![]() |
| नाटककार वि.दा.सावरकर |
मराठी रंगभूमिच्या इतिहासात कृ.पा. खाडिलकर,राम गणेश गडकरी,मामा वरेरकर आदी नाटककरांनी मराठी ऐतिहासिक नाटकाची निर्मिती केली असली तरी ऐतिहासिक सत्यता,सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, बदलले राजकीय संदर्भ आणि अस्थिरतेचे विषय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाटकात दिसून येतात शिवाय सावरकरांनी मराठी नाटकाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे रंगमंच,बोलपट,वेशभूषा,नेपथ्य,सं वाद असे अनेक शब्द दिल्यामुळे सावरकरांचे मराठी रंगभूमीवरील स्थान अढळ आहे हे कोणीही नाकारु शकत नाही.
१९२०-३० हा काळ हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय राजकारणात उलथापालथीचा काळ समजला जातो.टिळक युग संपवून गांधी युगाला सुरुवात झाली होती. याच काळात काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या राजकारणाला,सशस्त्र क्रांतीला,तत्वज्ञानाला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. शिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य इतिहासाचा पायाही खचू लागला होता. हा काळ इंग्रजी राजवटीला विरोध करणारा असल्याने स्वातंत्र्यवीरांच्या झुंजार लेखणीतून राजकीय आणि सामाजिक बांधलिकी जपणारे नाट्यकृतीचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. सावरकरांचे काव्य,कादंबरी, संशोधन, चरित्र लेखन, हे जसं वाड;मयाच्या दुष्टीने अभ्यास करणं गरजेचे आहे. तसंच त्यांच्या नाट्यकृतीचा चिकित्सक,आस्वादक भूमिकेतून संशोधन लेखन झाले पाहिजे. सावरकर मुळातच हे व्यामिश्र व्यक्तिमत्व आहे. त्याची विज्ञाननिष्ठा,हिंदू समाजात परिवर्तन घडवून आणण्याची तळमळ त्यांच्या तीनही नाटकात दिसून येते.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी एकूण चार नाटके लिहिली त्यापैकी 'बोधीसत्व' हे चौथे नाटक अपूर्ण आहे. रत्नागिरीत स्थानबध्द असताना सावरकरांनी १९२७ साली 'उ:शाप' हे पहिले नाटक लिहिले. मराठी रंगभूमिच्या ऐन बहराच्या काळातले हे महत्त्वाचं नाटक समजलं जातं.
१९२७ साली महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. गांधीवादाचा अतिरेक वाढला होता. त्यामुळं सावरकरांनी या घटनांना समोर ठेवून आपल्या 'उ:शाप'नाटकात याचा समाचार घेतला आहे. त्यासाठी मायापूर नावाच्या काल्पनिक नगरीचे कथानक वापरले आहे. शंकर व कमलिनी या दलित प्रियकर प्रेयसीची कथा मध्यवर्ती ठेवून त्याच्या जोडीला किसन हा शंकरचा मित्र आणि कमलिनीचा भाऊ. या तिघांवर व संंत चोखामळ्यावर होणाऱ्या जातीय अन्यायाचं चित्रण नाटकातून येते. सावरकरांनी नाटकाचा आशय आणि त्यातील प्रसंग संत चोखामेळा यांच्या कालखंडातील निवडलेले आहोत.
या नाटकातील चोखामेळा यांच्या तोंडून निघालेला प्रसंग खूप विचार करायला लावणारा आहे तो म्हणतो,"सर्व शास्त्राचा कर्ता आणि करवता जो परमेश्वर त्यालाच मी प्रत्यक्ष हा प्रश्न विचारणार आहे. माझ्या एकट्यासह नव्हे तर कोटी कोटी अस्पृश्य जातीच्या जीवनाचे ध्येय कोणते ? आम्हास देव आहे की नाही ?या जन्मी तरी उध्दार व्हावा म्हणून काय नियम पाळले पाहिजेत आणि कशी भक्ती केली पाहिजे? याचा उलगडा पांडुरंगाच्या तोंडुन करवून घेणार ,"
या प्रसंगातून सावरकरांचा अस्पृश्यतेविषयी विचार लक्षात येतो. माणसाला माणूस म्हणून जगावेसे वाटत असताना सामाजिक व्यवस्थेने दिलेला उ:शाप किती भयानक स्वरूपाचा आहे हे सावरकर समजावून सांगतात. गांधीवादाला विरोध करण्यासाठी या नाटकात सावरकरांनी सत्यवान हे पात्र वापरले आहे. सत्यवान आणि शिष्य यांच्या संवादातून गांधीवादावर कशा प्रकारे कडाडून हल्ला चढविला आहे हे पाहणं अगत्याचे वाटते.
