सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

'ट्री मॅन ऑफ इंडिया'

ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असे राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात विष्णू लांबा या धरतीपुत्राने कोणत्याही सरकारी पाठिंब्याशिवाय ५ लाख झाडे भेट म्हणून दिली आहेत. त्याने आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे ५० लाख झाडे लावली आहेत, १३लाख झाडे तोडण्यापासून वाचवली आणि ११ लाख झाडे पूर्णपणे विनामूल्य वाटली आहेत. हे अतुलनीय कार्य लक्षात घेऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या तरूणास ‘ट्री मॅन ऑफ इंडिया’ हे नवे दिले.
विष्णू लांबा याचा जन्म ३ जून १९८७ रोजी टोंक जिल्ह्यातील लांबा गावात झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून विष्णूने गुरेढोरे चारत असताना शेतात विविध प्रकारची झाडे लावायला सुरुवात केली. विष्णूला झाड लावयाचे इतके वेड जडले की कोणाच्याही घरातून झाडे चोरुन मोकळ्या जागेत लावत असे. त्याच्या सवयीने ग्रामस्थ आणि कुटुंब त्रस्त झाले. विष्णूची सवय बदलावी यासाठी त्याच्या परगावी (आत्याकडे ) पाठवले. पण निसर्गावर त्याचे प्रेम वाढतच गेले. यानंतर विष्णू नातलगासमवेत जयपूरला गेला तेव्हा तिथे त्याने जवाहर विभागाचे तत्कालीन जयपूर जिल्हाधिकारी श्रीमंत पांडे यांच्या निवासस्थानी असलेल्या नर्सरीमधील रोपटे चोरले.
वृक्षारोपण करताना
विष्णूची ही चोरी पकडली गेली. जिल्हाधिकारी समज देताना म्हणाले, " विष्णू, चोरी करणे वाईट आहे. मात्र झाडे लावणे चांगले आहे" असे म्हणून विष्णुला काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी विष्णूंनी सात वर्षे घर सोडले. समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जेथे जाईल तेथून रोपटे चोरायची नंतर त्यांची कुठेतरी लागवड करायची. त्यामुळे गावकरी या तरुणाला 'पौधा चौर' म्हणून चिडवू लागले. लोक चेष्टा करू लागले. झाडे चोरून कुठे वृक्षसंवर्धन होते का? असं बोलणे विष्णूच्या कानी पडायचे. झाडावर त्याचे निरपेक्ष प्रेम होते.वसुंधरचे, पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागला. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल त्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन पर्यावरण संवर्धन केले.
विष्णूच्या भावाचे जेव्हा लग्न ठरले तेव्हा हुंड्याचा विषय गावात गाजला. मुलीकडील माणसं हुंडा द्यायला तयार होती;पण विष्णूचा सुधारणावादी विचार घरात ग्राह्य मानला जात. वडील बैठकीत म्हणाले, " विष्णू माझा मुलगा आहे, हुंड्याचं त्यालाच विचारा?"
विष्णू म्हणाला "आम्हाला हुंडा नको आहे. तुम्हाला जे काही द्यायचं आहे. त्याबदल्यात झाडे द्या, हाच हुंडा समजून आम्ही आनंदाने तुमच्या मुलीचा स्विकार करू"

राजस्थान सारख्या रूढी परंपरा प्रमाण मानणाऱ्या राज्यात असा नवा विचार ऐकून उपस्थित मंडळी अंचबित झाले. मुलींच्या मंडळींना होकार दिला. लग्न समारंभानिमित्ताने वधू-वराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.हळूहळू लोकांना विष्णूच्या निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व लक्षात आले.
विष्णूची टीम
पर्यावरण संरक्षणासाठी 'श्री कल्पतरू संस्थान' ची स्थापना केली आहे. गेल्या २० वर्षांपासून ही संस्था वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित काम करत आहे. या संस्थेने देशातील शंभर गावे पर्यावरणदृष्ट्या आदर्श गावे (कल्प ग्राम) म्हणून देण्याचे वचन दिले असून त्यामध्ये तीन गावे विशेष नाविन्यपूर्ण माध्यमातून आदर्श ग्राम बनण्याच्या दिशेने आहेत. विशेष म्हणजे पाली जिल्ह्यातील जैतारणमध्ये हत्तींवर झाडांची मिरवणूक काढली आहे. तसेच,राजस्थानमध्ये पाचशेहून अधिक वृक्ष प्रेमींची परिषद आयोजित केली गेली होती, ज्यात केळीच्या पानांवर पारंपारिक भोजन दिले गेले.
राजस्थानातील उंट संवर्धनासाठी ही संस्था कार्य करीत आहे. राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार रोखण्यासाठी या संस्थेने महत्त्वाचे पाऊल उचलले. सिंदूरसारख्या दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले असून दोनशेपेक्षा जास्त दुर्मिळ प्रजाती त्यांच्या मूळ अधिवासात पोचवण्याचे काम केले आहे.विष्णूच्या या चळवळीत देशातील २२ राज्यांतील तरुण सहभागी झाले आहेत. तसेच जगभरातील पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे इतर देशांचे तरुण त्याच्याशी संपर्कात आहेत.
'पानसिंग तोमर' या चित्रपटापासून प्रेरित होऊन विष्णू लांबाने चंबळपासून ते राजस्थानमधील चित्रकूटपर्यंत सुमारे दोन वर्षे तळ ठोकला होता आणि माजी दस्यूंना त्यांच्या मोहिमेशी जोडले. जयपूर येथे माजी दस्यूंना एकत्रित आणून। त्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली.
माजी दस्यूंना कार्यात सहभागी करून घेताना
गेल्या पंधरा वर्षांपासून विष्णूंनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडी 'पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे' अभियान राबवून असंख्य पाण्याचे भांडी बसवले आहेत. तसेच गेल्या नऊ वर्षांपासून विष्णू आणि त्यांचे स्वयंसेवक मकर संक्रांती निमित्ताने होत असलेल्या पतंग कार्यक्रमात चिनी मांझ्याने जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी नि: शुल्क वैद्यकीय शिबिर आयोजित करत असतात.
विष्णूचे कार्य एवढ्यापुरते सीमित नाही. आजपर्यंत त्याने २२ राज्याचा प्रवास करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची कुटुंबे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ५६हून अधिक क्रांतिकारकांच्या कुटूंबाचा शोध घेतला आहे. हुतात्माच्या समाधीस्थळ ठिकाणी जाऊन वृक्षारोपण केले आहे.

२०१२ साली काही निवडक वारसदारांना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. या हुता्म्यांना शोधून काढणारा मुलगा कोण, असे कुतुहलाने त्यांनी विचारले. महाराष्ट्रातील शहिद विष्णू पिंगळे यांचे वारसदार राजेंद्र पिंगळे यांनी प्रणव मुखर्जी यांना विष्णू लांबा यांची ओळख करुन दिली. या तरुणाला 'पौधा चोर' असे म्हटले जाते, असे पिंगळे यांनी सांगताच प्रणव मुखर्जी यांनी राग व्यक्त करत हा मुलगा पौधा चोर नाही 'ट्री मॅन ऑफ इंडिया'आहे असे उद्गार काढले. लांबा यांच्या पाठीवर हात फिरवत पर्यावरणाच्या कामाला वाहून दे. हे काम सोडू नकोस, असा आशीर्वाद त्यांनी दिला.
बदलते हवामान,जैवविविधता आणि सौर ऊर्जेसंदर्भात त्याचे विचार मौलिक आहेत. तो म्हणतो, "आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी वातावरण तयार करण्यात आपला देश यशस्वी होत आहे. सौर ऊर्जेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा आहे. हवामान संकट हे वैज्ञानिक आणि पारंपरिक ज्ञान संकलातून सोडवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशातील जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे"
अभिनेता इरफान खानला वृक्ष भेट देताना
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,अजय देवगण, सुभाष घई, अनुराग कश्यप,अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी विष्णूच्या कार्याचा गौरव केला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखावा, वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि वसुंधरेचे रक्षण व्हावे यासाठी राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात अतुलनीय कार्य करणाऱ्या विष्णू लांबाची ही कहाणी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

कोल्हापूरची रणरागिणी


कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंचलकरंजी इथल्या दिव्या मगदूम हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. नवऱ्याने सोडून दिलेली म्हणून तिची अवहेलना व्हायची.आज ती परित्यक्ता, कुमारी माता आणि घटस्फोटित महिलांसाठी मायेची सावली बनली आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या सुलतानी धोरणा विरोधात पंचगंगेत आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांच्या समस्यांना वाचा फोडणारी रणरागिणी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. रणरागिणी क्रांती सेना व छत्रपती शासन महिला आघाडीच्या माध्यमातून ती खंबीरपणे नेतृत्व करतीये.
दिव्या ऊर्फ शंकुतला ही वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावाची. गोरा रंग, चेहऱ्यावर तेज, करारी बाणा या गुणवैशिष्ट्यांमुळे ती सर्वांना आपली वाटते. पण तिच्या वाट्याला जे दु:ख आले; ते ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात. ती शोषित असली तरी अन्याय सहन न करणारी आहे. ती एकटी असली तरी ती असंख्य एकल महिलेची साऊली आहे.भय,भीती,भोग,बाईपण हे सर्व तिने सोसले आणि भोगले आहे. या भयाला न डगमगता ती स्वतः च्या पायावर उभी आहे.
दिव्या आपली दिव्यकहाणी सांगताना म्हणाली, "घरची गरीबी. शाळा नीट शिकता आलं नाही. न्हानं आलं तवा बापानं लगीन लावून दिलं. तवा मी १४ वर्षाची असेन. २००२ साल असावं. माहेरात जे सुख मिळालं नाही ते नवऱ्याच्या घरात मिळेल या आशेवर सासर जवळ केलं. पाणावलेल्या डोळ्यांनी माहेर सोडलं; त्याच डोळ्यांच्या धारांनी पुन्हा माहेरी परतावं लागलं. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाच काय? माझं नशीबचं फुटकं. नवी नवरी म्हणून सासरी आली तवा ना नवऱ्याकडून, ना सासू सासऱ्याकडून चांगली वागणूक मिळाली. सर्व सोसत, दु:खाला हसतमुखाने कवटाळत राहिले. तीन-चार महिन्याचे गरोदर होते, तेव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आयुष्यात काहीही भोगायचं शिल्लक ठेवलं नाही ते भोग माझ्या वाट्याला आलं होतं.
आता जायचं कुठं? आईबापाचं अस्सं.. शेवटी मी घरी आले एकदाची. लहान मुलासारखे रडत बसायची. जवळ पैसे नव्हते.कधी कधी जीव देऊन मरुन जावं असं वाटायचं. पोटात गोळा वाढत होता. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. जीवन एकलकोडं होऊन गेलं होतं. मी अगदी ठरवून टाकले होते. जे काय संकट आहे ते आनंदाने स्विकारायचं.
आयुष्याच्या एका टप्प्यावर चांगली माणसं भेटत गेली. त्यांना मला भेटू दिलं. आता जगायचं तर आपल्या बाळासाठी! तेवढाच विरंगुळा. जीव जगण्यासाठी धडपडत होता, ओढ घेत होता.त्यावेळी 'सोडलेली बाई' म्हणून आयाबायाकडून मला हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांच्या नजरा वाईट असायच्या..न डगमगता, सहन करत पुढे जात राहिले. 'अमन नागरी विकास' संस्थेच्या माध्यमातून बचत गटाचे काम करू लागले. सूर गवसला. पैशाची बचत होत गेली. विस्कटलेली घडी सावरू लागली.
तेराशे बचतगटांची स्थापना
महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण होते, हे दिव्याने अल्पावधीतच हेरले.


