विकास पांढरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विकास पांढरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० मार्च, २०१९

माझ्या जन्माची कहाणी -भाग २



माणसाचं आयुष्य हा फार कुतूहलाचा विषय असतो, हे सत्यच आहे. कारण ज्या गोष्टींच्या मागे असलेल्या रहस्यांची उकल आजवर होऊ शकलेली नाही, अश्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटणे अगदी साहजिकच आहे. एखाद्या वस्तूच्या मागे काही रोचक कथा आहे असे कळल्यानंतर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते,  जुन्या आठवणींचे गाठोडं डोळ्यांसमोरून जाता जात नाहीत. २६-२७वर्षांपूर्वीं घडलेली ही गोष्ट आहे.

एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला.आम्ही चौघेजण भावडं.दोन बहिणी,दोन भाऊ आणि मी शेंडेफळ. शेतकरी असलेले आमचे वडील म्हणजे नाना फारच कष्टाळू. नाना आणि आईचे कष्ट बघत,अनुभवत आम्ही मोठे झालो. हणम्या आणि नाग्याची शेतात नांगर मारणारी बैलजोडी होती. सात एकराच्या बरड जमिनीत जे पिकेल त्यात समाधान मानून आमचा सुखाचा संसार सुरू होता. पाच चुलते, चुलत भावडं एकाच वाड्यात गुण्यागोविंदाने राहत होतो, शेरडं, म्हशी, गायी, कुत्र्यांनी वाडा भरून जायचा. झाडलोट करायला बायांना दुपार व्हायची. शेतात गेल्यावर रम्य वाटायचं, पावसाळ्यात लवनातून पाणी झुळझुळ वाहतं असायचं, रानात साळीचं पिकं डोलत राहायचं, असे रम्य आणि मनोहर वातावरणाचा हेवा वाटायचा. सारं काही ठीक असताना माझ्या बाबतीत नियतीनं वेगळचं लिहीलं होतं.

***

पावसाळी दिवस होते...  सतत कोसळणार्‍या पावसाने आमच्या घरात एक वादळ घेऊनच आलं,त्या पावसात माझा जन्म झाला.. त्या रात्री घरी कुणीच नव्हतं, आईनं सर्व कळा सोसून मला जन्म दिला. नव्याचे नऊ दिवस संपले होते. मी थोडा चालू लागलो होतो. धरती हिरवी शाल पांघरून पावसाची मजा लूटत होती.आमच्या घरातल्या माणसाच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

काय ओ?ऐकताय का? "राच्याला पोराचं अंग तापानं फणफणलं होतं. तरीबी सरकारी दवाखान्याल्या सिसटरीन बाईनं त्याला इंजेक्शन दिलं.तीन-चार वरसतल्या लेकरासनला इंजेक्शन करत नसत्यात म्हणं? तरीबी माझ्या पोराला तिनं इंजेक्शनचं डोस दिल. सवा,आंबा (माझे चुलत भावड-सविता आणि आंबा ऊर्फ अनिल) अन् गावतली पोरं बघा त्यासनी डोस देऊनही ठणठणीत हायती. माझचं पोरगंच का लुळ होऊन पडलयं?" अश्या आर्त स्वरात आई नानाला म्हणाली.

नाना खाली मान घालून विचार करत होता. अस काय झालं असावं?  पोरगं लुळ होऊन का पडलंय? कुणाची चुक झाली? याचं उत्तर शोधत होता.

"गरीब माणूस हा नियतीच्या जात्यात भरडला जातो असं म्हणतात ते खरंच आहे. ह्या गरीबीमुळेचं ज्यांनी मला डोस दिला 'त्या'
सिसटरीन बाईला बोलण्याची हिंमत नानाकडं नव्हती. शेवटी जी गोष्ट घडून गेली तिचे परिणाम जाणवत असताना मग दाद कुणाकडे मागयची?

माझ्या कपाळावर हात ठेवत नाना म्हणाला,"माझ्या पोरानं कोणतं पाप केलंय की देवानं त्याला लुळ केलयं?" घर, शेत  विकू अन् पोराला बरं करू", असा धीर देत नानांनी आईला शांत करण्याचा प्रयत्न केला.

कणगीच्या बाजूला माचोळी होती. तिथं पोतं टाकून मला झोपवण्यात आलं होतं. माझा डावा पाय पूर्णपणे लुळा होऊन पडला होता. पायातली संवेदना संपली होती. आमचा वाडा वेशीत असल्यानं गावातल्या आयाबाया मला बघायचा यायच्या. कुणी पायाला हात लावलं तरी जाणीव होत नसायची.  ज्या त्या बाया माझ्या पायाला बघून डोळ्यातून पाणी काढायच्या. "पोराला दवाखान्यात दाखवा म्हणायच्या."

