शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

दंगलीतले दोन दिवस


मंगळवार,२ जानेवारी २०१८

कार्यालयीन कामासाठी मी १ जानेवारी पासून नगर जिल्ह्याच्या (उत्तरेला) ग्रामीण भागात फिरत होतो. मजल-दरमजल करत या गावाहून त्या गावात जाऊन काही महनीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन पुढचा रस्ता शोधत होतो. रात्रभर प्रवास सुरु होता. रात्री श्रीरामपूरला मुक्काम ठोकला. सकाळी सात वाजताच उठलो. अंघोळ केली. पुन्हा शहरातील काही व्यक्तींची भेट घेऊन पुढच्या प्रवासाचा बेत आखला.  श्रीरामपूर बसस्थानक समोरच्या कँटीनमध्ये नाष्टा केला. सोबत स्थानिक जिल्हा दैनिक जिल्ह्यातील घडामोडी नजरेत भरत होतो. चहावाला चहा करत होता, पानवाला पानाला कात लावत होता, भज्जीवाला कडईत भजी तळत होता, बाजारहाटसाठी परगावचे लोक येत होती, शाळा,काँलेजला जाण्यासाठी विद्यार्थी एसटीमधून उतरत होती,अशी काही लगबग सुरु होती. खरेतर, श्रीरामपूर हे व्यापारी पेठ. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच. 

दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात मध्यमगती गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या झहीर खानचे हे गाव. त्यामुळे या शहराविषयी उत्सुकतेने  कँटीन चालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. "झहीर खान हा आमच्या गावचा आहे,त्याचा मला अभिमान आहे." सध्या झहीरचे कुटुंब मुंबईत राहते, काही वर्षांपूर्वी त्याचे वडील श्रीरामपूरला आले होते, असे ऐकायला मिळते.
खरे,सांगायचे झाले तर श्रीरामपूरला ना मोठा इतिहास आहे ना भूगोल. इंग्रजी काळात  मध्य रेल्वेचे जंक्शन (बेलापूर) निर्माण झाल्यामुळे येथे मानवी वस्ती वाढली. पुढे साखर कारखाना सुरु झाल्याने झपाट्याने श्रीरामपूरचे गावात,शहरात, तालुक्यात आणि आता जिल्ह्याचे रूप धारण करत आहे. गुजरात, मध्यप्रदेश मधून मारवाडी जैन आले,गुजरात, राजस्थान च्या सीमाभागातून काही मुसलमान आले,  ख्रिश्चन मिशनाऱ्याने आपले बस्तान बसवले, पंजाब हरियाणा मधून शीख बांधव आले असे हे संमिश्र शहर आहे.

 महाराष्ट्रीयन समाजाचे स्थान क्वचित मोठे आहे पण आर्थिक स्थिती सक्षम नाही,असे तो कँटीनचालक सांगत होता. बघता बघता घड्याळात दहा वाजून गेले हे कळलेच नाही. मला ऊसतोड कामगार हाँस्पिटल परिसरात एकाची भेट घेऊन मुलाखत घ्यायची होती. मी संभाषण कमी करून रस्ता धरला. अचानक भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली असून एका युवकाचा बळी गेला असल्याची वार्ता हाहा म्हणताच श्रीरामपूर मध्ये धडकली. सकाळी अकरा वाजपर्यंत शांत असलेले शहर अचानक अशांत झाले. भीमा कोरेगावचे पडसाद श्रीरामपूर मध्ये उमठले. या प्रकरणाची शाहनिशा न करता काही  तरूणांनी दगडफेक केली. शहरातील मध्यवर्ती (शिवाजी चौकात) ठिकाणी काही तरूण एकत्र जमा होऊन घोषणाबाजी करत होते. श्रीरामपूर शहर बंद करत आले. टिव्ही चँनल आणि समाज माध्यमात भीमा कोरेगाव प्रकरणावरून तुंबळ वादसंगर चालू झाला. कोण, कुणाची डोके भडकवत होता? कोण,कुणाला शांत करत होता ? कुणी, पराचा कावळा करून दोन मने दुभंग करत होता. यामागचा हेतू काय आहे  कळायला मार्ग नव्हता.

    शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. चौकाचौकात पोलिसांचा पहारा उभा होता. हा गोंधळ लक्षात घेऊन मी बसस्थानकात येऊन बसलो शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसस्थानकात जमले होते. एसटी विभागाने बससेवा बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थी मित्राच्या घरी,काही विद्यार्थी होस्टेलवर,कुणी नातेवाईकांकडे राहण्याचा बेत करत होते. ज्याला कुणीच नाही, असे बसस्थानकात ताटकळत बसले होते. गावावरुन कुणी तरी आपणाला न्यायला येईल, या विचारात काही विद्यार्थी मग्न होते. शहर रिक्षा बंद असल्यामुळे इच्छित स्थळी कसे पोहोचावे, असाही प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.दंगलीबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने काही काळ शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दुग्ध संस्था व आरोग्य सेवा वगळता तातडीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. संपूर्ण शहरात कफ्यू लावण्यात आली होती. त्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते पण अनामिक भीती वाटत होती. पण सर्व जण जीवाच्या आकांताने सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. एक ज्येष्ठ नागरिकांनी श्रीरामपूर मध्ये १९८६ साली झालेल्या दंगलीचे कथन केले. तर एकाने २०१६ साली श्रीरामपूर दंगलीत ३४ दुकाने कशी जाळली गेली, आणि ती धग संपत असताना अचानक घडलेल्या अघटीत घटनेचे भाव त्या इसमावर उमठले होते. एक महिला आपल्या शेतातील भाजी विकण्यासाठी श्रीरामपुरात आली होती. दंगलीच्या पडसादामुळे ती ना बाजारात पोहचली ना तिची कुणी भाजी घेतली. गावाकडे कसे जायचं हा तिच्यापुढे उभा राहिला होता. जसजशा सूर्य माथ्यावर येऊ लागला तसतसे रस्तावर कुणी नजरेस पडत नव्हते. दुकाने बंद झाली होती, घोटभर पाणी प्यावे म्हटले तर हाँटेल ही बंद झाली होती. दिवसाढवळ्या रस्ते ओस पडू लागली होती. मी एका रिक्षाचालकास आगाऊ पैसे देऊन एका घरी पोहोचलो.

बुधवार, ३ जानेवारी २०१८

भीमा कोरेगावची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला. आदल्या दिवशीच श्रीरामपूरहून बेलापूरला जायचे ठरवले. दुपारचे चार वाजले असतील शहरात बंद शांतता होती. श्रीरामपूरहून बेलापूर आठ किलोमीटरवर आहे. त्यामुळे हा प्रवास सोयीचा वाटला. एका खासगी वाहन चालकास विणवणी केल्यामुळे तो मला बेलापूरला सोडायला तयार झाला. त्या आठ किलोमीटर अंतरासाठी शंभर रुपये मोजावे लागले,असो. रात्रीचा मुक्काम पुण्यनगरीचे वार्ताहर विष्णु डावरे यांच्याकडे केला. सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक जिल्हा दैनिक वाचत असताना एक बातमी नजरेत भरली. त्या बातमीने मी खूप अस्वस्थ झालो.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे श्रीरामपूर मध्ये शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. मॉडेल इंग्लिश स्कूल मधील तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रद्धा आदिक (८वर्ष) ही विद्यार्थिनी घरी पोहचलीच नसल्याची ती बातमी होती.
शाळेतील स्कूल बसने संबंधित मुलीला खानापूर येथे सोडले होते. शाळा लवकर सोडल्याची कल्पना शाळा प्रशासनाने पालकांना दिली नाही. तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेत या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता ही मुलगी पनवेल येथे सुखरूप सापडली,असे बातमीचे शेवट आहे. एका दंगलीचा या निरागस बालिकेने कसा सामना केला असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे राहताना अंगावर काटा उभा राहतो.

