सोमवार, २० मार्च, २०१७

राजस्थानच्या शुष्क वाळवंटातील वृक्षपुरूष...!



ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असं राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाखापेक्षा जास्त झाडे लावून, तन, मन, आणि धनाने जागविणार्‍या विष्णू लांबा या वृक्षप्रेमी तरूणाच्या कार्याला सलाम ठोकले पाहिजे.
देशात पर्यावरणाबद्दल जागरूकता आलेली आहे.  जसजशी लोकसंख्या वाढत आहे. नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे. त्याबरोबरीने पर्यावरण वाचावे. जंगल नष्ट होऊ नयेत आणि वन्यप्राणी सुरक्षित राहावेत, यासाठी विविध समाज संस्थेकडून
प्रयत्नही होत आहेत. पर्यावरणात वृक्ष, प्राणी पक्ष्यांचे महत्वाचे स्थान आहे.  पर्यावरणाचा समतोल राखावा,  वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी राजस्थान सारख्या शुष्क वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाख झाडे लावून जगण्याचे अतुलनीय कार्य विष्णू लांबा या तरूणाने केले आहे.

 इतकेच नाहीतर तब्बल नऊ लाख झाडे तोडण्यापासून वाचविणारा लांबा हे राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ात वृक्षपुरूष म्हणून ओळखले जात आहेत.
लहानपणी आजूबाजूच्या लोकांनी लावलेली झाडे चोरून आणून आपल्या भागात लावण्यात ते पटाईत होते. एवढेच काय त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या रोपवाटिकेतून झाडे चोरून आणून आपल्या घरी लावली.


 लांबाचे काका यांनी त्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या घरी घेवून गेले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी चोरी करणे वाईट आहे,  मात्र झाडे लावणे चांगले आहे. असे म्हणत त्यांना काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी त्यांनी सात वर्षे घर सोडले.  पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागले.  समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल,  त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. लांबा यांच्या कार्याचा विषय प्रथम लोकांनी थट्टेवारी नेला.  पण त्यांच्या चांगुलपणाचा आणि निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व कळल्याने,  लांबा यांच्या कार्यास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  हाच लांबा आता राजस्थानच्या शुष्क वाळवंटात पर्यावरणाचा जतन करणारा आणि वृक्षलागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍यासाठी आयकॉन बनला आहे.



 बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,  अजय देवगण,  सुभाष घई, अनुराग कश्यप,  अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.  तर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर,  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे,  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लांबा यांच्या कार्याचा गौरव केला आहे.  वृक्षमिञ म्हणून ओळख असलेल्या लांबा यांनी प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना पाच झाडे भेट देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
हुंड्यात मागितली झाडे
लांबा यांच्या भावाच्या लग्नासाठी हुंडा किती घ्यावा यावर चर्चा सुरू होती.  यावेळी लांबा यांच्या वडिलांनी विष्णू आमचा मोठा मुलगा आहे. हुंड्याचं त्यालाच विचारा असे सांगितल्यावर वधूकडील मंडळी अचंबित झाले.  लांबा ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी जातात तिथे वधु वराच्या हस्ते वृक्षारोपण करवतात.  त्यामुळे लांबा हे नाव राजस्थान मध्ये सर्वञ परिचित झाले आहे.

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(जागतिक वन दिनानिमित्त २१ मार्च २०१६ रोजी दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख )

..........................................

शनिवार, १८ मार्च, २०१७

हॅलो, मी साहेबराव करपे बोलतोय !


साहेबराव :-  हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय...

सरकार :   ....

साहेबराव :- सरकार... यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात माझी शेती होती.वाडा होता.घरात वारकरी संप्रदायाचा वारसा होता. येळ मिळेल तवा भजनात दंग व्हायचो. चाळीस एकर शेती मन लावून करायचो. माझी पत्नीही मला साथ द्यायची.. आपली शेती अन् भजन बरं! यातचं आम्ही समाधान मानायचो. ध्यानीमनी नसताना गावकऱ्यांनी मला सरपंच केलं.. अकरा वर्ष सरपंचपद भोगलो, पण आम्हा कुणब्याला यातलं काय समजलं नाय, काळी आईची सेवा करण्यात आमची जिंदगाणी गेली.. कुठलं आलं ते राजकारण..

सरकार :-  .....

साहेबराव  :- सरकार काय सांगू ? आमचा भाग दुष्काळी. हमखास पाऊस देणारी नक्षत्रं कोरडीच गेली होती. लोक हवालदिल झाली होती. घरात अन्न नव्हतं.. हातात पैसा नव्हता..डोक्यावरचं कर्ज वाढतच होतं..गुंठा गुंठा विकत गेलो पण कर्ज काय फिटलं नाय.. कापसाला भाव मिळत नव्हता.. वीजेचं बिल यायचं तेच फेडत बसायचो. सगळा इस्कोट व्हायचा.. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं घरात कधी सण साजरा केला नाय.दिवाळीत मात्र कालावाकालव व्हायची, माझ्या चिमुकल्याना ना नवीन कपडे ,ना फटाके दयायची ऐपत नसायची. चटणी भाकर खाऊन बछडे वाढवली. 

बायकोला ना कधी नवीन साडी घेऊन देता आली. या फाटक्या संसारात काळी आईची सेवा करत राहिलो. जित्राबात मन लागत होतं. माझ्या दोन खिल्लार बैलजोडीवर सर्व शेत नांगरत होतो. त्यांच्यामुळं बळ मिळायचं. पण कर्जापायी आठवडी बाजारात त्यांना विकून आलो. इथंही व्यापारी आणि दलालानं गंडवलं. असं सगळं सुरू होतं सर्व ते सहन होतं नव्हतं, सरकार, सर्व पुढे आक्रीतच घडत गेलं....

सरकार :-

साहेबराव :- "पावसाची वाट पाहून व्याकुळ झालो होतो, देणेकरी रोज दारात येऊन बसायचे, तुमच्या बँकेचे लोक यायचे. म्हणायचे- फेडता येत नाही तर घेता कशाला ? मी अगदी शांत ऐकायचो, थकीत वीज बिलापोटी वीज तोडणी करण्यात आली.  ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला होता.. कर्ज आणि बिल फेडण्याची चिंता लागून राहिली होती.
"ती" जमिनीत पाय रोवून उभी राहात म्हणायची,
"पाऊस येतोय न्हवं का"  आशाभूळत नजरेने आभाळाकडं एकटक बघायची. कधी कर्ज फेडू आणि सुखाचा संसार करू असं तिला वाटायचं, माझं पिल्लं ही खूप गोड होती. त्या निरागस बालकांना रानशीळ खूप आवडायची.. मातीच्या सुवासाने गंधित झालेला वारा, हिरवी मखमल पांघरलेले रान, रानात आपल्याच नादात ती सर्व जण खेळत, बागडत...रंगीबेरंगी पक्षी, गायवासरे, पक्षाची आणि जित्राबाची गोड सुरावट ऐकून ते आनंदित आसयाची. त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हर्षोल्हास व्हायचा, आज ३१ वर्षानंतर पुन्हा मन भरून आलं. आज माझ्या मुलांची लग्ने झाली असती. कुणी शेत, तर कुणी घराकडं लक्ष दिलं असतं, आम्ही दोघं म्हातारी, ढालजत स्वस्थ पडून बघायचं..एवढं स्वप्न आमच्या नशीबी नव्हतं.....

सरकार :-

   साहेबराव :- सरकार, काही तरी नवीन करावं? असं काहीच नव्हतं, त्यामुळं आम्ही पती-पत्नीनं  मनाशी ठरवलं.मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलो,
 १९ मार्च १९८६ रोजीचा दिवस. मी, पत्नी आणि चार मुलांसह कुष्ठधामात आलो. तिथं खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीनं भजने गायलो. सोबत आणलेल्या स्टोव्हवर बायकोनं भजी तळली. त्यात विषारी औषध मिसळलं. मुलांना भजी खायला दिलो.एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ बायकोसह मी ही जगाचा निरोप घेतला. आज या घटनेला ३१ वर्ष पूर्ण झाली. सरकार, मी कुणालाही दोष दिला नाही? तसं चिठ्ठीत लिहून ठेवलो होतो. त्यामुळं अनुदान, कर्जमाफी, तातडीची मदत असं काही अशा आणि अपेक्षा नव्हत्या, कारण, शेतकरी जात स्वाभिमानी असतीय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, मी जागतिकीकरणाचा पहिला बळी ठरलो, अशा बातम्या छापून यायच्या, ९० नंतर जागतिकीकरणाचं युग सुरु झालं. त्या काळात माध्यमांचं इतकं पेव फुटलं नव्हतं. शेतकऱ्यांवरील अन्याय, अत्याचार पूर्वापार चालत आलाय. शेतकरी आत्महत्या माझ्यापासून सुरु झाल्या अशी नोंद आहेत.पण माझ्या ही आधी कुणी तरी केली असेल, त्याची फक्त दखल घेतली नसेल?आज शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.  केंद्राचे पथक येऊन गेले.निधी मिळाला पण आत्महत्या काय कमी होत नाहीत. पी.साईनाथ यांच्या म्हणण्याप्रमाणं २००५ पर्यंत वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, २०१७ पर्यंतचा आकडा सांगू नका?