"काय ओ? तुमी दोन घास खा! अणदुर्‍याला सुभाष डॉक्टरकडं जावा. पोराला काय झालं इचारा."

"आई काळजीत नानाला बोलली."

नाना आईला होकार देत अणदूरला जायची तयारी करू लागला. नानाच्या खिश्यात पैशाची एक दमडी नव्हती. कोण हात उसणे पैसे द्यायला तयार होत नव्हतं. दुपार झाली होती. दिस माथ्यावर आला होता. नाना चितागत होऊन बसला होता. आईनं कुणाकडून तरी ३०रूपये आणले,तवा मग दवाखान्यात जाता आलं.

नानांनी मला उचलून खांद्यावर घेतलं. गावाच्या बसस्टॉपवर आलो, पण गाड्या थांबतच नव्हत्या. तासाभरानं एक गाडी थांबली. उमरग्याला जाणार्‍या माल ट्रकमध्ये बसून आम्ही अणदूरला आलो. अंगात मळकट शर्ट, दाढीचे खुंट वाढलेली, बारीक पांढरे केस, केविलवाणी डोळे, चेहर्‍यावरचा तणाव घेऊन डॉक्टर कस्तुरे ह्यांच्या समोर नाना उभा राहिला.

 दत्ता, कसं काय आलास? असं डॉक्टर सुभाष कस्तुरे म्हणाले.

डॉक्टर कस्तुरे आणि नानांची अगोदरची ओळख होती.
आमच्या गावातले बरेच लोक उपचारासाठी कस्तुरे डॉक्टरकडं येत. त्यामुळं डॉक्टर कस्तुरे हे बर्‍याच जणांना नावानिशी ओळखत.

पोरगं, "कालच्यापासनं लुळं होऊन पडलंय, डावा पाय उचलतच नाय, दोन पाऊल चाललं तर लगीच खाली पडतं. आमचा जीव भांड्यात पडलाय. काय करावं कायबी कळत नाय. माझं पोरगं चालेल पाहिजे,डॉक्टर? कितीबी खर्च येऊ द्या अगुदर पोरगं नीट करा?". असं नाना केविलवाण्या स्वरात डॉक्टरला बोलू लागला.

कधीपासून पोराचा पाय लुळा झाला? डॉक्टर कस्तुरे ह्यांनी माझ्या पायाला हात लावत नानाला विचारलं.

नाना गप्प.

नानाला काय बोलावं कळत नव्हतं. फक्त माझं पोरगं नीट करा?एवढचं पुटपुटत होता.

डॉक्टरानी मला तपासले, त्यांनी मला पोलिओ झाल्याचं सांगितलं. "ह्या आजारावर कुठलाच इलाज होत नाही. पोराला कायमच अपंगत्व आलंय. पण घाबरून जायची गरज नाही" असं डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांच्या उत्तरानं नानाचा चेहरा आणखीन उतरला. काय करावं? नानाला समजत नव्हतं. दुपारचं उन्हं तापत होतं.घसा कोरडा पडूनही नाना पाणी पीत नव्हता. माझ्या पोराचं कसं होईल? हाच प्रश्न नानाला छळत होता.

***

त्यादिवशी नाना उपाशीच होता. घराकडं आल्यावर रानातही गेला नाही. जनावरं दावणीला बांधली होती. चुलत्यानं चारापाणी केलं.

काय ओ? डोळे कशानं एवढं भरलं तुमचं?
काय झालं सांगा की,  डॉक्टरनी काय सांगितलं ? आई म्हणाली.

नाना शांत .

नाना दोन्ही पायात मुडकं घालून रडत होता. "आपला इक्याचा पाय नीट होणार न्हाय.कायमचा तो लुळाचं राहणार ह्याय" असं डॉक्टरनं सांगितलं. असं नाना रडक्या आवाजात आईला बोलू लागला.

सगळं आक्रीत घडल्याचं पाहून आईही ढसाढसा रडायला लागली. तिची वेदना कमी होत नव्हती, घरातला रडायचा आवाज ऐकून सगळ्या चुलत्या गोळा झाल्या. गावातली मालन आत्या आली. काल तरातरा चालणारं पोरगं, अचानक लुळं होऊन पडल्यानं त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.