बेलापूरहून मला पुणतांब्याला यायचे होते. बेलापूर सारखे छोटे गाव बंद होते. विष्णुपंत डावरे यांच्या दुचाकीवरून कोल्हारला गेलो. तिथे  आदल्यादिवशी बंद पुकारण्यात आला होता.  दुपारचे तीन वाजले होते.हळूहळू रस्त्यावर वाहने दिसू लागली होती. त्या जिल्हा रस्त्यावर दंगलीची धग तेवढी जाणवत नव्हती. मला पुणतांबा येथे जाण्यासाठी श्रीरामपूरला यावे लागले. श्रीरामपूर ते पुणतांबा अंतर १८ किलोमीटर आहे. हे अठरा किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार तास लागले. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतली असल्याची बातमी समाज माध्यमातून कळली,तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

शाहीर पठ्ठे बापूराव

मराठी शाहीर परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव. बापूराव यांची यंदा दिडशेवे जयंती वर्ष सुरु आहे. या शाहीराच्या कलेचे स्मरण व्हावे म्हणून हा प्रपंच.

शाहीर पठ्ठे बापूराव
 मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि परंपरा म्हटले की,संत, पंत आणि तंत परंपरेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. शाहीर पठ्ठे बापूराव हे मराठी शाहीर परंपरेचे मुकुटमणी समजले जातात. असंख्य लावण्या, कवने, पदे भेदिक लिहून मराठी साहित्य परंपरेच्या दालनात मोलाची भर घातली. संत साहित्याच्या खालोखाल लावणीतून, अध्यात्माची जाणीव देणारे पठ्ठे बापूराव हे खरे 'लावणीसम्राट' होत.
पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांना ताला-सुरांचा साज चढून  त्याला तमाशात पेश करायचे काम पवळाने केले म्हणून १९ शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्याकडे पाहिले जाते.

 पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे वाळवे तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या छोट्याशा गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले हे पोरं. लाडाने त्याला बापू म्हणत. पुढे हाच बापू तमाशा क्षेत्रातला तेजस्वी तारा बनला. जेमतेम चौथी पर्यंत शिकलेले हे पोरं शब्दरचना करण्याच्या नादात औंध संस्थानातील नोकरी सोडून तमाशाच्या फडात कवने करू लागला. बापू ( श्रीधर) ने तमाशाचा नाद सोडवा, यासाठी त्याच्या कुटुंबाने खूप प्रयत्न करून पाहिले. यातून बाहेर काढण्यासाठी शिंगणापूरच्या शंभू महादेव बडव्याची मुलगी सरस्वती हिच्याशी श्रीधरचे  लग्न उरकून टाकले. लग्नानंतरही संसाराच्या जबाबदारीत बापूला आपले कवित्व स्वस्थ बसू देत नव्हते. त्याकाळी त्याने सरळ मुंबई गाठून किसनदादा गवळी,  आशन्ना कामाठी यांच्या तालमीत काम करू लागला. बालपणापासून कवितेची आवड असलेल्या बापूचे नाव अल्पावधीतच मुंबापुरीत गाजू लागले. बापू अनेक लढती जिंकू लागल्याने रसिक प्रेक्षकातून 'शाब्बास पठ्ठे ! बापूराव शाब्बास' अशी आरोळी ऐकू येऊ लागली.

 तेव्हापासून मराठी लोक परंपरेत पठ्ठे बापूराव हे नाव परिचित झाले. याच काळात हिरकणी पवळा हिच्याशी त्याची ओळख झाली.  तमाशात हे दोघे जोडीने काम करू लागले. पुढे हीच जोडी १९ व्या शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. संगमनेरजवळील हिवरगावच्या तबाजी महाराची ही मुलगी. देवाला मुरळी म्हणून सोडलेली पवळा दिसायला गोरीपान होती.
पवळा

ऐन तारुण्यात पठ्ठे बापूराव आणि पवळा यांची जोडी जमली. बघता बघता या दोघांची अदाकारी पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होऊ लागली. पुढे एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रितीरिवाज पाळण्याच्या काळात बापूराव आणि पवळाची प्रेमकहाणी गाजत होती. बापूराव ब्राह्मण तर पवळा महार. यामुळे लोकांत वितंडवाद झाला. भारतीय जातीव्यवस्थेची बळी पवळा ही सुद्धा ठरली.

 या प्रकरणामुळे बापूराव - पवळाचा फड काही दिवस बंद पडला. हातावरचे पोट असलेल्या बापूरावांनी कंञाटदारांना एकञ बोलावून शेवटी म्हणाले, "आम्हाला विकत तरी घ्या किंवा आमचा लिलाव करा" शेवटी एल्फिन्स्टन थिएटरचे मालक अबुशेट यांनी बापूराव -पवळा यांचा दरमहा नऊशे रूपयांवर लिलाव घेतला. कलावंत साथ देत नसल्याने बापूराव हतबल झाले. बापूराव,अबूशेटला म्हणाले, आम्हाला नुसते बघायलाही लोक फार येतात.  तेव्हा आम्हा उभयतांना पाहाण्यासाठी तिकिट लावले तरी गल्ला जमेल, असे सांगितले.अबूशेटने तसेच केले आणि दोन आण्याच्या तिकिटांची दररोज दोन चारशे रुपयांचा गल्ला जमू करू  लागले. गर्दी वाढू लागल्याने बंदोबस्ताची गरज भासू लागली.  त्यातच लोकात बाटला की न बाटलाचा वाद चालू होता. पोलिसात तक्रारी गेल्या आणि या सार्‍याला कारणीभूत तुम्ही आहात, तुम्हाला हद्दपार का करू नये, अशी नोटीस होऊन खटला कोर्टात गेला. ११ आॅक्टोबर १९०५ पर्यंत हा खटला चालला. पुढे कोर्ट स्वतः बापूरावांचा तमाशा बघायला आले. बापूरावांनी यावेळी स्टेजवर स्वतःचे जीवन चरित्रे सांगितले.

 "ब्राह्मणाचे महार होता येईल ; पण महाराचा ब्राह्मण होता येणार नाही. नामचंद पवळाने मला महार होण्याची अट घातली आणि ती मान्य केली, हे फक्त जाणते लोकच जाणतील. मग ती आता महार झालो आहे, तो ठीक आहे". याची प्रचिती म्हणून काय, पवळाने बापूरावाला आपल्या हाताने जेऊ घातले. मग हा वाद संपला. पुढे या दोघांनी मिळून  'मिठराणी' हा सुप्रसिद्ध वग तयार केला. कोल्हापूरात छञपती शाहू महाराजांच्या समोर हा वग सादर करून महाराजांचे मन जिंकले. या दोघांनी पुण्यात काही काळ राहून रेठर्‍यात आले. पवळाने बापूला बाटवले म्हणून तिचा तिरस्कार होऊ लागला. पवळा नाराज होऊन पुण्याला निघून गेली. गावकर्‍यांनी वर्गणी करून तीन हजार जमा करून  बापूरावाला काशीला जाऊन धर्मांतर शुध्द होऊन जातीत यावे म्हणून पैसे दिले. बापूराव काशीला न जाता पुण्याला आले. त्यांनी ते तीन हजार रूपये पवळाला दिले आणि म्हणाले, "एकदा महार झालो तो झालो. आता धर्मांतराची जरूरी काय? पण पवळाचे मन विटले होते. या दर्दभरी कहाणीचा शेवट शोकात्म होत होता.  दोघांमध्ये चिडचीड सुरू होऊ लागली आणि एकदिवशी हे दोन पाखरे विभक्त झाली. पवळाने तमाशाला रामराम ठोकून आयुष्य जगू लागली. पुढे हे दोघेही अत्यंत हलाखीत जीवन कंठीत होते.स्वतःचे जीवन लावणीत सांगताना पठ्ठे बापूराव म्हणतात :-
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण, असूनी सोवळे ठेवले घालून घडी !
मशाल धरली हाती तमाशाची लाज लाविली देशोधडी !
असे जीवन चरित्र असलेल्या पठ्ठे बापूरावाची लावणीरचना दोन लाखांहून अधिक आहे. तर रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्या. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली.
संग्रहीत चित्र

