शनिवार, २ जानेवारी, २०२१

धनाजीरावांची ‘देशी बियाणे बँक’


 उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील शेतकरी, ग्रामविकास समितीचे कार्यकर्ते धनाजी धोतरकर यांनी गेल्या सोळा वर्षांपासून विविध दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण अशा 125हून अधिक देशी पीक वाणांचे जतन केले आहे. त्यासह सेंद्रिय शेतीला चालना देत ते देशी बियाणांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

शेतीचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये बियाणे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या ओवीत संत तुकाराम महाराजांनी बियाणांचे महत्त्व सांगितले आहे. पेरणीच्या वेळी अंकुरक्षम व अधिक जोमदार असलेल्या बियाणांची उपलब्धता हे अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आधुनिक शेती पद्धतीत कृषी पर्यावरणीय दृष्टीकोनातून शुद्ध व देशी बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात शेतीतील पारंपरिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे आणि त्याचे दस्तऐवजीकरण करणे किती गरजेचे आहे, या संदर्भात पर्यावरण लेखक हर्षद तुळपुळे यांचा सा. विवेकच्या 30 नोव्हेंबर 2020 ते 6 डिसेंबर 2020च्या अंकातील ‘पारंपरिक ज्ञानसंकलन व्हावी राष्ट्रव्यापी चळवळ’ या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला होता. प्रस्तुत लेखही ‘पारंपरिक ज्ञानसंकलन’ या विषयाला पुढे घेऊन जाणारा आहे.

देशी बियाणांचा संग्रह

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावातील धनाजी धोतरकर हे 2004 सालापासून देशी बियाणांवर काम करत आहेत. या कामात त्यांना समाधान मिळते आहे. पारंपरिक बियाणे शेतीसाठी उपयुक्त असून त्याच्या लागवडीतून शेतीचे अनेक प्रश्न निकाली लागतील, असा त्यांचा विश्वास आहे.

देशी वाणांविषयी काम करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगताना धनाजीराव म्हणाले, “बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. भारतीय शेतीचा अभ्यास केला, तर आपला देश, शेतकरी बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. इथला शेतकरी देशी बियाणांची लागवड करत होता. हल्ली पारंपरिक बियाणांची जागा हायब्रीडने (रासायनिक बियाणांनी) घेतली आहे. त्यामुळे पारंपरिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी बियाणांच्या बाबतीत शेतकरी परावलंबी झाला आहे.

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे. त्यामुळे घरीच बियाणे बनवली जायची. त्यामुळे शेतकर्‍यांना दोन प्रकारचे फायदे व्हायचे - एक म्हणजे बियाणांवरचा खर्च वाचायचा आणि दुसरे म्हणजे देशी अस्सल बियाणांमुळे त्यांची फसवणूक व्हायची नाही. माझा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आमची दहा एकर शेती आहे. माझे वडील शेतात पेरणीच्या वेळी पारंपरिक बियाणे वापरायचे. मिश्र शेतीतून विविध बियाणांचे जतन व संवर्धन करायचे.

मला लहानपणापासून शेतीचे वेड होते. गाय, बैल, वासरू, शेळी यांना चारण्यासाठी रानात घेऊन जात असे. रानात विविध प्रकारची कडधान्ये व पालेभाज्या दिसायच्या. अशा कडधान्यांची व पालेभाज्यांची बियाणे आमच्या शेतात असावी, म्हणून मी धडपडत असे. गाईगुरांचे खत असल्याने हे बियाणे शेतात एकदा पेरले की चांगले उत्पन्न निघायचे. करड, तीळ, अंबाडीच्या उत्पादनातून तेल निघायचे, शिवाय या तेलाची पेंड निघायची, हाच गाईगुरांचा पौष्टिक आहार असायचा.

सध्या शेतकरी नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे स्थानिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपली पारंपरिक शेती जगावी यासाठी मी गेल्या 16 वर्षांपासून धडपडत आहे. पुण्यातील ‘अफार्म’ व ‘बायफ’ संस्थेमुळे मला देशी बियाणे संकलन करण्याची अधिक आवड निर्माण झाली. माझी नाळ शेतीशी जुळलेली असल्याने या कामात मी झोकून देऊन काम केले. आज माझ्याकडे 125हून अधिक बियाणांचे संकलन आहे.

हुलगे, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, मूग, गहू, बाजरी, पिवळी साळी, हरभरा अशा सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या व पालेभाज्यांच्या बिया इतरत्र कुठे मिळत नाहीत, त्या आमच्याकडे आहेत.”

धनाजीरावांनी ही सर्व पारंपरिक बियाणे मोठ्या कष्टाने संकलित केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात हा सर्व ठेवा जतन करून ठेवला आहे. हे कार्यालय म्हणजे धनाजींचे संशोधन केंद्रच आहे. अनेक शेतकरी कार्यालयात येऊन धनाजीरावांचा सल्ला घेऊन आपल्या शेतीसाठी देशी बियाणे घेऊन जातात.

देशी बियाणांची वैशिष्ट्ये

1. देशी बियाणांत उच्च दर्जाची पोषणमूल्ये असतात. खाण्यास चवदार.

2. हवामान बदलात तग धरण्याची क्षमता.

3. बदलत्या हवामानाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण पीक जातींच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन, तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. हुलगे, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, मूग, गहू, बाजरी, पिवळी साळी, हरभरा अशा सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या व पालेभाज्यांच्या बिया इतरत्र कुठे मिळत नाहीत, त्या आमच्याकडे आहेत.”

धनाजीरावांनी ही सर्व पारंपरिक बियाणे मोठ्या कष्टाने संकलित केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात हा सर्व ठेवा जतन करून ठेवला आहे. हे कार्यालय म्हणजे धनाजींचे संशोधन केंद्रच आहे. अनेक शेतकरी कार्यालयात येऊन धनाजीरावांचा सल्ला घेऊन आपल्या शेतीसाठी देशी बियाणे घेऊन जातात.

पाच हजार लोकांपर्यंत प्रचार, प्रसार

 पारंपरिक बियाणे शेतकर्‍यांच्या उपयोगाची आहेत. त्या दृष्टीने विचार करता ही बियाणे केवळ चार भिंतीत बंदिस्त न ठेवता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धनाजीरावांची प्रयत्नशील आहेत.

धनाजीराव सांगतात, “ग्रामविकास सेवा मंडळ व लोकप्रबोधन संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार करत आहे. आतापर्यंत मी पाच हजार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलो आहे. राज्यातील व परराज्यातील कृषी प्रदर्शनांतून, कृषी कार्यशाळेतून देशी बियाणांचा प्रसार केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी के.एम. नागरगोजे व दीपा मुधोळ-मुंडे यांनी देशी बियाणे दालनास भेट देऊन प्रशंसा केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के गावांत देशी बियाणे व सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन केले आहे. देशी बियाणे, दुष्काळ, पाणी व शेती क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन मला 2014 साली ‘कृषिमित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रचार-प्रसाराच्या कामात टाटा सामाजिक संस्था व अभिव्यक्ती संस्था नाशिक यांचे सहकार्य लाभले. सह्याद्री वाहिनीवरील ‘आमची माती, आमची माणसं’ या टाटांच्या कार्यक्रमात, तर अभिव्यक्ती संस्थेमुळे केरळ येथे झालेल्या जागतिक ऑरगॅनिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये, तर हिमाचल प्रदेशातील बीर येथे झालेल्या कृषी कार्यक्रमात सहभाग नोंदवता आला.

शेतकर्‍यांच्या सहभाग पद्धतीतून पारंपरिक बियाणांचे पुनरुज्जीवन करणे, पुनरावृत्ती करणे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांच्या संपर्कात राहण्याचे, देशी बियाणांची देवाणघेवाण करण्याचे काम करत आहे.”

सेंद्रिय शेतीची कास

धनाजीराव आपल्या शेतात पारंपरिक बियाणांचा वापर करतात. त्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. धनाजीराव सांगतात, “राष्ट्राच्या हिताचा विचार करून मी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. आज माझ्याकडे 10 गावरान गाई, 10 खोंड, 4 बैल आहेत. माझ्या सर्व शेतात दशपर्णी, पंचामृत, गोमूत्र, जीवामृत व गांडूळ खताचा वापर करतो. त्यामुळे माझ्या शेतातील मातीचा पोत टिकून राहिला आहे. पारंपरिक बियाणांचा व सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने माझ्या शेतीचे उत्पादन तीन पट वाढले आहे. विशेष म्हणजे आरोग्यावरचा खर्चही कमी झाला आहे. एकूणच मिश्र व जीववैविध्य शेती पद्धत पुनरुज्जीवित करण्याकडे माझा कल आहे.”

रासायनिक शेतीमुळे होणारी मातीची हानी टाळण्यासाठी, तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची अनुपब्धता पाहता पारंपरिक सेंद्रीय शेती फायदेशीर ठरणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढील दिशा

 “स्थानिक बियाणांचे महत्त्व लक्षात घेता येत्या काळात राज्यातील विविध जातींच्या बियाणांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यामध्ये अडचणी आहेत.

अनेक बियाणांमध्ये चांगले गुणधर्म असूनही काही अडचणींमुळे त्यांची लागवड कमी झाली आहे. राज्यात शुद्ध बियाणे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे उत्पादन नवीन सुधारित/संकरित जातीपेक्षा कमी येते. काही जातींमध्ये फुटवा कमी येतो. तसेच काही जाती उंचीने जास्त असल्याने पीक शेवटच्या टप्प्यात जमिनीवर लोळते, त्यामुळे त्याचे नुकसान होते. या अडचणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करणार आहे” असे धोतरकर यांनी सांगितले.

जागतिकीकरणाच्या काळात धनाजीरावांसारखा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. देशी वाणांच्या माध्यमातून हवामान बदलाला तोंड तर देता येईल, तसेच शेतकरी स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहतील, यासाठी धनाजीरावांसारखे असंख्य देशी बियाणे संकलक निर्माण होणे आवश्यक आहे.

विकास पांढरे,9822998827


अवकाळी 'गारपिटी'च्या मरणकळा


बोंडअळीच्या प्रकोपातून विदर्भातला शेतकरी सावरत होता, दुष्काळाच्या झळांतून मराठवाडयातला शेतकरी रब्बीतून आधार शोधत होता. वर्षा ऋतूचे दिवस नसतानाही या दोन्ही भागांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्यात आभाळातून गारपिटीचा मारा झाला अन् शेती क्षेत्राचे होत्याच नव्हते झाले. राज्यातील सव्वा लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जीवित- व वित्तहानी झाली. महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. दरसाल नवनवे संकट  झेलणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांचे  दु:ख, दैन्य पराकोटीचे बनले आहे. एकूणच हवामान आधारित पीक रचना घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर नाही.

 शेती म्हणजे आशा-निराशेचे क्षेत्र. निसर्गाच्या लहरीपणाचे जास्तीत जास्त चटके सोसावे लागणारा हा बेभरवशाचा धंदा. मध्यम व्यापार, कनिष्ठ  नोकरी आणि श्रेष्ठ  शेती हे फक्त पुस्तकात वाचायला मिळते. असो. भारतासारख्या खंडप्राय देशातील शेती क्षेत्रावर अनेक दशकांपासून सरकारी अनास्थेची आणि हवामान बदलाची इडापिडा चालू आहे. आधुनिक शेतीतील 'इंटेलिजन्स'चा स्पर्श इथल्या हजारो शेतकऱ्यांना झालेला नाही. देशाला विकसित होण्यासाठी कमी काळात खूप अंतर कापायचे आहे. शेतीसारखे मुख्य बलस्थान कमकुवत असेल, तर पुढे जाण्यात काय अर्थ आहे? एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध संपत असताना भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यातील शेती व्यवसाय नव्या वळणावर उभा आहे.

गारपिटीने 13 जिल्हे बाधित

राज्यात 11, 12 आणि 13 फेबु्रवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे 13 जिल्ह्यांत मिळून सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, तसेच मराठवाडयातील जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली आणि खान्देशातील जळगाव या जिल्ह्यांत शेतीचे व कापणी झालेल्या शेतमालाचे आतोनात नुकसान झाले आहे. या गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा जीव घेतला. जनावरे दगावली. कुठे गहू लोळला, तर कुठे हरभरा भिजला, कुठे तुरीचे ढीग झाले, कुठे आंब्याचे मोहोर गळले. मका, करडई, संत्रे, मोसंबी, लिंबू आणि केळी या फळबागा, भाजीपाला, टरबूज, खरबूज, भोपळा, चारापिके अशी इतर पिके अवकाळी पावसाच्या आणि गारपिटीच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाल्याने कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बोंडअळीनंतर गारपिटीचे संकट

सन 2013मध्ये विदर्भात अतिरिक्त पाऊस झाला, तर 2014मध्ये दुष्काळी स्थिती. 2016 साली त्यातून शेतकरी सावरत नाही, त्याच वेळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्याचबरोबर दिवसागणिक होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचा विषय गहन होत चालला आहेच. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2017मध्ये कपाशीवर बोंडअळींचा प्रादुर्भाव झाला, म्हणून फवारणीच्या जीवघेण्या फासात 32हून अधिक शेतकऱ्यांचा व शेतमजुरांचा नाहक जीव गेला. अडीचशेहून अधिक जणांना कायमचे अंधत्व आले. हे संकट संपेपर्यंत आता गारपिटीच्या रूपाने दुसरे संकट उभे राहिले आहे. अवेळी आलेल्या पावसाने आणि गारपिटीने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. विदर्भाच्या पश्चिम पट्टयातील बुलढाणा, अकोला, वाशीमसह अमरावती, वर्धा, भंडारा जिल्ह्यांतील अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. गहू, हरभरा, संत्रे, केळी, टोमॅटो या पिकांचे व बीजोत्पादन प्लॉटचे अतोनात नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात गारपिटीच्या तडाख्याने वृध्देचा मृत्यू झाला. 8 ते 10 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 32 हजार हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसल्याचा अंदाज आहे.

अमरावती जिल्ह्याच्या संत्रे उत्पादक भागात गारपीट व त्यानंतर झालेल्या पावसाने मृग बहरातील संत्र्यांचे नुकसान झाले आहे. अमरावती विभागात साडेचार लाख हेक्टरवर रब्बीची पेर झाली होती. त्यात हरभरा, तूर व कापूस यांचे प्रमाण अधिक होते. गोंदिया जिल्ह्यात 5 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांची नासधूस झाली आहे. बोंडअळींचा सर्वाधिक फटका बसलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवरील तूर, गहू, संत्रे या पिकांना अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला आहे. वर्धा व नागपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावला आहे. या अस्मानी संकटाला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. खरीपाची पिके हातातून गेल्यानंतर रब्बीतून आधार शोधणाऱ्या शेतकऱ्यांना गहू, हरभरा ही पिके आधार देतील, असे वाटले होते. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा असताना, मेहनत करून पिकवलेल्या पिकांवर अवकाळी पावसाची अवकृपा झाली आहे.

''अमरावती जिल्ह्यात झालेली गारपीट भयानक होती. यामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. ज्या शेतात 15 ते 20 पोते गहू - हरभरा झाला असता, तिथे आता एक पोतेही उत्पन्न निघणार नाही. गारपिटीमुळे ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रे या पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाला आलेले 2 एकर गहू, 3 एकर हरभरा आणि 2 एकर तूर अस्मानी संकटाने ओढावून घेतले. या गारपिटीने शेतीबरोबरच शेतकऱ्यांची स्वप्नेसुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत. निसर्गच साथ सोडत असेल, तर जायचे कुणाकडे?'' असा सवाल अमरावती जिल्ह्यातील मोशी येथील महिला शेतकरी संगीता ढोके यांनी व्यक्त केला. मोशी गावातील संत्रे उत्पादक शेतकरी बबनराव विघे यांच्या संत्रे बागेचे मोठे नुकसान झाल्याचे त्या म्हणाल्या.

''पीक हे आमच्यासाठी सोनंच असतं. दिवस-रात्र राब राब राबून, हाडाची काडं करून पीक वाढवलेलं असतं. हे सोनं पाहताना पाच-सहा महिन्यांचा थकवा कुठल्या कुठं पळून जातो. आता हेच सोनं पाहताना रडू येतंय. गारपिटीने होत्याचं नव्हतं केलं. खरीपात बोंडअळींच्या प्रादुर्भावाचा शेतीला फटका बसला, आता पुन्हा अस्मानी संकट उभे राहिलं आहे.'' अशा शब्दात वर्धा जिल्ह्यातील रोटा येथील शेतकरी देवराव पुसाटे यांनी आपल्या व्यथा सांगितल्या.

 विदर्भात हरभऱ्याचा व गव्हाचा मोठा पेरा झाला होता. त्यातल्या त्यात संत्र्याच्या बागा जमीनदोस्त झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

दुष्काळाने मारले, गारपिटीने झोडपले

मराठवाडा हा भाग गेली दोन दशके दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय. कधी अवकाळी पावसाने, तर कधी गारपिटीने इथला शेतकरी कंगाल होतोय. 2015-16च्या दुष्काळाच्या खाईतून शेतकरी उठतो न उठतो, तोपर्यंत यंदा पुन्हा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून खरीपाची पेरणी केली, पण हाती मात्र काहीच लागले नाही. वरुणराजाच्या दडून बसण्याने खरीप हातचे गेले. गावातली माणसे शहराकडे धावू लागली. रब्बीवर मदार ठेवून बसलेल्या शेतकऱ्याला गारपिटीने झोडपले आहे.

जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांत गारपिटीने हाहाकार माजवला. जालना जिल्ह्यात तर जणू काश्मीरच अवतरले. बियाणे उत्पादनात अग्रेसर असलेल्या जालना जिल्ह्यात 27 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित आहेत.

बीड जिल्ह्यातील 10 हजार हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बीची पिके बहरलेल्या गारपिटीच्या तडाख्यात सापडली आहेत. परभणी जिल्ह्यातील 3 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 583 हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील 2 हजार 379 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 143 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. जळगाव जिल्ह्यातील 2 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा एकूण सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मराठवाडयात यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी होऊन हरभरा पिकाचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उत्पादनही वाढणार आहे. लातूर, बीड, औरंगाबाद बाजारपेठेत आवक होत असून यास प्रतिक्विंटल साडेतीन हजार ते तीन हजार 700 रुपये दर आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड या जिल्ह्यांत हरभऱ्याची मळणी सुरू आहे. गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील हरभरा भिजला आहे. त्यामुळे हरभरा पिकांचे उत्पादन कमी होऊन दर कमी मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने हरभरा हमीभाव केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.

गारपीटग्रस्तांची भेट

राज्य शासनाने गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील बाधित 13 जिल्ह्यांत महसूल विभागाकडून गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करून देण्याचा आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिला आहे.  फुंडकर यांनी गारपीटग्रस्तांची भेट घेतली.  सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी असून नुकसानभरपाई देण्यास कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे हळूहळू राज्यभरातून माहिती गोळा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावती, जालना, बीड, लातूर, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ, वर्धा यासह बाधित जिल्ह्यांत व तालुक्यांत महसूल विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. 12 फेबु्रवारी रोजी बीड जि.प.चे कृषी अधिकारी दत्तात्रेय मुळे यांनी धारूर व अंबाजोगाई तालुक्यांना भेट देऊन गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. गारपिटीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची माहिती गोळा केली जात असून सर्व तहसीलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशा सर्व जिल्ह्यांत कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार गारपीटग्रस्तांची भेट घेऊन पंचनामे करत आहेत.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून विदर्भात व मराठवाडयात वातावरणीय बदलांचा मोठा फटका बसतोय. खरे तर 1990च्या दशकापासून बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास सुरू झाला. शेतकऱ्यांसाठी हा तसा दुर्लक्षित विषय होता. सामाजिक उत्तरदायित्व असलेल्या पर्यावरणवाद्यांनी हा विषय केवळ चर्चा आणि आंदोलनापुरता ठेवला. आज ग्लोबल वॉर्मिंग हा विषय बघता बघता जगाला भेडसावत आहे.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांखालील हवमान आपत्तीचा इतिहास पाहता 2004 साली भारताच्या किनाऱ्यावर त्सुनामी लाटेत शेतीचे व मत्स्य व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर राजस्थानमध्ये 2006 साली आलेला भयंकर पूर, मुंबईतला 2005चा महापूर, 2008चा व 2015चा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट, वादळ यामुळे शेतीवर विपरीत पारिणाम होत आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग' या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील तापमानात वाढ, कधी थंडी कमी, तर मोसमी पावसाला तीन-चार महिन्यांचा खंड पडत आहे. त्यामुळे शेतीतील विविध पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे.

हवामान आधरित शेती विकसित करणे गरजेचे

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय आज संकटात सापडला आहे. या व्यवसायाची संपूर्ण मंदार पावसावर अवलंबून आहे. संभाव्य काळातील संकटे लक्षात घेऊ न शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर शेती शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन हवामान आधारित पूरक जाती विकसित केल्या पाहिजेत. सरकारने त्यासाठी हवामान आधारित कृषी धोरण आखले पाहिजे.

शेतकऱ्यांनी, भविष्यातील हवामानाशी सुसंगत उपाययोजनांचा आणि तंत्रज्ञानाचा शोध घेऊ न त्याकडे वळण्याची गरज आहे. नेट हाउस क्षेत्रातील काही कंपन्यांनी गारा तयार होऊ  न देणारे यंत्र विकसित केले आहे. यंत्रामुळे गारा, हिमवर्षाव आदींपासून पिकांचे संरक्षण करता येते, मात्र बर्फाच्या गोळयांचे ओझे सहन करण्याची ताकद, क्षमता असलेले नेट वापरावे लागेल. स्थानिक, भौगोलिक हवामान, परिस्थिती लक्षात घेऊ न त्या पध्दतीच्या नेट हाउसचा अभियांत्रिकी आराखडा वा संरचना तयार करणे गरजेचे आहे.

विकास पांढरे,9970452767




रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

नांदी कृषी उन्नतीची

 



२० सप्टेंबर २०२० हा दिवस भारतीय कृषी इतिहासातला महत्त्वाचा दिवस ठरला. या दिवशी मोदी सरकारने शेती संदर्भातील तीन विधेयक मंजूर करून घेतली. देश स्वयंपूर्ण होण्यासाठी, देशातील कृषी उत्पादनांना ‘न्याय’ बाजारभाव मिळाला पाहिजे या हेतूने पारित झालेले हे विधेयके कृषी उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारी आहेत.

आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शेती आाणि शेतकर्‍यांकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही, हे वास्तव आहे. अविकसित स्वरूपातील बाजार व्यवस्था, दळणवळणाच्या अपुर्‍या सोयी या कारणाने शेतीमधील पारंपारिक दृष्टीकोन बदलला नाही. शेतीला व्यापारी स्वरूप दिले नाही. त्यामुळे शेती आणि शेतकरी मागास राहिला परिणामी देश सशक्त, समर्थ होऊ शकला नाही.


डॉ.रवींद्र दोशी यांचा ‘अर्थसंवाद’या त्रैमासिकाच्या २००४ च्या ‘सहकार शतक महोत्सव’ विशेषांकात  ‘भारतातील सहकारी विपणन : सद्यःस्थिती आणि भविष्यातील वाटचाल’ यासंबंधी अभ्यासपूर्ण लेख आहे. दोशी यांनी विपणन व्यवस्थेतील दोष आणि उणीवा यावर बोट ठेवत काही उपाय देखील सांगितले आहेत. ते म्हणतात,

'‘भारतातील सध्याची सहकारी विपणन व्यवस्था उत्पादक शेतकर्‍यांना विपणन सेवा पुरविण्याच्या बाबतीत दुर्बल, अकार्यदक्ष आणि परिणामशून्य आहे. याबद्दल दुमत असू नये. असे असले तरी या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होता कामा नये अथवा तिला एकदम खुल्या स्पर्धेच्या तोंडाशी देऊनही चालणार नाही. सहकारी विपणन संस्था ही व्यवस्था भारताच्या कृषी क्षेत्रात दीर्घकाल अस्तित्वात असून आजही तिच्यासाठी अधिक चांगली पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. नव्याने एखादी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा अव्यापारेषु व्यापार करण्याऐवजी याच प्रस्थापित व्यवस्थेत नवा जीव ओतून तिलाच पूर्णतया सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणे कमी कष्टाचे होईल. आपल्याला गरज आहे ती मोठ्या आकाराची, शेतीमालांच्या विपणनाच्या विविध गरजा भागविणारी आणि शेतीमालाच्या विपणनाकरिता नवीन अधिक शास्त्रशुद्ध वित्तीय, व्यवस्थापकीय आणि विपनविषयक पद्धतीचा अनुभव करणारी सहकारी विपणन व्यवस्थेच्या नव रचनेची, त्यासाठी सर्व संंबंधितांनी कंबर कसली पाहिजे.’’

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी देखील भारतीय शेती कायदे आणि धोरणांसंबंधी विचार मांडलेले आहेत. ते एका लेखात म्हणतात," काही देशांनी शेती आधारित नियोजन केल्यामुळे त्या देशातील सकल उत्पादन वाढीचा दर सातत्याने १० टक्यांच्या आसपास राहिला आहे. आपल्यालाही शेती आधारित नियोजन व्यवस्था करण्याकरिता इतर देशांकडे पाहण्याची गरज आहे."  काही शेती कायद्यात बदल करून हे साध्य होईल, असा  त्या लेखाचा सार आहे.

जागतिकीकरण, मुख्य अर्थव्यवस्था व गॅट करार यामुळे भारतीय कृषी क्षेत्रात अनेक बदल होताहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी कृषी धोरणे व शेतमालाच्या विक्रीचे व्यवस्थापन बघणार्‍या कृषी बाजार समिती कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज होती. बाजार समित्यांची मक्तेतदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने २००६ साली मॉडेल अ‍ॅक्ट आणला होता पण अमंलबजाणी रखडली गेली होती. 

देशात मदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मॉडेल अ‍ॅक्टला गती मिळाली. देशातील कृषी विपणन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शेती सुधारण्यासाठी योग्य उचलायला सुरूवात केली. शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने आणि देशाच्या भविष्याचा विचार करताना नव्या परिवर्तनाची गरज होती. त्यासाठी शेतीविषयक कायद्यात सुधारणा आवश्यक होत्या. परवा मोदी सरकारने बाजार समिती नियमन मुक्ती, करार/कंत्राटी शेती आणि आवश्यक वस्तुचा कायदा असे तीन विधेयक पारित केली. या विधयेकाच्या अध्यादेशाचा नीट अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, हे तिन्हींही विधेयके कायदेशीर सुधारणा, प्रत्यक्ष विपणन व्यवस्था आणि बाजारांची आधारभूत संरचना या सूत्रावर आधारलेली आहेत असे स्पष्ट होते.

शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देणे, नवीन पर्याय उभे करणे, विक्रीचे मुक्त स्वातंत्र्य बहाल करणे, असे काही अध्यादेशाचे मुख्य उद्दिष्टे आहेत. या अध्यादेशामुळे बाजार समित्या व सर्व बाजार घटकांच्या हिताला कोणतीही हानी पोहोचणार नाही याचाही विचार केला गेला आहे. मोदी सराकरपुढे पारंपारिक बाजार पध्दतीमध्ये बदल करणे हे काम सोपे नव्हते पण उदारीकरण व जागितकीकरणावर भर देणार्‍या अर्थव्यवस्थेत बाजार समितीने नवे बदल, नवे प्रवाह आत्मसात करण्यासाठी अशा विधेयकाची नितांत गरज होती.

 कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयकात ‘एक देश, एक कृषी बाजारपेठ’ ही संकल्पना अंतर्भूत आहे. एपीएमसी बाजार समितीबाहेर अतिरिक्त व्यापार संधी निर्माण झाली आहे त्यामुळे आता शेतकर्‍यांची दलालाच्या माध्यमातून होणारी लूट थांबणार असून, शेतकर्‍याला आपल्या मालाची कुठेही विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी शेतकर्‍याला कसलाही कर भरावा लागणार नाही. 


आज संपूर्ण जग ही एक मोठी बाजारपेठ बनली असून, व्यापारी व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहेत. व्यापार वाढविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. बहुतेक सर्व देशांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आपल्या देशाचा जागतिक व्यापार वाढविण्यासाठी ह्या विधेयकामुळे आता मोठा फायदा होणार आहे.

जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयकात अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नधान्य, कांदा, बटाटा तेल यासारख्या वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत राहणार नाहीत. त्यामुळे शेतकर्‍याला आपला त्याला हवे तसे कोणत्याही बाजारपेठेत विकण्याची मूभा देण्यात आली आहे.

या विधेयकामुळे शेतीमालाला आता नवे दिवस येणार आहेत. त्यासाठी देशातील शेतीमालाचे उत्पादन, उपलब्धता व किंमती याबाबत सरकारने योग्य पावले उचलली पाहिजेत. 

शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयकात शेतकरी आणि खरेदीदार यांना थेट करार करण्याची संधी मिळाली आहे. कमीत कमी एक हंगाम आणि जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी शेतकर्‍याला ग्राहकाशी आपला शेतमाल विकण्यासाठी थेट करार करता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. करार शेतीच्या उपयुक्तेविषयी माझ्या मनात शंका आहे. या पध्दतीचा भारतामध्ये तिचा व्हावा तसा प्रचार व प्रसार झाला नाही. यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. ज्या शेतकर्‍याकडे अधिक जमीन आहे त्याला करार तत्वांवर शेती करण्याची गरज भासत नाही पण अल्पभूधारक शेतकर्‍याला त्याच्या मालकी हक्क नाहीसा होईल, अशी भीती वाटते. खरेतर करार शेतीमुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेमध्ये ही पद्धत आर्थिक सामर्थ्यावर निश्चितच टिकेल आणि देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नही वाढेल. त्यामुळे या पध्दतीचा जास्तीत प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.


अध्यादेशाबाबत विविध मतमतांतरे, दावे आहेत.  त्यासाठी योग्य विश्लेषणाची गरज आहे. तीनही विधेयकाचे काही शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे तर कॉग्रेस, राष्ट्रवादीसह डाव्या संघटनांनी विरोध दर्शवला आहे.  पंजाब -हरियाणात आंदोलन करण्यात आले. खरेतर, ज्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढले ते या अध्यादेशाकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतायेत. या विधेयकामुळे शेतकर्‍यांचे शोषण होईल, असा त्यांचा आरोप आहे. आता अशा विरोधकांचे दुखणे सजग शेतकर्‍याला चांगलेच अवगत झाले आहे. या विधेयकामुळे उद्योगपतींना फायदा होणार असेल?  शेतकर्‍यांचे शोषण होणार असेल तर केंद्र सरकारने जरूर विचार करावा.

 या विधेयकांची अमंलजवाणी होत जाईल तसतसा शेती, शेतकर्‍यांचा विकास होत जाणार आहे. कारण विधेयकाचे यश अमंलबजाणीवर अवलंबून आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक तिथे आर्थिक मदत करणे, गावांगावामध्ये शेती सहकारी समिती निर्मिती करणे, ज्यामुळे शेतीला संगठित व्यवसाय स्वरूप प्राप्त होईल, मालाची एकत्रिकरण करून विकण्याची व्यवस्था करणे, निर्यात व्यवस्था करणे, लहान शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान व विपणन क्षेत्राशी प्रत्यक्ष जोडण्याचा प्रयत्न करून अशा शेतकर्‍यांसाठी कृषी व्यापार केंद्र सुरू करणे, हमीभाव, ई नाम प्रणालीचा प्रभावी अमंलबजाणी करणे अशा स्वरूपाची यंत्रणा सरकारला उभी करावी लागणार आहे.


आज भारतीय शेतीपुढे ज्या काही समस्या आहेत. त्यातील काही समस्यांचे उत्तर या विधेयकांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निश्चित करतील, पुढील काळात अशीच शेती धोरणे राबवून शेतीची दुर्दशा थांबली जावीत आणि शेतकर्‍यांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे, सन्मानाचे दिवस येतील अशी आशा बाळगूया.

विकास पांढरे, ९९७०४५२७६७

(प्रस्तुत लेखक सा.विवेकचे उपसंपादक आहेत)

शनिवार, २१ मार्च, २०२०

'प्लेग ते कोरोनापर्यंतचा प्रवास'


काही वर्षीपूर्वी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हाँकींग यांनी सांगितले होते, ‘‘मानवजातीसह जीवसृष्टीला शंभर वर्षांपेक्षा जास्त भवितव्य आहे असे वाटत नाही.’’

एका मुलाखतीत बिल गेट्स म्हणतात, "रोगराई मुख्यत्वे साथीचे रोग. पोलिओ, मलेरिया, एचआयव्ही, क्षयरोग इत्यादी सारखे असे रोग ज्यांना आम्ही समूळ घालविले आहे किंवा निंयत्रणात आणले आहे. त्यांना शुन्यवत करण्यासाठी दृढसंकल्प केला पाहिजे जोवर त्यावर आम्ही पूर्ण नियंत्रण प्राप्त करत नाही."

ही त्यांना वाटणारी चिंता म्हणजे जगातील विचारशील माणसाची अस्वस्थ अभिव्यक्ती होती.

विज्ञानाने मानवी जीवन सुखी आणि आनंदी बनवले आहे तसेच मानवासमोर आव्हाने देखील निर्माण केले आहेत. एड्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू यासारखे आजार वैद्यकशास्त्रासमोर आव्हान बनून उभे आहेत.
आज कोरोना’  या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला भयभयीत करून टाकले आहे. चीनमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा रोग आता जगभरातील दीडशेहून अधिक देशात पसरला आहे. विषाणूजन्य रोगामुळे भारतालाही फटका बसला आहे. देशात शंभरहून अधिक नागरिक या रोगाने बांधित झाले आहे. महाराष्ट्रात पुणे शहरात सर्वांधिक संख्या आढळून आली आहे. याबाबत केेद्र व राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. या रोगामुळे जागतिक अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे.  चालू आर्थिक वर्षाच्या या शेवटच्या तिमाहीत जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोसळेल अशी भीती ओईसीडीने (आर्थिक सहयोग व विकास संघटना) व्यक्त केली आहे.'

