गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

कहाणी एका नगरसेविकेची

पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक ७ मधून राजश्री काळे भाजपच्या तिकिटावर सहा हजार मते घेऊन निवडून आल्या. पारधी समाजातील त्या पहिल्या नगरसेविका ठरल्या. २०१० साली मी भटके विमुक्त समाजातील महिलांच्या जीवनावर आयाबाया नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची एक नायिका राजश्री काळे होती. आज तिच्या विजयाने पुन्हा एकदा त्या लेखाची आठवण झाली.



ट्रेन लोणावळयाच्या दिशेने चालली होती. पुणे... शिवाजीनगर... एकामागून एक स्टेशने मागे पडत होती. ट्रेनच्या गतीबरोबर तिच्या आनंदालाही अधिक वेगाने भरती येत होती. तिला चिंचवडला उतरायचे होते. चिंचवड प्रभुणे काकांचे गाव. त्यांनीच आधार दिला आणि ती भटकंती सोडून चिंचवडात आली. तेथेच राहिली आणि आज तिच्या आयुष्यातील एक सोन्याचा क्षण... ज्यांच्या प्रतीक्षेत तिने अनेक वर्षे घालवली. छळ सहन केला, गुरासारखे कष्ट उपसले, तो क्षण गरवारे कॉलेजमधील नोकरीचा पहिला दिवस. राजश्री नोकरीचा पहिला दिवस भरून संध्याकाळी चिंचवडकडे परत निघाली होती. तिला काकांना भेटायचे होते. दिवसभराचा अनुभव काकांना सांगायचा होता. आपणही सर्वसामान्यांसारखे जगू शकतो, मारामाऱ्या,चोऱ्या, जेल या कचाटयातून मुक्त होऊ शकतो,स्वत:च्या कष्टावर पोट भरू शकतो. हा काकांनी जागवलेला आशावाद खरा झाला होता. ट्रेनच्या वेगाने राजश्री आपल्या पूर्वायुष्यातील आठवणीच्या प्रदेशात पोहचली. मनातल्या मनात वास्तवाचे जळजळीत तुकडे जोडण्याचा प्रयत्न करू लागली. आठवणी असल्या तरी त्यांनी भोगलेल्या भंगार आयुष्याचे चटके पुन:पुन्हा राजश्रीच्या मनाला बसू लागले.  राखेच्या आत निखारा जसा बसलेला असतो तशी या आठवणीत ही आग होती.  आयुष्यभर पायाला वाट दिसेल तिकडे पळत राहण्याची सवय... कधी पोलिसांची गोळी चुकवण्यासाठी तर कधी पोलिसांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी, फक्त पळणे हाच जीवनातील जास्तीचा भाग. जीव वाचवत घृणा सहन करत राजश्रीच्या मनात अशा विचाराचा, आठवणींचा कल्लोळ चालला होता. ती आठवणीच्या खोल खोल गर्तेत उतरत गेली. स्वत:च्या आयुष्याचे काच तुकडे जमवून एकसंध चित्र पाहण्याचा प्रयत्न करू लागली.

****

पारधी... सांगायला गाव नाही... राहायला घर नाही. मोकळया आकाशाखाली गाववेशीबाहेर पाल ठोकून राहायचे गावाच्या आसऱ्याने ... राजश्रीचे आईवडीलही त्याला अपवाद नव्हते. गणपत भोसले राजश्रीचे वडील, पाच पोरी आणि एक पोरगा असे चिल्या-पिल्याचे लेंढार सांभाळत जगत होते. पोटाची आग विझवायला बाकी पारधी करतात तेच काम करत होते, पण पोरांनी शिकावे, मोठे व्हावे हे स्वप्न त्यांच्याही डोळयांत होते. कोणत्या बापाला वाटेल की आपल्या पोरांनी रानोमाळ भटकावे, चोऱ्या कराव्यात, खून पाडावेत, गणपत भोसलेंनी पोरांना शाळेत घातलं. बाकीच्या बहिणीबरोबर राजश्रीही शाळेला गेली... पहिली... दुसरी... तिसरी... चौथी... राजश्री चौथीत होती. एक दिवस पालावर पोलिसांची धाड पडली... चोरी झालेली... आरोपी गणपत भोसलेला मारझोड करतच पोलिसांनी पालाबाहेर काढले. बेडया घालून घेऊन गेले. एकच गलका झाला... गणपतला पोलिसांनी धरला... साऱ्या पारध्यात पळापळ झाली... राजश्रीचे वय ते किती दहा-अकरा वर्षांचे. हबकली... बापाला पोलीस घेऊन गेले... कशासाठी? चोरी केली म्हणून? पुरावा काय? पारध्याने पुरावा द्यायचा नसतो. सरळ गुन्हा कबूल करून शिक्षा भोगायची असते,नाहीतर पोलीस मरेपर्यंत  मारतात. पण मरू देत नाहीत...  पायाच्या शिरा तोडतात, गुडघ्याची वाटी फोडतात. जायबंदी करतात. एकदा अटक झालेला पारधी स्वत:च्या पायावर सहसा उभा राहत नाही. त्यातूनही सुटला तर पोलीस आवई उठवतात,  हा फितूर आहे...  मग सारे पारधी त्यांच्याशी फटकून वागतात. माणसाला शिवलेल्या कावळयाला जसे बाकीचे कावळे टोचून टोचून मारतात ना अगदी तसे... हे  सारे चित्र राजश्रीच्या डोळयांसमोरून सरकन् पुढे गेले. धक्काबुक्की करत गणपत भोसलेला गाडीत कोंबले, घेऊन गेले. रानोवनी पांगलेले पारधी पुन्हा पालाकडे आले. आपण  वाचलो  याचे समाधान आणि गणपतला अटक यांचे दु:ख दोन्ही एकाच वेळी मग सगळयांच्या चेहऱ्यावरून ओघळले. पुढे कधीतरी केस उभी राहते. न्याय होतो आणि गणपत भोसलेला चोरीच्या गुन्ह्यासाठी सजा झाली. गुलबर्गाच्या जेलमधील भोसले दहा वर्षांसाठी गेला.