पवळा हिच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. पवळाच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते. तमाशाप्रेमी बाबूराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात  याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तर बापूरावविषयी प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील म्हणतात, शाहीर पठ्ठे बापूराव-ज्यांचा उल्लेख सार्थपणे 'लावण्यांचे विद्यापीठ' असा केला जातो, त्या बापूरावांच्या एका गौळणीतील शृंगार तर मला 'ओलेती' या चित्रकृतीच्या दर्जाचा वाटतो. ज्या अवीट गौळणीत शृंगाराच्या तप्त ज्वाला आहेत; मात्र तीत छछोर बाजारूपण नाही. रंगाची उधळण आहे, खुलेपणा आहे, पण बीभत्सपणाचा लवलेशही नाही. त्या गौळणीची धुंदावणारी चाल, पारंपरिक स्वरसाज... सारेच काही और!
"श्रीरंग सारंगधरा, लाजुनी धरिते उरा
चला नेते माझ्या मंदिरा
हो, उडवा रंग, रंग, रंग
तुम्ही माझ्या महाली चला ना
थाट विलासी केला भला ना
गुलाबाच्या फुलांचा झेला
जागोजागी मी खोविला पहिला
तुम्हा पचला, तर मग उचला
नचला नंग नंग नंग, उडवा रंग रंग रंग...'
त्या निःसंग, ढंगदार रात्रीचे वर्णन करता करता बापूराव राधा-कृष्णाचा हा शृंगार "मग आनंद मारील चिपळ्या, करील दंग दंग दंग' अशा बेहोषीच्या उंचच उंच झुल्यावर नेऊन ठेवतात.
यावरून तमाशा क्षेत्रातील पहिल्या अजरामर जोडीचे महत्त्व लक्षात येते.

लेखक - विकास पांढरे,९९७०४५२६७
       
शाहीर पठ्ठे बापूराव
जन्म नोव्हेंबर ११, १८६६
रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली
मृत्यू२२ डिसेंबर १९४५
पुणे


संदर्भ :-
 १)मराठीचे लोकनाट्य तमाशा  कला आणि साहित्य : लेखक नामदेव व्हटकर
२) प्रतिष्ठान खंड २

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

ऐसी कलाकृती होणे नाही


आज वि.वा.शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' नाटकाच्या प्रयोगाला ४३ वर्षे पूर्ण झाले. नाटकांविषयी मी २७ मार्च २०१६ रोजी सोलापूर तरूण भारत मध्ये लिहिलेला लेखाची ही एक आठवण.


 मराठी नाटयसृष्टीतील अजरामर नाटक म्हणजे  नटसम्राट  टू बी ऑर नॉट टू बी... जगावं की मरावं, कुणी घर देता का घर असा जबरदस्त मर्मभेदी संवाद अनेक अभिनयाची जुंगलबंदी असलेल्या, मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक नटसम्राट 23 डिसेंबर 1970 रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.



सत्तरच्या दशकात  वि.वि.शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यानंतर या नाटकाने एक नवा  इतिहास निर्माण केला.नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर  या पात्राला अधिक उंची मिळाली.  ख्यातनाम अभिनेता डॉ.श्रीराम लागू यांनी अप्पासाहेब बेलवकर यांची भूमिका साकारली होती. लागू यांनी अभियनातला मानदंड निर्माण केला. वि.वा.शिरवाडकर यांनी निर्माण केलेल्या नटसम्राट या नाटकाचा मूलाधर शेक्सपिअरच्या किंगलेअर नाटकाचा आहे. सत्तरच्या दशकातील हे नाटक मराठी नाटय रसिकांचा ठाव घेते. डॉ.श्रीराम लागू, दत्ता भट या रंगकर्मींनी हे नाटक एका उंचीवर नेउन ठेवले. सतीश दुभाषी,चंद्रकांत गोखले, यशवंत गोखले,मधुसूदन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे, उपेंद्र भट यांनी ही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. गणपतराव बेलवलकर या व्यक्तिरेखेला आयाम दिला तो लागू यांनीच. वृध्द नायकाची होणारी होरपळ आणि परवड सांगणारे हे नाटक आहे.  कावेरी,नलू, नंदा, शारदा, सुधाकर, विठोबा, सुहास ही पात्रे देखील तितक्याच ताकदीची आहेत.



अभिनयाची कारकीर्द ऐन भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा नट उतारवायत प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशीबी अंधारवाट येते. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक -प्रेक्षकच नव्हेतर त्याची 

स्वत:ची मुलेही त्याला स्वत:पासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीला सोबत घेवून या जगापासून दूर जात हालखीचं जीवन जगतो. या वृध्द नायकाची शोकांतिका म्हणजे नटसम्राट नाटक. डॉ.श्रीराम लागू यांनी वृध्द नायकाची केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहे.

1970-80 च्या दशकात या नाटकाचे विक्रमी प्रयोग झाले. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रयोग झालेले हे एकमेव नाटक. लागू यांनी आपला जिवंत अभिनय ओतून नटसम्राट आणि आप्पासाहेब ऊर्फ गणपतराव बेलवलकर या पात्रास घरोघरी नेले. लागूंच्या तोडून निघणारे स्वगत प्रेक्षकांना घायाळ करून सोडले होते इतके नाटक लोकप्रिय झाले. मुळातच लागू हे रंगभूमीवरचे कलाकार. लागू यांनी आकाश पेलताना, आंधळयाची शाळा, इथे ओशाळला मृत्यू, आधे अधुरी, एकच प्याला, उद्याचा संसार,कन्यादान, किरवंत, गिधाडे, दूरचे दिवे,पुण्यप्रभाव, वेडयाचे घर उन्हात, सुंदर मी होणार, राजमुकुट, सूर्यास्त अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केली. प्रसिध्द दिग्दर्शक जब्बार पटेल  लागू यांच्या अभिनयाविषयी म्हणतात.


"पाहिलेला माणूस,हिमालयाची सावली या नाटकात  महत्वाची भूेमका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता यर्इिल. भूमिका जिवंत करणारा  हा वाडमयप्रचार लागूंच्या बाबतीत  अगदी खरा ठरतो.डॉ. लागू हे आमचे  गुरू आहेत". त्यांचा रंगमंचावरील वाघासारखा वावर,त्यांची स्वगते, आवाजाची गोलकार परंगणी,देहबोली ओतून टाकतात. जीवंत अभिनयविश्व उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभिनयात आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने ते जागतिक रंगभूमीवरचे तोडीचे कलाकार आहेत असा नट होणे नाही.शिरवाडकर यांच्या लेखनात म्हणजेच संवादात जी ताकद आहे, त्याचा प्रभाव नाटकावर जाणवाते. या नाटकाची नुसती स्वगते अंगावर रोमांच उभे करतात. डॉ.जब्बार पटेल यांनी केलेल्या वर्णनावरून लागू यांच्या अभिनयाची महती लक्षात येते.

या वृध्द नायकाची शोकांतिक रूपेरी पडद्यावर आणण्याचे कार्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. जगावं की मरावं हाच एक खरा प्रश्न आहे. मी आप्पासाहेब बेलवकर. उभा आहे इथा हिमालयासारखा अभद्य. या दमदार संवादाने नाना पाटेकर यांनी आप्पासाहेबांना आणखीन अमर केले. हा संपूर्ण चित्रपट वेगवेगळया  सौंदर्याने नटला आहे.


 शिरवाडकरांच्या भाषेचा कणा नादमय आहे. प्रसंगानुसार, पोट तिडकीनुसार, वैतागानुसार, क्रोधानुसार,आनंदाने तर कधी तर दु:खाचे  उद्गार उमटतात. त्यामुळे हा चित्रपट रसिकांना  अस्वस्थ करून जातो. नानाच्या तोंडून निघणारा  संवादच  पाहा ना.
 " आता फक्त म्हणून उरला आहे. आपली पोरं चांगली आहेत.सरकार आपलं म्हातारपण वाईट आहे. वय झालेली म्हातारी माणसं पिशाच्चंच असतात. माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. दोष तुमचा नसेल,तुमच्या वयाचाही असेल.....मी पैसे चोरले सरकार? सरकार, तुला माहीत आहे. माझ्या क्रोधाला पाय नाहीत. हात नाहीत, लुळापांगळा आहे... गटरात तडफडणारं. मी पैसे चोरले?नाही. सरकार, मी रागवणार नाही नी तुम्हाला सांगून ठेवतो. मी रडणार नाही. डोळयांत आसवं जमायला लागली तर खेळ मारून डोळयांच्या खाचा करीन संभाजीसारखा. तुझ्यासारख्या आळयीसमोर रडणार नाही. मी पैसे चोरल? मी पैसे चोरले?". नानांनी आपल्या अभिनय कुशलतेने हा संवाद अधिक जिवंत केला आहे. त्यामुळे हा चित्रपट शोकात्मिक तेच्या उंचीवर नेउन पोहोचला आहे. हा चित्रपट पाहताना रसिकांना कुठेही कंटाळा येत नाही. मुळात नाना तस मराठी रंगभूमीवरचा शिलेदार नट. पाहिजे जातीचे, हामिदाबाईची कोठी, महासागर,अडाण्याचा गाडा,पुरूष, भाउ मुरारराव या नाटकात नानाची अभिनयाची कस लक्षात येते.   नानाच्या अभिनयाबाबत नाटयसमीक्षक वि.भा.देशपांडे एके ठिकाणी म्हणतात, "त्याच्या कारकीर्दकडे बघताना असं वाटत की त्यांचं सामर्थ्थ कशात आहे? किंवा बलस्थान कशात आहे? याचा विचार केला  नानाचा जो स्वर आहे तो स्वर खर्जात लावण्याची जी पध्दती आहे. ती त्याचं बलस्थान आहे आणि असा खर्जातला स्वर, खालच्या पट्टीतला लियाया पेलणारा नट असू शकतात असं नाही.संथ लयीनं, सहजतेने नाना अभिनय करतो हेच त्याच्या अभिनयाचे बलस्थान आहे".



एकूणच नाना हा कितीही मोठा नट असला तरी तो मूळ रंगभूमीवरचा माणूस आहे. डॉ.श्रीराम लागू हे जागतिक रंगभूमीवरचे महत्वाचे शिलेदार आहे. नटसम्राट नाटकांनी मराठी नाटकांना दिलेली मोठी शिदोरी आहे.

लेखक विकास पांढरे,९९७०४५२७६७

(साभार २७  मार्च २०१७ रोजी सोलापूर तरूण भारतमध्ये प्रसिध्द झालेला हा लेख.)

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरात निकाल आणि मतमतांतरे



गुजरात विधानसभा निवडणुकीचे रण अखेर संपले. भाजपाने सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन केले. या निकालामुळे समाजमाध्यमातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बीबीसी मराठीला मुलाखत देताना गुजरात मध्ये एका अर्थाने भाजपाचा पराभव झाला असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी गुजरातमधील नवीन काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे,असे ट्विटर वर मत व्यक्त केले आहे. समाज माध्यमातून गुजरात निकालाबाबत पत्रकार आणि  विश्लेषकांनी मते मांडली आहेत.

दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार सुकृत करंदीकर म्हणतात, "सलग सहाव्यांदा भाजप सरकारचा हा मोठा जय आहे. याआधी फक्त डाव्यांनी बंगाल सलग सातवेळा जिंकले होते". या पोस्ट ला देताना करंदीकर यांनी उपकमेंट दिली आहे, ती विचारत घेणे आवश्यक आहे. "जागा किती, मतांची टक्केवारी किती, प्रचारात किती फौजफाटा उतरवला होता यासारखे मुद्दे निर्रथक असतात. कारण, युद्धाला उतरताना तयारी किती करावी, याचं स्वातंत्र्य दोन्ही बाजूला असतेच. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अंतिम निकाल महत्त्वाचा. यावेळचा विजय भाजपने मोठ्या कष्टाने खेचून आणला, ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदींचा वैयक्तीक करीश्मा आणि अमित शहा या टास्क मास्टरचे परिश्रम या दोन्हीचा यात मोठा वाटा आहे. कॉंग्रेसने गुजरात जिंकण्याची सुवर्णसंधी वाया घालवली. कॉंग्रेसच्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत वाढ झाली हे खरे. पण गंमत म्हणजे भाजपच्या जागा गेल्यावेळपेक्षा कमी असल्या तरी त्यांचीही मताची टक्केवारी गेल्या वेळेपेक्षा वाढली आहे."

"जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर हे दोन नेते निवडून आले तर ते राष्ट्रीय पातळी वरील नेते बनू शकतात.  तसे घडले तर भारतीय राजकारणाला गुजरातची ही मोठी देणगी ठरेल",असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुनील तांबे यांना वाटते.

लातूर येथील 'बातमीमागची बातमी' या साप्ताहिकाचे संपादक महारूद्र मंगनाळे म्हणतात,"गुजरात विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल काहीही येवोत. जिग्नेश मेवाणी हा तरूण कार्यकर्ता १८ हजारावर मतांनी विजयी झाला,ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. जिग्नेशने गुजरातमधील उना दलित अत्याचारानंतर जी लढाई लढली होती, ती यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे,जिग्नेशने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली .सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. जिग्नेशच्या पराभवासाठी भाजपाने काहीच करायचे शिल्लक ठेवले नव्हते.प्रत्येक जातीसाठी वेगवेगळी पत्रकं काढून, जिग्नेशच्या बदनामीची मोहिम आखली होती. या सगळ्या प्रतिकूलतेवर  मात करून तो निवडून आला.एक प्रामाणिक,लढावू कार्यकर्ता निवडणुकीतही विजयी होऊ शकतो, हा जिग्नेशने दिलेला संदेश मोलाचा आहे.एक जिग्नेश भाजपाची पोलखोल करायला पुरेसा आहे".असे मंगनाळे यांनी फेसबुकवर म्हटले आहे.

