पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ जुलै, २०१७

आयाबाया' च्या भरारीचा सामाजिक दस्ताऐवज



कथा,कादंबरी म्हटले की,नायक,नायिका अशी पात्रे  येतात. पण ती काहीशी काल्पनिक असतात. धीरोदात्त पात्रे एकूण कलाकृतीला न्याय देत असतात. परवा आमचे मार्गदर्शक मित्र,विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांचे 'आयाबाया' हे पुस्तक वाचत होतो. सव्वाशे पानाचे हे पुस्तक वाचून क्षणभर गहिवरल्या सारखे झाले. कारण या पुस्तकातील धीरोदात्त नायिका या गावकूसाबाहेरच्या आहेत.भटक्या समाजातील स्त्रियांचे जीवन म्हणजे किड्यामुंगासारखेच. पण काही स्त्रिया परिस्थितीला तोंड देत समाजाला आशेचा नवा किरण दाखवतात. गोळे यांचे आयाबाया' हे पुस्तक म्हणजे भटक्या जाती - जमातील महिलांच्या वेदनेची व कर्तृत्वाची गाथा होय.

महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्या समाजाचे चित्र मराठी पत्रकारितेत आणि साहित्यात आणण्याचे कार्य करणारे पत्रकार-लेखक फार क्वचितच आढळतात. त्यामध्ये रवींद्र गोळे यांचे नाव प्राधान्य क्रमाने घ्यावे लागेल. मराठी साहित्यात आजपर्यंत न हाताळलेला विषय रवींद्र गोळे यांनी आपल्या साहित्यातून वाचकांसमोर आणला आहे.

उजव्या विचारात जडणघडण झालेल्या रवींद्र गोळे यांच्या पत्रकारितेची सुरुवात सा.विवेक पासून झाली. सध्या ते सा.'विवेक'चे सह कार्यकारी संपादक आहेत. दरम्यानच्या काळात त्यांचा भटके- विमुक्त विकास परिषदेच्या अनेक प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला.  पालावरची शाळा असो वा पालात राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकांशी त्यांचा संबंध आला.

महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या ४२ जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. यांना ना हक्काची जमीन आहे ना घर, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या लोकांच्या जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. भटक्या-विमुक्तांच्या काही जमातींवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. याच धरत्रीचे पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. राजकीय उपेक्षा, पोलिसांचा जाच, याबरोबरच जात पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या या समाजाच्या दैन्यावस्था अजूनही संपल्या नाहीत. या समाजातील स्त्रियांचे दु:ख ही भेदक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा भटका समाज मूळ प्रवाहात येत आहे. शिक्षण,स्वावलंबन,सन्मान आणि सुरक्षा याची जाणीव या समाजाला करून देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यशस्वी झाला आहे हे रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया' ग्रंथातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताबाई देवकर, सखुबाई बंडीधनगर, जयश्री भोसले, राजश्री काळे, कांचन मालन काळे, सुजाता गणवीर, सरस्वतीबाई माने, समूध्दी काळे आणि अयोध्याबाई उपाध्ये या नवदुर्गेची गाथा 'आयाबाया'त आली आहे. यात केवळ त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दु:खाच्या करुण कहाण्या नाहीत तर राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याच्या भरारीचे ते सामाजिक दस्तऐवज आहेत. भटके-विमुक्त समाजातील स्त्रियांच्या संघर्षांचे अत्यंत सखोल चित्र रवींद्र गोळे यांच्या या पुस्तकात पाहायला मिळेल.

नवऱ्यानं डोक्यात दगड घातला म्हणून तान्हय़ा बाळासह घर सोडून आलेल्या भारतबाई. आज तुळजापूर शहराच्या स्वच्छतेचं स्वप्न पाहताहेत. त्याच्या पूर्ततेसाठी गेली अनेक त्या अनवाणी फिरत आहेत. शाळेचं तोंडही न पाहिलेल्या या बाईंना सगळा हिशेब, व्यवहार तोंडपाठ असतो. तुळजापुरात बचत गट सुरू करून अनेकींना रोजगारातून स्वत:च्या पायावर उभ्या राहायला शिकवणाऱ्या, शहर स्वच्छतेसाठी  तुळजापुरात घंटागाडय़ा सुरू करणाऱ्या भारतबाई देवकर यांचा जीवनपटाला लेखक रवींद्र गोळे यांनी आपल्या'आयाबाया' पुस्तकात प्रथम स्थान दिले आहे.

 वडार समाजात जन्माला आलेल्या भारतबाईचा संघर्ष वेदनादायक आहे. नवऱ्याला तिनं सोडले असले तरी स्वाभिमान सोडला नाही. कधी सूतगिरणीवर तर कधी तुळजापूराच्या आसपास खडी फोडून दिवस काढलेल्या भारतबाईला आधार मिळाला यमगरवाडीत. वडारजातील एका मुलीला शाळेत घालण्यासाठी भारतबाई यमगरवाडीला पोहोचल्या.त्या मुलीचा प्रवेश झाला. भारतबाई कायमच्या भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या जोडल्या गेल्या. इथेच त्यांना बचतगटाची माहिती मिळाली. भारतबाईचा स्वभाव आणि कामाबद्दलची आत्मियता पाहून त्यांना यमगरवाडी प्रकल्प समितीचे सदस्य करण्यात आले. पुण्याला भटके विमुक्त विकास परिषदेची एक बैठक दादा इदातेंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत भाळतबाईच्या नावाची भटके -विमुक्त विकास परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून केली गेली. भारतबाई म्हणजे हाती घेतलेले काम तडीस नेणारी बाई. आपल्या आयुष्यातील दु:ख विसरून त्या नव्या दमाने आणि उमेदीने जीवनाची वाट चोखाळत आहेत. बचत गट असो वा तुळजापूर शहर स्वच्छ करण्याचा नित्यक्रम कसा आदर्शवत आहे हे लेखक गोळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून सांगितले आहे.


गोपाळ म्हणजे कृष्णाचे वंशज.  काळाच्या ओघात भीक मागून जगतोय. खेळकरी, पैलवान, डोंबारी अशी अनेक नावे असलेल्या या समाजातील एका सखूबाई बंडीधनगर या महिलेने लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा गावात आपल्या अद्वितीय कामामुळे नवी उमेद निर्माण केली आहे.

आयुष्यातील पन्नास वर्षे काढल्यानंतर या आपण आपल्याच समाजासाठी काही तरी करावे,असे सखुबाईला वाटले. बघताबघता  समाजातील ७२ कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले. आज ती साडेतीनशे जणांची ती "माई' झाली आहे. सखूबाई तुकाराम बंडीधनगर यांनी आपल्या समाजाला आशेचा नवा किरण दाखविला आहे. सखूबाईंमध्ये बदल घडण्यास निमित्त ठरले भटक्‍या विमुक्तांसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे, नरसिंग झरे आणि तुळशीराम गरगटे. नातेवाईकाच्या तुकडाभर जमिनीच्या आधारावर सखूबाई लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यातील अनसरवाडा इथे आल्या. भटकें जगणे सोडून द्यायचे तर पोट भरण्यासाठी हाताला काम हवे. त्याची सुरवात सखूबाईंनी शेतमजुरीने केली. तेव्हापासून स्वतः शिकणं आणि आपल्या समाजातील महिलांना शिकविणे असा नित्यक्रम सुरू झाला.

 जीवनाला स्थिरता मिळत असल्याचे पाहून अनसरवाड्याच्या वस्तीवर गोपाळ खेळकरी समाजाच्या कुटुंबांची आणि महिलांची संख्या हळूहळू वाढू लागली. तेव्हा सखूबाईंनी स्वयंसहायता गटाची स्थापना केली. महिलांनी रोजच्या मजुरीतून एक रुपया बचतीला सुरवात केली. सखूबाईंनी अनेक महिने, विविध पद्धतीने समजावून सांगितल्यानंतर पुरुष मंडळी वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेण्यास तयार झाली. यामुळे आज वस्तीवर मोठे दोन वाजंत्री गट आहेत. हैदराबाद, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये येथील मुले वाद्य वाजविण्यास जातात.ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण सखूबाईंनी स्वतः घेतले. त्यानंतर त्यांनी वस्तीवरील महिलांना पायपुसणी, माळा, दोरखंड, तरट्या, दाळी आदी वस्तू बनविण्यास शिकविल्या. भीक मागून खाणाऱ्या महिलांना वस्तीवरच महिनाकाठी साडेतीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची सोय केली. बघता बघता गोकुळ महिला उत्पादन केंद्र सुरू करून महिलांमध्ये आत्मभान निर्माण केले आहे. चौथीपर्यंत शिकलेल्या सखुबाईना विविध भाषा अवगत आहेत. महिला प्रशिक्षणासाठी सहा महिने परगावी राहिल्यामुळे (जातीबाहेर जाऊन ज्ञान घेतल्याबद्दल) सखुबाईवर जातीने बहिष्कार टाकला होता. जातपंचायतीत दंड भरल्याशिवाय तिला जातीत घेतले जात नव्हती. नरसिंग झरेंच्या मदतीने ती या समस्येतून कशी बाहेर पडली याची उत्कंठावर्धक कथा गोळे यांनी शब्दबध्द केली आहे.

आजच्या काळातही पारधी समाज हा मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहे. या समाजाची आजही परिस्थितीत बदलली नाही. ना हक्कांचे घर आहे ना जागा, कोणतेही अघटित घटना घडली की पोलीसांची नजर या समाजाकडे जात असते. अशा या वंचित समाजातील स्त्रियांची अवस्था तर फार बिकट आहे. त्याचबरोबर हा समाज रूढी, समजुती, अंधश्रद्धांच्या प्रभावात आदिम जीवन जगत आहे.  पारधी समाजातील स्त्रियांच्या वाट्याला आलेले अंधारमय आणि प्रकाशमान जीवनाची यशस्वी गाथा लेखक रवींद्र गोळे यांनी  जयश्री भोसले व राजश्री काळे या दोघींच्या माध्यमातून समोर आणली आहे. राजश्री काळे ही सध्या पुणे महानगरपालिकेच्या  प्रभाग क्रमांक सातची नगरसेविका आहे.पारधी समाजातील ती पहिली नगरसेविका आहे.