तिसरा शिष्य : 'तर मग पंचतंत्र,हितोपदेश हे नीतिग्रंथ त्याज्यच होत."
सत्यवान :"सर्वस्वी अहो ते नीतिग्रंथ कसले ?ते अनितिग्रंथ आहेत. काय म्हणे घोडा म्हणाला,उंट हसला,उंदीर उद्गगारला !धिक्कार,धिक्कार त्या असत्यवाद्यांना त्यांचं नांव काढलं की,अंगाची लाही लाही होते."
दुसरा शिष्य : "ही लाहीची पण उपमाच झाली."
सत्यवान :"क्षमा करा बरोबर धरलंत !अंगाचा संताप होते.माझ्या आश्रमात एक वेळ मद्य प्यायलं तरी चालतं,कारण ते सत्य आहे. पण काव्य वाचणं खपत नाही. काय बाई तुम्ही का आलात ?
बाई : "माझ्या मुलाचं डोकं अतिशय दुखतं आहे."
सत्यवान : "बाई चार दिवस तुम्ही निर्भेळ सत्य बोला, तुमच्या मुलाचं डोकं हटकून राहिल,काय? अविश्वास वाटतो ?अहो तुम्ही सत्य बोललात म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहील. मनात प्रसन्न ता आली की तुमच्या आसपास सत्व आणि प्रसन्नता फैलावून मुलाचं डोकं दुखणं,म्हणजे अप्रसन्नता दूर होईल. सत्यानं सर्व रोग दूर होतात.
तिसरा : "सत्यागारात आणि एकांत ?तुम्हाला सत्यधर्म म्हणजे काय ? हे मुळीच कळलं नाही. एकांत म्हणजे इतरांपासून काही लपवून ठेवण्याची इच्छा लपविणे म्हणजे असत्य. म्हणून सत्यधर्माच्या अनुयायांस एकांतात काहीही गोष्ट बोलण्याची, करण्याची सक्त बंदी असते. आम्ही आमच्या शिष्य, शिष्यिणीस नियम घालून दिलेला आहे की,जर तुम्हास सत्यसक्ती संतती हवी असेल तर. प्रजनन हे देखील एखाद्या पापकृतीत्यासारखं अंध:काराचे पडदे सोडून करू नका,तर स्वच्छ स्पष्ट आणि सत्य प्रकाशाच्या सूर्यकिरणात तुमचे ग्रहस्थ धर्म आचारित जा म्हणजे संतती गर्भापासूनच सत्यवक्ती आणि निरोगी होईल.
उपहास आणि उपरोधाने भरलेल्या या प्रसंगात सावरकरांनी गांधीवादी विचारधारेवर फटकारे ओढले आहेत. अहिंसेचा मार्ग कितपत अयोग्य आहे हे स्पष्ट करताना अहिंसेचा अतिरेकपणा राष्ट्रीय शिष्टाचाराला धोका कशाप्रकारे होतो हे स्पष्ट केले आहे.
'संन्यस्त खडग'(१९३१) या नाटकात सावरकरांनी अहिंसा तत्वावर प्रहार केला आहे. गौतम बुध्दांच्या विचार काळाशी निगडीत असलेले नाटक.गौतम बुध्दाच्या सांगण्यावरून 'शाक्य'सेनापती विक्रमसिंह शस्त्र त्याग करून संन्यासी होतो.बुध्दांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्र त्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या असुरक्षितेकडे दुर्लक्ष होते. जेव्हा शेजारील कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा शेजारील विक्रमसिंहचा पूत्र वल्लभाच्या सेनापतीतत्वाखाली असलेले राज्य शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकी वेष धारण करून रणांगणात उतरते.पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूत पूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुध्दाशी अहिंसा व नैतिकता यावर वाद विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (संन्यस्त खडग) उपसून शाक्यांना विजयी करतो.असं या नाटकाचं मूळ कथानक आहे.
सावरकरांनी या नाट्यातील अहिंसात्मक विचारांवरील वाद -विवादाने हे नाटक वाड्:मयीनदुष्ट्या अतिशय सुंदर आहे.
या नाटकाला लाभलेले दुसरे परिणाम म्हणजे स्वगत होय. युध्दात पराभव होऊन शत्रूचा बंदा होतो तेव्हा त्यांच्या पत्नीला भावना सावरकरांसारख्या महाकवीने स्वगताला कलात्मकता प्राप्त करुन दिली आहे.