"बहुमतातही पराभव आणि पराजयातही विजय शोधता येणे हा गुजरात निवडणुकीने दिलेला राजकीय विश्लेषणाचा नवा पॅटर्न"! असल्याचे मत लोकसत्ताचे पत्रकार दिनेश गुणे यांनी व्यक्त केले आहे.

फेसबुक युजर अरुण दीक्षित म्हणतात, "काँग्रेसला हरण्या सारखे काहीच नव्हते. १२-१५ सीटचा फायदा आणि १०% मतात वाढ ही एक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून मिळालेले यश हे विरोधकांच्या गडात घुसून शांतपणे त्याला आव्हान द्यायचे आणि गडात त्याला घाबरवून सोडायचे ही योग्य रणनीती यशस्वी झाली आहे".

"गुजरातमध्ये काँग्रेस बहुमत न का मिळवेना, भाजपची बऱ्यापैकी फाटली ! प्रबळ विरोधी पक्ष असणे आपल्या लोकशाहीसाठी आवश्यकच आहे. काँग्रेसचे मनोबल वाढेलच, भाजपने ही फार स्वप्नात न राहता सर्व प्रकारच्या लोकसमूहाच्या आशा आकांक्षाची दखल घेऊन संघटनात्मक काम केले पाहिजे, पुढच्या निवडणूका नक्कीच अधिकाधिक कठीण होत जातील,असे धनंजय भिडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केले आहे.

फेसबुकवर प्रसिद्ध असलेले युजर्स प्रसाद राऊत, अभिजित पानसे व पुण्याचे तुषार दामगुडे यांनी विनोदी ढंगाने गुजरात निवडणूक निकालाविषयी भाष्य केले आहे. 

प्रथम प्रसाद राऊत काय म्हणतात हे पाहुयात, गुजरात युद्धाचा निकाल लागलाय. सेनापती रागा यांच्या नेतृत्वाखाली जानवेसेना, वाघोजीराजेंची उठासेना, पटेलांची हार्दिकसेना, ठकोरांची अल्पसेना, जिग्नेसभायची मेवासेना... आदी सेनांनी कालकेय मोदींचा पराभव केला.  राजमाता सोनियागामींनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे जो कोणी राजकुमार मोदीचा पराभव करेल त्याला गुजरात देशाचं सिंहासन मिळणार होतं. त्यामुळे स्वतः आघाडीवर उतरत वाघोजीराजांनी मुसंडी मारली होती. पण इकडे त्यांच्या जहागिरीच्या प्रदेशात मोदी सेनेने वाघोजीराजेंना सुभेदारी बहाल केली. आणि मग वाघोजीराजे युद्धमैदानावर उगाच इकडे -तिकडे घोडा दौडवत राहीले. उठासेना गळफटलेली बघून युवराज रागा यांनी जानवेसेनेला मुसंडी मारायचा आदेश दिला. जानवेसेनेने जोरदार हल्ला चढवला. जानवेसेनेचे अनुभवी सरदार केतकर, कुबेर, सरदेसाई यांनी प्रचंड धाडसी हल्ला चढवत मोदीसेनेची विनाशक शस्त्रे - इव्हिएम ताब्यात घेतली. इव्हिएम अस्त्रे शत्रूच्या ताब्यात गेल्यामुळे मोदीसेना दुबळी झाली. मोदीसेनेचे सेनापती
अमितभाय यांनी माघार घ्यायला सुरुवात केली. सेनापतीने माघार घेतल्याने मोदी सरळ दिल्लीला निघून गेला. प्रचंड पराभव ! मोदीसेनेचा प्रचंड पराभव!
आता सगळ्यांना असे लागली होती ती गुजरात देशाचा नवीन राजा कोण असणार? राजकुमार वाघोजीराजेंनी ऐन युद्धभूमीवर टंगळमंगळ केल्यामुळे राजमाता सोनियागामींनी राजकुमार रागा यांच्या राज्याभिषेकाची घोषणा केली. या निर्णयामुळे वाघोजीराजे व संजयप्पा कमालीचे नाराज, उद्विग्न झाले. त्याच उद्विग्नतेतून त्यांनी भर राजसभेत सत्तेला लाथ मारण्याची धमकी दिली. आधीच युद्धभूमीवर टाइमपास वर सत्तेला लाथ मारेन अशी राजसत्तेच्या विरोधातली भाषा.. नवनिर्वाचित महाराज रागा संतापाने लाल झाले, आणि त्याच संतापाच्या भरात त्यांनी आदेश दिला. "युवराज वाघोजीराजे यांना राजशिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी गुजरात देशातून शून्य देऊन निष्कासित करण्यात येत आहे." 
आदेशाची तत्काल अंमलबजावनी करण्यात आली.आणि अशा प्रकारे गुजरात देशाचे राजेपद तर गेलेच सोबतीला सत्तेला लाथ मारेन या डायलोगच्या अति हव्यासामुळे सेनापती पदाचा पदभार सांभाळताना "वाघोजीराजे ठाकरे यांनी की में.... " हा अजरामर डायलोग हाणन्याची संधीसुद्धा गेली. 
सहसंपादक - साहेब... उठा... अग्रलेख देताय ना? 
संजयप्पा - हो. अर्ध्या तासाने ये. पाडतो तो पर्यंत अग्रलेख. 
सहसंपादक निघून गेल्यावर संजयप्पा लिहायला घेतात - राहुल गांधी हेच देशाचे भावी पंतप्रधान,असे उपहात्मक भाष्य प्रसाद राऊत यांनी केले आहे.

अभिजित पानसे हे उपहात्मक भाष्य केले आहे, ते म्हणतात,
गुजरात  निवडणूकचे निकाल बघता ही काही वर्षातील (रिजल्ट्स वरून) सगळ्यात सकारात्मक निवडणूक  क्रिकेट मॅच वाटतेय. दोन्ही टीम्सला यातुन सकारात्मक शिकायला मिळालं आहे.

"होम पिच" वर टॉस जिंकून पहिली बॅटींग बीजेपीने घेतली. संपूर्ण शक्तीने सर्व "कॅबिनेट टीम" खेळवली.
एका आदर्श , टिपिकल टेस्ट मॅच प्रमाणे 'सकाळी' #अँटीइंकंबन्सी'च्या धुक्यात, थंडीत ,नव्या कोऱ्या चेंडूने अलपेश , जिग्नेश, आदर्शने आणि राहुल गांधींच्या जबरी 'स्पिन' (जनेऊ धारी, शिव भक्तीचं #वळण) बॉलिंगच्या नेतृत्वात जबरदस्त, बॉलिंग करीत होम पिच वाल्यांची पूर्णपणे तारांबळ उडवली! 
आऊट साईड ऑफ स्टंप्स बॉलिंग केली , बौन्सर टाकलेत विकेट्स घेतल्यात. 
होमपीच असलेल्या भाजपासाठी सकाळ , पहिलं सत्र खूप वाईट ठरलं!
सकाळी काँग्रेस एकवेळ ९०+  तर बीजेपी ८४ + वर अडकलेली होती.
पण सकाळचं सत्र आटोपलं, धुकं हटलं, सूर्य डोक्यावर आला आणि टिपिकल '#राजकोट'ची पिच टिपिकल "पाटा बॅटींग पिच " झाली.
तिथून बीजेपीने जबरदस्त बॅटींग करत  'आघाडी' घेत 'मॅच'  जिंकली.
आणि काँग्रेसने हाती आलेली संधी गमावली. 'इतिहास' रचता रचता "इति ऱ्हास"  झाला.
पण यामुळे  भाजपाला जबरदस्त झटका बसला आहे हे नक्की. सत्तेचा माज आणि लोकांना गृहीत धरु नये हे कळलं. "होम पिच"वरही अवस्था बिकट होऊ शकते हे त्यांना समजलं,असं पानसे यांना वाटतं.

