मंगळवार, १० जुलै, २०१८

पुणतांब्याच्या पाऊलखुणा...!


एक गाव मनात घर करून राहिले आहे. ते मनातून जाता जात नाही. तिथला निसर्ग, तिथले ऐतहासिक,धार्मिक वैभव पाहताना सुखद अनभुव येतो. काही दिवसांपासून या गावाविषयी लिहावे असे  मनात घोळत होते,पण की-बोर्डवर उतरत नव्हते, या गावाला आपण विसरून तर गेलो नाही ना? असा भास झाला. आज पुन्हा त्या गावाची आठवण आली आणि लिहायला बसलो. आजच्या 'ग्लोबल' युगातले हे गाव काळाच्या ओघात आपल्या पाऊलखुणा जपत आहे. होय, मी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पुणतांबा ( ता.कोपरगाव जि.नगर) या गावाविषयी बोलतोय!

सा.'विवेक'च्या कामानिमित्त जानेवारी (सन २०१८)महिन्यात नगर जिल्ह्यात प्रवास करता आला. या प्रवासात 'पुणतांबा' या गावात जाणे झाले. अलीकडच्या काळात शेतकरी आंदोलनामुळे हे गाव प्रसिध्द पावले. माध्यमांतून या गावातल्या शेतकरी संपाविषयी, आंदोलनाविषयी बातम्या वाचायला मिळत होत्या. या गावात जाता येईल, असे वाटले नव्हते. जेव्हा या गावात उतरलो तेव्हा इथला शेतकरी कसा असेल? पीक-पाणी कसे असेल याविषयी मनात प्रश्न उभे राहिले. पण आंदोलनाविषयी कोणी बोलत नव्हते.

शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. रेल्वे मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाची उत्तम सोय आहे. गावाच्या अंतरंगात शिरू लागलो. तेव्हा पडझड झालेल्या तटबंदी दिसू लागल्या. संपूर्ण पुणतांबा गावाला तटबंदी आहे. ठिकठिकाणी वेशी दिसू लागल्या. या तटबंदी,वेशी आपल्या जुन्या आठवणी सांगत होत्या. अकरा वेशीने बनलेले हे गाव असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. माझ्या नजरतले असे हे पहिलेच गाव. गोदातरी वसलेल्या या गावाची कहाणी मला अधिक भावत गेली. मनात घर करत राहिली. बालकवींनी शब्दबध्द केलेल्या 'औदुंबर' कवितेची आठवण झाली. हिरवेगार शेतमळे, नागमोडी वळणे घेत घाट, मंदिराकडे जाणारी गोदामाईची पायवाट पाहताना मनात चैतन्य खळाखळते.  काळाश्या डोहात पाय ठेवताना मन पवित्र होते. गोदामाईचे पाणी गोड आहे. या गोडव्यामुळे या गावाला वैभव प्राप्त झाले असावे.
गोदातीर
 प्रतिष्ठित नागरिक सुभाष वहाडणे यांनी पुणतांब्याची सफर घडवली. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आणि गोदातीरावर हे गाव वसले आहे. विशेष म्हणजे या गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी राजा विक्रमादित्य यांची राजधानीचे हे गाव होते. अशी मौखिक माहिती मिळते. चांगदेव महाराजांची समाधी मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, मामा-भाच्याचे मंदिर, खंडोबा मंदिर,कालभैरव मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, संत गंगागीर महाराज मंदिर असे गावात जवळपास ४००पेक्षा जास्त पुरातन मंदिरे आहेत. संत साईबाबा व संत जनार्दन स्वामी यांचे काही वर्षे पुणतांब्यात वास्तव होते. पेशवाईच्या काळात या गावाला वैभव प्राप्त झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट व मंदिराची उभारणी करून गावाला धार्मिक वैभव प्राप्त करून दिले. आजही हे घाट व मंदिर सुस्थितीत आहे.

गावात आलुतेदार-बलुतेदार पूर्वीपासून गुण्यागोंविदाने राहतात. धनगरवाडा, कुंभारवाडा, बामणवाडा अशा वेगवेगळया आळया आढळतात. काळाच्या ओघात जीवनपध्दती बदलत गेल्यामुळे आळया ( गल्ली) हा प्रकार राहिला नाही. पुणतांबेकर, वहाडणे, शेंडगे, चितळकर, मुळे, रोकडे, कुलकर्णी अशा विविध आडनावाचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या २० हजारपेक्षा जास्त असली तरी शहराचे रूप गावाने पाघरले नाही. सका-सकाळी शेताकडे गुरे-ढोरे घेऊन जाणारे पशुपालक- शेतकरी नजरेस पडतात. गावात राष्ट्रीय व शेडयूल बँका आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्याची शाळा आहे. व्यापारी संकुल देखील आहे. सायंकाळी गावात भाजीपाल्याचा बाजार भरतो. भाजी विकण्यासाठी आसपासच्या गावातील शेतकरी पुणतांब्यात येतात.

पुणतांबा व्यापारी संकुल


पुणतांबा - भाजीपाला बाजार

मी पहिल्यांदा श्री.खड्गधारी खंडेराय मंदिरात गेलो. झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' मलिकेत या मंदिराचा उल्लेख आला होता. त्यामुळे या मंदिराविषयी उत्सुकता होती. मंदिर छोटेच आहे.

कृत युगात पुरातन काळी मनी आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी ऋषी मुनींचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मनिचल पर्वतावर मोठे युध्द केले त्या युध्दात मनी दैत्य शरण आले आणि मल्ल दैत्याचा वध झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या अवतरला मल्हारी मार्तंड असे नाव मिळाले. ती विजय तलावर (खड्ग) देवाने भक्तांसाठी पुणतांबा गावास भेट दिली आहे. त्यात त्यांचा अंश आहे. अशी अख्यायिका असल्याची माहिती पुजारी शेंडगे यांनी दिली.
खंडोबा मंदिरातील विजयी तलवार समवेत मी आणि सुभाष वहाडणे
गोदावरी नदीत मल्हारी मार्तंड अंघोळीसाठी गेले असता तिथे ही विजयी तलवार त्यांनी पाण्यात फिरवली. आज त्या ठिकाणी चौकानी आकाराचा खड्डा पडला आहे. खरेच, अशा प्रकारचा खड्डा गोदावरी नदीत पहायला मिळतो. मी जेव्हा विजयी तलवार हातात घेतलो ती खूपच जड होती. दोन्ही हाताने उचलावी लागली. तलावर उंची ७ ते ८ फूट असावी.

गोदातीराच्या बाजूला अंबाबाईचे पुरातन मंदिर आहे. एखाद्या राजवाडयासारखे दिसणारे हे मंदिर पर्यटकांना मोहित करते. मंदिराची इनामी शेती आहे. शेतीत विविध पीके घेतली जातात. मंदिराच्या जीर्णोद्वाराची माहिती एका शिलालेखाद्वारे मिळते. मंदिराची आतील बाजू तितकीची चांगली दिसत नसली तरी बाहेरून हे मंदिर बघण्याजोगे आहे.
देवी मंदिर
मंदिराच्या इनामी जमीनीत बहरलेले गव्हाचे पीक

नदीच्या तीरावर कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे. अहिल्यादेेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला. घडीव व कोरीव दगडाचे हे मंदिर आहे.मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही, त्याचे काही धार्मिक कारणे आहेत पण त्रिपुरारी र्पोर्णिमा व कृतिका नक्षत्रांत महिलांना देवाचे दर्शन घडते.  मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला नवग्रह मंदिराचे दर्शन घडते. काशीविश्वेश्वरांचे मंदिर ही सुस्थितीत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भलीमोठी पिंड आहे. नदीपात्रातील या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविक गर्दी करत असतात. दूरवरून ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलेला  दगडी पुल दिसतो. आजही हा पुल भक्कम स्थितीत आहे.
कार्तिक स्वामी मंदिर


काशी विश्वेश्वर मंदिर
पुरातन पिंड

ब्रिटिश कालीन रेल्वे पुल

पुणतांबा गावातच महायोगी चांगदेव महाराजांची समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज या गावातून गेले होते असे असल्याचे सांगण्यात आले. चांगदेवानी ज्यांना गुरू केले त्या संत मुक्ताबाईचे मंदिर इथेच आहे. या गावात मामा- भाच्याचे एक मंदिर आहे. मामा-भाचे या दोघांच्या प्रेमाची कहाणी इथे सांगितले जाते. देशात मामा-भाचे एक मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही.आगळेवगळे मंदिर असावे. सध्या या मंदिराची दुरावस्था झाली आहे. मंदिरातील मूर्त्या अडगळीला पडल्या आहेत. नंदीबैलाच्या मूर्तीची नासधूस झाली आहे. मंदिराची देखभाल करायला कोणी नाही.
चांगदेव मंदिर
समाधी दर्शन
मामा-भाचे मंदिर

अडगळीत पडलेली मूर्ती

मूर्तीची दुरावस्था

गावाची आध्यात्मिक परंपरा लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट बांधला आहे. हा घाट आजही उत्तम स्थितीत असून घाटावर उभारून गोदातीराचे विलोभनीय दर्शन घडते. घाटावर अनेक धार्मिक होतात. गावातच होळकरांचा मोठा वाडा आहे. आज या वाडयाची मोठी पडझड झाली आहे. होळकरांच्या वंशजांनी हा वाडा दुसऱ्या एका व्यक्तीला विकला असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले.