****

राजश्रीच्या बापाला ज्या वर्षीसजा झाली त्याच वर्षी तिचं लग्न झालं, ज्ञानेश्वर काळेशी. एक दिवस ज्ञानेश्वर आला आणि सरळ मागणी घातली राजश्रीला. राजश्रीच्या आईनेही होकार दिला. ज्ञानेश्वरचे वडील वारलेले.  आई दुसऱ्या पोराकडे राहत होती.  एका जागी स्थिर होता. पोरगा पाहण्यातला. पोरगीचे नशीब उजळले होते. लग्न नक्की झाले, पण हुंडा आणि जात पारध्यांत पोटभेद आहे. गावपारधी आणि गायपारधी या दोघांत सोयरीक होत नाही.  गावपारधी नवरा हुंडा घेतो,  तर गायपारधीमध्ये नवरीचे आई-वडील हुंडा घेतात. ज्ञानेश्वर गावपारधी आणि राजश्री गायपारधी. दोघंबी एकमेकांना कमी समजणाऱ्या जातीचे. जुळणार कुठून? आणि हुंडा... तो कुठून देणार.  बाप जेलमध्ये सजा भोगतोय. कुठून आणायचे पैसे. तेही थोडेथोडे का हवेत. लाखात हुंडा मोजावा लागणार. राजश्रीची आई हवालदिल झाली, पण ज्ञानेश्वर काळे. त्याने निर्णय घेतला, हुंडा घ्यायचा नाही. राजश्रीच्या आईचा जीव भांडयात पडला. लगीन जुळले. अक्षता पडल्या आणि राजश्री भोसले राजश्री ज्ञानेश्वर काळे झाली. गायपारधी-गावपारधी यांच्यात लगीन लागले. पारध्यांच्यात खळबळ माजली. राजश्रीच्या आईबरोबरच सारे राहू लागले. पोट भरण्यासाठी ज्ञानेश्वराने दारूची भट्टी पेटवली.

****

ज्ञानेश्वर दारूची भट्टी चालवू लागला आणि मदतीला राजश्री. तीही शिकली दारू गाळायला. रोज 400 ते 500 रुपये यायचे. पैसा हातात खुळखळायचा. कधीकधी ज्ञानेश्वर स्वत:ही प्यायचा, तर कधी पोलिसांची धाड पडायची. मग तोडपाणी. प्रत्येक वेळी हजार-दीड हजार खिशात घातल्याशिवाय पोलीस माघारी फिरत नसत. पोलीस हप्ता बांधून घेत. वेळोवेळी येऊन दारू पीत.  पैसे देण्याचे नाव नाही. उलट शिव्यांची लाखोली आणि दंडुक्याचा फटका. दिवस चालले होते. ज्ञानेश्वर-राजश्रीने दोन वर्षे भट्टी चालवली. पण त्या काळात बऱ्याच घटना घडल्या होत्या, ज्या राजश्रीला नकोशा होत्या.

****

''जात बाटवली.''

''गावपारध्याने गायपारध्याची बाईल केली?''

''कुळाला बट्टा लावला.''

''हे खपवून घ्यायचे नाय.''