१९६१ साली अहमदशहा अब्दालीकडून मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत महानीकारक पराभव नव्हेच तर या लढाईमुळं मराठी सत्ता खिळखिळी झाली. नंतर थोरले माधवराव पेशवे,महादजी शिंदे या मराठ्यांनी दिल्लीवर चाल करून पराभवाचे उट्टे भरून काढले. हिंदुस्थानात हिंदू धर्माची सत्ता स्थापन करण्याची इच्छा सदाशिव भाऊची होती. ही इच्छा पूर्ण करण्याची शपथ माधवराव घेतात. एका अर्थाने भाऊची इच्छा 'उत्तरक्रिया'करून करतात असे कथानक असलेले सावरकरांचे 'उत्तरक्रिया' (१९३३) हे शेवटचे नाटक होय.
पानिपतच्या रणांगणावर वीरमरण झालेल्या मराठ्यांचे कार्य पूर्ण करणे म्हणजे 'उत्तरक्रिया'अशा स्वरूपाचे वक्तव्य एका वेडीच्या मुखातून सावरकर वदवून घेतात. वेडी आणि माधवराव पेशवे यांच्यातील संवादातून गूढ उलगडलं आहे.
वेडी :"कोणाची उत्तरक्रिया म्हणून सांगू तुला ?अरे शनिवारवाड्याचा जो धनि आहे. तोच भट बोलाव आणि आमची उत्तरक्रिया कर ! तरच आमच्या अंतरळात तळमळणाऱ्या अतूप्त जीवांना उत्तम गति मिळेल.असे पानपतीं पडलेले सहस्त्रावधि अतूप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात.ते बघ माझे पतिराज,तो बघ माझा तरूण तनय !झुंजत पडले बघ रणांत !ती बघ माझी मुलगी ,अगं बाई गं,घायाळ केली,रक्तबंबाळ केलीना रे त्या राक्षसांनी !त्या माझ्या पतीची,मुलाची, मुलीची (पहारेकऱ्याकडे बोट दाखवून ) तुझ्या बापाची,तुझ्या भावाची (माधवरावांकडे बोट दाखवून ),नि तुझ्या काकांची!"
माधवराव : ( दचकून ) "काय ? आमच्या काकांची ? भाऊसाहेबांची ? उत्तरक्रिया ?"
वेडी : "होय ! त्याच तुझ्या चुलत्याची नि तुझ्या बापाची नि तुझ्या भावाची -विश्वासरावाची ! इतक्यातच दचकतोस काय असा ? आणखी ऐक अगं बाई ? पण माझ्या पायात बोचलं काय पुन्हा ? काचा ! काचा ? ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग ! घरोघरी बांगडी फुटली.ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे हे माझं ह्दय !भरा !मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे !त्या लाखांची नाव ऐक नावं,पानिपत ! मला पानिपतची उत्तरक्रिया करायची आहे ! आणि त्या पानिपतच्या उत्तरक्रियेचा भट तू !"
सावरकरांच्या प्रतिभाशाली विचारातून साकार झालेल्या या नाटकात पराक्रमी मराठ्यांचा इतिहास उभा करून देशवासियांना ज्वलंत स्वाभिमान बाळगण्याचा सल्ला देऊन जातात. या नाटकाच्या शेवटी यशवंतराव ब्रिटिशांशी वाटाघाटी करताना माधवरावांना उपयोगी पडतो असे दाखविले आहे.
सावरकरांच्या नाटकांविषयी समीक्षक मकरंद साठे म्हणतात की, "सावरकरांच्या तीनही नाटकात ऐतिहासिक पात्रं आहेत. चोखामेळा,गौतम बुध्द, माधवराव पेशवे. आधीच्या ऐतिहासिक नाटकांविषयी खूपच वेगळी ती गौरवशाली इतिहासाची साक्ष देण्यापुरती नाहीच तर पुढच्या टप्प्यावर भाष्य करतात.
तर भालचंद्र खांडेकर सावरकरांच्या नाटकाविषयी मूल्यमापन करताना म्हणतात,"स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा एका झपाटलेल्या क्रांतीकारकाची होती. त्यांच्या प्रतिभेला सामान्य विषयांचा लोभ नव्हता. सामाजिक सुधारणा आणि प्रखर राष्ट्र निष्ठा हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक होते.
- ९९७०४५२७६७
( पूर्वप्रसिद्धी साहित्य चपराक मासिक फेब्रुवारी -मार्च २०१५ )



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा