सोमवार, २० जून, २०२२

‘परिसांचा संग’-



सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी जी जी माणसे पाहिली, अनुभवली त्या माणसांच्या अंतरंगाचा पट ‘परिसांचा संग’ या पुस्तकात अतिशय आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने रंगवला आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या साहित्याचा, समाज जीवनाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांचे सर्वाथाने असणारे माणसांवरील प्रेम. लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न मानता त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली, जोडत आहेत.एकूणच  त्यांचा पिंडच ‘माणुसकी’ने भरलेला आहे.

 सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि माणसांबद्दलची ओढ यातून त्यांनी‘ परिसाचां संग’ या पुस्तकातून अनेकविध व्यक्तींचे दर्शन घडविले आहे. प्रभुणे यांची आत्मनिष्ठा ही निरामय, उत्कट व अविचल झालेली पहायला मिळते, त्यामुळे त्यांच्या या संग्रहात पुढील बाबी प्रकर्षांने जाणवतात.
१. व्यक्तींचे समाजातील स्थान व व्याप्ती
२. व्यक्तीचे समाजातील कार्य
३. व्यक्तीचा समाजावर होणारा परिणाम
४. व्यक्तीला सामाजिक दस्तऐवज म्हणून कसे पाहावे याचे दर्शन घडते.

प्रभुणे यांच्या जीवनात जी माणसे आली, मनावर अमीट असा ठसा उमठवला,त्या माणसाचे जीवन सौंदर्याचे ओळख करून देणे हाच या पुस्तकामागील मुख्य हेतू आहे. त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या विषयासाठी निवडलेल्या व्यक्ती या वेगवेगळ्या स्तरातल्या, विविध विचारधारेतल्या, पठडीतल्या निवडल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रभुणे यांनी या संग्रहातील सर्व व्यक्तीचे बाह्यांगाचा परिचय करुन न देता अंतरंगाची ओळख करून दिलेली आहे. 

त्यापैंकी मोरोपंत पिंगळे, किशाभाऊ  पटवर्धन, दत्तोपंत ठेंगडी, नाना नवले, बाळासाहेब देवरस, डॉ.अशोक कुकडे, रमेश पतंगे, नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे, आर.आर.पाटील, डॉ.कालबाग, डॉ.देवदत्त दाभोळकर, नरेंद्र जाधव, सुनील देशपांडे, भीमराव गस्ती, धर्मपाल, कवी ग्रेस, गो.नी.दांडेकर, आनंद यादव, रवींद्र शर्मा,  शाहीर आसाराम कसबे, इंदुमती काटदरे अशा ४३ व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेले लेख प्रस्तुत संग्रहात आहेत.

ही सारीच माणसं निर्विवादपणे मोठी आहेत. मात्र सगळ्यांच्याच कामाची हवी तशी दखल समाजाने घेतलेली नाही. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांच्या कामाची, त्यांच्यातल्या वेगळेपणाची माहिती असलेच, असे नाही. राजश्री काळे, सुजाता गणवीर, महादेव सरडे, रावसाहेब कुलकर्णी, डॉ.सुवर्णा रावळ, डॉ.कालबाग, शाहीर असाराम कसबे हे त्यातील ठळक उदाहरणे. पारधी समाजात जन्माला आलेल्या राजश्री काळे यांची कहाणी चित्तथरारक आहे. यमगरवाडीत त्यांना मिळालेली दिशा यातून राजश्री यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. आज त्या पुणे महानगर पालिकेच्या नगरसेविका आहेत. मूळच्या नागपूरच्या पण सध्या यमगरवाडीच्या मातीत रमून गेलेल्या सुजात गणवीर यांचे साधे-सरळ जगणे लेखकाला कसे आपलेसे वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. अनेेक गोष्टी शिकवत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अवितरपणे काम करणारे असंख्य संघ स्वयंसेवक एक प्रकारे समाजऋण फेडत असतात. महादेवराव सरडे व रावसाहेब कुलकर्णी हे त्यापैंकीच एक. या दोन व्यक्तींनी यमगरवाडी प्रकल्पासाठी घेतलेले कष्ट, सोसलेला संघर्ष प्रभुणे आपल्या सिद्धहस्त लेखनीतून सांगतात.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी पाबळच्या टेकडीवर विज्ञान आश्रम् सुरू करणारे व दुष्काळी भागात कौशल्यावर आधारित शिक्षणाचे प्रयोग करणारे व ‘ विज्ञान आश्रम’   या आगळ्यावेगळ्या आधुनिक गुरूकुलाचे जनक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांच्याबद्दलही सामान्य वाचकाला फारशी मिाहती नाही. डॉ.कलबाग यांनी यमगरवाडीला दिलेला भेट आणि यातून निर्माण झालेला स्नेहाचा धागा याविषयाीचे चित्रण वाचायला मिळते.

