शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६
राष्ट्रऋषी नानाजी देशमुख
"नानाजी एक ऐसे समाज-प्रेरक थे जिन्होंने देश के असंख्य दीन-दुखियों के चेहरों पर मुस्कुराहट बिखेरने में सफलता पाई। भारतीय ग्रामीण जीवन की समस्याओं, चुनौतियों और उनकी अंतर्निहित संभावनाओं की बारीक समझ के साथ ही नानाजी के हृदय में ग्रामीण बंधुओं के प्रति गहरी संवेदना थी। जहाँ तक सामाजिक विकास के बारे में नानाजी के प्रयोगों का प्रश्न है उनमें वह पूर्णतः खरे दिखाई पड़ते हैं। उन्होंने किसी बात से समझौता नहीं किया। यह नानाजी के बूते की ही बात थी कि उन्होंने ग्राम विकास के कार्य में दलों और मत-मतांतरों की सीमाएं लांघकर सभी दलों व विचारधाराओं के लोगों को एकसाथ लाकर खड़ा कर दिया"
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
एका भारतरत्नाने दुसऱ्या भारतरत्नाला दिलेली ही शब्दरूपी मानवंदना. हे उद्गार इतिहासाच्या पानांवर नोंदले जाण्याइतके महत्त्वाचे ठरतात.
खिशात दमडी नाही, डोक्यावर आई-वडिलांचे छत्र नाही; पण डोळ्यांत शिक्षणाचे स्वप्न आणि मनात राष्ट्रसेवेचा ध्यास. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत स्वतःचे आयुष्य घडवणाऱ्या आणि पुढे ग्रामविकासाच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या नानाजी देशमुख यांची जीवनकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षाही विलक्षण आहे.
चंडिकादास अमृतराव देशमुख म्हणजेच नानाजी देशमुख यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी तत्कालीन परभणी जिल्ह्यातील (सध्याचा हिंगोली जिल्हा) कडोली येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. घरची परिस्थिती बेताची, गावाजवळ शाळा नाही आणि शिक्षणाची वाटही खडतर. रिसोड येथे आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी वाशिमला गेले. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा परिचय झाला. शिक्षणाची ओढ एवढी की, शुल्क भरण्यासाठी आणि पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नसतानाही त्यांनी हार मानली नाही. १९३७ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा त्यांनी भाजीपाला विकून पैसे जमवले आणि राजस्थानातील पिलानी येथील बिर्ला महाविद्यालय गाठले. पिलानी येथे शिष्यवृत्ती मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, संघकार्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि स्वतःला संघकार्यासाठी वाहून घेतले. ग्रामीण भागातील मुलांनाही शिक्षणाची संधी मिळावी, या जाणिवेतून त्यांनी १९५२ मध्ये गोरखपूर येथे देशातील पहिले ‘सरस्वती शिशुमंदिर’ स्थापन केले. स्वतःच्या वाट्याला आलेल्या अडचणी इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, ही त्यांच्या कार्यामागील भूमिका होती.
पुढे १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली. नानाजींना पं. दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत पक्षकार्याची जबाबदारी मिळाली. त्यांनी संघटन उभारणीसाठी स्वतःला झोकून दिले. १९६८ मध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाली. नानाजींसाठी हा मोठा आघात होता. आपल्या मार्गदर्शकाच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांनी ‘दीनदयाळ स्मारक समिती’ स्थापन केली. तिचे नामकरण ‘दीनदयाळ शोध संस्थान असे करण्यात आले.
नानाजींची सामाजिक बांधिलकी पक्षीय सीमांमध्ये अडकलेली नव्हती. लोककल्याण आणि राष्ट्राचे सक्षमीकरण हे उद्दिष्ट समोर असेल, तर वेगवेगळ्या विचारांच्या प्रवाहांशी सहकार्य करण्याची त्यांची तयारी होती. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याशी नानाजींचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या विचारांचा नानाजींवर प्रभाव पडला. जयप्रकाश नारायण यांनी ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिली, तेव्हा नानाजींनी या आंदोलनाला पाठिंबा देत त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले, तेव्हा केंद्रीय उद्योगमंत्रिपदाची संधी चालून आली मात्र नानाजींनी ती नम्रपणे नाकारली. वयाची साठ वर्षे पूर्ण होताच सत्तेच्या राजकारणातूनही त्यांनी स्वतःहून निवृत्ती घेतली आणि गावांच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनातील ग्रामाधारित विकास आणि अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ध्यास घेतला.
गोंड्यातून ग्रामविकासाचा प्रयोग
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या बलरामपूर मतदारसंघातून नानाजी देशमुख निवडून आले, त्याच परिसरातील गोंडा हा अतिमागास जिल्हा त्यांनी ग्रामविकासाच्या प्रयोगांसाठी निवडला. त्या काळातील गोंडा-बलरामपूर या एकत्रित जिल्ह्यात थारू या आदिवासी जनजातीची मोठी लोकसंख्या होती. शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य आणि स्वावलंबनाची कमतरता यांमुळे या भागातील जनजीवन अनेक अडचणींनी वेढलेले होते. रावती आणि घाघरा या दोन नद्या परिसरातून वाहत असल्या, तरी सपाट भूभागामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी फारशी खोल नव्हती. मात्र, पाण्याची उपलब्धता असूनही शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. मागासलेपणाचे चित्र बदलायचे असेल, तर सुरुवात गावापासूनच केली पाहिजे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. शिक्षण, स्वास्थ्य, स्वावलंबन आणि सदाचार ही चार सूत्रे त्यांनी ग्रामविकासाचा आधार मानली. या सूत्रांच्या बळावर गावातील माणूस सक्षम व्हावा, त्याने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि गावाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी, यासाठी नानाजींनी गोंड्यात आपल्या कार्याचा पाया घातला.
