ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असं राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाखापेक्षा जास्त झाडे लावून, तन, मन, आणि धनाने जागविणार्या विष्णू लांबा या वृक्षप्रेमी तरूणाच्या कार्याला सलाम ठोकले पाहिजे.
देशात पर्यावरणाबद्दल जागरूकता आलेली आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे. नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे. त्याबरोबरीने पर्यावरण वाचावे. जंगल नष्ट होऊ नयेत आणि वन्यप्राणी सुरक्षित राहावेत, यासाठी विविध समाज संस्थेकडून
प्रयत्नही होत आहेत. पर्यावरणात वृक्ष, प्राणी पक्ष्यांचे महत्वाचे स्थान आहे. पर्यावरणाचा समतोल राखावा, वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी राजस्थान सारख्या शुष्क वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाख झाडे लावून जगण्याचे अतुलनीय कार्य विष्णू लांबा या तरूणाने केले आहे.
इतकेच नाहीतर तब्बल नऊ लाख झाडे तोडण्यापासून वाचविणारा लांबा हे राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ात वृक्षपुरूष म्हणून ओळखले जात आहेत.
लहानपणी आजूबाजूच्या लोकांनी लावलेली झाडे चोरून आणून आपल्या भागात लावण्यात ते पटाईत होते. एवढेच काय त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या रोपवाटिकेतून झाडे चोरून आणून आपल्या घरी लावली.
लांबाचे काका यांनी त्यांना जिल्हाधिकार्यांच्या घरी घेवून गेले. त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी चोरी करणे वाईट आहे, मात्र झाडे लावणे चांगले आहे. असे म्हणत त्यांना काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी त्यांनी सात वर्षे घर सोडले. पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागले. समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल, त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. लांबा यांच्या कार्याचा विषय प्रथम लोकांनी थट्टेवारी नेला. पण त्यांच्या चांगुलपणाचा आणि निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व कळल्याने, लांबा यांच्या कार्यास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हाच लांबा आता राजस्थानच्या शुष्क वाळवंटात पर्यावरणाचा जतन करणारा आणि वृक्षलागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेणार्यासाठी आयकॉन बनला आहे.
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन, अजय देवगण, सुभाष घई, अनुराग कश्यप, अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे. तर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लांबा यांच्या कार्याचा गौरव केला आहे. वृक्षमिञ म्हणून ओळख असलेल्या लांबा यांनी प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना पाच झाडे भेट देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
हुंड्यात मागितली झाडे
लांबा यांच्या भावाच्या लग्नासाठी हुंडा किती घ्यावा यावर चर्चा सुरू होती. यावेळी लांबा यांच्या वडिलांनी विष्णू आमचा मोठा मुलगा आहे. हुंड्याचं त्यालाच विचारा असे सांगितल्यावर वधूकडील मंडळी अचंबित झाले. लांबा ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी जातात तिथे वधु वराच्या हस्ते वृक्षारोपण करवतात. त्यामुळे लांबा हे नाव राजस्थान मध्ये सर्वञ परिचित झाले आहे.
© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(जागतिक वन दिनानिमित्त २१ मार्च २०१६ रोजी दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख )
..........................................