बारा तोंडी बारा बाता... खवळलेले पारधी... जातीला बट्टा लावणाऱ्यांना जिवंत ठेवायचे नाही. आपसातील कुजबुज. राजश्रीच्या कानी आली. धीराची बाई.  पोरगी जावयाला सोबत घेऊन जगत होती, कष्ट करत होती. पोरगा ज्ञानेश्वर भोसले रंगकाम करायचा... तसा लहानच होता, पण आईला मदत करायचा.  गणपत भोसलेला जेल झाली आन् सारा कुटुंबकबिला धरमगावाकडे गेला. मंगळवेढा सोडला. बापाला पोरांनी शिकावे असे वाटायचे. आईने ते पुरे करायचे ठरवलं. राजश्री आन् तिची बहीण  शाळंला जाऊ लागल्या. पुन्हा अक्षरं गिरवू लागल्या.  शाळेत अंतर पडले होते. चौथीनंतर शाळा थांबलेली. आईने जिद्द केली. पोरांना शाळेला घातले.  राजश्री शिकू लागली. पाचवी, सहावी, सातवी. राजश्रीचे शाळेचे अनुभव विलक्षण. शाळेत पोरे छळायची. वाटेने छेड काढायची, जवळ बसू देत नव्हती. पण राजश्रीने जिद्द केली. शाळेला जात राहिली. दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली होती. प्रत्येकजण आपापल्या डबा खात होता. राजश्रीला कुणी जवळ करीना. केविलवाणी झाली. मराठा,सुतार, धनगर जातीची पोरे-पोरी राजश्रीला जवळ घेईनात. पारधी ना ती... पेन्सिलीची चोरी केली तर? पुस्तकांची चोरी केली तर? त्यांच्या मनात शंका असे.

शाळेच्या बाई मात्र राजश्रीच्या जिद्दीचे कौतुक करत. मायेने जवळ घेत. हवे नको ते पाहत. राजश्री कबड्डी चांगली खेळायची. अनेक वेळा शाळेच्या संघातून ती खेळली. संघ जिंकला. अशा वेळी बाईचा ऊर भरून येत असे. संघ जिंकला की बाई राजश्रीला बक्षिसे देत. वह्या,पेन शाळेसाठी लागणारी साधने.

****

हूल उठली. जात बाटवणाऱ्यांना खतम करणार. राजश्री आणि ज्ञानेश्वर काळेला ठार करणार. राजश्री आणि ज्ञानेश्वर दोघेही सावध झाले. पारध्याची जात शब्दांना फिरणार नाही. दारूची भट्टी चालवून दिवस काढत असताना आता तर मोठे संकट समोर होते. त्यातच ज्ञानेश्वर काळेच्या नातेवाईकांत काहीतरी बिनसले. तो राजश्रीला तिच्या आईकडे सोडून निघून गेला. पण पूर्वी निसर्गाने त्यांचे काम केले होते. राजश्रीच्या पोटात गर्भ वाढला होता आणि ज्ञानेश्वर राजश्रीला सोडून गेलेला. जीव हवालदिल. अशा वेळी नवरा जवळ हवा. तो निघून गेलेला. पण जास्त दिवस नाही. आला परत. मालू पवारचा मर्डर झाला आणि ज्ञानेश्वर परत आला. राजश्री व ज्ञानेश्वरने विचार केला, हे पारधी आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत. इथून पळाले पाहिजे. एक दिवशी दोघे अचानक गायब झाले. कुठे गेले? कसे गेले? कुणाला कळले नाही. पण पारध्यांत आवई उठली. ज्ञानेश्वर काळेला राजश्रीसोबत मारून टाकले? हे काम कोणाचे? गावपारध्याचे की गायपारध्याचे?दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले. पोलीस कम्प्लेंटपर्यंत मजल गेली. एकमेकांविरुध्द काठया-कुऱ्हाडी उठल्या. जात-पंचायत बसवू,आव्हाने, प्रतिआव्हाने झाली. पण राजश्री व ज्ञानेश्वर दोघेही सापडली नाहीत. दोघेही हुबळीला पोहोचली होती. एका आजीबाईच्या सहाऱ्याने तेथे राहिले. पण महिन्याभराने पुन्हा आपल्या माणसांची ओढ लागली. एक महिन्यानंतर दोघेही परतली. तेव्हा कुठ वादळ शांत झाले. मग ख्रोबापूरला पाल टाकले. दोन वर्षे तेथेच राहिले. दारूची भट्टी लावली. शिवानीचा जन्म झाला. संसारात एकाची भर पडली.

****

यमगरवाडीला आश्रमशाळा सुरू झाली होती. परभुणे काका, गडेकर गुरुजी, सोलापूरचे अण्णा व्हटकर पालापालावर फिरत होते. देवकामावशीनेच प्रभुणे काकांची आईशी भेट घालून दिली. मंगळवेढयाला रमेश काळे, प्रभू काळे हत्याकांड झाले. रमेश काळे राजश्रीच्या आईचा मामेभाऊ तर प्रभू काळे आईचा मामा. रमेश काळेचा पोलीस अत्याचारात जीव गेला,तर प्रभू काळेच्या गुप्तांगात जंतू झाले. पोलिसांनी त्याला लाईटचा करंट लावला होता. या प्रकरणात प्रभुणे काकांनी पुढाकार घेतला. अन्याय, अत्याचाराचे प्रकरण कलेक्टरसमोर धसास लावले. रमेश काळेच्या कुटुंबीयाला सरकारी मदत मिळाली आणि पारध्यांचे प्रश्न,त्यांचे पुनर्वसन यांची गरज अधिक तीव्रपणे जाणवू लागली.