मागे एकदा-
"पंतप्रधान म्हणाले,
घेतलेल्या कर्जाचं आणि कुटुंबाचं
नियोजन करता येत नाही
म्हणून शेतकरी आत्महत्या करतात,
सरकार तुम्हीच सांगा?देशाचं आणि राज्याचं नियोजन जमलं नाही म्हणून तुम्ही आत्महत्या केल्या होत्या का ? कुणी साले म्हणाले, तर कुणी धरणात...काय काय?
सरकार :-
साहेबराव :- मायबाप सरकार, मला माहित आहे, कोणत्याही व्यवस्थेला दोन बाजू असतात, सरकारला एकांगी, एककल्ली, एकदेशीय भूमिका घेता नाही.पण जिवंत माणूस जेव्हा आत्महत्या करायला सुरुवात करतो, तेव्हा सत्य, न्याय या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं.
नापिकी,दुष्काळ, वाढत्या उत्पादन खर्चामुळं न परवडणारी, ढासळून पडणारी कृषी व्यवस्था यामुळंच रोज एक 'बळी'चा बळी जातोय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, आमची अजून किती परवड होणार? .शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्तेची चावी किती वेळा घेता ?आज विरोधी पक्षात असलेले काल सत्तेत होती, आज सत्तेत असलेली मंडळी काल विरोधी पक्षात होती. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला परवडेल असा भाव द्या साहेब, भांडवलदार, उद्योगपती आमच्या जमीनी  कमी मोबदल्यात घेऊन  डल्ला मारतायेत,  जमीनविषयक नवे नवे कायदे आमचा घात करणारी आहेत. 

सरकार :-
साहेबराव :- सरकार, हरितक्रांती, धवल क्रांती चा मूठभर लोकांना फायदा झाला. मागे निवडणुकीच्या तोंडावर दिलेली कर्जमाफीचा आम्हाला कितपत फायदा झाला? हा संशोधनाचा विषय आहे. मायबाप सरकार, आम्हाला तुमची गरज आहे. खेडी ओस पडताहेत. आमचा शेतकरी शेती, बैल, बारदाना, गुरे -ढोरे, गाई-वासरे, झाडे यांच्याशी अंत:करण पूर्वक जोडला गेलाय. आज त्यांच्या मुलांची शेतीकडे बघण्याचा कल बदलत चाललाय. माझा बाप शेतीत मेला, मी मरणार नाही, ही त्याची भूमिका बनत आहे. त्याची ही मानसिकता बरोबर आहे. पण माझी काळी आई कोण सांभाळेल. नव्या बदलांमुळं त्याचं होरफळलेलं मन फक्त तुम्हीच बदलू शकता तरच जगाचा पोंशिदा जगेल. एवढीच मागणी मान्य कराल, अशी अपेक्षा आहे.    
       धन्यवाद    
         आपला
 साहेबराव करपे, पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी

  लेखक - विकास पांढरे, मु.पो.इटकळ, ता.तुळजापूर, जिल्हा. उस्मानाबाद. मो.९९७०४५२७६७ ईमेल आयडी : vikaspandhare3@gmail.com
(टिप : वरील आशय कल्पानिक आहे, त्यामुळे व्यक्तिंशा कुणी अर्थ काढू नये. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून प्रकट केलेल्या भावना आहेत.)

फोटो :इंटरनेट सेवा

शनिवार, ११ मार्च, २०१७

यशवंतराव आणि उजनी धरण विस्थापितांचा विकास


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय महाराष्ट्राच्या समृध्दीला कारणीभूत आहेत. त्यांच्या  संकल्पनेतून  साकार झालेली सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची निर्मिती हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे ‘दुष्काळी जिल्हा’ हा  सोलापूर  जिल्ह्यावर मारलेला शिक्का पुसला गेला. उजनी धरणनिर्मितीबद्दलचा विशाल दृष्टिकोन आणि पुनर्वसन संबंधित विचाराबाबत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिशादर्शक विचार मांडले होते. आज उजनी धरणामुळे 52 गावे विस्थापित झाले आहेत. या गावांचा अद्याप मूलभूत विकास झाला नाही. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या विचारांतून विस्थापित गावांचा विकास होणे गरजेचे आहे.

 यशवंतरावांचे स्मरण

आपल्या  40 वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला  दिशा देण्याचे आणि समतोल व जातीभेदरहित राजकारणाचा  वारसा देण्याचे कार्य  स्व. चव्हाण यांनी केले. शेती, सहकार, पंचायत राज, साहित्य, उद्योग, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अतुलनीय असे योगदान दिले. त्यामुळेच त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हटले जाते. 12 मार्च हा त्यांचा जन्मदिवस. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी जलायशाच्या निर्मितीमागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 उजनी धरणाची निर्मिती
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात 7 मार्च 1966 मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उजनी धरण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर 1976  मध्ये धरण पहिल्यांदा भरले. तेव्हापासून आजपर्यंत या महाकाय धरणाच्या लाभक्षेत्रात सातत्याने पाणीसाठा होत गेला आणि गावच्यागावे पाण्याखाली गेली. सुंदर पुरातन आणि देखण्या वास्तू, मंदिरे धरणग्रस्तांना जशाच्या तशा सोडून जाव्या लागल्या होत्या. त्याअगोदर सोलापूरवर ‘दुष्काळी जिल्हा’ असा शिक्का होता. तो पुसण्याचे कार्य स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 117 टीएमसी एवढ्या विशाल पाणी क्षमतेचे उजनी धरण बांधून सुरू केली.


उजनी धरणाचे संग्रहीत चित्र


उजनी धरण विस्थापित
विस्थापित गावांची ससेहोलपट
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आज पाण्यामुळे ऊस कारखानदारी वाढली आहे.  लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील 52, पुणे 22, अहमदनगर जिल्ह्यांतील  तीन या विस्थापित गावांची काय अवस्था आहे?  सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 52 गावात उजनी धरणामुळे विस्थापित झालेले लोक राहतात. त्यांच्या वाट्याला सुलतानी कारभारामुळे संघर्षच उभा राहिला आहे. पंढरपूर तालुक्यातील सहा विस्थापित गावांना ग्रामपंचायती व 11 गावांना महसुलीचा दर्जा मिळाला नाही.  धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे पंढरपूर, मोहोळ, माढा या तालुक्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.

             यशवंतरावांच्या दूरदृष्टितून विकास

शेतकरी आणि शेती समृध्द व्हावी हा मुख्य उद्देश उजनी धरणाच्या निर्मितीमागे होता. याबाबत  स्व.चव्हाण यांनी आपल्या ‘युगान्तर’ या ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे. ते म्हणतात, भीमा नदी आडवावयाचे हे जे काम चालले आहे  ते तरी कशाकरता चालले आहे ? ही वाहत जाणारी नदी आम्हाला पाहवत नव्हती म्हणून हे काम चालले नसून या नदीच्या पाण्यात जे सामर्थ्य आहे त्याचा उपयोग आमच्या शेतीला झाला पाहिजे आणि त्या शेतीतून संपत्ती निर्माण झाली पाहिजे, असा या कामाचा अर्थ आहे. 
करमाळे तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली चालली आहेत आणि इंदापूर तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली जात आहेत. आणखीही काही गावे जाणार असतील. या सगळ्या गावांच्या पुनर्वसनाची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पण हे सर्व घडेल आणि हे काम पुरे होईल, असा माझा स्वतःचा विश्‍वास आहे. या घटनेस चाळीस वर्षे पूर्ण झाली पण आपल्या राज्यकर्त्यांनी स्व. यशवंतरावांनंतर धरणग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. विस्थापित गावांची ससेहोलपट दूर करण्यासाठी आजच्या लोकप्रतिनिधींनी व सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

■ राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उजनी धरणाची निर्मिती झाली. विस्थापितांना राज्यकर्त्यांनी वार्‍यावर सोडू नये, त्यांचा मूलभूत विकास करावा, असे विचार होते. आज या घटनेस 40 वर्षे उलटून गेले तरी विस्थापित 52 गावांचा विकास होऊ शकला नाही. राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण झाले झाले आहे. विस्थापित गावांना बारमाही पाणी देणे आवश्यक आहे, तसे होत नाही.  शेती व उद्योगांना कॅनॉलमधून 1 जुलै ते 28 फेब्रुवारीपर्यंत पाणी देण्याची तरतूद आहे. या सर्व नियमांचे पालन होत नाही.
शिवाजी बंडगर, अध्यक्ष उजनी धरणग्रस्त समिती

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(साभार दैनिक पुढारी, सोलापूर १२ मार्च २०१७)

माझ्या जन्माची कहाणी




      गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा नाही. म्हणजे दुःखाला कंटाळून बसणे हे मला आवडत नाही. पण आज मन मोकळं करतोय. यात मी कुठेही कल्पनाविलासाचा वापर केला नाही.

माझ्या जन्माची तारीख काय आहे ? वार कोणता ? वेळ काय ? याबाबची माहिती मला काय माझ्या जन्मदात्यानाही नीट सांगता येणार नाही. कारण संपूर्ण जीवन खूप गुंतागुंतीच्या प्रक्रियांनी बनलेले आहे. अठराविश्व दारिद्र्यात जन्माला आलेल्या माझ्या सारख्या इसमाला मास्तरांनी लावलेल्या जन्मतारीखवरच विसंबून राहावं लागतंय.