जयश्री- कस्तुऱ्याची कहाणी चित्तथरारक आहे. या दोघांच्या लग्नाला आठ दिवस झाले नसतील,अचानक पालावर पोलिसांची पालावर धाड पडते अन् कस्तुऱ्या जेरबंद होतो. जो गुन्हा त्यांनी केला नाही त्याची शिक्षा कस्तुऱ्याला भोगावे लागते. अशावेळी जयश्रीची झालेली परवड अंगावर शहारे आणणारे आहे. गावकुसाबाहेर जीवन जगत असलेला हा समाज सामाजिकदुष्टा सुरक्षित नाही.  जीवनाची फरफट करत जयश्री आणि कस्तुऱ्या नळदुर्ग जवळील सिंदगाव इथे येतात. पण नियती मात्रं जयश्रीला साथ देत नाही.  काही नराधम जयश्रीला आपल्या वासनेची शिकार बनवतात.

क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली, असहाय, फाटक्या कपड्यातली, जयश्रीची वेदना समजू शकली नाही.
बलात्कार झाला. पारध्याची बाई बाटली.. अन् पुन्हा सुरू होते जयश्रीच्या जीवनाची फरफट. जयश्रीला जातीबाहेर फेकण्याचा प्रकार सुरु असतो,तर दुसरीकडे कस्तुऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांचा ससेमिरा. यावेळी या अभागी नवदाम्पत्याच्या झालेल्या ससेहोलपटाची कुणालाही दया येत नाही.

जयश्रीच्या जीवाला कस्तुऱ्या तेवढाच आधार तर होता..त्याला औरंगाबादच्या जेल मध्ये डाबण्यात आले...तिच्या जीवनाची फरफट थांबली ती यमगरवाडीला आल्यावर... गिरीश प्रभुणे काकांनी तिला आधार दिला. तिचा जीव यमगरवाडीत रमू लागला. तिचे पिल्ले ही यमगरवाडीत शिकू लागली. पुढे तिला बचतीचा मार्ग सापडला. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ यांनी जयश्रीला बचतीचे अर्थशास्त्र सांगितले. जयश्रीने जे आयुष्य भोगले त्यापासून मुक्ती मिळाली होती. जयश्रीच्या जीवनात झालेला हा बदल संघविचारातून सुरू झालेल्या परिवर्तनाच्या कार्याच्या पाऊलखुणा आहेत.

यमगरवाडी हे भटके-विमुक्त समाजाचे माहेरघर. पारधी समाजात गायपारधी व गावपारधी दोन पोटजाती आहेत. राजश्री काळे ही गायपारधी. तिला धरून पाच बहिण आणि एक भाऊ. राजश्रीच्या बापाला ज्या वर्षी सजा झाली त्याच वर्षी तिचं लग्न झालं ते ज्ञानेश्वर भोसले. तो गावपारधी तर राजश्री गायपारधी. दोघांत सोयरिक होत नाही. पण नियतीने या दोघांचा योग जळवून आणला. ज्ञानेश्वर काही दिवस दारु भट्टी चालवून संसार चालवू लागला. अशावेळी गावपारध्याने गायपारध्याची बाईल केली ?म्हणून पारधी समाज खवळला.

 राजश्रीची चौथीनंतर शाळा थांबलेली होती.शिकण्याची जिद्द असूनही मार्ग सापडत नव्हता. अशावेळी प्रभुणेकाका,गडेकर गुरुजी, व्हटकर याची राजश्री शी भेट झाली. ती यमगरवाडीत शिकू लागली. ज्ञानेश्वरने देखील तिला साथ दिली. प्रभुणे काकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण घेतले. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिने शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात तिला शिपायाची नोकरी मिळाली. दरम्यान काळात तिला मुलगी का झाली म्हणून ज्ञानेश्वरने माणसात शिवीगाळ करून मारहाण केली.आज राजश्रीच्या जीवनात विविध परिवर्तन झाले आहेत. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेची नगरसेवसिका आहे.

लेखक रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया' या पुस्तकात विविध स्त्रियांचे दर्शन घडवले आहे.यामध्ये सरस्वती माने या महिलेची कथा सांगितली आहे. सरस्वती या यमगरवाडी प्रकल्पातील प्रथमापासूनचे कार्यकर्ते तुकाराम माने यांच्या सौभाग्यवती. एकदा प्रकल्पातील पोरांनी शेतातले धान्य चोरले म्हणून गावकऱ्यांनी मुलांना डांबून मारले. फार विणवणी करून ही गावकरी शांत होत नसल्याचे पाहून सरस्वती बाईने आपला दुर्गावतार दाखवला. त्यामुळे मुलांना सरस्वतीबाई बद्दल आदर आहे तितकच ममत्व देखील. सरस्वतीबाई या स्वयंपाक विभाग सांभाळतात.

लेखक गोळे यांनी कांचन काळे, सुजाता गणवीर, समूध्दी काळे आणि अयोध्याबाई आराध्ये यांची जीवनगाथा
मांडली आहे. सामाजिक इतिहासात उतरंडीच्या तळागाळाशी असलेली स्त्री अज्ञान, दारिद्रय़, अत्याचार, अंधश्रद्धा यांनीच केवळ पिचलेली नव्हती तर दुहेरी दडपणाची ती बळी होती. अस्पृश्य म्हणून पुरुषांबरोबरच समाजाकडून अवहेलना, हेटळणी, तुच्छता सहन करणारी आणि दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणून कुटुंबात पुरुषप्रधानतेकडून सतत अत्याचार सोसणारी. तरीही ही स्त्री दुबळी, रडवी, हातपाय गाळून बसणारी कधीच नव्हती. सतत कष्ट करणारी, अन्याय अत्याचाराला खंबीरपणे आणि कणखरपणे तोंड देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तगून राहणारी आहे. हे रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया'तून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 © विकास पांढरे, सा.विवेक मुंबई
मो.नं.९९७०४५२७६७, ८२०८६६९८९३

आयाबाया
लेखक -रवींद्र गोळे
मो.नं.९५९४९६१८६०,९८६९८१३२२८
प्रकाशक
स्वाती जोशी
परम मित्र पब्लिकशन्स ६,राजदुर्गा,बी कँबीन रोड,नौपाडा, ठाणे ( प.)४००६०२
मो.नं.९९६९४९६६३४

मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

नक्षलवाद समजून घेताना


छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले. तर आणखी काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मन विषण्ण झाले. आपल्या देशातील गद्दार देशद्रोह करून सामाजिक विषमता कुलुषित करत करत आहेत. आपल्या देशाला नक्षलवाद्याचे हे आव्हान नवीन नाही. यापूर्वी भारतीय जवानांवर झाले आहेत. नक्षलवाद म्हणजे काय? स्वरूप, व्याप्ती आणि एकूणच भारत देशावर झालेला परिणाम समजून घेण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे नक्षलवादाचे आव्हान चीनचे भारताशी छुपे युद्ध हा ग्रंथ उपयुक्त ठरला. मुळात लेखक लष्करात राहून भारत चीन सीमा, भारत पाकिस्तान सीमा, काश्मीर, ईशान्य भारत, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागात ३६ वर्षे सेवा केली आहे. या प्रदीर्घ अनुभवाची अनमोल शिदोरी म्हणजे हे पुस्तक होय.

पुस्तकाचे अतरंग 

३२४ पानाच्या या पुस्तकात भारताची अंतर्गत, बाह्य सुरक्षा आणि इतर आव्हाने, माओवाद्यांचा भारतात प्रसार आणि सध्याची परिस्थिती:नक्षलवाद आणि आपली व्यवस्था, माओवादाचा पूर्वइतिहास,देशात पसरण्याची कारणे आणि सरकारचा प्रतिसाद, माओवाद्यांचे अड्डे वने आणि आदिवासी-सरकारला काय हवे ? अहिंसात्मक सत्याग्रह की माओवाद ?, माओवाद्यांचे अत्याचार आणि भयभीत रक्तबंबाळ आदिवासी, माओवाद्याचे रक्तरंजीत थैमान आणि सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधाड्या,माओवाद्यांचे डावपेच,संघटना आणि लढण्याची पध्दती, माओवाद्यांचे अर्थकारण आणि खंडणी राज्ये, आँपरेशन ग्रीन हंट विरुद्ध रेड काँरीडाँट,एक थंडावलेली मोहीम, निवडणुका,लोकशाही आणि बुलेट वि.बँलेटची लढाई, माओवादी भरकटलेले विचारवंत आणि प्रसार माध्यमे, माओवाद्यांचे मानवी हक्क आणि इतर पैलू, माओवाद्यांचा चक्रव्युहात हरवलेले पोलीस आणि अर्धसैनिक बले, सलवा जुडूम,एसपीओज,c-७० कंमोडाज अदिवासी पोलिसांविरूध्द अदिवासी नक्षलवादी, माओवाद्यांची लढाई, वाटाघाटी : काही आशेचे किरण, माओवादी विदेशी सहकार्य आणि चीनचे भारताशी छुपे युद्ध, भारताची बाह (सीमा) ची सुरक्षा : १९६२ च्या घोडचुकांपासून आपण काय काही शिकलो का ? माओवाद्यांश लढाई :सेना शेवटचा उपाय, माओवाद संपविण्यासाठी व्यापक सर्व समावेशक उपाय आणि माओवाद थांबविण्यासाठी वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या अशा महत्त्वाच्या घटकांवर चिंतनशील विचार वाचायला मिळतात.

