शनिवार, ११ मार्च, २०१७

माझ्या जन्माची कहाणी




      गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा नाही. म्हणजे दुःखाला कंटाळून बसणे हे मला आवडत नाही. पण आज मन मोकळं करतोय. यात मी कुठेही कल्पनाविलासाचा वापर केला नाही.

माझ्या जन्माची तारीख काय आहे ? वार कोणता ? वेळ काय ? याबाबची माहिती मला काय माझ्या जन्मदात्यानाही नीट सांगता येणार नाही. कारण संपूर्ण जीवन खूप गुंतागुंतीच्या प्रक्रियांनी बनलेले आहे. अठराविश्व दारिद्र्यात जन्माला आलेल्या माझ्या सारख्या इसमाला मास्तरांनी लावलेल्या जन्मतारीखवरच विसंबून राहावं लागतंय.

 १९८८चे वर्ष असावं.. श्रावण महिना..नागपंचमी जवळ आला होती..... वार शनिवार... अमावस्येची रात्र.... पाऊस धो धो कोसळत होता... वडील कुटुंबाची खळगी भरण्यासाठी शहरात कामाला गेले होते... त्या रात्रीच्या पावसाने तीन पञ्याच्या खोलीत पाण्याचा डोह उभारला होता... चिमणी मधेमधे बंद व्हायची.... अशावेळी आईची प्रसृतीची वेदना ही तीव्र झाल्या होत्या.... अशा या घरात आईला आधार देणारा माणूसच नव्हता.

आईनं कळा सोसत वाड्यातल्या चुलतीला खूप हाका मारल्या.. पण कुणीही जागं झालं नाही... तो पाऊसचं इतका भयानक होता...की घरातला आवाज बाहेर पडत नव्हता... नुसताच रिपरिप पावसाचा आवाज सुरू होता..आईची घालमेल झाली होती... काय करावं तिला कळेनासं झाले.. शेवटी सर्व वेदना सहन करून तिनं मला जन्म दिला.

पहाटेच्या वेळी पाऊस ओसरला होता... तेव्हा माझी आई बाहेर का येत नाही ? म्हणून चुलतीनं घरात डोकावून पाहिलं तर प्रसृतीचं चित्र दिसले. माझ्या अंगावर पावसाचं पाणी पडलं होतं. त्यामुळं मी थंडगार होऊन पडलो होतो. अंगावरची नाळ तशीच होती. आई ही त्या वेदनेतून बाहेर पडल्यानं माझ्याकडं पाहण्याची तिची शक्ती उरली नव्हती.

आयाबाया घरात आल्या.. मी जानवं घेऊन जन्माला आल्यानं खूप भाग्यवान आहे ? असं आयाबाया म्हणाल्या तर कुणी अमावस्येची राञ.... त्यात शनिवार त्यामुळं पोरगं चांगलं निघणार नाही ? असं त्या आतल्या आवाजात बोलू लागल्या.

पहाटे पाच सहा वाजता गावतल्या आत्याला कुणीतरी बोलावून घेतलं. तव्हा माझ्या अंगावरचं जानवं आणि नाळं तिनेचं काढलं.... चुलीवर गरम पाणी तपाला ठेवली पण सरपन पावसात भिजल्यानं चुल पेटतच होती.. कसबसं घासलेट टाकून तिनं पाणी तपावलं.. तिनंच दोघांना अंघोळ घातली. आईला चिमूटभर भात घातला.. घरातही पिठाचा कण नव्हता.. आईला त्या भाताच्या कण्या सुद्धा गोड लागत नव्हत्या..

त्या भयाण रात्री माझा जन्म झाला,असं माझ्या आईनं वीस वर्षापूर्वी सांगितलेली ही माझ्या जन्माची कहाणी. आज या गोष्टीचं स्मरण करताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

घरात शिकलेलं कुणीच नव्हतं.. पंचांग, जन्मकुंडली, नावरस नावं, शनि या गोष्टी पाहायच्या तर लांबच राहिल्या, त्यावेळी माझी जन्मतारीख लिहायलाही कुणाला वेळ मिळाला नाही ? कारण संपूर्ण कुटुंबचं अशिक्षित... तिथं कुठलं आलं ज्ञान ?

शेती पिकत नाही म्हणून नाना (बाप ) मिळेल ते काम करायचा. घरात दोनाची चार हात झाली होती. त्यामुळं पोटाची खळगी भरावी म्हणून तो महिना महिना बाहेर असायचा..

चार लेकरं सांभाळायची चिंता.. शेतात मूठभर दाणे निघायची नाहीत.. आई ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं कामाला जायची. मिळेल त्या पैशातून आपल्या पिलांना घास भरवित.. दिवाळी, दसरा कसा असतो ? माहीत सुद्धा नव्हता.

 पुढं मी रांगायला लागलो.. धडाधडा धावत होतो.. खेळत होतो,बागडत होतो.. अचनाक १९९२-९३ साली माझ्या अंगात भयंकर ताप आला... माझ्या गावात सरकारी दवाखाना होता पण डॉक्टर कधीच वेळेत नसतं.. आईनं, माझ्या अंगावरून मीठ मिरची उतरवली तरी काही झालं नाही...! परगावच्या, खासगी दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जवळ पैसेही नव्हते.

अंगात ताप वाढतच होता.. अन् मला पोलिओ झाला ! एक दोन काय झालं नाही ? काल धावणार पोरगं आज चालताना लगडत आहे हे पाहून त्यावेळी आई खूप रडली होती.

अन् उपाय करायला सुरुवात झाली.. मोठ्या दवाखान्यात दाखवण्यात नेण्यात येऊ लागले. बापानं,माझ्या पायासाठी लवकर इलाज व्हावा म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे शेअर्स अवघ्या पाच सहा हजारला विकले. आज या शेअर्सची किंमत तीन लाखाच्या घरात आहे, असो मी चांगलं चालावं यासाठी माझ्या पायाला राञराञ शेखत बसायची..! कुणाच्या तरी सांगण्यावरून माझा लंगडा पाय दोन तास उकिरड्यात पुरला होता. एवढं करूनही इलाज झाला नाही.

आजही ती माझ्या पायाला खूप जपते. कधी ओझं उचलू दिली नाही. माझ्या कुटुंबांचा आयुष्याचा बारोमास पावसावर अवलंबून असल्याने कधी पाऊस यायचा कधी नाही. त्यामुळं नानांनी शेताचा नांद सोडून दिला होता. आई आणि नानांनी मला खूप शिकवलं..

खूप हलाकीतून शिक्षण घ्यावं लागलं. माझ्या बहिणीला आणि भावाचं प्राथमिक शिक्षण देता आलं.मला ही कधी, पुस्तक, वह्या, कपडे कधी मुबलक मिळू शकले नाही. आठवीत असताना फक्त सहा वह्या मिळाल्या. दहावी कसाबसा पास झालो. अकरावी ते एम. ए पर्यंत एकाच कपड्यावर दिवस काढावे लागले. घासलेटच्या दिव्यावर एम.ए पर्यंत अभ्यास आणि वाचन केलो. एवढं असूनही महाविद्यालयात पहिला नंबरनी पास व्हायचो. याकाळात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. स्कॉलरशिपच्या पैशातून जवळपास ६०० पुस्तके खरेदी केली त्यातून लिखाणाची आवड निर्माण झाली. 

नानांना मी मास्तर व्हावं, अशी इच्छा होती. बी.एड च्या परीक्षेसाठी प्रयत्न करू लागलो. त्या अगोदर सेट नेटच्या सात आठ परीक्षा दिल्या होत्या. प्रत्येकी वेळी ८ -१० गुणांचा फरक पडत गेला. त्यामुळे बी.एड कडे वळलो. सीईटी परीक्षा दिली. चांगले मार्क मिळाले. पहिल्याच यादीत पुण्यातील एस.पी.महाविद्यालयाच्या आवारातील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नंबर लागला. 
महाराष्ट्रातलं सर्वात जुनं महाविद्यालय म्हणून लौकिक होता. प्रवेश अर्ज, फीसची तजबीज करु लागलो. त्याकाळी ८ हजार फीस होती. इतरांच्या दृष्टीनं ही फीस फार किरकोळ होती. माझ्या दृष्टीनं डोंगराएवढी होती. २०११-१२ चं वर्षे असावं. आमच्याकडं भयानक दुष्काळ पडला होता. शेतातून चिपटभरं दाणे सुध्दा निघाले नाहीत. त्यामुळे बीएड ला प्रवेश घ्यायचं नाही. असं मनोमनी ठरवलो.

नानांनी एका व्यापाऱ्याला माझ्या शिक्षणासाठी एक बैल सहा हजाराला विकल्याची बातमी कळली. मी रानात जाईपर्यंत व्यापाऱ्यानं तो बैल घेऊन गेला होता. नानांनी त्या बैलाचे सर्व पैसे माझ्या हातात दिले आणि पुण्याला जाण्यासाठी मनधरणी करू लागले. नाईलाजाने मी बीएडला प्रवेश घेतला. इकडून तिकडून पैशाची तजबीज करून कसाबसा बीएडला प्रवेश घेतला. पुण्यात शिक्षण घेताना खूप हाल झाले. इथल्या आठवणी नंतर कधी तरी सांगेन.

बीएडला चांगल्या गुणांनी पास झालो, माझा मुलगा मास्तर होणार मी आई आणि नाना खुश असतं. पण कुठलं काय ? कशात काय आणि फाटक्यात पाय? अशी गत झाली. दोन वर्षे सलग सगळीकडे अर्ज करत होतो. मास्तर होण्यासाठी १५-२० वीस लाख रूपये मोजावी लागतात, असा वाईट अनुभव मिळाला. ताण-तणाव वाढत गेला.

तीन वर्षापूर्वी सोलापुरात पूर्णवेळ पञकार झालो.
इथे माणसं ओळखायला शिकलो. मान्यवर संपादक आणि पञकाराची वाहवा वाहवा मिळवत लिहीत राहिलो. काहींनी इथेही घाण्याच्या बैलासारखा वापर केला. काहींना माझा कमकुवतपणा सांगून ही त्यांनी गैरविश्वास दाखवला.या क्षेत्रात काम करताना खूप तणाव येतो हे लक्षात आले. बस्स आता प्रामाणिकपणे काम करत रहायचं,पुढे दिवस काढत राहिलो.

सध्या आयुष्याला वेगळे वळण लागतं आहे. ते म्हणजे चांगले काहीतरी सकारात्मक लिहायचं. त्यासाठी चांगले व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे हीच माझी ऊर्जा आणि जन्मकुंडली असणार आहे. हीच माझ्या आयुष्याची कहाणी असणार आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( ११ मार्च २०१६ )
     

६ टिप्पण्या:

  1. अतिशय थरारक आणि प्रेरणादायी जीवनप्रवास

    शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. विकासजी ग्रेटच!
    ही कहाणी एक दिवस इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल!
    शुभेच्छा वाढदिवसाच्या...

    उत्तर द्याहटवा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...