होळकर वाड्याची दुरावस्था


घाट

या गावाचे आणखीन वैशिष्टय म्हणजे दिवंगत संगीतकार सी.रामचंद्र, स्व.माजी खा.सूर्यभान वहाडणे, स्व.जगन्नाथ बारहाते, बाबुराव चतुर्भुज हे दोन माजी आमदार या गावातीलच होती. संगीतकार सी.रामचंद्र यांचे बालपण या गावतच झाले. ते ज्या वाडयात राहत होते. तो वाडा आजही सुस्थितीत आहे. आज या वाडयात त्यांचे पुतणे राहतात. माजी खा.सूर्यभान वहाडणे यांनी आपले कुलदैवत खंडेरायाचे मंदिर स्वतःच्या जागेत स्थापन केले आहे.

संगीतकार सी.रामचंद्र यांचा वाडा

सी.रामचंद्र यांच्या पुतण्यासमवेत


वहाडणे कुटुंबियांचे खंडोबा मंदिर

पुणतांबा गावाला जे वैभव प्राप्त झाले आहे. त्या वैभवाचे जतन व संवर्धन करणे आपली व सरकारची जबाबदारी आहे. पुणतांबा गावाचा विकास होण्यासाठी सरकारने हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आणले  पाहिजे. कारण इथला सर्व भाग हा पर्यटनाने व्यापला आहे. पुणतांब्याचे हे वैभव पर्यटकांना आकर्षित करील, हे मात्र नक्की.

-विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, २१ मे, २०१८

स्मरण एका महानायकाचे..!



तारुण्यात उत्साह आणि जोश असतो. याकाळात जीवनाची टेकडी चढताना समोर मृत्यू दिसत नसतो. तो पलीकडच्या बाजूला पायथ्याशी असतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबतीत असेच घडले. राजीवजीच्या मृत्यूला २५ वर्षे उलटली तरी त्याचे कार्य आजही उपयोगी पडते आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृती दिन.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची पैलू उलगडून दाखवणारा हा लेख.

स्वातंञ्योत्तर भारतीय राजकारणातील चाणाक्ष नेते, विज्ञानाचे पुरस्कर्ते, परराष्ट्र धोरणाचे अचूक ज्ञान, जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती लाभलेल्या राजीव गांधी यांना आपल्या देशातील सर्वाधिक तरूण पंतप्रधान म्हणून पंतप्रधान होण्याचा मान मिळविला. जेव्हा ते पंतप्रधान बनले तेव्हा ते चाळीस वर्षाचे होते. त्यांची हत्या झाली तेव्हा ते ४६ वर्षाचे होते. इतक्या छोट्या आयुष्यात त्यांनी विविध कार्य करून देशाला नवी दिशा आणि आशा प्राप्त करून दिली. त्यामुळेच ते अजब रसायन ठरतात. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी आयुष्यात जे मिळवले ते आठवण्याचा दिवस. राजीवजी भूतकाळात रमणारे पंतप्रधान नव्हते. भविष्याकडे आशेने पाहत बसणारे ते एक चिरतरुण पंतप्रधान होते. राजीवजी जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा देशाची सद्यस्थिती व वर्तमानकाळ केविलवाणा होता. 

 १९८७-८८ च्या काळामध्ये देशांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी 'भारतीय माकडाच्या लष्कराला हाकलून लावा' हा "पीपल्स लिबरेशन फ्रण्ट"चा लोकप्रिय नारा होता. सिंहल लोक भारताकडे वाकड्या नजरेने पहात होते. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मुळे संपूर्ण पंजाब आगीत भडकून निघाले होते. भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी धर्मत्याग करून दहशतवाद स्वीकारला होता. अशा परिस्थितीत राजीव गांधी यांनी चाणाक्षपणाने पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख नेते संत हरचंद सिंग लाँगवाले यांच्या सहमतीने उग्रवाद्यांसोबत सामंजस्य करार केला. परंतु, संत लाँगवाले यांच्या हत्येमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. पण राजीवजी शीख नेत्यांचे समर्थन जिंकण्याचा प्रयत्नात होते. अशा अंदाधुंदीच्या काळात राजीव गांधी यांना २१ व्या शतकाचा सुवर्णकाळ स्वस्थ बसू देत नव्हता. या तरूण पंतप्रधानाने आपले लक्ष नवनिर्मितीकडे वळवले. त्या प्रकाशात व आशेवर ते जगत होते.

ज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सॅम पिञोदा एका लेखात म्हणतात." राजीव गांधी यांच्याकडे दूरदृष्टी होतीच. परंतु त्याशिवाय त्यांचाकडे उत्कृष्टता देखील होती. त्यांना राजकारणाविषयी आत्मविश्वास होता. भारताला २१ व्या शतकात नेण्याची दूरदृष्टी आणि आपल्या देशातील गरज आणि आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत त्यांना खूप चांगली समज होती. जेव्हा कोणीही या गोष्टीचा विचार देखील करत नव्हता. भारतासारख्या विकसनशील देशात तंञज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावेल, हे त्यांच्या लक्षात आले. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी तंत्रज्ञान प्रमुख भूमिका बजावेल याबाबत ते आश्वस्त झाले होते. दूरसंचार ही विकासाची किल्ली ठरणार हे त्यांना समजले होते. कॉम्प्युटर उपयोगासाठी मुख्य प्रवाहात त्यांनीच आणले. सरकारच्या व्यवस्थापन पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवून देखील त्यांनीच आणले. नवीन उपकरणांच्या मदतीने ते बैठका घेऊ लागले. संपूर्ण व्यवस्थापनामध्ये त्यांनी बदल घडवून आणलेल्या परिवर्तनामध्ये आधुनिक विचार आणि नवीन गोष्टी होत्या." यावरून राजीवजीच्या दूरदृष्टीची कल्पना लक्षात येते. एवढेच नव्हे तर जागतिक पातळीवर सुध्दा राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला.

एक नमूद करण्यासारखे योगदान म्हणजे त्यांनी वैश्विक अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी योजना तयार केली होती. 'राजनैतिक' बाबतीत बोलायचे झाले तर राजीव गांधी यांनी यांची १९८८ सालची चीनची भेट महत्त्वाची ठरली. दौर्‍यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंध चिघळलेले होते. अशा परिस्थितीत राजीवजींना स्वस्थ बसू वाटत नव्हते. बीजिंगमध्ये राजीव गांधी यांनी देंग झायोपिंग यांची भेट घेतली. यावेळी जोरदार वाटाघाटी आणि चर्चा केल्यामुळे संघर्ष आटोक्यात आला. त्यातून देशाला नव्या संधी उपलब्ध झाल्या. राजीव गांधी यांनी हा वाटाघाटीचा मार्ग तयार केल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीन भेट यशस्वी होऊ शकली. एवढेच नव्हे तर राजीव गांधी यांची सार्क परिषदेवर विशेष छाप होती.  कठीण प्रसंगात आणि प्रश्नांमध्ये सहभागी होण्याची आणि ते हाताळण्याची त्यांची  तयारी असायची. वंशिक प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेचे जे.आर.जयवर्धने यांच्याशी बोलणी केली होती. पण फारसे यश मिळाले नाही. 
राजीव गांधी यांच्या काळात भारतात दूरदर्शन संच घराघरात पोहोचला. त्यांनी दूरदर्शन आणि माहिती व प्रसारण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन पारंपरिक दर्शन घडवले आणि समाजातील चांगल्या मूल्यांचे कार्यक्रम तयार करण्याची सूचना दिल्यामुळे 'रामायण आणि महाभारत' सारख्या लोकप्रिय मालिकाची निर्मिती होऊ शकली. 

देशात उच्चस्तरीय आणि आधुनिक पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी १९८६ साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचे जीवन उंचावण्यासाठी आणि त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारची संस्था असलेली जवाहर नवोदय विद्यालय पध्दत त्यांनी सुरू केली. देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विरोधी पक्षातील अर्थतज्ज्ञ डॉ. मधु दडवंते यांचे मार्गदर्शन घेत. विकासासाठी येणाऱ्या एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे खर्च केले जातात हा अंदाज व्यक्त केला होता. आज भारतात जो तांत्रिक विकास झाला तो राजीवजींनी केलेल्या अथक प्रयत्नामुळेच शक्य झाले आहे.

राजीवजीच्या काळात एका स्विडीश कंपनी कडून बोफोर्स बंदूक खरेदीसाठी देण्यात आलेल्या कंञाटामुळे राजकीय सत्तेला धक्का बसला होता. जनतेच्या मनात चूकीची भावना झाली होती. त्यातच राष्ट्रपती गियानी सिंग यांच्याशी वाद घातल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शाहबानो प्रकरणात पारंपरिक मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हिंदुत्व असलेली जनता भडकली आणि जनतेचे मन वळविण्यासाठी त्यांनी राम मंदिराचा मुख्य गाभारा खुला करून रामलल्लाचे दर्शन घडविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजीवींजीना जागतिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी दक्षिणेकडे गेले असताना एका महिला (एलटीटीईने )आत्मघातकी बाॅम्बरने राजीवजींचा जीव घेतला. भारताला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणाऱ्या महानायकाचा शेवट असा झाला असला तरी त्यांनी देशाला नवा राजमार्ग तयार करून दिला. याच मार्गावरून भारताचा प्रवास सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभरात ' विरोधी दहशतवाद दिन' म्हणून साजरा केला जातो. मानवजात विरूद्ध असणाऱ्या प्रत्येक प्रवृत्ती विरूद्ध सर्वांनी पुढे येऊन उभे राहिले पाहिजे. हाच या दिनाचा संदेश होय.
©विकास पांढरे,९९७०४५२७
( सदर लेख दैनिक सुराज्य,सोलापूर मध्ये २१ मे २०१५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)

शनिवार, १९ मे, २०१८

'पाक' आयात साखरेचे वास्तव !