सर्व अडचणी ओळखून नानाजींनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षण केले. जिल्ह्यातील २५ पैकी २० विकासखंडांत भूजल उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २० हजार कूपनलिका खोदण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या योजनेत नानाजींनी स्थानिक परिस्थितीला साजेसा अभिनव मार्ग शोधला. लोखंडी पाइपऐवजी पोकळ बांबूच्या नलिका वापरण्याची कल्पना पुढे आली. त्यामुळे पाइपलाइनच्या खर्चात दोन तृतीयांश बचत शक्य झाली. तसेच छोट्या शेतकऱ्यांचे गट तयार करून एका शेतात पंप बसवायचा आणि माफक भाड्याने शेजारच्या शेतांना पाणी द्यायचे, अशी व्यवस्था आखण्यात आली. सरकारी अनुदान आणि बँकांच्या कर्जाच्या मदतीने शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यात आले. प्रत्येक विकासखंडात दोन याप्रमाणे ५० प्रशिक्षित कार्यकर्त्यांची ‘ग्राम संयोजक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नानाजींनी ग्रामोदयात सुधारित बियाणे, कृषी संशोधन, पीक उत्पादनवाढ, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती यांनाही त्यांनी समान महत्त्व दिले. जयप्रभा ग्राममधील प्रयोगांच्या आधारे भात, डाळी, भाजीपाला आणि गव्हाच्या सुधारित जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गोंड्यातील प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे केळी लागवड. परिसराचे हवामान अनुकूल नसल्याची भूमिका सरकारी यंत्रणेने घेतली असताना, जयप्रभा ग्रामने केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. पुढे गोंडा जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होऊ लागली.शेतीतील उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ लागली. रोजगाराच्या संधी वाढल्याने मजुरीच्या दरातही वाढ झाली. या कार्याची दखल देश-विदेशांत घेतली गेली.
२५ नोव्हेंबर १९७८ रोजी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी गोंड्याला भेट दिली. आदिवासी बांधवांसोबत जमिनीवर बसून पत्रावळीवर भोजन करणाऱ्या राष्ट्रपतींचे दृश्य ग्रामविकासातील सामाजिक समरसतेचे प्रतीक ठरले.
गोंडा ग्रामोदय प्रकल्पांतर्गत चार कृषी विज्ञान केंद्रे कार्यरत झाली. आरोग्यविषयक पाहणीत परिसरात रातांधळेपणाचे प्रमाण मोठे असल्याचे आढळले. त्यावर उपाय म्हणून शेवग्याच्या शेंगा आणि पानांचा आहारात वापर करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली, तसेच सुमारे हजारो वृद्धांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ग्रामीण भागात सहज उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘दादी माँ का बटुआ’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सामान्य आजारांवरील २६ प्रकारच्या औषधांचा समावेश असलेला औषधी बटवा ५०० हून अधिक गावांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला. स्थानिक आरोग्यसेवकांमार्फत माफक दरात औषधे मिळू लागली. त्यामुळे ग्रामस्थांना जवळच प्राथमिक उपचार मिळाले, तर स्थानिकांना रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले. पारंपरिक दाईंना प्रसूतीविषयक प्रशिक्षण आणि सुरक्षित साधने देऊन मातृआरोग्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.शिक्षण आणि कौशल्यविकास हेही या प्रकल्पाचे महत्त्वाचे आधार ठरले. जयप्रभा ग्राम आणि इमलिया कोडर येथील वसतिगृहांत थारू जनजातीची मुले शिक्षण घेऊ लागली. पशुपालन, फलोद्यान, वनौषधी निर्मिती, यंत्रदुरुस्ती, शिवणकाम आणि भरतकाम अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले.
नानाजींच्या गोंडा ग्रामोदय प्रकल्पाने हीच विकासाची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणली. या प्रयोगातून मिळालेली प्रेरणा पुढे चित्रकूटसह देशातील विविध भागांत ग्रामविकासाच्या उपक्रमांना दिशा देणारी ठरली.
चित्रकूट मॉडेल
गोंड्याचे कार्य संपवून अवघे सामान एका छोट्याशा पिशवीत बांधले आणि आपला मोर्चा वळवला तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवरील चित्रकूटकडे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर व मंदाकिनीच्या पवित्र तीरावर राष्ट्रचेतनेचा ध्यास घेतलेल्या या आधुनिक दधीचीने आपले अवघे जीवन ग्रामविकासासाठी समर्पित केले. स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी झिजण्यातच जीवनाचे सार आहे, हा विचार त्यांनी कृतीतून जगून दाखवला.
खरे पाहता, नानाजींच्या चित्रकूट आगमनामागे स्वामी भगवानंद यांचे निमंत्रण हा महत्त्वाचा धागा होता. नानाजींनी गोंडा येथे उभारलेल्या ग्रामविकास प्रकल्पाचे काम स्वामीजींनी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी नानाजींना चित्रकूटमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.