दिव्या म्हणाली, "बचत गटामुळं असंख्य महिला भेटल्या. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला दिसल्या. या वाटेत अनेकजणी ओळखीच्या झाल्या. त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले. तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेराशे बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच ते सहा लाख महिला बचतगटाशी जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांचा संपूर्ण व्यवहार पारदर्शी असतो"
'जिव्हाळा'ने दिला जगण्याचा आधार
कोल्हापूर जिल्ह्यातील पीडित, शोषित, निराधार, घटस्फोटित महिलांना जगण्याचा आधार मिळावा म्हणून दिव्या मगदूम हिने २०१८साली खोतवाडी येथे जिव्हाळा आश्रमाची स्थापना केली. या माध्यमातून सुमारे तीस महिलांचे पालन केले.



वयोवृद्ध महिला,अपंग महिलांच्या आरोग्याचा प्रश्न स्वतःच्या खर्चातून सोडवण्याचे कार्य तिने केले. शिवाय आश्रमातील महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी लघुउद्योग सुरु केला. बचतगटाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था केली."आश्रम चालवणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी पुरेसा पैसा आणि शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. मला कोणाचेही मदत मिळाली नाही. आश्रम चालवण्या इतपत माझी आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे मला आश्रम बंद करावा लागला. पण आश्रमातील सर्व महिलांना योग्य ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले आहे. या महिलांशी माझं जिव्हाळाशी नातं निर्माण झालं होतं पण परिस्थिती अभावी त्याचं पालन करू शकले नाही" अशी खंत दिव्या हिनी व्यक्त केली.
२२विवाहितेचा सुखाचा संसार उभा
दिव्या हिचं काम केवळ बचतगटापुरते मर्यादित नाही ती महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा पुकारते, संघर्ष करते, न्याय मिळवून देते.
दिव्या म्हणते, "पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढले,जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना केली. या माध्यमातून २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला. माझ्याकडं असंख्य महिला येत असतात, आपली गऱ्हाणी सांगतात. अशिक्षित, अल्पशिक्षित, गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या वाट्याला अनेक दु:खे येतात. त्यांना ना समाजाचे सहकार्य मिळते ना शासनाची मदत. या महिलांची घुसमट ओळखून मी रस्त्यावर उतरते"
दिव्याचे काम आज १३ जिल्ह्यात पसरले आहे. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी लढणारी रणरागिणी बनली आहे.
मायक्रो फायनान्स विरोधात लढा
२०१९ साली कोल्हापूर जिल्ह्याला महापूरचा मोठा फटका बसला. या संकटामुळं सर्वसामान्याचे जगणे मुश्कील झाले असताना मायक्रो फायनान्स या कंपनीने जिल्ह्यातील बचत गटातील महिलांकडून सक्तीचे कर्जाची वसुली केली. कंपनीच्या सुलतानी कारभारात विरोधात दिव्याने लढा उभारला आणि तो राज्यभर गाजला.
याबाबत सांगताना ती म्हणाली, " माझा हा लढा केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हता तर संपूर्ण राज्यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचतगटांना नियमबाह्य कर्ज देऊन सक्तीची वसुली सुरू केली होती. गोरगरीब महिला माझ्याकडे येतं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू वाहत होते. एकीकडे निसर्गाने दगा दिला होता तर दुसरीकडे फायनान्स कंपनी सूड उगवत होती. त्यामुळं मी याविरोधात आंदोलन केले. माझ्या महिला कार्यकर्तीनी पंचगंगेत उडी मारली. कार्यकर्त्यांच्या सजगतेने त्या वाचल्या. पालकमंत्री ते मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करून कंपनीची चौकशी सुरू आहे. यातून बचतगटातील महिलांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे"
छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना
दिव्या हिच्या कामाचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसा तिचा लोकसंग्रह वाढू लागला. दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी तिला पक्षात स्थान देऊन मतांसाठी वापर करून घेतला. खुर्चीचा हव्यास, घाणेरड्या राजकारणाला कंटाळून तिने २०२० साली छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १६८ शाखांत आघाडीचे काम सुरू आहे. जवळपास अडीच लाख महिला दिव्याच्या कामाशी जोडल्या गेल्या आहेत.
छत्रपती शासन महिला बँकेची स्थापना
ग्रामीण महिला, शोषित, पीडित, घटस्फोटित, एकल महिलांना अधिकाधिक बचतीची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कळावे आणि त्यातून स्वावलंबी बनव्यात यासाठी दिव्या मगदूम हिने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१३ एप्रिल२०२१) बचत गटातील महिलांना एकत्रित करून छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आहे.
दिव्या सांगते, " बचत गट व छत्रपती शासन महिला विकास आघाडीच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध करुन देणं एवढेच माझं उद्दीष्ट नसून, त्यांना स्वावलंबनाकडं, आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा माझा उद्देश आहे"
कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीब कुटुंबाचे व वंचित समाजबांधवांचे हाल होऊ नयेत, म्हणून छत्रपती शासन महिला आघाडीने योग्य ती खबरदारी घेतली आहे.टाळेबंदीत सेवा बजावत असलेल्या पोलीस बांधव व अन्य घटकांना भोजन पुरवण्यात येत आहे, असे दिव्या हिने सांगितले.
कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या रणरागिणीला सदिच्छा
© विकास पांढरे, ९९७०४५२७६७

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

भटके विमुक्त: सद्यस्थिती आणि उपाय

.


