माणसाचं आयुष्य हा फार कुतूहलाचा विषय असतो, हे सत्यच आहे. कारण ज्या गोष्टींच्या मागे असलेल्या रहस्यांची उकल आजवर होऊ शकलेली नाही, अश्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटणे अगदी साहजिकच आहे. एखाद्या वस्तूच्या मागे काही रोचक कथा आहे असे कळल्यानंतर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते, जुन्या आठवणींचे गाठोडं डोळ्यांसमोरून जाता जात नाहीत. २६-२७वर्षांपूर्वीं घडलेली ही गोष्ट आहे.
एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला.आम्ही चौघेजण भावडं.दोन बहिणी,दोन भाऊ आणि मी शेंडेफळ. शेतकरी असलेले आमचे वडील म्हणजे नाना फारच कष्टाळू. नाना आणि आईचे कष्ट बघत,अनुभवत आम्ही मोठे झालो. हणम्या आणि नाग्याची शेतात नांगर मारणारी बैलजोडी होती. सात एकराच्या बरड जमिनीत जे पिकेल त्यात समाधान मानून आमचा सुखाचा संसार सुरू होता. पाच चुलते, चुलत भावडं एकाच वाड्यात गुण्यागोविंदाने राहत होतो, शेरडं, म्हशी, गायी, कुत्र्यांनी वाडा भरून जायचा. झाडलोट करायला बायांना दुपार व्हायची. शेतात गेल्यावर रम्य वाटायचं, पावसाळ्यात लवनातून पाणी झुळझुळ वाहतं असायचं, रानात साळीचं पिकं डोलत राहायचं, असे रम्य आणि मनोहर वातावरणाचा हेवा वाटायचा. सारं काही ठीक असताना माझ्या बाबतीत नियतीनं वेगळचं लिहीलं होतं.
***
पावसाळी दिवस होते... सतत कोसळणार्या पावसाने आमच्या घरात एक वादळ घेऊनच आलं,त्या पावसात माझा जन्म झाला.. त्या रात्री घरी कुणीच नव्हतं, आईनं सर्व कळा सोसून मला जन्म दिला. नव्याचे नऊ दिवस संपले होते. मी थोडा चालू लागलो होतो. धरती हिरवी शाल पांघरून पावसाची मजा लूटत होती.आमच्या घरातल्या माणसाच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
काय ओ?ऐकताय का? "राच्याला पोराचं अंग तापानं फणफणलं होतं. तरीबी सरकारी दवाखान्याल्या सिसटरीन बाईनं त्याला इंजेक्शन दिलं.तीन-चार वरसतल्या लेकरासनला इंजेक्शन करत नसत्यात म्हणं? तरीबी माझ्या पोराला तिनं इंजेक्शनचं डोस दिल. सवा,आंबा (माझे चुलत भावड-सविता आणि आंबा ऊर्फ अनिल) अन् गावतली पोरं बघा त्यासनी डोस देऊनही ठणठणीत हायती. माझचं पोरगंच का लुळ होऊन पडलयं?" अश्या आर्त स्वरात आई नानाला म्हणाली.
नाना खाली मान घालून विचार करत होता. अस काय झालं असावं? पोरगं लुळ होऊन का पडलंय? कुणाची चुक झाली? याचं उत्तर शोधत होता.
"गरीब माणूस हा नियतीच्या जात्यात भरडला जातो असं म्हणतात ते खरंच आहे. ह्या गरीबीमुळेचं ज्यांनी मला डोस दिला 'त्या'
सिसटरीन बाईला बोलण्याची हिंमत नानाकडं नव्हती. शेवटी जी गोष्ट घडून गेली तिचे परिणाम जाणवत असताना मग दाद कुणाकडे मागयची?
माझ्या कपाळावर हात ठेवत नाना म्हणाला,"माझ्या पोरानं कोणतं पाप केलंय की देवानं त्याला लुळ केलयं?" घर, शेत विकू अन् पोराला बरं करू", असा धीर देत नानांनी आईला शांत करण्याचा प्रयत्न केला.
कणगीच्या बाजूला माचोळी होती. तिथं पोतं टाकून मला झोपवण्यात आलं होतं. माझा डावा पाय पूर्णपणे लुळा होऊन पडला होता. पायातली संवेदना संपली होती. आमचा वाडा वेशीत असल्यानं गावातल्या आयाबाया मला बघायचा यायच्या. कुणी पायाला हात लावलं तरी जाणीव होत नसायची. ज्या त्या बाया माझ्या पायाला बघून डोळ्यातून पाणी काढायच्या. "पोराला दवाखान्यात दाखवा म्हणायच्या."
"काय ओ? तुमी दोन घास खा! अणदुर्याला सुभाष डॉक्टरकडं जावा. पोराला काय झालं इचारा."
"आई काळजीत नानाला बोलली."
नाना आईला होकार देत अणदूरला जायची तयारी करू लागला. नानाच्या खिश्यात पैशाची एक दमडी नव्हती. कोण हात उसणे पैसे द्यायला तयार होत नव्हतं. दुपार झाली होती. दिस माथ्यावर आला होता. नाना चितागत होऊन बसला होता. आईनं कुणाकडून तरी ३०रूपये आणले,तवा मग दवाखान्यात जाता आलं.
नानांनी मला उचलून खांद्यावर घेतलं. गावाच्या बसस्टॉपवर आलो, पण गाड्या थांबतच नव्हत्या. तासाभरानं एक गाडी थांबली. उमरग्याला जाणार्या माल ट्रकमध्ये बसून आम्ही अणदूरला आलो. अंगात मळकट शर्ट, दाढीचे खुंट वाढलेली, बारीक पांढरे केस, केविलवाणी डोळे, चेहर्यावरचा तणाव घेऊन डॉक्टर कस्तुरे ह्यांच्या समोर नाना उभा राहिला.
दत्ता, कसं काय आलास? असं डॉक्टर सुभाष कस्तुरे म्हणाले.
डॉक्टर कस्तुरे आणि नानांची अगोदरची ओळख होती.
आमच्या गावातले बरेच लोक उपचारासाठी कस्तुरे डॉक्टरकडं येत. त्यामुळं डॉक्टर कस्तुरे हे बर्याच जणांना नावानिशी ओळखत.
पोरगं, "कालच्यापासनं लुळं होऊन पडलंय, डावा पाय उचलतच नाय, दोन पाऊल चाललं तर लगीच खाली पडतं. आमचा जीव भांड्यात पडलाय. काय करावं कायबी कळत नाय. माझं पोरगं चालेल पाहिजे,डॉक्टर? कितीबी खर्च येऊ द्या अगुदर पोरगं नीट करा?". असं नाना केविलवाण्या स्वरात डॉक्टरला बोलू लागला.
कधीपासून पोराचा पाय लुळा झाला? डॉक्टर कस्तुरे ह्यांनी माझ्या पायाला हात लावत नानाला विचारलं.
नाना गप्प.
नानाला काय बोलावं कळत नव्हतं. फक्त माझं पोरगं नीट करा?एवढचं पुटपुटत होता.
डॉक्टरानी मला तपासले, त्यांनी मला पोलिओ झाल्याचं सांगितलं. "ह्या आजारावर कुठलाच इलाज होत नाही. पोराला कायमच अपंगत्व आलंय. पण घाबरून जायची गरज नाही" असं डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांच्या उत्तरानं नानाचा चेहरा आणखीन उतरला. काय करावं? नानाला समजत नव्हतं. दुपारचं उन्हं तापत होतं.घसा कोरडा पडूनही नाना पाणी पीत नव्हता. माझ्या पोराचं कसं होईल? हाच प्रश्न नानाला छळत होता.
***
त्यादिवशी नाना उपाशीच होता. घराकडं आल्यावर रानातही गेला नाही. जनावरं दावणीला बांधली होती. चुलत्यानं चारापाणी केलं.
काय ओ? डोळे कशानं एवढं भरलं तुमचं?
काय झालं सांगा की, डॉक्टरनी काय सांगितलं ? आई म्हणाली.
नाना शांत .
नाना दोन्ही पायात मुडकं घालून रडत होता. "आपला इक्याचा पाय नीट होणार न्हाय.कायमचा तो लुळाचं राहणार ह्याय" असं डॉक्टरनं सांगितलं. असं नाना रडक्या आवाजात आईला बोलू लागला.
सगळं आक्रीत घडल्याचं पाहून आईही ढसाढसा रडायला लागली. तिची वेदना कमी होत नव्हती, घरातला रडायचा आवाज ऐकून सगळ्या चुलत्या गोळा झाल्या. गावातली मालन आत्या आली. काल तरातरा चालणारं पोरगं, अचानक लुळं होऊन पडल्यानं त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.
आईला आधार देत सुभाकाकून डोळ्यांवरून पाणी शिंपडाला सांगितलं. बराच वेळ बाया-माणसं घरात बसली होती. नियतीच्या हातात हाय सगळं ?आपुण काय करावं? पोराच्या वाट्याला आलेलं भोग हाय? असं आयाबाया बोलू लागल्या. अमुक करा, तमुक करा असं बाया एकमेकीत बोलत होत्या. मी ठिक व्हावं, खेळावं, चालावं ह्यासाठी आई आणि नाना पूर्णत: प्रयत्न करत होते. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी माझ्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले.
गावातल्याच एका वयोवृद्ध महिलेच्या सांगण्यावरून मला उकिरड्यात छातीपर्यंत पुरून ठेवण्यात आलं होतं. उकिरड्यातील ऊब पायाला चांगली असते ह्या समजुतीनं माझ्यावर काही दिवस हा प्रयोग सुरू होता. ह्या प्रयोगाचा माझ्या पायावर कसलाच असर झाला नाही शिवाय नीट चालूही शकत नव्हतो. माझा पाय नीट व्हावा यासाठी कुणी गाढवाचं दुध पाजा, कुणी डुकराचं तेल लावा असा सल्ला देऊ लागले. तेही प्रयत्न करून पाहिले, काही महिने माझ्या पायाला डुकराचं तेल लावण्यात होतं. मी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा यासाठी आईने अनेक रात्री जागून काढल्या होत्या. ती रात्रभर माझ्या पायाची मालीश करत बसायची, माझ्यामुळे तीन भावडांचे हाल झाले .
माझ्या अपंगत्वामुळं आई आणि नाना अधिकच चिंतेत पडले होते. आई शेताकडं जायची बंद झाली होती. शेतात काढणीला आलेलं हायब्रीड, बाजरी आणि तुरी नाना एकटाच काढायचा अन् रास घरी आणायचा. सगळं मिळून दोन तीन पोत्यांच्यावर धान्य निघायचं नाही. काही दिवस गेल्यानंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून मला सोलापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण परिस्थिती माणसाला हतबल करते ह्याची जाणीव माझ्या कुटुंबाला होत गेली. कारण घरात नानाशिवाय कमवत कुणीच नव्हतं.शेतात जे पिकेलं,त्यावर सर्वांचे पोट भरायचं. धान्य विकून खाणार काय? तरीही माझ्यावर उपचार करण्यासाठी नानांनी कोणतीही कसर सोडली नाही.
***
(उर्वरीत कहाणी पुढच्या भागात)
©विकास पांढरे ,९९७०४५२७६७

😥nice
उत्तर द्याहटवा