चित्रकूटमध्येच स्वामी भगवानंद यांचा आश्रम होता. नानाजींच्या ग्रामविकासाच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी त्यांनी आपल्या मठाची तब्बल १६० एकर जमीन या कार्यासाठी उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे स्वामीजींच्या निमंत्रणातून आणि सहकार्यातून चित्रकूटमधील ग्रामविकासाच्या कार्याला भक्कम पायाभरणी मिळाली.
चित्रकूटचा परिसर फिरताना नानाजींना ग्रामीण जीवनाची दाहक वास्तवता जवळून अनुभवायला मिळाली. गावागावांत ना वीज, ना धड रस्ते, ना रुग्णालये आणि ना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था. अशिक्षितपणा आणि उपासमारीशी झुंजणारा ग्रामीण समाज, दिवसेंदिवस खालावत चाललेली शेती आणि घटत चाललेली पशुधनाची संख्या गावांचे चित्र निराशाजनक होते. मात्र, नानाजींनी या परिस्थितीपुढे हात टेकले नाहीत उलट, याच वास्तवात परिवर्तनाच्या नव्या वाटा शोधल्या. ग्रामविकासाचा आराखडा आखला. याच ध्यासातून १९९१ मध्ये चित्रकूट येथे महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाची ( भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ) स्थापना झाली. ग्रामीण विकासाला समर्पित असलेल्या या विद्यापीठाचे नानाजी पहिले कुलगुरू झाले. गोंडामध्ये ग्रामविकासाचे यशस्वी प्रयोग करताना मिळालेला अनुभव नानाजींनी चित्रकूटमध्येही उपयोगात आणला. मंदाकिनी नदीच्या उत्तर तटावर चित्रकूट विद्यापीठ आणि नानाजींच्या विविध प्रकल्पांचा विस्तीर्ण परिसर उभा आहे. नानाजींनी मंदाकिनीच्या दोन्ही तटांवर घाट बांधून घेतले, तसेच नदीवर बंधाराही उभारला. या कामांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडलीच; शिवाय आधुनिक शिक्षण, कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करून त्यांनी आधुनिक कृषितंत्रज्ञान आणि ग्रामविकासाचे एक वेगळे विश्व उभे केले.
उद्यमितेच्या माध्यमातून नानाजींनी ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे दालन खुले केले. शेतमाल प्रक्रिया, आयुर्वेदिक औषधनिर्मिती, पंचगव्य, गोमूत्र प्रक्रिया, कुटीर उद्योग आणि लघुउद्योग अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू केली. गावातील उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.
आयुर्वेद रसशाळेत पारंपरिक औषधे आणि विविध काढे तयार केले जातात. त्याचबरोबर ग्रंथालयाच्या विस्तीर्ण परिसरातील बागेत पारंपरिक वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या पारंपरिक औषधी ज्ञानाचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच ‘दादी माँ का बटुआ’ ही संकल्पनाही पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शेतीच्या विकासासाठी केवळ प्रशिक्षण पुरेसे नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधणेही आवश्यक आहे. हीच भूमिका ठेवून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ५०० गावांमध्ये माती परीक्षणाची मोहीम राबवण्यात आली. मातीचा पोत, तिची सुपीकता आणि स्थानिक शेतीतील अडचणी लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना सुचवण्याची यंत्रणा उभी करण्यात आली.
समाजशिल्पी अभियान
गावाचा विकास करायचा, तर गावात राहून गावकऱ्यांच्या सुख-दुःखाशी नातं जोडायला हवं. त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि त्यांच्याच सहभागातून परिवर्तनाची वाट शोधायला हवी. हाच विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नानाजी देशमुख यांनी १९९४ मध्ये ‘समाजशिल्पी दाम्पत्य अभियान’सुरू केले. ग्रामविकासासाठी पती-पत्नीने एकत्रितपणे गावात राहून काम करण्याची ही अनोखी संकल्पना होती.
अभियानाच्या सुरुवातीला ४० दाम्पत्यांना वेगवेगळ्या गावांमध्ये पाठविण्यात आले. भरत पाठक आणि त्यांच्या पत्नी नंदिता पाठक यांचाही त्यात समावेश होता. या दाम्पत्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक झाले. पुढे भरत पाठक यांनी दीनदयाळ शोध संस्थानचे संघटन सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली, तर नंदिता पाठक सध्या ‘गंगा समग्र’च्या दिल्ली प्रांताच्या संयोजक म्हणून कार्यरत आहेत.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे एका दाम्पत्याकडे पाच वर्षांच्या कालावधीसाठी पाच गावे दत्तक दिली जातात. या काळात दाम्पत्य गावकऱ्यांशी संवाद साधते, त्यांच्या अडचणी समजून घेते आणि स्थानिक सहभागातून त्या सोडविण्याचा प्रयत्न करते. पती गावातील पुरुषांच्या समस्या, शेतीविषयक अडचणी आणि कृषिविषयक मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळतात. पत्नी महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रकारे कुटुंब, शेती आणि समाजजीवनाशी संबंधित प्रश्नांवर दोघेही एकत्रितपणे काम करतात. या अभियानासाठी पदवीधर दाम्पत्यांची निवड केली जाते. चित्रकूट परिसरातील ५१२ गावांमध्ये ग्रामविकासाची संकल्पना रुजविण्याच्या व्यापक प्रयत्नांचा समाजशिल्पी दाम्पत्य अभियान हा महत्त्वाचा भाग आहे.
