देशात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. माध्यमात राजकीय विषयांवर भरभरून लिहिले आणि बोलले जात आहे. त्यामुळे या काळात घडलेल्या काही घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातील एका दुर्लक्षित विषयाला स्पर्श करण्याचा हा प्रयत्न. मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेतल्या वृत्तपत्रात एक बातमी झळकली. ही बातमी 'मोन्सॅन्टो' या रासायनिक कंपनीच्या ( Monsanto Agrochemical Company) विश्वासहर्तला धक्का देणारी ठरली.
मोन्सॅन्टो' या महाकाय अमेरिकन कंपनीचा वावर जगभर असला तरी कंपनीच्या गुणवत्तेवर नेहमीच शंका उपस्थित होत असते. अमेरिकेतल्याच एडविन हर्डेमन ह्या नागरिकाला कर्करोग होण्यामागे मोन्सॅन्टो' कंपनीचे ग्लायफोसेट हे तणनाशक कारणीभूत असल्याचा दावा सॅन फ्रॅन्सिस्को जिल्हा न्यायालयाने मान्य केला आहे. त्यासाठी सुमारे ८० दशलक्ष अमेरिकी डाँलरपेक्षा (५५०कोटी) जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिला आहे. एडविन हे सत्तर वर्षीय गृहस्थ आहेत. गेल्या २६ वर्षांपासून ते आपल्या मालकीच्या जागेत मोन्सॅन्टो कंपनीच्या तणनाशकाचा वापर करतात. २०१५ साली त्यांना लक्षात आले की आपल्याला कर्करोग झाला आहे. या वर्षाच्या अगोदर जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग आंतराष्ट्रीय संशोधन संस्थेने 'ग्लायफोसेट'च्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो असे जाहीर केले होते. या आधारावर एडविन यांनी 'मोन्सॅन्टो' कंपनी विरोधात न्यायालयीन लढा उभारला आणि जिंकलाही. एडविन यांच्या वकिलांनी 'मोन्सॅन्टो' सर्व प्रकारचे संशोधनात्मक पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत.
![]() |
| एडविन हर्डेमन |
मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेतच ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापरामुळे एका शेतकऱ्याला कॅन्सर झाल्याचा दावा मान्य करत कंपनीला सुमारे दोन हजार कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. एकूणच 'मोन्सॅन्टो' विरोधातील अमेरिकेतील ही दुसरी बातमी होती. आशा पद्धतीचे कंपनी विरोधात अमेरिकेत चार हजाराहून अधिक खटले न्यायालयात चालू आहेत.
![]() |
| 'मोन्सॅन्टो कंपनी U.S |
"ग्लायफोसेट' आधारित उत्पादन १६०हून अधिक देशात विकले जाते. एकट्या कॅलिफोर्निया राज्यातील शेतकरी २५०हून अधिक पिकांमध्ये या केमिकल्सचा वापर करतात. भारतीय शेतकर्यांना सजग करण्यासाठी हा एक पुरावा आपल्यासमोर आहे.
दुसरी बातमी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने 'ग्लायफोसेट' मुळे कॅन्सरग्रस्त झालेल्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. आपल्या राज्यात वर्षाकाठी ३५लाख लिटर्स तणनाशकाचा वापर केला जातो, तर करोड रुपयांचे तणनाशक विकले जाते. हा संवेदनशील मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकार तणनाशक विरोधात पाऊल उचलताना दिसत आहे. कृषी आयुक्तालयाला ग्लायफोसेट आणि कॅन्सर बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या राज्यात 'ग्लायफोसेट' मुळे कुणी कॅन्सरग्रस्त झाला आहे हे जरी अजून सिद्ध झाले नसले तरी किमान या विषयाकडे सरकार गांभीर्याने विचार करत आहे हे महत्त्वाचे आहे.आपल्या देशातील १८ कीटकनाशकांवर सन २०२०पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.या बंदीत बुरशीनाशक, कीटकनाशक आणि तणनाशक यांचा समावेश आहे. ही बंदी १ जानेवारी २०१८ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीपर्यंत लागू होणार आहे. 'ग्लायफोसेट'वर पंजाब आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बंदी आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले राज्य सरकार यावर बंदी आणेल, अशी अपेक्षा करूया.
आपल्या राज्यात 'ग्लायफोसेट' केमिकल्सचा वापर सर्रास केला जातोय. हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक असून या मागील भीषण वास्तव नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंड अळी आली होती. कीटकनाशक फवारणीच्या जीवघेण्या फासात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला जे घटक जबाबदार होते. त्यामध्ये बी. टी.अर्थात'मोन्सॅन्टो' या कंपनीकडे बोट दाखवण्यात आले होते. अखेर शेतकऱ्यांच्या,नागरिकांच्या जीवाशी आणि पर्यावरणाशी घातक खेळी खेळणार्या आणि ' शेतकर्यांच्या मानगुटीवर बसलेल्या 'मोन्सॅन्टो' कंपनीचे महाकाय भूत वेळीच उतरवले पाहिजे.
ही कंपनी बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती जाती आणि तणनाशक केमिकल्स निर्माण केल्या आहेत.बीटी तंत्रज्ञानाने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही असा दावा कंपनीने केला होता. कंपनीच्या एका शास्त्रज्ञाने या संदर्भात सखोल संशोधन केल्या नंतर त्याच्या लक्षात आले की, जनुकांकरित अन्न खाऊन उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे ते एक संशोधन होते. कंपनीच्या शास्त्रज्ञाने त्रुटी लक्षात आणून दिल्याने कंपनीने त्या शास्त्रज्ञाला कामावरून काढून टाकले. ह्यावरून कंपनी शेतकर्यांची घोर फसवणूक करते हे लक्षात येते.
ह्याच कंपनीने राऊंड अप हे एक जहरी तणनाशक बाजारात आणले होते. तणनाशकाच्या फवारणीत पीक तग धरून राहील असा पुन्हा एक दावा केला. या राऊंड अपमुळे जमिनीतील पोषण मूल्य नष्ट होत आहेत, अशी शेतकर्यांनी ओरड केली होती. बीटी कपाशीवर बोंडअळी येत नाही असा कंपनीचा दावा होता.पण गेल्या पाच सहा वर्षांपासून बीटीवर कपाशीवर प्रारंभी मावा, तुडतुडे, गुलाबी बोंडअळी,मिलीबग यांचा प्रादुर्भाव होत आहे.सध्या कापसात ग्लायफोसेट हे तणनाशक वापरले जात नाही. इतर पिकांमध्ये विशेषतः फळबागांमध्ये ग्लायफोसेट देशभरात सर्रास वापरले जाते. कीटकनाशके, रासायनिक खते ही जमिनीच्या उत्पादकतेला घातक ठरत आहेत. पर्यावरणवादी वंदना शिवा हे मॉन्सॅन्टोचे कट्टर विरोधक आहेत. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल (Cargill) नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकार्याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या "Soil not Oil" या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय विदर्भात होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. पोलखोल करूनही ही कंपनी बंद होत नाही.
सिंजेटा, केमचायना, बायर, डाऊ, बास्फ, ड्यूपाँट अशा बड्या अँग्री केमिकल कंपन्या जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य गाजवत आहेत. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न करोडोच्या घरात आहेत. हे उत्पन्न केवळ नि केवळ शेतकर्यांच्या बळावर कमविले जाते. 'एंडोसल्फान' हे घातक रसायन आहे. या रसायनाचा मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ७३ देशात बंदी असलेल्या या रसायनावर केरळ वगळता उर्वरित भारतात बंदी नाही, अशा प्रकारच्या जीवघेण्या रसायानांवर आपल्या देशात वेळीच बंदी घातली पाहिजे.
आज पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो हेक्टर जमिनी क्षारयुक्त झाल्या आहेत. या संदर्भात संशोधन केले जाणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा तालुका भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.या भाजीपाल्यात कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अंश असण्याची दाट शक्यता असल्याने या तालुक्यात कर्करोगाची संख्या वाढली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.हरित क्रांतीचे माहेरघर असलेल्या पंजाब प्रांतात दर चार घरांमागे एक कॅन्सर रुग्ण आहे. त्यामुळे पंजाबला 'Cancer Capital of India' असे म्हणू लागले आहेत. पंजाब राज्यातील भटिंडा, बटला परिसरात एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरलेले नाही. पंजाब सरकारने याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून हे निष्कर्ष काढले आहेत. या भागातील गावोगावी कर्करोगी आढळतात.भटिंडा ते बिकानेर धावणाऱ्या गाडीला नागरिकांनी 'कॅन्सर ट्रेन' हे नाव दिले आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, देशात ब्रेस्ट कॅन्सरचे १ लाख ४५ हजार रुग्ण आढळून आले भारतातील आर्थिकदृष्ट्या मध्यम व अल्प उत्पन्न गटातील ५२ टक्के महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत.वाढते प्रदूषण, आधुनिक जीवनशैली, फळे व भाज्यांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.
आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. भविष्यात अन्न धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करणे अयोग्य ठरेल, कारण रासायनिक खते आणि तणनाशकांतून विषच जन्माला येत आहे. असले विष जन्माला घालून आपण कोणते 'पुण्य' पदरात पाडून घेणार आहोत. देशात दुसरी हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जैविक शेती करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
विकास पांढरे, ९९७०४५२७६७
आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. भविष्यात अन्न धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करणे अयोग्य ठरेल, कारण रासायनिक खते आणि तणनाशकांतून विषच जन्माला येत आहे. असले विष जन्माला घालून आपण कोणते 'पुण्य' पदरात पाडून घेणार आहोत. देशात दुसरी हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जैविक शेती करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
विकास पांढरे, ९९७०४५२७६७





खूप महत्वाची माहिती देणारा लेख आहे. शेतकऱ्यांमध्ये यांविषयी जागृती करणे गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद, महत्वपमह माहितीसाठी.
चुकीच्या माहितीवर आधारीत लेख आहे .पुर्णतः शेतकरी विरोधी .ग्लायसोफेटच्या वापरावरील मोन्सेंटोचा स्वामीत्व हक्क संपल्याने जगभरात हजारो कंपन्या हे स्वस्त तणनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देत आहेत.त्यामुळे यावर बंदी घालुन स्वामीत्व हक्क असलेले कुठलेतरी महाग तणनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे षडयंत्र आहेत .जगात कुठलेही संशोधन ठाम पणे कँन्सर याच मुळे होतो हे सांगु शकलेले नाही सगळी गृहीतक आहेत.कँन्सर होण्याच्या A2 प्रकारात शेकड्याने बाबी आहेत.भडींटा येथे कँन्सर रुग्णांचे प्रमाण देशातील सरासरी ईतकेच आहे .कृपया या बाबत सखोल अभ्यास करावा
उत्तर द्याहटवासुधीरजी, धन्यवाद
हटवाया संदर्भात तुमच्या कडे अधिक माहिती असेल तर द्या. शेतकर्यांनी जैविक शेतीकडे वळणे या मताचा मी आहे.
https://twitter.com/WebMD/status/1129076550819864577?s=19
उत्तर द्याहटवासुंदर, रोकठोक लेख!
उत्तर द्याहटवा