पाकिस्तानातून मुंबईत आयात झालेल्या साखरे वरून केंद्र सरकारवर  टीका होत आहे. टीका होणे साहजिकच आहे कारण पाकिस्तानला आपण कितीही समजून घेत असलो तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ती वाकडे असते हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे 'पाक'बद्दल सहानुभूती  वाटण्याची गरज नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी विषयावर 'ब्र' ही न काढणारे लोक 'आयत साखरे'वर बोलू लागले आहेत. पण त्यांच्या विधानातून सामान्य वाचक म्हणून मोदी द्वेषापलीकडे ठोस काही हाती सापडत नाही.  यासंदर्भात 'पाक'मधून आलेल्या आयात साखरेचे वास्तव मात्र वेगळेच आहे. भारत-पाक या दोन देशाला जागतिक व्यापार संघटनेने जी चौकट घालून दिलेली आहे. ही चौकट समजून घेतली तरच पाकिस्तानी आयात साखरे मागील वास्तव समोर लक्षात येईल.

भारताला सध्या २५०लाख टन साखरेची गरज आहे. एप्रिल २०१८पर्यंत भारतीय साखर कारखान्यांनी ३१०.३७लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये १०६.५०लाख टन साखर निर्मिती केली आहे. भारताने २०१७-१८ एकूण साखर निर्यात २,४०,०९३ टन इतकी होती. आपल्याकडे साखर शिल्लक असताना 'पाक'ची साखर आयात कशी झाली आहे? विरोधक सरकारला प्रश्न करत आहेत. पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे. त्याच्या आर्थिक नाड्या बंद करण्याऐवजी आपण सैल करत आहोत, असा प्रश्न सुजाण माणसाला पडला आहे. दळणवळणच्या दृष्टीने आपल्याला 'पाक'जवळचा आहे. गँट कराराच्या आधारे प्रत्येक देशाला आयात-निर्यात संदर्भात स्वतंत्र अधिकार आहे. पण पाकिस्तानातून आलेल्या साखरेची आयात रोखण्यासाठी उपाय योजना काढाव्या लागतील. डब्लूटीओ अंतर्गत साखरेवरील आयात शुल्क लावण्याची मर्यादा १५०टक्के असली तरी आणखी वाढ करण्यासाठी वित्त कायद्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

नवी मुंबईत पाकिस्तानी साखर दाखल झाली. त्यावेळी एकच गजहब झाला, शत्रू राष्ट्राचे पाय मजबूत करत आहोत,अशा वावड्या उडाल्या पण ही साखर कशी आली?का आली ? त्यामागील कोणती कारणे आहेत पाकिस्तान आपली साखर बिनदिक्कतपणे भारतात आयात करू शकला. बातम्यापलीकडे याचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे सामान्य वाचकांच्या मनात केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल संशय निर्माण झाला. खरेतर, भारत-पाक युध्दावर जितकी लिहिले जाते तितकेच या दोन देशातील कृषी-व्यापारी संबंधावर लिहिले जात नाही,असो. ही साखर कशी आली. त्याचे उत्तर असमाधानकारक असले तरी वास्तवाला धरुन आहे. मुंबईतील एका उद्योग कंपनीने पाकिस्तानाला चॉकलेट निर्यात केले होते. त्याच्या बदल्यात चॉकलेट मधील साखरे एवढीच पाकिस्तानातून आयात केलेली साखर नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे, अशी माहिती मिळत आहे. ही माहिती समाज माध्यम वीरांपर्यंत पोहोचली असेलच. यावर कुणी भाष्य करत नाही. हा जो 'उद्योग' ज्यांनी केला 'त्या' उद्योग कंपनीचे नाव अद्याप तरी समजले नाही त्यामुळे हे व्हायरल 'सत्य' आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. हे सत्य जाणून घेण्यासाठी आपणास मागे वळून पहावें लागेल. भारतात अशी आयात पूर्वी झाली होती. आता जितकी चर्चा होत आहे त्यावेळी तितकी चर्चा झाली नाही.याबाबत ज्येष्ठ शेतकरी नेते अजित नरदे यांनी 'भारत-इंडिया' नियतकालिकेत (फेब्रुवारी २०१८) सविस्तर लेख लिहिला आहे. याविषयी भाष्य करताना नरदे म्हणतात-
 "ऑक्टोबर २०१७च्या पहिल्या आठवड्यात पंजाबमधील एका व्यापाऱ्याने २०००टन साखरेची आयात केली. पंजाबमध्ये किरकोळ साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल ४०००हजार रूपये होता. आयात साखरेवर ५०टक्के आयातकर आणि ५टक्के जीएसटी धरून सदर आयात परवडेल, असा त्या व्यापाऱ्यांचा अंदाज होता. प्रत्यक्षात या आयतीत त्या व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले. सप्टेंबर अखेरीस पाकिस्तानामध्ये साखरेचे भाव प्रतिक्विंटल ५२००पाक रूपये होते. या साखरेला प्रति क्विंटल १०७० पाक निर्यात अनुदान पाक सरकार देते. यामुळे साखरेची किंमत प्रति क्विंटल ४१३ पाक देते. याच्या निर्यातीसाठी साखर कारखाना ते वाघा बॉर्डर इथपर्यंत प्रतिक्विंटल ३४० पाक रूपये खर्च येईल. यामुळे वाघा बॉर्डरवर भारतीय हद्दीत या साखरेची किंमत प्रति क्विंटल ४४७० पाक रूपये इतकी होईल. एक भारतीय रूपयाला १.७० पाक रूपये मिळतात. या दराने या साखरेची भारतातील किंमत प्रति क्विंटल २६३० रूपये इतकी होईल.

या किंमतीवर ५०टक्के आयात कर लागेल. आयात कर १३१५ रूपये धरून साखरेची किंमत प्रति क्विंटल ३९४५ रूपये इतकी होईल. यावर ४टक्के जीएसटी लागेल अशी व्यापाऱ्याची कल्पना होती पण प्रत्यक्षात १८ टक्के इतका जीएसटी लागला. हा जीएसटी देऊन व्यापाऱ्याला ही साखर प्रति क्विंटल ४६५५रूपयाला पडली. त्यावेळी पंजाबमधील साखरेच्या किंमती प्रति क्विंटल ४०००रूपये होती.थोडक्यात, हा व्यापार प्रति क्विंटल ६२५रूपये आतबट्टयाचा झाला. त्यामुळे नंतर साखर आयात करण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही साखर आयतीची अफवा साखर उद्योगातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उठवणे हे योग्य नाही."यावरून पाकिस्तानातून आयात झालेल्या साखरेची पार्श्वभूमी लक्षात येतेच शिवाय उगाच साखर आयतीची वावडी उठवण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रातील साखर उत्पादकांना या आयतीमुळे शेतकऱ्यांना 'एफआरफी'देण्यास अडचण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. यात किती तथ्थ आहे? आपल्या देशातून सर्वाधिक साखरेची निर्यात केली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही.

आपण जेव्हा भारत-पाक व्यापार विषयक संबंध लक्षात घेण्याचा प्रयत्न करत जावू तेव्हा वरील मुद्यांचे स्पष्टीकरण अधिक होत जाईल. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू यांच्या कालखंडात तत्कालीन जगाच्या संदर्भातील शीतयुद्ध लक्षात घेऊन नेहरूंनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला अलिप्ततावादाची दिशा दिली. पण १९९१ नंतर जग बदलले. संपूर्ण विश्व एक खेडे झाले. त्यापूर्वी १९५२-५३साली भारत-पाक यांच्यामध्ये व्यापार करार झाला होता. तो फार काळ टिकला नाही. १९७१ च्या युध्दानंतर आपण 'पाक' सोबतचे सर्व संबंध तोडले. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत उदारीकरणाचे मार्ग खुले झाले. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांच्यापासून ते अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानबाबत भावनाप्रधनता दाखवली. जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्यांना व्यापाराच्या संदर्भात सदस्य देशांना 'एमएफएन'चा दर्जा देणे बंधनकारक केले होते. भारताने १९९६ मध्ये पाकिस्तानला एमएफएन ( Most Fovered Nation- सर्वात आवडता राष्ट्र) दर्जा दिला. उत्साह पूर्ण वातावरणात शांततेत उत्पादन, व्यापारातून दोन राष्ट्रांनी आर्थिक व राजकीय सुधारणा घडवून आणाव्यात असे 'एमएफएन'चे सूत्र आहे. "डब्लूटीओ" नियमातंर्गत सदस्य देशातील व्यापार भागीदारी दरम्यान भेद करू शकत नाही. एखाद्या व्यापारी भागीदारांमध्ये विशिष्ट स्थिती मंजूर झाल्यास तो जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्यांना विस्तारित करणे आवश्यक आहे. 'एमएफएन' दोन देशांमधील सर्वात अनुकूल व्यापाराची हमी देतो. या अटीमध्ये कमीतकमी शक्य व्यापार दर आणि कमीतकमी शक्य व्यापार अडथळ्यांचा समावेश आहे आणि व्यापार संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे सर्वाधिक आयात कोटा स्विकारण्यासाठी केवळ सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्रांना समान उपचार आवश्यक आहे.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २.६१अब्ज डॉलर आहे. दोन्ही देशातील व्यापाऱ्यांमध्ये सिमेंट, साखर, कापूस आदींची आयात निर्यात होत असते. पाकिस्तान आवडता राष्ट्र असला तरी तो उपचार नाही. जेव्हा एखादा देश 'एमएफएन'चा दर्जा प्राप्त करतो तेव्हा व्यापारातील अडथळे कमी करणे आणि दर कमी करणे अपेक्षित आहे. तसे आजपर्यंत दोन देशामध्ये झाले नाही.आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराच्या दृष्टीने दक्षिण आशियात कदाचित जगातील विविध प्रादेशिक गटांमध्ये सर्वात कमी काम केले आहे. मुख्य कारण म्हणजे दक्षिण आशिया भारत आणि पाकिस्तान मधील दोन मोठ्या राष्ट्रांमधील अविश्वास. 'पाक'बद्ल भारताने नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळे भारताला असे वाटते की पाकिस्तान लवकरच आपल्याला 'एमएफएन'चा दर्जा देईल, तसे पाकिस्तानाने आजपर्यंत पावले उचलली नाहीत. त्यामुळे भारत-पाक यांच्यातील तार्किक समस्या आहे. परिणामी,आवडता राष्ट्र म्हणून पाकिस्तान भारताचा लाभ उठवत असतो, हे आपणास साखर आयतीवरुन लक्षात आले असेल. २०११ साली महाराष्ट्र आणि पाकिस्तानचे व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री मखदुम मुहम्मद फईम यांच्या शिष्टमंडळाने फिक्कीच्या सदस्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत चर्चा केली होती.साखर, चित्रपट, कापूस इतर वस्तूच्या आयात-निर्यात संदर्भात पावले उचलण्यात येतील असे दोन्ही मंत्र्यांनी सूचित केले होते.