गावाचा विकास म्हणजे बाहेरून कुणीतरी येऊन बदल घडविणे नव्हे, तर गावकऱ्यांमधील सुप्त शक्ती जागी करून त्यांना स्वतःच्या विकासाचे शिल्पकार बनविणे हाच नानाजींच्या ग्रामविकासाच्या विचाराचा गाभा. गावाशी नातं जोडायचं, माणसं जोडायची आणि लोकसहभागातून परिवर्तनाची चळवळ उभी करायची, हा संदेश समाजशिल्पी दाम्पत्य अभियानाने दिला. या विचारातून प्रेरणा घेऊन आजवर अनेक समाजसेवक स्वयंप्रेरणेने समाजकार्यात उतरले.
सुमारे तीन दशकांपूर्वी सुरू झालेले भरगॅंवा केंद्र आज स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दिशेने विकसित झाले आहे. बी-बियाण्यांपासून माती परीक्षणापर्यंत आणि पशुधन संवर्धनापासून शेतीतील प्रयोगांपर्यंत विविध क्षेत्रांत केंद्राने प्रगती साधली आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे, नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देणे आणि शेती अधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणे, अशा कामांतून केंद्राने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
नानाजींच्या प्रेरणेतून सोनभद्र (उत्तर प्रदेश) येथील गोविंद आश्रम, अहमदाबादमधील वानप्रस्थी प्रकल्प आणि बीड जिल्ह्यातील सोनदरा गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी, ग्रामोद्योग, योग आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत ग्रामविकासाची चळवळ रुजवली जात आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कोणताही गाजावाजा न करता, जाहीर कार्यक्रमाचा सोपस्कार टाळून या प्रकल्पाला भेट दिली होती. दोघांच्याही ध्येयाच्या केंद्रस्थानी होता तो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्म मानवतावाद. तो प्रत्यक्ष कृतीत उतरवून भारताच्या सर्वांगीण उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न या दोघांनीही केला. थोर शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना नानाजी देशमुख आणि ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याविषयी नितांत आदर होता. या दोन द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांच्या अनेकदा भेटी झाल्या. या भेटींमधून विचारांची देवाणघेवाण झाली आणि ग्रामविकासाच्या स्वयंपूर्ण प्रारूपाविषयीची दृष्टी अधिक समृद्ध झाली.
२००५ मध्ये डॉ. कलाम यांनी चित्रकूट येथील दीनदयाळ संशोधन संस्थेच्या प्रकल्पाला भेट दिली. या वेळी त्यांनी नानाजी देशमुख यांच्याशी संवाद साधत त्यांच्या ग्रामविकास कार्याची माहिती घेतली. स्वयंपूर्ण गावांची निर्मिती आणि ग्रामीण भारताच्या विकासासाठी नानाजींनी उभे केलेले प्रारूप डॉ. कलाम यांना विशेष भावले. त्यांनी आपल्या ‘टार्गेट ३ बिलियन’ या पुस्तकातही नानाजींच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. दीनदयाळ संस्थेच्या या प्रयत्नांमुळे चित्रकूट परिसरातील सुमारे ८० गावे जवळजवळ न्यायालयीन वादांपासून मुक्त झाली होती. गावकऱ्यांनी एकमताने ठरवले होते की, गावातील कोणताही वाद न्यायालयात नेण्याऐवजी तो गावातच सामंजस्याने सोडवायचा.आपापसांत भांडण्यात वेळ घालवण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी तो खर्च केला पाहिजे,’ हा नानाजींच्या कार्यामागील विचार डॉ. कलाम यांना विशेष भावला.
प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी नानाजी देशमुख यांच्या ‘गोंडा प्रकल्पा’सह शंभर ग्रामदानी खेड्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘गोविंदपूर आश्रमा’च्या कार्याची शोधयात्रा ‘प्रकाशवाटा’ या रोजनिशीतून उलगडली आहे. या पुस्तकाविषयी कुसुमाग्रजांनी केलेले भाष्य नानाजींच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. ते लिहितात, ‘काळोख खूप आहे. पण त्यात प्रकाशाची बेटेही आहेत. त्यांचे दर्शन घडवणे हे महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य आहे.’
नानाजी देशमुख यांचे कार्य म्हणजे ग्रामीण भारताच्या अंधारलेल्या वाटांवर विकासाचे दीप प्रज्वलित करणारी प्रकाशयात्राच. ग्रामविकास, स्वावलंबन आणि समाजपरिवर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केलेल्या या प्रकाशवाटा आजही नव्या भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरतात.
-विकास पांढरे, मुंबई
भ्रमणध्वनी:९९७०४५२७६७
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
कृषी ग्रामसमृद्धीचा गांधीमार्ग
एकदा सरकारने गांधीजींवर राजद्रोहाची केस केली होती.अहमदाबादच्या न्यायलयात काम चालू झाले.न्यायलयातील न्यायाधीश नाव तर विचारणारच ना ?"तुमचे नाव काय ?"
"मोहनदास करमचंद गांधी."
"कुठले राहणारे ?"
"सत्याग्रहाश्रम साबरमतीचे."
"कसला व्यवसाय?"
"विणकर व शेतीचा."
हे शेवटचे उत्तर ऐकून न्यायाधीश चकित झाले. उपस्थित लोकही गांधीजींकडे पाहत राहिले.
( संदर्भ: गांधीजी : जुगतराम दवे, पृष्ठ क्रमांक ७ ; नवजीवन प्रकाशन)
शाश्वत विकास हा राष्ट्रउभारणीचा खरा पाया असतो. महात्मा गांधींच्या कृषी आणि ग्रामविकासाच्या विचारांमध्ये या शाश्वततेचा धागा ठायीठायी जाणवतो. गाव स्वयंपूर्ण, सक्षम आणि समृद्ध झाले, तरच राष्ट्राची पायाभरणी भक्कम होईल, असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच शाश्वत विकासाची दिशा दाखविताना गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा मूलमंत्र दिला. गावाच्या विकासातून राष्ट्रविकास साधण्याची ही गांधीवाट आजही तितकीच महत्त्वाची ठरते.
काठेवाडातील पोरबंदरच्या मातीत २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधींचा जन्म झाला. वडील करमचंद गांधी पोरबंदर संस्थानचे दिवाण.सातव्या वर्षी राजकोटला गेलेल्या बुजऱ्या मोहनदासांच्या मनात मात्र विचारांची वेगळीच पालवी फुटत होती.इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेऊन १८९१ मध्ये ते बॅरिस्टर झाले. १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे पोहोचताच वर्णभेदाचे चटके बसू लागले. कोर्टातील पागोट्यापासून मारित्सबर्गच्या रेल्वे डब्यापर्यंत झालेल्या अपमानाने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. अन्यायाविरुद्ध संघटित संघर्ष उभारताना मोहनदास घडत गेले. १८९७ मध्ये भारतावर दुष्काळाचे संकट कोसळले. संकटातून सावरत असतानाच १८९९ मध्ये पुन्हा एकदा तीव्र दुष्काळाने देशाला कवेत घेतले. या कठीण काळात गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असले, तरी त्यांचे मन मात्र भारतभूमीशी जोडलेले होते. भारतातील दुष्काळग्रस्तांच्या वेदना त्यांनी तेथेही मांडल्या आणि दक्षिण आफ्रिकेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. देशापासून हजारो मैल दूर असूनही भारतातील दुःखाशी नाते जोडणारी त्यांची ही संवेदनशील भूमिका पुढे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाभावाची एक महत्त्वाची खूण ठरली. पुढे जगाला ‘महात्मा’ मिळाला.
जानेवारी १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाची शिदोरी घेऊन ते भारतात परतले. देश समजून घेतल्यानंतर १९१७ मध्ये फिजीच्या मळ्यांसाठी सुरू असलेल्या मुदतबंदीच्या मजुरीविरोधात त्यांनी सरकारला सत्याग्रहाचा इशारा दिला. दबावाची दखल घेत सरकारने ही पद्धत बंद केली. भारतभूमीवर सत्याग्रहाचा हा पहिला प्रभावी विजय ठरला.
चंपारण्य लढा
लखनौ काँग्रेसचे अधिवेशन सुरू होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिनिधींच्या गर्दीत बिहारमधील काही प्रतिनिधी गांधीजींना भेटले. त्यांच्या मनात एकच वेदना होती चंपारण्यातील शेतकऱ्यांची.
निळीच्या मळेवाल्यांकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या कहाण्या त्यांनी गांधीजींसमोर मांडल्या. शेतकऱ्यांची अवस्था ऐकून गांधीजींनी चंपारण्यात जाऊन परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याचा निर्णय घेतला.एप्रिल १९१७ मध्ये गांधीजी चंपारण्यात मोतीहारी येथे पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांना भेटायला बोलावले आणि त्यांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षांचा अन्याय दिसत होता आणि त्यांच्या शब्दांत दडपलेल्या वेदनेला वाट मिळत होती.गांधीजींची ही उपस्थिती मात्र सरकारला अस्वस्थ करणारी ठरली. तेथील मॅजिस्ट्रेटने गांधीजींना जिल्हा सोडण्याचा आदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे होते.आता गांधीजींसमोर दोन मार्ग होते सरकारचा आदेश मानायचा किंवा अन्यायाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे. त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. सत्याच्या शोधात निघालेला माणूस अन्यायाच्या आदेशापुढे कसा झुकणार?
गांधीजींनी जिल्हा सोडण्याचा आदेश मानण्यास नकार दिला. ब्रिटिश सरकारच्या युद्धप्रयत्नांना मदत केल्याबद्दल त्यांना मिळालेले ‘कैसर-इ-हिंद’ हे सुवर्णपदकही त्यांनी परत केले.अखेर गांधीजींना अटक झाली आणि त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाच्या कठड्यात उभा असलेला हा माणूस मात्र अजिबात विचलित झाला नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप मान्य केला. एवढेच नव्हे, तर आपल्या कृत्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी न्यायाधीशांसमोर मांडली.या भूमिकेमुळे सरकारचीच कोंडी झाली. गांधीजींना शिक्षा करावी, तर चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणे कठीण होते; आणि शिक्षा करू नये, तर गांधीजींच्या नैतिक भूमिकेसमोर सरकारला माघार घ्यावी लागणार होती.अखेर सरकारने खटला मागे घेतला. गांधीजींना चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची आणि त्यांच्या समस्यांची चौकशी करण्याची परवानगी मिळाली. येथून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सत्याग्रहाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
चंपारण्यातील या सत्याग्रहाने गांधीजींच्या नेतृत्वाची ताकद शेतकऱ्यांसमोर उभी केली. बिहारमधील जनतेत आणि विशेषतः शेतकरी वर्गात गांधीजींविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला.चंपारण्यात गांधीजींनी केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केले नाही, तर ग्रामजीवन सुधारण्यावरही भर दिला. गावशाळा आणि गावसफाईबरोबरच त्यांनी गोरक्षणाचे कामही हाती घेतले. याठिकाणी गोवंशाची वाढ व सुधारणा करणे, बैलांकडून योग्य पद्धतीने शेतीची कामे करून घेणे आणि गोशाळांचे आदर्श दुग्धालयात रूपांतर करणे, अशा विविध कामांचा त्यात समावेश होता. या कामासाठी काही मारवाडी बंधूंनी गांधीजींना भरघोस मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गांधीजींना चंपारण्यात दीर्घकाळ राहता न आल्याने हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. बेत्तियामधील गोशाळा मात्र आजही सुरू आहे.