तुषार दामगुडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गुजरात निकालाविषयी मत व्यक्त केले आहे,  ते म्हणतात,

" ऐक ना, आय लव यु, मै तेरे बिना जी नही सकता  " तो 

" Oh No.... " ती

" काय झालं ?" तो 

" मी तुझ्या बरोबर भरपुर खाल्ले पिले, फिरले पण मी आजपर्यंत तुला "त्या" नजरेने कधी पाहिलं नाही " ती

" मग आता बघ" तो

" प्लिज रागवू नकोस , I Like You so much but माझ्या जोडीदारा बद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या मध्ये तु बसत नाहीस, पण तु शेवटपर्यंत माझा बेस्ट फ्रेंड म्हणून राहशील.....  " ती

तात्पर्य : याला म्हणतात सगळी बिलं मोठ्या आशेने भरून सुद्धा शेवटी "नैतिक विजय" पदरी पडणे.असे दामगुडे यांनी फेसबुकवर पोस्ट  शेअर केले आहे.

पुणे येथील पत्रकार अश्विनी सातव -डोके यांनी गुजरात निकालाचे वर्णन सुरेश भटांच्या ओळीत केले आहे. 
"आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यासत्व, 
विजय तो कसला जखम उरावर जो करणार नाही".

एकूणच गुजरात निवडणूक निकालांबाबत विविध राजकीय विश्लेषकांचे भाष्य, रविवारीय पुरवणी मधून काय समोर येईल, यावरून निकालाचे आणखीन गूढ समजून घेता येईल.

विकास पांढरे,९९७०४५२७६७

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

अश्विनी तडवळकर - समर्पित अभिनेत्री


पवित्र रिश्ता, कालाय तस्मय नम:, या दर्जेदार मालिकांपासून ते फोर्स, राजवाडा, यंदा कर्तव्य आहे, अशा हिंदी मराठी चित्रपटात आपल्या अभिनव कुशल अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री  म्हणजे सोलापूरची कन्या आणि उस्मानाबाद जिल्ह्याची सून अश्विनी तडवळकर होय. आज ती अभिनय आणि पत्रकारिता या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी झाली आहे.



  1. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर हे कला आणि संस्कृतीचे केंद्र समजले जाते. या शहराने जुन्या काळापासून सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. सोलापूरच्या मातीतून आजही अनेक गुणी कलावंत जन्माला येत आहेत, हे आपण पाहत आहात. त्यातील एका समर्पित अभिनेत्रीचे नाव म्हणजे अश्विनी तडवळकर.


    अश्विनी सध्या सोलापूरच्या दैनिक 'दिव्य मराठी' मध्ये सांस्कृतिक विभागाची पत्रकार आहे. ती पत्रकार असली तरी तिच्या अंगात अभिनय भिनला आहे. तिला बालपणापासून नाटकाची आवड आहे. ती अनेक नाटकात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. महाविद्यालयीन काळात तिच्या कलेला वाव मिळाला. याच काळात तिची अमिर तडवळकर या कसदार अभिनेत्यासोबत ओळख झाली.पुढे या जोडीने अनेक नाटके केली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकले.

  1. अश्विनीचा नाटक,चित्रपट आणि पत्रकार या माध्यमाशी संबंध आला. या तिन्हीं क्षेत्रात ती यशस्वी पणे काम करत आहे. विशेष म्हणजे घर,कुटुंब, मुलं सांभाळून ती नाटकाची तालीम असो वा राज्य नाट्य स्पर्धा यासाठी कार्यमग्न असते. 
  1. अभिनय कुशलता

    आतापर्यंत तिने  'कालाय तस्मय नमः', 'हसत खेळत लागली वाट', 'पवित्र रिश्ता' आणि 'बडे अच्छे लगते हो' या मराठी-हिंदी मालिकांमधून पडद्यावर दिसली तर जॉन अब्राहम यांचा 'फोर्स'या हिंदी चित्रपटात आणि मुक्ती, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित केदार शिंदे दिग्दर्शित 'राजवाडा' या मराठी चित्रपटात अभिनयाची झलक दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. इतकेच नव्हेतर 'यंदा कर्तव्य आहे', 'तुझी तुझा नवरा माझी बायको' या चित्रपटात विशेष छाप टाकली आहे. गेली पंचवीस वर्षे तिचा हा प्रवास सुरु आहे.

  1. पुण्यात पार पडलेल्या ५६ व्या राज्य नाट्य महोत्सवाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला अभिनयाचे रौप्यपदक रौप्यपदक मिळाले. सोलापूर केंद्रातून प्रथम आलेल्या लेखक राजेंद्र पोळ लिखित आणि अश्विनी तडवळकर दिग्दर्शित 'वारूळ' या नाटकातील राणी या पात्रांसाठी तिला पारितोषिक मिळाले. राज्यातील २१ केंद्रांतून प्रथम आलेल्या अव्वल नाटकातून बाजी मारत तिला हे यश प्राप्त करता आले. यावरून अश्विनीच्या अभिनय आणि दिग्दर्शनाची कल्पना लक्षात येते.

सन्मान 


56 व्या राज्य नाट्य स्पर्धेत समर्पित नाट्यमंदिर ने सादर केलेल्या 'वारूळ' या नाटकास प्रथम परितोषिक मिळाले.
यश

अभिनय


समर्पित नाट्य शाळेची ही मुलं म्हणजे उर्जेचा भांडार आहेत


कला,नाट्य,चित्रपट आणि पत्रकारितेची जाण असलेल्या या समर्पित अभिनेत्री 


झलक


. कला ही अंगभूत असावी लागते 


पत्रकारितेची जाण 


पत्रकारिता 

गेली अकरा वर्षे पत्रकारितेत ती काम करते आहे. दिव्य मराठीत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून विविध विषयांवर लेखन केल्यानंतर आज पहिल्यांदा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने पालकांची लूट या विषयावर लेखनाने तिला सशक्त पत्रकार बनवले. या लेखाला याविषयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

पुरस्कार 

अश्विनी व अमिर तडवळकर 

  • सोलापुरात अनेक तरुण- तरुणी कलावंत होण्यासाठी धडपडत असतात. या तरूणांना कलेचे व्यासपीठ आणि धडे देणारी संस्था सोलापुरात नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी अश्विनी व अमिर तडवळकर यांनी 'समर्पित' या संस्थेची निर्मिती करून अनेक होतकरू तरुण-तरुणींना नाटकाचे विशेष धडे देत आहेत.