कोरोना हा रोग चीनमधून आला आहे म्हणून अमेरिका व इतर राष्ट्रे चीनला दोषी ठरवत आहेत, चीन हा तसा धूर्त आणि लबाड देश म्हणून ओळखला जातो. असो, आपला देश आजाराने ग्रस्त असावा,असं कोणत्याही देशाला वाटत नाही, तसे चीनलाही वाटत नसावे. आरोग्याच्या बाबतीत हा देश तसा सजग समजला जातो.

 सन १९४५ मध्ये झालेल्या परिसंवादात प्रथम ब्राजील आणि चीनच्या प्रतिनिधींनी युनोत आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना स्थापन करावी असा विचार मांडला होता. त्यानंतर १९४८ साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली.

हा सर्व इतिहास अभ्यासताना माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले. चीनवर अशी कोणती आपत्ती कोसळली होती, जेणेकरून चीनला आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा वाटला, हा शोध घेता घेता प्लेग ते कोरोनापर्यंतचा इतिहास जाणून घेता आला.

जागतिक पटलावर गेल्या २० वर्षांमध्ये एक प्रबळ महासत्ता म्हणून चीनचा उदय झाला आहे.  आर्थिक महासत्तेबरोबरच सामरिक महासत्ता बनण्याच्या दिशेनेही चीनने दमदार पावले टाकली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर या देशाने जगाची बाजारपेठ काबीज केली आहे. चीनच्या मॉडेलचे अनुकरण करण्याचा अनेक देशांना मोह अवरला नाही. सध्या हा देश 'कोरोना आणि बर्ड फ्लूने' ग्रस्त आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

आता आपण माहिती करून घेऊया अशाच काही महाभयंकर साथीच्या आजारांबद्दल...

प्लेग, देवी, पटकी, टायफॉईड, डेंग्यू, पोलिओ,एड्स आशा विविध साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला चितेंत टाकले होते. यातील प्लेग आणि देवी या दोन रोगांवर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. १९७५ साली देवी रोगाचा भारतात रूग्ण आढळला होता. २००१ सालानंतर दूषित पाणी पिण्याने होणारा नारू हा रोग सापडलेला नाही. मार्च २०१४साली जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे.आता एड्स, चिकुनगुनिया आदी साथी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

‘प्लेग’ हा रोग ऐकताना आणि वाचताना अंगावर काटा उभा राहतो. युरोप खंडात तिसर्‍या शतकापासून या साथीचा डंका वाजत आला आहे. जगाच्या इतिहासात या रोगामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. १८९० पर्यंत आपल्या भारतात या रोगाचा शिरकाव झाला नव्हता. १८५५मध्ये चीनमध्ये सुरू झालेली प्लेगची साथ सर्वांत मोठी समजली जाते. ती सुमारे आठ वर्षे चालली आणि त्यात सुमारे एक कोटी नागरिकांचा जीव गेला. चीनमध्ये आलेली ही साथ भारतभर पसरली. या रोगाने युरोपमध्ये २५ टक्के जनता दगावली,  १८६४मध्ये वर्षभरात पाऊणलाख रुग्णांचा जीव गेला.

 पुण्यात प्लेगची साथ १८९७ मध्ये पसरली होती. त्यात असंख्य रूग्णांचा जीव गेला. संपूर्ण पुण्यात जीवघेणी साथ पसरल्यानंतर ब्रिटिशांनी १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू केला. 
( कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महामारी रोग कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे.COVID-१९ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी संशयितांवर पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने आदेश दिला आहे.)
पुण्यातील कॅन्टोनमेंट क्षेत्र आणि उपनगरातील उंदीर नष्ट करण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वाँल्टर चार्ल्स रँडने लष्कराची मदत घेतली. इंग्रज जवान घरात जबरदस्तीने फवारणी करून घेऊ लागले. आरोग्याच्या दृष्टिने ही जबरदस्ती योग्य वाटत असली तरी, दुसरीकडे फवारणीच्या नावाखाली इंग्रज घरातील संपत्ती लुटत, आयाबहिणीच्या अब्रुवर हात घालत असे अनेक पुरावे इतिहासात आढळतात. 

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून इंग्रजांच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे’ हा अग्रलेख याच संदर्भातला आहे.. पुढे काय झाले ? हे तुम्हाला माहितच आहे. रँडच्या जुलमी कारभाराचा बदला चाफेकर बंधूंनी घेतला.

सामाजिक, शैक्षणिक कार्यात हिरहिरीने सहभागी असणार्‍या सावित्रीबाई फुले यांना प्लेगपीडितांचे हाल पहावले नाहीत. त्यासाठी त्यांनी पीडितांसाठी पुणे शहराजवळ असलेल्या ससाणे यांच्या शेतात दवाखाना सुरू केला. स्वतः सावित्रीबाई फुले यांनी पीडितांची सेवा केली, एवढेच नव्हेतर पीडितांग्रस्तांच्या कुटुंंबांना धीर देण्यासाठी घरोघरी जात. ही सेवा करता करता सावित्रीबाईंनाच प्लेगची लागण झाली यात त्यांचा अंत झाला. समाजाची सेवा करताना सावित्रीबाईंना एकप्रकारे वीरमरणच आले.

९०चे दशक. महाराष्ट्रात १२ आँगस्ट १९९४ साली बीड जिल्ह्यातील मामला गावात प्लेगचा रुग्ण सापडला होता. तत्कालीन सचिव एन.रघुनाथ यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या ८१ होती. त्यात मामला गावात ४७ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली होती. याचकाळात शेजारच्या गुजरात राज्यात असे रूग्ण आढळून आले होते.

‘डेंग्यू’ हा चीनमधून शिरकाव झालेला हा विषाणू जन्य आजार आहे. हा आजार प्रथम चीनमधील ‘जीन’ या राजवंशात आढळून आला. इतिहासाच्या दप्तरात १७ व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे सापडतात इ.सन १७७९आणि १७८०मध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आले.  या आजारामुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या खंडांत मोठी जीवित हानी झाली होती. हा आजार जगभरातील १०० हून अधिक देशात पसरला आहे.

भारतात १९६३ साली कोलकाता येथे डेंग्यूची पहिली मोठी साथ आली होती. त्यानंतर संपूर्ण देशात या रोगाचा प्रादुर्भाव झाला. चार वर्षांपूर्वी आपला महाराष्ट्र डेंग्यूंचा विळख्खात सापडला होता. हजारोहून अधिक नागरिक डेंग्यूने ग्रसले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात डेंग्यूचे १९०दशलक्ष रुग्ण आहेत, त्यापैकी ९६ दशलक्ष रुग्णांना उपचारांची आवश्यकता आहे. आपल्या भारत देशात डासांची पैदास रोखण्यासाठी योग्य ते उपाय न केल्यामुळे दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २५टक्क्यांनी वाढ होते, अशी आकडेवारी सांगते.

‘स्वाइन फ्लू’  ह्या रोगाचा मुद्दामहून उल्लेख करत आहे, रोग तसा अमेरिकेतून आला आहे.  २००९साली भारतात या रोगाने हाहाकार माजवला होता. पुणे व मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने या रोगाने ग्रसले होते.

चीन हा जगात डुकराच्या मांसाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावरचा देश आहे. सन २०१८साली या देशात आफ्रिकन स्वाइन ताप पसरण्याच्या भीतीने १४५०० डुकरांची कत्तल करण्यात आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये चीनमध्ये आफ्रिकन स्वाइन तापाचा रुग्ण सापडला होता तेव्हापासून चीनमधील अनेक शहरांत डुकरांमध्ये हा विषाणू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी संसर्ग झालेले पशुधन व डुकरे नष्ट करणे हा एकमेव मार्ग असतो. चीन सरकारने ही काळजी घेत निर्जन जागी डुकरांची कत्तल केल्या आहेत,

तात्पर्य असे की, चीन हा आपला शेजारच्या देश आहे, त्यामुळे इथून कोणत्याही हा रोग आपल्याकडे शिरकाव करू शकतो.

‘नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल’ मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या माहितीनुसार १ डिसेंबर २०१९पर्यंत महाराष्ट्रात २ हजार २७९रूग्णांना स्वाइन फ्लूवर उपचार करण्यात आले . त्यापैंकी  २४२रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर राजस्थान २०८आणि मध्य प्रदेश मध्ये १६५ रूग्ण स्वाइन फ्लूने दगावली गेल्याची माहिती आहे.  १जानेवारी ते १डिसेंबर २०१९ दरम्यान पुणे शहरात १७५रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती.