३१ ऑगस्ट रोजी, भटके विमुक्त दिवस साजरा झाला. त्यानिमित्त एक आठवण जागी झाली. टाळेबंदीची दुसऱ्या लाट येण्यापूर्वी भटके विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी आम्ही काही समविचारी मंडळी एकत्रित आलो होतो. यानिमित्त भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्याचा विचार सुरू होता. पण टाळेबंदीमुळे ती घेता आली नाही. ' भटके विमुक्त: सद्यस्थिती आणि उपाय' या विषयावर मी पेपर लिहिला होता. तो इथे शेयर करत आहे.

 

आज भारताला स्वातंत्र मिळून तब्बल ७५  वर्षे झाले तरी, भटक्या विमुक्त जमाती विकासाच्या प्रक्रियेपासून शेकडो मैल दूरच राहिल्या आहेत. महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या ४९ जाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. यांना ना हक्काची जमीन आहे ना घर, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या लोकांच्या जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. भटक्या विमुक्तांच्या काही जमातींवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. याच धरत्रीचे पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. राजकीय उपेक्षा, पोलिसांचा जाच, याबरोबरच जात पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या या समाजाच्या दैन्यावस्था अजूनही संपल्या नाहीत. या समाजातील स्त्रियांचे दु:ख ही भेदक आहेत.

विमुक्त जातीं (व्हिजे)

महाराष्ट्रात विमुक्त जातींची (व्हिजे) संख्या १४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे. बेरड, बेस्तर, भामटा, कैकडी, कंजारभाट, कटाबू, बंजारा, राज पारधी, राजपूत भामटा, रामोशी, वडार, वाघरी, छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह) जातीचा समावेश होतो.

भटक्या जमातीं (ब)

भटक्या जमातींची (ब) (एनटी-बी) संख्या ३८ असून या प्रवर्गास २.५% आरक्षण आहे. यात गोसावी, बेलदार, बेलदार ,भुते, भराडी, चित्रकथी, गारुडी, लोहार, गोल्ला, गोंधळीगोपाळ, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मैराळ, मसनजोगी, नंदीवाले, पांगूळ, रावळ, सिक्कलगर, वैदू,  वासुदेव ,भोई, बहुरुपी, ठेलारी, ओतारी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले, गिहारा/गहरा, गुसाई/गोसाई, मुस्लिम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर, भारतीय इराणी, गवळी, मुस्लिम गवळी, गवलान, ग्वालवंश गोपाल-गवळी गवळी- गोपाल,दरवेशी, वाघवाले- शाह (मुस्लिम धर्मीय), अस्वलवाले, बागडी या जमातींचा सामवेश होतो.

भटक्या जमाती (क) (एनटी-सी)

भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे. अहिर, धनगर अहिर,डांगे,गढरी, हंडे, तेलवर, हटकर, हाटकर, शेगर, सगर, सेगर, खुटेकर, तेलंगी, ठेलारी, कोकणी-धनगर,कानडे, वऱ्हाडे, धनगर, झाडे, झेंडे, कुरमार, माहुरे, लाडसे, सनगर, धनवर, गडारिया, गड्री, गढरी, डंगेधनगर व डोंगरी धनगर, गडरिया/ गडारिया या जमातींचा समा‍विष्ट होतो.

भटक्या जमातींची (ड)

भटक्या जमातींची (ड) (एनटी-डी) संख्या १ (वंजारी) असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे

आज डोंबारी , बहुरूपी , कलंदर , वैदू मरीआईवाले , नाथपंथी , नंदीवाले , बेलदार , कोल्हाटी , रामोशी , पाथरवट , उचले यांच्या आयुष्याची तर फारच दैना झालेली आहे. या शिवाय राज्यातला इतर भटका बांधव अनेक शासकीय लाभापासून वंचित आहे. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात अजूनही बदल झाला नाही. आजही ते लाजलेले व बुजलेले वाटतात. भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी १४ मार्च २००५ ला केंद्र सरकारने बाळकृष्ण रेणके आयोगाची स्थापना केली होती. आयोगाच्या अहवालानुसार आजही या जमातीतील ९८ टक्के लोकांकडे रेशनकार्ड नाही, ७२ टक्के लोक भूमिहीन आहेत आणि ९८ टक्के लोकांना कोणत्याही प्रकारचे बँकेचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. या प्रवर्गातील लोक हे देशातील सर्वात दुर्बल घटक आहेत. अहवालानुसार विकास मात्र अजूनही झाला नाही. १९ फेब्रुवारी २०१४ च्या केंद्र सरकारच्या राजपत्रानुसार दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली एका नवीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. इदाते यांच्याकडून वंचित घटकांचा विकास होईल, अशी अपेक्षा करूया.

या समूहाचे उत्थान करायचे असेल तर प्रथम अन्न, निवारा, शिक्षण आणि महिलांच्या प्रश्नांचा शोध घेऊन त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत.

 रेशनकार्ड व आधारकार्ड

 अर्टिकल ३८ मध्ये सामाजिक विषमता नष्ट करणे, सर्वांना समान संधी देणे,वेगवेगळ्या पातळीवर जो समाज आहे. त्या घटकांना एकत्र एका ठिकाणी आणणे या जबाबदाऱ्या शासनावर सोपविण्यात आल्या आहेत. यातील मूठभर समाजाकडे शासनाने लक्ष दिले आहे. आज जगण्याच्या अधिकारापासून भटके विमुक्त जाती-जमाती वंचित राहिल्या आहेत. या जमातीतील असंख्य लोकांकडे आजही हक्काचे रेशनकार्ड ना आधारकार्ड. दारिद्र्यरेषेखालील नाव तर दूरच राहिले. या जमातींसाठी काही धोरणे राबविण्यात आली असली तरी ती त्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. शासनाने व भटके विमुक्त आयोगाने खालील उपाय करावेत.

उपाय

 १) रेशनकार्ड व आधारकार्ड नसलेल्या भटक्या समाजातील लोकांचा सर्व्हे करणे.

२)भटक्या समाजापर्यंत रेशनकार्ड व आधारकार्ड पोहोचण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि रेशन दुकानदार आशा तीन जणांची टीम तयार करुन भटक्या समाजातील लोकांना रेशनकार्ड व आधारकार्ड  उपलब्ध करून देणे.