महाराष्ट्रात तेव्हा युतींचे शासन होते. भटके-विमुक्त विकास परिषद आणि संघ कार्यकर्त्यांनी जोर लावला. पाहता पाहता प्रथम वसनाचा प्रयोग यशस्वी झाला. सय्यद वरवडयाला पारध्याचे प्रथमवसन झाले. ज्यांना सांगायला गाव नव्हते, त्यांना गाव मिळाले. राजश्री ज्ञानेश्वर काळेंची झोपडी ही या प्रथमवसनात वसली.

****

स्वत:चे घर बांधायचे, सन्मानाने राहायचे,प्रभुणे काकांनी सांगितले, पण त्यासाठी अवघड अट घातली. चोरी न करता घरासाठी पैसे जमवायचे, पैसा पैसा स्वत:च्या कष्टाचा आणि सच्चाईचा हवा. चोरी, दरोडे टाकून घर बांधू नका. सय्यद वरवडे येथे 45 एकर जमीन सरकारकडून मिळाली. येथे प्रथमवसन व्हायचे होते. पक्की घरे स्वत:च्या कष्टातून उभारायची,असे काका नेहमी सांगत. सय्यद वरवडेला झोपडया उभारल्या गेल्या आणि पारधी कुटुंबे तेथे राहू लागली. पारध्याची पोरं यमगरवाडीच्या आश्रमात शिकू लागली. पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा तर पोराबाळांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक होते. यमगरवाडी हे हक्काचे आणि आधाराचे स्थान वाटू लागले. यमगरवाडी. तेथील महाशिवरात्रीचा स्नेहमेळावा. भटकेश्वराची जत्रा. सारे भटके येथे जमा होत. सय्यद वरवडे येथीलही पारधी येत स्नेहमेळाव्याला.  एक वेळ राजश्रीही आली. महाशिवरात्री आदली रात्र म्हणजे भटकण्याची जागरण रात्र. भटक्यांनी विविध कला सादर कराव्यात, संस्कृतीचे गोडवे गावेत. यासाठी या कार्यक्रमाची योजना. गाण्यातून, पोवाडयातून राजश्रीला आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान इतिहास, वारसा, परंपरा कळत गेला. आपण चोर नाही, दरोडेखोर नाही. देशाच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी आपल्या वीर पुरुषांनी बलिदान केले आहे.  मग का आली अशी जन्मासोबत भटकंती. पोलीस गोळीवर लिहिलेले नाव. का? कशासाठी? असंख्य प्रश्नाचे भुंगे राजश्रीचा मेंदू पोखरू लागले. इतके दिवस जगलेले भणंग आयुष्य तिला नव्याने कळू लागले. आपण जे जगलो ते आपल्यावर लादले गेले होते. आपण मुक्त होऊ शकू  का या जाचातून. कितीतरी वेळ राजश्री विचारचक्रात गुंतून पडली.

हे संघाचे लोक. प्रभुणे काका, किती भटकंती करत आहेत आपल्या लोकांसाठी आणि हे यमगरवाडी, मुक्तिनगर, सय्यद वरवडेचे प्रथमवसन किती केले या लोकांचे कशासाठी?तर आपण सर्व एका भारतमातेचे पुत्र आहोत, या भावनेच्या पूर्ततेसाठी संघ काम करतोय. हे सर्वच कार्यकर्ते नि:स्वार्थीपणे काम करत आहेत. सामाजिक परिवर्तनाचा विश्वास त्यांनी कामातून जागवला आहे. संघशक्ती नक्कीच भटके- विमुक्तांचे जीवन बदलेल. आपणही त्यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांनी मार्ग शोधला आहे...  संघविचाराने आपण विश्वासाने त्यांच्यासोबत जायचे, मार्गक्रमण करायचे. संघाची माणसं चांगली आहेत. देव माणसं ही. तेच घडवतील आपले पुढचे आयुष्य आणि थांबवतील आपले भटके जगणे.

यमगरवाडीचा स्नेहमेळा संपला. जमलेले भटके परत फिरले. राजश्रीही सय्यद वरवडेला परत गेली. तिथे तिची झोपडी... गावात मोलमजुरी करून दिवस काढत होती. प्रथमवसन झाल्यापासून दारूची भट्टी बंद केली होती. मजुरी करूनही अर्धपोटी राहावे लागत होते. कामासाठी दारोदार भटकावे लागत होते. पारध्याची जात आडवी येत होती. चोरी करील म्हणून कोण काम देत नव्हते. दिले तर सक्त पहारा असे. एक दिवस प्रभुणे काका सय्यद वरवडेला प्रवासात आले. सर्वांची विचारपूस झाली. बोलत बोलत प्रभुणे काका राजश्रीच्या झोपडीपर्यंत आले. सर्वजण भोवती गोळा झाले. हाताला काम पाहिजे. पण चोऱ्या करायच्या नाहीत.कष्ट करायचे पण दारूची भट्टी चालवायची नाही. सन्मानाने जगायचे, पण कसे? प्रश्न बिकट होता. काका सांगत, नवे काहीतरी शिका. सहज शक्य आहे असे प्रशिक्षण घ्या. हस्तकला, हस्तव्यवसाय शिका. मसाले,पापड, लोणची, शिलाई असे कितीतरी व्यवसाय शिकण्यासारखे आहेत. पुण्यात, मुंबईत असे व्यवसाय शिकवले जातात. तुमच्यापैकी कोण कोण शिकायला जाईल? शिकण्यात तर फायदा तुमचाच. विचार करा. तुमच्या नेहमीच्या जीवनापेक्षा हे काम वेगळे आहे. पण शिकण्याला पर्याय नाही. काका बोलताना थांबले. काकांचा सल्ला उपयुक्त होता. नव्या जीवनाची सुरुवात करणारा होता. राजश्री,ज्ञानेश्वर दोघेही तयार झाले.