आईला आधार देत सुभाकाकून डोळ्यांवरून पाणी शिंपडाला सांगितलं. बराच वेळ बाया-माणसं घरात बसली होती. नियतीच्या हातात हाय सगळं ?आपुण काय करावं? पोराच्या  वाट्याला आलेलं भोग हाय? असं आयाबाया बोलू लागल्या. अमुक करा, तमुक करा असं बाया एकमेकीत बोलत होत्या. मी ठिक व्हावं, खेळावं, चालावं ह्यासाठी आई आणि नाना पूर्णत: प्रयत्न करत होते. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी माझ्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले.

गावातल्याच एका वयोवृद्ध महिलेच्या सांगण्यावरून मला उकिरड्यात छातीपर्यंत पुरून ठेवण्यात आलं होतं. उकिरड्यातील ऊब पायाला चांगली असते ह्या समजुतीनं माझ्यावर काही दिवस हा प्रयोग सुरू होता. ह्या प्रयोगाचा माझ्या पायावर कसलाच असर झाला नाही शिवाय नीट चालूही शकत नव्हतो. माझा पाय नीट व्हावा यासाठी कुणी गाढवाचं दुध पाजा, कुणी डुकराचं तेल लावा असा सल्ला देऊ लागले. तेही प्रयत्न करून पाहिले, काही महिने माझ्या पायाला डुकराचं तेल लावण्यात होतं. मी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा यासाठी आईने अनेक रात्री जागून काढल्या होत्या. ती रात्रभर माझ्या पायाची मालीश करत बसायची, माझ्यामुळे तीन भावडांचे हाल झाले .

माझ्या अपंगत्वामुळं आई आणि नाना अधिकच चिंतेत पडले होते. आई शेताकडं जायची बंद झाली होती. शेतात काढणीला आलेलं हायब्रीड, बाजरी आणि तुरी नाना एकटाच काढायचा अन् रास घरी आणायचा. सगळं मिळून दोन तीन पोत्यांच्यावर धान्य निघायचं नाही. काही दिवस गेल्यानंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून मला सोलापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे  दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण परिस्थिती माणसाला हतबल करते ह्याची जाणीव माझ्या कुटुंबाला होत गेली. कारण घरात नानाशिवाय कमवत कुणीच नव्हतं.शेतात जे पिकेलं,त्यावर सर्वांचे पोट भरायचं. धान्य विकून खाणार काय? तरीही माझ्यावर उपचार करण्यासाठी नानांनी कोणतीही कसर सोडली नाही.
***
(उर्वरीत कहाणी पुढच्या भागात)

©विकास पांढरे ,९९७०४५२७६७

शनिवार, ११ मार्च, २०१७

माझ्या जन्माची कहाणी




      गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा नाही. म्हणजे दुःखाला कंटाळून बसणे हे मला आवडत नाही. पण आज मन मोकळं करतोय. यात मी कुठेही कल्पनाविलासाचा वापर केला नाही.

माझ्या जन्माची तारीख काय आहे ? वार कोणता ? वेळ काय ? याबाबची माहिती मला काय माझ्या जन्मदात्यानाही नीट सांगता येणार नाही. कारण संपूर्ण जीवन खूप गुंतागुंतीच्या प्रक्रियांनी बनलेले आहे. अठराविश्व दारिद्र्यात जन्माला आलेल्या माझ्या सारख्या इसमाला मास्तरांनी लावलेल्या जन्मतारीखवरच विसंबून राहावं लागतंय.

 १९८८चे वर्ष असावं.. श्रावण महिना..नागपंचमी जवळ आला होती..... वार शनिवार... अमावस्येची रात्र.... पाऊस धो धो कोसळत होता... वडील कुटुंबाची खळगी भरण्यासाठी शहरात कामाला गेले होते... त्या रात्रीच्या पावसाने तीन पञ्याच्या खोलीत पाण्याचा डोह उभारला होता... चिमणी मधेमधे बंद व्हायची.... अशावेळी आईची प्रसृतीची वेदना ही तीव्र झाल्या होत्या.... अशा या घरात आईला आधार देणारा माणूसच नव्हता.

आईनं कळा सोसत वाड्यातल्या चुलतीला खूप हाका मारल्या.. पण कुणीही जागं झालं नाही... तो पाऊसचं इतका भयानक होता...की घरातला आवाज बाहेर पडत नव्हता... नुसताच रिपरिप पावसाचा आवाज सुरू होता..आईची घालमेल झाली होती... काय करावं तिला कळेनासं झाले.. शेवटी सर्व वेदना सहन करून तिनं मला जन्म दिला.