 ३) रेशनकार्ड, आधारकार्ड नसलेल्या लोकांना ते कसे मिळवायचे याची माहिती देणे.

 ४) रेशनकार्ड बनवून देणे व विभक्त करून देण्यासाठी मदत करणे.

 ५) रेशनकार्ड- आधारकार्ड माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करणे.

 ६) 'वन नेशन-वश रेशनकार्ड' अंतर्गत भटक्यांना रेशन उपलब्ध करून देणे.

 निवारा

 भटका समाज हा सतत स्थलांतरित करणारा आहे. त्यामुळे त्याला स्वतः चे हक्काचे घर नाही ना जमीन. त्यामुळे हा समाज एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी त्याला जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

 उपाय

 १)भटक्या विमुक्तांच्या स्थलांतरासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून करणे जिथे तांडा, वस्ती, किंवा व्यवसायानिमित्ताने राहतात. त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करून देणे.

 २)घरकुल व गायरान जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे देणे.

 ३) भटक्या विमुक्तांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे.

 ४) पंतप्रधान आवास योजनासह अन्य योजनांची माहिती देणे.

 जात प्रमाणात व जात पडताळणी

 भटक्या समाजातील आज बहुतांश लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यामुळे त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ज्याकडे जात प्रमाणात पत्र आहे पण जातपडताळणीमुळे त्यांना नोकरी-राजकारण आदी पासून वंचित राहावे लागत आहे.

 उपाय

 १) शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे.

 २) महाराजस्व अभियान कार्यक्रम प्रत्येक वस्तीवर राबवणे.

 ३)जातीचा दाखला देणे आणि त्यानंतर वैधता प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीचा आहे. जातीचा मूळ दाखला देण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. हेच अधिकारी बढती मिळून अतिरिक्त जिल्हाधिकारी होतात. समित्यांचे अध्यक्ष या नात्याने उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनीच एके काळी दिलेले दाखले तेच पुन्हा तपासतात. उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी हे काही कमी महत्त्वाचे पद नाही. परंतु त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राला पुढे काहीच महत्त्व राहात नाही, असा याचा अर्थ होतो. प्रशासकीय कामकाजातील ही द्विरुक्ती टाळणे आवश्यक आहे.

 ४) सन २०००चा महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम) अधिनियम २००० व त्या अंतर्गत नियम २०१२ दि. १ सप्टेंबर २०१२नुसार नियम करण्यात आलेले आहेत. तथापि राज्यातील जनतेस जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र मिळण्याबाबत मोठय़ा प्रमाणावर अडचणी येत आहेत. त्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 ५)प्रत्येक जिल्ह्य़ात एक याप्रमाणे राज्यात आता ३६ जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत. पण रक्ताच्या नातेवाईकाकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर त्या आधारावर त्यांच्या पाल्यांना प्रमाणपत्र देणे. हा निर्णय समित्यांच्या कामाचा व्याप कमी करणारा आणि अर्जदाराचाही त्रास कमी होऊन त्याला वेळेत प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु ज्यांनी मुळातच खोटी प्रमाणपत्रे घेतली आहेत, त्या आधारावर त्यांच्या पाल्यांना तशीच प्रमाणपत्रे दिली जाण्याचा एक धोका आहे. ते कसे टाळण्यासाठी प्रबोधन करणे.

 शिक्षण

 महाराष्ट्रातही व्यावसायिक दृष्ट्या परंपरेने भटकणाऱ्या जाती-जमातीमधील मुले मुली आजही शिक्षणापासून वंचित आहेत. उदा., धनगर, वडार, बंजारा (Banjara), कंजारभाट, घिसाडी, पारधी (Paradhi), रामोशी (Ramoshi), लमाण (Laman), पाथरवट आदी जमाती आपल्या पारंपरिक व्यवसायांसाठी सातत्याने स्थलांतरित होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या घटकांतील पाल्य मुलभूत शिक्षणापासून वंचित आहेत.

 उपाय

 १) भटक्या समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचे सर्व्ह करणे.

 २)राज्यातील आश्रमशाळा, निवासी शाळांची संख्या वाढवणे, फिरत्या शाळा सुरू करणे.

 ३) मुला-मुलींना शिष्यवृत्ती, विद्यावेतन, सकस आहार, मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, व्यावसायिक प्रशिक्षण असे प्रभावी व सर्वसमावेशक प्रयत्न  करणे.

 ४) वंचितांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजना-उपक्रम राबविण्यात अध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. शंभर टक्के पटनोंदणी, शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाची गोडी निर्माण करणे, दर्जेदार शिक्षण देणे, वंचित मुलांच्या समस्या जाणून घेणे, स्व-भाषेतून अध्ययन, अध्यापन करणे. पालकांशी संपर्क व सुसंवाद साधणे, विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे व मार्गदर्शन करणे इत्यादी बाबी वंचितांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी पाऊल उचलणे.

 महिला

 आजही भटक्या विमुक्त समाजातील महिलांना मोठ्या प्रमाणावर विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या घटकातील महिलांच्या परिवर्तनासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे.

 उपाय

 १) भटक्या समाजातील महिलांवर प्रथा, रूढी, परंपरा इत्यादी प्रभाव असतो. त्यासंबंधी प्रबोधन करणे.

 २) मुली- महिलांची सतत हिमोग्लोबिन तपासणी करणे.

 ३) पाल,वस्त्या, वाड्या याठिकाणी मिनी आरोग्य उपकेंद्र निर्मिती करणे.

 ४) समाज विकासामध्ये सामूहिक नेतृत्व विकसित करणे, स्वयंप्रेरणा, स्वावलंबन, सामाजिक जबाबदारी याबाबत जागृती घडवून आणणे.

