सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

प्रतापगडचा अविस्मरणीय अनुभव

मी आजपर्यंत बोटावर मोजण्याइतके प्रेक्षणीय स्थळे व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. त्यामध्ये नळदुर्ग, परंडा, औसा, दौलताबाद (देवगिरी), सिंहगड ऐतिहासिक गडकिल्लाचा व महाबळेश्वर,पाचगणी आणि येडशी येथील निसर्ग सौंदर्याचा समावेश आहे. परवा 'विवेक'समूहाबरोबर महाबळेश्वर-वाई-भिलार-प्रतापगडची सहली केली.

महाबळेश्वर मधले फिरणे.. थंडगार हवा.. अद्भभूत स्पाँट.. जितका आनंद तितकाच कमी.. देशातले पहिले पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारगावाची भेटही नव्या विश्वात घेऊन जाणारी ठरली.प्रतापगडची सहल माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. मराठी मुलुखावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्याच्या पायथ्याशी केला. त्यामुळेच लहानपणापासून 'किल्ले प्रतापगड'ने मनात घर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असलेल्या 'प्रतापगड'च्या पायरीला मस्तक ठेकताना अंगावर काटे आले आहे.

                                                               इतिहासात डोकावताना 

चंद्रराव मोरे याचा पराभव करून छ.शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तेव्हा नीरा आणि कोयनेच्या काठावर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जावळीच्या खोऱ्यात असलेल्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा शिवाजी महाराजांनी मोरोपंतांनी दिली. मोरोपंतांनी आपले कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद किल्ला तयार केला. हाच तो प्रतापगड. पार आणि किनूश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्लाची बांधणी झाली आहे. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा प्रचंड विस्तार आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे.


या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाढत चालली शक्ती पाहून १६५७ साली आदिलशहाने वाईचा सरदार अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराज आपल्या गमिनी काव्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.  खानाचा साथीदार सय्यद बंडा यांने राजेंवर तलवार उगारली तेव्हा जिवा महाला या धाडसी मावळ्यांने सावधगिरीने सय्यद बंडाला मारले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा"या म्हणीच्या रूपाने गडाचा इतिहास अजरामर झाला आहे. त्याचे इतिहासात वर्णन आहे. 

                                    
                                                                                      सफर 

प्रतापगडची सफर पायथ्यापासून सुरू होते. गडाच्या खाली डाव्या बाजूला दर्गा शरीफला जाण्याची एक पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर.



 सध्या येथे पोलिसांचा पहारा असल्यामुळे येथे जाता येत नाही. त्यामुळे दूरवरून फोटो घेता आला. किल्लाचा थोडा पायथा चढून वर गेल्यावर महाद्वार लागतो.श्री तुळजाभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. आज गडावर छोटे गाव वसले आहे


प्रतापगडावरून सह्याद्रीचा अद्भभूत निसर्ग पाहता आला. सह्याद्रीच्या कुशीत गडावरचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहतोय. 'हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी' ची गुंज दऱ्याखोऱ्याला जागी करते. पुन्हा पुन्हा इथल्या मातीला, इथल्या निसर्गाला,  इथल्या पशुपक्ष्यांन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देते.

                                                                    शिवकालीन शौचालये 

       किल्ल्याची पाहणी करताना माझ्यातला पत्रकार जागा झाला. कोणकोणती कामे सुरू आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. किल्लात सध्या विविध कामे सुरु आहेत. चाळीस वर्षापूर्वी किल्ल्यावर वीज कोसळल्याने एक तटबंदी कोसळली आहे. या तटबंदीचे काम होणे आवश्यक आहे पण फार जिकिरीचे हे काम आहे. गडाच्या माथ्यावर असलेल्या ध्वजस्तंभापर्यंतचा रस्ता सध्या माती आणि दगडाने भरून गेला आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली पायऱ्या आहेत. या पायऱ्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
  या ढिगाऱ्याखाली शिवकालीन जातं निघाले आहे.  विशेष म्हणजे, किल्ल्याची जी तटबंदी आहे. त्या तंटीबंदीमध्ये जवळपास दीडशेहून अधिक शौचालयाचा शोध लागला असल्याची माहिती अभियंता अमन कांबळे यांनी दिली.




आज लोकांना शौचालयाचे महत्त्व किती आहे  कळू लागले आहे. ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर शिवकालीन शौचालयांची निर्मिती केली होती. हे पाहून मी भरावून गेला. किल्लात अनेक ठिकाणी शिवकालीन पाण्याच्या टाक्या आहेत.त्याचा शोध घेणे सुरू आहे.

                                                         ७२ वर्षाचा उत्साही गाईड 

 शिवकालीन इतिहासापासून ते प्रतापगडाच्या पायथ्थापासून ते माथ्यापर्यंत,  इंत्थभूत माहिती असणारा एकमेव गाईड म्हणून जनार्दन जंगम (पाटील) उल्लेख केला जातो. या माणसाचे सध्याचे वय आहे बहात्तर. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ ते गाईडशीप करत आहेत. सध्या ते विद्यमान सरपंच आहेत. ५० वर्षापूर्वी किल्ल्याची माहिती कशी द्यायची याविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, साहित्यिक गो.निं.दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

गाईडशीप करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळ्या भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. विविध प्रांतांतून, देशांतून आलेल्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत ही माहिती दिली तर इतिहास जास्त कळतो,असे गो.निं.दांडेकर म्हणायचे, त्यासाठी मी मराठी, हिंदी, कन्नड, पंजाबी, तेलगू, कच्छ या भाषेतून मार्गदर्शन करतो असे जनार्दन जंगम (पाटील) यांनी सांगितले.गाईड जनार्दन पाटील यांच्या तोंडून प्रतापगडाचा इतिहास समजावून घेणे, हाच मुळी मोठा आनंददायी, माहिती आणि ज्ञानात भर टाकणारा असतो. त्यामुळे पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील बरचसे पर्यटक गाईड म्हणून पाटील यांना पसंती देतात.


जनार्दन पाटील हे अर्धशतक प्रतापगडाशी एकरूप झाले आहेत. यामुळेच सत्तरीतही तरूणांना लाजवणारा अखंड उत्साह त्यांच्याजवळ आहे. किल्ल्यावर चढणे,खाली उतरणे ही मोठी कसरत असते. हा अवलिया बहात्तराव्या वर्षी ही कसरत लिलया पार करतोय. मर्द मावळ्याचे रक्त काय असते हे गाईड जनार्दन पाटील यांच्याकडे पाहून लक्षात येते. पुरातत्व विभागाने त्यांना गाईडशीपचे अधिकृत ओळखपत्र दिले आहे. या अवलियाची माझी भेट झाली हाच एक अविस्मरणीय अनुभव होता.

महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो हे आमचे भाग्य आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजासारख्या महापुरुषांच्या पराक्रमी वास्तुला स्पर्श होणे म्हणजे परमोच्च आनंद. या महापुरुषांच्या पराक्रमाचे जागर करणे हे आमचे कर्तव्य आहे नव्हे ते आद्यकर्तव्य आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

४ टिप्पण्या:

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...