माणूस हा श्रध्देवर जगत असतो, भलेही तो नास्तिक असो वा अस्तिक. काही प्रमाणात त्यांच्या अंगी श्रध्देने घर केलेले असते. श्रध्दा म्हणजे काय ? अंधश्रद्धा कशाला म्हणायचे ? या जटील प्रश्नाची उत्तरे देणे सोपे नाही. कारण अंधश्रध्देबद्दल कितीही प्रबोधन केले तरी, माणसाची मानसिकता बदलत नाही तर वाढतच आहे. हे चिवरी ( ता.तुळजापूर) येथील महालक्ष्मी यात्रेवरुन लक्षात येते.
मंगळवार ( १४ फेब्रुवारी) रोजी पशुहत्येसाठी प्रसिध्द असलेल्या चिवरीची यात्रा पार पडली. पहाटे चार वाजता देवीच्या मूर्तीला पालखीसह सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात आले. यावेळी पोतराज, जान्या, आराधिनी या हलग्याच्या कडकडाटात, मोकळे केस सोडून बेधूंद होऊन नाचत होत्या. देवीला अभिषेक, अलंकार पूजा करण्यात आली. यात्रेचे मुख्य विशेष म्हणजे असंख्य नवीन पोतराज, जान्या, आराधिनी यांना दीक्षा देण्यात आली. त्यानंतर हजारो कोंबडे, शेकडो बकरे व रेड्यांची खुलेआम कत्तल करण्यात आली. मंगळवारी चतुर्थी असूनही मोठ्या प्रमाणात बकरे, कोंबड्याची बळी देण्यात आली.
याठिकाणी वर्षातून दोन तीन वेळा इथं यात्रा भरत असते. नव्हे दर मंगळवार आणि शुक्रवारी जत्रेचे स्वरूप असते. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत, नेत्यांपासून ते महानेत्यापर्यंत, शिपायापासून ते क्लासवन अधिकाऱ्यापर्यंत देवीची भक्त आहेत. अणदूरपासून काही हाकेच्या अंतरावर असलेली ही देवी डोंगर कपारीत वसली आहे. देवी नवसाला पावणारी आहे, देवीचा नवस पूर्ण नाही केले तर तिचा कोप होतो, अशी अंधश्रद्धा आहे. दर बुधवारी रात्री मंदिर परिसरात भुताची यात्रा भरते असा नागरिकांचा समज झाला होता. तो आता दूर झाला आहे. १९८७-८८ साली याविषयी माध्यमांनी आवाज उठविला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, सि.ना.आलुरे गुरूजी यांनी काही कार्यकर्त्यांच्या मदतीने चिवरीच्या अघोरी प्रथेविरूध्द आवाज उठविला.
तेव्हापासून रेड्याचा बळी थांबला, भुत मशाली घेऊन नाचायचा बंद झाला. शेवटी ती माणसाचं होती, हे लक्षात आले. या प्रबोधनास पंचवीस वर्षे पूर्ण झाली असतील. डॉ. दाभोलकर यांनी काही काळ प्रबोधन केले पण यात्रा पशुहत्या विना पार पडली नाही. भक्तांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. यात्रेत महिलांच्या अंगात येणे , नवीन पोतराज, आराधिनी, जान्या यांना दीक्षा देण्याची संख्या ही वाढतच आहे. येथे येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भक्तांची देवीवर असणारी श्रध्दा डोळस आहे की आंधळी हा एक संशोधनाचा विषय आहे.
कारण संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात:-
पाषाण देव पाषाण पायरी !
पूजा एका वरी पाय ठेवी !!
मंदिराची पायरी आणि गाभा-यातील मूर्ती दोन्ही दगडाच्याच आहेत. पण, आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुस-याची पूजा करतो. गाभा-यातील दगड हा दगड नसून देव आहे, असे "मानावे" लागते. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आंधळीच आहे. डोळस श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे ठरवायचे कोणी? असा जटील प्रश्न बनला आहे.
पाषाण देव पाषाण पायरी !
पूजा एका वरी पाय ठेवी !!
मंदिराची पायरी आणि गाभा-यातील मूर्ती दोन्ही दगडाच्याच आहेत. पण, आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुस-याची पूजा करतो. गाभा-यातील दगड हा दगड नसून देव आहे, असे "मानावे" लागते. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आंधळीच आहे. डोळस श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे ठरवायचे कोणी? असा जटील प्रश्न बनला आहे.
सरतेशेवटी अनिसचे याकडे कितीपत लक्ष आहे हे पाहणे आवश्यक आहे. शनि शिंगणापूर पासून ते कोल्हापूर पर्यंत महिलेला मंदिर प्रवेश देण्यात यावा यासाठी आंदोलन करून प्रसिद्धीझोतात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे चिवरी यात्रेकडे लक्ष कधी जाणार ? की अजून मंदिर प्रवेश करत बसणार. आराधिनी, जान्या या प्रथेत अडकलेल्या असंख्य महिला तुमची वाट पाहत आहेत.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७

