दैनिक सोलापूर 'तरूण भारत'चे समूह संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेठे यांनी आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये उद्दिष्ट ठरवणे आणि ते पूर्ण करण्यासाठी काम करणे या गोष्टींच्या स्वातंत्र्याची चव पुरेपूर चाखल्यामुळेच त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात परिवर्तन घडवून आणले आहे.
लोकप्रबोधनाची साधने ज्यांच्या हातात असतात. त्यांना भूतकाळाचे ज्ञान, भान आणि दूरदृष्टी लाभलेले यशवंत पेठे यांनी 'सोलापूर तरुण भारत' ची धुरा यशस्वीपणे सांभाळली. या कुशल प्रशासक व व्यवस्थापकाचे सुपुत्र म्हणजे दिलीप पेठे. १९७७ सालच्या आणीबाणीमुळे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली. सरकारविरोधात आवाज उठविणारे वृत्तपत्र म्हणून 'तरूण भारत'चा उदय झाला. पुणे आवृत्तीनंतर कर्नाटक सीमेलगत असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी १९८५ साली 'तरुण भारत' ची आवृत्ती सुरु झाली. चित्तरंजन पंडित, विवेक घळसासी, अरविंद जोशी, अनिल कुलकर्णी, अरूण करमरकर आदी मातब्बर संपादकांनी 'तरुण भारत' चा लौकिक वाढवला. 'माध्यमा', 'मानसी' 'सदाफुली', 'विविधा', 'आसमंत', 'हॅलो इन्स्पेक्टर' या पुरवण्यांनी वाचकांची मने जिंकली होती. रविवारची 'आसमंत' व चित्रपट व कला क्षेत्रांची वेध घेणारी 'सदाफुली' ही पुरवणी आजही सुरू आहे.
वृत्तपत्र चालविणे तसे कठीण काम. विचारधारेसाठी वृत्तपत्र चालविणे त्याहून महाकठीण काम. विविध कारणांमुळे 'तरुण भारत' ची पुणे व देवगिरी आवृत्ती बंद करावी लागली. पण काल प्रवाहात 'सोलापूर तरुण भारत' टिकून राहिला व विस्तारला. यामागचे व्यवस्थापन समजून घेतले पाहिजे.
सोलापूरचा 'संचार' साताऱ्याचा 'ऐक्य', नाशिकचा 'देशदूत', ' चिपळूणचा 'सागर' 'अलिबागचा 'कृषिवल', नांदेडचा 'गोदातीर समाचार' या प्रादेशिक दैनिकाच्या तुलनेत सोलापूर 'तरूण भारत' चा विस्ताराचा वेग मोठा आहे. यासाठी 'तरुण भारत' ने कालानुरूप बदल स्वीकारला. फक्त सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी मराठवाडा आवृत्ती सुरु केली. संभाजीनगर येथे स्वतःच्या मालकीची छपाई मशीन सुरू करून मराठवाड्यात 'राष्ट्रविचार' पोहोचवत आहे. महत्त्वाचे म्हणजे बीदर, गुलबर्गा, हुमनाबाद, विजयपूर या कन्नड भाषिक जिल्ह्यात जाणारे 'तरूण भारत' हे एकमेव दैनिक आहे. ही विस्ताराची यात्रा सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे.
माध्यमातील बदल थांबवणे कोणालाही शक्य होणार नाही. परंतु योग्य धोरणे आखून वृत्तपत्र विकास साधणे हे मालकाच्या किंवा व्यवस्थापकाच्या हाती असते. दिलीप पेठे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 'तरूण भारत' ला उभे केले आहे. जगभरातील वाचकांना 'तरूण भारत' वेब आवृत्ती असो की, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हक्कासाठी सुरू केलेले 'वृत्तवेध' न्युज चॅनल म्हणजे त्यांच्या एकंदर कामाचा व प्रयोगाचा परिचय करून देणारा आहे. आज 'तरूण भारत' म्हणजे पेठे, पेठे म्हणजेच तरुण भारत' असे समीकरण बनले आहे.
दिलीप पेठे यांनी माझ्या उमेदीच्या काळात मला प्रोत्साहित केले. त्यांच्यामुळेच वयाच्या सोळाव्या वर्षी मी 'तरुण भारत' चा वार्ताहर होऊ शकलो. विपणन विभागातील तत्कालीन प्रतिनिधी मसरे यांनी माझी परिस्थिती पाहिली तेव्हा पेठे यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा पेठे यांच्यामुळे दरमहा दीडशे रूपये मानधन मिळू लागले. त्याकाळात ग्रामीण वार्ताहरांना कोणतेही वृत्तपत्र मानधन देत नसत. (मुख्य धारेतील वृत्तपत्र त्यांच्या व्यावसायिक/ जाहिराती किती दिल्या यावर मानधन द्यायचे ) यामुळेच अनेक ग्रामीण विषय हाताळता आले.कुशल व्यवस्थापक, मितभाषी, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीत सदैव पाठीमागे उभे राहणारे असे त्यांचे गुणवैशिष्ट्ये.
सरांचा आणि माझा २००३-०४ सालापासूनचा परिचय. २०१३-१४ साली हा परिचय अधिक घट्ट झाला. काही महिन्यांपूर्वी आमची भेट झाली होती. या भेटीत अनेक जुन्या -नव्या आठवणींना उजाळा दिला. या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस. सर, आपणांस उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-विकास पांढरे
मुंबई
३ मे, २०२५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा