मंगळवार, १० मार्च, २०२०

माझ्या जन्माची कहाणी - भाग 3


तो दिवस आजही मला स्पष्टपणे आठवतोय. त्या दिवशी घरात एक नवीनच असा प्रसंग घडत होता. तो आमच्या वाट्याला कधीही असा आला नव्हता.. त्या प्रसंगाने आई आणि नानाच्या चेहर्‍यावर ‘हसू आणि अश्रू’ हे दोन्ही भाव दाटून आले होते. घरातला एक आर्थिक कोपरा ढासळू पाहत होता. नाना पहिल्यांदाच घरात असं येरझार्‍या मारत होता... नानाच्या पायाला पाणी सुटलं होतं..घराच्या भिंती ओल्या झाल्या होत्या. सारखं ट्रगतलं कागद शोधत होता.. त्या ट्रगतले छोटे छोटे कागद काढत होता.. पण एक कागद सापडत नव्हता म्हणून आतून चिडत होता..
त्या कागदाच्या माध्यमातून आपण घरातली एक मौल्यवान वस्तू विकतोय या विचारानं नाना एकदम बैचेन झाला होता.. या सगळ्या प्रसंगामुळे आमच्या रोजच्या जगण्यातले क्षण विखुरले गेले होते.. त्याला कारण ही मीच होतो..
****

माझ्यामुळे आई आणि नानाला खूप वनवास सोसावा लागला. मी लुळा होऊन पडलो होतो.. माझा इलाज व्हावा म्हणून नाना रोज एका दवाखान्यात जात होता.. आठवड्यातून तीन-चार वेळा सोलापूरला नाना मला घेऊन जात असे.. डॉक्टर माझी नाडी बघत, आणि पैसे उकळत.. हे रोजच होत चाललं होतं.. माझ्यात कसलाही फरक जाणवत नव्हता. ‘आपलं पोरगं आज ना, उद्या तुरूतुरू चालेल, उठेल!’ या आशेने नाना दवाखान्याला पाण्यासारखा पैसा ओतत होता..

डॉक्टर म्हणायचे, ‘मुलगा बरा व्हायचा असेल तर त्याच्या पायाचे ऑपरेशन केलं पाहिजे. त्यासाठी दहा-पंधरा हजार रूपये लागतील..’ 

डॉक्टराचे म्हणणे ऐकून नानाची कंबर बसली होती. एवढे पैसे आणायचे कुठून? शेतीचा काही आधार नव्हता..ना कुठल्या रोजगाराचा.. ना घरात कुणी कमावत.. पै-पाहुणे ही मदतीला धावून येतील अशी त्यांची ही परिस्थिती नव्हती.. आता काय करावे? या विचाराने नाना अधिकच चिंतेत पडला होता.

दुपार झाली होती.. माथ्यावर आलेला सूर्य अधिकच चटका देत होता..दावणीला बांधलेली जनावरं हंबरंडा फोडायला लागली होती. जनावरांना चारापाणी करून येतो, म्हणून नाना, शेताकडे गेला.. जनावरांना लवणाला पाणी पाजून, त्यांना चिंचेच्या झाडाखाली बांधली. नानाच यात कशातच मन लागत नव्हतं. शेवटी घराकडं घासभर खाऊन येण्यापेक्षा आंब्याच्या झाडाखाली येऊन बसला.

दिवस मावळतीला आला.. रानात चरायला गेलेली गुरे-ढोरे गावाच्या दिशेने निघाली होती.. नाना मात्र माझ्याच विचारात गुंग होता. या विचाराच्या तंद्रीने नानाला अस्वस्थ करून टाकलं होतं.

गावातल्या सावकाराला एकरभर शेत विकायचं आणि माझं ऑपरेशन करायचं! असं नानाच्या मनात घोळू लागलं. पदारात चार लेकरं आहेत.. पुढं त्याचं कसं व्हायचं?  शेवटी काही तरी केलेच पाहिजेच ना.. हा इचार सतत नानाला भेडसावत होता.

आपली 'शेतीमाय' इकायची नाही, असं  दुसरं मन ही नानाला सावरत होतं. मागचा-पुढचा इचार करत नाना मोठ्या कष्ठानं घेतलेलं दुर्गाच्या (नळदुर्ग) तुळजाभवानी साखर कारखान्याचं ‘शेअर्स’ विकायचं मनात ठरवलं. नानाला हा इचार पटला हेाता. यातून आपलं काही मोठं आर्थिक नुकसान होणार नाही. असे मनोमनी नानाला पटले. यामुळे नानाला मोठा धीर आला होता.

सांज झाल्यावर नाना घराकडं आला.. आई चुली समोर बसून काठवटीत भाकरी थापत होती. ती कोरडं पिठं पसरून दोन्ही हात काठवटीत गोल गोल फिरवत बडबड करत होती.

कवा आलावं? ‘कायबी करा माझं पोरंग चांगलं करा...’
नानाचा चेहरा हळवा झाला होता..  ‘माझ्या चितेला अग्नि देती का आता?’  ‘मला काय समजत नाय? रानात गेलो तर,तिथं मन लागतं नाय? माळावर जनावरं राखायला घेऊन गेलो की तिथं बी करमत नाय?’   ‘पोराचं कसं होईल? हाच इचार मनाला सतावत हाय?’ 
नाना गहिवरून म्हणाला..

नानाचं आणि आईचं थोडं ‘तू तू मैं मैं झाली..’

मी कारखान्याचं शेअर्स इकायचं ठरवलंय?  गावात कुणी शेअर्स घेतं का बघून येतो. नानाच्या मनाच्या मोठेपणाचं आईला कौतुक वाटलं. आपल्या पोराच्या सुखासाठी बापाचं काळीज सुपाएवढं झालेलं पाहून आईला मनोमन आनंद झाला होता.
***

नानाला, ना दारूचे व्यसन होते ना, कसल्या विकाराचे..पण माझ्यामुळे नानाला चितेंच्या विकाराने ग्रासले होते. आपण शेअर्स विकतोय? यात कोणी फसवणुक करू नये? यासाठी सल्लामसलत म्हणून जाणत्या माणसाकडे जाऊन विचारपूस केली. आपण 'शेअर्स' विकतोय कारणामुळे नानांनी पाच-सहा रात्री जागून काढल्या असतील.

नानाची अशी धावपळ सुरू झाली होती, दरम्यान एक दिवस आमच्या शेताच्या बाजूल्या असलेल्या एका कारखान्याच्या मालकाला आमच्या घरची होणारी तारांबळ लक्षात आली. नानाची आणि त्या मालकाची अगोदरपासून ओळख होती. दुपारच्या वेळेस त्या मालकांनी नानाला ऑफिसमध्ये बोलवून घेेतले. मालकांनी माझ्या पायाची विचारपूस केली. त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल निश्‍चित राहा, असं बोलून,  मालकांनी नानाला धीर दिला.

मालकाच्या धीराच्या बोलण्याने नानालाही थोडं बरं वाटलं. 
दत्तोबा, ‘तुमची परिस्थिती लक्षात घेता मी शेअर्स घ्यायला तयार आहे.’, असं मालक म्हणाला.

 नानाला, शेअर्स विकतोय? हे मालकाला कोणी सांगितलं? याचा थांगपत्ता लागला नाही. आपल्या संकटात, देवच आपल्यासाठी धावून आला. या विचाराने नानांनी मालकाला शेअर्स विकत असल्याचा होकार दिला.

‘सध्याची शेअर्सची किंमत पाहता मी दहा हजार रूपये द्यायला तयार आहे.’, असं तो मालक म्हणाला.
नानाला ही रक्कम कमी वाटली.

‘मालक दहा हजार रूपयांत पोराचं ऑपरेशन कसं होणार? सोलापूरचे डॉक्टर म्हणतायेत,  ऑपरेशनसाठी कमीतकमी पंधरा हजार रूपये लागतील.’ असं नाना मालकाला म्हणाला.

मालक म्हणाला, दत्तोबा, ‘तुम्हाला एवढे पैसे कोणी देणार नाही. तुमची नड पाहून मी तुम्हाला जास्तीचे पैसे देतोय. त्यापुढे मला जास्त किंमत देता येणार नाही.’

नाना या गोष्टीला तयार होत नव्हता. त्यासाठी मालकानी नानाला आपल्या स्वतःच्या कारने सोलापूरला घेऊन गेला. नानाला माझ्या पायाच्या ऑपरेशनसाठी ओळखीच्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचे आश्‍वासने दिले. त्यामुळे नानाला थोडा धीर आला.
नानाचा बदलेला मूड लक्षात येताच मालकाने एक संधी साधली.

दत्तोबा, ‘‘शेअर्स विकून काय होणार नाही. तुझं साळीचं तुकडं मला विक..पाच-पन्नास हजार सहज देईन. तुझी, यातून सहज गरज भागेल.. शिवाय शिल्लक राहिलेल्या पैशातून घरासाठी काही करता येईल?'’

नानाला मालकाचा हा 'भांडवली डाव' लक्षात आला. संकटात असलेल्या माणसाचा 'धुर्त माणसं' कसं फायदा उचलतात, हे नानाच्या लक्षात आले.

‘‘मालक आम्ही गरीब असलो, म्हणून काय झालं? आता आमची नड हाय,म्हणून कारखान्याचे शेअर्स इकतोय. कारखान्याकडून हा शेअर्स घेताना मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. डगमगलो नाही, मी खरा शेतकरी आहे. शेती आमची माय आहे. या मायेला तुमच्या स्वाधीन करणं माझ्या इचारत नाय. तुम्ही माझं शेअर्स विकत घ्या अथवा न घ्या. मला त्याची पर्वा नाय.. मी दुसरा चांगला माणूस शोधतो.. तो घेईल माझं शेअर्स..’’

नानांची ही खंबीरता लक्षात आल्यानंतर त्या मालकाने आपला विचार बदलला आणि शेअर्स घेण्यासाठी स्वतःहून नानांपुढे विणवणी करू लागला. नानाचा स्वभाव दिलेला शब्द पाळणारा होता. रितसर पध्दतीने नानांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले ‘शेअर्स’कवडीमोलाने त्या मालकाच्या घश्यात घातले.

नाना मनातल्या मनात पुटपुटत होता, कस काय? आपण या मालकाच्या साखळीत अडकलो हे कळलेच नाही? आयुष्यात 'परवड' झालेल्या माणसाला कोणकोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. हे ह्या प्रसंगावरून नानाच्या लक्षात आलं होतं.

माणसाला आपलं मिळालेलं आयुष्य गोड मानून 'तडजोड' करत जगता आलं पाहिजे, असं म्हणतं नानांनी त्या मालकासोबत ‘शेअर्स' बद्दलचा व्यवहार पूर्ण केला. आज त्या शेअर्सची किंमत 'लाखात' आहे, असं थोडं लक्षात आलं की मागचं सारं आठवतं राहतं.
(अपूर्ण )
विकास पांढरे -९९७०४५२७६७

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कष्टाची कमाई


स्व.मोहन धारिया यांच्या 'वनराई' संस्थेला भेट देण्याचा योग आला. दुपारची वेळ.. वातावरणात थंडी जाणवत होती.. वनराई बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या नाल्याच्या कोपऱ्यात चप्पल दुरुस्तीचे काम करीत असलेल्या महिलेवर नजर गेली. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातले हे दृश्य पाहून कुतूहल निर्माण झाले. चप्पल शिवणे हे खरे तर पुरूषांचे काम पण जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीही नाही हे या महिलेने दाखवून दिले आहे. मंजुषाताई कैलास रावखंडे असे या महिलेचे नाव आहे.
गोरा रंग, कपाळावर कुंकू, काळेभोर डोळे असलेल्या मंजुषाताईचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. मंजुषाताईंच्या घरात चप्पल शिवणे परंपरेने चालत आले आहे. त्यामुळे घरातल्या माणसांकडून त्यांना या व्यवसायाची आवड निर्माण झाली. व्यवसायातील बारकावे त्यांना शिकता आले. यानिमित्ताने मंजुषाताईंची जीवनाची कहाणी थोडक्यात का होईना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मंजुषाताई सांगत होत्या.. "माझं शिक्षण सातवी पर्यंत झालं. पुढं शिकावं वाटत होतं पण तसं घडलं नाही!"
"आम्ही मुळचे सातारचे. मंगळवार पेठेत आमचं घर आहे." सासऱ्यानं पोटासाठी पुण्याची वाट धरली. पर्वती दर्शन शेजारी सासऱ्यानं घेतलेलं घर आहे आम्ही तिथेच राहतो.. नवरा ड्रायव्हर आहे. चपलाचा व्यवसाय करणे त्यांना जमलं नाही.. त्याला आजची परिस्थिती कारणीभूत आहे."

" पूर्वीसारखा आमचा व्यवसाय राहिला नाही. गावाकडं बलुतं मिळायचं! आता कुठंय आलंय बलुतं-फलुतं? नव्या यंत्रानं तर आमचं जीणचं मुश्किल केलयं."
"मी धीटपणे उभी राहिली! हातात चप्पल शिवायला घेतली.. लाज कसली यात? घरातली चूल बंद झाली तर कोणी मदतीला येतं का? कष्टाची कमाई करायला लाजायचं कशाला?
मंजुषाताई मनातून बोलत होत्या.. मी ही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो.
(नुसत्या 'चांभार चौकशा'करत नव्हतो! 😊)
"गेल्या पंधरा वर्षांपासून मी इमानेइतबारे हा व्यवसाय करतीय, सरकारच्या मदतीने टपरी मिळालीय. मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. थोरला मुलगा विरेन एमसीए झालाय. तो नोकरीच्या शोधात आहे. धाकटा दहावी शिकलाय. तो टू व्हिलर गाड्यांना कव्हर बसवून देण्याचं काम करतोय. मुलगी दहावीत शिकत आहे."

"रोजच्या कामातून मला दोन-तीनशे रूपये मिळतात, मुलांचे शिक्षण, घरखर्च सांभाळणे कठीणच आहे. त्यात नवऱ्याला कधी काम मिळते कधी नाही! सासऱ्याने घेतलेलं घर आहे पण ते फारच छोटं आहे. बाहेरची चार माणसं आली तर अवघडच होतं. त्यासाठी स्वतःचं हक्काचं घर असावं! असं मला वाटतं.. मुलामुलींचे शिक्षण, लग्न, संसार यामुळे स्वतःचं घरं होईल की नाही हे सांगणं कठीणच आहे."
"आज आमची कला यांत्रिकीकरणामुळं हातून निसटून मोठमोठ्या व्यावसायिकांच्या हातात गेली आहे. त्यातून मूठभर लोकांनी संपत्तीचा डोंगर उभा केलाय, त्याचवेळी या कलेचा खरा मानकरी मात्र दारिद्रयाच्या अंधारात चाचपडत आहे."
मंजुषाताईचे शेवटचे बोल ऐकून अंगावर काटा उभा राहिला. कारण इतरांच्या पायांची काळजी घेणाऱ्या चर्मकाराचे आयुष्य आज यांत्रिकीकरणामुळे मातीत जाण्याची वेळ आली आहे. या समाजाला आज पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे समाजाचे, शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे.

पोटाच्या वीतभर खळग्यासाठी नाल्याच्या कडेला ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या कुटुंबाचा चरितार्थ पेलवत असणाऱ्या मंजुषाताई रावखंडे यांचे कार्य निश्चितच प्रंशसनीय आहे.
©विकास पांढरे, पुणे

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

शिवराय : शेाध आणि बोध




छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत. ज्यांनी राजकारण व समाजकारण यांची अतुलनीय सांगड घातली. द्रष्टेपणाने राज्यव्यवहार केला. राजे म्हणून जितके भावतात तेवढेच ते ‘लोक कल्याणकारी राजा’ म्हणून नावाजले जातात. या लोककल्याणकारी राजाच्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध प्रशांत बबनराव लवटे यांनी आपल्या   ‘पराक्रमापलीकडले शिवराय’या पुस्तकातून घेतला आहे. 


 मनुष्याच्या कुतहूलाचा, जिज्ञासेचा सर्वांत मोठा विषय मनुष्य हाच आहे. मनुष्याला जाणून घेणे आवडत असते. त्यातला त्यात धीरोदत्त नायकाला, महापुरूषाला अधिक जास्त जाणून घेणे ही एक दुर्दम जिज्ञासा असते. त्यातील एक नाव म्हणजे छ.शिवाजी महाराज. महाराजांचेे जीवन, त्यांचा पराक्रम व संपूर्ण चरित्र याविषयी विपुल साहित्य उपलब्ध असले, तरी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेता येणारे पुस्तक मोजकेच आहेत आणि हा विषय मोजक्या शब्दांत मांडणे तसे कठीणच आहे. हे कठीण काम प्रशांत लवटे यांनी  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक लिहून पूर्ण केले आहे.

प्रशांत लवटे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे. सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत ते कार्यरत आहेत. त्यांच्या जगण्यात व वागण्यात शिवरायांबद्दल ओतप्रोत प्रेम दिसून येते. ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, इतिहास संकलन करणे हा त्यांचा छंद. शिवाजी महाराजांचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून धडपडत असतात. त्याचेच एक मूर्त रूप म्हणजे  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे रूढार्थाने चरित्र पुस्तक नाही. यात  काळ, सनावळ्या नाहीत. काही ठिकाणी सालाचा उल्लेख येतो.

शिवराय हे आदर्श राज्याची रचना करून ते उत्तमप्रकारे चालवणारे प्रजाहित दक्ष राजे होते. राजे आपल्या बोलण्यातून, वागण्यातून रयतेवर वेगळी छाप पडत असत. आपल्या प्रत्येक मोहिमेची आखणी ते बारकाईने आणि अंतिम विजयाच्या दृष्टीने करत. याचा शोध आणि बोध लेखक प्रशांत लवटे यांनी घेतला आहे. 

१४२ पानांच्या या पुस्तकात शिवरायांचे वेगळेपण, विचारधारा, प्रेरणास्थळे, जडणघडण, नेतृत्व, चारित्र्य, कल्याणकारी राजे, शिवराय नक्की कोणाचे आदी लेखातून शिवरायांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.


शिवरायांचा व्यक्तिमत्वाचा / मनोव्यापरांचा सखोल अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण शिवरायांचे असामान्य व्यक्तिमत्व तपासणे, त्याचा शोध घेणे,  त्या उपयोगितेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून शिवरायांच्या जीवनाचे आकलन करणे तसे अवघड काम आहे. हे अवघड कार्य लेखकाने लिलया पार केले आहे. 

आपल्या प्रतिभेने शिवरायांचे अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात. यात कुठेही रंजकता आणत नाहीत शिवाय ऐतिहासिक वास्तव उलटेपालटे करून वाचकांला संभ्रम करणारे विधान ते करत नाहीत,याचे भान लेखकाने सांभाळले आहे.
व्यक्तिच्या जीवनात संस्काराची गरज असते. शिवरायांच्या कार्याची निर्मिती ही प्रामुख्याने पिता शहाजी आणि माता जिजाऊच्या संस्काराच्या आणि कार्याच्या प्रेरणेतून झाली आहे. त्यातून त्याचे व्यक्तिमत्व तयार झाले. वैचारिक दृष्टीने जडणघडण होत गेली. 

शिवरायांनी समाजासाठी केलेले कार्य व त्यांचे विचार आजच्या पिढीला, एक जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी, एक आदर्श समाज बनविण्यासाठी उपकारक ठरतील, असे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.

महाराजांचे व्यक्तिमत्व लेखक म्हणून मला किती भावले हे प्रत्ययकारी मांडताना दिसतात. त्या संदर्भात राजांच्या जीवनातील प्रसंगविशेषाचा उल्लेख करतात. या प्रसंगातून आपणाला काय शिकता येईल, त्या प्रसंगातून नवा अर्थ व्यक्त करताना दिसतात. म्हणजेच शिवरायांवर निष्ठा ठेवून आणि स्वतःचे आकलन मांडतात.
शिवरायांमधील समय सूचकता, असमान्य कल्पकता, द्रष्टेपणा आदी गुणांचा उल्लेख करून लेखकाने त्यावर विचार मांडले आहेत.   या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला प्रेरित करते आणि विविध व्यक्तिमत्व विकासाच्या गुणाचे आपल्यामध्ये बीजारोपण करते. 




तारूण्यातील जडणघडण’ या प्रकरणात आजची तरूणाची अवस्था कशी आहे यावर भाष्य केले आहे. ‘‘आजचा तरूण थोडे कोणतेही संकट आले की स्वतःची अवस्था भिजलेल्या मांजरासारखी करून घेतात. विचार करा शहाजीराजांना ज्यावेळी आदिलशहाने अटक केली आणि शिवरायांपुढे सर्व किल्ल्यांची मागणी केली त्यावेळी किती मोठे धर्मसंकट त्यांच्यापुढे उभे होते. एका बाजूला वडील आणि दुसर्‍या बाजूला उभे केलले छोटसं राज्य. राज्य वाचवावं तर वडिलांचा जीव धोक्यात आणि वडिलांचा जीव वाचवाा तर पूर्ण राज्य हातून निसटणार. परंतू, अजिबात न डगमगता आणि स्वतःचा समतोल योग्य पद्धतीन राखून योग्य ती राजकीय खेळी करून वडिलांना सोडवलेच ना?’’


शिवरायांच्या व्यवस्थापनाचे रहस्य काय ? संकटावर मात कशी करावी, संयम, चिकाटी, उच्च कार्यक्षमता आदी गुण शिवरायांमध्ये कसे सामावलेले होते आणि या गुणांचे आपण कसे अनुकरण करावे यावर लेखकाने मार्गदर्शन केलेले आहे.

शिवरायांचे वेगळेपण कशात आहे याविषयी लेखकाने खूप सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, ‘‘शिवरायांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मुळं उखडून टाकण्यासाठी नव्हता तर, अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य आहे पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती. ती पुन्हा उजेडात आणली ती शिवरायांनी.’’ 

आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने, कौशल्याने, चातुर्याने, साहसाने शिवराय हे युगप्रवर्तक ठरले. शिवरायांचा एक व्यापक विचार प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळतो. यामुळेच इतिहास अभ्यासकाची, विद्यार्थ्यांची आकलनशक्ती सशक्त करणारे हे मराठी ऐतहासिक साहित्यातील एक महत्वपूर्ण पुस्तक आहे यात शंका नाही.

आजपर्यंत शिवकाळावर विपूल लेखन झाले असले तरी स्वराज्याची खरी प्रेरणा ज्यांच्यापासून मिळाली, असे शहाजीराजे उपेक्षित राहिले अशी  खंत लेखकांनी व्यक्त केली आहे.

प्रशांत लवटे यांचा पुस्तक लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न खरोखर यशस्वी झाला आहे  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ या पुस्तकाला वाचकांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. शिवरायांचे वेगळेपण पुरेशा तागदीने समाजसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अवघ्या पंधरा महिन्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर वाचकांच्या हाती आली आहे. लेखक लवटे यांनी शिवरायांचा केलेला अभ्यास वाचकांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे. साधी सरळ भाषा, संशोधकवृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक सर्वांना आपलेसे करून टाकते आणि प्रत्येकांनी संग्रहीत ठेेवावे असे हे पुस्तक आहे. 
-विकास पांढरे, ९९७०४५२७६७ 

पराक्रमापलीकडले शिवराय
लेखक : प्रशांत बबनराव लवटे
प्रकाशक : प्रशांत बबनराव लवटे, ९८८१९५५१६१
पृष्ठ : १४२
 मूल्य :२००/-

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आठवणीतला येळवस


आज आमच्या भागात (उस्मानाबाद) शेती मातीशी नातं सांगणारा 'येळवस'सण साजरा केला जातोय, यातून लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपल्या जात आहेत. या सणांविषयी मला नेहमीच आकर्षण राहिले आहे, गेल्या तीन-चार वर्षांपासून या सणाचा आनंद घेता आला नाही. यानिमित्ताने काही आठवणी ताज्या झाल्या.

मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्या दिवशी 'येळवस' सण साजरा केला जातो. गावातला जमीनदार, संपन्न शेतकरी, गरीब कुणबी, मजूर शेतकरी येळवसाचा सण जिव्हाळ्याने साजरा करतो.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरेमध्ये एक मिलाफ आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरा या मिळत्या जुळत्या आहेत. ह्या परंपरा शेतीशी निगडीत आहेत. थंडीचा महिना सुरू झाला की, पिकं पोटर्यात आले की आम्हा पोरांना 'येळवस'ची चाहूल लागायची, गावात कुंभार आला की या सणाची उत्सुकता शिगेला पोहोचायची, असा हा सण.

कृषी संस्कृतीतला एक महत्त्वाचा सण म्हणून ‘येळवस' ओळखला जातो. या सणात कुंभाराच्या मडक्यापासून ते रानभाज्या, फळापर्यंत समावेश असतो. येळवसाला लागणाऱ्या भाज्या आणण्यासाठी रानात जायाचो, भाजी खुडण्यासाठी आईला मदत करायचो, चिंचेच्या झाडावर चढून गाबुळ्या चिंचा काढायचो! गोड बोरीची झाड शोधायचो... 

आई सकाळी लवकर उठून मडक्यात आबिंल भरायची मडक्यात भरलेले अंबिल नानाच्या (वडील) डोक्यावर घेऊन शेतात जात.. शेतातल्या झाडाला कडब्याच्या पेंड्याची खोप करून बांधत असत आजही परंपरा अशीच आहे. समोर दगडाचे पाच पांडव व एक द्रौपदी ठेवत, या दगडाला चुना व कावाने रंगवले जात, दगड रंगवण्याचे काम माझ्याकडे असायचे. नवैद्य म्हणून भज्जी,अंबिल,बाजारीचे उंडे, भात, वांग्याचे भरीत, केळ आणि जांब पाच पांडवासमोर ठेवली जात. रानातल्या पिकांचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करायचो..