 १९८८चे वर्ष असावं.. श्रावण महिना..नागपंचमी जवळ आला होती..... वार शनिवार... अमावस्येची रात्र.... पाऊस धो धो कोसळत होता... वडील कुटुंबाची खळगी भरण्यासाठी शहरात कामाला गेले होते... त्या रात्रीच्या पावसाने तीन पञ्याच्या खोलीत पाण्याचा डोह उभारला होता... चिमणी मधेमधे बंद व्हायची.... अशावेळी आईची प्रसृतीची वेदना ही तीव्र झाल्या होत्या.... अशा या घरात आईला आधार देणारा माणूसच नव्हता.

आईनं कळा सोसत वाड्यातल्या चुलतीला खूप हाका मारल्या.. पण कुणीही जागं झालं नाही... तो पाऊसचं इतका भयानक होता...की घरातला आवाज बाहेर पडत नव्हता... नुसताच रिपरिप पावसाचा आवाज सुरू होता..आईची घालमेल झाली होती... काय करावं तिला कळेनासं झाले.. शेवटी सर्व वेदना सहन करून तिनं मला जन्म दिला.

पहाटेच्या वेळी पाऊस ओसरला होता... तेव्हा माझी आई बाहेर का येत नाही ? म्हणून चुलतीनं घरात डोकावून पाहिलं तर प्रसृतीचं चित्र दिसले. माझ्या अंगावर पावसाचं पाणी पडलं होतं. त्यामुळं मी थंडगार होऊन पडलो होतो. अंगावरची नाळ तशीच होती. आई ही त्या वेदनेतून बाहेर पडल्यानं माझ्याकडं पाहण्याची तिची शक्ती उरली नव्हती.

आयाबाया घरात आल्या.. मी जानवं घेऊन जन्माला आल्यानं खूप भाग्यवान आहे ? असं आयाबाया म्हणाल्या तर कुणी अमावस्येची राञ.... त्यात शनिवार त्यामुळं पोरगं चांगलं निघणार नाही ? असं त्या आतल्या आवाजात बोलू लागल्या.

पहाटे पाच सहा वाजता गावतल्या आत्याला कुणीतरी बोलावून घेतलं. तव्हा माझ्या अंगावरचं जानवं आणि नाळं तिनेचं काढलं.... चुलीवर गरम पाणी तपाला ठेवली पण सरपन पावसात भिजल्यानं चुल पेटतच होती.. कसबसं घासलेट टाकून तिनं पाणी तपावलं.. तिनंच दोघांना अंघोळ घातली. आईला चिमूटभर भात घातला.. घरातही पिठाचा कण नव्हता.. आईला त्या भाताच्या कण्या सुद्धा गोड लागत नव्हत्या..

त्या भयाण रात्री माझा जन्म झाला,असं माझ्या आईनं वीस वर्षापूर्वी सांगितलेली ही माझ्या जन्माची कहाणी. आज या गोष्टीचं स्मरण करताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

घरात शिकलेलं कुणीच नव्हतं.. पंचांग, जन्मकुंडली, नावरस नावं, शनि या गोष्टी पाहायच्या तर लांबच राहिल्या, त्यावेळी माझी जन्मतारीख लिहायलाही कुणाला वेळ मिळाला नाही ? कारण संपूर्ण कुटुंबचं अशिक्षित... तिथं कुठलं आलं ज्ञान ?

शेती पिकत नाही म्हणून नाना (बाप ) मिळेल ते काम करायचा. घरात दोनाची चार हात झाली होती. त्यामुळं पोटाची खळगी भरावी म्हणून तो महिना महिना बाहेर असायचा..

चार लेकरं सांभाळायची चिंता.. शेतात मूठभर दाणे निघायची नाहीत.. आई ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं कामाला जायची. मिळेल त्या पैशातून आपल्या पिलांना घास भरवित.. दिवाळी, दसरा कसा असतो ? माहीत सुद्धा नव्हता.

 पुढं मी रांगायला लागलो.. धडाधडा धावत होतो.. खेळत होतो,बागडत होतो.. अचनाक १९९२-९३ साली माझ्या अंगात भयंकर ताप आला... माझ्या गावात सरकारी दवाखाना होता पण डॉक्टर कधीच वेळेत नसतं.. आईनं, माझ्या अंगावरून मीठ मिरची उतरवली तरी काही झालं नाही...! परगावच्या, खासगी दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जवळ पैसेही नव्हते.

अंगात ताप वाढतच होता.. अन् मला पोलिओ झाला ! एक दोन काय झालं नाही ? काल धावणार पोरगं आज चालताना लगडत आहे हे पाहून त्यावेळी आई खूप रडली होती.

अन् उपाय करायला सुरुवात झाली.. मोठ्या दवाखान्यात दाखवण्यात नेण्यात येऊ लागले. बापानं,माझ्या पायासाठी लवकर इलाज व्हावा म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे शेअर्स अवघ्या पाच सहा हजारला विकले. आज या शेअर्सची किंमत तीन लाखाच्या घरात आहे, असो मी चांगलं चालावं यासाठी माझ्या पायाला राञराञ शेखत बसायची..! कुणाच्या तरी सांगण्यावरून माझा लंगडा पाय दोन तास उकिरड्यात पुरला होता. एवढं करूनही इलाज झाला नाही.

आजही ती माझ्या पायाला खूप जपते. कधी ओझं उचलू दिली नाही. माझ्या कुटुंबांचा आयुष्याचा बारोमास पावसावर अवलंबून असल्याने कधी पाऊस यायचा कधी नाही. त्यामुळं नानांनी शेताचा नांद सोडून दिला होता. आई आणि नानांनी मला खूप शिकवलं..

खूप हलाकीतून शिक्षण घ्यावं लागलं. माझ्या बहिणीला आणि भावाचं प्राथमिक शिक्षण देता आलं.मला ही कधी, पुस्तक, वह्या, कपडे कधी मुबलक मिळू शकले नाही. आठवीत असताना फक्त सहा वह्या मिळाल्या. दहावी कसाबसा पास झालो. अकरावी ते एम. ए पर्यंत एकाच कपड्यावर दिवस काढावे लागले. घासलेटच्या दिव्यावर एम.ए पर्यंत अभ्यास आणि वाचन केलो. एवढं असूनही महाविद्यालयात पहिला नंबरनी पास व्हायचो. याकाळात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. स्कॉलरशिपच्या पैशातून जवळपास ६०० पुस्तके खरेदी केली त्यातून लिखाणाची आवड निर्माण झाली. 

नानांना मी मास्तर व्हावं, अशी इच्छा होती. बी.एड च्या परीक्षेसाठी प्रयत्न करू लागलो. त्या अगोदर सेट नेटच्या सात आठ परीक्षा दिल्या होत्या. प्रत्येकी वेळी ८ -१० गुणांचा फरक पडत गेला. त्यामुळे बी.एड कडे वळलो. सीईटी परीक्षा दिली. चांगले मार्क मिळाले. पहिल्याच यादीत पुण्यातील एस.पी.महाविद्यालयाच्या आवारातील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नंबर लागला. 
महाराष्ट्रातलं सर्वात जुनं महाविद्यालय म्हणून लौकिक होता. प्रवेश अर्ज, फीसची तजबीज करु लागलो. त्याकाळी ८ हजार फीस होती. इतरांच्या दृष्टीनं ही फीस फार किरकोळ होती. माझ्या दृष्टीनं डोंगराएवढी होती. २०११-१२ चं वर्षे असावं. आमच्याकडं भयानक दुष्काळ पडला होता. शेतातून चिपटभरं दाणे सुध्दा निघाले नाहीत. त्यामुळे बीएड ला प्रवेश घ्यायचं नाही. असं मनोमनी ठरवलो.

नानांनी एका व्यापाऱ्याला माझ्या शिक्षणासाठी एक बैल सहा हजाराला विकल्याची बातमी कळली. मी रानात जाईपर्यंत व्यापाऱ्यानं तो बैल घेऊन गेला होता. नानांनी त्या बैलाचे सर्व पैसे माझ्या हातात दिले आणि पुण्याला जाण्यासाठी मनधरणी करू लागले. नाईलाजाने मी बीएडला प्रवेश घेतला. इकडून तिकडून पैशाची तजबीज करून कसाबसा बीएडला प्रवेश घेतला. पुण्यात शिक्षण घेताना खूप हाल झाले. इथल्या आठवणी नंतर कधी तरी सांगेन.

बीएडला चांगल्या गुणांनी पास झालो, माझा मुलगा मास्तर होणार मी आई आणि नाना खुश असतं. पण कुठलं काय ? कशात काय आणि फाटक्यात पाय? अशी गत झाली. दोन वर्षे सलग सगळीकडे अर्ज करत होतो. मास्तर होण्यासाठी १५-२० वीस लाख रूपये मोजावी लागतात, असा वाईट अनुभव मिळाला. ताण-तणाव वाढत गेला.

तीन वर्षापूर्वी सोलापुरात पूर्णवेळ पञकार झालो.
इथे माणसं ओळखायला शिकलो. मान्यवर संपादक आणि पञकाराची वाहवा वाहवा मिळवत लिहीत राहिलो. काहींनी इथेही घाण्याच्या बैलासारखा वापर केला. काहींना माझा कमकुवतपणा सांगून ही त्यांनी गैरविश्वास दाखवला.या क्षेत्रात काम करताना खूप तणाव येतो हे लक्षात आले. बस्स आता प्रामाणिकपणे काम करत रहायचं,पुढे दिवस काढत राहिलो.