समाजाप्रती समर्पण भावनेने काम करणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व आर.आर.पाटील यांच्याविषयी आठवणी प्रभुणे आपल्या पुस्तकातून सांगितलेल्या आहेत. ‘संघात न आलेला स्वयंसेवक ’या शीर्षकातून  आर.आर.पाटी यांच्या ऋजू स्वभावाचे दर्शन घडविले आहे. पक्ष-विचारधारा याविषयी कोणताही भेद न करता आर.आर.आबांना गुरूकुलम संस्थेच्या मान्यतेचा आग्रह धरला, याविषयी मनस्वी व्यक्तिमत्वाच्या आबांच्या स्वभावातले अनेक पैलू प्रभुणे यांनी अत्यंत सुरेखपणे उलगडून दाखविले आहेत. सतत आपल्या कामात बुडालेले आणि सतत समाजाच्या भल्यासाठी सतत धडपड करणारे आर.आर.पाटील हे संघात कधीही न आलेले, शाखेत न आलेला संघ स्वयंसेवक म्हणून आबांचे वर्णन केलेले आहे.

देवदत्त दाभोळकर हे तसे समाजवादी. पण त्यांच्या जगण्यात कुठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेश नाही, विचारवंत असूनही अहंकाराचा कुठेही स्पर्श न झालेल्या या व्यक्तिमत्वाचे दर्शन प्रभुणे यांनी घडविले आहे. नितीन गडकरी, विनोद तावडे, लता मंगेशकर, सुनील देशपांडे, विष्णू वाकणकर, गो.नी.दांडेकर, सुभाष अवचट आदीं व्यक्तींचा मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न प्रभुणे यांनी केलेला आहे.

 नेटके आणि गोळीबंद लेखण करणारे प्रभुणे यांची लेखनशैली ओघवती, सच्ची, सुगम असल्याने, त्यांचे पुस्तक अगदी सामान्य वाचकाला आपलेसे करते. पुस्तकातील व्यक्तींचे रेखाचित्र आणि त्याला साजेशे शीर्षके हे पुस्तकाचे आणखीन एक बलस्थान. मराठी साहित्यात प्रथमच विविध विचारधारेतील, विषयांतील व्यक्तित्वाचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे. त्यामुळेच विषयाच्या वेगळेपणामुळे आणि अनुभवांच्या अस्सलपणामुळे, नेटक्या मांडणीमुळे हे पुस्तक सर्वांगानी उठून दिसते.

- विकास पांढरे,९९७०४५२७६७

परिसांचा संग
लेखक : पद्मश्री गिरीश प्रभुणे
प्रकाशन : साप्ताहिक विवेक
पृष्ठ संख्या : २००
मूल्य : ३००/-
संपर्क : ९५९४९६१८५८

गोड उसाची कडू कहाणी

 


दरसाल उसाचा हंगाम सुरू झाला की दोन प्रश्न नेहमी ऐरणीवर येतात - पहिला ऊस दर आंदोलनाचा आणि दुसरा अतिरिक्त ऊस गाळपाचा. यंदा राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ऊस गाळप हंगाम संपूनही मराठवाड्यात एक ते दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना आहे. या समस्येला नेमके जबाबदार कोण? याचे मूळ शोधणे गरजेचे आहे.