 पाकिस्तानला भारताने आवडत्या राष्ट्राचा दर्जा असला तरी तो आजपर्यंत तो भारताला वैरीच समजतो. उलटपक्षी पाकिस्तानला चीन अधिक जवळचा वाटतो. कोणत्याही देशाला कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात, देश जितका गरीब तितकी त्याला मैत्रीची गरज असते. हे सूत्र पाकिस्तानने ओळखले पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाक संबंध जुळले होते. भारतातून साखर व इतर वस्तू आयात झाल्या होत्या पण शेवटी कारगिल युद्ध झालेच. नंतर २६/११च्या दहशतवादी हल्लात 'पाक'चा हात दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गेल्या चार वर्षामध्ये आपण पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यात यशस्वी झालो आहोत. आधी मैत्रीचा हात पुढे केला पण पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या.सुरुवातीला आपण सहन केले पण दोन वेळा "सर्जिकल स्ट्राइक"करूनही कुरघोडी करत राहतोय.

सार्क मधील सर्वात मोठा देश म्हणून भारतावर विशेष जबाबदारी आहे. त्यामुळे भारताला सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे आम्हाला शेजाऱ्यांवर जुलूम-जबरदस्ती करून चालणार नाही. (पाक नेहमीच कुरघोडी करत असतो त्यामुळे त्याला धडा शिकवावा लागतो.) दक्षिण आशिया मुक्त व्यापार (सेफ्टा) तसा पुरेसा नाही. आयात मालावरील जकात अगदीच नाममात्र आहे. पाकिस्तान भारताला 'सेफ्टा'करारातून मिळणारे फायदे व सेवा घेऊ देत नाही। त्याच्या मते भारताला अत्यंत आवडीचा देश ( MFN) अशी वागणूक मिळते. सेफ्टाकडून मिळणाऱ्या मुक्त व्यापाराच्या मानाने दक्षिण आशियातील इतर देशांना मिळणाऱ्या लाभाकरिता त्यांच्या मागे लागावे लागते.ही चौकट जागतिक व्यापार संघटनेने दिलेली आहे. भारताला याची जाणीव आहे. पाकिस्तान बाबत भारताला राजकीय डावपेच टाकावे लागतील. जागतिकीकरणात संपूर्ण जगाची बाजारपेठ निर्माण करणे,खुली स्पर्धा, वस्तूची विक्री करणे हे अपेक्षित आहे. जे चांगले असेल ते टिकेल हे तत्व समोर येत आहे. त्यासाठी भारतीय उत्पादने चांगली असली पाहिजेत.चांगल्या वस्तूला चांगले दर मिळाले तर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
-विकास पांढरे,९९७०४५२७६७
(लेखक सा.'विवेक'चे उपसंपादक आहेत)

संदर्भ :-
१) अजित नरदे,भारत-इंडिया,फेब्रुवारी २०१८

२) भारत-पाकिस्तान व्यापार,संपादक निशा तनेजा, संजीव पौरोहित्य, स्प्रिंगर प्रकाशन,नवी दिल्ली

३)इंडियन एक्सप्रेस २७ सप्टेंबर २०१६

४) समर्थ भारत स्वप्न- विचार-कृती, साप्ताहिक विवेक प्रकाशन

गुरुवार, १० मे, २०१८

मोत्यांची यशस्वी शेती करणारी हिरकणी


दीड एक वर्षापूर्वी मयुरी खैरे ही तरूणी भेटली. गंभीर आजाराला तोंड देत असतानाही सकारात्मक दृष्टीनं आनंदी आयुष्य जगणारी आणि मध्य प्रदेशात शिंपल्याची यशस्वी शेती करणाऱ्या मयुरीची कहाणी संघर्षमय आहे. आज तिचा वाढदिवस. तिच्याविषयी हा शब्दप्रपंच.


मयुरी खैरे
बुलढाणा जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात मयुरीचा जन्म झाला. अकरावीत असताना तिला किडनीच्या आजारांनी ग्रासले.ऐन उमेदीची चार पाच वर्षे आजारपणात निघून गेली. आजारपणात तिनं काँलेलजा न जाता पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. याकाळात मयुरीनं अनेक महनीय व्यक्तीचे चरित्रे वाचून काढली. समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकानं तिच्यातली ऊर्जा बाहेर पडली,आणि दिशाच बदलली. पदवीनंतर ती आजारपणाला विसरून गेली. पुण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्गाला जाऊ लागली. इथेच तिला समविचारी मित्रांची ओळख झाली. या तरुणांनी ऊर्मी नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. ही संस्था समाजाच्या हितासाठी काम करु लागली. एकदिवशी तिच्या वाचनात 'मोत्याची शेती' हा लेख आला. या लेखाने ती झपाटून गेली. तिच्या घरी शेती नव्हती,शेतीबद्दल तिला फारसे काही माहिती ही नव्हते. तरीही तिने ही नवी वाट धरली.

मयूरी  सांगत होती- तेव्हा एक चित्रपट उभा राहिला. "सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझ बालपण ही सर्वसमान्यचं होत. हसण्या-बागडण्यात कशी १५-१६ वर्ष निघून गेली कळलच नाही. वयाच्या १७व्या वर्षी आयुष्यानी खूप मोठी कलाटनी घेतली.  मी ११वीत असताना मला किडनीच्या आजारानी ग्रासलं आणि नंतर दिवसागणिक माझं आजरपण वाढतच गेलं. सगळे उपचार करुन झाले. अगदी दिल्लीच्या मोठ-मोठया हॉस्पिटलच्या ही पायऱ्या झिझवूण झाल्या होत्या. माझ्या उपचारासाठी माझ्या मम्मी-पप्पानी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही."

आयुष्याचा तो टप्पा ज्यावेळी आपण सगळं डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन जिद्दीनं ,मेहनंतीनं आयुष्याला आकार देण्यासाठी धडपडत असतो. तेच उम्मीदीचं ४-५ वर्ष माझ्या आजारपनात निघून गेले. मला प्रचंड त्रास व्हायचा जो सहन न होण्या पलीकडचा होता. त्यामुळं मला आयुष्य नकोस झाल होतं. आपण आपलं आयुष्य संपवावं असंही विचार त्यावेळी माझ्या डोक्यात यायचा. याकाळात मला माझ्या फॅमिलीने खूप आधार दिला. माझ्या जगण्याची संपत चाललेली इच्छा त्यांनी परत जगवली आणि मला दुसरा जन्म दिला."
पुढची कहाणी तर आशादायी तर आहेच शिवाय इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर माणूस काय बदल घडवू शकतो याचे उत्तम उदाहरण मयुरी खैरे आहे.

आजारपणातल्या दिवस कसे गेले याबाबत मयूरीने कथन केले. "काहीतरी विरंगुळा म्हणून मी त्या ४-५ वर्षाच्या आजरपणाच्या काळात प्रचंड वाचन केले. ते. वाचनामुळं मला सिंधुताई सपकाळ, डॉ.प्रकाश बाबा आमटे आणि अजून अशा बऱ्याच लोकांच्या कार्याची माहिती मिळाली. त्याचवेळी आपण ही असचं काहीतरी कराव हा ध्यास मनानं घेतला. त्यानंतर माई आणि प्रकाशबाबांना भेटण्याचं भाग्य मला लाभले आणि माझा तो ध्यास पक्का झाला.

४-५वर्ष आजारपणात गेल्या नंतर मी बरी झाले. आजरपणातच मी माझी डिग्री पूर्ण केली. कॉलेजला  न जाताच फक्त पेपर देऊन मला ही डिग्री मिळाली होती. त्यामुळं त्या क्षेत्रात आपण काहीतरी करावं, असं फारस वाटत नव्हतं. मागच्या ४-५ वर्षात माझ्या आजारपणामुळं मम्मी-पप्पाना ही खूप त्रास झाला होता. मला होणारा त्रास पाहुण त्यांना ही प्रचंड वेदना होत होत्या. याची जाणीव मला होती. त्यामुळं मला आता असन काहीतरी करायचा होत ज्या मुळे माझ्या मम्मी-पप्पा ना माझ्यावर गर्व वाटावा, माझ्या नावानं त्यांना ओळखलं जाव अस मला कही तरी करायच होत.