शेतकरी सुखा व्हावा, शेतात बरकत यावी म्हणून, "ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे ! यासाठी हर हर महादेव,चावर चावर चांगभलं ! म्हणतं एका ताब्यात आबिंल घेऊन रानभर पिकांवर शिंंपडायचो, रानात डोलणाऱ्या पिकांवर रोग पडू नये अशी यामागील धारणा आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार देवाच्या नावाने दुमदुमून जात, प्रत्येकाच्या शेतातून ही हाक कानी पडायची...


शेताजवळच्या म्हसोबाला...महादेवाला.. विहिरीला, बोअरला, इंजिनाला, पाण्याच्या मोटारीला, नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे असायची.

नैवेद्य दाखवली की, सगळेजण एकत्र बसून निसर्गाच्या सान्निध्यात जेवण करायचो, रात्रभर जागरण करून आई शेंग्याच्या पोळ्या, बाजरीचे उंडे, वरण भात, खिचडी, भज्जी तयार करून ठेवायची. मला भज्जी खूप आवडायची, आजही आवडते. ही भज्जी म्हणजे सर्व पालेभाज्या व फळभाज्या एकत्र करून केलेली भाजी होय. जेवण झाल्यावर प्यायला आबिंल मिळायचे, रानातचं आई दगडाची चूल तयार करायची, रानाल्या गवर्या गोळा करून एका मडक्यात दूध तापवायला ठेवायची.


दुपारच्या येळला दोस्तांबरोबर शिवारात मोहोळ झाडत फिरायचो, त्यासाठी सगळे शिवार पालथे घालायचो, एकदा मला म्हवळाची माशी चावली होती.. क्षणात डोळा सुजला.. तरीही धुराचा ठेंभा करून मोहोळ झाडतच फिरलो. यादिवशी मध खाल्ले पाहिजे अशी धारणा आहे.

कुणाच्या तरी शेतात हुरडा असेल तर याचाही आस्वाद घ्यायचो, विहिरीत पोहायचो, सुरपारंबा खेळायचो, विंडी दांडू खेळायचो..अशा कितीतरी आठवण आजही फक्त मनात घर करून बसल्या आहेत.
कडूस पडले की गावचा पाटील हेंडगा घेऊन मारुतीच्या देवळासमोर यायचा, गावातली सगळी पोरं गोळा व्हायची, हेंडग्याच्या पाठीमागे आम्ही पोरं उभे राहून चांगभलं म्हणतं, मंदिराला प्रदक्षिणा घालायचो,थंडीपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून मारुतीच्या देवळासमोर हेंडगा ठेवला जातो. कडूसं पडलं की एकेक शेतकरी रानातून घराकडे परतत असत, आबालवृद्धांच्या चेहर्यावर तेज दिसून येत असत.


निसर्ग आणि शेती यांच्यात आदिम नाते आहे. लोकसंस्कृती नेहमी निसर्गन्मुख जीवनशैलीतून साकार झाली आहे. शेतकरी नेहमीच मातीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगत आला आहे. पाणी, पशु - पक्षी, झाडे, नद्या यांच्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होते, याची जाणीव शेतकर्यांना असते.

म्हणूनच येळवस हा सण आजही टिकून आहे. त्याचे मूळ आदिम आहे. या सणाचे अंश आमच्या पिढीमध्ये पाझरत आहेत. म्हणूनच शहरात राहूनही, विज्ञानाने सारे कवेत घेतले असतानाही या सणांविषयी यत्किंचितही महत्त्व कमी झाले नाही. ही नाळ अधिकाधिक घट्ट राहील,अस प्रयत्न करत राहीन.
©विकास पांढरे
फोटो- समाज माध्यमातून
(५जानेवारी२०१९)

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

कांद्याची गोष्ट



आज सकाळी गावाकडच्या एका तरूण शेतकरी मित्राचा फोन आला.  त्याच्या बोलण्यात आनंद  होता. तो आपल्या कांद्याची गोष्ट सांगू लागला.''यंदा पावसानं चांगलीच कमालच की राव.. शेतात पाणीच पाणी होतं.. खरीपाचं पिकं हाती लागलं नाही. जे हाती आलं त्याचा खर्च ही निघाला नाही. खरीपाकडं मोठी आशा लावून धरलो होतो.. तेही वाहून गेलं होतं. अतिवृष्टीनंतर शाबूत राहिलेल्या जमिनीवर लावणी काय करायची असा प्रश्न उभा होता..सगळचं इस्कटून गेलं होतं.. दिवाळी साजरी करता आली नाही.. लेकरांना कपडे घेता आले नाहीत.. असा विस्कटलेला संसार कसा उभा करायचा ? हे एक मोठं आव्हान होतं. उरल्यासुरल्या कांद्यावर आशा ठेवून होतो. यंदा कांद्याला चांगला भाव मिळाला.  खर्चवजा जाऊन हातात चांगले पैसे आले. यामुळं नवीन दिवस येतील असं नाही. पण मी समाधानी आहे...

'कांदा कधी हसवतो तर कधी रडवतो'मागच्या साली व्याजाने पैसे काढून कांद्याची लावण केली पण दोन रूपये भाव मिळाला आणि सगळं गणितचं बिघडलं. काय करावं ? समजत नव्हतं. थोडसं सावरलं. पुन्हा जोमानं शेतात उतरलो.. पुन्हा कांदा लावला.. यंदा समाधानापेक्षा जास्त कांद्याला भाव मिळाला..
ज्याच्या कांदा अजून रानात आहे त्यांना ही  चांगला भाव मिळावा...येत्या महिना, दोन महिन्यात शेतातला आणखीन कांदा बाहेर येणार आहे.  बाजारात  आवक वाढली तर या कांद्याला कवडीची किंमत मिळणार नाही. ज्यांनी व्याजाने पैसे काढून कांदा लावला आहे आशांचे अश्रू पुसायला कोणी येणार नाही.  शेतीचं जग समजून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर यावं लागेलं.''खरंच या तरूण शेतकरी  मित्राचे बोल ऐकून मी  थोडा वेळ स्तब्ध झालो आणि  विचार करू लागलो..

मी शेतकरी कुटुंबातला आहे. शेतीचे प्रश्न जास्त मला समजतात असे नाही. वाढत्या वयाबरोबर  हे प्रश्न अधिकाधिक समजून घेऊ लागलो. त्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र मांडण्याची कुवत माझ्यात नाही. 'आज शेती परवडत नाही आणि सोडता ही येत नाही' अशी परिस्थिती आहे.

कधी नव्हे यंदा कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचे कारण नैसर्गिक आहे. या भाववाढीबद्दल बाजारात चांगलीच चर्चा होत आहे. किलोभर कांदा विकत घेणे  सर्वसामान्य माणसाच्या आवक्यात राहिलेले नाही. या महागाईला जबाबदार कोण? हा ठरलेला प्रश्न सहज ऐकायला मिळत आहे.तर दुसऱ्या बाजूला इतर वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत याबद्दल कोणीही काहीही बोलायला तयार नाही... कांद्यावरच जास्त चर्चा होतीय, असे का?

कांदा हा कंद वर्गातील भाज्यामधील महत्वाचे पीक समजले जाते. भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा आविभाज्य भाग बनला आहे. म्हणूनच कांदा हे एक व्यापारीदृष्टया महत्वाचे नगदी पीक आहे. एकाच वर्षी अनेकवेळा उत्पादन घेणारे हे पीक आहे. मे ते ऑगस्ट महिन्यात कांद्याचा भाव कमी असतो. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत कांद्याला कधी जास्त भाव तर कधी कमी भाव मिळतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.  त्याला  शासकीय धोरणे कारणीभूत आहेत.
महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य समजले जाते. देशातील एकूण कांदा उत्पादनापैंकी 25 ते 30 टक्के उत्पादन एकटया महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील 37 टक्के कांदा क्षेत्र हे एकटया नाशिक जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती ही कांदा बाजारासाठी आशिया खंडात प्रसिध्द आहे. सोलापूर, नगर, धुळे  ह्या बाजारपेठाही कांदा विक्रीसाठी महत्वाच्या समजल्या जातात.

 महाराष्ट्रात तीन प्रकारच्या कांद्याची लागवड केली जाते. संगमनेर, माण,  फलटण या तालुक्यातील शेतकरी हळवा कांद्याची लागवड करतात. मे महिन्यात रोपे टाकून पुर्नलागवड केली जाते. उर्वरित महाराष्ट्रात पोळ कांदा लावला जातो. जून महिन्यात रोपे टाकून ऑगस्ट महिन्यात या जातीच्या कांद्याची लागवड केली जाते.  त्यानंतर रांगडा कांद्याची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात या कांद्याची रोपे टाकून जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात पुर्नलागवड केली जाते. साधारणतः ज्याच्याकडे मुबलक पाणी आहे,  आशांसाठी या कांद्याची लागवड करणे सोयीस्कर आहे.

 कांद्यावर फुलकिडे व करपा या दोन रोगाचा प्रार्दुभाव होत असतो. लहरी हवामान, अवकाळी पाऊस या नैसर्गिक कारणामुळे शेतकऱ्यांना कांदा पीक घेणे अवघडच बनले आहे, असे असले तरी महाराष्ट्रात कांद्याची विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारण यातून शेतकऱ्यांना कधी नफा मिळतो तर कधी तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्याला कांदा विक्री खूप काळजीपूर्वक करावी लागते. आपल्या कांद्याला अधिकतेचे उत्पन्न मिळविण्यासाठी त्याला योग्य बाजारपेठाचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला कांद्याची प्रतवारी करताना सडलेले कांदे, काळपट पडलेले कांदे फेकून द्यावे लागतात, असे काही सगळे करावे लागते.

जो शेतकरी आपल्या कांद्याची विक्रीचे व्यवस्थापन करतो त्याला समाधानकारक भाव मिळतो. पण बाजारातील अपूर्णता व शेतीमलाचे नाशवंत स्वरूप लक्षात घेता शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मागच्या वर्षी शेतकऱ्याला कांद्याला दोन रूपये भाव मिळाला.शहरात कांदा दोन किलोने मिळाला का? यात व्यापार आणि दलालाची चांगलीच कमाई होते. तोच कांदा व्यापाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा रूपयाला विकला. कांदा प्रश्न कधी कळीचा मुद्दा कधी बनला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 1980 च्या दशकात चाकण बाजार समितीत कांद्याला निच्चांकी दर मिळाला म्हणून शेतकरी संघटनेचे प्रेणते शरद जोशी यांनी कांदा आंदोलन केले होते. त्यानंतर कांदा हा विषय माध्यमात चर्चेला येऊ लागला. अटलजींच्या काळात कांदा 80 रूपये किलोवर गेला होता. त्यामुळे त्याचे सरकार गडगडले असाही एक अंदाज वर्तवला जातो.  यामुळे कांदा हा विषय किती संवेदनशील झाला आहे हे लक्षात येते.

 आज अनेक वर्षानंतर कांद्याला विक्रमी दर मिळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे तर सर्वसामान्य ग्राहक दुखावला गेला आहे. आज शेती, शेतकरी विविध संकटात सापडला आहे, गावे ओस पडू लागली आहेत, गावातील मजूर शहराकडे धाव घेऊ लागला आहे. शेती अवजारे, खते आणि औषधे दुपट्टीने वाढले आहेत. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. पाण्याचा पंपाची किंमत वाढलीय, मजूरांच्या रोजंदारीत वाढ झालीय यावर कुणी चर्चा करत नाही. याला कोणी महागाई म्हणत नाही. भाववाढ झाली म्हणून कोणी आंदोलनही करत नाही. शेतकरी आमची लाज राखतो... तो आम्हाला वस्त्र पुरवतो.. अन्नधान्य पुरवतो.. तरीही आमच्या बांधवांना  शेतीमालाचे भाव वाढले की फटका बसतो.. हे कुठे तरी  थांबले पहिजे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही.  भाव व भांडवल या दृष्टचक्राचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय.

  शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर त्यालाच पुरेसे भांडवल उभा करता येईल. त्यातून त्याचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावेल. त्यासाठी  शेतीमालाला संरक्षण मिळण्यासाठी बाजार ठिकाणाच्या गावात गोदामे, शीतगृहे व वखारी बांधल्या पाहिजेत.

विशेष म्हणजे आपल्या राज्यात कांदा हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते आणि कांद्याचे वर्षभरातील भाव लक्षात घेता या पिकावर छोटया-मोठया गावात प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा उद्योग उभा केला तर कांद्याच्या बाजाराभर नियंत्रण आणता येईल, विशेष म्हणजे भाव वाढवण्यास व स्थिर राहण्यासाठी मोठी मदत होईल.
©विकास पांढरे, ९९७०४५२७६७







शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

काळे ढग पांढरे ढग


 पुणे, मुंबई, नाशिक, पालघर भागात वरूणराजा मनमोकळा बरसला..धरणी ओलेचिंब झाली आहे. डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. कडेकपारीतून फेसाळ धबधबे आनंदाने उचंबळून वाहू लागले आहेत...शेतातील इवली इवली रोपे वाऱ्यावर डोलू लागले आहेत. हे पाहून संवेदनशील मन तृप्त होते.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यात पाऊस चक्क धो..धो कोसळला. या जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांना महापूर आला. कोयना धरणातून त्याच्या क्षमतेपेक्षा किेतीतरी पाणी सोडून द्यावे लागत आहे. अनेक गावांना पुराचा वेढा आहे. पुलुस जवळील ब्रह्मनाळ गावात बोट उलटून अनेकांना प्राण गमवावा लागला. शेकडो लोक पुरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.

कोल्हापूर, साताऱ्यातील हीच परिस्थिती आहे. लाखो लोक पुरात अडकले आहेत. लाखोचे पशुधन पुरात वाहून गेले आहे. गावची गाव पाण्याखाली गेली.. रस्ते हरवले.. शेतात पाणीच पाणी... हळद रूसली आहे..बेदाणा सुकला आहे.. गूळ नासला आहे..ऊस मूळासकट वाहून गेला... नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे..

अशी आपत्ती पूर्वी ही आली होती.. आता ही आली आहे...पूर्वीच्या आपत्तीतून काय शिकलो? इथल्या नागरिकांना अस्मानी संकटातून बाहेर काढण्याासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, सरकार,नागरिक जीवाचे रान करत आहे. सर्वांच्या प्रयत्नाना यश मिळत आहे.

या पावसाच्या हाहाकाराने नागरिक हवालदिल झाला आहे.. विस्कटलेला सगळा संसार कसा उभा करायचा? पुरानंतर शाबूत राहिलेल्या जमिनीवर लावणी काय करायची? असा प्रश्न इथल्या कुटुंबकर्त्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

आज ना उद्या पूर ओसरेल.. आपत्तीग्रस्तांना मदत मिळेल..आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा होईल.. लेख छापून येतील.. पुढे सगळे विसरले जाईल..पुन्हा प्रश्न उभा राहिल?

 या अरिष्टाचे परिणाम त्याची व्याप्ती आणि तीव्रता बघता अरिष्ठ निवारण हे सरकारपुढचे मोठे आव्हान आहे.. थोडक्यात सांगायाचे झाले तरी आज सर्वांनी अरिष्टग्रस्त व सरकार यंत्रणा यांना जोडणाऱ्या पुलाचे काम करायला हवे. अशाप्रकारे सर्वांनी मिळून हा गोवर्धन पर्वत उचलला तरच अरिष्टग्रस्तांना दिलासा मिळेल.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावरचे काळे ढग जाता जात नाहीत तर दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यात अजूनही पांढरे ढग आहेत. काही दिवस, काही महिने उलटून गेले तरी अजूनही वरूणराजा या भागावर रूसून बसला आहे.

या भागात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची नुसतीच भुरभुर सुरू आहे. जायकवाडी वगळता अनेक धरणे कोरडी आहेत. नदीनाले सुकून गेली आहेत. रान ओसाड आहे.अल्प पावसावर जी पेरणी झाल्यावर त्यावर रोग पडू लागला आहे. कपाशीवर मावा पडला आहे. मका लष्करी अळींच्या विळख्यात सापडली आहे.

एक आनंदाची गोष्ट आज दुपारी समजली. मराठवाड्यात कृत्रिम प्रयोग पाडण्यासाठी विमान आकाशात झेपावले आहे.कृत्रिम पावसाचा आधार हा शाश्वत नसला तरी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

विकास पांढरे

शनिवार, २० एप्रिल, २०१९

'मोन्सॅन्टो' एक महाकाय भूत



देशात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. माध्यमात राजकीय विषयांवर भरभरून लिहिले आणि बोलले जात आहे. त्यामुळे या काळात घडलेल्या काही घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातील एका दुर्लक्षित विषयाला स्पर्श करण्याचा हा प्रयत्न. मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेतल्या वृत्तपत्रात एक बातमी झळकली. ही बातमी 'मोन्सॅन्टो' या रासायनिक कंपनीच्या  ( Monsanto Agrochemical Company) विश्वासहर्तला धक्का देणारी ठरली. 

मोन्सॅन्टो' या महाकाय अमेरिकन कंपनीचा वावर जगभर असला तरी कंपनीच्या गुणवत्तेवर नेहमीच शंका उपस्थित होत असते. अमेरिकेतल्याच एडविन हर्डेमन ह्या नागरिकाला कर्करोग होण्यामागे मोन्सॅन्टो' कंपनीचे ग्लायफोसेट हे तणनाशक कारणीभूत असल्याचा दावा सॅन फ्रॅन्सिस्को जिल्हा न्यायालयाने मान्य केला आहे. त्यासाठी सुमारे ८० दशलक्ष अमेरिकी डाँलरपेक्षा (५५०कोटी) जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिला आहे. एडविन हे सत्तर वर्षीय गृहस्थ आहेत. गेल्या २६ वर्षांपासून  ते आपल्या मालकीच्या जागेत मोन्सॅन्टो कंपनीच्या तणनाशकाचा वापर करतात. २०१५ साली त्यांना लक्षात आले की आपल्याला कर्करोग झाला आहे. या वर्षाच्या अगोदर जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग आंतराष्ट्रीय संशोधन संस्थेने 'ग्लायफोसेट'च्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो असे जाहीर केले होते. या आधारावर एडविन यांनी 'मोन्सॅन्टो' कंपनी विरोधात न्यायालयीन लढा उभारला आणि जिंकलाही. एडविन यांच्या वकिलांनी 'मोन्सॅन्टो' सर्व प्रकारचे संशोधनात्मक पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. 

एडविन हर्डेमन
मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेतच ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापरामुळे एका शेतकऱ्याला कॅन्सर झाल्याचा दावा मान्य करत कंपनीला सुमारे दोन हजार कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. एकूणच 'मोन्सॅन्टो' विरोधातील अमेरिकेतील ही दुसरी बातमी होती. आशा पद्धतीचे  कंपनी विरोधात अमेरिकेत चार हजाराहून अधिक खटले न्यायालयात चालू आहेत.

'मोन्सॅन्टो कंपनी U.S
"ग्लायफोसेट'  आधारित उत्पादन १६०हून अधिक देशात विकले जाते. एकट्या कॅलिफोर्निया राज्यातील शेतकरी २५०हून अधिक पिकांमध्ये या केमिकल्सचा वापर करतात. भारतीय शेतकर्‍यांना सजग करण्यासाठी हा एक पुरावा आपल्यासमोर आहे.
 दुसरी बातमी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने 'ग्लायफोसेट' मुळे कॅन्सरग्रस्त झालेल्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. आपल्या राज्यात वर्षाकाठी ३५लाख लिटर्स तणनाशकाचा वापर केला जातो, तर करोड रुपयांचे तणनाशक विकले जाते. हा संवेदनशील मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकार तणनाशक विरोधात पाऊल उचलताना दिसत आहे. कृषी आयुक्तालयाला ग्लायफोसेट आणि कॅन्सर बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या राज्यात 'ग्लायफोसेट' मुळे कुणी कॅन्सरग्रस्त झाला आहे हे जरी अजून सिद्ध झाले नसले तरी किमान या विषयाकडे सरकार गांभीर्याने विचार करत आहे हे महत्त्वाचे आहे.आपल्या देशातील १८ कीटकनाशकांवर सन २०२०पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.या बंदीत बुरशीनाशक, कीटकनाशक आणि तणनाशक यांचा समावेश आहे. ही बंदी १ जानेवारी २०१८ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीपर्यंत लागू होणार आहे. 'ग्लायफोसेट'वर पंजाब आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बंदी आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले राज्य सरकार यावर बंदी आणेल, अशी अपेक्षा करूया. 

आपल्या राज्यात 'ग्लायफोसेट'  केमिकल्सचा वापर सर्रास केला जातोय. हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक असून या मागील भीषण वास्तव नागरिकांनी समजून घेणे आवश्‍यक आहे. दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंड अळी आली होती. कीटकनाशक फवारणीच्या जीवघेण्या फासात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला जे घटक जबाबदार होते. त्यामध्ये बी. टी.अर्थात'मोन्सॅन्टो' या कंपनीकडे बोट दाखवण्यात आले होते. अखेर शेतकऱ्यांच्या,नागरिकांच्या जीवाशी आणि पर्यावरणाशी घातक खेळी खेळणार्‍या आणि ' शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसलेल्या 'मोन्सॅन्टो' कंपनीचे महाकाय भूत वेळीच उतरवले पाहिजे.


ही कंपनी बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती जाती आणि तणनाशक केमिकल्स निर्माण केल्या आहेत.बीटी तंत्रज्ञानाने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही असा दावा कंपनीने केला होता. कंपनीच्या एका शास्त्रज्ञाने या संदर्भात सखोल संशोधन केल्या नंतर त्याच्या लक्षात आले की, जनुकांकरित अन्न खाऊन  उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे ते एक संशोधन होते. कंपनीच्या शास्त्रज्ञाने त्रुटी लक्षात आणून दिल्याने कंपनीने त्या शास्त्रज्ञाला कामावरून काढून टाकले. ह्यावरून कंपनी शेतकर्‍यांची घोर फसवणूक करते हे लक्षात येते. 

ह्याच कंपनीने राऊंड अप हे एक जहरी तणनाशक बाजारात आणले होते. तणनाशकाच्या फवारणीत पीक तग धरून राहील असा पुन्हा एक दावा केला. या राऊंड अपमुळे जमिनीतील पोषण मूल्य नष्ट होत आहेत, अशी शेतकर्‍यांनी ओरड केली होती. बीटी कपाशीवर बोंडअळी येत नाही असा कंपनीचा दावा होता.पण गेल्या पाच सहा वर्षांपासून बीटीवर कपाशीवर प्रारंभी मावा, तुडतुडे, गुलाबी बोंडअळी,मिलीबग यांचा प्रादुर्भाव होत आहे.सध्या कापसात ग्लायफोसेट हे तणनाशक वापरले जात नाही. इतर पिकांमध्ये विशेषतः फळबागांमध्ये ग्लायफोसेट देशभरात सर्रास वापरले जाते. कीटकनाशके, रासायनिक खते ही जमिनीच्या  उत्पादकतेला घातक ठरत आहेत. पर्यावरणवादी वंदना शिवा हे मॉन्सॅन्टोचे कट्टर विरोधक आहेत. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल (Cargill) नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकार्‍याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या "Soil not Oil" या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय विदर्भात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. पोलखोल करूनही ही कंपनी बंद होत नाही.


सिंजेटा, केमचायना, बायर, डाऊ,  बास्फ, ड्यूपाँट अशा बड्या अँग्री केमिकल कंपन्या जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य गाजवत आहेत. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न करोडोच्या घरात आहेत. हे उत्पन्न केवळ नि केवळ शेतकर्‍यांच्या बळावर कमविले जाते. 'एंडोसल्फान' हे घातक रसायन आहे. या रसायनाचा मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ७३ देशात बंदी असलेल्या या रसायनावर केरळ वगळता उर्वरित भारतात बंदी नाही, अशा प्रकारच्या जीवघेण्या रसायानांवर आपल्या देशात वेळीच बंदी घातली पाहिजे.

आज पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो हेक्टर जमिनी क्षारयुक्त झाल्या आहेत. या संदर्भात संशोधन केले जाणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा तालुका  भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.या भाजीपाल्यात कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अंश असण्याची दाट शक्यता असल्याने या तालुक्यात कर्करोगाची संख्या वाढली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.हरित क्रांतीचे माहेरघर असलेल्या पंजाब प्रांतात दर चार घरांमागे एक कॅन्सर रुग्ण आहे. त्यामुळे पंजाबला 'Cancer Capital of India' असे म्हणू लागले आहेत. पंजाब राज्यातील भटिंडा, बटला परिसरात एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरलेले नाही. पंजाब सरकारने याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून हे निष्कर्ष काढले आहेत. या भागातील गावोगावी कर्करोगी आढळतात.भटिंडा ते बिकानेर धावणाऱ्या गाडीला नागरिकांनी 'कॅन्सर ट्रेन' हे नाव दिले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, देशात ब्रेस्ट कॅन्सरचे १ लाख ४५ हजार रुग्ण आढळून आले भारतातील आर्थिकदृष्ट्या मध्यम व अल्प उत्पन्न गटातील ५२ टक्के महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत.वाढते प्रदूषण, आधुनिक जीवनशैली, फळे व भाज्यांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.

आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. भविष्यात अन्न धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करणे अयोग्य ठरेल, कारण रासायनिक खते आणि तणनाशकांतून विषच जन्माला येत आहे. असले विष जन्माला घालून आपण कोणते 'पुण्य' पदरात पाडून घेणार आहोत. देशात दुसरी हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जैविक शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
विकास पांढरे, ९९७०४५२७६७

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...