‘ऊस’ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक. राज्यात आर्थिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यात या पिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकतेमध्ये आणि साखरेच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल राहत आला आहे. महाराष्ट्रात एकूण 95 सहकारी आणि 93 खाजगी कारखाने आहेत, तर जवळपास 48 कारखाने बंद अवस्थेत आहेत. 1 जून 2022 अखेर राज्यात 1316.8 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 1369.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती मिळते. उसाचा सर्वसाधारण बारा महिन्यांचा कालावधी संपूनही मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आदीसह काही जिल्ह्यांतील ऊस फडातच आहे.

ही समस्या केवळ बिगर सभासदांची नाही, तर जे कारखान्याचे सभासद आहेत, त्याचीही हीच गत आहे. या समस्येमुळेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतरही काही भागात साखर कारखाना ऊस नेत नाही म्हणून काहींनी ऊस पेटवून दिला. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत गेली. सध्या त्या त्या भागातील कारखान्यांकडून तोडणीचे आश्वासन दिले जात असले, तरी मान्सून सुरू झाल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

अतिरिक्त ऊस गाळपासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून पडणार्‍या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 2022-23 या हंगामातही उसाचे क्षेत्र वाढेल, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केलीे. एक कारखानदार म्हणून उसाखाली किती क्षेत्र आणायचे? बंद पडलेले साखर कारखाने कसे सुरू करायचे? याविषयी ते बोलणे आवश्यक होते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी मूळ समस्येकडे दुर्लक्षच केले.



अतिरिक्त ऊस प्रश्न - एक अन्वयार्थ

सध्या प. महाराष्ट्रातील अतिरिक्त उसाचा प्रश्न संपला असला, तरी मराठवाड्यात हा प्रश्न गंभीर बनला आहे. अवर्षणग्रस्ततेचा कायमचा शाप असलेल्या या भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळेच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खात्रीचे उत्पन्न, उसाची ‘एफआरपी’ (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर) निश्चितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शेतीकडे वळत आहेत. 2021-22 हंगामात या विभागात सहा लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. या संपूर्ण उसाची भिस्त केवळ 58 कारखान्यांवर अवलंबून आहे.

यंदा सभासदांइतकीच बिगरसभासदांनी उसाच्या एकरी लागवडीत वाढ केली आहे. त्यामुळे कारखानदारांना ऊस तोडणीचे व गाळपाचे नियोजन करता आले नाही. त्याचबरोबर ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. परिणामी, मजुराअभावी शेतकर्‍यांचा ऊस फडातच राहिला. वाढत्या तापमानात काळात उसाला तुरे फुटले. पावसामुळे शेतकर्‍यांसमोर उसाच्या शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उभा राहिला असला, तरी आता गोड ऊस ‘कडू’ वाटत आहे. संपूर्ण ऊस गाळप झाला, तरीही यातून उत्पादन खर्च निघेल की नाही, याविषयी शंका आहे.


घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथील ऊस उत्पादक शेतकरी नारायण देवकाते म्हणाले, “गोदावरी पट्ट्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे राजेटाकळी, भादली, मंगू जळगाव परिसरात जवळपास 25 हेक्टरहून अधिक ऊस गाळपाविना शिल्लक आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस नाही झाला, तर बर्‍याच प्रमाणात ऊस गाळप होईल.”

एकूणच, अतिरिक्त ऊस गाळपाचे चक्र पावसावर अवलंबून आहे. येत्या काळात बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाले, तर अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उसाला कालव्याने पाणी दिले. मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण, उसासाठी होणारा पाण्याचा अपव्यव लक्षात घेता, या भागातील शेतकर्‍यांनी उसाशिवाय इतर नगदी पिके कशी घ्यावी, याविषयी धोरणकर्त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

विकास पांढरे

https://www.evivek.com/Encyc/2022/6/14/Sweet-sugarcane-The-story.html

राष्ट्रऋषी नानाजी देशमुख

"नानाजी एक ऐसे समाज-प्रेरक थे जिन्होंने देश के असंख्य दीन-दुखियों के चेहरों पर मुस्कुराहट बिखेरने में सफलता पाई। भारतीय ग्रामीण जीव...