****

काकांनी काम केले. राजश्री व ज्ञानेश्वरला पुण्याला बोलावले. पुण्याच्या खादी ग्रामोद्योग भवनात म्हणजे आगाखान पॅलेसमध्ये त्यांची प्रशिक्षण व्यवस्था केली. पण चांगल्या कामात खूप मोडते असतात. तसेच झाले. राजश्रीला प्रवेश नाकारला. कारण राजश्रीच्या पोटचा गर्भ. राजश्रीला दिवस गेले होते. गर्भवती अवस्थेत शिलाई मशीन प्रशिक्षण शक्य नव्हते. आगाखान पॅलेसमधील प्रवेश हुकला. राजश्री हबकली,निराश झाली. आता काय करायचे? सय्यद वरवडे सोडून येताना किती स्वप्ने आणली आपण सोबतीला. शिकू. स्वत: कमावू, कुणाच्या आधाराशिवाय जगू, पण प्रवेश नाकारला. आता काय? आपण जातीपेक्षा वेगळे करतोय. पारध्याची बाई असं प्रशिक्षण, शिक्षण घेत नाही. पारध्याची बाई म्हणजे पापाचे मूळ. आपण धाडसाने आलो. पारधी समाजातील बंडखोरी. समाज कसा स्वीकारेल मला... राजश्री विचारात गर्क  झाली.

****

पुन्हा काकांची धावपळ, शोधाशोध, कुठे प्रशिक्षण द्यायचे, तोपर्यंत राजश्री चिंचवडला प्रभुणे काकांच्या घरी राहिली. प्रयत्न चालू होते. शेवटी शिरूर तालुक्यातील पाबळ येथे प्रशिक्षण मिळू शकते असे लक्षात आले. काका पोहोचले तेथे. संस्थाचालकांना विनंती केली. घेऊन या म्हणाले. काका राजश्रीला घेऊन पोहोचले.

''हिला प्रशिक्षण हवं आहे. काखेत शिवानीला घेतलेल्या राजश्रीकडे पाहत संस्थाचालक म्हणाले.

''हो.'' काका.

''हिला तर मुलगी आहे आणि पुन्हा गरोदर...''संस्थाचालक.

''असे आहे खरं, पण प्रशिक्षणही गरजेचे आहे''काका. ''गरोदर अवस्थेत शिलाई प्रशिक्षण अशक्य असते. गर्भाला धोका पोहोचू शकतो.''

''आणि गर्भच नसेल तर? तर द्याल प्रशिक्षण?''इतक्या वेळ शांतपणे ऐकणारी राजश्री बोलली. सारेच अवाक् झाले. काकाही... ती पुढे बोलली, ''मला प्रशिक्षण हवं आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.''

''आपण विचार करू या.'' प्रभुणे काका.

''काका... मला जर इथे प्रशिक्षण मिळणार असेल तर मी पोट खाली करून घेईन. माझा विचार पक्का आहे.''

राजश्री बोलली. काका विचारात पडले. काय करायचे?

एक नवसृजनाची हत्या की राजश्रीच्या नवजीवनाला सुरुवात? खरं तर निर्णय तिने घ्यायचा आहे. आपण  फक्त आधार व्हायचे. तिचा तीच निर्णय घेईल.  लहान नाही राजश्री आता. ठरवू देत तिलाच. आपण पाठीमागे भक्कम उभे राहू. राजश्रीचा निर्णय तिने कृतीत आणला. प्रशिक्षण सुरू झाले.

पाबळला प्रशिक्षण मिळू लागले, पण राहायची सोय संस्थेत नव्हती. राजश्रीला शिलाईकाम तर ज्ञानेश्वरला गवंडीकामाचे प्रशिक्षण मिळत होते. गावात खोली भाडयाने घेऊन तेथे राहत होते. प्रशिक्षण घेता घेता बाहेर मोलमजुरी करत होते. दिवस जात होते. मशीनच्या चाकाबरोबर राजश्रीच्या भाग्याची चाके गतिमान होत होती. राजश्री शिकली मेहनत करून, बंड करून जिद्दीने शिकली. ज्ञानेश्वरची साथही तशीच आश्वासक होती. दोघेही सय्यद वरवडेला परतले. सर्वांच्या नजरा रोखलेल्या. कुजबुज चाललेली. काहींनी धाडस केलेच. राजश्रीला हटकले.

''का गं. पोट खाली का केले?''

''शिकण्यापायी पोट पाडलंस?''

''आम्ही सांभाळले असते पोराला...''

''तुला एवढं जड जात व्हतं व्हय.''

''अगं पोरं देवाची देण. तेच तू पाडलंस.''

चारी बाजूंनी प्रश्नांचा भडिमार... जीवघेणा दबाव...  पारधी बाई कधी गर्भपात करत नाही. राजश्रीने केला. आधीच प्रशिक्षणासाठी जातीच्या परंपरा तोडल्या, पुन्हा गर्भपात. तेही पारध्याची परंपरा मोडणारे. सय्यद वरवडेला प्रथमवसनात राजश्रीला या भयाण वास्तवाचा सामना करावा लागला. त्यातूनच कुणीतरी ज्ञानेश्वरचे कान भरले. ''बाईल हातातून गेली तुझ्या'', ''आत्ताच विचार कर, नंतर पस्तावशील.''राजश्रीला हे कळत होते. सय्यद वरवडे गावापासून प्रथमवसन दोन किलोमीटर दूर गावात जाऊन शिलाईचे काम आणण्याचा प्रयत्न राजश्रीने सुरू केला. पण गावात आधीच दोन-तीन टेलर्सची दुकाने. काम किती मिळणार?पुन्हा मोलमजुरी. कधीतरी काका सय्यद वरवडेला  येतात. पुन्हा राजश्रीचे गाऱ्हाणे. काय करूया? काकांपुढचा प्रश्न. करूया. बघूया... दिवस जात असतात. पुन्हा कधीतरी काका निरोप देतात- राजश्री यमगरवाडीला ये. तेथे बघू. यमगरवाडी भटक्या -विमुक्ताचे आधुनिक तीर्थक्षेत्र. राजश्री, ज्ञानेश्वर,  शिवानी तिघेही यमगरवाडीला पोहोचले. वसतिगृहातील मुलींना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याची सूचना काकांनी केली. वसतिगृहात भोजन- निवासाची व्यवस्था झाली. कपडालत्ताही मिळू लागला, वर मानधन म्हणून 300 रुपयेही मिळू लागले.

****

राजश्री यमगरवाडीत रुळली. शबरीमाता वसतिगृहातील मुलींना शिलाईकाम शिकवू लागली. ज्ञानेश्वरही सोबत होता. पारधी पुरुष कमालीचा संशयी, हलक्या कानाचा. ज्ञानेश्वर त्याला अपवाद नव्हता. आसपासच्या परिसरात जाऊन तो गवंडीकाम करायचा. एक दिवस अचानक तो निघून गेला. राजश्री यमगरवाडीला. ज्ञानेश्वर त्याच्या आईकडे. पारध्याने बाईला सोडून जाणे म्हणजे फारकत. न बोलताही समजणारे वास्तव. राजश्री चिंतातुर झाली, पण काही दिवसच. ज्ञानेश्वर परत आला. चुकलो म्हणाला. पुन्हा असे करणार नाही असे सांगून राजश्रीची समजूत घातली. प्रभुणे काका अधूनमधून यमगरवाडीला येत. एकदा राजश्रीच्या पुढच्या शिक्षणाबद्दल बोलले. राजश्रीने धाराशिवला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. खंडित झालेली ज्ञानसाधना सुरू झाली.

****

यमगरवाडीची संध्याकाळ... वसतिगृहातील चिमणीपाखरं भोजनगृहाकडे जात होती आणि अचानक गाेंधळ झाला. ज्ञानेश्वरने राजश्रीला मारहाण सुरू केली.  कारण काय? माहीत नाही. राजश्री मार सहन करत होती. शिवानी केविलवाण्या नजरेने आपल्या मार खाणाऱ्या आईकडे आणि मारझोड करणाऱ्या बापाकडे पाहत होती. ज्ञानेश्वर बेभान झाला होता. मारत राहिला. राजश्रीचा चेहरा काळानिळा झाला. मारझोड करून ज्ञानेश्वर निघून गेला. पुन्हा राजश्री एकटी? नाही तिच्या पोटात गर्भ होता. चिमुरडी शिवानी सोबत होती. ज्ञानेश्वर मात्र या सर्वांना सोडून निघून गेला.

****

दिवस पूर्ण झाले. धाराशिवच्या रुग्णालयात राजश्रीने मुलीला जन्म दिला. यमगरवाडी प्रकल्पावर  पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या गौरीताई कानिटकर तिच्यासोबत होत्या. प्रकाश ढवळे हॉस्पिटलमध्ये येत होते. या बाळंतपणाच्या काळात राजश्रीने निर्णय घेतला. तिने अनुभवले होते अठरा विश्व दारिद्रयात जगणारे पारध्याचे जिणे. दहा-बारा पोरांचे लेंढार सांभाळायचे. पोटाला अन्न नाही. अंगाला वस्त्र नाही. धड सांभाळता येत नाहीत तर कशाला हवीत ढीगभर पोरे. आपण हे थांबवायचे. आपण संतति नियमन करायचे. स्वत:चा निर्णय स्वत: घ्यायचा. राजश्रीने निर्णयाची अंमलबजावणी केली. छोटी मुलगी. शिवानीला घेऊन राजश्री यमगरवाडीला आली. राजश्री बाळंत झाल्याचे कळताच ज्ञानेश्वर यमगरवाडीला पोहोचला. मुलगी झाली यापेक्षा राजश्रीने ऑपरेशन केले याचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. लहान बाळाला न पाहताच तो म्हणाला, ''मला मुलगा पाहिजे होता.''

''पण ही मुलगी आहे.''

''मला मुलगा हवा होता. तू ऑपरेशन का केलेस?''

''तुला मुलगा देण्याची कपॅसिटी माझ्यात नाही.'' राजश्रीने उत्तर दिले. ''तुम्हाला मुलगा पाहिजे तर दुसरे लग्न करा, माझी ना नाही...''पण मला या जाचातून मोकळे व्हायचे होते म्हणून मी ऑपरेशन करून घेतले.''

बंडखोरी. राजश्री बंडखोरी करते आहे समाजाशी. स्वत:च्या नवऱ्याशी. ज्ञानेश्वरचा संताप अनावर झाला. मारझोड करून पुन्हा तो निघून गेला.

****

ज्ञानेश्वरचे असे मारझोड करून निघून जाणे,मनाला येईल तेव्हा परत येणे, हक्क गाजवणे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. प्रभुणे काका यमगरवाडीत असताना एक दिवस ज्ञानेश्वर आला. काकांनी त्याची समजूत घातली. राजश्रीलाही बोलावली.

''काका, यांना जर मला सोडायचे असेल तर सोडू देत. मला आता मार सहन होत नाही. यांना मुलगा पाहिजे. ती देण्याची कपॅसिटी माझ्यात नाही. हे दोन्ही पोरींनासांभाळणार असतील तर ठीक. नाहीतर मी स्वत: त्यांना सांभाळीन. शेवटी मी आई आहे त्यांची.'' राजश्री बोलू लागली. तिच्या चेहऱ्यावर तेज होते. स्वतंत्र व्यक्तित्वाचा तो प्रकाश होता. राजश्री पुढे म्हणाली, ''त्यांनी दुसरं लग्न करावं. माझी आडकाठी नाही.'' ''मी नाही दुसरं लग्न करणार.'' ज्ञानेश्वर.

''मारझोड... तीही सहन करण्याची कपॅसिटी माझ्यात नाही.'' राजश्री.

''नाही. मी लिहून देतो काका... मी राजश्रीला मारणार नाही... तिला सोडून जाणार नाही. तिच्यासोबतच राहीन.'' ज्ञानेश्वर भूतकाळातील चुका डोळयासमोर आणत बोलला. काकांना आनंद झाला. ज्ञानेश्वरने काकांच्या साक्षीने लिहून दिले. राजश्री आणि दोन मुलींबरोबर ज्ञानेश्वर यमगरवाडीला राहू लागला.

****

दिवस जात होते. राजश्रीचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शिक्षण संपत आले. यमगरवाडीच्या प्रकल्पावर मिळणारे तीनशे रुपये खूप मोलाचे होते, पण त्यात भागत नव्हतं. राजश्री जगली जाती भटक्याचे आयुष्य, पण तिला मुलीच्या आयुष्याला घडवायचे होते.  शिक्षण चालू असताना गौरीताईंशी हितगुज करी. शिक्षण झाल्यावर काय काम करता येईल याचा विचार करी... तिला माहीत होते... प्रभुणे काका... भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते आपल्याला नक्की मदत करतील. कुठले कोण?पण नात्यातील माणसासारखा व्यवहार करतात. प्रभुणे काका तर वडिलांसारखी माया करतात. बाप जेलमध्ये गेला. त्यांची माया नाही मिळाली. आधार नाही मिळाला. पण प्रभुणे काकांनी तो दिला. पुढेही तेच मदत करतील.

****

चिंचवड स्टेशन आले होते. राजश्री उतरली. धावतपळत सावरकर नगरमध्ये प्रभुणे काकांच्या घरी पोहोचली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. प्रभुणे काका, काकू दोघेही आनंदले. राजश्रीने नोकरीचा पहिला दिवस भरला. पालावरची पोरे. गरवारे महाविद्यालयात नोकरी करू लागली याचा आनंद प्रभुणे काकांनाही झाला. तो श्रमसाफल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. भटके-विमुक्त विकास परिषद आणि संघविचारांच्या कामाची ही पोचपावती होती.

