बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

मंगळवेढ्यात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची गरज


सध्या सोलापूरसह मराठवाड्यात हुरडा पार्ट्या दिसू लागल्यात. विशेष म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीची चवच न्यारी असल्याने मुंबई पासून ते नागपूर पर्यंतचे खवय्ये या भागात येऊन हुरडा पार्टीचा आस्वाद घेताना दिसतात. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत मंगळवेढा तालुक्यात पाहुण्यांची वर्दळ असते. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला जीआय ( भौगोलिक) मानांकन मिळाले असले तरी याचा इथल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. विद्यमान सरकारने या भागात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे.
आपल्या देशात ११ टक्के जमिन क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर पुणे, नगर जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड, लातूर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिध्द आहे.

जिल्ह्यात सोलापूर - हैदराबाद महामार्गावर मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले ) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सुरू आहे. त्यामुळे या भागात ज्वारी उत्पादनाचा विकास झाला आहे. १९८५ साली सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यात रब्बी ज्वारीसाठी पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. त्यासाठी २५ टक्के बागायती व २० टक्के बागायती जमिन क्षेत्राचा विचार करून 'मालदांडी'व उन्नत 'स्वाती'चा समावेश केला गेला होता. बार्शी तालुक्यात शाळू जातीची ज्वारी उत्पादन घेतली जाते तिलाही राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे.
मंगळवेढा हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. येथील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. एकरी ८ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीत १५ ते २० आणि चांगल्या जमिनीत २५ ते ३० क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते.
ज्वारीचे आयुर्वेदात देखील खूप महत्व सांगण्यात येते. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवेढा ज्वारीला भौगोलिक मानांकन दिले आहे. यामुळे मंगळवेढ्याची ज्वारी आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करता येणार आहे. दोन वर्षापूर्वी या ज्वारीला जीआय (भौगोलिक)मानांकन मिळाले होते. याबाबतची सविस्तर बातमी मी सोलापूर तरुण भारत मध्ये दिली होती. या मानांकनामुळे मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी सातासमुद्रापार जाईल व उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशा आशयाची ती बातमी होती. या बातमीला येत्या मार्च २०१८ मध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. ना इथली ज्वारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचली ना इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. जीआय मानांकनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो? हा एक संशोधनाचा विषय आहे.
गेल्या पंधरा वीस वर्षापासून राज्यात कधी दुष्काळ तर कधी सुकाळ असतो. त्यामुळे ज्वारी उत्पादनात कमालीची घट होत आहे. यास सोलापूर जिल्हा ही अपवाद नाही.
राज्यात ज्वारीचे क्षेत्र २४ ते ३२ लाख हेक्टर असून उत्पादन ७ ते २४ लाख टन आहे. सध्या रब्बी ज्वारीचे ८ ते १०लाख हेक्टरने क्षेत्र कमी झाली. शेती क्षेत्रात ही चिंताजनक बाब आहे. धान्य आणि कडबा ही दोन्ही महत्वाच्या गरजा आहेत. ज्वारीच्या शाश्वत वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यात मालदांडी, दगडी, ज्योती, परभणी मोती,यशोदा या जातींचे उत्पादन होते.मंगळवेढा तालुक्यात मालदांडी ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ज्वारी आणि कडब्यास दर मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी डाळिंब फळबागेकडे वळल्याने ज्वारीचे क्षेत्र कमी होत गेले. ज्वारीला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळाले असले तरी इथला शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी ज्वारी प्रक्रिया उद्योगाची दालने खुले करून देणे गरजेचे आहे. ज्वारीचे प्रक्रियायुक्त केलेले पीठ, लाह्या, पापड, पोहे,मोतीकरण, स्टार्च,ग्लुकोज पदार्थ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन असा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

आपल्या देशात ज्वारी पासून इथेनॉल उत्पादनासंबंधी केंद्र सरकार कमी पडत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या पुढाकाराने इथेनॉल उत्पादनासंबंधी प्रथम निर्णय झाला होता. आज देशात आणि राज्यात भाजपाची एक हाती सत्ता आहे. या सरकारने ज्वारी पासून इथेनॉल निर्मिती केले तर शेतकऱ्यांचे दारिद्रय संपल्याशिवाय राहणार नाही.
सप्टेंबर २०१७ मध्ये मंगळवेढ्यात वारी परिवार, कृषीक्रांती व आत्मा ( कृषी विभाग) संयुक्त विद्यमाने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ज्वारी व मका महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्वारीचे कोठार असलेल्या मंगळवेढ्यात ज्वारीवर आधारित उद्योग सुरु करण्यात यावा,असा सूर निघाला होता. विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. देशमुख यांच्या कार्यकाळात ज्वारी प्रक्रिया उद्योग उभारला गेला तर सोलापूर जिल्ह्यातील सहकार उद्योगाला आणखी झळाळी प्राप्त होईल.
© विकास पांढरे, मुंबई
९९७०४५२७६७

1 टिप्पणी:

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...