शनिवार, ३ मे, २०२५

कुशल व्यवस्थापक



असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स्वातंत्र्यामुळे आनंद मिळतो. आत्मविश्वास वाढतो, नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यातून आत्मभान येतं, नवनवीन गोष्टी करून पाहण्याची ऊर्मी येते."
दैनिक सोलापूर 'तरूण भारत'चे समूह संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेठे यांनी आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये उद्दिष्ट ठरवणे आणि ते पूर्ण करण्यासाठी काम करणे या गोष्टींच्या स्वातंत्र्याची चव पुरेपूर चाखल्यामुळेच त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात परिवर्तन घडवून आणले आहे.
लोकप्रबोधनाची साधने ज्यांच्या हातात असतात. त्यांना भूतकाळाचे ज्ञान, भान आणि दूरदृष्टी लाभलेले यशवंत पेठे यांनी 'सोलापूर तरुण भारत' ची धुरा यशस्वीपणे सांभाळली. या कुशल प्रशासक व व्यवस्थापकाचे सुपुत्र म्हणजे दिलीप पेठे. १९७७ सालच्या आणीबाणीमुळे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली. सरकारविरोधात आवाज उठविणारे वृत्तपत्र म्हणून 'तरूण भारत'चा उदय झाला. पुणे आवृत्तीनंतर कर्नाटक सीमेलगत असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी १९८५ साली 'तरुण भारत' ची आवृत्ती सुरु झाली. चित्तरंजन पंडित, विवेक घळसासी, अरविंद जोशी, अनिल कुलकर्णी, अरूण करमरकर आदी मातब्बर संपादकांनी 'तरुण भारत' चा लौकिक वाढवला. 'माध्यमा', 'मानसी' 'सदाफुली', 'विविधा', 'आसमंत', 'हॅलो इन्स्पेक्टर' या पुरवण्यांनी वाचकांची मने जिंकली होती. रविवारची 'आसमंत' व चित्रपट व कला क्षेत्रांची वेध घेणारी 'सदाफुली' ही पुरवणी आजही सुरू आहे.
वृत्तपत्र चालविणे तसे कठीण काम. विचारधारेसाठी वृत्तपत्र चालविणे त्याहून महाकठीण काम. विविध कारणांमुळे 'तरुण भारत' ची पुणे व देवगिरी आवृत्ती बंद करावी लागली. पण काल प्रवाहात 'सोलापूर तरुण भारत' टिकून राहिला व विस्तारला. यामागचे व्यवस्थापन समजून घेतले पाहिजे.
सोलापूरचा 'संचार' साताऱ्याचा 'ऐक्य', नाशिकचा 'देशदूत', ' चिपळूणचा 'सागर' 'अलिबागचा 'कृषिवल', नांदेडचा 'गोदातीर समाचार' या प्रादेशिक दैनिकाच्या तुलनेत सोलापूर 'तरूण भारत' चा विस्ताराचा वेग मोठा आहे. यासाठी 'तरुण भारत' ने कालानुरूप बदल स्वीकारला. फक्त सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी मराठवाडा आवृत्ती सुरु केली. संभाजीनगर येथे स्वतःच्या मालकीची छपाई मशीन सुरू करून मराठवाड्यात 'राष्ट्रविचार' पोहोचवत आहे. महत्त्वाचे म्हणजे बीदर, गुलबर्गा, हुमनाबाद, विजयपूर या कन्नड भाषिक जिल्ह्यात जाणारे 'तरूण भारत' हे एकमेव दैनिक आहे. ही विस्ताराची यात्रा सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे.
माध्यमातील बदल थांबवणे कोणालाही शक्य होणार नाही. परंतु योग्य धोरणे आखून वृत्तपत्र विकास साधणे हे मालकाच्या किंवा व्यवस्थापकाच्या हाती असते. दिलीप पेठे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 'तरूण भारत' ला उभे केले आहे. जगभरातील वाचकांना 'तरूण भारत' वेब आवृत्ती असो की, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हक्कासाठी सुरू केलेले 'वृत्तवेध' न्युज चॅनल म्हणजे त्यांच्या एकंदर कामाचा व प्रयोगाचा परिचय करून देणारा आहे. आज 'तरूण भारत' म्हणजे पेठे, पेठे म्हणजेच तरुण भारत' असे समीकरण बनले आहे.
दिलीप पेठे यांनी माझ्या उमेदीच्या काळात मला प्रोत्साहित केले. त्यांच्यामुळेच वयाच्या सोळाव्या वर्षी मी 'तरुण भारत' चा वार्ताहर होऊ शकलो. विपणन विभागातील तत्कालीन प्रतिनिधी मसरे यांनी माझी परिस्थिती पाहिली तेव्हा पेठे यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा पेठे यांच्यामुळे दरमहा दीडशे रूपये मानधन मिळू लागले. त्याकाळात ग्रामीण वार्ताहरांना कोणतेही वृत्तपत्र मानधन देत नसत. (मुख्य धारेतील वृत्तपत्र त्यांच्या व्यावसायिक/ जाहिराती किती दिल्या यावर मानधन द्यायचे ) यामुळेच अनेक ग्रामीण विषय हाताळता आले.कुशल व्यवस्थापक, मितभाषी, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीत सदैव पाठीमागे उभे राहणारे असे त्यांचे गुणवैशिष्ट्ये.
सरांचा आणि माझा २००३-०४ सालापासूनचा परिचय. २०१३-१४ साली हा परिचय अधिक घट्ट झाला. काही महिन्यांपूर्वी आमची भेट झाली होती. या भेटीत अनेक जुन्या -नव्या आठवणींना उजाळा दिला. या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस. सर, आपणांस उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-विकास पांढरे
मुंबई
३ मे, २०२५