नक्षलवादाचे स्वरूप 

 नक्षलवाद्याचे उगमस्थान हे पश्चिम बंगाल, १९६७ साली कानु सन्याल आणि चारू मुझुमदार यांच्या ( नक्षलबारी गाव ) नेतृत्वाखाली नक्षलवाद उद्यास आला. १९७२ साली त्याचा बिमोड करण्यात आला. त्यानंतर १९८७ साली नक्षलवादाचा पुन्हा जन्म झाला.२०११ साली देशभर १६००हून अधिक नक्षलवादी हल्ले झाले. पाकिस्तान आणि चीनने तेल ओतण्याचा प्रयत्न केला. सध्या देशातील १६ राज्यात,२३२ जिल्ह्यात,१४ हजार खेड्यामध्ये नक्षलवाद कार्यरत आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील अबुजमाड दंडकारण्यामध्ये दहा हजार च्या आसपास नक्षली आहेत. गेल्या पाच वर्षात ९ हजार ८२९ जण नक्षलवाद्यांच्या  गोळ्यांचे शिकार झाले आहेत.

नक्षलवाद्यांची संघटना :

       नक्षलवाद्यांच्या एकूण तीन संघटना आहेत. एक राजकीय,दुसरी सशस्त्र आणि तिसरी दलम. दलम ही नक्षलवादी कारवायांच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाची संघटना. प्रत्येक दलामध्ये दहा ते पंधरा तरुण असतात. त्यात तीन ते चार युवतींचा सहभाग असतो. एके ४७,३०३,३१२,१२ बोअर,हातबाँम्ब,देशी बनावटीच्या रायफल्स अशा शस्त्रांचा वापर केला जातो.

नक्षलवाद्यांचे अर्थकारण :-

आपल्या देशाचे बजेट नेहमी घाट्यात चालते पण माओवाद्यांनी बँकेमध्ये इतर ठिकाणी प्रचंड पैसा गोळा करून ठेवला आहे. खंडणी वसूल करणे, अफुची शेती,वनसंपत्तीचे स्मगलिंग करणे,याशिवाय परदेशातून माओवाद्यांना पैसा मिळतो. माओवाद्यांसाठी लढणाऱ्यांना चार ते पाच हजार रूपये पगार मिळतो.

नक्षलवाद्यांचा दहशतवाद :

महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या सर्व राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचे विविध गट काम करत आहेत. जोपर्यंत नक्षलवाद्यांचा बिमोड होत नाही. तोपर्यंत पुढची शंभर वर्षे नक्षलवादी असेच उपद्रव देत राहतील.

नक्षलवाद्यांचे समर्थन म्हणजे रोगापेक्षा इलाज गंभीर :
आज तथाकथित विचारवंत,लेखक नक्षलवाद्यांचे समर्थन करत असतात. आतापर्यंत तीन नक्षलवाद समर्थक नेत्यांना रँमन मँगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाचा घात करण्याचा प्रकार तथाकथित मंडळी करत आहेत.

लष्करी कारवाई करण्याची वेळ :

१९६७-७० मध्ये प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे यांनी लष्करी दलाच्या सहाय्याने चळवळ मोडून काढली होती. पण त्यांची व्याप्ती लहान होते. आज ही चळवळ फोफावली आहे. तिचा निप्पात करण्याची वेळ आली आहे. जेथे जेथे अशा कारवाया होत आहेत. तेथे तेथे सशस्त्र दलांची संख्या वाढवून तिचा बिमोड करावा लागणार आहे.

सारांश :-
              लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपल्या ग्रंथातून भारतातील नक्षलवादी चळवळीला चीनचे कसे सहकार्य मिळते यावर मंथन केले आहे. माओवाद संपविण्यासाठी सर्व समावेशक उपाय देखील त्यांनी सांगितले आहेत. एकूणच भारतातील माओवाद-नक्षलवाद समजून घेण्यासाठी हा ग्रंथ सुजाण वाचक,विद्यार्थी, अभ्यासक यांना उपयुक्त आहे.
 ©विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७

नक्षलवादाचे आव्हान
चीनचे भारताशी छुपे युद्ध
लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन
०२२६ ८५१७८३,९०९६७०१२५३
प्रकाशन : नचिकेत प्रकाशन,नागपूर-४४००१५

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

सुरवंट



मराठीत स्त्रीवादी साहित्याने फार मोठी मोलाची भर घातली आहे यात शंका नाही. २०१० नंतर स्त्री जीवनाची घुसमट प्रकर्षाने मांडणारी नवोदित लेखिका म्हणून अर्चना डावखर- शिंदे यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या 'सुरवंट' या कादंबरीने असंख्य वाचकांचे मन जिंकले आहे. जे पुस्तक वाचताना तहान, भूक विसराला लावते, अशीच कलाकृती ही अभिजात असते. आजच्या फेसबुक आणि व्हाँटसअपच्या दुनियेत 'सुरवंट' ही वाचकाला पहिल्या पानापासून ते शेवटपर्यंत खेळवून ठेवते. २६४ पानाची कादंबरी वाचताना मला पंधरा दिवस लागले, यातच या कादंबरीची गुणवत्ता लक्षात आले.

                कादंबरीच्या सचित्रावरुन  'सुरवंट' ही कशावर आधारित आहे हे लक्षात येते. रूढ अर्थाने सुरवंट हा फुलपाखराचा अळी अवस्थेतील किड्याचा प्रकार होय. त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान असते. किड्यामुंगासारखेच स्त्रीचे जीवन आहे, असं अर्चना डावखर-शिंदे यांनी आपल्या 'सुरवंट' या कादंबरीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी 'मी' या आत्मनिवेदन प्रकारची सर्व वैशिष्ट्ये दर्शवणारी आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील छोटेसे विळद गावाच्या चंदाच्या जीवनाची शोकांतिका म्हणजे सुरवंट होय.

विळद हे गाव शहरापासून जवळ आहे. मुख्य म्हणजे आर्मीचे प्रशिक्षण केंद्र जवळच असल्यामुळे तोफांचा आवाज,  बंदुकीचा सराव हा नेहमीच ऐकू येतो. या छोट्याशा परिघात घडणारी ही कहाणी. या कहाणीची नायिका आहे ती चंदा. तिचा बाप देशमुखांच्या घरातच चंदाचं लग्न लावून द्यायचं ठरवतो। त्यासाठी वर मुलगा चाळीशी पर्यंत जावूनही चंदाचं विवाह लावतो.  आपल्या खोट्या इंभ्रतीपुढे निरागस चंदाकडे न पाहणारा बाप समोर येतो. तर दुसरीकडे चंदाचा नवरा श्रीनिवासराव वयाने खूप मोठा, वेडसर आहे पण रात्रीच्या वेळी बायको म्हणून चंदाच्या कोवळ्या देहाची चिरफाड करणारा आहे. तिसरीकडे तिचा सासरा हा वारकरी आहे. दिंडीत हजारोंच्या पंगती करणारा आहे पण घरातील उपाशी सूनेकडे दुर्लक्ष करणारा सासरा नजरेस पडतो, असे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.

       मानव हा चंदाचा दुसरा पती. जातीपातीच्या भिंती तोडून नव्या समाजरचेनेचे भाग बनतात. मानव हा चंदाचा योगटिचर. पुढे ते दोघेही एम.ए.च्या पहिल्या वर्षाला अँडमिशन घेतात. इथेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मानवला माहीत आहे तिचे लग्न झाले आहे. तिला एक मुलगी आहे. चंदा  मोठ्या घरची आहे. चंदाचं वागणं, बोलणं, शांत स्वभाव, तिचे राहणीमान हे मानवला मनापासून आवडत. पुढे हे दोघे एकमेकांशी बिलगतात.  मानव हा ध्येयवेडा आहे. लहानपणी सोसलेले गरिबीचे चटके मानवला स्वस्थ बसू देत नाहीत. चंदाला मानवचा आधार हवाहवासा वाटतो. तर दुसरीकडे तिला स्व- जाणीव होऊ लागते. अशा  द्विधा मनस्थितीत ती अडकते. तिच्या मनाची स्थिती अगदी झाडात गुंतलेल्या पतंगाच्या दोराला जणू पंख गुंतून जीवन मरणाशी झुंज देणाऱ्या चिमणीसारखी होते. चंदाची होणारी घुसमट हे कथेचे दुसरे सूत्र.

   लेखिका अर्चना डावखर-शिंदे आपल्या कादंबरीतून महिलांची होणारी हेळसांड, विविध गुंतागुंती, ताण- तणाव चित्रित करतात. चंदाच्या जगण्यातील हरवलेली नैसर्गिकता आणि त्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक पातळीवरचा खोटेपणा चंदाला कसा तिला छळू लागतो हे प्रकर्षाने मांडले आहे.

 सगळी नाती मेली असली तरी तिच्यात एका बायकोचं नातं तग धरून होतं.अगदी सुकलेल्या सरोवरातलं शेवटच्या क्षणालाही त्या खडकाला धरून बसलेलं शेवाळ जसं", आयुष्याच्या शेवटी जर्जर झालेल्या क्षणी
त्या सोसाव्या लागलेल्या वेदनांच्या जखमांचा हिशोब कोठेच ....कसा दिसत नव्हता.  तसं  पाहिलंतर तिच्या ललाटावरच्या रेषाही प्रत्येक गतक्षणांचा सारीपाट मांडत होत्या.पण मनातली सय दिसत नव्हती,फक्त मनाला सारखी बोचत होती. या आत्मसंवादातून वाचकांना तिच्या जगण्याविषयी धारणा लक्षात येते.  लेखिकेने चंदाच्या मनातील उलाढालींचे वर्णन करत असताना संवाद, आत्मसंवाद, चिंतन यांचा योग्य वापर केला आहे. कधी कधी प्रसंगातून तिची मानसिकता वाचकांसमोर ठेवतात. कादंबरीतील प्रत्येक प्रसंग, घटना, संवाद ही चंदाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू वाचकांसमोर कुशलपणे वापरलेल्या आहेत.

