मंगळवार, ३० मे, २०१७

अहिल्यादेवी होळकर : मराठेशाहीतील सोनेरी पान

मराठेशाहीतील कर्तबगार स्त्रियांची पाने अंधुकच राहिलेले दिसून येतात. या शाहीने राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, झाशीची राणी या कर्तबगार महिलांबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा इतिहास अद्यापही अज्ञात आहे. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचकांसमोर आणण्याचे कार्य आमचे पत्रकार मित्र उज्ज्वलकुमार माने यांनी 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाद्वारे केले आहे.

माने हे हाडाचे पत्रकार, उपसंपादक. लोकशाहीच्या चौथा स्तंभात ते प्रदीर्घ अशी सेवा करीत आहेत. 'पोलिस आणि पत्रकारिता', पोलिस आणि जनता' आणि पोलिस हेल्पलाईन 'अशी माने यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाची तिसरी आवरुती प्रकाशित झाली आहे.   अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावरील अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण अहिल्यादेवीच्या समग्र जीवनाचा परामर्श घेणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता. माने यांनी अनेक संदर्भ साहित्याचा सखोल अभ्यास करून  सामान्य वाचकांला पचनी पडेल या हेतूने  ग्रंथाची निर्मिती केली आहे. अहिल्यादेवीचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.

हा कालपट सांगण्याबरोबर माने यांनी  मराठेशाहीतील पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनाचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. मल्हाररावांचा बुंदेलखंडावर कब्जा,रोहिले,जाट,मराठे आणि शीख कसे एकत्र आले होते हे प्रकरणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पती खंडेराव होळकर  युद्धात मारल्या गेल्या नंतर सती जाणाऱ्या अहिल्येस सासऱ्याने थोपविले.राज्यकारभाराचे धडे दिले. आणि स्वत:च्या निधना अगोदर राज्य त्यांच्या हाती सोपविले. अहिल्यादेवीने अखंड २८ वर्षे राज्य कारभार चालविला. दरबारात जातीने बसवून अनेक कामे त्या हाता वेगळी करीत. शत्रू देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगीत असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुर्नबांधणी,जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठापणा, घाट -रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्न छत्रे चालविणे या लोककल्याणकारी कामामुळे भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.

अहिल्यादेवी आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष, व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या.त्यांनी सोरटी-सोमनाथ, काशी-विश्वनाथ अशा भ्रष्ट मंदिरांची पुनु निर्मिती व देवताची प्राण प्रतिष्ठा केली.

 अहिल्यादेवीने अनेक लोकोपयोगी कामे करून जनतेचे मने जिंकली. नर्मदा नदीच्या तीरावर महेश्वर येथे राजधानी हालविली. भारतात सुमारे २५ ठिकाणी अहिल्यादेवींनी शिवालयाची निर्मिती केली. पंढरपुरात होळकर वाडा बांधला. अनेक ठिकाणी दगडी विहीर बांधल्या. पशू -पक्ष्यांसाठी पिके विकत घेतली. पर्यावरणाच्या बाबतही अहिल्यादेवींचा दूरदूष्टीपणा होता. प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान २० झाडे लावली पाहिजेत असा त्यांचा हुकूम होता. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद होती. अहिल्यादेवी इंग्रजाची चाल ओळखून होत्या. त्यासाठी महादजी शिंदे यांना पुणे दरबारी जाऊन इंग्रजाविरूध्द योजना करण्यासाठी आग्रह धरला होता. अहिल्यादेवी या सर्वगुण संपन्न होत्या. त्यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर हे सुंदर हस्ताक्षराचा नमुना होय.खरेदी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र समजला जाणारा सातबारा उतारा अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातच निर्माण झाला. त्यांनी शत्रूंशी लढा देण्यासाठी महिलांची विशेष फौज तैनात केली होती. अनेक लढाया त्यांनी केल्या व जिंकल्याही.

लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथात अहिल्यादेवीच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भातील काही निवडक पत्राचा माने यांनी ग्रंथात समावेश केला आहे. होळकर घराण्यातील नातीगोती व संपर्कात आलेल्या प्रमुख व्यक्तींचे नावे दिली आहेत. त्याचबरोबर कारभारी, होळकर राजघराण्याची वंशावळ होळकर घराण्याशी संबंधित छायचित्रे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना अधिक पसंतीस उतरले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्शवत कार्य लक्षात घेऊन माने यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

परीक्षण - विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७

 ग्रंथ :रणरागिणी अहिल्यादेवी
लेखक : उज्ज्वलकुमार माने -९९२२४२४६१९
प्रकाशन
यशोदिप पब्लिकेशन्स
२१७ ब,जोरी निवास,नारायण पेठ, पुणे -४११०३०, ९८५०८८४१७५
पाने :११२, मूल्य : ११०/-

शनिवार, २७ मे, २०१७

सावरकरांचे नाट्यविश्व : एक आकलन

नाटककार वि.दा.सावरकर
मराठी रंगभूमिच्या इतिहासात   कृ.पा. खाडिलकर,राम गणेश गडकरी,मामा वरेरकर आदी नाटककरांनी मराठी ऐतिहासिक नाटकाची निर्मिती केली असली तरी ऐतिहासिक सत्यता,सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, बदलले राजकीय संदर्भ आणि अस्थिरतेचे विषय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाटकात दिसून येतात शिवाय सावरकरांनी मराठी नाटकाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे रंगमंच,बोलपट,वेशभूषा,नेपथ्य,संवाद असे अनेक शब्द दिल्यामुळे सावरकरांचे मराठी रंगभूमीवरील स्थान अढळ आहे हे कोणीही नाकारु शकत नाही.

१९२०-३० हा काळ हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय राजकारणात उलथापालथीचा काळ समजला जातो.टिळक युग संपवून गांधी युगाला सुरुवात झाली होती. याच काळात काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या राजकारणाला,सशस्त्र क्रांतीला,तत्वज्ञानाला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. शिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य इतिहासाचा पायाही खचू लागला होता. हा काळ इंग्रजी राजवटीला विरोध करणारा असल्याने स्वातंत्र्यवीरांच्या झुंजार लेखणीतून राजकीय आणि सामाजिक बांधलिकी जपणारे नाट्यकृतीचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. सावरकरांचे काव्य,कादंबरी, संशोधन, चरित्र लेखन, हे जसं वाड;मयाच्या दुष्टीने अभ्यास करणं गरजेचे आहे. तसंच त्यांच्या नाट्यकृतीचा चिकित्सक,आस्वादक भूमिकेतून संशोधन लेखन झाले पाहिजे. सावरकर मुळातच हे व्यामिश्र व्यक्तिमत्व आहे. त्याची विज्ञाननिष्ठा,हिंदू समाजात परिवर्तन घडवून आणण्याची तळमळ त्यांच्या तीनही नाटकात दिसून येते. 

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी एकूण चार नाटके लिहिली त्यापैकी 'बोधीसत्व' हे चौथे नाटक अपूर्ण आहे. रत्नागिरीत स्थानबध्द असताना सावरकरांनी १९२७ साली 'उ:शाप' हे पहिले नाटक लिहिले. मराठी रंगभूमिच्या ऐन बहराच्या काळातले हे महत्त्वाचं नाटक समजलं जातं.

१९२७ साली महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. गांधीवादाचा अतिरेक वाढला होता. त्यामुळं सावरकरांनी या घटनांना समोर ठेवून आपल्या 'उ:शाप'नाटकात याचा समाचार घेतला आहे. त्यासाठी मायापूर नावाच्या काल्पनिक नगरीचे कथानक वापरले आहे. शंकर व कमलिनी या दलित प्रियकर प्रेयसीची कथा मध्यवर्ती ठेवून त्याच्या जोडीला किसन हा शंकरचा मित्र आणि कमलिनीचा भाऊ. या तिघांवर व संंत चोखामळ्यावर होणाऱ्या जातीय अन्यायाचं चित्रण नाटकातून येते. सावरकरांनी नाटकाचा आशय आणि त्यातील प्रसंग संत चोखामेळा यांच्या कालखंडातील निवडलेले आहोत.

 या नाटकातील चोखामेळा यांच्या तोंडून निघालेला प्रसंग खूप विचार करायला लावणारा आहे तो म्हणतो,"सर्व शास्त्राचा कर्ता आणि करवता जो परमेश्वर त्यालाच मी प्रत्यक्ष हा प्रश्न विचारणार आहे. माझ्या एकट्यासह नव्हे तर कोटी कोटी अस्पृश्य जातीच्या जीवनाचे ध्येय कोणते ? आम्हास देव आहे की नाही ?या जन्मी तरी उध्दार व्हावा म्हणून काय नियम पाळले पाहिजेत आणि कशी भक्ती केली पाहिजे? याचा उलगडा पांडुरंगाच्या तोंडुन करवून घेणार ,"
या प्रसंगातून सावरकरांचा अस्पृश्यतेविषयी विचार लक्षात येतो. माणसाला माणूस म्हणून जगावेसे वाटत असताना सामाजिक व्यवस्थेने दिलेला उ:शाप किती भयानक स्वरूपाचा आहे हे सावरकर समजावून सांगतात. गांधीवादाला विरोध करण्यासाठी या नाटकात सावरकरांनी सत्यवान हे पात्र वापरले आहे. सत्यवान आणि शिष्य यांच्या संवादातून गांधीवादावर कशा प्रकारे कडाडून हल्ला चढविला आहे हे पाहणं अगत्याचे वाटते.

तिसरा शिष्य : 'तर मग पंचतंत्र,हितोपदेश हे नीतिग्रंथ त्याज्यच होत."
सत्यवान :"सर्वस्वी अहो ते नीतिग्रंथ कसले ?ते अनितिग्रंथ आहेत. काय म्हणे घोडा म्हणाला,उंट हसला,उंदीर उद्गगारला !धिक्कार,धिक्कार त्या असत्यवाद्यांना त्यांचं नांव काढलं की,अंगाची लाही लाही होते."
दुसरा शिष्य : "ही लाहीची पण उपमाच झाली."
सत्यवान :"क्षमा करा बरोबर धरलंत !अंगाचा संताप होते.माझ्या आश्रमात एक वेळ मद्य प्यायलं तरी चालतं,कारण ते सत्य आहे. पण काव्य वाचणं खपत नाही. काय बाई तुम्ही का आलात ?
बाई : "माझ्या मुलाचं डोकं अतिशय दुखतं आहे."
सत्यवान : "बाई चार दिवस तुम्ही निर्भेळ सत्य बोला, तुमच्या मुलाचं डोकं हटकून राहिल,काय? अविश्वास वाटतो ?अहो तुम्ही सत्य बोललात म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहील. मनात प्रसन्न ता आली की तुमच्या आसपास सत्व आणि प्रसन्नता फैलावून मुलाचं डोकं दुखणं,म्हणजे अप्रसन्नता दूर होईल. सत्यानं सर्व रोग दूर होतात.
तिसरा : "सत्यागारात आणि एकांत ?तुम्हाला सत्यधर्म म्हणजे काय ? हे मुळीच कळलं नाही. एकांत म्हणजे इतरांपासून काही लपवून ठेवण्याची इच्छा लपविणे म्हणजे असत्य. म्हणून सत्यधर्माच्या अनुयायांस एकांतात काहीही गोष्ट बोलण्याची, करण्याची सक्त बंदी असते. आम्ही आमच्या शिष्य, शिष्यिणीस नियम घालून दिलेला आहे की,जर तुम्हास सत्यसक्ती संतती हवी असेल तर. प्रजनन हे देखील एखाद्या पापकृतीत्यासारखं अंध:काराचे पडदे सोडून करू नका,तर स्वच्छ स्पष्ट आणि सत्य प्रकाशाच्या सूर्यकिरणात तुमचे ग्रहस्थ धर्म आचारित जा म्हणजे संतती गर्भापासूनच सत्यवक्ती आणि निरोगी होईल.
उपहास आणि उपरोधाने भरलेल्या या प्रसंगात सावरकरांनी गांधीवादी विचारधारेवर फटकारे ओढले आहेत. अहिंसेचा मार्ग कितपत अयोग्य आहे हे स्पष्ट करताना अहिंसेचा अतिरेकपणा राष्ट्रीय शिष्टाचाराला धोका कशाप्रकारे होतो हे स्पष्ट केले आहे.