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

एका पथिकाची वाटचाल



पद्मश्री गिरीश प्रभुणे काका महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. भटके विमुक्त चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा या व्यक्तिमत्वाच्या अनेक मनोज्ञ छटा रवींद्र गोळे लिखित ' गिरीश प्रभुणे जसे कळले तसे' या चरित्रात वाचायला मिळतात.


२०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष. याचवेळी एका स्वयंसेवकाचा अमृतमहोत्सव सुरू आहे. हे स्वयंसेवक म्हणजे गिरीश प्रभुणे काका. त्यांची (प्रभुणे काका)उंच शिडशिडीत शरीरयष्टी व पांढरी शुभ्र दाढी पाहून आपणांस एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व नजरेस पडते. होय, समाज परिवर्तनाच्या वाटेतील ते एक पथिक आहेत. त्यांचे भटके विमुक्त विषयावरचे कार्य आणि जीवन उलगडून वाचायला लागलो की एका क्षणात आपण त्या विषयाकडे खेचलो जातो. 'लाटांखाली संथ पाणी', 'पारधी' व 'पालांवरचं जिणं' 'लोक आणि संस्कृती' हे साहित्यलेखन त्यांच्या व्यासंगाची झलक दाखवणारी आहेत.

गिरीश प्रभुणे काका शांत, उपेक्षितांचे अंतरंग समजून घेणारे व संवेदनशीलतेचे अपूर्व वरदान लाभलेले स्वयंसेवक आहेत. बारामतीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जडणघडणीचा काळ चिपळूणमध्ये गेला. सहाव्या वर्षी त्यांना संघाचा परिसस्पर्श झाला. संघशाखेत त्यांची सामाजिक दृष्टी विकसित झाली.अठरापगड जाती जमाती म्हणजे काय? गावगाडा कसा चालतो? अशा गोष्टी त्यांनी आपल्या निरीक्षणातून शिकून घेतल्या. 'क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती', श्री.ग. माजगावकर यांच्या 'ग्रामयान' ची सूत्रे हाती घेतल्यानंतर गावगाड्याशी आंतरिक धागा घट्ट होत गेला. पुढे 'पुनरूत्थान समरसता गुरूकुलम' ते 'सामाजिक समरसता मंचा'च्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीशी अविरत झगडत गुणोत्कर्ष साधतात.

रवींद्र गोळे गिरीश प्रभुणे यांचे जीवनचरित्र मांडले खरे, पण यासाठी त्यांनी वाङ्मयीन आकृतिबंध वापरला नाही. या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, हे चरित्र प्रभुणे यांच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडत नाही; तर भटक्या विमुक्त समाजाचे हुंदके, आक्रोश आणि परिवर्तनाचे प्रतिबिंब मटविणारे हे पुस्तक आहे.

साधारणतः अडीच दशकांपूर्वी गोळे गिरीश प्रभुणे या विभूतीच्या संपर्कात आले. या पंचवीस वर्षांत प्रभुणे जसे त्यांना कळले, अनुभवले याचा सहजस्फूर्त आविष्कार म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. या पुस्तकातून साध्या, सहज सोप्या शब्दात प्रभुणे आपल्याला कळतात.

प्रभुणे यांचा पारधी, वडार, बेलदार, कुंभार, लोहार, शिकलगार, घिसाडी, ओतारी, लमाण, वैदू समाजाशी संबंध आला. या उपेक्षित समाजाचे मन व मत जुळविताना त्यांनी केलेला संघर्ष, जिद्द, अनंत ध्येयासक्ती विलक्षण आहे.त्यामुळेच त्यांच्या मनात समतेचा व समरसतेचा विचार दृढ झाला. 

या संदर्भात त्यांची मुलगी मनस्विनी यांनी एक प्रसंग सांगितला आहे. "चिंचवड गावात चापेकर चौकात जुना बस स्टॅण्ड होता. या बस स्टँडच्या मागे मनपा शाळेच्या भिंतीला टेकून एक म्हातारे आजोबा, तिथेच आडोसा घेऊन एकटे राहायचे. चप्पल शिवून देणे हे त्यांचे काम. बहुतेक वेळा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर यायची. चिंचवड गावात चप्पल शिवून देणारे ते एकमेव होते. त्यामुळे बहुतेक सर्व जण त्यांच्याकडून चप्पल शिवून घेत. पण ते बऱ्याच वेळा उपाशी पोटी झोपतात, हे फक्त बाबांच्या लक्षात आले. त्यानंतर बाबा त्यांना रोज पोळी-भाजी देऊ लागले. मी आणि मुकेश मनपा शाळेत जाऊ लागलो आणि पोळी-भाजी पोहोचवण्याचे काम आमच्याकडे आले. आम्ही ते काम करत असू. एक दिवस माझ्या वर्गातील मुलीने मला विचारले, "ते तुमचे कोण आहेत?" मी ठामपणे सांगितले, "ते आमचे आजोबा आहेत." आणि अख्ख्या वर्गात बातमी पसरली - 'रस्त्यावर राहणारे, चप्पल शिवणारे मनस्विनीचे आजोबा आहेत.' हे चप्पल शिवणारे गृहस्थ आपले कुणीच नाहीत, असे त्या वयात कधी वाटले नाही. बाबा त्यांना रोज पोळी-भाजी द्यायला सांगतात म्हणजे ते नक्कीच आपले आहेत, हा भाव मनात निर्माण झाला होता. कोण होते ते आजोबा ? आमचे आणि त्यांचे काय ऋणानुबंध ? जातीच्या चौकटीपलीकडचा विचार आणि कृती करण्याचा संस्कार बाबांनी नकळत आमच्या मनात रुजवला होता." (पृष्ठ क्र.२२)एखाद्या कादंबरीत शोभेल असा हा उतारा आहे. समजा , काही कारणाने हे संपूर्ण पुस्तक वाचणे तुम्हाला शक्य झाले नाही, तर किमान एवढा उतारा जरी वाचला तरी अंत:करणात समता व समरसतेचा भाव जागा होईल.

अनेकदा कठीण परिस्थितीशी सामना करताना प्रभुणे यांनी स्वतः च्या व्यक्तिमत्वात नकारात्मकता येऊ दिली नाही, विपरीत परिस्थितीतूनही ऊर्जा स्वीकारली आणि तिचे सकारात्मक परिवर्तन केले. 'असिधारा' नियतकालिकाचा आतबट्ट्याचा प्रयोग असो की, क्रांतिवीर चापेकर वाड्यातील समाजविघातक प्रवृत्तीकडून झालेली तोडफोड किंवा मिनार एक्स्प्रेस दरोडा प्रकरणात दाखविलेला धीरोदात्तपणा प्रेरणा देणारा आहे .

समाजाने गावकुसाबाहेर कुजत ठेवलेल्या पारधी समाजावरील अन्यायाविरुद्ध प्रभुणे उभे राहतात, परिणामी, प्रश्नांचा गुंता ही सोडवतात. (उदाहरणार्थ- आझाद मैदानावर पारधी आंदोलन, नागपूर येथील पारधी धर्मांतर प्रकरण.)

 यमगरवाडी व चिंचवडमधील 'पुनरूत्थान समरसता गुरूकुलम' आज एक यशस्वी संस्था म्हणून नावारूपाला येत आहेत, त्यांचे मुख्य कारण म्हणजे प्रभुणे यांनी घेतलेली मेहनतीची, कामाची, परिश्रमाची आणि दूरदृष्टीची पोचपावती आहे. निमगाव म्हाळुंगी येथील 'ग्रामायन' चा प्रयोग यशस्वी करण्यात प्रभुणे यांनी बहुमोल योगदान दिले आहे. हे व इतर कार्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

शेवटी हे पुस्तक कशासाठी..? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शतकांपूर्वीचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिले आहेत. अनेकांचा उपेक्षित, भटक्या सारखे जीवन जगणाऱ्या समाजाशी व लोकांशी दूरान्वयाने सुद्धा संवाद झाला नाही, अशांनी या समाजाचे अंतरंग समजून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.
- विकास पांढरे,९९७०४५२७६७

चौकट
गिरीश प्रभुणे 
जसे कळले तसे
लेखक : रवींद्र गोळे 
प्रकाशन : साप्ताहिक विवेक 
आवृत्ती: प्रथम (एप्रिल २०२५)
पृष्ठ संख्या :११२
मूल्य: रू.२२५/-

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...