छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत. ज्यांनी राजकारण व समाजकारण यांची अतुलनीय सांगड घातली. द्रष्टेपणाने राज्यव्यवहार केला. राजे म्हणून जितके भावतात तेवढेच ते ‘लोक कल्याणकारी राजा’ म्हणून नावाजले जातात. या लोककल्याणकारी राजाच्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध प्रशांत बबनराव लवटे यांनी आपल्या ‘पराक्रमापलीकडले शिवराय’या पुस्तकातून घेतला आहे.
मनुष्याच्या कुतहूलाचा, जिज्ञासेचा सर्वांत मोठा विषय मनुष्य हाच आहे. मनुष्याला जाणून घेणे आवडत असते. त्यातला त्यात धीरोदत्त नायकाला, महापुरूषाला अधिक जास्त जाणून घेणे ही एक दुर्दम जिज्ञासा असते. त्यातील एक नाव म्हणजे छ.शिवाजी महाराज. महाराजांचेे जीवन, त्यांचा पराक्रम व संपूर्ण चरित्र याविषयी विपुल साहित्य उपलब्ध असले, तरी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेता येणारे पुस्तक मोजकेच आहेत आणि हा विषय मोजक्या शब्दांत मांडणे तसे कठीणच आहे. हे कठीण काम प्रशांत लवटे यांनी ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक लिहून पूर्ण केले आहे.
प्रशांत लवटे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे. सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत ते कार्यरत आहेत. त्यांच्या जगण्यात व वागण्यात शिवरायांबद्दल ओतप्रोत प्रेम दिसून येते. ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, इतिहास संकलन करणे हा त्यांचा छंद. शिवाजी महाराजांचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून धडपडत असतात. त्याचेच एक मूर्त रूप म्हणजे ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे रूढार्थाने चरित्र पुस्तक नाही. यात काळ, सनावळ्या नाहीत. काही ठिकाणी सालाचा उल्लेख येतो.
शिवराय हे आदर्श राज्याची रचना करून ते उत्तमप्रकारे चालवणारे प्रजाहित दक्ष राजे होते. राजे आपल्या बोलण्यातून, वागण्यातून रयतेवर वेगळी छाप पडत असत. आपल्या प्रत्येक मोहिमेची आखणी ते बारकाईने आणि अंतिम विजयाच्या दृष्टीने करत. याचा शोध आणि बोध लेखक प्रशांत लवटे यांनी घेतला आहे.
१४२ पानांच्या या पुस्तकात शिवरायांचे वेगळेपण, विचारधारा, प्रेरणास्थळे, जडणघडण, नेतृत्व, चारित्र्य, कल्याणकारी राजे, शिवराय नक्की कोणाचे आदी लेखातून शिवरायांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवरायांचा व्यक्तिमत्वाचा / मनोव्यापरांचा सखोल अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण शिवरायांचे असामान्य व्यक्तिमत्व तपासणे, त्याचा शोध घेणे, त्या उपयोगितेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून शिवरायांच्या जीवनाचे आकलन करणे तसे अवघड काम आहे. हे अवघड कार्य लेखकाने लिलया पार केले आहे.
आपल्या प्रतिभेने शिवरायांचे अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात. यात कुठेही रंजकता आणत नाहीत शिवाय ऐतिहासिक वास्तव उलटेपालटे करून वाचकांला संभ्रम करणारे विधान ते करत नाहीत,याचे भान लेखकाने सांभाळले आहे.
व्यक्तिच्या जीवनात संस्काराची गरज असते. शिवरायांच्या कार्याची निर्मिती ही प्रामुख्याने पिता शहाजी आणि माता जिजाऊच्या संस्काराच्या आणि कार्याच्या प्रेरणेतून झाली आहे. त्यातून त्याचे व्यक्तिमत्व तयार झाले. वैचारिक दृष्टीने जडणघडण होत गेली.
शिवरायांनी समाजासाठी केलेले कार्य व त्यांचे विचार आजच्या पिढीला, एक जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी, एक आदर्श समाज बनविण्यासाठी उपकारक ठरतील, असे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.
महाराजांचे व्यक्तिमत्व लेखक म्हणून मला किती भावले हे प्रत्ययकारी मांडताना दिसतात. त्या संदर्भात राजांच्या जीवनातील प्रसंगविशेषाचा उल्लेख करतात. या प्रसंगातून आपणाला काय शिकता येईल, त्या प्रसंगातून नवा अर्थ व्यक्त करताना दिसतात. म्हणजेच शिवरायांवर निष्ठा ठेवून आणि स्वतःचे आकलन मांडतात.
शिवरायांमधील समय सूचकता, असमान्य कल्पकता, द्रष्टेपणा आदी गुणांचा उल्लेख करून लेखकाने त्यावर विचार मांडले आहेत. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला प्रेरित करते आणि विविध व्यक्तिमत्व विकासाच्या गुणाचे आपल्यामध्ये बीजारोपण करते.
‘तारूण्यातील जडणघडण’ या प्रकरणात आजची तरूणाची अवस्था कशी आहे यावर भाष्य केले आहे. ‘‘आजचा तरूण थोडे कोणतेही संकट आले की स्वतःची अवस्था भिजलेल्या मांजरासारखी करून घेतात. विचार करा शहाजीराजांना ज्यावेळी आदिलशहाने अटक केली आणि शिवरायांपुढे सर्व किल्ल्यांची मागणी केली त्यावेळी किती मोठे धर्मसंकट त्यांच्यापुढे उभे होते. एका बाजूला वडील आणि दुसर्या बाजूला उभे केलले छोटसं राज्य. राज्य वाचवावं तर वडिलांचा जीव धोक्यात आणि वडिलांचा जीव वाचवाा तर पूर्ण राज्य हातून निसटणार. परंतू, अजिबात न डगमगता आणि स्वतःचा समतोल योग्य पद्धतीन राखून योग्य ती राजकीय खेळी करून वडिलांना सोडवलेच ना?’’
शिवरायांच्या व्यवस्थापनाचे रहस्य काय ? संकटावर मात कशी करावी, संयम, चिकाटी, उच्च कार्यक्षमता आदी गुण शिवरायांमध्ये कसे सामावलेले होते आणि या गुणांचे आपण कसे अनुकरण करावे यावर लेखकाने मार्गदर्शन केलेले आहे.
शिवरायांचे वेगळेपण कशात आहे याविषयी लेखकाने खूप सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, ‘‘शिवरायांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मुळं उखडून टाकण्यासाठी नव्हता तर, अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य आहे पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती. ती पुन्हा उजेडात आणली ती शिवरायांनी.’’
आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने, कौशल्याने, चातुर्याने, साहसाने शिवराय हे युगप्रवर्तक ठरले. शिवरायांचा एक व्यापक विचार प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळतो. यामुळेच इतिहास अभ्यासकाची, विद्यार्थ्यांची आकलनशक्ती सशक्त करणारे हे मराठी ऐतहासिक साहित्यातील एक महत्वपूर्ण पुस्तक आहे यात शंका नाही.
आजपर्यंत शिवकाळावर विपूल लेखन झाले असले तरी स्वराज्याची खरी प्रेरणा ज्यांच्यापासून मिळाली, असे शहाजीराजे उपेक्षित राहिले अशी खंत लेखकांनी व्यक्त केली आहे.
प्रशांत लवटे यांचा पुस्तक लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न खरोखर यशस्वी झाला आहे ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ या पुस्तकाला वाचकांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. शिवरायांचे वेगळेपण पुरेशा तागदीने समाजसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अवघ्या पंधरा महिन्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर वाचकांच्या हाती आली आहे. लेखक लवटे यांनी शिवरायांचा केलेला अभ्यास वाचकांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे. साधी सरळ भाषा, संशोधकवृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक सर्वांना आपलेसे करून टाकते आणि प्रत्येकांनी संग्रहीत ठेेवावे असे हे पुस्तक आहे.
-विकास पांढरे, ९९७०४५२७६७
पराक्रमापलीकडले शिवराय
लेखक : प्रशांत बबनराव लवटे
प्रकाशक : प्रशांत बबनराव लवटे, ९८८१९५५१६१
पृष्ठ : १४२
मूल्य :२००/-