'संन्यस्त खडग'(१९३१) या नाटकात सावरकरांनी अहिंसा तत्वावर प्रहार केला आहे. गौतम बुध्दांच्या विचार काळाशी निगडीत असलेले नाटक.गौतम बुध्दाच्या सांगण्यावरून 'शाक्य'सेनापती विक्रमसिंह शस्त्र त्याग करून संन्यासी होतो.बुध्दांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्र त्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या असुरक्षितेकडे दुर्लक्ष होते. जेव्हा शेजारील कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा शेजारील विक्रमसिंहचा पूत्र वल्लभाच्या सेनापतीतत्वाखाली असलेले राज्य शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकी वेष धारण करून रणांगणात उतरते.पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूत पूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुध्दाशी अहिंसा व नैतिकता यावर वाद विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (संन्यस्त खडग) उपसून शाक्यांना विजयी करतो.असं या नाटकाचं मूळ कथानक आहे.

 सावरकरांनी या नाट्यातील अहिंसात्मक विचारांवरील वाद -विवादाने हे नाटक वाड्:मयीनदुष्ट्या अतिशय सुंदर आहे.
या नाटकाला लाभलेले दुसरे परिणाम म्हणजे स्वगत होय. युध्दात पराभव होऊन शत्रूचा बंदा होतो तेव्हा त्यांच्या पत्नीला भावना सावरकरांसारख्या महाकवीने स्वगताला कलात्मकता प्राप्त करुन दिली आहे.
१९६१ साली अहमदशहा अब्दालीकडून मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत महानीकारक पराभव नव्हेच तर या लढाईमुळं मराठी सत्ता खिळखिळी झाली. नंतर थोरले माधवराव पेशवे,महादजी शिंदे या मराठ्यांनी दिल्लीवर चाल करून पराभवाचे उट्टे भरून काढले. हिंदुस्थानात हिंदू धर्माची सत्ता स्थापन करण्याची इच्छा सदाशिव भाऊची होती. ही इच्छा पूर्ण करण्याची शपथ माधवराव घेतात. एका अर्थाने भाऊची इच्छा 'उत्तरक्रिया'करून करतात असे कथानक असलेले सावरकरांचे 'उत्तरक्रिया' (१९३३) हे शेवटचे नाटक होय.

पानिपतच्या रणांगणावर वीरमरण झालेल्या मराठ्यांचे कार्य पूर्ण करणे म्हणजे 'उत्तरक्रिया'अशा स्वरूपाचे वक्तव्य एका वेडीच्या मुखातून सावरकर वदवून घेतात. वेडी आणि माधवराव पेशवे यांच्यातील संवादातून गूढ उलगडलं आहे.
वेडी :"कोणाची उत्तरक्रिया म्हणून सांगू तुला ?अरे शनिवारवाड्याचा जो धनि आहे. तोच भट बोलाव आणि आमची उत्तरक्रिया कर !  तरच आमच्या अंतरळात तळमळणाऱ्या अतूप्त जीवांना उत्तम गति मिळेल.असे पानपतीं पडलेले सहस्त्रावधि अतूप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात.ते बघ माझे पतिराज,तो बघ माझा तरूण तनय !झुंजत पडले बघ रणांत !ती बघ माझी मुलगी ,अगं बाई गं,घायाळ केली,रक्तबंबाळ केलीना रे त्या राक्षसांनी !त्या माझ्या पतीची,मुलाची, मुलीची (पहारेकऱ्याकडे बोट दाखवून ) तुझ्या बापाची,तुझ्या भावाची (माधवरावांकडे बोट दाखवून ),नि तुझ्या काकांची!"

माधवराव : ( दचकून ) "काय ? आमच्या काकांची ? भाऊसाहेबांची ? उत्तरक्रिया ?"
वेडी : "होय ! त्याच तुझ्या चुलत्याची नि तुझ्या बापाची नि तुझ्या भावाची -विश्वासरावाची ! इतक्यातच दचकतोस काय असा ? आणखी ऐक अगं बाई ? पण माझ्या पायात बोचलं काय पुन्हा ? काचा ! काचा ? ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग ! घरोघरी बांगडी फुटली.ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे हे माझं ह्दय !भरा !मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे !त्या लाखांची नाव ऐक नावं,पानिपत ! मला पानिपतची उत्तरक्रिया करायची आहे ! आणि त्या पानिपतच्या उत्तरक्रियेचा भट तू !"
सावरकरांच्या प्रतिभाशाली विचारातून साकार झालेल्या या नाटकात पराक्रमी मराठ्यांचा इतिहास उभा करून देशवासियांना ज्वलंत स्वाभिमान बाळगण्याचा सल्ला देऊन जातात. या नाटकाच्या शेवटी यशवंतराव ब्रिटिशांशी वाटाघाटी करताना माधवरावांना उपयोगी पडतो असे दाखविले आहे.