‘बर्ड फ्लू’ हा चीनमधून प्रादुर्भाव झालेला रोग आहे. हा रोग प्रथम चीनी बदकांमध्ये आला आणि त्यानंतर कोंबड्यांना याची लागण झाली. २००३-०४ साली चीनमध्ये या रोगाने थैमान घातले होते. बाधित पक्ष्याचे विषाणू मानवाच्या शरीरात जात असल्यामुळे असंख्य नागरिक या रोगांने ग्रस्त झाले होते. या रोगांमुळे भारतातला पोल्ट्री व्यवसाय कोलमोडून पडला होता. लाखो कोंबड्यांना ठार मारण्यात आले होते. आजची परिस्थिती लक्षात घेता भारतातील  छोट्या-मोठ्या पोल्ट्री धारक व्यावसायिकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या १ फेब्रुवारी २०२० च्या बातमीनुसार, हुनान प्रांतामधील शायोयांग शहरातील एका पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लूची लागण झाल्याची चीनच्या कृषी व ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. फार्ममधील ७८५०कोंबड्यांपैकी ४५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून तसेच बर्ड फ्लूमुळे एकूण १७हजार ८२८ प्रांण्याना ठार करण्यात आले, अशी बातमी आहे.

सध्या जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे वायू प्रदूषण. जर्मनीतील मेन्झ येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे प्रमुख लेखक जोस लेलीवेल्ड यांच्या मते, "वायू प्रदूषणाचा एक (साथीचा रोग) सर्वत्र जगभरात जगण्याचे प्रमाण तीन वर्षांनी कमी होते आणि यामुळे दरवर्षी ८.दशलक्ष लोक अकाली मृत्यू होतात."पुढे म्हणतात, सर्वाधिक फटका बसणारा भाग आशिया आहे, जिथे सरासरी आयुष्यमान चीनमध्ये १.२ वर्षे, भारतात ९.९ वर्षे आणि पाकिस्तानमध्ये ८वर्षे कमी होते.

२०१४ सालच्या सुमारास मुंबईत दररोज सरासरी वीसजणांचा टीबीने मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने प्रसिध्द केला होता. टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूची मुंबई ही भविष्यात राजधानी होईल, असा निष्कर्षही या संस्थेने काढला होता.

या जगात असे अनेक आजार आहेत जे ऐकूनही आपल्याला आश्‍चर्य वाटेल. ते आपल्या सामन्य आजारांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यावरचे उपाय देखील. 

 कोरोना' आजारातून संपूर्ण जगाची सुटका होण्यासाठी  प्रार्थना करूया.
सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय

©विकास पांढरे

संपर्क :-९९७०४५२७६७
संदर्भ माहिती : आंतरजालावरून 

(तळटीप - मी आरोग्य क्षेत्रातील जाणकार नाही. अथवा इतिहास अभ्यासक देखील नाही. त्यामुळे वरील उपलब्ध माहिती, आकडेवारीमध्ये चुका झाल्या असतील तर क्षमा असावी.)

मंगळवार, १० मार्च, २०२०

माझ्या जन्माची कहाणी - भाग 3


तो दिवस आजही मला स्पष्टपणे आठवतोय. त्या दिवशी घरात एक नवीनच असा प्रसंग घडत होता. तो आमच्या वाट्याला कधीही असा आला नव्हता.. त्या प्रसंगाने आई आणि नानाच्या चेहर्‍यावर ‘हसू आणि अश्रू’ हे दोन्ही भाव दाटून आले होते. घरातला एक आर्थिक कोपरा ढासळू पाहत होता. नाना पहिल्यांदाच घरात असं येरझार्‍या मारत होता... नानाच्या पायाला पाणी सुटलं होतं..घराच्या भिंती ओल्या झाल्या होत्या. सारखं ट्रगतलं कागद शोधत होता.. त्या ट्रगतले छोटे छोटे कागद काढत होता.. पण एक कागद सापडत नव्हता म्हणून आतून चिडत होता..
त्या कागदाच्या माध्यमातून आपण घरातली एक मौल्यवान वस्तू विकतोय या विचारानं नाना एकदम बैचेन झाला होता.. या सगळ्या प्रसंगामुळे आमच्या रोजच्या जगण्यातले क्षण विखुरले गेले होते.. त्याला कारण ही मीच होतो..
****

माझ्यामुळे आई आणि नानाला खूप वनवास सोसावा लागला. मी लुळा होऊन पडलो होतो.. माझा इलाज व्हावा म्हणून नाना रोज एका दवाखान्यात जात होता.. आठवड्यातून तीन-चार वेळा सोलापूरला नाना मला घेऊन जात असे.. डॉक्टर माझी नाडी बघत, आणि पैसे उकळत.. हे रोजच होत चाललं होतं.. माझ्यात कसलाही फरक जाणवत नव्हता. ‘आपलं पोरगं आज ना, उद्या तुरूतुरू चालेल, उठेल!’ या आशेने नाना दवाखान्याला पाण्यासारखा पैसा ओतत होता..

डॉक्टर म्हणायचे, ‘मुलगा बरा व्हायचा असेल तर त्याच्या पायाचे ऑपरेशन केलं पाहिजे. त्यासाठी दहा-पंधरा हजार रूपये लागतील..’ 

डॉक्टराचे म्हणणे ऐकून नानाची कंबर बसली होती. एवढे पैसे आणायचे कुठून? शेतीचा काही आधार नव्हता..ना कुठल्या रोजगाराचा.. ना घरात कुणी कमावत.. पै-पाहुणे ही मदतीला धावून येतील अशी त्यांची ही परिस्थिती नव्हती.. आता काय करावे? या विचाराने नाना अधिकच चिंतेत पडला होता.

दुपार झाली होती.. माथ्यावर आलेला सूर्य अधिकच चटका देत होता..दावणीला बांधलेली जनावरं हंबरंडा फोडायला लागली होती. जनावरांना चारापाणी करून येतो, म्हणून नाना, शेताकडे गेला.. जनावरांना लवणाला पाणी पाजून, त्यांना चिंचेच्या झाडाखाली बांधली. नानाच यात कशातच मन लागत नव्हतं. शेवटी घराकडं घासभर खाऊन येण्यापेक्षा आंब्याच्या झाडाखाली येऊन बसला.

दिवस मावळतीला आला.. रानात चरायला गेलेली गुरे-ढोरे गावाच्या दिशेने निघाली होती.. नाना मात्र माझ्याच विचारात गुंग होता. या विचाराच्या तंद्रीने नानाला अस्वस्थ करून टाकलं होतं.

गावातल्या सावकाराला एकरभर शेत विकायचं आणि माझं ऑपरेशन करायचं! असं नानाच्या मनात घोळू लागलं. पदारात चार लेकरं आहेत.. पुढं त्याचं कसं व्हायचं?  शेवटी काही तरी केलेच पाहिजेच ना.. हा इचार सतत नानाला भेडसावत होता.

आपली 'शेतीमाय' इकायची नाही, असं  दुसरं मन ही नानाला सावरत होतं. मागचा-पुढचा इचार करत नाना मोठ्या कष्ठानं घेतलेलं दुर्गाच्या (नळदुर्ग) तुळजाभवानी साखर कारखान्याचं ‘शेअर्स’ विकायचं मनात ठरवलं. नानाला हा इचार पटला हेाता. यातून आपलं काही मोठं आर्थिक नुकसान होणार नाही. असे मनोमनी नानाला पटले. यामुळे नानाला मोठा धीर आला होता.

सांज झाल्यावर नाना घराकडं आला.. आई चुली समोर बसून काठवटीत भाकरी थापत होती. ती कोरडं पिठं पसरून दोन्ही हात काठवटीत गोल गोल फिरवत बडबड करत होती.

कवा आलावं? ‘कायबी करा माझं पोरंग चांगलं करा...’
नानाचा चेहरा हळवा झाला होता..  ‘माझ्या चितेला अग्नि देती का आता?’  ‘मला काय समजत नाय? रानात गेलो तर,तिथं मन लागतं नाय? माळावर जनावरं राखायला घेऊन गेलो की तिथं बी करमत नाय?’   ‘पोराचं कसं होईल? हाच इचार मनाला सतावत हाय?’ 
नाना गहिवरून म्हणाला..

नानाचं आणि आईचं थोडं ‘तू तू मैं मैं झाली..’

मी कारखान्याचं शेअर्स इकायचं ठरवलंय?  गावात कुणी शेअर्स घेतं का बघून येतो. नानाच्या मनाच्या मोठेपणाचं आईला कौतुक वाटलं. आपल्या पोराच्या सुखासाठी बापाचं काळीज सुपाएवढं झालेलं पाहून आईला मनोमन आनंद झाला होता.
***

नानाला, ना दारूचे व्यसन होते ना, कसल्या विकाराचे..पण माझ्यामुळे नानाला चितेंच्या विकाराने ग्रासले होते. आपण शेअर्स विकतोय? यात कोणी फसवणुक करू नये? यासाठी सल्लामसलत म्हणून जाणत्या माणसाकडे जाऊन विचारपूस केली. आपण 'शेअर्स' विकतोय कारणामुळे नानांनी पाच-सहा रात्री जागून काढल्या असतील.