आज सारखच त्याही वेळी सिविल सर्विसेजच फार वेड होत. त्या वेडा पासून मला ही दूर राहता आल नाही. पोस्ट मिळवून आपल्याला समाजासाठी  काहीतरी करता येईल, त्याचबरोबर आपल्या घरच्याना ही खूप आंनद होईल अस मला वाटत होत. त्यामुळं  मी MPSC करण्याचा निर्णय घेतला आणि पुणे गाठल.एका नामवंत क्लासेसमध्ये एडमिशन घेतले. त्यानंतर वर्षभर फक्त क्लास आणि अभ्यास हेच आयुष्य बनून गेलं होत. अभ्यासात सातत्य असल्यामुळं १-२ परीक्षाची पहिली पायरी ही मी क्लियर करू शकले होते. पण तरी सुध्दा त्यात मन कही लागत नव्हतं. आतला आवाज वेगळचं काहीतरी सांगत होता. त्याच वेळी आम्ही काही फ़्रेंड्सनी मिळून पुण्यात एक NGO सुरु केला. 'उर्मी' त्याच नाव.उर्मीच्या अंतर्गत आम्ही 'digital literacy'वरती काम करायला सुरुवात केली. अल्पावधितच आमच्या कामला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काम वाढत गेलं. तस तस अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या इतर मंडळीशी आपसूकच भावबंध जुळत गेले.

उर्मीच काम करताना एक नवीनच उर्मी तना-मनात दाटून आली होती. काम करताना आंनद तर मिळत होताच पण त्याही पेक्षा समाधान मिळत होत, जे कुठल्याही गोष्टीत मोजता येण्यासारख नव्हतं. ए्कीकडं MPSCचा अभ्यास आणि दुसरीकडं उर्मीच काम हे सगळ सुरु असतानाच. एक दिवस पेपरमध्ये मी 'मोत्यांची शेती' या विषयावर लेख वाचला, मोती समुद्रात असलेल्या शिंपल्यानमध्ये तयार होतात. इतकेच काय ते मला माहित होते. पण तो लेख वाचून कळालं की आपण मोत्यांची शेती करू शकतो. तो लेख वाचला आणि मी भारावून गेले, आपण हेच काम करायचं असं मला सारख वाटायला लागल होत. काय करायच,कसं करायच काहीच माहित नव्हतं. आपल्याला हेच काम करायच हे मात्र मनात  पक्क झालं होत.

मोत्यांची शेती सत्यात कशी आणले याविषयी सांगताना मयुरी म्हणाली, घरी शेती नव्हती, मला शेती बद्दल फारसं काही माहिती ही नव्हतं. पण तरी फक्त तो एक लेख वाचून माझा मोत्याच्या जगातला प्रवास सुरु झाला. घरी सगळ्यांना समजून सागंण थोड़ अवघड होत पण तेही मी केल. मग काय पुण्याला राम-राम ठोकून ,मी रानावनाची वाट चालू लागले. सुरुवातीला काय कराव ,कसं कराव काहिच माहिती नव्हतं. पण हळूहळू माहिती मिळत गेली. CIFA (Central institute of fresh water Aquaculture) ची माहिती मिळाली. मग मी भूवनेश्वर गाठलं.पण तिथं जाऊन ही काही कारणामुळं मला मोत्यांच्या शेतीच प्रशिक्षण घेता आल नाही.

 शेती प्रयोग
पण तिथं CIFA च्या campas मध्ये एक व्यक्ती भेटले, ज्यानी 'pearl farming'.(मोत्यांच्या शेती)वर बराच रिसर्च केला होता आणि ते स्वतः मोत्यांची शेती करत होते. त्यांनी मला प्रत्यक्ष त्यांच्या 'pearl fram' मध्ये नेऊन त्यांचा 'pearl farm' दाखवला आणि त्याबद्दल सगळी माहिती दिली. "तू हे काम नक्की करू शकतेस हा विश्वास त्यांनी मला दिला."

 त्या दिवसापासून आजपर्यंत मार्गदर्शक म्हणून क़ायम ते माझ्या सोबत आहेत. आता मला मार्गदर्शन करणारी अनुभवी व्यक्ती माझ्याकडं होती. मी ही माझ्याकडून होईल तेव्हा ही माहिती जमवली होती. त्यामुळं मोत्यांची शेती करायची कशी? हा प्रश्न तर सुटला होता. पण आपण मोत्यांची शेती करायची कुठे? हा प्रश्न मात्र अजूनही ही अनुत्तरित होता. माझ्या गावाकडं बऱ्याच ठिकाणी जागा शोधून झाली, पण मला हवी तशी जागा काही मिळाली नाही. त्यातच एक दिवस इंदौरला राहत असलेल्या माझ्या एका फ्रेंडचा फोन आला. असंच थोडसं इकडचं तिकडचं बोलून झाल्यानंतर मी त्याला मोत्यांच्या शेतीबद्दल सांगितल. त्याला ही मोत्यांच्या शेतीची कल्पना खूप आवडली आणि क्षणाचाही विलंब न करता ,तो म्हणाला तू  मध्य-प्रदेश में.यहा अपने खेत मे ये मोती की खेती करेगे, मग काय दुसऱ्याच दिवशी मी इंदौर गाठल, शुभमच्या फँमिलीला ही मोत्यांच्या शेतीची कल्पना आवडली. 'बच्चों आपको जो करना है वो करो अपने खेत मे ! असं म्हणून शुभमच्या फॅमिलीनी आम्हाला प्रोत्साहान दिलं आणि माझा मोत्यांच्या शेतीचा प्रोजेक्ट मध्यप्रदेश मध्ये सुरु झाला. पेपर मध्ये आलेला लेख वाचून सुरु झालेला माझा हा प्रवास मला मध्य प्रदेश मध्ये घेऊन आला. माझ्या वेडाने राज्याच्या सीमा तर ओलाडल्याच त्याचबरोबर भाषेच्या ही सीमा ओलाडल्या. शुभमची फॅमिली ही पाटीदार फॅमिली आहे.जे मध्य प्रदेशच्या निमाडी भागात राहत असल्यामुळं सगळंच निमाडी भाषेत बोलायचे. निमाडी सुरुवातीला मला कळत नव्हती आणि त्याना मराठीचा ही गंध नव्हता. त्यामुळं सुरुवातीला शुभम आमच्यात ट्रांसलेटर म्हणून असायचा तो मला निमाडीच भाषांतर हिंदीत करुन सांगायचा. राज्याना सीमा होत्या, भाषेला सीमा होत्या. पण मनाला मात्र कुठलीच सीमा नसते. हे इथे आल्यावर मला उमजलं आणि मी पाटीदार फॅमिलीची सदस्य कधी झाले. ते मला ही कळलंच नाही.

एक ते दीड वर्षाच्या रिसर्च नंतर फाइनली आमचं काम मध्य प्रदेश मध्ये सुरु झाल. शेतात शेततळ करुन आम्ही त्यात ऑपरेशन करुन शिंप टाकत होतो. इथे जवळच नर्मदा नदी असल्यामुळं आम्हाला तिथून शिंप मिळत होती.नर्मदेतून शिंप आणून त्याना आम्ही शेतात दोन छोट्या छोट्या शेततळयात ठेवायचो. नर्मदेच्या पाण्यात असलेलं तापमान आणि वातावरण आपण आपल्या शेततळयात कृत्रिम पद्धतीने तयार करायचो. ज्यामुळे शिंप ना त्या शेततळयात रीलैक्स फील व्हायचं.त्यामुळं त्याचा mortality rate (मरण दर) कमी होतो. त्या नंतर आठ दिवसांनी या शिंप च ऑपरेशन करुण त्यात आपण 'nuclear' (मोत्यांच सीड) इंप्लांट करतो, त्या नंतर आठ दिवस या ऑपरेशन केलेल्या शिंपी ना औषधी-गोळ्या देऊन त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. आठ दिवसानंतर या शिंपी ना मेन टैंक मधे शिप्ट केल्या जाते. या  शिंपी मध्ये एक मासाळलेला प्राणी असतो. जो आपण शिंप मध्ये इम्प्लांट केलेल्या सीड वरती एक Enzymes सोडते जे या प्राण्याच्या शरीरात तयार होते.
८-१० महिन्याच्या कालावधीत डिझायनर मोती तयार होतो. तर गोल मोती तयार व्हायला १५-१८ महिन्याचा कालावधी लागतो. या संपूर्ण कालावधीत आपल्याला या शिंपची योग्य ती काळजी घ्यावी लागते,असं मयुरी म्हणाली.

गोल मोती तयार व्हायला १५-१८ महिन्याचा कालावधी लागतो
मयुरीची यशोगाथा  आजच्या तरुण-तरुणींना लाजवेल अशी आहे.

या कहाणीमधून मयुरीची यशोगाथा समोर येते. आजारपणाशी दोन हात करत शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची वाट धरत मोत्यांची शेती करण्याचा केलेला ध्यास सत्यात उतरून दाखवला. तिची ही कहाणी आजच्या तरुण-तरुणींना लाजवेल अशी आहे. 

आपल्या शेती प्रयोगाच्या यशस्वीतेचे गमक सांगताना मयुरी म्हणाली, "आम्ही आता पर्यंत एक मोत्याचं पिक यशस्वीरित्या काढलं आहे.बाजारात डिझायनर मोत्यांची प्रति नग सरासरी किंमत २५०-३००रुपये आहे.आमचा आज पर्यंतचा खर्च वजा करता. चांगल्या प्रकारे प्रॉफिट राहिल आहे. अगदी काही हजारांच्या भांडवलावर सुरु होणारी ही मोत्यांची शेती लाखोच्या घरात प्रॉफिट कामवून देते. त्यामुळे "low investment and high profit"चा हा bussiness आहे.असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याकडे वळावे आणि आपली आर्थिक स्थिती सुधारावी हा आमचा प्रयत्न आहे.
येव्हडयावरच न थांबता आम्ही या सारख्याच अनेक नव-नवीन गोष्टी वर रिसर्च करत आहोत. ज्यामुळं शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून आपल्याकडं अनेक पर्याय तयार होतील.