बाळ जन्मल्यावर मेलं काय अन आज मेलं काय ,एकच आहे ! पण तिला आई होण्याची संधी तर मिळेल... घरची माणसं चांगली नाहीत,निदान तिला वांझुटी तरी कुणी बोलणार नाही. " या बोलण्यातून  लेखिका चंदाच्या बकाल आयुष्याचे सूचन करतात. तिच्या वाट्याला आलेले सडके जीवन चित्रित करतात. त्यांमुळे ही कादंबरी मानसशास्त्रीय अभ्यास समोर ठेवून आकलन करणे आवश्यक आहे.

         लेखिका अर्चना डावखर यांनी शेती जीवनाचा खुबीने वापर केला आहे. बळीराजाला अस्मानी आणि सुलतानी संकटाने गुडघे ठेकाला लावले आहे. यांचे दर्शन कादंबरीत घडते.
मागल्या साली पावसाअभावी पिकं निघाली नाही अन औंदा सुध्दा सारं मोलामाघाचं बी भरण मातीत गुदमरलें होतं.सारंगाचा दोन एक्कर कांदा तालुक्याच्या मार्केटला गेला. भाव पण चांगला मिळाला . लोक म्हणत, अरं सारंगा कादं मार्केटला नेया घाई काव्हून करतोया? अरं, अजून वाट बघ. शंभराच्यावर भाव जाईल बघू."
पर सारंगाला वाटे, भावापाई सारा माल तसाच ठेवू अन मध्येच भाव कमी झालास तर पदरात जे पडायचं ते राहून जाईल.  यावरून 'सुरवंट' ही कादंबरी केवळ स्त्री दु:ख सांगत नाहीतर असंख्य मानवी मनाचा वेध घेत शेती प्रश्नावर भाष्य करते.

          ही संपूर्ण कादंबरी चंदा आणि मानव या पात्राभोवती फिरत असली तरी श्रीनिवास, सारंग, शांताकाकू, सावित्रीबाई, चंदाची आई, वडील, सासरा ही पात्रे कादंबरीला उभारी देणारी आहेत. ही कादंबरी मनोरंजन करायला लावत नाही तर  वाचकांना गंभीर आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी कादंबरी आहे.

परीक्षण :- विकास पांढरे - ९९७०४५२७६७

सुरवंट

अर्चना डावखर - शिंदे

यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे ३०

मे २०१६

मूल्य - रु.२६०/-
-----------------------------------------

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

बिगारी : मदन देगावकर -दंदाडे


लेखकाने आत्मचरित्रामधून आपली व्यक्तिगत अनुभूती स्वाभाविक पणे प्रकट केलेली असते. त्यामुळे ’आत्मचरित्र’ हे आत्मनिष्ठ असते. स्वतः च्या जीवनाचे तटस्थपणे केलेले अवलोकन असते. बार्शी येथील संवेदनशील लेखक मदन देगावकर - दंदाडे यांनी आपल्या जीवनाचा आलेख ’बिगारी’ या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मदन देगावकर यांच्या ’बिगारी’ हे आत्मकथन मानवी मनाचे चित्रण करते. 112 पानांमधून लेखकाने आपले बालपण, तारूण्य आणि वैवाहिक जीवनात आलेल्या कडूगोड आठवणी सांगितल्या आहेत. ’बिगारी’ चे लेखन हे ओघवत्या शैलीत अवतरले आहे. बार्शी - मराठवाडयातील भाषा छोट्या छोट्या वाक्यातून अवतरली आहे. देगावकर यांनी ’बिगारी’ च्या मनोगतात स्पष्ट करताना म्हणतात की,’ आत्मचरित्र’ लिहिण्या एवढा मी काही मोठा प्रसिद्ध, प्रथित यश व्यक्ती नाही. कादंबरी किंवा कथासंग्रह लिहिण्याचा विचार करत होतो. तरीही मनाला सारखं वाटू लागलं जे आपण भोगलयं, जगलोय ते शब्दात मांडायला काय हरकत आहे.’अशी भूमिका विशद केली आहे.

’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परिणाम येथील समाज मनावर झाला आहे. त्यातूनच माणसाला शिक्षणाची गोडी लागली. ’बिगारी’ मधील मदनाचा बिगारी ते लेखक हा प्रवास पहिला तर शिक्षणासाठी - नोकरीसाठी चाललेली धडपड लक्षात येते. मदनचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बार्शीत झाले आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने शैक्षणिक होरपळ झाली. परिस्थितीमुळे भावाचं शिक्षण झाले नाही. बिगार्‍याचा तो गवंडी झाला. लेखकाला शाळेत असताना संध्याकाळी चौकात हातगाड्यावर पेन विकणे, पेपर विकणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे, पेपर टाकणे, येरमाळा व येडशीत नारळ विकणे अशी कामे करावी लागली.

लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने ते एम.ए. पर्यंत शिकून बीएड होऊन मास्तर होण्याचं स्वप्न पाहतात. त्याविषयी ते लिहितात, एम.ए.पूर्ण झालं.अन् बी.एड करायचे ठरवले पण पैसा आणायचा कुठून. दोन तीन ठिकाणी फॉर्म टाकले नंबर लागला.एवढे पैसे भरावे लागतात म्हणून समजले; आता काय करायचे ? रात्रभर विचार केला एकटाच भरपूर रडलो.अन सकाळी उठलो. भाकरी बांधल्या आत्तापर्यंत मिळालेली सर्व सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रे दोन पिशव्यात भरली. कागदपत्रे घेऊन एस टी स्टँण्ड वर आलो. सोलापूर गाडीत बसलो. सकाळी अकरा वाजता मी संस्थापकाच्या दारात.तिथल्या वॉचमन,नोकरांना वाटले मी कदाचित भंगारवाला असावा.विनवण्या करू मी संस्थापकांना भेटलो. त्यांना माझी कागदपत्रे दाखवली दोन पिशवी भरून आणलेली सन्मान चिन्हा दाखवली. माझ्याकडे पैसे नाहीत पण बी.एड.करायचे म्हणालो मला आलेलं पत्र दाखवलं. माझी मराठी भाषा त्यांना समजत नव्हती पण माझ्या भावना त्यांना समजत होत्या... ( पान क्र.19)

येडाई वर नारळ घेऊन विकायला जाणार म्हणल्यावर बाहेरच्यांनी तर येड्यात काढलेच होते पण घरचे ही तेवढे समाधानी वाटले नाहीत. पोरग मामलेदार, कलेक्टर व्हायची स्वप्न बघणार्या आईच्या डोळ्यात पाहायचं धाडस मला झालं नाही. (पान.33) शाळेच्या पुस्तकाने जेवढे शिकवले नाही तेवढे येणार्या परिस्थितीने शिकवले.
गरिबीमुळे शिक्षणात अडचणी आल्या पण शिक्षणामुळेच आपल्याला जगण्याचं आत्मभान कसं आले आहे, याचं वास्तव ते मान्य करतात.

लेखकाने आपले वैवाहिक जीवन अतिशय तरलतेने मांडले आहे. लग्न जमवताना हुंड्याचा विषय न काढण्याचा ते सांगतात. मुलीच्या जन्मानंतर लेखकाचे हळवे पण मनाला चटका लावणारे आहे. आजीचा दवाखाना, राणू शेळी यांच्या बाबतीत ते भरभरून बोलतात.

बाळ खूपच अशक्त त्यात बाळाच्या आईला कसलेच दूध नाही. त्यामुळे बाळ सारखे रडायचे. दोन दिवसांनी एका डाँक्टरला दाखवले, डॉक्टर म्हणाले, मुलीच्या नाकातून नळ्या सोडून औषधं व दूध वगैरे देता येईल, तरीही वजन वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. दोन तीन महिने बाळाला व आईला दवाखान्यात अँडमिट व्हावे लागेल. तरीही मी काही गँरटी देऊ शकत नाही.....आम्ही पती - पत्नी दोघेही मनसोक्त रडलो.. (पान 110,111)
लेखकाला गाण्याची आणि संगीताची आवड असल्याचे बोलून दाखवतात. शामराव देशपांडे यांच्याकडे मोफत शिक्षण घेणारे एकमेव विद्यार्थी.
’बिगारी’ त ’मदन’ हेच पात्र केंद्रस्थानी आहे. आण्णा, आई, भाऊ काँलेजला आणि गायनात मदत करणारे तरुण मित्र आणि शिक्षकाचे चित्रण लेखक करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुख: दु:खात सदैव मोलाची साथ देणार्‍या आपल्या पत्नीला लेखकांनी विशेष स्थान दिले आहे.
लेखकाने कथेचा शेवट ही सुंदर केला आहे ते म्हणतात,

आता ही बिगारी इनशर्ट करून सुटाबुटात राहतोय. पण तरीही मनाला वाटतयं अजून अरे ! आपण गड्याचा फक्त गवंडी झालोय. अजूनही आपल्याला खूप उंच इमले बांधायचे आहेत. आत्तापर्यंतच्याआयुष्यात खूप चांगली माणसं भेटली. जे वाईट भेटले ते ही चांगलेच होते.म्हणायचे. त्या परिस्थितीत जगत असताना शिकलेल्या लोकांपेक्षा अडाणी लोकांचे तत्वज्ञानचं जगण्याची प्रेरणा देऊन गेलं. हा संघर्ष अविरत चालूच राहिलं कारण माझ्यातला बिगारी अजूनही संपलेला नाही..

एकूणच ही आत्मकथा वाचकांना खेळवून ठेवण्याचा प्रयत्न करते. संवेदनशील मनाला काही प्रसंग चटका लावतात. बार्शी सारख्खा खेडे गावातील एका तरूणाची कथा प्रेरणा देणारी आहे तेवढीच अंतमूर्ख करायला लावते.
- विकास पांढरे,सोलापूर 9970452767
बिगारी
मदन देगावकर - दंदाडे,9922973614
युगंधर प्रकाशन, पुणे
---------------------------------------

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...