नानाची अशी धावपळ सुरू झाली होती, दरम्यान एक दिवस आमच्या शेताच्या बाजूल्या असलेल्या एका कारखान्याच्या मालकाला आमच्या घरची होणारी तारांबळ लक्षात आली. नानाची आणि त्या मालकाची अगोदरपासून ओळख होती. दुपारच्या वेळेस त्या मालकांनी नानाला ऑफिसमध्ये बोलवून घेेतले. मालकांनी माझ्या पायाची विचारपूस केली. त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल निश्‍चित राहा, असं बोलून,  मालकांनी नानाला धीर दिला.

मालकाच्या धीराच्या बोलण्याने नानालाही थोडं बरं वाटलं. 
दत्तोबा, ‘तुमची परिस्थिती लक्षात घेता मी शेअर्स घ्यायला तयार आहे.’, असं मालक म्हणाला.

 नानाला, शेअर्स विकतोय? हे मालकाला कोणी सांगितलं? याचा थांगपत्ता लागला नाही. आपल्या संकटात, देवच आपल्यासाठी धावून आला. या विचाराने नानांनी मालकाला शेअर्स विकत असल्याचा होकार दिला.

‘सध्याची शेअर्सची किंमत पाहता मी दहा हजार रूपये द्यायला तयार आहे.’, असं तो मालक म्हणाला.
नानाला ही रक्कम कमी वाटली.

‘मालक दहा हजार रूपयांत पोराचं ऑपरेशन कसं होणार? सोलापूरचे डॉक्टर म्हणतायेत,  ऑपरेशनसाठी कमीतकमी पंधरा हजार रूपये लागतील.’ असं नाना मालकाला म्हणाला.

मालक म्हणाला, दत्तोबा, ‘तुम्हाला एवढे पैसे कोणी देणार नाही. तुमची नड पाहून मी तुम्हाला जास्तीचे पैसे देतोय. त्यापुढे मला जास्त किंमत देता येणार नाही.’

नाना या गोष्टीला तयार होत नव्हता. त्यासाठी मालकानी नानाला आपल्या स्वतःच्या कारने सोलापूरला घेऊन गेला. नानाला माझ्या पायाच्या ऑपरेशनसाठी ओळखीच्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचे आश्‍वासने दिले. त्यामुळे नानाला थोडा धीर आला.
नानाचा बदलेला मूड लक्षात येताच मालकाने एक संधी साधली.

दत्तोबा, ‘‘शेअर्स विकून काय होणार नाही. तुझं साळीचं तुकडं मला विक..पाच-पन्नास हजार सहज देईन. तुझी, यातून सहज गरज भागेल.. शिवाय शिल्लक राहिलेल्या पैशातून घरासाठी काही करता येईल?'’

नानाला मालकाचा हा 'भांडवली डाव' लक्षात आला. संकटात असलेल्या माणसाचा 'धुर्त माणसं' कसं फायदा उचलतात, हे नानाच्या लक्षात आले.

‘‘मालक आम्ही गरीब असलो, म्हणून काय झालं? आता आमची नड हाय,म्हणून कारखान्याचे शेअर्स इकतोय. कारखान्याकडून हा शेअर्स घेताना मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. डगमगलो नाही, मी खरा शेतकरी आहे. शेती आमची माय आहे. या मायेला तुमच्या स्वाधीन करणं माझ्या इचारत नाय. तुम्ही माझं शेअर्स विकत घ्या अथवा न घ्या. मला त्याची पर्वा नाय.. मी दुसरा चांगला माणूस शोधतो.. तो घेईल माझं शेअर्स..’’

नानांची ही खंबीरता लक्षात आल्यानंतर त्या मालकाने आपला विचार बदलला आणि शेअर्स घेण्यासाठी स्वतःहून नानांपुढे विणवणी करू लागला. नानाचा स्वभाव दिलेला शब्द पाळणारा होता. रितसर पध्दतीने नानांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले ‘शेअर्स’कवडीमोलाने त्या मालकाच्या घश्यात घातले.

नाना मनातल्या मनात पुटपुटत होता, कस काय? आपण या मालकाच्या साखळीत अडकलो हे कळलेच नाही? आयुष्यात 'परवड' झालेल्या माणसाला कोणकोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. हे ह्या प्रसंगावरून नानाच्या लक्षात आलं होतं.

माणसाला आपलं मिळालेलं आयुष्य गोड मानून 'तडजोड' करत जगता आलं पाहिजे, असं म्हणतं नानांनी त्या मालकासोबत ‘शेअर्स' बद्दलचा व्यवहार पूर्ण केला. आज त्या शेअर्सची किंमत 'लाखात' आहे, असं थोडं लक्षात आलं की मागचं सारं आठवतं राहतं.
(अपूर्ण )
विकास पांढरे -९९७०४५२७६७

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कष्टाची कमाई


स्व.मोहन धारिया यांच्या 'वनराई' संस्थेला भेट देण्याचा योग आला. दुपारची वेळ.. वातावरणात थंडी जाणवत होती.. वनराई बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या नाल्याच्या कोपऱ्यात चप्पल दुरुस्तीचे काम करीत असलेल्या महिलेवर नजर गेली. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातले हे दृश्य पाहून कुतूहल निर्माण झाले. चप्पल शिवणे हे खरे तर पुरूषांचे काम पण जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीही नाही हे या महिलेने दाखवून दिले आहे. मंजुषाताई कैलास रावखंडे असे या महिलेचे नाव आहे.
गोरा रंग, कपाळावर कुंकू, काळेभोर डोळे असलेल्या मंजुषाताईचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. मंजुषाताईंच्या घरात चप्पल शिवणे परंपरेने चालत आले आहे. त्यामुळे घरातल्या माणसांकडून त्यांना या व्यवसायाची आवड निर्माण झाली. व्यवसायातील बारकावे त्यांना शिकता आले. यानिमित्ताने मंजुषाताईंची जीवनाची कहाणी थोडक्यात का होईना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मंजुषाताई सांगत होत्या.. "माझं शिक्षण सातवी पर्यंत झालं. पुढं शिकावं वाटत होतं पण तसं घडलं नाही!"
"आम्ही मुळचे सातारचे. मंगळवार पेठेत आमचं घर आहे." सासऱ्यानं पोटासाठी पुण्याची वाट धरली. पर्वती दर्शन शेजारी सासऱ्यानं घेतलेलं घर आहे आम्ही तिथेच राहतो.. नवरा ड्रायव्हर आहे. चपलाचा व्यवसाय करणे त्यांना जमलं नाही.. त्याला आजची परिस्थिती कारणीभूत आहे."

" पूर्वीसारखा आमचा व्यवसाय राहिला नाही. गावाकडं बलुतं मिळायचं! आता कुठंय आलंय बलुतं-फलुतं? नव्या यंत्रानं तर आमचं जीणचं मुश्किल केलयं."
"मी धीटपणे उभी राहिली! हातात चप्पल शिवायला घेतली.. लाज कसली यात? घरातली चूल बंद झाली तर कोणी मदतीला येतं का? कष्टाची कमाई करायला लाजायचं कशाला?
मंजुषाताई मनातून बोलत होत्या.. मी ही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो.
(नुसत्या 'चांभार चौकशा'करत नव्हतो! 😊)
"गेल्या पंधरा वर्षांपासून मी इमानेइतबारे हा व्यवसाय करतीय, सरकारच्या मदतीने टपरी मिळालीय. मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. थोरला मुलगा विरेन एमसीए झालाय. तो नोकरीच्या शोधात आहे. धाकटा दहावी शिकलाय. तो टू व्हिलर गाड्यांना कव्हर बसवून देण्याचं काम करतोय. मुलगी दहावीत शिकत आहे."

"रोजच्या कामातून मला दोन-तीनशे रूपये मिळतात, मुलांचे शिक्षण, घरखर्च सांभाळणे कठीणच आहे. त्यात नवऱ्याला कधी काम मिळते कधी नाही! सासऱ्याने घेतलेलं घर आहे पण ते फारच छोटं आहे. बाहेरची चार माणसं आली तर अवघडच होतं. त्यासाठी स्वतःचं हक्काचं घर असावं! असं मला वाटतं.. मुलामुलींचे शिक्षण, लग्न, संसार यामुळे स्वतःचं घरं होईल की नाही हे सांगणं कठीणच आहे."
"आज आमची कला यांत्रिकीकरणामुळं हातून निसटून मोठमोठ्या व्यावसायिकांच्या हातात गेली आहे. त्यातून मूठभर लोकांनी संपत्तीचा डोंगर उभा केलाय, त्याचवेळी या कलेचा खरा मानकरी मात्र दारिद्रयाच्या अंधारात चाचपडत आहे."
मंजुषाताईचे शेवटचे बोल ऐकून अंगावर काटा उभा राहिला. कारण इतरांच्या पायांची काळजी घेणाऱ्या चर्मकाराचे आयुष्य आज यांत्रिकीकरणामुळे मातीत जाण्याची वेळ आली आहे. या समाजाला आज पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे समाजाचे, शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे.