मोत्यांची शेती 

 "Low investment.. high profit" हा उद्देश्य डोळ्या समोर ठेवून "spirulina framing, colour fish farming and bell paper(colour capsicum) farming" या प्रोजेक्ट वरती सध्या आम्ही रिसर्च करत आहोत. मागच्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत या सगळ्या प्रोजेक्टच्या कामासाठी भारत भर फिरून झालंय, या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या ओळखी झाल्या. ज्याचा फायदा मला माझ्या प्रोजेक्टसाठी कायम होतो आहे.

सध्या आमचा प्रोजेक्ट मध्य-प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यामध्ये सुरु आहे. लवकरच महाराष्ट्रात ही प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस आहे. व्यवसायाविषयी सल्ला देताना मयुरी सांगते, कुणीही मोत्यांची शेती करू शकते. मोत्यांची शेती फक्त शेतातच करता येते अस नाही,तर आपण आपल्या घरी गच्चीवर  सुद्धा करू शकतो. मोत्यांची शेती करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते पाण्याची मुबालकता. पाणी मुबालक प्रमाणात असेल तर आपण कुठे ही मोत्यांची शेती करू शकतो. "side business" म्हणून या व्यवसायात उतरू शकतो. दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील तरुण -तरुणांनी या व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करावा.

 महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य-प्रदेश या तीन राज्यात मोत्यांची शेती प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. ज्या मध्ये आम्ही मोत्यांची शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करतो. आमच्या या प्रयत्नामुळे शेतकरी बांधवाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकलो तरी आम्ही आमच्या या प्रयत्नात यशस्वी झालो असन आम्ही समजू असा लाखमोलाचा संदेश मयुरीने दिला.

आजारपण आणि यशाच्या श्रेयाविषयी मयुरी सांगताना म्हणाली, ४-५ वर्षाच आजारपण आणि त्या नंतरचा माझा आज पर्यंतचा प्रवास खूप अवघड होता. वाटेत असंख्य अडचणी आल्या पण मी कधीच थांबले नाही. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकले. त्यामुळं माझं सगळ्यांना हेच सांंगण आहे. आयुष्यात दु:ख आलं  म्हणून चालन सोडू नका ,आणि त्या दु:खाला कवटाळून बसू नका. ज्यावेळी एक दार आपल्यासाठी बंद होत त्याच वेळी एक खिड़की आपल्यासाठी उघडत असते, पण ते बंद झालेल दार बघत बसण्यात आणि त्याच दु:ख करण्यात आपण इतके गुंग होतो की आपल्याला आपल्या समोर असून ही ती उघडलेली खिडकी दिसत नाही. कृपया अस करू नका. आंनद आणि दु:ख हे आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. ते येत-जात राहणारच हे कायम लक्षात ठेवा आणि चालत रहा.

माझ्या या यशाचं श्रेय कुणाला द्यायच झाल तर ते मी माझ्या फॅमिलीला देईल. विशेष म्हणजे माझ्या पप्पाना. त्यांनी कायम मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. मला मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून वाढवल. त्यांनी माझ्यावर कायम इतका विश्वास दाखवला की त्या विश्वसानेच मला कधी हारु दिलं नाही. आज मी जे काय आहे ते फक्त माझ्या पप्पानमुळेच आह. ते आहे म्हणून मी आहे त्यांच्या शिवाय मी काहीच नाहीये.
- विकास पांढरे,मुंबई
9970452767


(संपर्क -मयुरी खैरे,
8818839333

शनिवार, ५ मे, २०१८

दूधाचे अर्थशास्त्र


राज्यात दूधदर वाढीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने प्रति लिटरनुसार 27रूपये दर जाहीर केला असला तरी खासगी दूध संस्थांनी या दरवाढीला विरोध केला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्हयातील लाखगंगा गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी फुकट दूध घालण्याचा निर्णय घेतला. ही कोंडी फोडण्यासाठी  सरकार व खासगी दूध उत्पादक संस्थामध्ये समन्वय घडून आणून तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी दूधाचे अर्थशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे.

आपल्या देशात वैदिक काळाच्या आधीपासून पशुपालनास महत्व आहे. मौर्याच्या काळात म्हशींचा दूधासाठी उपयोग होऊ लागला. कृषी अर्थव्यवस्थेला आधार देण्याचे काम दूध व्यवसायाने केले आहे. जगामध्ये सर्वप्रथम 1885 मध्ये स्विर्झलंड देशात'केसिन' येथे पहिली सरकारी दूध संस्था स्थापन झाली. भारतामध्ये 1886 साली अलहाबाद येथे पहिली 'मिलिटरी डेअरी फर्म' सुरू झाली. या संस्थेचा उद्देश व्यावसायिक नव्हता. दूध व्यवसाय व पशुधनास चालना देण्यासाठी 1832साली पुण्यात पहिली पशुवैदिक शाळा सुरू झाली. या शाळेमुळे अनेक भारतीय पशुजातीचा शोध लागला. याकाळात ब्राझील सारख्या देशाने गीर,नेल्लोर सारख्या भारतीय वंशाच्या गाई आपल्या देशात नेउन 1857पासून दुधाचे उत्पादन वाढवले.1895मध्ये लुई पाश्चार यांनी दूध निर्जतुक करणारी पध्दत शोधून काढली. त्यामुळे दूध व्यवसायाला गती प्राप्त झाली.1912 साली ब्रिटिशानी सहकारी कायदा पास केला. यामुळे आपल्या देशात काही सहकारी संस्था उदयास आल्या. स्वातंत्रोत्तर काळात भारतात सर्वप्रथम 1946साली गुजरात राज्यात खेडा जिल्हयात'आनंद'याठिकाणी खेडा जिल्हा दूध उत्पादक संस्था स्थापन झाली.1949साली अमेरिकेचे डॉ.वर्गीस कुरियन आनंद ठिकाणी संशोधन कार्यास सुरूवात केली. त्यांच्या संकल्पनेतून भारतात धवलक्रांती यशस्वी झाली.अवघ्या 40वर्षात सहकारी तत्वाने जगात सर्वाधिक दूध उत्पादक करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले गेले.

1947 साली मुंबई येथे दूध योजना स्थापना करण्यात आली.1957साली'आरे'गवळी वाडयाची स्थापना झाली. यामुळे मुंबई शहरातील गुराचे गोटे शहराबाहेर हलिवले गेले व तेथून मुंबईकरांना दूधाचा पुरवठा होऊ लागला.राज्यात सहाकरी तत्वावर1950-51मध्ये पुणे येथे पहिली सहकारी दूध संस्था स्थापन करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना दूधाचा जोडधंदा निर्माण करण्यात यावा म्हणून1958साली स्वतंत्र दुग्ध व्यवसाय खाते निर्माण करण्यात आले. याकाळात दूध उत्पादन व्यवसायाकडे लक्ष देण्यात आले. ग्रामीण भागात सहकारी दूध संस्था पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.1967मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची (महानंद) स्थापना करण्यात आली. 1970-71 दशकात दूध महापूर योजना सुरू झाली. याकाळात राष्ट्रीय दूग्ध विकास महामंडळज्ञची स्थापना करण्यात आली. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला गती प्राप्त झाली. दूधाचे महापूर जगात पोहोचला. दूधाचे अर्थकारण राजकारणाला पोषक ठरले. पश्चिम महाराष्ट्राला याचा सर्वाधिक लाभ झाला.

राज्यात दूधाची प्रत व गुणवत्ता चांगली रहावी, दूध व दूधजन्य पदार्थांना चांगला दर मिळावा, दूधाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा, ग्राहकांना माफक दरात दूध मिळावे यासाठी 1973साली देवताळे समिती 1982मध्ये निलंगेकर समितीची नेमणूक करण्यात आली होती.या समितीने दूध खरेदीचे दर ठरविताना दूधाचा उत्पादन खर्च व इतर गोष्टींचा विचार करून दूधाचा दर,माप,दूधाची प्रत, फॅट व डिग्रीनुसार ठरविला जावा असे सुचवण्यात आले.

 भारतात 1991पासून जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. मुक्त अर्थव्यवस्थेत टिकून राहण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेत आपल्या दूधाची व दूग्धजन्य पदार्थाची मागणी टिकवून ठेवण्यासाठी काही पावले उचलली. ही पावले दूध उत्पादक संघास 'तारक होती की मारक' हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात एकूण प्राथमिक सहकारी दूध संस्थापैंकी 59.85 टक्के कार्यरत आहेत.  त्यापैकी 28.25 टक्के बंद आहेत. तर 11.89टक्के आवसायनात आहेत.दूध संस्था आवसायनात येण्याचे कारण म्हणजे राजकीय व्यक्ती. आपले राजकीय हित व अस्तित्व टिकविण्यासाठी, शासकीय अनुदानाचा फायदा घेण्यासाठी दूध संस्थेचा कारभार नाममात्र चालू ठेवतात.राज्यातील मुंबई वगळता इतर ठिकाची शासकीय दूध शीतकरण व प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने चालवली जात नाहीत म्हणून सरकारला याचा तोटा होतो. हा तोटा प्रतिवर्ष 3100कोटी रूपये होतो, असे काही सामाजिक संस्थेचे म्हणणे आहे. हा तोटा कमी करण्यासाठी'बस्तक'समितीच्या (सन 2000)शिफारसीनुसार महानंदचा शासकीय दूध योजना टप्पा म्हणजे त्याचे भाडेतत्वार सोपविण्याचा निर्णय होय.1980नंतर महाराष्ट्रात शेती व्यवसाय आणि शेतीपुरक व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. त्यात 72च्या दुष्काळाची पार्श्वभूमी होती.गावगाड्यातील सहकारी संस्था राजकीय नेत्यांच्या हातात गेल्या होत्या. जागतिकीकरणाने वरून दिसणारा गावाचा विकास खऱ्या अर्थाने गावाला भकास करणारा आहे. शेतकऱ्याची नवी पिढी शेती व्यवसायाबद्दल उदासीन का आहे ?

दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सातत्याने आंदोलने होत आली आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांची  ही मागणी रास्त आहे. मग दूध उत्पादकांना हमीभाव का मिळत नाही? खासगी दूध संस्थेची दुखरी नस कुठे आहे?याचा अभ्यास करण्यासाठी 97वी घटनादुरूस्तीकडे जावे लागते. जागतिक स्पर्धेत सहकार चळवळ टिकाव धरण्यासाठी 97व्या घटनादुरूस्तीचे विधेयक 12जानेवारी 2012रोजी मंजूर झाले. महाराष्ट्रात या विधेयकाची अमंलबजावणी 12फेब्रुवारी 2013रोजीपासून झाली. या विधेयकामुळे सहकारी दूध उत्पादकासह खाजगी दूध उत्पादकांना दूधाचे संकलन,दूधावरील प्रक्रिया व दुग्धजन्या पदार्थ निर्मिती तसेच विक्रीच्या नियंत्रणाबरोबर संघाच्या विकासासाठी कामे करावे लागणार आहे.कायद्यात समाविष्ठ झालेल्या तळागळातील सभासदाचे हित जोपासणे, सहकारी संस्था चालवतिना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे, राजकीय व शासकीय हस्तक्षेप कमी करून सहकार कायद्याच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची कल्पना मूर्त स्वरूपात आणणे आणि प्रस्थापितांचे वर्चस्व कमी करणे तसेच स्पर्धात्मक कामकाज करावे लागणार आहे. यातील बऱ्याच संस्था या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना दूध संघावरील राजकीय हस्तक्षेप दूर करता येत नाही. 

एकूण इथले राजकारण संस्थावर चालते त्यामुळे दूधाचे संकलन व विक्रीचे काम प्रभावीपणे होत का? तर दुसरीकडे खासगी दूध उत्पादक संघाची मुक्तेदारी काढण्यासाठी राज्यसरकारने 'आरे' हा दूध ब्रॅण्ड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी दूध उत्पादकांमध्ये धास्ती पसरली आहे. असे असले तरी सहकारी दूध संघातील अंतर्गत राजकारणाचा फायदा गुजरातने घेतला असून 26 दूध संघांना आपल्याकडे खेचण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे येत्याकाळात दूध उत्पादकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, दुध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने दूधाचा दर 27 रूपये ठरविला असताना ही खासगी दूध संस्था हा दर द्यायला तयार नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावातील शेतकऱ्यांनी हमीभाव प्रमाणे दूधाला दर द्यावा म्हणून दूध फुकट घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूधदर वाढीचा प्रश्न गंभीर झालेला दिसून येत आहे.

आपल्या राज्यात गोवा,कर्नाटक, गुजरात, आंध्र व तेलंगणा राज्यातील दूध मोठया प्रमाणात येत आहे. बाहेरच्या दूधावर कर बसवून आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार लक्षात घेऊन दूधभाव वाढ करावे व खासगी दूध संघाना अनुदान देण्यात यावे अशी खासगी संस्थेची मागणी राहत आली आहे. ही मागणी चुकीचे आहे,असे म्हणता येत नाही. पण खासगी संस्था या सहकारी दूध संस्था गिळकृंत करण्यासाठी बसलेल्या कंपन्या आहेत. त्यांना दूध उत्पादकांना मिळणाऱ्या नफ्याशी काहीही देणेघेणे नसते.दूध उत्पादक शेतकरी हा सहकारी दूध उत्पादक संघामधला प्रमुख दुवा असतो. हा दूवाच जर उपाशी राहत असेल तर आशा खासगी संस्थांची गरज काय?काही खासगी दूध संस्था दूध विक्रीऐवजी दूध पावडर तयार करतात. चीन, रशिया व इतर देशात दूध पावडरला मोठया प्रमाणात मागणी आहे यातून ते मोठया प्रमाणात नफा मिळवत असतात.

दूध संघाची उलाढाल ही दूध उत्पादक शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या दूधावर अवलंबून राहते. तर दूध उत्पादक शेतकरी हा आपल्या शेतीगोताळ्यावर जीवापाड प्रेम करणारा आहे. त्याच्याशी त्याच्या भावना जुळल्या गेल्या आहेत. शेती,बैल,बारदाना, गाई-वासरे यांच्याशी तो अंत:करणपूर्वक जोडला गेला आहे. गाई आणि म्हशीच्या दूधावर तो आपल्या घराला,कुटुंबाला आधार देत असतो. पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पांढऱ्या दुधाचा काळा पैसा करण्यात काही खासगी दूध संस्था माहेर आहेत. आज बाजारात गोळीपेंढीचे पोते 1100 रूपये तर भुसा 900 रूपये पोते, मका 1500 रूपये पोते मिळते. दूध उत्पादक शेतकरी हे सर्व गणित डोळयासमोर ठेवून आपल्या उत्पादनासाठी भाव मागत असतो. (म्हैस व गायाची राखण, गवत हे गणित सोडून) दुष्काळी परिस्थितीतील वैरण, पावसाळ्यात दुधाळ जनावरांना होणारे आजार व रोग ,दुधाची वाहतूक आदी समस्या शेतकऱ्यांसमोर असतात. दूधाला योग्य भाव मिळत नाही म्हणून महाराष्ट्रात दुधाचे कँन्सच्या कँन रस्त्यावर फेकून देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षात ऊस व दूध उत्पादनाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील दूध उत्पादनात घट होत आहे. त्यास दुष्काळ, पाणी,संगोपन,हमीभाव हे घटक जबाबदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016-17च्या अर्थसंकल्पात पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्यांचे परिणाम पुढील २वर्षामध्ये समजू शकतील. शेतकऱ्यांचा तारणहार सरकार आहे. त्यामुळे यातून योग्य तोडगा निघेल अशी आशा आहे. सध्यास्थितीत महाराष्ट्राला दरदिवशी तीन कोटी लीटर दूधाची गरज आहे. तीन कोटी पैंकी आपल्याकडे केवळ 1कोटी 75लाख लीटर दूधाचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे राधाकृष्ण समितीच्या रिपोर्टनुसार 2020सालापर्यंत दूध उत्पादन दुप्पट केल्याशिवाय पर्याय नाही.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार व सहकारी  संस्था व खासगी दूध संस्थामध्ये समन्वय घडविण्यासाठी पावले उचलून दूधदर वाढीसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे.

-विकास पांढरे,9970452767

(लेखक सा.'विवेक'चे उपसंपादक आहेत.)

 फोटो - इंटरनेट

शनिवार, २१ एप्रिल, २०१८

कृत्रिम पावसाचा 'आधार'


                   
परवा, कृत्रिम पावसा संदर्भात सकारात्मक बातमी वाचण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने सोलापूर येथे कृत्रिम  पावसाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी येत्या जून महिन्यापासून या प्रयोगाच्या प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना याचा फायदा होणार आहे. सरकारने उचलले हे एक चांगले पाऊल आहे.

सोलापूर हा अवर्षणग्रस्त जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा जिल्हा कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीशी सामना करतोय, अशी परिस्थिती सांगोला,मंगळवेढा, अक्कलकोट आणि दक्षिण व उत्तर,बार्शी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात असते. उर्वरित तालुके उजनी धरणामुळे हरित झाले आहेत. बाराही महिने, दुष्काळ असो वा सुकाळ इथे हिरवीगार ऊसाचे मळे दिसून येतात. सर्वाधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहेत.
शेती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यात कोरडवाहू रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र व हवामान विभाग कार्यरत आहे. आता कृत्रिम पावसाचा प्रायोगिक प्रकल्प सुरु होतोय. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पाचा शेजारील उस्मानाबाद आणि लातूर या मराठवाड्यातील दोन जिल्ह्याला कितपत फायदा होणार आहे ? हे पाहणे आवश्यक आहे.

राज्यात आघाडी सरकारच्या काळात (सन २००३)साली कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग  'प्रकल्प वर्षा'या नावाने १५ सप्टेंबर ते १४ डिसेंबर २००३या कालवधीत राबविला गेला. या प्रयोगात सोलापूर, अहमदनगर, बीड,उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. आपल्या देशात १९५७ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यास सुरूवात झाली. उत्तर प्रदेशातील रिहाद जलाशय परिसरात असा कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग पहिल्यांदा झाला. त्यानंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, राजस्थानसारख्या राज्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग केला. चीन,उत्तर अमेरिका, कुवैत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इस्त्रायल आदी जगभरातील ५०हून अधिक देशात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात आला आहे.

आजपर्यंत कोणताच देशाला या प्रयोगामुळे दुष्काळावर मात होता आले नाही. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी असा प्रयोग निश्चितच फायदेशीर आहे पण यामध्ये काही अडथळे आहेत. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी ज्या परिसरात पावसाची गरज आहे. त्या परिसरावर पावसाचे ढग दाटून आले पाहिजेत. विशेष म्हणजे ते ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा असायला हवी, ढगापर्यंत पोहचण्यासाठी राँकेटची मदत घेतली जाते. रसायनाचे ढगात बीजारोपण केला असता, बाष्पाचे प्रमाण अल्प असेल तर त्या परिसरात पाऊस पडू शकत नाही. हा प्रयोग अयशस्वी होण्यामागचा महत्त्वाचा मुख्य अडथळा आहे.

डॉ. राजा मराठे या अभियंत्याने आठ वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील सुललेगाव येथे कृत्रिम पावसावर प्रयोग केले. दहा प्रयोगात नऊ वेळा पाऊस झाल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी 'वरुण यंत्र'विकसित केले आहे.

दोनशे लीटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. ती मैदानावर ठेवली जाते. तिच्या दोन्ही बाजूंकडील पत्रे नसतात. त्यामुळे पोकळ असलेल्या या टाकीच्या एका बाजूला लोखंडी गजांची जाळी बसवतात. याच जाळीवर एक सच्छिद्र आडवी नळी बसविली असते. तिच्या मध्यभागी काटकोनातून दुसरी नळी बसवून ती बाहेर काढतात. या नळीला "ब्लोअर' किंवा भाता जोडला जातो. विजेवर चालणारे "ब्लोअर' चालू केल्यास टाकीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढतो. वीज नसल्यास भाता वापरला तरी चालतो,असे यंत्राचे स्वरूप आहे.

वरूण यंत्र

या टाकीत जळण म्हणून लाकडे, गोवऱ्या, भुश्‍श्‍याच्या विटा सहा इंचापर्यंत रचून ठेवाव्यात. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून पेटवावे. चांगला जाळ पेटल्यानंतर भुश्‍श्‍याच्या गोवऱ्या किंवा लाकडाच्या ढिपल्या दोन फुटांपर्यंत टाकीत टाकाव्यात. त्यानंतर "ब्लोअर'ने किंवा भात्याने जोरात हवा द्यावी. भट्टी चांगली पेटवून वर आगीचा जाळ यायला लागल्या की त्यात सुमारे सहा किलो मीठ (बारीक) थोडे-थोडे टाकत राहावे,अशी कृती केल्यास तासभरात पाऊस पडायला सुरूवात होते,असा दावा डॉ. मराठे यांनी काही वर्षापूर्वी केला होता. हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आर्द्रता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्‍यक आह,असेही त्यांचे म्हणणे होते. म्हणजेच हे वरूण यंत्र देखील कृत्रिम पावसाच्या यंत्रासारखे आहे.

केवळ कृत्रिम पावसावर विसंबून चालेल का?

पाणी अडवणे, साठवणे, जिरवणे, जपून व काटेकोरपणे वापरणे आणि छोटे व मोठे बंधारे, बांधबंदिस्ती, राखीव वन्यक्षेत्रे, राखीव कुरणे, कुर्‍हाडबंदी-चराईबंदी, तळी-तलाव अशा सूक्ष्म प्रयत्नातून दुष्काळावर मात करता येते, हे आपण पाहिलो आहे. जोपर्यंत दुष्काळ भागात वनसंपदा वाढत नाही तोपर्यंत पावसाचे प्रमाण कमी अधिक असणार आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळापासून आपल्या देशात दुष्काळाची समस्या आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येत असतात.पावसाचा प्रत्येक थेंब किती महत्त्वाचा असतो याची जाणीव दुष्काळग्रस्तांना असते. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी 'कृत्रिम' विचार करून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत  'आधार' शोधावा लागणार आहे.
©विकास पांढरे,९९७०४५२७६७

शनिवार, १७ मार्च, २०१८

एका जिद्दीची कहाणी



नवरा अपंग तर बायको अंध तरीही या दोघांचा संसार सुखाचा आहे. कुणाचा आधार नाही, ना कुणाचे कर्ज स्वत:चा विकास स्वतः करणे यातच खरा पुरूषार्थ आहे, असं प्रमाण मानून सोलापूरच्या पूर्व भागात अंध आणि अपंग दाम्पत्य काळ्या बाहुल्या तयार करून त्यावर गुजराण करणारे चित्र दृष्टीक्षेपास पडते.

या दाम्पत्याची शहरात कुठे मालकीची जागा नाही ना हक्काचे घर नाही. घर नाही म्हणून सारं जीवनच असुरक्षित, अशा असुरक्षित आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या या अंध अपंग दांम्पत्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुणाचाही आधार न घेता गेल्या २५ वर्षापासून काळया बाहुल्या तयार करून त्यावर पोट भरतायेत.
महागाईमुळे त्यांच्या जगण्याची परवड होतीय. ही कहानी आहे दोन्ही पायाने अपंग असलेल्या फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई यांची.

फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई

सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील पद्मनगरच्या वळणार एक पाल आहे. या पालीत फुलचंद जाधव आणि मंगलाबाई गेल्या पंचवीस वर्षापासून राहतात. आज फुलचंदचे वय ६५ हून अधिक झालंय तर मंगलाबाई साधारण ५८ वर्षांच्या असतील. त्या पालीमध्ये या दोघांनी आपला छोटासा संसार मांडलाय. फुलचंद मुळचे अकलूजचे. दोन्ही पायाने अपंग आहेत. लहानाचे मोठे अकलूज मध्ये झाले. फुलचंद याचे वय वाढलें तसे कुटुंबाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. फुलचंद यांच्यातील जगण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. निराशेला न डगमगता ते १९७२ साली सोलापूर शहरात आले. छोटे मोठे काम करू लागले. मिळणाऱ्या पैशातून पोट भरणे ही मुश्कील होते.

काही दिवस भीक मागून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला पण भीक मागणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले. स्वत: काही तरी कला शिकल्या शिवाय जगण्याला आकार येणार नाही म्हणून काळया बाहुल्या बनविणे, पिंजरे, झाडू, गंगावण अशा वस्तू तयार करू लागले. त्यातून दोन पैसे मिळू लागले.त्यांचा स्वाभिमान आणखीन ज्वलंत होऊ लागला. यातून आपण स्वावलंबी जीवन जगू शकतो याचा अभिमान वाटू लागला.
या दरम्यान दोन्ही डोळयांनी अंध असलेली मंगला खंदारे नावाची युवती भेटली. तेही जगण्यासाठी धडपडत करत होती. दोघांची चांगली ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले पुढे या दोघांनी विवाह केला. यातून या दोघांच्या आयुष्याचा संसार सुरू झाला.

काळ्या बाहुल्या करताना फुलचंद व मंगलाबाई

छोट्याशा व्यवसायातून दोघांचे पोट भरणे कठीण झाले अनेक वेळा त्यांना उपाशी राहावे लागले. मंगला ही तशी तेलूगू भाषिक तर फुलचंद मराठी.
त्यामुळे या दोघांना संवाद साधताना अडचण यायची. पुढे ते एकमेकांच्या भाषा बोलू लागले. शब्दांचा, भाषेचा नवा सूर जुळून आला.

या दोघांनी काळया बाहुल्यांचा व्यवसाय नेटाने उभा केला. संसाराला आकार येऊ लागला. मंगलाबाईची उद्योगजकता स्वस्थ बसू देत नव्हती. तिने बांगडयांचा व्यवसाय सुरू केला.पण समाजातील महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्याने, या व्यवसायावर पाणी फिरले. मंगलाबाईने जिद्द न हरता, आपल्या पतीला साथ देत आजही काळया बाहुल्या बनविण्यासाठी मदत करतायेत. या दोघांची कमाईतून ८० ते १०० रूपये मिळतात.

आमवस्या आणि पौर्णिमेला थोडी जास्त कमाई होते. पण रेशन, घासलेट आणि औषध पाण्यामुळे जगण्यात आनंद वाटत नाही, त्यातही ना हक्काचे घर आहे ना जागा, स्वयंजरोजगार करावा यासाठी जवळ शिधापत्रिका आहे ना शिक्षण. पोटासाठी रोज मर मर मरायचे,कधी गिऱ्हाईक नाही आले तर अर्धपोटी उपाशी रहावे लागते. बाहुल्या बनविण्यासाठी रबर, दोरा, खिळा, लिंबू आदी वस्तू विकत घेताना नाकी नऊ होते,असे ते म्हणतात.

"कलेवर पोट भरणे अवघड होत आहे. त्यातच महागाईमुळे आज अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे. त्यामुळे सध्या आम्हाला शासनाची मदतीचे गरज आहे. आमच्या व्यवसायाला अधिक हातभार लावण्यासाठी बँकानी आर्थिक सहाय्य करून, आमची परवड थांबवावी" असे, फुलचंद जाधव आणि त्यांच्या पत्नी मंगलाबाई सांगतात.

या दांम्पत्यांना स्वत:चा लघुउद्योग सुरू करायचा आहे पण कोणतीही बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. कारण त्यांच्याकडे कुठलीच तारण नसल्यामुळे बँकाचा आशिर्वाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. समाजात स्थान नाही, गावात वा शहरात हक्काची जागा नाही, शहराशिवाय अस्तित्व नाही, त्यामुळे सतत भाकरीचा चंद्र शोधण्यसाठी या अंध अपंग दांम्पत्याची परवड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काळया बाहुल्या विकून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबाची कहानी प्रेरणादायी आहे.

शहरी असो वा ग्रामीण याठिकाणी अपंग नजरेस पडत असतात. काही अपंग शिक्षण घेऊन त्यांना नोकरी मिळत नाही ना पगार. काहीजण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपंगात्वावर मात करून, स्वावलंबी बनत आहेत. पण त्यांना स्थिरता देण्यासाठी बँकेकडून काहीच मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( साभार :अपंग सहायता दिनानिमित्त १६ मार्च २०१६ रोजी तरूण भारत,सोलापूर मध्ये मी लिहिलेला हा लेख आहे)

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...