शनिवार, ८ जुलै, २०१७

आयाबाया' च्या भरारीचा सामाजिक दस्ताऐवज



कथा,कादंबरी म्हटले की,नायक,नायिका अशी पात्रे  येतात. पण ती काहीशी काल्पनिक असतात. धीरोदात्त पात्रे एकूण कलाकृतीला न्याय देत असतात. परवा आमचे मार्गदर्शक मित्र,विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांचे 'आयाबाया' हे पुस्तक वाचत होतो. सव्वाशे पानाचे हे पुस्तक वाचून क्षणभर गहिवरल्या सारखे झाले. कारण या पुस्तकातील धीरोदात्त नायिका या गावकूसाबाहेरच्या आहेत.भटक्या समाजातील स्त्रियांचे जीवन म्हणजे किड्यामुंगासारखेच. पण काही स्त्रिया परिस्थितीला तोंड देत समाजाला आशेचा नवा किरण दाखवतात. गोळे यांचे आयाबाया' हे पुस्तक म्हणजे भटक्या जाती - जमातील महिलांच्या वेदनेची व कर्तृत्वाची गाथा होय.

महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्या समाजाचे चित्र मराठी पत्रकारितेत आणि साहित्यात आणण्याचे कार्य करणारे पत्रकार-लेखक फार क्वचितच आढळतात. त्यामध्ये रवींद्र गोळे यांचे नाव प्राधान्य क्रमाने घ्यावे लागेल. मराठी साहित्यात आजपर्यंत न हाताळलेला विषय रवींद्र गोळे यांनी आपल्या साहित्यातून वाचकांसमोर आणला आहे.

उजव्या विचारात जडणघडण झालेल्या रवींद्र गोळे यांच्या पत्रकारितेची सुरुवात सा.विवेक पासून झाली. सध्या ते सा.'विवेक'चे सह कार्यकारी संपादक आहेत. दरम्यानच्या काळात त्यांचा भटके- विमुक्त विकास परिषदेच्या अनेक प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला.  पालावरची शाळा असो वा पालात राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकांशी त्यांचा संबंध आला.

महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या ४२ जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. यांना ना हक्काची जमीन आहे ना घर, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या लोकांच्या जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. भटक्या-विमुक्तांच्या काही जमातींवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. याच धरत्रीचे पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. राजकीय उपेक्षा, पोलिसांचा जाच, याबरोबरच जात पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या या समाजाच्या दैन्यावस्था अजूनही संपल्या नाहीत. या समाजातील स्त्रियांचे दु:ख ही भेदक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा भटका समाज मूळ प्रवाहात येत आहे. शिक्षण,स्वावलंबन,सन्मान आणि सुरक्षा याची जाणीव या समाजाला करून देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यशस्वी झाला आहे हे रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया' ग्रंथातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताबाई देवकर, सखुबाई बंडीधनगर, जयश्री भोसले, राजश्री काळे, कांचन मालन काळे, सुजाता गणवीर, सरस्वतीबाई माने, समूध्दी काळे आणि अयोध्याबाई उपाध्ये या नवदुर्गेची गाथा 'आयाबाया'त आली आहे. यात केवळ त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दु:खाच्या करुण कहाण्या नाहीत तर राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याच्या भरारीचे ते सामाजिक दस्तऐवज आहेत. भटके-विमुक्त समाजातील स्त्रियांच्या संघर्षांचे अत्यंत सखोल चित्र रवींद्र गोळे यांच्या या पुस्तकात पाहायला मिळेल.

नवऱ्यानं डोक्यात दगड घातला म्हणून तान्हय़ा बाळासह घर सोडून आलेल्या भारतबाई. आज तुळजापूर शहराच्या स्वच्छतेचं स्वप्न पाहताहेत. त्याच्या पूर्ततेसाठी गेली अनेक त्या अनवाणी फिरत आहेत. शाळेचं तोंडही न पाहिलेल्या या बाईंना सगळा हिशेब, व्यवहार तोंडपाठ असतो. तुळजापुरात बचत गट सुरू करून अनेकींना रोजगारातून स्वत:च्या पायावर उभ्या राहायला शिकवणाऱ्या, शहर स्वच्छतेसाठी  तुळजापुरात घंटागाडय़ा सुरू करणाऱ्या भारतबाई देवकर यांचा जीवनपटाला लेखक रवींद्र गोळे यांनी आपल्या'आयाबाया' पुस्तकात प्रथम स्थान दिले आहे.

 वडार समाजात जन्माला आलेल्या भारतबाईचा संघर्ष वेदनादायक आहे. नवऱ्याला तिनं सोडले असले तरी स्वाभिमान सोडला नाही. कधी सूतगिरणीवर तर कधी तुळजापूराच्या आसपास खडी फोडून दिवस काढलेल्या भारतबाईला आधार मिळाला यमगरवाडीत. वडारजातील एका मुलीला शाळेत घालण्यासाठी भारतबाई यमगरवाडीला पोहोचल्या.त्या मुलीचा प्रवेश झाला. भारतबाई कायमच्या भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या जोडल्या गेल्या. इथेच त्यांना बचतगटाची माहिती मिळाली. भारतबाईचा स्वभाव आणि कामाबद्दलची आत्मियता पाहून त्यांना यमगरवाडी प्रकल्प समितीचे सदस्य करण्यात आले. पुण्याला भटके विमुक्त विकास परिषदेची एक बैठक दादा इदातेंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत भाळतबाईच्या नावाची भटके -विमुक्त विकास परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून केली गेली. भारतबाई म्हणजे हाती घेतलेले काम तडीस नेणारी बाई. आपल्या आयुष्यातील दु:ख विसरून त्या नव्या दमाने आणि उमेदीने जीवनाची वाट चोखाळत आहेत. बचत गट असो वा तुळजापूर शहर स्वच्छ करण्याचा नित्यक्रम कसा आदर्शवत आहे हे लेखक गोळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून सांगितले आहे.


गोपाळ म्हणजे कृष्णाचे वंशज.  काळाच्या ओघात भीक मागून जगतोय. खेळकरी, पैलवान, डोंबारी अशी अनेक नावे असलेल्या या समाजातील एका सखूबाई बंडीधनगर या महिलेने लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा गावात आपल्या अद्वितीय कामामुळे नवी उमेद निर्माण केली आहे.

आयुष्यातील पन्नास वर्षे काढल्यानंतर या आपण आपल्याच समाजासाठी काही तरी करावे,असे सखुबाईला वाटले. बघताबघता  समाजातील ७२ कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले. आज ती साडेतीनशे जणांची ती "माई' झाली आहे. सखूबाई तुकाराम बंडीधनगर यांनी आपल्या समाजाला आशेचा नवा किरण दाखविला आहे. सखूबाईंमध्ये बदल घडण्यास निमित्त ठरले भटक्‍या विमुक्तांसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे, नरसिंग झरे आणि तुळशीराम गरगटे. नातेवाईकाच्या तुकडाभर जमिनीच्या आधारावर सखूबाई लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यातील अनसरवाडा इथे आल्या. भटकें जगणे सोडून द्यायचे तर पोट भरण्यासाठी हाताला काम हवे. त्याची सुरवात सखूबाईंनी शेतमजुरीने केली. तेव्हापासून स्वतः शिकणं आणि आपल्या समाजातील महिलांना शिकविणे असा नित्यक्रम सुरू झाला.

