठेच ....कसा दिसत नव्हता. तसं पाहिलंतर तिच्या ललाटावरच्या रेषाही प्रत्येक गतक्षणांचा सारीपाट मांडत होत्या.पण मनातली सय दिसत नव्हती,फक्त मनाला सारखी बोचत होती. या आत्मसंवादातून वाचकांना तिच्या जगण्याविषयी धारणा लक्षात येते. लेखिकेने चंदाच्या मनातील उलाढालींचे वर्णन करत असताना संवाद, आत्मसंवाद, चिंतन यांचा योग्य वापर केला आहे. कधी कधी प्रसंगातून तिची मानसिकता वाचकांसमोर ठेवतात. कादंबरीतील प्रत्येक प्रसंग, घटना, संवाद ही चंदाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू वाचकांसमोर कुशलपणे वापरलेल्या आहेत.
बाळ जन्मल्यावर मेलं काय अन आज मेलं काय ,एकच आहे ! पण तिला आई होण्याची संधी तर मिळेल... घरची माणसं चांगली नाहीत,निदान तिला वांझुटी तरी कुणी बोलणार नाही. " या बोलण्यातून लेखिका चंदाच्या बकाल आयुष्याचे सूचन करतात. तिच्या वाट्याला आलेले सडके जीवन चित्रित करतात. त्यांमुळे ही कादंबरी मानसशास्त्रीय अभ्यास समोर ठेवून आकलन करणे आवश्यक आहे.
लेखिका अर्चना डावखर यांनी शेती जीवनाचा खुबीने वापर केला आहे. बळीराजाला अस्मानी आणि सुलतानी संकटाने गुडघे ठेकाला लावले आहे. यांचे दर्शन कादंबरीत घडते.
मागल्या साली पावसाअभावी पिकं निघाली नाही अन औंदा सुध्दा सारं मोलामाघाचं बी भरण मातीत गुदमरलें होतं.सारंगाचा दोन एक्कर कांदा तालुक्याच्या मार्केटला गेला. भाव पण चांगला मिळाला . लोक म्हणत, अरं सारंगा कादं मार्केटला नेया घाई काव्हून करतोया? अरं, अजून वाट बघ. शंभराच्यावर भाव जाईल बघू."
पर सारंगाला वाटे, भावापाई सारा माल तसाच ठेवू अन मध्येच भाव कमी झालास तर पदरात जे पडायचं ते राहून जाईल. यावरून 'सुरवंट' ही कादंबरी केवळ स्त्री दु:ख सांगत नाहीतर असंख्य मानवी मनाचा वेध घेत शेती प्रश्नावर भाष्य करते.
ही संपूर्ण कादंबरी चंदा आणि मानव या पात्राभोवती फिरत असली तरी श्रीनिवास, सारंग, शांताकाकू, सावित्रीबाई, चंदाची आई, वडील, सासरा ही पात्रे कादंबरीला उभारी देणारी आहेत. ही कादंबरी मनोरंजन करायला लावत नाही तर वाचकांना गंभीर आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी कादंबरी आहे.
परीक्षण :- विकास पांढरे - ९९७०४५२७६७
सुरवंट
अर्चना डावखर - शिंदे
यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे ३०
मे २०१६
मूल्य - रु.२६०/-
-----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा