तारुण्यात उत्साह आणि जोश असतो. याकाळात जीवनाची टेकडी चढताना समोर मृत्यू दिसत नसतो. तो पलीकडच्या बाजूला पायथ्याशी असतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबतीत असेच घडले. राजीवजीच्या मृत्यूला २५ वर्षे उलटली तरी त्याचे कार्य आजही उपयोगी पडते आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृती दिन.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची पैलू उलगडून दाखवणारा हा लेख.
स्वातंञ्योत्तर भारतीय राजकारणातील चाणाक्ष नेते, विज्ञानाचे पुरस्कर्ते, परराष्ट्र धोरणाचे अचूक ज्ञान, जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती लाभलेल्या राजीव गांधी यांना आपल्या देशातील सर्वाधिक तरूण पंतप्रधान म्हणून पंतप्रधान होण्याचा मान मिळविला. जेव्हा ते पंतप्रधान बनले तेव्हा ते चाळीस वर्षाचे होते. त्यांची हत्या झाली तेव्हा ते ४६ वर्षाचे होते. इतक्या छोट्या आयुष्यात त्यांनी विविध कार्य करून देशाला नवी दिशा आणि आशा प्राप्त करून दिली. त्यामुळेच ते अजब रसायन ठरतात. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी आयुष्यात जे मिळवले ते आठवण्याचा दिवस. राजीवजी भूतकाळात रमणारे पंतप्रधान नव्हते. भविष्याकडे आशेने पाहत बसणारे ते एक चिरतरुण पंतप्रधान होते. राजीवजी जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा देशाची सद्यस्थिती व वर्तमानकाळ केविलवाणा होता.
१९८७-८८ च्या काळामध्ये देशांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी 'भारतीय माकडाच्या लष्कराला हाकलून लावा' हा "पीपल्स लिबरेशन फ्रण्ट"चा लोकप्रिय नारा होता. सिंहल लोक भारताकडे वाकड्या नजरेने पहात होते. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मुळे संपूर्ण पंजाब आगीत भडकून निघाले होते. भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी धर्मत्याग करून दहशतवाद स्वीकारला होता. अशा परिस्थितीत राजीव गांधी यांनी चाणाक्षपणाने पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख नेते संत हरचंद सिंग लाँगवाले यांच्या सहमतीने उग्रवाद्यांसोबत सामंजस्य करार केला. परंतु, संत लाँगवाले यांच्या हत्येमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. पण राजीवजी शीख नेत्यांचे समर्थन जिंकण्याचा प्रयत्नात होते. अशा अंदाधुंदीच्या काळात राजीव गांधी यांना २१ व्या शतकाचा सुवर्णकाळ स्वस्थ बसू देत नव्हता. या तरूण पंतप्रधानाने आपले लक्ष नवनिर्मितीकडे वळवले. त्या प्रकाशात व आशेवर ते जगत होते.
ज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सॅम पिञोदा एका लेखात म्हणतात." राजीव गांधी यांच्याकडे दूरदृष्टी होतीच. परंतु त्याशिवाय त्यांचाकडे उत्कृष्टता देखील होती. त्यांना राजकारणाविषयी आत्मविश्वास होता. भारताला २१ व्या शतकात नेण्याची दूरदृष्टी आणि आपल्या देशातील गरज आणि आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत त्यांना खूप चांगली समज होती. जेव्हा कोणीही या गोष्टीचा विचार देखील करत नव्हता. भारतासारख्या विकसनशील देशात तंञज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावेल, हे त्यांच्या लक्षात आले. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी तंत्रज्ञान प्रमुख भूमिका बजावेल याबाबत ते आश्वस्त झाले होते. दूरसंचार ही विकासाची किल्ली ठरणार हे त्यांना समजले होते. कॉम्प्युटर उपयोगासाठी मुख्य प्रवाहात त्यांनीच आणले. सरकारच्या व्यवस्थापन पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवून देखील त्यांनीच आणले. नवीन उपकरणांच्या मदतीने ते बैठका घेऊ लागले. संपूर्ण व्यवस्थापनामध्ये त्यांनी बदल घडवून आणलेल्या परिवर्तनामध्ये आधुनिक विचार आणि नवीन गोष्टी होत्या." यावरून राजीवजीच्या दूरदृष्टीची कल्पना लक्षात येते. एवढेच नव्हे तर जागतिक पातळीवर सुध्दा राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला.