सध्या आयुष्याला वेगळे वळण लागतं आहे. ते म्हणजे चांगले काहीतरी सकारात्मक लिहायचं. त्यासाठी चांगले व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे हीच माझी ऊर्जा आणि जन्मकुंडली असणार आहे. हीच माझ्या आयुष्याची कहाणी असणार आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( ११ मार्च २०१६ )
     

बुधवार, १ मार्च, २०१७

कहाणी एका ध्येडवेड्या तरुणाची...!



.......स्वामी विवेकानंदजी ने म्हटले  आहे की, ""मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत,आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर  मी हा पूर्ण देश बदलून टाकेन" आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरूण आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपीठ हवं आहे. त्यातील एक ध्येयवेडा तरूण म्हणजे उमाकांत मिटकर. यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास परिषदेच्या एकलव्य  व पालावरच्या शाळेला जोडलेला हाडाचा कार्यकर्ता. त्यांचा पालावरच्या झोपडीपासून ते सरकारी खुर्चीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. अशा या ध्येयवेड्या तरूणाला  महाराष्ट्र सरकारचा  राज्यस्तरीय 'प्रेरणा युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने उमाकांत मिटकर यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत...!

महाराष्ट्रात भटके विमुक्त,पारधी, बहुरुपी, मसणजोगी, वडारी, कोल्हाटी, गोपाळ अशा जवळपास 52 जातीं-जमाती. ज्यांची पाळमुळं रुजली आहेत,संस्कृतीच्या गडद-गूढ अंधारात. या अंधारलेल्या  समाजाला प्रकाशात आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेला यमगरवाडी (ता.तुळजापूर) येथील एकलव्य प्रकल्प.

ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांनी या ‘यमगरवाडी पॅटर्न’चा पाया रचला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि  परिषद या दोन संस्थांच्या आधारे 1993 साली हे कार्य सुरू झाले. रानावनात हुंदडणारी ही रानपाखरं. यमगरवाडीच्या त्या झोपडीवजा शाळेत पालापालांवरून एकत्र आणली गेली आज यमगरवाडीत जवळपास चारशे- पाचशे विद्यार्थी आहेत. हे चारशे विद्यार्थी म्हणजे चारशे कहाण्या आहेत,अंगावर शहारे उमटणार्‍या. अशा या माणूसपणाच्या शाळेविषयी प्रत्येकाला लळा लागणे साहजिकच आहे. पण ज्याची संवेदनशीलता अधिक तीव्र आहेत अशीच युवक समाजसेवेत येत असतात.  त्यामध्ये उमाकांत मिटकर मोडतात. नळदुर्गच्या बालघाट शिक्षण संस्थेत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पोटपाण्यासाठी धडपडत यमगरवाडीपर्यंत पोहोचलेला युवक पूर्णपणे वैचारिक दृष्ट्या बदलतो, समाजाच्या प्रश्‍नांविषयी, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी विचार करू लागतो, तो युवक म्हणजे उमाकांत मिटकर. साधारण 35 वर्षाचा युवक. आज ते  समाजसेवेतील विविध शिखरे पादाक्रांत करत आहेत. संघटनेने सुरू केलेल्या पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. त्यात उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटके विमुक्तांना शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला. अनेक मुलांमध्ये त्यांच्यातले नैसर्गिक गुण हेरून त्यांना उत्तेजन दिले.

गेल्या दशकापासून  उमाकांत मिटकरांचे काम पाहण्याची संधी मिळत आहे. यमगरवाडीचा एकलव्य प्रकल्प आणि पालावरच्या शाळेचा हा पूर्णवेळ कार्यकर्ता. पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. यास उमाकांतने घेतलेली मेहनत मी अनुभवलो आहे. M.A,M,ed असलेले उमाकांतआता कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून यमगरवाडी येथे 2002 पासून कामास प्रारंभ केले. यमगरवाडी प्रकल्प,  उमरगा, बीड, किल्लारी या भागामध्ये मसणजोगी वस्तीत राहून समाजसेवेला त्यांनी वाहून घेतले.

त्याचबरोबर किनवट, धर्माबाद, नांदेड भागातील भिल्ल, आंध,कोलाम  समाजावर त्यांनी काम केले या समाजातील जाणिवा, प्रश्‍न यांचा सखोल अभ्यास करून पालावरची शाळा हा अभिनव प्रयोग उदयास आला. त्यासाठी उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटका समाज हा शिक्षणापासून पूर्णपणे अंधारात होता. त्यास मूळ प्रवाहात आणण्यासाठी पालावरच्या शाळेचा महत्वाचा वाटा आहे. आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये 35 समाजांमध्ये 48 पालावरच्या शाळा आहेत. यातून शिक्षण, आरोग्य,आत्मसन्मान, स्वावलंबन अशा गोष्टींवर धडे दिले जातात. सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने ही याची दखल घेतली. त्याचबरोबर युनायटेट नेशन्स अ‍ॅन्ड कल्चरल ऑरगयायझेशन (युनिस्को) या संस्थेतर्फे अशिया पॉसिफिक विभागाकडून देण्यात येणारा एज्युकेशन इनोव्हेशन पुरस्कार ही मिळाला आहे.

उमाकांतजी आता येथेच थांबत नाहीत पालावरची शाळा, व्यसनमुक्ती, आरोग्य, बचतगट या कामाबरोबरच त्यांच्यावर आता राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण,महाराष्ट्रा शासन समिती सदस्यपदाची जबाबदारी आली आहे. पोलिस अत्याचार, गुन्हेगार आदी गुंतांगुंतीच्या विषयावर ते सक्षमपणे काम करत आहेत.  सतत ग्राऊंड लेव्हलला काम करणार्‍या या तरुणाला महाराष्ट्र सरकारचा 2014-15 साठी देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रेरणा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील 35 वर्षाच्या आतील युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी या पुरस्कार दिला जातो. गेल्या सोळा वर्षा पासून  भटके विमुक्त जाती-जमातींच्या कल्याणासाठी झटत असलेला ध्येयवेडा युवक उमाकांत मिटकर यांना मार्च 2017 च्या चौथ्या आठवड्यात महामहीम राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थित मुंबई विद्यापीठात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख५००००/-,गौरवपत्र,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मिटकर यांना यापूर्वी जिव्हाळा संस्थेचा (पुणे) राज्यस्तरीय समाजरत्न, हरित मित्र परिवार (पुणे)आदर्श नेतृत्व पुरस्कार,  राज्यस्तरीय युवा चेतना पुरस्कार, आदर्श सामाजिक कार्यकर्ता,ऊस्मानाबाद आयकाॕन असे विविध नामंकित पुरस्कार मिळाले आहेत. अशा या ध्येयवेडा तरूणाला सलाम..!

विकास पांढरे,सोलापूर

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

कहाणी एका नगरसेविकेची

पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक ७ मधून राजश्री काळे भाजपच्या तिकिटावर सहा हजार मते घेऊन निवडून आल्या. पारधी समाजातील त्या पहिल्या नगरसेविका ठरल्या. २०१० साली मी भटके विमुक्त समाजातील महिलांच्या जीवनावर आयाबाया नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची एक नायिका राजश्री काळे होती. आज तिच्या विजयाने पुन्हा एकदा त्या लेखाची आठवण झाली.



ट्रेन लोणावळयाच्या दिशेने चालली होती. पुणे... शिवाजीनगर... एकामागून एक स्टेशने मागे पडत होती. ट्रेनच्या गतीबरोबर तिच्या आनंदालाही अधिक वेगाने भरती येत होती. तिला चिंचवडला उतरायचे होते. चिंचवड प्रभुणे काकांचे गाव. त्यांनीच आधार दिला आणि ती भटकंती सोडून चिंचवडात आली. तेथेच राहिली आणि आज तिच्या आयुष्यातील एक सोन्याचा क्षण... ज्यांच्या प्रतीक्षेत तिने अनेक वर्षे घालवली. छळ सहन केला, गुरासारखे कष्ट उपसले, तो क्षण गरवारे कॉलेजमधील नोकरीचा पहिला दिवस. राजश्री नोकरीचा पहिला दिवस भरून संध्याकाळी चिंचवडकडे परत निघाली होती. तिला काकांना भेटायचे होते. दिवसभराचा अनुभव काकांना सांगायचा होता. आपणही सर्वसामान्यांसारखे जगू शकतो, मारामाऱ्या,चोऱ्या, जेल या कचाटयातून मुक्त होऊ शकतो,स्वत:च्या कष्टावर पोट भरू शकतो. हा काकांनी जागवलेला आशावाद खरा झाला होता. ट्रेनच्या वेगाने राजश्री आपल्या पूर्वायुष्यातील आठवणीच्या प्रदेशात पोहचली. मनातल्या मनात वास्तवाचे जळजळीत तुकडे जोडण्याचा प्रयत्न करू लागली. आठवणी असल्या तरी त्यांनी भोगलेल्या भंगार आयुष्याचे चटके पुन:पुन्हा राजश्रीच्या मनाला बसू लागले.  राखेच्या आत निखारा जसा बसलेला असतो तशी या आठवणीत ही आग होती.  आयुष्यभर पायाला वाट दिसेल तिकडे पळत राहण्याची सवय... कधी पोलिसांची गोळी चुकवण्यासाठी तर कधी पोलिसांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी, फक्त पळणे हाच जीवनातील जास्तीचा भाग. जीव वाचवत घृणा सहन करत राजश्रीच्या मनात अशा विचाराचा, आठवणींचा कल्लोळ चालला होता. ती आठवणीच्या खोल खोल गर्तेत उतरत गेली. स्वत:च्या आयुष्याचे काच तुकडे जमवून एकसंध चित्र पाहण्याचा प्रयत्न करू लागली.