  •  "कला ही अंगभूत असावी लागते तरच ती प्रेक्षकांच्या काळजापर्यत पोहोचते. कला म्हणजे काय?अभिनय,संवाद, संघर्ष याचे शास्त्रोक्त पद्धतीने धडे देण्यासाठी आम्ही नवराबायको मिळून 'समर्पित' संस्थेची निर्मिती केली आहे."असं अश्विनी तडवळकर हिने सांगितले. अशा या गुणसंपन्न अभिनेत्रीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!
@ विकास पांढरे,नवी मुंबई 

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

शोकात्म नायक

एखाद्या चित्रपटातील शोकात्म नायकाप्रमाणे शरद जोशी जगले, शिवाय महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा मूळ आत्मा हा दुसरा तिसरा कोणी नसून शरद जोशी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. मुळात ब्राह्मण असलेले शरद जोशी सामान्य माणसाचे जीवन जगता जगता अचानक एक असामान्य व्यक्तिमत्त्व बनले. चळवळीच्या माध्यमातून विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी शेतकरी बांधवांना दिलासा दिला, एवढेच नव्हे तर शेतीच्या प्रश्नांना आवाज प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली. बरबटलेल्या राजकारणात काही जण सोडून गेले तर, काही गळून पडले,तर काही कार्यकर्ते सत्तेत सहभागी आहेत. पण शरद जोशी या योध्दा शिलेदाराने आपली विचारसरणी ढळू दिली नाही.
  •  बळीराजाच्या समस्येसाठी सतत झटणारे शरद जोशी नावाचे चक्रीवादळ निवले. आयुष्यच्या उत्तरार्धात त्यांच्या संघटनेचा प्रभाव कमी झाला असला तरी, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान बहुमोल आहे. मी कुणब्याच्या पोटी जन्माला आल्याने शेतीबाबत आत्मियता तर होतीच शिवाय शेती व्यवहारात घडत असलेल्या प्रश्नांबाबत जनमानसात विशेषतः वर्तमानपत्रात बातम्या वाचायला मिळत.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्याविषयी भरभरून लिहिले जात असे. आमच्या पिढीने शरद जोशी यांचे आंदोलन, भाषणे पाहिले व ऐकले नसले तरी या व्यक्तीबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे शरद जोशी हे सामान्य शेतकरी ते सधन शेतकऱ्यांचे आधारवड वाटतात.बहात्तरच्या दुष्काळ ळानंतर राज्यातील शेती व्यवसाय धोक्यात अडकला होता. खेड्यातील तरुणाई पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात स्थलांतर करु लागली. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या समस्येकडे अधिक लक्ष देण्यासाठी शरद जोशी यांनी सनदी अधिकाऱ्यासारखी भली मोठी पगार सोडून,शेतकऱ्यांच्या जीवनात नवप्रकाश निर्माण करण्यासाठी १९७९ साली शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. १९७९ पासून शेतमालास रास्त भाव एककलमी कार्यक्रम, नाशिकचे दरवाढीचे आंदोलन, निपाणीचे तंबाखू आंदोलन, पिंपळगाव बसवंतीमधील कांदा आंदोलन, दूध, भात,कापूस इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व उभारले, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने घेऊन महाराष्ट्र ढवळून निघाले. त्यामुळे शेतकरी जागृत होऊ लागला. त्यानंतर शेतकरी नेते शरद जोशी यांचा प्रभाव पडत गेला. विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचे कौशल्य, अफाट स्मरणशक्ती व संघटन कौशल्याच्या जोरावर शरद जोशी हे अल्पावधीत लोकप्रिय झाले. अनेक सुशिक्षित तरुण शेतकरी चळवळीत सहभागी होऊन आंदोलने करु लागली. माजी आमदार पाशा पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत आदी नेते जोशी यांच्या तालमीत घडलेले विद्यार्थी आहेत. जोशी यांना विदर्भातील शेतकऱ्यांनी साथ दिली. विशेष म्हणजे ८०च्या दशकात शरद जोशी यांना याठिकाणी जे यश मिळाले तितके अन्य विभागात मिळाले नाही. त्यामुळेच जोशी यांचा विदर्भात आजही काही प्रमाणात प्रभाव टिकून आहे. व्ही.पी.सिंग यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोशी यांनी देश पिंजून काढला तर रामजन्मभूमीच्या मुद्यावर भाजपसेनेवर टीकाही केली.
  • १९८४ साली त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. शरद जोशी यांची शेतकरी संघटना ज्या मायकल लिफ्टन यांच्या 'व्हँव पुअर पिपल स्टे पुअर केस ऑफ अरबन डेव्हलपमेंट' या पुस्तकावर आधारित आहे. याविषयी एका अंकात मिलिंद मुरुगकर म्हणतात, या पुस्तकातील प्राइस ट्विस्ट आयडोलाँजी इन रूरल अँन्ड अरबन डेव्हलपमेंट ही दोन प्रकरणी म्हणजे शेतकरी संघटनेचे वैचारिक अधिष्ठान आहे. हे लिफ्टन यांच्या पुस्तकाचे मुख्य सिध्दांत असा की, शेती मालाचे भाव पाडणे हे जगातील गरीब, विकसनशील देशांचे अधिकृत धोरण आहे. लिफ्टन हे ७० च्या दशकात लिहित होते,शेती मालाचे भाव पाहून शेतीत तयार होणारी संपत्ती औद्योगिक क्षेत्राकडे वळवल्यास औद्योगिकीकरण होऊन विकास साधला जाईल,अशी ही भूमिका होती.पण प्रत्यक्षात शेतीच्या शोषणाच्या या अधिकृत धोरणांमुळेच गरीबी हटण्याची प्रक्रिया मंदावली, अशी प्रभावी यांनी लिफ्टन करतात. मायकल लिफ्टन यांनी कंट्री व टाऊन या संकल्पना वापरून केलेली शेतीच्या शोषणाच्या सिध्दांताची मांडणी शरद जोशींनी मोठ्या कल्पतेने भारत व इंडिया ही संकल्पना वापरून भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली व शेतकऱ्यांची प्रबळ राजकीय ताकद उभी राहिली. यावरून त्यांच्या संघटनेचे स्वरूप लक्षात येते. १९९१ साली मुक्त अर्थव्यवस्थे संदर्भात शरद जोशी यांनी ''सरकार क्या समस्या सुलझायेगी? सरकार ही एक समस्या आहे ! अशी टोकाची भूमिका घेतली. तर याच काळातील डंकेल ड्राफ्टचे स्वागत केले असले तरी, हा संवेदनशील विषय शेतकऱ्यांना समजून सांगण्यास कमी पडले. त्यामुळे या संघटनेची पडझड होऊ लागली. 

  • ज्या पक्षाला विरोध करत राहिले त्याच पक्षाच्यावतीने राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळवले. अशी विसंगती दिसून येत असल्याने संघटनेतील मोहरे बाहेर पडले, संघटनेची एकसूत्रता ढासळू लागली. वेगवेगळ्या संघटना उदयास येऊ लागल्या. त्यामुळे शेतकरी संघटना आणि शरद जोशी हे समीकरण कमी कमी होत गेले. पण शरद जोशी यांच्या शेतकरी संघटने प्रमाणे देश ढवळून काढणारी संघटना निर्माण होऊ शकली नाही. शरद जोशी यांनी जी झुंज दिली आणि संघटना नावारूपाला आणली. पण एकेक मावळे स्वतःचा सावतासुभा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकानेही बळीराजाचे स्पंदने ज्वलंत करण्यासाठी शेतकरी संघटनेची कावड उचलू शकले नाही. त्यामुळे शरद जोशी यांच्या विचारांची परवड झाली. जोशी यांच्या राजकीय व सामाजिक चळवळीत शेती आणि शेतकऱ्यांच्या परिवर्तनाची असंख्य स्पंदने आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात शरद जोशी यांनी शेती प्रश्नांसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. चळवळीतील साक्षीदार म्हणून राहिले, ते निघून गेले, स्वार्थाचे भागीदार बनले. त्यामुळेच शेतकरी संघटनेची शोकात्मकता झाली.  यांचे परिमार्जन म्हणजे शरद जोशी यांच्यासारख्या सच्चा नेत्याची झालेली परवड होय. जोशी यांचे अनेक कार्य अधुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना आपले कौशल्य पणाला लावतील का ? शेतकऱ्यांचे प्रश्न,त्यांच्या समस्या, त्यांच्या. हालअपेष्टा यासाठी आंदोलनाचे अंगार उभे करणारे शरद जोशी यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायीआहे. 