नोकरीला लागून तीन महिने झाले होते. राजश्री प्रभुणे काकाकडेच राहत होती. दररोज बस, रेल्वेचा प्रवास करून पुण्याला जात होती. दिवसभरातील नवेनवे अनुभव सांगत होती.

''राजश्री, आता तू घर कर.'' काका.

''मलाही तसेच वाटते.'' प्रभुणे काकू.

राजश्रीसाठी चिंचवडमध्ये घर शोधण्यास गेले. डिपॉझिटचे पैसे प्रभुणे काका आणि गौरीताई कानिटकरांनी दिले. छोटयाशा खोलीत राजश्रीने संसार थाटला. ज्ञानेश्वरही आला. दोन मुली... राजश्री असा चौकोनी संसार सुरू झाला. नोकरी चालू होती. ज्ञानेश्वर पुण्यात, चिंचवडात, पिंपरीत जिथे मिळेल तेथे गवंडीकाम करत होता. रंगकामाची छोटी-मोठी कामे घेत होता. दिवस चालले होते. मुक्त होणे म्हणजे बंध तोडणे असा अर्थ राजश्रीला मान्य नसावा. पूर्वायुष्यात कधीही मदतीला न येणारी सासू, ज्ञानेश्वरची आई, हिलाही चिंचवडला राजश्रीने आणले. सून आणि लेक सन्मानाने जगत आहेत. स्वकष्टाच्या कमाईवर चार घास सुखाने खात आहेत. हे पाहून त्या माऊलीचे डोळे भरून आले. काही दिवस राजश्रीकडे राहून त्या परत गेल्या.

****

हंगामी कर्मचारी म्हणून गरवारे कॉलेजमध्ये नोकरीला लागलेली राजश्री तेथे कायम झाली. पगार वाढला. हाती पैसा येऊ लागला. पैसा येण्याची वाट एक, पण तो कसा खर्च करायचा याच्या वेगवेगळया वाटा असतात. राजश्रीच्याही होत्या. स्वत:साठी मर्यादित खर्च करणारी, बस रेल्वेचा धावपळीचा प्रवास करणारी राजश्री. मुलीबाबत मात्र जागरूक होती. पहिला पगार आला सहा हजार रुपये. राजश्रीने दोन्ही मुलींची,नवऱ्याची ङ.ख.उ. पॉलिसी काढली... मुलीच्या भवितव्याचा विचार आईच अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. त्यांचे शिक्षण, लग्न यांची तरतूद राजश्रीने केली. स्वत: मात्र साधीच राहिली. न थकता काम करत राहिली. पैसा पैसा जमवत राहिली. ज्ञानेश्वरही आता गवंडीकामात स्थिर होत होता.  पुण्यात त्याला चांगल्या प्रकारे काम मिळत होते. राजश्रीने साठवलेल्या पैशातून ज्ञानेश्वर काळेला मोटरसायकल घेऊन दिली... ज्ञानेश्वर पुणे, चिंचवड मोटर सायकलवरून प्रवास करू लागला. राजश्री मात्र चिंचवड, पुणे रेल्वे आणि बसमधूनच दररोज येत-जात राहिली. शिवानी शाळेत जाऊ लागली. तिच्या सर्व गरजा,राजश्री पुऱ्या करू लागली... चिखलात उगवलेले कमळ जशी आपली मुळं घट्टपणे चिखलात रुजवते तशी राजश्रीही शिकली,नोकरीला लागली, पण आपली पार्श्वभूमी विसरली नाही. नातेवाईक, आई, सासू, भाऊ,दीर, नणंद यांच्याशी फारकत न घेता, त्यांच्याशी संबंध ठेवून राहिली. ज्ञानेश्वर भोसले राजश्रीचा भाऊ.. त्याला खुनाच्या खोटया आरोपाखाली अटक झाली. त्याला सोडवायला केसचा खर्च20 ते 22 हजार रुपये राजश्रीनेच केला. राजश्री नाती, संस्कार विसरली नाही.

****

समाज बदलतो. प्रयत्न हवेत. राजश्री हे त्यातीलच एक उदाहरण. संघविचार आणि समर्पित कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून यमगरवाडीचे माळरान फुलले. राजश्रीसारखी जीवन घडवण्याची कार्यशाळा अव्याहतपणे चालू आहे. ही कार्यशाळा माणूस घडवते, त्याला खंबीरपणे उभे करते. संघ-विचार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. मग त्यांच्या यशाची क्षितिजे झळाळून उठतात. क्षितीज हाती आले तरी मातीचे भान आणि नात्याची जाण कायम हृदयात ठेवण्याचा वसाही याच कार्यशाळेत दिला जातो.
रवींद्र गोळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रऋषी नानाजी देशमुख

"नानाजी एक ऐसे समाज-प्रेरक थे जिन्होंने देश के असंख्य दीन-दुखियों के चेहरों पर मुस्कुराहट बिखेरने में सफलता पाई। भारतीय ग्रामीण जीव...