****

पारधी... सांगायला गाव नाही... राहायला घर नाही. मोकळया आकाशाखाली गाववेशीबाहेर पाल ठोकून राहायचे गावाच्या आसऱ्याने ... राजश्रीचे आईवडीलही त्याला अपवाद नव्हते. गणपत भोसले राजश्रीचे वडील, पाच पोरी आणि एक पोरगा असे चिल्या-पिल्याचे लेंढार सांभाळत जगत होते. पोटाची आग विझवायला बाकी पारधी करतात तेच काम करत होते, पण पोरांनी शिकावे, मोठे व्हावे हे स्वप्न त्यांच्याही डोळयांत होते. कोणत्या बापाला वाटेल की आपल्या पोरांनी रानोमाळ भटकावे, चोऱ्या कराव्यात, खून पाडावेत, गणपत भोसलेंनी पोरांना शाळेत घातलं. बाकीच्या बहिणीबरोबर राजश्रीही शाळेला गेली... पहिली... दुसरी... तिसरी... चौथी... राजश्री चौथीत होती. एक दिवस पालावर पोलिसांची धाड पडली... चोरी झालेली... आरोपी गणपत भोसलेला मारझोड करतच पोलिसांनी पालाबाहेर काढले. बेडया घालून घेऊन गेले. एकच गलका झाला... गणपतला पोलिसांनी धरला... साऱ्या पारध्यात पळापळ झाली... राजश्रीचे वय ते किती दहा-अकरा वर्षांचे. हबकली... बापाला पोलीस घेऊन गेले... कशासाठी? चोरी केली म्हणून? पुरावा काय? पारध्याने पुरावा द्यायचा नसतो. सरळ गुन्हा कबूल करून शिक्षा भोगायची असते,नाहीतर पोलीस मरेपर्यंत  मारतात. पण मरू देत नाहीत...  पायाच्या शिरा तोडतात, गुडघ्याची वाटी फोडतात. जायबंदी करतात. एकदा अटक झालेला पारधी स्वत:च्या पायावर सहसा उभा राहत नाही. त्यातूनही सुटला तर पोलीस आवई उठवतात,  हा फितूर आहे...  मग सारे पारधी त्यांच्याशी फटकून वागतात. माणसाला शिवलेल्या कावळयाला जसे बाकीचे कावळे टोचून टोचून मारतात ना अगदी तसे... हे  सारे चित्र राजश्रीच्या डोळयांसमोरून सरकन् पुढे गेले. धक्काबुक्की करत गणपत भोसलेला गाडीत कोंबले, घेऊन गेले. रानोवनी पांगलेले पारधी पुन्हा पालाकडे आले. आपण  वाचलो  याचे समाधान आणि गणपतला अटक यांचे दु:ख दोन्ही एकाच वेळी मग सगळयांच्या चेहऱ्यावरून ओघळले. पुढे कधीतरी केस उभी राहते. न्याय होतो आणि गणपत भोसलेला चोरीच्या गुन्ह्यासाठी सजा झाली. गुलबर्गाच्या जेलमधील भोसले दहा वर्षांसाठी गेला.

****

राजश्रीच्या बापाला ज्या वर्षीसजा झाली त्याच वर्षी तिचं लग्न झालं, ज्ञानेश्वर काळेशी. एक दिवस ज्ञानेश्वर आला आणि सरळ मागणी घातली राजश्रीला. राजश्रीच्या आईनेही होकार दिला. ज्ञानेश्वरचे वडील वारलेले.  आई दुसऱ्या पोराकडे राहत होती.  एका जागी स्थिर होता. पोरगा पाहण्यातला. पोरगीचे नशीब उजळले होते. लग्न नक्की झाले, पण हुंडा आणि जात पारध्यांत पोटभेद आहे. गावपारधी आणि गायपारधी या दोघांत सोयरीक होत नाही.  गावपारधी नवरा हुंडा घेतो,  तर गायपारधीमध्ये नवरीचे आई-वडील हुंडा घेतात. ज्ञानेश्वर गावपारधी आणि राजश्री गायपारधी. दोघंबी एकमेकांना कमी समजणाऱ्या जातीचे. जुळणार कुठून? आणि हुंडा... तो कुठून देणार.  बाप जेलमध्ये सजा भोगतोय. कुठून आणायचे पैसे. तेही थोडेथोडे का हवेत. लाखात हुंडा मोजावा लागणार. राजश्रीची आई हवालदिल झाली, पण ज्ञानेश्वर काळे. त्याने निर्णय घेतला, हुंडा घ्यायचा नाही. राजश्रीच्या आईचा जीव भांडयात पडला. लगीन जुळले. अक्षता पडल्या आणि राजश्री भोसले राजश्री ज्ञानेश्वर काळे झाली. गायपारधी-गावपारधी यांच्यात लगीन लागले. पारध्यांच्यात खळबळ माजली. राजश्रीच्या आईबरोबरच सारे राहू लागले. पोट भरण्यासाठी ज्ञानेश्वराने दारूची भट्टी पेटवली.

****

ज्ञानेश्वर दारूची भट्टी चालवू लागला आणि मदतीला राजश्री. तीही शिकली दारू गाळायला. रोज 400 ते 500 रुपये यायचे. पैसा हातात खुळखळायचा. कधीकधी ज्ञानेश्वर स्वत:ही प्यायचा, तर कधी पोलिसांची धाड पडायची. मग तोडपाणी. प्रत्येक वेळी हजार-दीड हजार खिशात घातल्याशिवाय पोलीस माघारी फिरत नसत. पोलीस हप्ता बांधून घेत. वेळोवेळी येऊन दारू पीत.  पैसे देण्याचे नाव नाही. उलट शिव्यांची लाखोली आणि दंडुक्याचा फटका. दिवस चालले होते. ज्ञानेश्वर-राजश्रीने दोन वर्षे भट्टी चालवली. पण त्या काळात बऱ्याच घटना घडल्या होत्या, ज्या राजश्रीला नकोशा होत्या.

****

''जात बाटवली.''

''गावपारध्याने गायपारध्याची बाईल केली?''

''कुळाला बट्टा लावला.''

''हे खपवून घ्यायचे नाय.''

बारा तोंडी बारा बाता... खवळलेले पारधी... जातीला बट्टा लावणाऱ्यांना जिवंत ठेवायचे नाही. आपसातील कुजबुज. राजश्रीच्या कानी आली. धीराची बाई.  पोरगी जावयाला सोबत घेऊन जगत होती, कष्ट करत होती. पोरगा ज्ञानेश्वर भोसले रंगकाम करायचा... तसा लहानच होता, पण आईला मदत करायचा.  गणपत भोसलेला जेल झाली आन् सारा कुटुंबकबिला धरमगावाकडे गेला. मंगळवेढा सोडला. बापाला पोरांनी शिकावे असे वाटायचे. आईने ते पुरे करायचे ठरवलं. राजश्री आन् तिची बहीण  शाळंला जाऊ लागल्या. पुन्हा अक्षरं गिरवू लागल्या.  शाळेत अंतर पडले होते. चौथीनंतर शाळा थांबलेली. आईने जिद्द केली. पोरांना शाळेला घातले.  राजश्री शिकू लागली. पाचवी, सहावी, सातवी. राजश्रीचे शाळेचे अनुभव विलक्षण. शाळेत पोरे छळायची. वाटेने छेड काढायची, जवळ बसू देत नव्हती. पण राजश्रीने जिद्द केली. शाळेला जात राहिली. दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली होती. प्रत्येकजण आपापल्या डबा खात होता. राजश्रीला कुणी जवळ करीना. केविलवाणी झाली. मराठा,सुतार, धनगर जातीची पोरे-पोरी राजश्रीला जवळ घेईनात. पारधी ना ती... पेन्सिलीची चोरी केली तर? पुस्तकांची चोरी केली तर? त्यांच्या मनात शंका असे.

शाळेच्या बाई मात्र राजश्रीच्या जिद्दीचे कौतुक करत. मायेने जवळ घेत. हवे नको ते पाहत. राजश्री कबड्डी चांगली खेळायची. अनेक वेळा शाळेच्या संघातून ती खेळली. संघ जिंकला. अशा वेळी बाईचा ऊर भरून येत असे. संघ जिंकला की बाई राजश्रीला बक्षिसे देत. वह्या,पेन शाळेसाठी लागणारी साधने.