  • लेखक विकास पांढरे,९९७०४५२७६७  ( सदर लेख १३ डिसेंबर २०१५ रोजी दैनिक देशदूत,जळगाव मध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)


सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

प्रतापगडचा अविस्मरणीय अनुभव

मी आजपर्यंत बोटावर मोजण्याइतके प्रेक्षणीय स्थळे व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. त्यामध्ये नळदुर्ग, परंडा, औसा, दौलताबाद (देवगिरी), सिंहगड ऐतिहासिक गडकिल्लाचा व महाबळेश्वर,पाचगणी आणि येडशी येथील निसर्ग सौंदर्याचा समावेश आहे. परवा 'विवेक'समूहाबरोबर महाबळेश्वर-वाई-भिलार-प्रतापगडची सहली केली.

महाबळेश्वर मधले फिरणे.. थंडगार हवा.. अद्भभूत स्पाँट.. जितका आनंद तितकाच कमी.. देशातले पहिले पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारगावाची भेटही नव्या विश्वात घेऊन जाणारी ठरली.प्रतापगडची सहल माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. मराठी मुलुखावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्याच्या पायथ्याशी केला. त्यामुळेच लहानपणापासून 'किल्ले प्रतापगड'ने मनात घर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असलेल्या 'प्रतापगड'च्या पायरीला मस्तक ठेकताना अंगावर काटे आले आहे.

                                                               इतिहासात डोकावताना 

चंद्रराव मोरे याचा पराभव करून छ.शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तेव्हा नीरा आणि कोयनेच्या काठावर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जावळीच्या खोऱ्यात असलेल्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा शिवाजी महाराजांनी मोरोपंतांनी दिली. मोरोपंतांनी आपले कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद किल्ला तयार केला. हाच तो प्रतापगड. पार आणि किनूश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्लाची बांधणी झाली आहे. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा प्रचंड विस्तार आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे.


या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाढत चालली शक्ती पाहून १६५७ साली आदिलशहाने वाईचा सरदार अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराज आपल्या गमिनी काव्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.  खानाचा साथीदार सय्यद बंडा यांने राजेंवर तलवार उगारली तेव्हा जिवा महाला या धाडसी मावळ्यांने सावधगिरीने सय्यद बंडाला मारले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा"या म्हणीच्या रूपाने गडाचा इतिहास अजरामर झाला आहे. त्याचे इतिहासात वर्णन आहे. 

                                    
                                                                                      सफर 

प्रतापगडची सफर पायथ्यापासून सुरू होते. गडाच्या खाली डाव्या बाजूला दर्गा शरीफला जाण्याची एक पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर.



 सध्या येथे पोलिसांचा पहारा असल्यामुळे येथे जाता येत नाही. त्यामुळे दूरवरून फोटो घेता आला. किल्लाचा थोडा पायथा चढून वर गेल्यावर महाद्वार लागतो.श्री तुळजाभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. आज गडावर छोटे गाव वसले आहे


प्रतापगडावरून सह्याद्रीचा अद्भभूत निसर्ग पाहता आला. सह्याद्रीच्या कुशीत गडावरचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहतोय. 'हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी' ची गुंज दऱ्याखोऱ्याला जागी करते. पुन्हा पुन्हा इथल्या मातीला, इथल्या निसर्गाला,  इथल्या पशुपक्ष्यांन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देते.

                                                                    शिवकालीन शौचालये 

       किल्ल्याची पाहणी करताना माझ्यातला पत्रकार जागा झाला. कोणकोणती कामे सुरू आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. किल्लात सध्या विविध कामे सुरु आहेत. चाळीस वर्षापूर्वी किल्ल्यावर वीज कोसळल्याने एक तटबंदी कोसळली आहे. या तटबंदीचे काम होणे आवश्यक आहे पण फार जिकिरीचे हे काम आहे. गडाच्या माथ्यावर असलेल्या ध्वजस्तंभापर्यंतचा रस्ता सध्या माती आणि दगडाने भरून गेला आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली पायऱ्या आहेत. या पायऱ्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
  या ढिगाऱ्याखाली शिवकालीन जातं निघाले आहे.  विशेष म्हणजे, किल्ल्याची जी तटबंदी आहे. त्या तंटीबंदीमध्ये जवळपास दीडशेहून अधिक शौचालयाचा शोध लागला असल्याची माहिती अभियंता अमन कांबळे यांनी दिली.




आज लोकांना शौचालयाचे महत्त्व किती आहे  कळू लागले आहे. ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर शिवकालीन शौचालयांची निर्मिती केली होती. हे पाहून मी भरावून गेला. किल्लात अनेक ठिकाणी शिवकालीन पाण्याच्या टाक्या आहेत.त्याचा शोध घेणे सुरू आहे.

                                                         ७२ वर्षाचा उत्साही गाईड 

 शिवकालीन इतिहासापासून ते प्रतापगडाच्या पायथ्थापासून ते माथ्यापर्यंत,  इंत्थभूत माहिती असणारा एकमेव गाईड म्हणून जनार्दन जंगम (पाटील) उल्लेख केला जातो. या माणसाचे सध्याचे वय आहे बहात्तर. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ ते गाईडशीप करत आहेत. सध्या ते विद्यमान सरपंच आहेत. ५० वर्षापूर्वी किल्ल्याची माहिती कशी द्यायची याविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, साहित्यिक गो.निं.दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

गाईडशीप करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळ्या भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. विविध प्रांतांतून, देशांतून आलेल्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत ही माहिती दिली तर इतिहास जास्त कळतो,असे गो.निं.दांडेकर म्हणायचे, त्यासाठी मी मराठी, हिंदी, कन्नड, पंजाबी, तेलगू, कच्छ या भाषेतून मार्गदर्शन करतो असे जनार्दन जंगम (पाटील) यांनी सांगितले.गाईड जनार्दन पाटील यांच्या तोंडून प्रतापगडाचा इतिहास समजावून घेणे, हाच मुळी मोठा आनंददायी, माहिती आणि ज्ञानात भर टाकणारा असतो. त्यामुळे पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील बरचसे पर्यटक गाईड म्हणून पाटील यांना पसंती देतात.


जनार्दन पाटील हे अर्धशतक प्रतापगडाशी एकरूप झाले आहेत. यामुळेच सत्तरीतही तरूणांना लाजवणारा अखंड उत्साह त्यांच्याजवळ आहे. किल्ल्यावर चढणे,खाली उतरणे ही मोठी कसरत असते. हा अवलिया बहात्तराव्या वर्षी ही कसरत लिलया पार करतोय. मर्द मावळ्याचे रक्त काय असते हे गाईड जनार्दन पाटील यांच्याकडे पाहून लक्षात येते. पुरातत्व विभागाने त्यांना गाईडशीपचे अधिकृत ओळखपत्र दिले आहे. या अवलियाची माझी भेट झाली हाच एक अविस्मरणीय अनुभव होता.

महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो हे आमचे भाग्य आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजासारख्या महापुरुषांच्या पराक्रमी वास्तुला स्पर्श होणे म्हणजे परमोच्च आनंद. या महापुरुषांच्या पराक्रमाचे जागर करणे हे आमचे कर्तव्य आहे नव्हे ते आद्यकर्तव्य आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...