पोटाच्या वीतभर खळग्यासाठी नाल्याच्या कडेला ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या कुटुंबाचा चरितार्थ पेलवत असणाऱ्या मंजुषाताई रावखंडे यांचे कार्य निश्चितच प्रंशसनीय आहे.
©विकास पांढरे, पुणे

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

शिवराय : शेाध आणि बोध




छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत. ज्यांनी राजकारण व समाजकारण यांची अतुलनीय सांगड घातली. द्रष्टेपणाने राज्यव्यवहार केला. राजे म्हणून जितके भावतात तेवढेच ते ‘लोक कल्याणकारी राजा’ म्हणून नावाजले जातात. या लोककल्याणकारी राजाच्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध प्रशांत बबनराव लवटे यांनी आपल्या   ‘पराक्रमापलीकडले शिवराय’या पुस्तकातून घेतला आहे. 


 मनुष्याच्या कुतहूलाचा, जिज्ञासेचा सर्वांत मोठा विषय मनुष्य हाच आहे. मनुष्याला जाणून घेणे आवडत असते. त्यातला त्यात धीरोदत्त नायकाला, महापुरूषाला अधिक जास्त जाणून घेणे ही एक दुर्दम जिज्ञासा असते. त्यातील एक नाव म्हणजे छ.शिवाजी महाराज. महाराजांचेे जीवन, त्यांचा पराक्रम व संपूर्ण चरित्र याविषयी विपुल साहित्य उपलब्ध असले, तरी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेता येणारे पुस्तक मोजकेच आहेत आणि हा विषय मोजक्या शब्दांत मांडणे तसे कठीणच आहे. हे कठीण काम प्रशांत लवटे यांनी  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक लिहून पूर्ण केले आहे.

प्रशांत लवटे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे. सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत ते कार्यरत आहेत. त्यांच्या जगण्यात व वागण्यात शिवरायांबद्दल ओतप्रोत प्रेम दिसून येते. ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, इतिहास संकलन करणे हा त्यांचा छंद. शिवाजी महाराजांचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून धडपडत असतात. त्याचेच एक मूर्त रूप म्हणजे  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे रूढार्थाने चरित्र पुस्तक नाही. यात  काळ, सनावळ्या नाहीत. काही ठिकाणी सालाचा उल्लेख येतो.

शिवराय हे आदर्श राज्याची रचना करून ते उत्तमप्रकारे चालवणारे प्रजाहित दक्ष राजे होते. राजे आपल्या बोलण्यातून, वागण्यातून रयतेवर वेगळी छाप पडत असत. आपल्या प्रत्येक मोहिमेची आखणी ते बारकाईने आणि अंतिम विजयाच्या दृष्टीने करत. याचा शोध आणि बोध लेखक प्रशांत लवटे यांनी घेतला आहे. 

१४२ पानांच्या या पुस्तकात शिवरायांचे वेगळेपण, विचारधारा, प्रेरणास्थळे, जडणघडण, नेतृत्व, चारित्र्य, कल्याणकारी राजे, शिवराय नक्की कोणाचे आदी लेखातून शिवरायांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.


शिवरायांचा व्यक्तिमत्वाचा / मनोव्यापरांचा सखोल अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण शिवरायांचे असामान्य व्यक्तिमत्व तपासणे, त्याचा शोध घेणे,  त्या उपयोगितेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून शिवरायांच्या जीवनाचे आकलन करणे तसे अवघड काम आहे. हे अवघड कार्य लेखकाने लिलया पार केले आहे. 

आपल्या प्रतिभेने शिवरायांचे अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात. यात कुठेही रंजकता आणत नाहीत शिवाय ऐतिहासिक वास्तव उलटेपालटे करून वाचकांला संभ्रम करणारे विधान ते करत नाहीत,याचे भान लेखकाने सांभाळले आहे.
व्यक्तिच्या जीवनात संस्काराची गरज असते. शिवरायांच्या कार्याची निर्मिती ही प्रामुख्याने पिता शहाजी आणि माता जिजाऊच्या संस्काराच्या आणि कार्याच्या प्रेरणेतून झाली आहे. त्यातून त्याचे व्यक्तिमत्व तयार झाले. वैचारिक दृष्टीने जडणघडण होत गेली. 

शिवरायांनी समाजासाठी केलेले कार्य व त्यांचे विचार आजच्या पिढीला, एक जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी, एक आदर्श समाज बनविण्यासाठी उपकारक ठरतील, असे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.

महाराजांचे व्यक्तिमत्व लेखक म्हणून मला किती भावले हे प्रत्ययकारी मांडताना दिसतात. त्या संदर्भात राजांच्या जीवनातील प्रसंगविशेषाचा उल्लेख करतात. या प्रसंगातून आपणाला काय शिकता येईल, त्या प्रसंगातून नवा अर्थ व्यक्त करताना दिसतात. म्हणजेच शिवरायांवर निष्ठा ठेवून आणि स्वतःचे आकलन मांडतात.
शिवरायांमधील समय सूचकता, असमान्य कल्पकता, द्रष्टेपणा आदी गुणांचा उल्लेख करून लेखकाने त्यावर विचार मांडले आहेत.   या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला प्रेरित करते आणि विविध व्यक्तिमत्व विकासाच्या गुणाचे आपल्यामध्ये बीजारोपण करते. 




तारूण्यातील जडणघडण’ या प्रकरणात आजची तरूणाची अवस्था कशी आहे यावर भाष्य केले आहे. ‘‘आजचा तरूण थोडे कोणतेही संकट आले की स्वतःची अवस्था भिजलेल्या मांजरासारखी करून घेतात. विचार करा शहाजीराजांना ज्यावेळी आदिलशहाने अटक केली आणि शिवरायांपुढे सर्व किल्ल्यांची मागणी केली त्यावेळी किती मोठे धर्मसंकट त्यांच्यापुढे उभे होते. एका बाजूला वडील आणि दुसर्‍या बाजूला उभे केलले छोटसं राज्य. राज्य वाचवावं तर वडिलांचा जीव धोक्यात आणि वडिलांचा जीव वाचवाा तर पूर्ण राज्य हातून निसटणार. परंतू, अजिबात न डगमगता आणि स्वतःचा समतोल योग्य पद्धतीन राखून योग्य ती राजकीय खेळी करून वडिलांना सोडवलेच ना?’’


शिवरायांच्या व्यवस्थापनाचे रहस्य काय ? संकटावर मात कशी करावी, संयम, चिकाटी, उच्च कार्यक्षमता आदी गुण शिवरायांमध्ये कसे सामावलेले होते आणि या गुणांचे आपण कसे अनुकरण करावे यावर लेखकाने मार्गदर्शन केलेले आहे.

शिवरायांचे वेगळेपण कशात आहे याविषयी लेखकाने खूप सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, ‘‘शिवरायांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मुळं उखडून टाकण्यासाठी नव्हता तर, अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य आहे पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती. ती पुन्हा उजेडात आणली ती शिवरायांनी.’’ 

आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने, कौशल्याने, चातुर्याने, साहसाने शिवराय हे युगप्रवर्तक ठरले. शिवरायांचा एक व्यापक विचार प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळतो. यामुळेच इतिहास अभ्यासकाची, विद्यार्थ्यांची आकलनशक्ती सशक्त करणारे हे मराठी ऐतहासिक साहित्यातील एक महत्वपूर्ण पुस्तक आहे यात शंका नाही.

आजपर्यंत शिवकाळावर विपूल लेखन झाले असले तरी स्वराज्याची खरी प्रेरणा ज्यांच्यापासून मिळाली, असे शहाजीराजे उपेक्षित राहिले अशी  खंत लेखकांनी व्यक्त केली आहे.

प्रशांत लवटे यांचा पुस्तक लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न खरोखर यशस्वी झाला आहे  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ या पुस्तकाला वाचकांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. शिवरायांचे वेगळेपण पुरेशा तागदीने समाजसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अवघ्या पंधरा महिन्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर वाचकांच्या हाती आली आहे. लेखक लवटे यांनी शिवरायांचा केलेला अभ्यास वाचकांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे. साधी सरळ भाषा, संशोधकवृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक सर्वांना आपलेसे करून टाकते आणि प्रत्येकांनी संग्रहीत ठेेवावे असे हे पुस्तक आहे. 
-विकास पांढरे, ९९७०४५२७६७ 

पराक्रमापलीकडले शिवराय
लेखक : प्रशांत बबनराव लवटे
प्रकाशक : प्रशांत बबनराव लवटे, ९८८१९५५१६१
पृष्ठ : १४२
 मूल्य :२००/-

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...