****

हूल उठली. जात बाटवणाऱ्यांना खतम करणार. राजश्री आणि ज्ञानेश्वर काळेला ठार करणार. राजश्री आणि ज्ञानेश्वर दोघेही सावध झाले. पारध्याची जात शब्दांना फिरणार नाही. दारूची भट्टी चालवून दिवस काढत असताना आता तर मोठे संकट समोर होते. त्यातच ज्ञानेश्वर काळेच्या नातेवाईकांत काहीतरी बिनसले. तो राजश्रीला तिच्या आईकडे सोडून निघून गेला. पण पूर्वी निसर्गाने त्यांचे काम केले होते. राजश्रीच्या पोटात गर्भ वाढला होता आणि ज्ञानेश्वर राजश्रीला सोडून गेलेला. जीव हवालदिल. अशा वेळी नवरा जवळ हवा. तो निघून गेलेला. पण जास्त दिवस नाही. आला परत. मालू पवारचा मर्डर झाला आणि ज्ञानेश्वर परत आला. राजश्री व ज्ञानेश्वरने विचार केला, हे पारधी आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत. इथून पळाले पाहिजे. एक दिवशी दोघे अचानक गायब झाले. कुठे गेले? कसे गेले? कुणाला कळले नाही. पण पारध्यांत आवई उठली. ज्ञानेश्वर काळेला राजश्रीसोबत मारून टाकले? हे काम कोणाचे? गावपारध्याचे की गायपारध्याचे?दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले. पोलीस कम्प्लेंटपर्यंत मजल गेली. एकमेकांविरुध्द काठया-कुऱ्हाडी उठल्या. जात-पंचायत बसवू,आव्हाने, प्रतिआव्हाने झाली. पण राजश्री व ज्ञानेश्वर दोघेही सापडली नाहीत. दोघेही हुबळीला पोहोचली होती. एका आजीबाईच्या सहाऱ्याने तेथे राहिले. पण महिन्याभराने पुन्हा आपल्या माणसांची ओढ लागली. एक महिन्यानंतर दोघेही परतली. तेव्हा कुठ वादळ शांत झाले. मग ख्रोबापूरला पाल टाकले. दोन वर्षे तेथेच राहिले. दारूची भट्टी लावली. शिवानीचा जन्म झाला. संसारात एकाची भर पडली.

****

यमगरवाडीला आश्रमशाळा सुरू झाली होती. परभुणे काका, गडेकर गुरुजी, सोलापूरचे अण्णा व्हटकर पालापालावर फिरत होते. देवकामावशीनेच प्रभुणे काकांची आईशी भेट घालून दिली. मंगळवेढयाला रमेश काळे, प्रभू काळे हत्याकांड झाले. रमेश काळे राजश्रीच्या आईचा मामेभाऊ तर प्रभू काळे आईचा मामा. रमेश काळेचा पोलीस अत्याचारात जीव गेला,तर प्रभू काळेच्या गुप्तांगात जंतू झाले. पोलिसांनी त्याला लाईटचा करंट लावला होता. या प्रकरणात प्रभुणे काकांनी पुढाकार घेतला. अन्याय, अत्याचाराचे प्रकरण कलेक्टरसमोर धसास लावले. रमेश काळेच्या कुटुंबीयाला सरकारी मदत मिळाली आणि पारध्यांचे प्रश्न,त्यांचे पुनर्वसन यांची गरज अधिक तीव्रपणे जाणवू लागली.

महाराष्ट्रात तेव्हा युतींचे शासन होते. भटके-विमुक्त विकास परिषद आणि संघ कार्यकर्त्यांनी जोर लावला. पाहता पाहता प्रथम वसनाचा प्रयोग यशस्वी झाला. सय्यद वरवडयाला पारध्याचे प्रथमवसन झाले. ज्यांना सांगायला गाव नव्हते, त्यांना गाव मिळाले. राजश्री ज्ञानेश्वर काळेंची झोपडी ही या प्रथमवसनात वसली.

****

स्वत:चे घर बांधायचे, सन्मानाने राहायचे,प्रभुणे काकांनी सांगितले, पण त्यासाठी अवघड अट घातली. चोरी न करता घरासाठी पैसे जमवायचे, पैसा पैसा स्वत:च्या कष्टाचा आणि सच्चाईचा हवा. चोरी, दरोडे टाकून घर बांधू नका. सय्यद वरवडे येथे 45 एकर जमीन सरकारकडून मिळाली. येथे प्रथमवसन व्हायचे होते. पक्की घरे स्वत:च्या कष्टातून उभारायची,असे काका नेहमी सांगत. सय्यद वरवडेला झोपडया उभारल्या गेल्या आणि पारधी कुटुंबे तेथे राहू लागली. पारध्याची पोरं यमगरवाडीच्या आश्रमात शिकू लागली. पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा तर पोराबाळांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक होते. यमगरवाडी हे हक्काचे आणि आधाराचे स्थान वाटू लागले. यमगरवाडी. तेथील महाशिवरात्रीचा स्नेहमेळावा. भटकेश्वराची जत्रा. सारे भटके येथे जमा होत. सय्यद वरवडे येथीलही पारधी येत स्नेहमेळाव्याला.  एक वेळ राजश्रीही आली. महाशिवरात्री आदली रात्र म्हणजे भटकण्याची जागरण रात्र. भटक्यांनी विविध कला सादर कराव्यात, संस्कृतीचे गोडवे गावेत. यासाठी या कार्यक्रमाची योजना. गाण्यातून, पोवाडयातून राजश्रीला आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान इतिहास, वारसा, परंपरा कळत गेला. आपण चोर नाही, दरोडेखोर नाही. देशाच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी आपल्या वीर पुरुषांनी बलिदान केले आहे.  मग का आली अशी जन्मासोबत भटकंती. पोलीस गोळीवर लिहिलेले नाव. का? कशासाठी? असंख्य प्रश्नाचे भुंगे राजश्रीचा मेंदू पोखरू लागले. इतके दिवस जगलेले भणंग आयुष्य तिला नव्याने कळू लागले. आपण जे जगलो ते आपल्यावर लादले गेले होते. आपण मुक्त होऊ शकू  का या जाचातून. कितीतरी वेळ राजश्री विचारचक्रात गुंतून पडली.

हे संघाचे लोक. प्रभुणे काका, किती भटकंती करत आहेत आपल्या लोकांसाठी आणि हे यमगरवाडी, मुक्तिनगर, सय्यद वरवडेचे प्रथमवसन किती केले या लोकांचे कशासाठी?तर आपण सर्व एका भारतमातेचे पुत्र आहोत, या भावनेच्या पूर्ततेसाठी संघ काम करतोय. हे सर्वच कार्यकर्ते नि:स्वार्थीपणे काम करत आहेत. सामाजिक परिवर्तनाचा विश्वास त्यांनी कामातून जागवला आहे. संघशक्ती नक्कीच भटके- विमुक्तांचे जीवन बदलेल. आपणही त्यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांनी मार्ग शोधला आहे...  संघविचाराने आपण विश्वासाने त्यांच्यासोबत जायचे, मार्गक्रमण करायचे. संघाची माणसं चांगली आहेत. देव माणसं ही. तेच घडवतील आपले पुढचे आयुष्य आणि थांबवतील आपले भटके जगणे.

यमगरवाडीचा स्नेहमेळा संपला. जमलेले भटके परत फिरले. राजश्रीही सय्यद वरवडेला परत गेली. तिथे तिची झोपडी... गावात मोलमजुरी करून दिवस काढत होती. प्रथमवसन झाल्यापासून दारूची भट्टी बंद केली होती. मजुरी करूनही अर्धपोटी राहावे लागत होते. कामासाठी दारोदार भटकावे लागत होते. पारध्याची जात आडवी येत होती. चोरी करील म्हणून कोण काम देत नव्हते. दिले तर सक्त पहारा असे. एक दिवस प्रभुणे काका सय्यद वरवडेला प्रवासात आले. सर्वांची विचारपूस झाली. बोलत बोलत प्रभुणे काका राजश्रीच्या झोपडीपर्यंत आले. सर्वजण भोवती गोळा झाले. हाताला काम पाहिजे. पण चोऱ्या करायच्या नाहीत.कष्ट करायचे पण दारूची भट्टी चालवायची नाही. सन्मानाने जगायचे, पण कसे? प्रश्न बिकट होता. काका सांगत, नवे काहीतरी शिका. सहज शक्य आहे असे प्रशिक्षण घ्या. हस्तकला, हस्तव्यवसाय शिका. मसाले,पापड, लोणची, शिलाई असे कितीतरी व्यवसाय शिकण्यासारखे आहेत. पुण्यात, मुंबईत असे व्यवसाय शिकवले जातात. तुमच्यापैकी कोण कोण शिकायला जाईल? शिकण्यात तर फायदा तुमचाच. विचार करा. तुमच्या नेहमीच्या जीवनापेक्षा हे काम वेगळे आहे. पण शिकण्याला पर्याय नाही. काका बोलताना थांबले. काकांचा सल्ला उपयुक्त होता. नव्या जीवनाची सुरुवात करणारा होता. राजश्री,ज्ञानेश्वर दोघेही तयार झाले.

****

काकांनी काम केले. राजश्री व ज्ञानेश्वरला पुण्याला बोलावले. पुण्याच्या खादी ग्रामोद्योग भवनात म्हणजे आगाखान पॅलेसमध्ये त्यांची प्रशिक्षण व्यवस्था केली. पण चांगल्या कामात खूप मोडते असतात. तसेच झाले. राजश्रीला प्रवेश नाकारला. कारण राजश्रीच्या पोटचा गर्भ. राजश्रीला दिवस गेले होते. गर्भवती अवस्थेत शिलाई मशीन प्रशिक्षण शक्य नव्हते. आगाखान पॅलेसमधील प्रवेश हुकला. राजश्री हबकली,निराश झाली. आता काय करायचे? सय्यद वरवडे सोडून येताना किती स्वप्ने आणली आपण सोबतीला. शिकू. स्वत: कमावू, कुणाच्या आधाराशिवाय जगू, पण प्रवेश नाकारला. आता काय? आपण जातीपेक्षा वेगळे करतोय. पारध्याची बाई असं प्रशिक्षण, शिक्षण घेत नाही. पारध्याची बाई म्हणजे पापाचे मूळ. आपण धाडसाने आलो. पारधी समाजातील बंडखोरी. समाज कसा स्वीकारेल मला... राजश्री विचारात गर्क  झाली.

****

पुन्हा काकांची धावपळ, शोधाशोध, कुठे प्रशिक्षण द्यायचे, तोपर्यंत राजश्री चिंचवडला प्रभुणे काकांच्या घरी राहिली. प्रयत्न चालू होते. शेवटी शिरूर तालुक्यातील पाबळ येथे प्रशिक्षण मिळू शकते असे लक्षात आले. काका पोहोचले तेथे. संस्थाचालकांना विनंती केली. घेऊन या म्हणाले. काका राजश्रीला घेऊन पोहोचले.

''हिला प्रशिक्षण हवं आहे. काखेत शिवानीला घेतलेल्या राजश्रीकडे पाहत संस्थाचालक म्हणाले.

''हो.'' काका.

''हिला तर मुलगी आहे आणि पुन्हा गरोदर...''संस्थाचालक.

''असे आहे खरं, पण प्रशिक्षणही गरजेचे आहे''काका. ''गरोदर अवस्थेत शिलाई प्रशिक्षण अशक्य असते. गर्भाला धोका पोहोचू शकतो.''

''आणि गर्भच नसेल तर? तर द्याल प्रशिक्षण?''इतक्या वेळ शांतपणे ऐकणारी राजश्री बोलली. सारेच अवाक् झाले. काकाही... ती पुढे बोलली, ''मला प्रशिक्षण हवं आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.''

''आपण विचार करू या.'' प्रभुणे काका.

''काका... मला जर इथे प्रशिक्षण मिळणार असेल तर मी पोट खाली करून घेईन. माझा विचार पक्का आहे.''

राजश्री बोलली. काका विचारात पडले. काय करायचे?

एक नवसृजनाची हत्या की राजश्रीच्या नवजीवनाला सुरुवात? खरं तर निर्णय तिने घ्यायचा आहे. आपण  फक्त आधार व्हायचे. तिचा तीच निर्णय घेईल.  लहान नाही राजश्री आता. ठरवू देत तिलाच. आपण पाठीमागे भक्कम उभे राहू. राजश्रीचा निर्णय तिने कृतीत आणला. प्रशिक्षण सुरू झाले.

पाबळला प्रशिक्षण मिळू लागले, पण राहायची सोय संस्थेत नव्हती. राजश्रीला शिलाईकाम तर ज्ञानेश्वरला गवंडीकामाचे प्रशिक्षण मिळत होते. गावात खोली भाडयाने घेऊन तेथे राहत होते. प्रशिक्षण घेता घेता बाहेर मोलमजुरी करत होते. दिवस जात होते. मशीनच्या चाकाबरोबर राजश्रीच्या भाग्याची चाके गतिमान होत होती. राजश्री शिकली मेहनत करून, बंड करून जिद्दीने शिकली. ज्ञानेश्वरची साथही तशीच आश्वासक होती. दोघेही सय्यद वरवडेला परतले. सर्वांच्या नजरा रोखलेल्या. कुजबुज चाललेली. काहींनी धाडस केलेच. राजश्रीला हटकले.

''का गं. पोट खाली का केले?''

''शिकण्यापायी पोट पाडलंस?''

''आम्ही सांभाळले असते पोराला...''

''तुला एवढं जड जात व्हतं व्हय.''

''अगं पोरं देवाची देण. तेच तू पाडलंस.''

चारी बाजूंनी प्रश्नांचा भडिमार... जीवघेणा दबाव...  पारधी बाई कधी गर्भपात करत नाही. राजश्रीने केला. आधीच प्रशिक्षणासाठी जातीच्या परंपरा तोडल्या, पुन्हा गर्भपात. तेही पारध्याची परंपरा मोडणारे. सय्यद वरवडेला प्रथमवसनात राजश्रीला या भयाण वास्तवाचा सामना करावा लागला. त्यातूनच कुणीतरी ज्ञानेश्वरचे कान भरले. ''बाईल हातातून गेली तुझ्या'', ''आत्ताच विचार कर, नंतर पस्तावशील.''राजश्रीला हे कळत होते. सय्यद वरवडे गावापासून प्रथमवसन दोन किलोमीटर दूर गावात जाऊन शिलाईचे काम आणण्याचा प्रयत्न राजश्रीने सुरू केला. पण गावात आधीच दोन-तीन टेलर्सची दुकाने. काम किती मिळणार?पुन्हा मोलमजुरी. कधीतरी काका सय्यद वरवडेला  येतात. पुन्हा राजश्रीचे गाऱ्हाणे. काय करूया? काकांपुढचा प्रश्न. करूया. बघूया... दिवस जात असतात. पुन्हा कधीतरी काका निरोप देतात- राजश्री यमगरवाडीला ये. तेथे बघू. यमगरवाडी भटक्या -विमुक्ताचे आधुनिक तीर्थक्षेत्र. राजश्री, ज्ञानेश्वर,  शिवानी तिघेही यमगरवाडीला पोहोचले. वसतिगृहातील मुलींना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याची सूचना काकांनी केली. वसतिगृहात भोजन- निवासाची व्यवस्था झाली. कपडालत्ताही मिळू लागला, वर मानधन म्हणून 300 रुपयेही मिळू लागले.

****

राजश्री यमगरवाडीत रुळली. शबरीमाता वसतिगृहातील मुलींना शिलाईकाम शिकवू लागली. ज्ञानेश्वरही सोबत होता. पारधी पुरुष कमालीचा संशयी, हलक्या कानाचा. ज्ञानेश्वर त्याला अपवाद नव्हता. आसपासच्या परिसरात जाऊन तो गवंडीकाम करायचा. एक दिवस अचानक तो निघून गेला. राजश्री यमगरवाडीला. ज्ञानेश्वर त्याच्या आईकडे. पारध्याने बाईला सोडून जाणे म्हणजे फारकत. न बोलताही समजणारे वास्तव. राजश्री चिंतातुर झाली, पण काही दिवसच. ज्ञानेश्वर परत आला. चुकलो म्हणाला. पुन्हा असे करणार नाही असे सांगून राजश्रीची समजूत घातली. प्रभुणे काका अधूनमधून यमगरवाडीला येत. एकदा राजश्रीच्या पुढच्या शिक्षणाबद्दल बोलले. राजश्रीने धाराशिवला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. खंडित झालेली ज्ञानसाधना सुरू झाली.

****

यमगरवाडीची संध्याकाळ... वसतिगृहातील चिमणीपाखरं भोजनगृहाकडे जात होती आणि अचानक गाेंधळ झाला. ज्ञानेश्वरने राजश्रीला मारहाण सुरू केली.  कारण काय? माहीत नाही. राजश्री मार सहन करत होती. शिवानी केविलवाण्या नजरेने आपल्या मार खाणाऱ्या आईकडे आणि मारझोड करणाऱ्या बापाकडे पाहत होती. ज्ञानेश्वर बेभान झाला होता. मारत राहिला. राजश्रीचा चेहरा काळानिळा झाला. मारझोड करून ज्ञानेश्वर निघून गेला. पुन्हा राजश्री एकटी? नाही तिच्या पोटात गर्भ होता. चिमुरडी शिवानी सोबत होती. ज्ञानेश्वर मात्र या सर्वांना सोडून निघून गेला.

****

दिवस पूर्ण झाले. धाराशिवच्या रुग्णालयात राजश्रीने मुलीला जन्म दिला. यमगरवाडी प्रकल्पावर  पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या गौरीताई कानिटकर तिच्यासोबत होत्या. प्रकाश ढवळे हॉस्पिटलमध्ये येत होते. या बाळंतपणाच्या काळात राजश्रीने निर्णय घेतला. तिने अनुभवले होते अठरा विश्व दारिद्रयात जगणारे पारध्याचे जिणे. दहा-बारा पोरांचे लेंढार सांभाळायचे. पोटाला अन्न नाही. अंगाला वस्त्र नाही. धड सांभाळता येत नाहीत तर कशाला हवीत ढीगभर पोरे. आपण हे थांबवायचे. आपण संतति नियमन करायचे. स्वत:चा निर्णय स्वत: घ्यायचा. राजश्रीने निर्णयाची अंमलबजावणी केली. छोटी मुलगी. शिवानीला घेऊन राजश्री यमगरवाडीला आली. राजश्री बाळंत झाल्याचे कळताच ज्ञानेश्वर यमगरवाडीला पोहोचला. मुलगी झाली यापेक्षा राजश्रीने ऑपरेशन केले याचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. लहान बाळाला न पाहताच तो म्हणाला, ''मला मुलगा पाहिजे होता.''

''पण ही मुलगी आहे.''

''मला मुलगा हवा होता. तू ऑपरेशन का केलेस?''

''तुला मुलगा देण्याची कपॅसिटी माझ्यात नाही.'' राजश्रीने उत्तर दिले. ''तुम्हाला मुलगा पाहिजे तर दुसरे लग्न करा, माझी ना नाही...''पण मला या जाचातून मोकळे व्हायचे होते म्हणून मी ऑपरेशन करून घेतले.''

बंडखोरी. राजश्री बंडखोरी करते आहे समाजाशी. स्वत:च्या नवऱ्याशी. ज्ञानेश्वरचा संताप अनावर झाला. मारझोड करून पुन्हा तो निघून गेला.

****

ज्ञानेश्वरचे असे मारझोड करून निघून जाणे,मनाला येईल तेव्हा परत येणे, हक्क गाजवणे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. प्रभुणे काका यमगरवाडीत असताना एक दिवस ज्ञानेश्वर आला. काकांनी त्याची समजूत घातली. राजश्रीलाही बोलावली.

''काका, यांना जर मला सोडायचे असेल तर सोडू देत. मला आता मार सहन होत नाही. यांना मुलगा पाहिजे. ती देण्याची कपॅसिटी माझ्यात नाही. हे दोन्ही पोरींनासांभाळणार असतील तर ठीक. नाहीतर मी स्वत: त्यांना सांभाळीन. शेवटी मी आई आहे त्यांची.'' राजश्री बोलू लागली. तिच्या चेहऱ्यावर तेज होते. स्वतंत्र व्यक्तित्वाचा तो प्रकाश होता. राजश्री पुढे म्हणाली, ''त्यांनी दुसरं लग्न करावं. माझी आडकाठी नाही.'' ''मी नाही दुसरं लग्न करणार.'' ज्ञानेश्वर.

''मारझोड... तीही सहन करण्याची कपॅसिटी माझ्यात नाही.'' राजश्री.

''नाही. मी लिहून देतो काका... मी राजश्रीला मारणार नाही... तिला सोडून जाणार नाही. तिच्यासोबतच राहीन.'' ज्ञानेश्वर भूतकाळातील चुका डोळयासमोर आणत बोलला. काकांना आनंद झाला. ज्ञानेश्वरने काकांच्या साक्षीने लिहून दिले. राजश्री आणि दोन मुलींबरोबर ज्ञानेश्वर यमगरवाडीला राहू लागला.

****

दिवस जात होते. राजश्रीचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शिक्षण संपत आले. यमगरवाडीच्या प्रकल्पावर मिळणारे तीनशे रुपये खूप मोलाचे होते, पण त्यात भागत नव्हतं. राजश्री जगली जाती भटक्याचे आयुष्य, पण तिला मुलीच्या आयुष्याला घडवायचे होते.  शिक्षण चालू असताना गौरीताईंशी हितगुज करी. शिक्षण झाल्यावर काय काम करता येईल याचा विचार करी... तिला माहीत होते... प्रभुणे काका... भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते आपल्याला नक्की मदत करतील. कुठले कोण?पण नात्यातील माणसासारखा व्यवहार करतात. प्रभुणे काका तर वडिलांसारखी माया करतात. बाप जेलमध्ये गेला. त्यांची माया नाही मिळाली. आधार नाही मिळाला. पण प्रभुणे काकांनी तो दिला. पुढेही तेच मदत करतील.

****

चिंचवड स्टेशन आले होते. राजश्री उतरली. धावतपळत सावरकर नगरमध्ये प्रभुणे काकांच्या घरी पोहोचली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. प्रभुणे काका, काकू दोघेही आनंदले. राजश्रीने नोकरीचा पहिला दिवस भरला. पालावरची पोरे. गरवारे महाविद्यालयात नोकरी करू लागली याचा आनंद प्रभुणे काकांनाही झाला. तो श्रमसाफल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. भटके-विमुक्त विकास परिषद आणि संघविचारांच्या कामाची ही पोचपावती होती.

नोकरीला लागून तीन महिने झाले होते. राजश्री प्रभुणे काकाकडेच राहत होती. दररोज बस, रेल्वेचा प्रवास करून पुण्याला जात होती. दिवसभरातील नवेनवे अनुभव सांगत होती.

''राजश्री, आता तू घर कर.'' काका.

''मलाही तसेच वाटते.'' प्रभुणे काकू.

राजश्रीसाठी चिंचवडमध्ये घर शोधण्यास गेले. डिपॉझिटचे पैसे प्रभुणे काका आणि गौरीताई कानिटकरांनी दिले. छोटयाशा खोलीत राजश्रीने संसार थाटला. ज्ञानेश्वरही आला. दोन मुली... राजश्री असा चौकोनी संसार सुरू झाला. नोकरी चालू होती. ज्ञानेश्वर पुण्यात, चिंचवडात, पिंपरीत जिथे मिळेल तेथे गवंडीकाम करत होता. रंगकामाची छोटी-मोठी कामे घेत होता. दिवस चालले होते. मुक्त होणे म्हणजे बंध तोडणे असा अर्थ राजश्रीला मान्य नसावा. पूर्वायुष्यात कधीही मदतीला न येणारी सासू, ज्ञानेश्वरची आई, हिलाही चिंचवडला राजश्रीने आणले. सून आणि लेक सन्मानाने जगत आहेत. स्वकष्टाच्या कमाईवर चार घास सुखाने खात आहेत. हे पाहून त्या माऊलीचे डोळे भरून आले. काही दिवस राजश्रीकडे राहून त्या परत गेल्या.

****

हंगामी कर्मचारी म्हणून गरवारे कॉलेजमध्ये नोकरीला लागलेली राजश्री तेथे कायम झाली. पगार वाढला. हाती पैसा येऊ लागला. पैसा येण्याची वाट एक, पण तो कसा खर्च करायचा याच्या वेगवेगळया वाटा असतात. राजश्रीच्याही होत्या. स्वत:साठी मर्यादित खर्च करणारी, बस रेल्वेचा धावपळीचा प्रवास करणारी राजश्री. मुलीबाबत मात्र जागरूक होती. पहिला पगार आला सहा हजार रुपये. राजश्रीने दोन्ही मुलींची,नवऱ्याची ङ.ख.उ. पॉलिसी काढली... मुलीच्या भवितव्याचा विचार आईच अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. त्यांचे शिक्षण, लग्न यांची तरतूद राजश्रीने केली. स्वत: मात्र साधीच राहिली. न थकता काम करत राहिली. पैसा पैसा जमवत राहिली. ज्ञानेश्वरही आता गवंडीकामात स्थिर होत होता.  पुण्यात त्याला चांगल्या प्रकारे काम मिळत होते. राजश्रीने साठवलेल्या पैशातून ज्ञानेश्वर काळेला मोटरसायकल घेऊन दिली... ज्ञानेश्वर पुणे, चिंचवड मोटर सायकलवरून प्रवास करू लागला. राजश्री मात्र चिंचवड, पुणे रेल्वे आणि बसमधूनच दररोज येत-जात राहिली. शिवानी शाळेत जाऊ लागली. तिच्या सर्व गरजा,राजश्री पुऱ्या करू लागली... चिखलात उगवलेले कमळ जशी आपली मुळं घट्टपणे चिखलात रुजवते तशी राजश्रीही शिकली,नोकरीला लागली, पण आपली पार्श्वभूमी विसरली नाही. नातेवाईक, आई, सासू, भाऊ,दीर, नणंद यांच्याशी फारकत न घेता, त्यांच्याशी संबंध ठेवून राहिली. ज्ञानेश्वर भोसले राजश्रीचा भाऊ.. त्याला खुनाच्या खोटया आरोपाखाली अटक झाली. त्याला सोडवायला केसचा खर्च20 ते 22 हजार रुपये राजश्रीनेच केला. राजश्री नाती, संस्कार विसरली नाही.

****

समाज बदलतो. प्रयत्न हवेत. राजश्री हे त्यातीलच एक उदाहरण. संघविचार आणि समर्पित कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून यमगरवाडीचे माळरान फुलले. राजश्रीसारखी जीवन घडवण्याची कार्यशाळा अव्याहतपणे चालू आहे. ही कार्यशाळा माणूस घडवते, त्याला खंबीरपणे उभे करते. संघ-विचार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. मग त्यांच्या यशाची क्षितिजे झळाळून उठतात. क्षितीज हाती आले तरी मातीचे भान आणि नात्याची जाण कायम हृदयात ठेवण्याचा वसाही याच कार्यशाळेत दिला जातो.
रवींद्र गोळे

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

गरिबांची गाय


महात्मा गांधी शेळीला गरिबांची गाय म्हणत. गोपालन करायला मोठी गुंतवणूक करावी लागते. म्हशींचे विचारुच नका. आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांना शेळी आणि कोंबड्या हाच एक आधार.

       काल आमच्या शेळीने ( उस्मानाबादी जात) चार पिले दिले. पिले ठणठणीत आहेत. अगोदर तिने तीन तीन पिले दिली आहेत. वर्षभरात ३० हजारांचे उत्पन्न दिले आहे. आता चार पिले मिळून उत्पन्नाचा अकडा वाढतच जाणार आहे. त्यामुळे घराला थोडासा आधार मिळाला आहे. भविष्यात शेळीपालन करण्याचा मानस आहे.

संबंध आशिया खंडात उस्मानाबादी शेळी प्रसिद्ध आहे. भौगोलिक वातावरण, हवामान या घटकांमुळे उस्मानाबादी शेळीचे महत्व आहे.भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळतो.

शेळी पालनाचे फायदे

अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो.

शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.

शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.

शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.

शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.

शेळयांचे खत उत्तम असते.
आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.

शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.

शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.

विकास पांढरे,९९७०४५२७६७

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...