 जीवनाला स्थिरता मिळत असल्याचे पाहून अनसरवाड्याच्या वस्तीवर गोपाळ खेळकरी समाजाच्या कुटुंबांची आणि महिलांची संख्या हळूहळू वाढू लागली. तेव्हा सखूबाईंनी स्वयंसहायता गटाची स्थापना केली. महिलांनी रोजच्या मजुरीतून एक रुपया बचतीला सुरवात केली. सखूबाईंनी अनेक महिने, विविध पद्धतीने समजावून सांगितल्यानंतर पुरुष मंडळी वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेण्यास तयार झाली. यामुळे आज वस्तीवर मोठे दोन वाजंत्री गट आहेत. हैदराबाद, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये येथील मुले वाद्य वाजविण्यास जातात.ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण सखूबाईंनी स्वतः घेतले. त्यानंतर त्यांनी वस्तीवरील महिलांना पायपुसणी, माळा, दोरखंड, तरट्या, दाळी आदी वस्तू बनविण्यास शिकविल्या. भीक मागून खाणाऱ्या महिलांना वस्तीवरच महिनाकाठी साडेतीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची सोय केली. बघता बघता गोकुळ महिला उत्पादन केंद्र सुरू करून महिलांमध्ये आत्मभान निर्माण केले आहे. चौथीपर्यंत शिकलेल्या सखुबाईना विविध भाषा अवगत आहेत. महिला प्रशिक्षणासाठी सहा महिने परगावी राहिल्यामुळे (जातीबाहेर जाऊन ज्ञान घेतल्याबद्दल) सखुबाईवर जातीने बहिष्कार टाकला होता. जातपंचायतीत दंड भरल्याशिवाय तिला जातीत घेतले जात नव्हती. नरसिंग झरेंच्या मदतीने ती या समस्येतून कशी बाहेर पडली याची उत्कंठावर्धक कथा गोळे यांनी शब्दबध्द केली आहे.

आजच्या काळातही पारधी समाज हा मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहे. या समाजाची आजही परिस्थितीत बदलली नाही. ना हक्कांचे घर आहे ना जागा, कोणतेही अघटित घटना घडली की पोलीसांची नजर या समाजाकडे जात असते. अशा या वंचित समाजातील स्त्रियांची अवस्था तर फार बिकट आहे. त्याचबरोबर हा समाज रूढी, समजुती, अंधश्रद्धांच्या प्रभावात आदिम जीवन जगत आहे.  पारधी समाजातील स्त्रियांच्या वाट्याला आलेले अंधारमय आणि प्रकाशमान जीवनाची यशस्वी गाथा लेखक रवींद्र गोळे यांनी  जयश्री भोसले व राजश्री काळे या दोघींच्या माध्यमातून समोर आणली आहे. राजश्री काळे ही सध्या पुणे महानगरपालिकेच्या  प्रभाग क्रमांक सातची नगरसेविका आहे.पारधी समाजातील ती पहिली नगरसेविका आहे.

जयश्री- कस्तुऱ्याची कहाणी चित्तथरारक आहे. या दोघांच्या लग्नाला आठ दिवस झाले नसतील,अचानक पालावर पोलिसांची पालावर धाड पडते अन् कस्तुऱ्या जेरबंद होतो. जो गुन्हा त्यांनी केला नाही त्याची शिक्षा कस्तुऱ्याला भोगावे लागते. अशावेळी जयश्रीची झालेली परवड अंगावर शहारे आणणारे आहे. गावकुसाबाहेर जीवन जगत असलेला हा समाज सामाजिकदुष्टा सुरक्षित नाही.  जीवनाची फरफट करत जयश्री आणि कस्तुऱ्या नळदुर्ग जवळील सिंदगाव इथे येतात. पण नियती मात्रं जयश्रीला साथ देत नाही.  काही नराधम जयश्रीला आपल्या वासनेची शिकार बनवतात.

क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली, असहाय, फाटक्या कपड्यातली, जयश्रीची वेदना समजू शकली नाही.
बलात्कार झाला. पारध्याची बाई बाटली.. अन् पुन्हा सुरू होते जयश्रीच्या जीवनाची फरफट. जयश्रीला जातीबाहेर फेकण्याचा प्रकार सुरु असतो,तर दुसरीकडे कस्तुऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांचा ससेमिरा. यावेळी या अभागी नवदाम्पत्याच्या झालेल्या ससेहोलपटाची कुणालाही दया येत नाही.

जयश्रीच्या जीवाला कस्तुऱ्या तेवढाच आधार तर होता..त्याला औरंगाबादच्या जेल मध्ये डाबण्यात आले...तिच्या जीवनाची फरफट थांबली ती यमगरवाडीला आल्यावर... गिरीश प्रभुणे काकांनी तिला आधार दिला. तिचा जीव यमगरवाडीत रमू लागला. तिचे पिल्ले ही यमगरवाडीत शिकू लागली. पुढे तिला बचतीचा मार्ग सापडला. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ यांनी जयश्रीला बचतीचे अर्थशास्त्र सांगितले. जयश्रीने जे आयुष्य भोगले त्यापासून मुक्ती मिळाली होती. जयश्रीच्या जीवनात झालेला हा बदल संघविचारातून सुरू झालेल्या परिवर्तनाच्या कार्याच्या पाऊलखुणा आहेत.

यमगरवाडी हे भटके-विमुक्त समाजाचे माहेरघर. पारधी समाजात गायपारधी व गावपारधी दोन पोटजाती आहेत. राजश्री काळे ही गायपारधी. तिला धरून पाच बहिण आणि एक भाऊ. राजश्रीच्या बापाला ज्या वर्षी सजा झाली त्याच वर्षी तिचं लग्न झालं ते ज्ञानेश्वर भोसले. तो गावपारधी तर राजश्री गायपारधी. दोघांत सोयरिक होत नाही. पण नियतीने या दोघांचा योग जळवून आणला. ज्ञानेश्वर काही दिवस दारु भट्टी चालवून संसार चालवू लागला. अशावेळी गावपारध्याने गायपारध्याची बाईल केली ?म्हणून पारधी समाज खवळला.

 राजश्रीची चौथीनंतर शाळा थांबलेली होती.शिकण्याची जिद्द असूनही मार्ग सापडत नव्हता. अशावेळी प्रभुणेकाका,गडेकर गुरुजी, व्हटकर याची राजश्री शी भेट झाली. ती यमगरवाडीत शिकू लागली. ज्ञानेश्वरने देखील तिला साथ दिली. प्रभुणे काकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण घेतले. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिने शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात तिला शिपायाची नोकरी मिळाली. दरम्यान काळात तिला मुलगी का झाली म्हणून ज्ञानेश्वरने माणसात शिवीगाळ करून मारहाण केली.आज राजश्रीच्या जीवनात विविध परिवर्तन झाले आहेत. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेची नगरसेवसिका आहे.

लेखक रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया' या पुस्तकात विविध स्त्रियांचे दर्शन घडवले आहे.यामध्ये सरस्वती माने या महिलेची कथा सांगितली आहे. सरस्वती या यमगरवाडी प्रकल्पातील प्रथमापासूनचे कार्यकर्ते तुकाराम माने यांच्या सौभाग्यवती. एकदा प्रकल्पातील पोरांनी शेतातले धान्य चोरले म्हणून गावकऱ्यांनी मुलांना डांबून मारले. फार विणवणी करून ही गावकरी शांत होत नसल्याचे पाहून सरस्वती बाईने आपला दुर्गावतार दाखवला. त्यामुळे मुलांना सरस्वतीबाई बद्दल आदर आहे तितकच ममत्व देखील. सरस्वतीबाई या स्वयंपाक विभाग सांभाळतात.

लेखक गोळे यांनी कांचन काळे, सुजाता गणवीर, समूध्दी काळे आणि अयोध्याबाई आराध्ये यांची जीवनगाथा
मांडली आहे. सामाजिक इतिहासात उतरंडीच्या तळागाळाशी असलेली स्त्री अज्ञान, दारिद्रय़, अत्याचार, अंधश्रद्धा यांनीच केवळ पिचलेली नव्हती तर दुहेरी दडपणाची ती बळी होती. अस्पृश्य म्हणून पुरुषांबरोबरच समाजाकडून अवहेलना, हेटळणी, तुच्छता सहन करणारी आणि दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणून कुटुंबात पुरुषप्रधानतेकडून सतत अत्याचार सोसणारी. तरीही ही स्त्री दुबळी, रडवी, हातपाय गाळून बसणारी कधीच नव्हती. सतत कष्ट करणारी, अन्याय अत्याचाराला खंबीरपणे आणि कणखरपणे तोंड देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तगून राहणारी आहे. हे रवींद्र गोळे यांनी आपल्या 'आयाबाया'तून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 © विकास पांढरे, सा.विवेक मुंबई
मो.नं.९९७०४५२७६७, ८२०८६६९८९३

आयाबाया
लेखक -रवींद्र गोळे
मो.नं.९५९४९६१८६०,९८६९८१३२२८
प्रकाशक
स्वाती जोशी
परम मित्र पब्लिकशन्स ६,राजदुर्गा,बी कँबीन रोड,नौपाडा, ठाणे ( प.)४००६०२
मो.नं.९९६९४९६६३४

गुरुवार, ६ जुलै, २०१७

यमगरवाडीचे आबा





कुणीतरी म्हटले की,जीवनातील नाती ही नियतीने बनवलेल्या असतात. ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. आबा ऊर्फ फुलाजी ताटीकुंडलवार हे त्यातील एक व्यक्तिमत्त्व. यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या प्रकल्पातील मितभाषी, विद्यार्थी प्रिय वसतिगृह अधीक्षक म्हणून ते परिचित आहेत.
      यमगरवाडी( ता.तुळजापूर) येथे सामाजिक समरसता मंचाने 'भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून १९९२-९३ पारधी समाजातील या एका जातीच्या २५ मुलांना घेवून पहिली शाळा सुरू केली.२५ मुले तीन झोपड्या आणि माळरान असे काही चित्र होते. यासाठी अनेक हातांनी काम केले.त्यांचे योगदान, त्याग हा समाजाला आदर्श घालून देणारा आहे. शिक्षण, स्वावलंबन, सन्मान व सुरक्षा या चतुसूत्रीचा अंगीकार करण्यात आला. त्यामुळे आज २५ वर्षात यमगरवाडी हे भटके विमुक्तांचे मुख्य केंद्र बनले आहे. माझं गाव यमगरवाडी पासून अवघ्या १५ किलोमीटरवर असल्याने प्रतिष्ठानच्या विविध कामाची लवकर माहिती व्हायची. गिरीश प्रभुणेकाकांनी घेतलेली मेहनत, लेख वाचनात येत असतं.त्यामुळे यमगरवाडी विषयी आपसूकच ओढ लागली. महाशिवरात्री असो व इतर कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सवय लागली.
  प्रकल्पाची विविध माहिती घेत असताना ओळख झाली ती आबाची. आबा ऊर्फ फुलाजी ताटीकुंडलवार यांच्या भोवती सतत मुलांचा गराडा पाहून चकित झालो होतो. आबा तसे धर्माबाद -किनवट या वनवासी भागातले. नोकरीनिमित्त यमगरवाडीला आले पण पगारी नोकरदार म्हणून कधीच पाहिले नाहीत.

भटके विमुक्तातील अनेक समाजातील जसे,डोंबारी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मसनजोगी, ब‌हुरुपी,भिल्ल, पारधी, वैदू, वडार, वासुदेव, नाथजोगी, नंदीबैलवाले, मरीआईवाले, मेंडंगी-जोशी, सरोदे, शिकलकार, कोल्हाटी, धनगर, यासह २८ जातीच्या भटक्या समाजातील बांधवाचे
असंख्य मुले आणि मुली यमगरवाडीत शिक्षण घेत आहेत. ही सर्व मुले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. काही मुलांना तर कुटुंबाचा आधार नाही, ना घर ना मायबाप, ज्याचे आहेत ते वर्षे - सहा सहा महिने मुलांकडे येतील असे नाही. कारण ते ही आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी सतत स्थलांतर करत असतात. काही मुलांना प्रकल्पात आणण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. ज्या मुलांना आपल्या आई वडिलांची सतत आठवण येते. त्यांच्यासाठी आबा हा एक आधार वाटतो. काही मुलांना काय हवे असेल तर ते अगोदर आबांकडे हट्ट धरतात. यावरून आबा किती विद्यार्थी प्रिय आहेत हे लक्षात येते. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठवणेअसो वा सायंकाळी शाखेवर हजर करण्यासाठी आबा नेहमी तत्पर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची शिस्त लागली आहे. आबाच्या रूपात यमगरवाडी प्रकल्पाचा कर्तव्यदक्ष वसतिगृह अधीक्षक मिळाला आहे. अशा या व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
©विकास पांढरे, सा.विवेक मुंबई

सोमवार, ३ जुलै, २०१७

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव!




तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. संत तुकाराम महाराज यांनी आपल्यासमवेत 1400 वारकरी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आता याच वारीचे रूप दिवसेंदिवस वाढतच आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या दिंडयांची संख्या लक्षणीय होत आहे. या वर्षी राज्यभरातील तब्बल 331 संख्या सहभागी झाल्या आहेत.

देहू म्हटले की संत तुकोबाराय डोळयासमोर येतात. वारकरी संप्रदायातील त्यांचे स्थान अढळच आहे. त्यांच्या घराण्याची पांडुरंगावरची श्रध्दा पूर्वावर चालत आली आहे. पांडुरंगाने विश्वंभरबाबांना दिलेल्या दृष्टान्तातून विठ्ठलभक्तीचे महत्त्व लक्षात येते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सान्निध्याने पुनित झालेल्या देहू गावात असंख्य दिंडया सहभागी होऊन पंढरीकडे प्रस्थान करतात. देहू ते पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये 331 दिंडया सहभागी झाल्या आहेत. सोहळयाचे हे 332वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळयात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झालेले आहेत. देहू गावाच्या दिंडीचे स्वरूप, वारीची परंपरा, इतिहास, जोडणारे संत, व्यवस्थापन कसे असते? याविषयी घेतलेला धांडोळा...!

दिंडीचे स्वरूप

दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा समूह. महाराष्ट्र व बाहेरून अशा हजारो दिंडया एकत्र येऊन पालखी तयार होते. तशी प्रत्येक संतांची पालखी वेगळी असते. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायी पायी चालत जातात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक 'वीणेकरी' असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेकऱ्यानंतर टाळकऱ्यांचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे 5 ते 10पर्यंत ध्वज असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष, काही वेळा आख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होत आहे. ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात, त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात.

दिंडीचा इतिहास

पंढरीची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु, पंढरपूरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. याविषयी संतसाहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे एके ठिकाणी सांगतात - ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, तर त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची मिराशी होती. ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून पंढरीच्या वारीला जाण्याचा प्रघात होता. परंतु, पहिली दिंडी ही पंढरपुराहून आळंदीला आली आहे. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा मनोदय जेव्हा व्यक्त केला, तेव्हा संत नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार, नरहरी सोनार आदी संत मंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या गावाहून, म्हणजे पंढरपुराहून संत मंडळी माउलींच्या समाधी सोहळयासाठी आळंदीस आले. ज्ञानेश्वर माउलींच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता, पण दिंडी नव्हती. आता दिंडी सुरू झाली आणि ही पंढरपुरी पायी जाणारी मंडळी दिंडीत सहभागी झाली. त्या काळच्या साधू-संतांनी हा प्रघात चालू ठेवला. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर आदी संत परंपरेने हा पुण्यमार्ग वाढविला.

देहू संस्थानाचा इतिहास


धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटीवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. देहूला असे आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान लाभले आहे.

आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमच्या गावी आलो असल्याचे सांगून देव आंब्याच्या वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंब्याच्या वनात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल-रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात मूर्तींची स्थापना केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. प्रतिवर्षी देवाचा महोत्सव होऊ लागला. महोत्सवाच्या खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुध्द एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभरबाबांचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्रवृत्तीकडे वळले.

तुकाराम महाराजांची वारी

तुकोबारायाचे घराणे सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढयान्पिढया विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती, साव-सावकारकी, व्यापारधंदा होता. दोन वाडे होते. एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या अठव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्नीचा मृत्यू. ते घरदार सोडून संन्यासी झाले होते.

पुढे दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहत झाली. गुरेढोरे मेली. साव-सावकारकी बुडाली. व्यापार धंदा बसला. लोकांतील मानमान्यता गेली. प्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने मृत्यू झाला. त्यामुळे तुकोबाही एकांतात राहू लागले. भंडारा येथील डोंगरात पांडुरंगाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगदोध्दाराकरिता कवित्व करण्याचे काम सांगितले. पुढचा इतिहास आपणास ज्ञात आहे. गावातील विठ्ठल मंदिराचा जीर्णोध्दार केला.

संत तुकाराम महाराज आण्ाि हजरत महंमद शेख

श्रीगोंदा येथील हजरत महंमद शेख हे मुस्लीम विचारवंत होते. त्यांची आणि संत तुकाराम महाराजांची घनिष्ठ मैत्री होती. हजरत शेख महंमद हे कुरआन प्रवचन करायचे. त्याला संत तुकाराम महाराजांची आवर्जून उपस्थिती असायची. कुरआनचे कित्येक दाखले तुकारामांच्या गाथेत अभंग स्वरूपात सापडतात. त्यांची ही मैत्री त्यांच्या मृत्यूनंतरदेखील टिकून आहे. देहू गावातून निघणारी दिंडी आजही श्रीगोंदा येथे शेख महंमद यांच्या दफनस्थळी तीन दिवस मुक्कामाला असते, इतका हजरत शेख महंमद यांचा मान आहे असा काहीसा संदर्भ मिळत आहे.

तुका झालासे कळस

संतकृपा झाली, इमारत फळा आली

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस

संत ज्ञानदेव व नामदेव महाराज पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी अधिष्ठान दिले. नामदेव महाराजांनी संप्रदायाची खरी ओळख पंजाबपर्यंत पोहोचवली, तर तुकोबा महाराज या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले. तुकोबांनी आपल्या अभंगातून लोकांचे प्रबोधन केले. पंढरीच्या पांडुरंगांची त्यांनी भक्ती केली नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंगाला खडे बोल करणारे पहिले संत होत.

तुकोबांच्या वैकुंठगमनानंतरची वारी

तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली आणि त्यानंतर वारीच्या परंपरेची आणि सांप्रदायाची धुरा तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून 'ज्ञानोबा-तुकाराम' असे भजन करीत पंढरपूरला जाण्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली आणि वारीला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले. तेव्हापासून ज्ञानोबा-तुकाराम भजनाची निर्मिती झाली. आजतागायत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या नामघोषाने भजनपरंपरेची सुरुवात होते. पालखी सोहळा वाढल्यानंतर दोन्ही पालख्या विभक्त झाल्या. पुढे हैबतबाबा यांनी ज्ञानोबारायाची पालखी सुरू केली.

दिंडयांच्या संख्येत वाढ

संत तुकाराम महाराज यांनी आपल्यासमवेत 1400 वारकरी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आता याच वारीचे रूप दिवसेंदिवस वाढतच आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या दिंडयांची संख्या लक्षणीय होत आहे. या वर्षी राज्यभरातील तब्बल 331 संख्या सहभागी झाल्या आहेत. पालखी रथाचा मान यंदा वडगाव मावळ येथील बाबुराव वायकर यांच्या 'थैमान-संज्या' या आणि वाडे बोल्हाईच्या पंढरीनाथ तुकाराम पठारे यांच्या 'सोन्या-हिरा' या बैलजोडीला प्राप्त झाला आहे.

दिंडीचे व्यवस्थापन

वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातला अलौकिक असा हा वारीचा सोहळा जगाच्या कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. दिंडीचे व्यवस्थापन हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

दिंडीचा एक कार्यक्रम निश्चित केलेला असतो. पालखी निघण्यापूर्वी जेव्हा माउलींच्या पादुकांची पूजा केली जाते, तेव्हा पालखी निघण्याची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी पाच-दहा मिनिटांच्या अंतराने तीन वेळा कर्णा होतो. पहिला कर्णा झाला की वारकारी निघण्याच्या तयारीला लागतात. अशा प्रत्येक गोष्टीचे अचूक नियोजन करण्यात येत असते. दिंडीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्यासाठी आर्थिक व्यवस्थापन करणे आवश्यक असते. संत तुकाराम महाराजाची पालखी ही स्वयंपूर्ण आहे. धान्य, रॉकेल, सरपण, चहापान, दूध, कपडे, इतर वस्तू, हे सामान वाहून नेणाऱ्या बैलगाडीच्या व रथाच्या बैलास कडबा, पेढया, पेंड लागते. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली असते.


दिंडीतील चोपदार

चोपदार हा दिंडीचा मुख्य व्यवस्थापक. मखमली कापडाचा अंगरखा, डोक्यावर फेटा आणि खांद्यावर चांदीचा राजदंड, असा चोपदारांचा पोषाख असतो. व्यवस्थापनाची सर्व कामे तो करतो. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात परंपरेने चालणारी परभणीतील पाथरी तालुक्यातील माई दिंडी, बीडची कानसूरकर दिंडी आणि अंबेजोगाई येथील देशमुख दिंडी या तिन्ही दिंडयांचे चोपदार हे सोहळयातही प्रमुख चोपदार म्हणून सेवा देत आहेत. यामध्ये माई दिंडीचे ह.भ.प. काकामहाराज गिराम हे सेवा देत असून, त्यांची ही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील निवृत्तीमहाराज व आजोबा यांनीही सेवा दिली. कानसूरकर दिंडीकडून कानसूरकर सेवा देत असून, अंबेजोगाई येथील देशमुख दिंडीकडून देशमुख मंडळींची सेवा सुरू आहे. तर, काळूस येथील नारायण खैरे हे संस्थानचे चोपदार म्हणून सेवा देत आहेत. त्यांचीही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील शंकर लक्ष्मण खैरे यांनी चोपदारकी केली.

दिंडीतील वीणेकरी

वीणेकरी हा दिंडीतील प्रमुख. वारकऱ्यांना वीणा प्रिय आहे. 'तो' विठ्ठलाचे रूप आहे. ती वीणा असे वारकरी म्हणत नाहीत. 'तो' वीणा असे म्हणतात. दिंडी निघताना वीणेची पूजा करतात. विणेकरी विठ्ठल होतो. तो दिंडीचे नेतृत्व करतो.

दिंडीतील हरकरा

हरकरा म्हणजे काम करणारा हरकाम्या. दिंडीतील हरकरा पुढे पत्र घेऊन जातो. तो तेथील सर्व प्रमुख मंडळींना भेटतो. दिंडीचे आगमन, निवास, भोजन, कीर्तन, प्रवचन, पूजा, आरती व मिरवणूक अशा सर्व बाबींचे व्यवस्थापन करतो.

दिंडीतील रिंगण

दिंडीचा प्रवास सुरू असताना वारकरी थकतात. ही मरगळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी 'रिंगण' नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मेंढयाचे रिंगण, अश्वरिंगण, उभे रिंगण आदी रिंगण प्रकार होतात. हे ठरावीक गावातच होतात. उदा., अश्वरिंगण इंदापुरात होते. यात आधी झेंडेकऱ्यांचे, तुळशीधारक महिलांचे, विणेकरी व नंतर मानाच्या अश्वाचे रिंगण असा कार्यक्रम साधारणत: असतो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काटेवाडी गावात दाखल झाल्यावर पहिले रिंगण मेंढयाचे असते. या वेळी परीट समाजाकडून धोतराच्या पायघडया घालून स्वागत करण्याची परंपरा आहे. 136 वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

दिंडीचे बदलते स्वरूप

देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे दिंडीच्या बदलत्या स्वरूपाविषयी बोलताना म्हणाले, ''वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. इतक्या समूहाने समाज एकवटत आहे. त्याचे नेतृत्व करणारा एकमेव विठ्ठल आहे. ज्ञानोबा माउली आणि तुकोबा - एक या वारीचा पाया आहे, तर एक कळस आहे. एक ज्ञानाचा राजा आहे, तर दुसरा जगद्गुरू आहे. या वारीमध्ये तरुणांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वारीमध्ये असलेला तरुणांचा सहभाग आध्यात्मिकतेला वाव देणारा आहे.''

विकास पांढरे , 9970452767

शुक्रवार, ३० जून, २०१७

Vikas pandhare













काळी आई : काही प्रश्न

आज कृषी दिन म्हणजे आमचा दिवस. शेतकरी पुत्र म्हणून काळ्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्यच आहे आणि ती असायलाच पाहिजे. आज शेतीबाबतच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागल्या आहेत. शेती आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. सध्या गावाकडे खरीप पेरणी उरकली आहे पण काही दुर्मिळ बी-बियाणे नष्ट होत  असल्याचे चित्र आहे.
.......................................
उथळ व कुसळी गवताचा तालुका म्हणजे तुळजापूर. बोरी नदीमुळे काही भाग ओलिताखाली आला असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे काही प्रमाणात प्यायला पाणी मिळणे मुश्कील. भौगोलिक स्थिती, हवामान स्थितीचा विचार केला असता या भागात तूर,सोयाबीन, उडीद ही खरीप तर ज्वारी हे रब्बीचे मुख्य पीक घेतले जाते. या भागातील शेती ही संपूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. तंत्रज्ञान आणि रसायनिक खतांमुळे कुसळे नष्ट झाली ही चांगली बाब.
............................

शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं आहे. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात गार गार वार्‍याची, मातीला सुगंध देणार्‍या पहिल्या सरीची.. मी बघतो तसा आमची शेती पूर्णपणे शेतीवरच अवलंबून. पावसाळा सुरू झाला की खरीप पेरणीची लगबग असायची. या काळात सर्व जण पेरणीत अडकल्याने माझ्यावर शाळेला दांडी मारून जनावरांची राखण्याची वेळ यायची. पावसाळी दिवस.. धरत्रीचा हिरवा शालू..ससे,घोरपड, मोर,काळवीट, हरीण हे वन्यजीव बाहेर पडायचे.. त्यात जनावरांच्या गळ्यातील घंटीचा आवाज... आंब्याच्या झाडांवर खेळलेला सूर पारंबा... ओढ्याला आलेले मासे..ते पकडून केलेली पार्टी.. तळ्यात मनसोक्त पोहण्यातला आनंद औरच होता... राही जांभळ खाण्यासाठी शाळेला मारलेली दांडी.. मास्तराचा मार..
......................................

आमच्या शेताची खास बात म्हणजे साळी. साळीचं तीन पोते बी पेरणीसाठी लागयाचे. त्यासाठी आमच्या वडिलांची व काकांची महिनाभर राब चालयची. साळी म्हणजे तांदूळ. आमचं हे मुख्य पीक असल्याने सगळीजणे लक्ष द्यायचे. गावातही ८० टक्के शेतकरी साळी पेरायचे. आमच्या कुटुंबासह साळी, राळं ( भगरी सारखा पदार्थ) हुलगा, आंबडी, लहान कारळं, मठकी, जवस, तूर, तीळ आदी देशी बियाणाची पेर व्हायची.. देशी साळीचा भात आणि दुधाची चवच न्यारी होती. सकाळ व दुपार यावरच ताव मारायची. सोबत जवसाची चटणी, आंबड्याची भाजी असायची...
....................................
 गेल्या दहा बारा वर्षापासून साळीचे क्षेत्र आमच्यासह गावातील सर्व शेतकऱ्यांनी शून्यावर आणले आहे. हुलगा, जवस,लहान कारळं,आंबडी,राळं, बाजरी, मूग, हायब्रीड (महाबीज) तीळ ही धान्ये नामशेष झाली आहेत. लहानपणी ही सर्व पीके शेतात दिसायची. हुलगा तर केव्हाच बुडाला.... महाबीजची पिशवी म्हणजे आमचं शाळेचं दप्तर असायचं. पिशवी साठी आमच्या भावडाचं भांडण लागयचं. शालेय शिक्षण संपेपर्यंत महाबीजची पिशवी प्रिय असायची...
......................................

पारंपरिक शेतीत मिश्र पिके घेतली जात. पाऊसपाण्याने दगा दिला, हवामान बदलले तरी त्याचा फटका सगळ्या पिकांना बसत नसे. मिश्र पिकांमधील काही पिके त्यातही तग धरत असतं. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत नसतं.
...….......................
आंबडी,मटकी, कारळाची जागा सोयाबीन व उडदाने घेतली आहे. आज शेती क्षेत्रात बदल होत आहेत.योग्य पिकांची निवड आणि सिंचनाच्या काटेकोर पद्धतीवर लक्ष द्यावे लागत आहे.गेल्या अर्धदशकात स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचा तत्कालिक लाभ झाला. म्हणजे काही काळ कृषी उत्पादन वाढत गेले परंतु त्या पातळीवर ते दीर्घ काळ टिकून राहिले नाही. पारंपरिक बि-बियाणांची जाती-प्रजाती आपण नष्ट करून बसलो आहोत. यापुढे शेतीमध्ये शाश्वततेचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक आहेच शिवाय देशी बि-बियाणे टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
..............................
पत्रकारितेत आलो तेव्हा शेती विषयाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. सरकार कुणाचेही असो शेतीच्या सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या ज्वारी,डाळिंब व मराठवाड्यातील केशर आंब्याला केंद्र शासनाचे जीआय मानांकन मिळाले. तेव्हा या तीन्ही बातम्या दिलेल्या महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार असल्याचा मला अभिमान वाटतो.भविष्यात ही सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
( टीप : वरील उपस्थित झालेले प्रश्न माझे वैयक्तिक व गावापुरते मर्यादित आहेत.)

  ©विकास पांढरे, सा.विवेक, मुंबई
९९७०४५२७६७





सोमवार, २६ जून, २०१७

माणदेशी शेतकरी कन्या





सध्या पावसाळी दिवस असल्याने जिकडे तिकडे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे बळीराजा शेतीची मशागत करून काळया आईची ओटी भरताना दिसतोय. अशातच सध्या एक छायाचित्र सामाजिक माध्यमातून सर्वत्र व्हायरल झालंय. हे चित्र पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटतं, शिवाय एक शिकलेली पोरगी चक्क दोन बैलांचं औत ओढताना पाहून ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही, इतके जिवंत चित्र आहे. सतत दुष्काळात होरपळत असलेल्या माण तालुक्यातील गटेवाडी इथे बारावीत शिकत असलेल्या मनीषा खरात हिची ही कहाणी..

माणदेश म्हटलं की डोळयासमोर येतो तो दुष्काळ, दूरदूरपर्यंत ना झाडं दिसतं, ना सावली, ना पाणी, ना बागायती शेती.. दिसतं फक्त कुसळी गवत, शुष्क माळरान अन माळरानावर चरणाऱ्या मेंढया. थोर ग्रामीण साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी 'माणदेशी माणसं' या आपल्या कथासंग्रहातून माणदेशी माणसांचं आणि प्रदेशाचं रसभरित वर्णन केलं आहे. त्याचबरोबर माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या कादंबरीची नायिका शकू जशी आपल्या मेंढया सांभाळून शेती करते, अगदीअशाच प्रकारचं वास्तववादी चित्र माण तालुक्यातील गटेवाडी इथल्या मनीषा खरात हिच्या बाबतीत घडलंय. साधारण चौदाशे लोकवस्तीचं गाव.. गावात पाणी नाही, पाणी नाही म्हणून शेतीवर अवलंबून राहता येत नाही, शिकून मोठं व्हावं असं ठरवलं तर शिक्षण घेता येत नाही.. अशीच परवड मनीषा खरात हिच्या वाटयाला आलीय. मेंढीपालन हाच मनीषाच्या कुटुंबाचा व्यवसाय. गावात वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतात विहीर आहे, पण पाणी नाही. पावसाळयात विहिरीला पाणी असतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे खरात कुटुंबीयांना शेळया-मेंढयांवर गुजराण करावी लागते. काळ बदलला असला तरी खरात कुटुंबीयांचं मेंढयावरचं जिणं मात्र काही थांबलं नाही. आपल्या पोराबाळांना चांगलं शिकवावं अशी त्यांची मनीषा आहे. त्यासाठी ते जिवाचं रानं करताहेत..

ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता या गावाहून त्या गावाला सतत स्थलांतर करणाऱ्या खरात कुटुंबाने आपल्या पिलांना गावात जरी ठेवलं असलं, तरी त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करणारी ऊर्जा दिलीय. अशा या वातावरणात चुणचुणीत दिसणारी मनीषा आपल्या लहान भावंडांसह आजी-आजोबांजवळ राहते. मनीषाला दोन बहिणी व एक लहान भाऊ आहे. मनीषा सगळयात मोठी. घरातील काम असो वा शेतातलं, ती मोठया मेहनतीने करते. शिक्षणातही ती कमी नाही. दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिने 73 टक्के मिळवले आहेत. यंदा ती दहिवडी येथील कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. मेहनती, अभ्यासू व गुणवान विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये तिचा लौकिक आहे.

तिचे आई व वडील भीमराव खरात हे सध्या शेंळया-मेंढया घेऊन बाहेरगावी गेले आहेत. विशेषतः इथली माणसं मेहनती आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या या मंडळींना घराकडे व आपल्या काळया आईकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मनीषा खरातच्या घरातही हीच परिस्थिती आहे.

आई व वडील भीमराव हे अनेक महिन्यांपासून घरापासून दूर राहत आहेत. त्यामुळे शेतीची मशागत झाली नाही. यंदा वरुणराजाने लवकर हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी झाला असला, तरी वर्षानुवर्षं दुष्काळाच्या छायेत वावरत असलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करत असलेल्या खरात कुटुंबातील मनीषासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं - आपली पेरणी कोण करणार? मशागतीला उशीर झाला, तर पेरणीला विलंब लागेल; अशातच आई-वडिलांना गावाकडे यायचं झालं, तर त्यांना खूप उशीर होईल... असे अनेक प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. अशा वेळी काळया आईची ओटी भरणं आवश्यक आहे, असं तिला मनोमन वाटू लागलं. क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या नातेवाइकांकडे गेली. आपल्या घरात कर्ता माणूस नसताना, शेताची मशागत करण्यासाठी तिने बैलजोडीची मागणी केली. मनीषावर असलेल्या नातेवाइकांच्या विश्वासामुळे त्यांनी बैलजोडी दिली. त्या मिळालेल्या बैलजोडीचं तिने सोनं केलं. मनीषाने स्वतः बैलजोडी व अवजारं घेऊन औत मारायला सुरुवात केली. जवळपास दोन ते तीन एकर शेत तिने मशागत करून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली. आजूबाजूचे लोक मनीषाच्या कर्तबगारीकडे पाहून तिची पाठ थोपटत होते. शिकलेली मुलगी औत मारत असल्याची चर्चा माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे मनीषा खरात हिची सामाजिक माध्यमांत चर्चा होत आहे. तिच्या जिद्दीची कहाणी नवतरुणांना चेतना देणारी आहे.

कुठून मिळते त्यांना ही ऊर्जा?


आज शेती क्षेत्रात विविध संकटं निर्माण झाली आहेत. त्यातच शेतकरी कर्जमाफीवरून असंतोषाचं वातावरण निर्माण झालं असताना माणसारख्या दुष्काळी भागात एक सुखद बातमी येते. आजच्या काळातील मुली शाळा आणि घर यामध्ये बंदिस्त असताना बारावीत शिकत असलेली हुशार मुलगी बैलजोडी घेऊन शेतीची मशागत करते, ही गोष्ट प्रेरणा देऊन जाते. खेडयातल्या या मुलीमध्ये इतकी संवेदनशीलता व ऊर्जा कुठून मिळते, हा एक संशोधनाचा भाग आहे. मनीषा खरातसारखी मुलगी भारतीय कृषी क्षेत्राला ऊर्जा देणारी आहे. तिच्या कर्तबगारीला सलाम तर केलाच पाहिजे, शिवाय कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी मनीषासारख्या मुलींना पाठबळ दिलं पाहिजे.

शेती क्षेत्रातील कर्तबगार महिला

चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त असलेली महिला आज विविध क्षेत्रांत झेप घेत आहे. पारंपरिक व्यवसाय असलेल्या कृषी क्षेत्रात महिला क्वचितच उतरत आहेत. मनीषा खरात ही त्यातीलच. त्यांची शेती जरी पारंपरिक असली, तरी पुरेशा पैशाअभावी त्या आधुनिक पध्दतीने शेती करू शकत नाहीत. आज महाराष्ट्रात शेती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कर्तबगार महिला आहेत.

मेहनत, कुटुंबातील सुसूत्रता, मार्गदर्शन घेत पुढे जाण्याचा ध्यास घेत नगर जिल्ह्यातील महिला शेतकरी मंगल शंिदे यांनी आपल्या 10 गुंठयातील शेतीत रोपवाटिका तयार करून त्या सुमारे साठ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करतात.


चंद्रपूर जिल्ह्यात जागृत महिला समाज ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये सेंद्रिय शेती, पाणलोट क्षेत्रविकास, स्वावलंबन गट, सिंचनव्यवस्था, जीवविविधता आदी क्षेत्रांत प्रयोग करीत आहे. या भागात या शेतकरी महिलांनी जवळपास अकरा महसुली गावांतील शेतकरी महिलांमध्ये आत्मभान निर्माण केलं आहे. यामुळे हजारो महिला शेतकऱ्यांनी कुटुंबांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारून जमीन धारणा, सिंचनाची साधनं, खत, पशुधन, पीकपध्दती, शेतीवर होणारा खर्च व मिळणारं उत्पन्न, तसंच पूरक व्यवसाय या संदर्भात अभ्यास केला आहे. कणकवली तालुक्यातील भातडेवाडी येथील श्री कुर्ली देवी महिला बचत गटाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन गटाच्या महिलांनी भात व नाचणी शेती केली आहे. बचत गटातील दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गावातील पडीक जमीन भाडयाने घेऊन शेतीत बदल घडवून आणला आहे.

शेतीत महिलांचा पुढाकार महत्त्वाचा

आपल्या देशात शेतीकामात महिलांचा 70 ते 80 टक्के सहभाग आहे. नांगरणी, ट्रॅक्टर, बैलजोडी, शेती विकणं, पाणी वळवणं, व्यवहार ही पुरुषांची कामं, तर महिलांची कामं म्हणजे निंदणी, वेचणी, काडी-कचरा, बी-बियाणं लावणं, चारापाणी करणं आणि घरातील कामं करणं. पण आज महिलांनी यात पुढे येणं गरजेचं आहे. आज शेतीतलं संकट हे शेतात काम करणारी महिला समजू शकते आणि तिच्या आवडीनिवडी, कौशल्यावर तिला शेती क्षेत्रातलं ज्ञान आणखी विकसित करता येईल. त्यामुळे महिला शेतकरी शाश्वत शेतीकडे नेणारी एक महत्त्वाची कडी आहे.


''शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास करणार!''


देशाच्या अर्थकारणात एकेकाळी शेतीचा पहिला नंबर लागत होता. देशात हरितक्रांती व श्वेतक्रांती झाली असली, तरी शेतीचा म्हणावा तितका विकास झाला नाही. शेतीची झालेली पीछेहाट काय हे मी समजून घेईन. काळानुरूप शेतीचा विकास करण्यावर माझा व माझ्या कुटुंबीयांचा भर असेल. एक मुलगी म्हणून शेती करण्यात कसलीही लाज वाटत नाही. सध्या मी बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत आहे. पुढे चांगले गुण मिळाल्यास पदवीसाठी शेती व अर्थकारणाचा अभ्यास करणार आहे. सध्या आपल्या राज्यात शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी सरकार वेगवेगळया धोरणांचा विचार करत आहे. सरकारने गरजू व गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.

- मनीषा खरात

माणदेशी शेतकरी कन्या

विकास पांढरे,९९७०४५२७६७


गुरुवार, २२ जून, २०१७

कर्जमाफीचे परिणाम आणि राजकीय फायदे


मराठवाडयापेक्षा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे. म्हणजे प. महाराष्ट्रातला शेतकरी हाच या सरसकट कर्जमाफीचा जास्त हिस्सेदार असणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करण्यास विरोधकांना आणखी संधी मिळणार आहे. या कर्जमाफीमुळे सरकारवर 25 ते 30 हजार कोटीचा भार पडणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यासाठी व आपला विकास करण्यासाठी शाश्वत असा आधार शोधला पाहिजे, त्यासाठी  कृषिक्षेत्रातील नवी संकल्पना, तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, तरच शेतकरी आणखी जगाला तारणारा ठरेल....

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चाधिकार मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना जलदगतीने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देण्याबरोबरच दोन दिवसांत दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेतला. यूपीएच्या काळात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली होती. आतापर्यंत 5 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? त्यांच्या वेदनेपासून ते दु:खापर्यंत कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही, हे जाणकारांना माहीत आहे.  शेतीचे अर्थकारण कोलमडून पडण्याची कारणे काय आहेत, याचा शोध पुरेशा गांभीर्याने आजवर घेतला गेलेला नाही. केवळ सिंचन प्रकल्पांचा नीट पाठपुरावा झाला असता, तरी महाराष्ट्राचे चित्र बदलले असते. शेतीचे प्रश्न हे पाण्याशी निगडित आहेत, तसेच ते उत्पादन, वितरण, हमीभाव याच्याशी संबंधितही आहेत. कर्जमाफीच्या उपाययोजना तात्पुरत्या मलमपट्टीसारख्या आहेत.  कर्जमाफीबाबत फायदे, तोटे यांची चिकित्सा झाली पाहिजे.

राज्यात पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण, संभाजीनगर या कृषी विभागात 31 मार्च 2016 पर्यंत शंभर टक्के कृषी पतपुरवठा करण्यात आला. यामध्ये पुणे 30 टक्के, नाशिक 19 टक्के, संभाजीनगर 23 टक्के, नागपूर 11 टक्के, कोकण 5 टक्के पतपुरवठा करण्यात आला. यावरून पुणे आणि नाशिक विभागांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मुळात नाशिक व पुणे विभागातील सधन शेतकऱ्यांनी आंदोलनाची धग वाढवली. सामान्य शेतकरी आंदोलनात सहभागी होता का? हा संशोधनाचा विषय आहे.

विदर्भ व मराठवाडयातल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा मिळणार नाही, हे आकडेवारीवरून सिध्द होते. 2008 साली झालेल्या कर्जमाफीप्रमाणे याही वेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांना सरासरी एकरी 14000 रुपयाचे पीक कर्ज बँका देतात. याउलट नाशिक, पुणे विभागातील बागायतदार शेतकऱ्यांना सरासरी 2.5 ते 3 लाख रुपये कर्ज बँकाकडून मिळते. विदर्भ व मराठवाडयापेक्षा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे. म्हणजे प. महाराष्ट्रातला शेतकरी हाच या सरसकट कर्जमाफीचा जास्त हिस्सेदार असणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करण्यास विरोधकांना आणखी संधी मिळणार आहे. या कर्जमाफीमुळे सरकारवर 25 ते 30 हजार कोटीचा भार पडणार आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जे एक लाख 34 हजार कोटी रुपयांच्या घरात असून ती माफ करणे कोणत्याही सरकारला शक्य नसते. फडणवीस सरकारने राज्यावरचा होणारा आर्थिक भार उचलत ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली आहेत. शेतकरी कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. या मलमपट्टीने जखम जरी बरी होत असली, तरी वेदना मात्र ठसठसत राहत असते.  

कर्जमाफीचे होणारे परिणाम

1)  कर्जमाफी हा सरकारी लाभ असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट लाभ द्यावा लागतो. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची स्थिती चांगली असेल, तरीसुध्दा त्याचे कर्ज माफ होते.

2) कर्ज न फेडण्याची घातक सवय लागते. सध्या अनेक शेतकरी बँकाकडून पीक कर्जाच्या नावाखाली लाखो रुपयांचे कर्ज घेतात, मात्र परतफेड करण्यासाठी त्यांचे मन धजावत नाही, अशी उदाहरणे प. महाराष्ट्रात पाहायला मिळतील. याचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसतो. सरकार आपले कर्जमाफ करते तर मग पैसे कशाला भरायचे? अशीही काही शेतकऱ्यांची मानसिकता बनत चालली आहे. असे लोक स्वत: संकटात नसले तरी कर्जमाफीचा लाभ मात्र उचलत असतात.

3) कर्जमाफीचा तिसरा परिणाम म्हणजे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या समस्येवर कोणताही इलाज होत नाही. शेती आणि शेतकरी जगावयाचा असेल तर राजकीय आवेश बाजूला ठेवून दीर्घकालीन व परिणामकारक ठरेल असे धोरण निश्चित केले पाहिजे.

4) अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे सामान्य शेतकरी हतबल होतो. पीकपाणी चांगले नाही, तर आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो. त्यामुळे कर्जमाफीच्या कुबडयांकडे सर्वांचे लक्ष लागते.

5) कर्जमाफीचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे महागाई. सरकारवरचा अतिरिक्त भार कमी करायचा असेल तर इतर वस्तू महाग होतात. अस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांची कर्जे थकलेली असतात. पुन्हा कर्ज घ्यायचे असेल तर बँका काहीतरी त्रुटी काढून कर्ज देण्याचे टाळतात.

कर्जमाफी आणि राजकीय फायदे          

कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीसह काँग़्रेस व राष्ट्रवादी पुढे सरसावले आहेत. विरोधकांसह शेतकरी नेत्यांची आता राजकीय महत्त्वाकांक्षा जागी होत आहे. राज्य सरकारने 'सरसकट' कर्जमाफी केल्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरसकट, तत्त्वत: आणि निकष या तीन गोष्टींवर आक्षेप घेत राजकीय चाल खेळली आहे. 'सरसकट' म्हणजे त्यांना आपल्या भ्रष्टवादी पक्षातील नेत्यांची कर्जमाफी व्हावी, अशी अपेक्षा तर व्यक्त केली नाही ना? पवारांनी या कर्जमाफीचा जास्तीत जास्त राजकीय फायदा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. आपल्या संघर्ष यात्रेमुळे ही कर्जमाफी मिळाली असल्याचा आव आणून काँग्रेस व राष्ट्रवादी पध्दतशीरपणे राजकीय फायदा उचलत आहे. आ. बच्चू कडू आसूड यात्रेतून कर्जमाफी मिळाली असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे कडू हे आगामी काळात राजकीय दवाबगट निर्माण करतील.

मुळात शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दवाब टाकला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण, त्यातील विसंगती व वास्तव  याचे चित्र डोळयापुढे उभे ठेवले, तर विरोधकांनी निव्वळ राजकारण कसे केले हे लक्षात येते. स्वाभिमानी राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही रस्त्यावर उतरले. जे सरकार साठ वर्षे होते, त्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वातानुकूलित गाडीत बसून संघर्ष यात्रा उभारली. सत्तेतल्या शिवसेनेनेसुध्दा कर्जमाफीचा राग मनात धरून भाजपाविरुध्द षड्डू ठोकले. मात्र त्यामागे शेतकरीहितापेक्षा राजकारणच प्रबळ असल्याचे दिसून आले. खरे म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा भावनिक न बनविता वास्तव निकषावर त्याचा विचार केला पाहिजे होता. पण मंत्रिगटाच्या उच्चाधिकार समितीतील सदस्य व सेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी बैठकीवरून आपल्या 'नाटयछटा' दाखवून दिल्या.

शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या सदस्यांत सुंदोपसुंदी सुरू आहे. डॉ. गिरीधर पाटील हे समितीच्या कारभारावर व निर्णयावर नाराज आहेत. त्यामुळे सुकाणूतील सदस्य हे राजकीय फायद्यासाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. शेतकरी संपात विरोधकांनी सूडबुध्दीचे राजकारण केले. सरकारला उघड विरोध करणारे राजू शेट्टी व शिवसेना नेहमीच सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देत असतात. आता कर्जमाफी मिळाली आहे, त्यामुळे हे आगामी काळात काय रणनीती आखतात, हे पाहणे आवश्यक आहे.

कर्जमाफी होईपर्यंत दहा हजाराची मदत

सध्या राज्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. खरीप पेरणीची राज्यात लगबग सुरू आहे. गेल्या वर्षी अस्मानी संकटामुळे खरीप वाया गेले होते. यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला गेला असला, तरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यांना दिलासा देण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. सर्व मंत्र्यांनी यास सहमती दर्शविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाने शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करता येणार आहे.

बळीराजाला चार टक्के दराने पीक कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी बळीराजाच्या पाठीशी असल्याची आणखी एक कबुली म्हणजे आता शेतकऱ्यांना केवळ चार टक्के दराने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्पभूधारकांना शेतमालाच्या साठवणीसाठीही स्वस्त दराने कर्ज देण्याची योजनाही मंत्रीमंडळाने मंजूर केली. या योजनेनुसार हंगामानंतर तयार होणारा शेतमाल 'गोदाम विकास व नियमन प्राधिकरणा'ने प्रमाणित केलेल्या गोदामात सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवण्यासाठी अशा शेतकऱ्यांना बँकांकडून 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. या नऊ टक्क्यांपैकी पाच टक्के व्याज सरकार भरणार आहे.

शेतकऱ्याच्या कृषिकर्जाचे, नैसर्गिक आपत्तीमुळे मुदतीत परफेड होऊ न शकल्याने, पुनर्गठन करावे लागल्यास अशा पुनर्गठित कर्जाच्या रकमेवरील व्याजातही पहिल्या वर्षात केंद्र सरकार दोन टक्क्यांचे अनुदान देण्यात येणार आहे. अल्प - व अत्यल्पभूधारकांना शेतमाल तयार झाल्यावर त्याला चांगला भाव येईपर्यंत वाट पाहण्याची ऐपत नसते, कारण त्यांना लगेच पैशाची गरज असते. परिणामी ते आपला शेतमाल तयार झाला की बाजारभाव पडेल असला तरी विकतात किंवा पैशाची तातडीची निकड भागविण्यासाठी खासगी सावकारांकडून भरमसाठ व्याजदराने कर्ज घेतात. अशा अडचणीत सापडणाऱ्या अल्प- व अत्यल्पभूधारकांना शेतमालाच्या साठवणीसाठीही स्वस्त दराने कर्ज देण्याची योजनाही मंत्रीमंडळाने मंजूर केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सारांश

कर्जमाफी हा शेतीसमस्येवरील अंतिम उपाय नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनीच बदल घडवून आणला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पुत्र चौधरी चरणसिंह असोत, देवीलाल असोत वा शरद पवार असोत अथवा शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे महेंद्र सिंह टिकैत असोत की शरद जोशी आदींना शेतकऱ्यांच्या समस्या दूर करणे कधी जमले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली, तरी संपूर्ण समस्या सुटणार नाही. मात्र सामान्य शेतकऱ्यांला दिलासा मिळाला आहे. श्रमप्रतिष्ठेला आलेली अवकळा दूर होऊन शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण कृषिनिष्ठ संस्कृती जोपासली तरच जग जगणार आहे.


मोदी सरकारच्या धोरणावर स्वामिनाथन समाधानी

'हरित क्रांतीचे जनक' अशी ख्याती असलेले कृषितज्ज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर कर्जमाफी देणे तात्पुरते गरजेचे असल्याचे सांगून दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा खूप चांगला पर्याय नाही, कर्जमाफी केल्यास सरकारकडून बँकांनाही नुकसानभरपाई मिळते, असेही मत डॉ. स्वामिनाथन यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय कृषी आयोगाने सुचविलेल्या अनेक शिफारशी मोदी सरकारने राबविल्या आहेत, असे स्वामीनाथन यांनी ट्वीट केले आहे. सुधारित बियाणे, मृदा परीक्षण पत्रिका, सुधारित विमा या शिफारशी राबविण्यात आल्याचे स्वामिनाथन म्हणतात.

कृषी विद्यापीठांद्वारे ग्रामीण महिलांच्या कौशल्यवृध्दीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबतही स्वामिनाथन यांनी समाधान व्यक्त केले आहे. कृषी कर्जमाफी आणि भविष्यातली कृषिक्षेत्रातल्या पायाभूत सुविधा सुधारण्याबाबतही संतुलन साधल्याबाबत स्वामिनाथन खूश झाले आहेत.
विकास पांढरे,
9970452767


कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...