एक नमूद करण्यासारखे योगदान म्हणजे त्यांनी वैश्विक अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी योजना तयार केली होती. 'राजनैतिक' बाबतीत बोलायचे झाले तर राजीव गांधी यांनी यांची १९८८ सालची चीनची भेट महत्त्वाची ठरली. दौर्यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंध चिघळलेले होते. अशा परिस्थितीत राजीवजींना स्वस्थ बसू वाटत नव्हते. बीजिंगमध्ये राजीव गांधी यांनी देंग झायोपिंग यांची भेट घेतली. यावेळी जोरदार वाटाघाटी आणि चर्चा केल्यामुळे संघर्ष आटोक्यात आला. त्यातून देशाला नव्या संधी उपलब्ध झाल्या. राजीव गांधी यांनी हा वाटाघाटीचा मार्ग तयार केल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीन भेट यशस्वी होऊ शकली. एवढेच नव्हे तर राजीव गांधी यांची सार्क परिषदेवर विशेष छाप होती. कठीण प्रसंगात आणि प्रश्नांमध्ये सहभागी होण्याची आणि ते हाताळण्याची त्यांची तयारी असायची. वंशिक प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेचे जे.आर.जयवर्धने यांच्याशी बोलणी केली होती. पण फारसे यश मिळाले नाही.
राजीव गांधी यांच्या काळात भारतात दूरदर्शन संच घराघरात पोहोचला. त्यांनी दूरदर्शन आणि माहिती व प्रसारण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेऊन पारंपरिक दर्शन घडवले आणि समाजातील चांगल्या मूल्यांचे कार्यक्रम तयार करण्याची सूचना दिल्यामुळे 'रामायण आणि महाभारत' सारख्या लोकप्रिय मालिकाची निर्मिती होऊ शकली.
देशात उच्चस्तरीय आणि आधुनिक पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी १९८६ साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचे जीवन उंचावण्यासाठी आणि त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारची संस्था असलेली जवाहर नवोदय विद्यालय पध्दत त्यांनी सुरू केली. देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विरोधी पक्षातील अर्थतज्ज्ञ डॉ. मधु दडवंते यांचे मार्गदर्शन घेत. विकासासाठी येणाऱ्या एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे खर्च केले जातात हा अंदाज व्यक्त केला होता. आज भारतात जो तांत्रिक विकास झाला तो राजीवजींनी केलेल्या अथक प्रयत्नामुळेच शक्य झाले आहे.
राजीवजीच्या काळात एका स्विडीश कंपनी कडून बोफोर्स बंदूक खरेदीसाठी देण्यात आलेल्या कंञाटामुळे राजकीय सत्तेला धक्का बसला होता. जनतेच्या मनात चूकीची भावना झाली होती. त्यातच राष्ट्रपती गियानी सिंग यांच्याशी वाद घातल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शाहबानो प्रकरणात पारंपरिक मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हिंदुत्व असलेली जनता भडकली आणि जनतेचे मन वळविण्यासाठी त्यांनी राम मंदिराचा मुख्य गाभारा खुला करून रामलल्लाचे दर्शन घडविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राजीवींजीना जागतिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी दक्षिणेकडे गेले असताना एका महिला (एलटीटीईने )आत्मघातकी बाॅम्बरने राजीवजींचा जीव घेतला. भारताला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणाऱ्या महानायकाचा शेवट असा झाला असला तरी त्यांनी देशाला नवा राजमार्ग तयार करून दिला. याच मार्गावरून भारताचा प्रवास सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभरात ' विरोधी दहशतवाद दिन' म्हणून साजरा केला जातो. मानवजात विरूद्ध असणाऱ्या प्रत्येक प्रवृत्ती विरूद्ध सर्वांनी पुढे येऊन उभे राहिले पाहिजे. हाच या दिनाचा संदेश होय.
©विकास पांढरे,९९७०४५२७
( सदर लेख दैनिक सुराज्य,सोलापूर मध्ये २१ मे २०१५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)