पहाटेच्या वेळी पाऊस ओसरला होता... तेव्हा माझी आई बाहेर का येत नाही ? म्हणून चुलतीनं घरात डोकावून पाहिलं तर प्रसृतीचं चित्र दिसले. माझ्या अंगावर पावसाचं पाणी पडलं होतं. त्यामुळं मी थंडगार होऊन पडलो होतो. अंगावरची नाळ तशीच होती. आई ही त्या वेदनेतून बाहेर पडल्यानं माझ्याकडं पाहण्याची तिची शक्ती उरली नव्हती.

आयाबाया घरात आल्या.. मी जानवं घेऊन जन्माला आल्यानं खूप भाग्यवान आहे ? असं आयाबाया म्हणाल्या तर कुणी अमावस्येची राञ.... त्यात शनिवार त्यामुळं पोरगं चांगलं निघणार नाही ? असं त्या आतल्या आवाजात बोलू लागल्या.

पहाटे पाच सहा वाजता गावतल्या आत्याला कुणीतरी बोलावून घेतलं. तव्हा माझ्या अंगावरचं जानवं आणि नाळं तिनेचं काढलं.... चुलीवर गरम पाणी तपाला ठेवली पण सरपन पावसात भिजल्यानं चुल पेटतच होती.. कसबसं घासलेट टाकून तिनं पाणी तपावलं.. तिनंच दोघांना अंघोळ घातली. आईला चिमूटभर भात घातला.. घरातही पिठाचा कण नव्हता.. आईला त्या भाताच्या कण्या सुद्धा गोड लागत नव्हत्या..

त्या भयाण रात्री माझा जन्म झाला,असं माझ्या आईनं वीस वर्षापूर्वी सांगितलेली ही माझ्या जन्माची कहाणी. आज या गोष्टीचं स्मरण करताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

घरात शिकलेलं कुणीच नव्हतं.. पंचांग, जन्मकुंडली, नावरस नावं, शनि या गोष्टी पाहायच्या तर लांबच राहिल्या, त्यावेळी माझी जन्मतारीख लिहायलाही कुणाला वेळ मिळाला नाही ? कारण संपूर्ण कुटुंबचं अशिक्षित... तिथं कुठलं आलं ज्ञान ?

शेती पिकत नाही म्हणून नाना (बाप ) मिळेल ते काम करायचा. घरात दोनाची चार हात झाली होती. त्यामुळं पोटाची खळगी भरावी म्हणून तो महिना महिना बाहेर असायचा..

चार लेकरं सांभाळायची चिंता.. शेतात मूठभर दाणे निघायची नाहीत.. आई ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं कामाला जायची. मिळेल त्या पैशातून आपल्या पिलांना घास भरवित.. दिवाळी, दसरा कसा असतो ? माहीत सुद्धा नव्हता.

 पुढं मी रांगायला लागलो.. धडाधडा धावत होतो.. खेळत होतो,बागडत होतो.. अचनाक १९९२-९३ साली माझ्या अंगात भयंकर ताप आला... माझ्या गावात सरकारी दवाखाना होता पण डॉक्टर कधीच वेळेत नसतं.. आईनं, माझ्या अंगावरून मीठ मिरची उतरवली तरी काही झालं नाही...! परगावच्या, खासगी दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जवळ पैसेही नव्हते.

अंगात ताप वाढतच होता.. अन् मला पोलिओ झाला ! एक दोन काय झालं नाही ? काल धावणार पोरगं आज चालताना लगडत आहे हे पाहून त्यावेळी आई खूप रडली होती.

अन् उपाय करायला सुरुवात झाली.. मोठ्या दवाखान्यात दाखवण्यात नेण्यात येऊ लागले. बापानं,माझ्या पायासाठी लवकर इलाज व्हावा म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे शेअर्स अवघ्या पाच सहा हजारला विकले. आज या शेअर्सची किंमत तीन लाखाच्या घरात आहे, असो मी चांगलं चालावं यासाठी माझ्या पायाला राञराञ शेखत बसायची..! कुणाच्या तरी सांगण्यावरून माझा लंगडा पाय दोन तास उकिरड्यात पुरला होता. एवढं करूनही इलाज झाला नाही.

आजही ती माझ्या पायाला खूप जपते. कधी ओझं उचलू दिली नाही. माझ्या कुटुंबांचा आयुष्याचा बारोमास पावसावर अवलंबून असल्याने कधी पाऊस यायचा कधी नाही. त्यामुळं नानांनी शेताचा नांद सोडून दिला होता. आई आणि नानांनी मला खूप शिकवलं..

खूप हलाकीतून शिक्षण घ्यावं लागलं. माझ्या बहिणीला आणि भावाचं प्राथमिक शिक्षण देता आलं.मला ही कधी, पुस्तक, वह्या, कपडे कधी मुबलक मिळू शकले नाही. आठवीत असताना फक्त सहा वह्या मिळाल्या. दहावी कसाबसा पास झालो. अकरावी ते एम. ए पर्यंत एकाच कपड्यावर दिवस काढावे लागले. घासलेटच्या दिव्यावर एम.ए पर्यंत अभ्यास आणि वाचन केलो. एवढं असूनही महाविद्यालयात पहिला नंबरनी पास व्हायचो. याकाळात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. स्कॉलरशिपच्या पैशातून जवळपास ६०० पुस्तके खरेदी केली त्यातून लिखाणाची आवड निर्माण झाली. 

नानांना मी मास्तर व्हावं, अशी इच्छा होती. बी.एड च्या परीक्षेसाठी प्रयत्न करू लागलो. त्या अगोदर सेट नेटच्या सात आठ परीक्षा दिल्या होत्या. प्रत्येकी वेळी ८ -१० गुणांचा फरक पडत गेला. त्यामुळे बी.एड कडे वळलो. सीईटी परीक्षा दिली. चांगले मार्क मिळाले. पहिल्याच यादीत पुण्यातील एस.पी.महाविद्यालयाच्या आवारातील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नंबर लागला. 
महाराष्ट्रातलं सर्वात जुनं महाविद्यालय म्हणून लौकिक होता. प्रवेश अर्ज, फीसची तजबीज करु लागलो. त्याकाळी ८ हजार फीस होती. इतरांच्या दृष्टीनं ही फीस फार किरकोळ होती. माझ्या दृष्टीनं डोंगराएवढी होती. २०११-१२ चं वर्षे असावं. आमच्याकडं भयानक दुष्काळ पडला होता. शेतातून चिपटभरं दाणे सुध्दा निघाले नाहीत. त्यामुळे बीएड ला प्रवेश घ्यायचं नाही. असं मनोमनी ठरवलो.

नानांनी एका व्यापाऱ्याला माझ्या शिक्षणासाठी एक बैल सहा हजाराला विकल्याची बातमी कळली. मी रानात जाईपर्यंत व्यापाऱ्यानं तो बैल घेऊन गेला होता. नानांनी त्या बैलाचे सर्व पैसे माझ्या हातात दिले आणि पुण्याला जाण्यासाठी मनधरणी करू लागले. नाईलाजाने मी बीएडला प्रवेश घेतला. इकडून तिकडून पैशाची तजबीज करून कसाबसा बीएडला प्रवेश घेतला. पुण्यात शिक्षण घेताना खूप हाल झाले. इथल्या आठवणी नंतर कधी तरी सांगेन.

बीएडला चांगल्या गुणांनी पास झालो, माझा मुलगा मास्तर होणार मी आई आणि नाना खुश असतं. पण कुठलं काय ? कशात काय आणि फाटक्यात पाय? अशी गत झाली. दोन वर्षे सलग सगळीकडे अर्ज करत होतो. मास्तर होण्यासाठी १५-२० वीस लाख रूपये मोजावी लागतात, असा वाईट अनुभव मिळाला. ताण-तणाव वाढत गेला.

तीन वर्षापूर्वी सोलापुरात पूर्णवेळ पञकार झालो.
इथे माणसं ओळखायला शिकलो. मान्यवर संपादक आणि पञकाराची वाहवा वाहवा मिळवत लिहीत राहिलो. काहींनी इथेही घाण्याच्या बैलासारखा वापर केला. काहींना माझा कमकुवतपणा सांगून ही त्यांनी गैरविश्वास दाखवला.या क्षेत्रात काम करताना खूप तणाव येतो हे लक्षात आले. बस्स आता प्रामाणिकपणे काम करत रहायचं,पुढे दिवस काढत राहिलो.

सध्या आयुष्याला वेगळे वळण लागतं आहे. ते म्हणजे चांगले काहीतरी सकारात्मक लिहायचं. त्यासाठी चांगले व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे हीच माझी ऊर्जा आणि जन्मकुंडली असणार आहे. हीच माझ्या आयुष्याची कहाणी असणार आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( ११ मार्च २०१६ )
     

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...