खेडा सत्याग्रह
गुजरातमधील खेडा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट दाटून आले होते. पिके करपली होती, शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचा कणही उरला नव्हता. अशा परिस्थितीत ‘फॅमिन कोड’ या कायद्यानुसार शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यातून सूट मिळणे हा त्यांचा हक्कच होता. मात्र, सरकारी यंत्रणेने वास्तवाकडे डोळेझाक केली. खोटे अहवाल तयार करून शेतकऱ्यांना सारा-सूट नाकारली जात होती.
अन्यायाची ही कहाणी गांधीजींपर्यंत पोहोचली आणि फेब्रुवारी १९१८ मध्ये त्यांनी खेड्याच्या प्रश्नात लक्ष घातले. शेतकऱ्यांच्या वेदनेला त्यांनी आपल्या सत्याग्रहाची दिशा दिली. ‘सारा भरायचा नाही’ या निर्धारातून साराबंदीची चळवळ उभी राहिली..गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकरी ठामपणे उभे राहिले. दबाव वाढत गेला आणि अखेर ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले. शेतकऱ्यांना सारा-सूट देण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले.
हिंदुस्थानच्या मातीत रुजू शकणारे, सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी प्रभावी ठरणारे एक अमोघ अस्त्र गांधींनी जनतेच्या हाती दिल्याचा विश्वास निर्माण झाला. या विश्वासातून गांधींची लोकप्रियता अधिकाधिक विस्तारत गेली आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला जनशक्तीची नवी दिशा मिळू लागली.
पुढे जीवनावश्यक वस्तूवर लादलेल्या कराविरोधात गांधीजींनी मिठाला सत्याग्रहाचे अस्त्र बनविले. १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून ७८ सहकाऱ्यांसह सुरू झालेली दांडी यात्रा २४ दिवसांत ३८५ किलोमीटरचा पायी प्रवास करून ६ एप्रिलला दांडीच्या समुद्रकिनारी पोहोचली. गांधीजींनी समुद्रातून मीठ उचलून ब्रिटिश कायद्याचा भंग केला आणि देशभर सविनय कायदेभंगाची लाट पसरली.
गांधींचा ग्रामोद्योग मंत्र
‘हरिजन’च्या १ मार्च १९३५च्या अंकात गांधीजींनी ग्रामोद्योगाचा विचार मांडताना एक अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित केला खेड्यांचे शोषण थांबविल्याशिवाय त्यांचे पुनरुज्जीवन कसे होणार?
गांधीजींना वाटत होते की, खेड्यांतील उद्योगधंदे आणि कारागिरी नष्ट होण्यात शहरवासीयांचाही वाटा आहे. त्यामुळे त्याचे प्रायश्चित्तही शहरवासीयांनीच घ्यावे.गावकऱ्यांच्या हाताला काम द्यावे आणि त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ द्यावी.यासाठी मोठमोठ्या योजना, प्रचंड भांडवल किंवा सरकारी मदतीची गरज नाही. गरज आहे ती फक्त मनोवृत्ती बदलण्याची. गांधीजींच्या मते, घरात लागणारी अशी कोणतीही वस्तू नाही, जी गावकरी पूर्वी बनवत नव्हते किंवा आज बनवू शकत नाहीत. त्यांच्या हातातील कौशल्याला बाजार मिळाला, तर लक्षावधी रुपयांचे उत्पन्न पुन्हा गावांकडे वळू शकते. महत्त्वाचे म्हणजे आधुनिक यंत्रसामग्रीला गांधीजींचा सरसकट विरोध नव्हता. यंत्रे गावकऱ्यांच्या हातात असावीत, त्यांच्या श्रमाला बळ द्यावे; मात्र माणसाच्या शोषणासाठी यंत्रांचा वापर होऊ नये, एवढीच त्यांची भूमिका होती.
१९०८ सालापर्यंत गांधीजींनी चरखा किंवा माग जवळून पाहिलाही नव्हता. तरीही ‘हिंद स्वराज्य’मध्ये त्यांनी भारताच्या दारिद्र्यावरचा एक महत्त्वाचा उपाय म्हणून चरख्याकडे पाहिले. देशातील सामान्य माणसाच्या हाताला काम मिळाले, घराघरांत सूत कातले गेले आणि स्वदेशी वस्त्रनिर्मितीला चालना मिळाली, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळू शकते, असा त्यांचा विश्वास होता.विचार मांडून गांधीजी थांबले नाहीत. आपण जे सांगतो, ते आधी स्वतः आचरणात आणले पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी स्वतःच्या वस्त्राबाबत प्रयोग सुरू केला. हाताने कातलेल्या सुतापासून, हातमागावर विणलेले कापड वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
याच प्रयत्नांतून तत्कालीन बडोदा संस्थानातील विजापूर येथून चरखा मिळवण्यात आला. चरखा आश्रमात आला आणि गांधीजींच्या स्वदेशीच्या विचाराला जणू एक साधनच मिळाले आणि पुढे खादीची चळवळ आकाराला आली.
आदर्श गाव
आदर्श गावाची संकल्पना मांडताना गांधीजींनी ‘हरिजन’ च्या ९ जानेवारी १९३७च्या अंकात ग्रामजीवनाचे सुंदर चित्र उभे केले. त्यांच्या कल्पनेतील गाव स्वच्छ, निरोगी आणि स्वावलंबी असावे. स्थानिक साधनसामग्रीतून उभारलेली प्रकाशमान घरे, मोकळे अंगण, गुरांसाठी जागा आणि भाजीपाल्याची बाग असावी. स्वच्छ रस्ते, सर्वांसाठी खुल्या विहिरी, प्रार्थनागृह, सभास्थळ, गुरचरणाची जमीन, सहकारी दुग्धसंस्था, उद्योग-कौशल्याधारित शाळा आणि तंटे मिटविणारी पंचायत असावी. गावाने स्वतःच्या गरजेपुरते धान्य, भाजीपाला, फळे आणि खादी निर्माण करावी.
गांधीजींच्या मते ग्रामविकासाची पहिली पायरी म्हणजे सार्वजनिक स्वच्छता. ग्रामसेवकाने स्वतः झाडू हाती घेऊन कचरा गोळा करावा, त्याचे खत बनवावे आणि ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे. ‘आपले गाव आपणच घडवायचे’, हा त्यांच्या ग्रामस्वराज्याचा मूलमंत्र होता.
सोनखताची कल्पना
‘कंपोस्ट’ अर्थात सोनखताबद्दल विचार मांडताना त्यांनी माणूस आणि जनावरांचे मलमूत्र, केरकचरा यांचा योग्य वापर करण्यावर भर दिला.मलमूत्र आणि सेंद्रिय कचरा योग्य पद्धतीने एकत्र करून खड्ड्यात कुजवला, तर त्यातून तयार होणारे उत्तम सोनखत जमिनीला मिळते. हे खत म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने अक्षरशः मातीचे सोने. ज्या जमिनीला ते मिळेल, तिचा कस वाढणारच, असा गांधीजींचा विश्वास होता.
त्यांच्या दृष्टीने सोनखत तयार करणे हा केवळ स्वच्छतेचा उपाय नव्हता, तर एक महत्त्वाचा ग्रामोद्योग होता. घरातून आणि गोठ्यातून दररोज बाहेर पडणारा केरकचरा व घाण जर योग्य रीतीने खड्ड्यात पुरून पुन्हा खताच्या रूपाने शेतात पोहोचवली, तर कचऱ्याची विल्हेवाटही लागेल आणि जमिनीची सुपीकताही वाढेल.गांधीजींचा विश्वास होता की, कोट्यवधी भारतीयांनी या कार्यात मनापासून सहभाग घेतला, तर देशातील धान्यटंचाई दूर होऊन गरजेपेक्षा अधिक धान्य उत्पादन करण्याची क्षमता भारतात निर्माण होऊ शकते. सेंद्रिय खत जमिनीचा कस कमी करत नाही; उलट तो सातत्याने वाढवत राहते, असे ते सांगत.
पशुधनाचा सहकाराचा मार्ग
पशुपालन हा शेतीच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा आधार आहे .याकडे शास्त्रीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. महात्मा गांधींनी पशुधनाच्या या प्रश्नाचा विचार करताना सहकाराचा मार्ग सुचविला.
गांधीजींच्या मते, एका शेतकऱ्याला आपल्या घरातील गुराढोरांची शास्त्रशुद्ध देखभाल करणे सहज शक्य नाही. मर्यादित जमीन, अपुरी साधने, चारा-पाण्याची समस्या, पशुवैद्यकीय सेवांचा अभाव आणि निकृष्ट पैदास यामुळे पशुधन अनेकदा शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे साधन होण्याऐवजी त्याच्यावरचा आर्थिक भार बनते. विशेषतः जमिनीचे सतत तुकडे होत असताना प्रत्येक शेतकऱ्याने स्वतंत्रपणे गुरे पाळणे अधिकच अवघड होते. घरातील जागा गुरांनी व्यापली जाते, चाऱ्याचा खर्च वाढतो आणि उत्पादकतेच्या तुलनेत देखभालीचा खर्च अधिक ठरतो. परिणामी वासरे विकणे, जनावरांना उपेक्षित सोडणे किंवा त्यांच्याबाबत निर्णय घेण्याची वेळ येते. त्यासाठी गावातील पशुधनासाठी स्वतंत्र सामुदायिक व्यवस्था उभी राहिली, तर अनेक समस्या एकत्रितपणे सोडवता येतील. गुरांना घरात बांधून ठेवण्याची गरज राहणार नाही. पशुधनासाठी स्वतंत्र निवारा, कुरण आणि पाणी यांची व्यवस्था करता येईल. चारा सामूहिकरीत्या उपलब्ध करून दिल्यास खर्च कमी होईल.
आजारी जनावरांसाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणेही सोपे होईल. त्याचबरोबर निवडक वळू सामुदायिक पद्धतीने ठेवून गावातील पशुधनाची पैदास सुधारता येईल. अशा नियोजनातून हळूहळू निकृष्ट पशुधनाचे प्रमाण कमी होऊन उत्पादकता वाढू शकते.