 ५) आत्मनिर्भर भारत, स्टार्ट अप, मेक इन इंडिया, ग्रामीण विकास योजना, बचत गट आदी माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करणे.

 कायदा

 भटक्या समाजातील महिला व पुरुषांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते. तसेच पुरुषसत्ताक जातपंचायतीमध्ये या महिलांना दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यासाठी महिलांना योग्य सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.

 उपाय

१)भटक्या विमुक्त जमातीतील महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांना अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्याचे विशेष संरक्षण द्यावे आणि भटके विमुक्त जमातींना जातीचा दाखला काढण्यासाठी १९६१ सालच्या वास्तव्याच्या पुराव्याची अट रद्द करणे.

२) एस.एसटी प्रमाणे अत्याचार प्रतिबंधक कायदा भ.वि.जा.ज यांना देखील संरक्षण देणे.

३)भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी अॅक्टचे संरक्षण मिळाले पाहिजे.

 ४)राज्य महिला आयोगात भटक्या विमुक्त महिलांच्या प्रतिनिधीला स्थान मिळवून देणे.

 ५) जातपंचायतीमुळे महिलांवर अन्याय होत आहे. जातपंचायत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.

 पारंपरिक कौशल्य

 भटक्या जाती बांधवांकडे हस्तकौशल्य आहे. काळानुसार जसा समाज नष्ट होत असतो, तशी संस्कृतीही नष्ट होत असते. भटक्या बांधवांचे हस्तकौशल्य नष्ट न होता त्यांचे जतन करण्याची आवश्यकता आहे.

 उपाय

 १) भटक्या समाजातील पारंपरिक कला आणि आधुनिक कला यांची सांगड घालण्यासाठी प्रयत्न करणे.

 २) घोंगडी विणकाम करणारा धनगर समाज, दगडकाम करणारा वडारी समाज, ओतकाम करणारा पोटारी, जडी-बुटींसारखी आयुर्वेदिक औषधे विकणारा वैदू समाजाच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

 ३)वन नेशन - वन व्यवसाय अंतर्गत भटक्यांच्या व्यवसाय कलेला चालना देणे.

 ४) कोल्हाटी, डोंबारी, यासह अन्य कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी पाऊल उचलणे.

 धनगर समाज

भटक्या समाजातील धनगर घटकांचा आरक्षणाचा विषय नेहमी चर्चेत असतो. या समूहाला कायदेशीर मार्गाने सवलत मिळणे आवश्यक आहे.

उपाय

जात-जमात कोणत्या वर्गात समाविष्ट आहे हे दर्शविणारी तीन परिशिष्टे घटनेत जोडली आहेत. यातील परिशिष्ट नंबर दोन (अनुसूचित जमातीची यादी)मध्ये छत्तीस क्रमांकावर ओरान आणि धनगड या जातींचा उल्लेख आहे. यातील धनगड म्हणजेच धनगर होय. भारताची घटना इंग्रजी व हिंदीत लिहिली आहे. भाषा शास्त्रानुसार जसे ताकारी यांचे ताकाडी, जाखरचे जाखड, गुरगावचे गुडगाव होते तसेच धनगरचे धनगड झालेले आहे.

१) ‘आणि चे खुसपट काढून धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे. 

२) मेंढपाळाना संरक्षण देणे व गायरान - वनक्षेत्रातील जमीन मेंढपाळांना उपलब्ध करून देणे.

३) धनगर समाजासाठी १० हजार घरे, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलती अशी एक हजार कोटी रूपयांची योजना भाजपा सरकारने जाहीर केली होती त्यावर काम देखील सुरू होते मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वरील सर्व योजना बंद केल्या. या सर्व योजना -सवलती तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे.

कैकाडी व ठकारी जातीसाठी

 कैकाडी व ठकारी समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणाचे प्रमाण पूर्वीच्या पिढीत अत्यंत कमी असल्याने कैकाडी समाजातील तरूण मुलांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.

उपाय

 १)कैकाडी व ठकारी समाजाचा विदर्भात अनुसूचित जाती प्रवर्गात तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गात समावेश आहे. क्षेत्रबंधन उठवून विदर्भातील कैकाडी समाजाप्रमाणेच राज्यातील उर्वरित भागातील कैकाडी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलतींचा लाभ मिळवून देणे.

२)विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजात रोटी बेटीचे व्यवहार होतात, त्यामुळे हे दोन्ही समाज एकच आहेत. राज्यातील कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवणे आवश्यक.

या शिवाय शासनाने वंचित समाजाच्या विविध परंपरांची माहिती संकलित करणे गरजेचे आहे, त्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, मुख्य म्हणजे या समूहाच्या प्रश्नांकडे बघण्याची सरकारची व समाजाची दृष्टी न्यायसुसंगत असली पाहिजे.

छायाचित्र -आंतरजालावरून

विकास पांढरे,९९७०४५२७६७

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

उजनीकाठाचे सौंदर्य - कोकरे आयलॅन्ड


 मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. कुगावचे कोकरे आयलॅन्ड हे त्यापैकीच एक. इतिहासाचा झालेला स्पर्श आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या होणाऱ्या दर्शनामुळे कोकरे आयलॅन्डची सफर अविस्मरणीय होऊन जाते.

उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता.माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश-विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवाॅटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. 

उजनी धरण

सोलापूर, नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या उजनी धरणाला लागूनच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. तसेच दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर,  कुर्डुवाडीपासून भिगवणपर्यंतच्या पट्ट्यातूनच गेली आहे. दळणवळणाच्या या सोयीसोबतच परिसरातील अनेक गोष्टी पर्यटनवाढीला मदत करणाऱ्या आहेत. उजनी जलाशयावर मुक्त विहार करणारे पक्षी, मच्छीमारांच्या नौका, अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे विलोभनीय प्रतिबिंब पाहण्याची मजा काही औरच आहे. यामुळे हे विस्तीर्ण जलाशय अलीकडच्या काळामध्ये पर्यटकांना आकर्षित करत आहे. धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येथे येतात. त्यामुळे अलीकडच्या काळात उजनी जलाशय व उजनी बॅकवाॅटर ची ख्याती देशभर झाली आहे. याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेण्याची गरज आहे.

गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकत होत आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही.अशाच एका बेटाबद्दल आणि आयलॅन्डबद्दल (कृषि पर्यटन केंद्र) आज तुम्हाला माहिती सांगणार आहे.

कुगाव एक निसर्गरम्य बेट

उजनी पाणलोट क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले. त्यापैकीच एक गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील कुगाव. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला मोठा इतिहास आहे. हनुमानाची जन्मभूमी म्हणून गावाची ओळख आहे. याबाबतचा 'भीममहात्म्य' या पौराणिक ग्रंथातील ३३ व्या अध्यायात उल्लेख आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी कुगाव येथे भूईकोट किल्ला बांधला आहे. सध्या या ठिकाणीला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर जलसमाधी लाभली आहे. धरणातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पाडतो. भारतातीतील हनुमान भक्त, शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नागराज मुंजळे यांच्या सैराट चित्रपटातील काही प्रसंगाचे  चित्रिकरण या ठिकाणी करण्यात आले आहे. 

कुगावचे हनुमान मंदिर

संपूर्ण गावाला भीमा नदीच्या पात्राने तिन्ही बाजूने वेढा घातला आहे. त्यामुळे हा परिसर बेटासारखा भासतो. या ठिकाणी जमीन मार्गाने येण्यासाठी एकच मार्ग (प्रजिमा ११) आहे; हा मार्ग ही तितकासा सोपा नाही. त्यासाठी स्थानिक गावकरी, हनुमान भक्तांना व प्रवाशांना सुमारे १२० किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. तर उर्वरित चार मार्ग पुणे जिल्ह्यातील कळाशी, गंगावळण, कालठण व शिरसोडी गावातून  पाण्यामार्गे येणारे आहेत. हा मार्ग सोपा होण्यासाठी कळाशी (ता.इंदापूर)ते कुगावपर्यंत पुल तयार झाला तर मराठवाड्याला जोडणारा हा जवळचा मार्ग होणार आहे. उजनी बॅकवाॅटर परिसरातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळू शकते. 

 कुगावचा कोकरे आयलॅड

उजनी लाभ क्षेत्रातील वैभव  लक्षात घेऊन कुगाव येथील प्रगतशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे हे फेब्रुवारी २०१९ पासून पाच एकरांवर कोकरे आयलॅन्ड नावाने कृषि पर्यटन केंद्र विकसित करत आहे.

कोकरे आयलॅन्ड

कोकरे आयलॅन्ड उभारणीबाबत धुळाभाऊ कोकरे म्हणाले, "आमच्या कोकरे परिवाराची उजनी बॅकवाॅटर परिसरात जमीन आहे. त्यामध्ये ऊस आणि केळी ही मुख्य बागायती पिके आहेत. आमच्या कुगावला मोठा पौराणिक इतिहास तर आहेच; शिवाय इथला निसर्ग जगाच्या नकाशावर यावा, स्थानिक पदार्थांना वाव मिळावा आणि शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून कोकरे आयलॅन्डची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्रातून केवळ आमचा विकास होणार नाही तर यातून स्थानिक लोकांनाही रोजगार मिळणार आहे. या आयलॅन्डचा आकार एखाद्या द्विपसमूहासारखा आहे. या तिनही बाजूंनी विस्तीर्ण जलाशय, देशी विदेशी पक्ष्यांचा संचार, नीरव शांतता ही या पर्यटन स्थळाची जमेची बाजू आहे. त्यामुळेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात. सध्या हे केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे." 

नयनरम्य दृश्य

हिवाळ्याची चाहूल लागताच उजनी जलाशयावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगोसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात होते. कुंभारगाव, डिकसळ,भादलवाडी, डाळज, पळसदेव, गंगावळण, आगोती, कुगाव, भिगवण या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागतात. त्यानंतर पर्यटकांची पावले उजनी पाणलोट क्षेत्राकडे वळू लागतात.   पक्ष्यांचे आगमन हे पर्यटक,पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमीसाठी पर्वणीच ठरते.

फ्लेमिंगोचे विहंगम दृश्य

 कोकरे आयलॅन्डच्या संचालिका व माजी सरपंच तेजस्विनी कोकरे सांगतात, " पर्यटकांना जलविहार करता यावे, यासाठी नौका विहारची सोय करण्यात आली आहे. जलाशयावर विहार करणारे फ्लेमिंगो (रोहित-अग्निपंख), पेंटेड स्टॉर्क ग्रे हेरॉन राखी बगळा,(मोर बगळा), कॉमन कूट (चांदवा), ब्लॅक हेडेड आयबिस, ब्राऊन हेडेड गल (तपकिरी डोक्‍याचा कुरव), ब्लॅक हेडेड गल (काळ्या डोक्‍याचा कुरव), एशियन ओपनबिल (मुग्धबलाक), पर्पल स्वॅम्पहेन (जांभळी पाणकोंबडी) पर्पल हेरॉन (जांभळा करकोचा), लिटल कॉर्मोरंट (छोटा पाणकावळा), ग्रेट कॉर्मोरंट (मोठा पाणकावळा), रुडी शेल्डक (चक्रवाक), नॉर्दर्न शॉवेलर थापट्या), युरोपिअन स्पूनबिल (चमचा) यांसारखे अनेक प्रकारचे पक्षी आणि पक्ष्यांचे दर्शन होते. 

विस्तीर्ण जलाशयावर नौकाविहार

उजनी जलाशयाचा पसारा सहा किमी रुंद तर १४० किमी लांब असा भीमानगर ते दौंड पट्ट्यापर्यंत प्रचंड मोठा आहे. त्यामुळे नौकाविहार करण्याचा एक अविस्मरणीय अनुभव येथे येतो. पक्षी पाहण्यासाठी येणारे अनेक पर्यटक किमान एकदा तरी नौकाविहार करतातच. तसेच अनेक मच्छीमार तरुण नौकाविहार आणि पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देतात. विस्तीर्ण जलाशयामुळे जलविहार करण्यासाठी येथे मोठी संधी आहे. जलविहार करत जलाशयावरील पक्ष्यांच्या विलोभनीय कवायती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्याच असतात. 

आनंदी गोपाळ


सूर्यास्त दर्शन

त्यासोबतच मच्छिमारांच्या होड्या, मासळीचे खमंग जेवण आणि सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनमोहक दृश्यही या ठिकाणावरून बघता येते. जलाशयात भरपूर खाद्य उपलब्ध असल्यानं पक्ष्यांसाठी ही पर्वणीच असते. तिन्ही ऋतूमध्ये नितांत सुंदर अनुभव येतोच; पण येथे दडलेल्या जैवविविधता व निसर्ग नवलांमुळे पर्यटकांची मजा द्विगुणित होते.

देशी झाडे व वनस्पतींचे संवर्धन

या पर्यटन केंद्रात निसर्गाचा अधिवास जपणे,जैवविविधतेचे रक्षण करण्याबरोबरच विविध दुर्मिळ वृक्ष,देशी झाडांची रोपांची लागवड करण्यात आली आहे.

जैवविविधतेने नटलेला उजनी बॅक वॉटर

आंबा, चिंच, नारळ, सुपारी, चिक्कू, कडुलिंब, बाभूळ, सिताफळ, वड, पिंपर,जांभूळ, पेरू, उंबर त्याचबरोबर पाणफुटी, तुळस, गुळवेल, अश्वगंधा, कोरफडीसारख्या वनौषधी पहायला मिळतात. या केंद्रात ऊस, केळी, मका, गहू, वांगे, टोमॅटो, अशी नानाविध पिकांचेही दर्शन होते.

शिवारफेरीतून कृषि दर्शन

या आयलॅन्डच्या ठिकाणावरून उजनीकाठाचे सौंदर्याबरोबर ग्रामीण- कृषि जीवन संस्कृतीचे दर्शन ही पर्यटकांना होते. ग्रामीण भागातील लोक शहरात राहिल्यांने बऱ्याचवेळा आपली ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ तुटते ती भरून काढण्याचा प्रयत्न कोकरे आयलॅन्ड करत आहे.

केळीची शेती

धुळाभाऊ कोकरे म्हणाले, " आम्ही आमचे लक्ष शालेय विद्यार्थ्यांवर केंद्रित केले आहे. मुलांना भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती व्हावी यासाठी परिसर अभ्यास नावाचा भाग असतो. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात 'जलदिंडी' नावाचा धडा आहे. जलदिंडीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा पाण्यामार्गे असतो. आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून या जलदिंडीचा कोकरे आयलॅड येथे विसावा असताना मुलांना याची प्रत्यक्षात पाहणी करत अनुभव घेता  येतो. मुलांना निसर्गाचे दर्शन व्हावे आणि ग्रामीण जीवन कळावे म्हणून आम्ही विशेष व्यवस्था करतो. हंगामानुसारचे पीके, ऊस व केळीची डेमो प्लाँट, फळझाडे, वनस्पतीची शिवार फेरीच्या माध्यमातून माहिती देत असतो. विशेष म्हणजे मुलांना त्यांच्या शिक्षकांबरोबर बैलगाडी, ट्रॅक्टर व बोटींगच्या माध्यमातून फेरी मारण्यात येते. मैदानात पारंपरिक पद्धतीचे विटी दांडू, खो खो, कबड्डी असे देशी खेळ शिकवले जातात."

कोकरे आयलॅन्डची वैशिष्ट्ये

१ ) हनुमान जन्मभूमी

२) तिन्ही बाजूंनी उजनी बॅकवाॅटर

३) बोटिंगची सुविधा, पक्षी पाहण्याची संधी

४) शालेय सहलीची शासकीय परवानगी

५) शिवार फेरी,प्रत्यक्ष शेतीची प्रात्यक्षिके.

६) राहण्याची सोय, स्थानिक भोजनाची सोय

नकाशा

पारंपरिक शेतीला थोडे व्यवसायिक रूप दिले तर जास्तीचे उत्पन्न मिळू शकते हे कोकरे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे.या व्यवसायासाठी शहरात वा अन्य ठिकाणी जाऊन स्थलांतर करण्याची गरज नाही हे विशेष म्हणजे आपल्या गावात, शेतात राहून कृषिसेवा करता येते.

"कोरोनाचा कृषि पर्यटनाला फटका"- तेजस्विनी कोकरे

"गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या चाललेल्या खेळाचा मोठा फटका ग्रामीण अर्थकारणाशी निगडित असलेल्या कृषि पर्यटन केंद्रांना बसला आहे. चालू वर्षात कृषि पर्यटनाला बसलेला फटका भरून निघेल अशी आशा होती. हल्लीचा कोरोना काळ संपवावा आणि तीन चार दिवस बाहेर कुठे तरी जाऊन यावे असे प्रत्येक पर्यटकांना वाटत आहे; पण याही वर्षी टाळेबंदीमुळे पर्यटक घराबाहेर पडू शकत नाहीत. कोरोनाच्या तडाख्यातून हळूहळू का होईना; पण जगाची सुटका होणे आवश्यक आहे. तरच पर्यटन केंद्रांना पुन्हा एकदा झळाळी मिळेल."

- कार्यकारी संचालिका, कोकरे आयलॅन्ड, कुगाव (ता.करमाळा)

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७

संपर्क

कोकरे आयलॅन्ड, कुगाव

मो नं:-७७४४००००८४

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...