दूध उत्पादन आणि विक्रीतही सहकार महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. एकत्रित दूधसंकलन आणि विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला बाजारपेठ मिळते, योग्य दर मिळण्याची शक्यता वाढते आणि वैयक्तिक पातळीवरील गैरप्रकारांना आळा बसतो. त्यांच्या मते जमीन आणि पशुधन या दोन्हींच्या व्यवस्थापनात सहकाराचे तत्त्व लागू होते. शंभर कुटुंबांनी आपापल्या वाट्याला पडलेल्या छोट्या-छोट्या तुकड्यांवर स्वतंत्रपणे शेती करण्यापेक्षा एकत्रितपणे जमीन कसावी आणि मिळालेले उत्पन्न आपापल्या वाट्याने घ्यावे, ही कल्पना ते मांडतात.
मणीभाई देसाई हे गांधीजींचे निकटचे सहकारी आणि ग्रामीण पुनर्रचनेचे कर्मयोगी होते. १९४६ मध्ये गांधीजींच्या प्रेरणेने उरळी कांचन येथे आलेल्या मणीभाईंनी ग्रामीण जीवनाच्या गरजा जवळून समजून घेतल्या. पुढे १९६७ मध्ये त्यांनी भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ)ची मुहूर्तमेढ रोवली.
गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या विचारांना कृतीची जोड देताना मणीभाईंनी पशुधनाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानले. देशी गोवंश संवर्धन, शास्त्रीय पशुपैदास, कृत्रिम रेतन, पशुआरोग्य आणि दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविकेचा मार्ग मिळवून देण्याचे काम बायफने उभे केले.
गांधींची बीजे, विकासाची नवी पाल
गांधीजींच्या कृषी आणि ग्रामविकासाच्या विचारांकडे आज पुन्हा पाहिले, तर त्यांच्या अनेक संकल्पनांची पाऊलखूण आधुनिक विकासाच्या दिशेने उमटताना दिसते. मातीचा कस, स्थानिक साधनसंपत्ती, पशुधन, ग्रामोद्योग, स्वच्छता, सहकार आणि गावाची स्वयंपूर्णता यांना त्यांनी विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले. आजच्या काळात हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि ग्रामीण रोजगाराची आव्हाने पाहता या विचारांचे महत्त्व अधिक ठळक होते.
गांधीजींच्या सेंद्रिय कचऱ्यापासून सोनखत या कल्पनेशी आजची नैसर्गिक व पुनरुत्पादक शेती जोडली जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानातून मातीचे आरोग्य, जैवविविधता, स्थानिक संसाधनांचा वापर आणि पशुधनाधारित शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. मार्च २०२६ पर्यंत या अभियानात १८.१९ लाख शेतकरी सहभागी झाले होते.एकत्र या, उत्पादन करा आणि बाजारपेठ मिळवा’ या गांधीविचाराची आधुनिक आवृत्ती शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये दिसते. ऑगस्ट २०२६ पर्यंत देशात हजारो एफपीओची निर्मिती झाली असून त्यातून सामूहिक खरेदी, उत्पादनाचे एकत्रीकरण, मूल्यवर्धन आणि विपणनाला चालना मिळत आहे.
भारतरत्न नानाजी देशमुखांचा चित्रकूट प्रकल्प म्हणजे गांधीजींनी पाहिलेल्या स्वावलंबी, सक्षम आणि समृद्ध गावाच्या स्वप्नाला कृतीची जोड देणारा प्रयोग होय. चित्रकूट परिसरातील गावांना केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न ठेवता, ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाची दिशा देण्यात आली. शेती, जलसंधारण, पशुपालन, ग्रामोद्योग, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्यविकास यांची सांगड घालत गावाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग उभा करण्यात आला. ‘गावाचा विकास गावकऱ्यांनीच करायचा’ हा या प्रयोगाचा गाभा होता. श्रम, साधने आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून स्वावलंबनाची बीजे रोवली गेली. गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या विचारांना आधुनिक काळातील प्रयोगशील रूप देणारा चित्रकूटचा हा ग्रामविकास प्रयोग म्हणजे आत्मनिर्भर गावाकडे जाणारी प्रेरणादायी वाट ठरतो.
सारांश,गांधीजींच्या कृषी ग्रामविचारांकडे पाहिले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते त्यांनी विकासाची गाडी गावापासून सुरू केली होती. मातीचा कस, शेतकऱ्याचा घाम, पशुधनाची ताकद, गावकऱ्याच्या हातातील कौशल्य आणि सहकाराची जोड या सगळ्यांना त्यांनी विकासाच्या एका सूत्रात गुंफले. आज आपण त्याच वाटेवर आधुनिक तंत्रज्ञान, नवी बाजारपेठ आणि नव्या योजनांची भर घालत आहोत. साधने बदलली, काळ बदलला पण प्रश्न तोच गावाच्या मातीला समृद्धीची चव कशी चाखवायची? याचे उत्तर गांधीजींच्या विचारांत आजही सापडते.
– विकास पांढरे, ९९७०४५२७६७
२ ऑक्टोबर २०२६ | महात्मा गांधी जयंती
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
राष्ट्रऋषी नानाजी देशमुख
"नानाजी एक ऐसे समाज-प्रेरक थे जिन्होंने देश के असंख्य दीन-दुखियों के चेहरों पर मुस्कुराहट बिखेरने में सफलता पाई। भारतीय ग्रामीण जीव...
-
'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ...
-
गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा न...
-
ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असं राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाखापेक्षा ज...