सावरकरांच्या नाटकांविषयी समीक्षक मकरंद साठे म्हणतात की, "सावरकरांच्या तीनही नाटकात ऐतिहासिक पात्रं आहेत. चोखामेळा,गौतम बुध्द, माधवराव पेशवे. आधीच्या ऐतिहासिक नाटकांविषयी खूपच वेगळी ती गौरवशाली इतिहासाची साक्ष देण्यापुरती नाहीच तर पुढच्या टप्प्यावर भाष्य करतात.
तर भालचंद्र खांडेकर सावरकरांच्या नाटकाविषयी मूल्यमापन करताना म्हणतात,"स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा एका झपाटलेल्या क्रांतीकारकाची होती. त्यांच्या प्रतिभेला सामान्य विषयांचा लोभ नव्हता. सामाजिक सुधारणा आणि प्रखर राष्ट्र निष्ठा हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक होते.
 - ९९७०४५२७६७ 

( पूर्वप्रसिद्धी साहित्य चपराक मासिक फेब्रुवारी -मार्च २०१५ )

बुधवार, २४ मे, २०१७

मी पाहिलेला साहेबराव...



२००२ ते २००३ वर्ष असावं,तेव्हा मी सोलापूर व देवगिरी तरुण भारत मध्ये स्फूट लिखाण करत असे. त्याकाळी माझा शालेय टप्पा पूर्ण झाला नसेल, त्यामुळे लिखाणात धार नव्हती. तसं आजूबाजूचे वातावरण पोषक नव्हतं. न कळत्या वयात काहीतरी लिहायची सवय लागली होती. या सवयीला प्रेरणा दिली ती साहेबराव घुगे या मित्रानी.

            अणदूर हे तसं काँग्रेस विचासरणीचं गाव.या गावाने दोन आमदार दिले आहेत . अशा वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधलिकी म्हणून काम करणाऱ्या धडपड्या युवकांशी माझा संपर्क आला. त्यामध्ये साहेबरावांचा अग्रक्रम लागतो. साहेबरावाचे वडील हाडाचे शिक्षक. घरात संघ वातावरण. त्यामुळे ते घडत गेले. त्याकाळी साहेबराव सा.'विवेक' साठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे काम पाहत होते. ते आजही तेच काम पाहतात. प्रचंड जनसंपर्क आणि माणसं पारखण्याची कला या माणसाकडे आहे. या गुणाचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव राहिला.

  मी अकरावीत शिकत असतानाच तरुण भारत साठी पूर्णवेळ वार्ताहर म्हणून काम पाहू लागलो.  या भागातील महत्त्वाचे विषय, बातम्या व लेख दैनिकासाठी पाठवत असे. त्याकाळी आमच्याकडे ईमेलचा जन्म ही झाला नव्हता. कोऱ्या - करकरीत पानावर समास ठेवून बातम्या फँक्स करून पाठवावं लागायचं. आता स्वहस्ते लिहिण्याची सवय मोडली आहे. मोबाईल मुळे लिहायला आणि बातम्या पाठवायला सोपे झाले आहे.

त्याकाळी मला कोणतेही मानधन मिळत नव्हते. त्यामुळं माझी तारांबळ व्हायची. सगळ्या बातम्या फॅक्स करून पाठवणं हे माझ्या ऐपतीत नव्हते. पोस्टाने पाठविलेल्या बातम्या उशिरा लागायच्या. एकदा साहेबरावनी माझी ही धडपड पाहिली. त्या धडपड्याला आकार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तब्बल तीन ते चार वर्षे आम्ही एकमेकांच्या सहवासात राहिलो. एकमेकांच्या विचारातून एकमेकांना घडवणारा असा हा माणूस मला भेटला. संकटात  दिलासा देणारा,समजून घेणारा, निस्वार्थी भावनेने आपुलकीचे दोन शब्द प्रेमाने बोलणारा साहेबराव मला खूप भावला.

 अणदूर व परिसरातील असह्याला मदत करणारा, बुडत्याला हात देणारा, वृद्धांना आधार देणारा, सतकर्म करून फक्त आशीर्वाद घेणारा साहेबराव ही मी पहिला. माणसांना श्रीमंतीत न तोलणारा, माणसातील माणूसकी जागा ठेवणारा,  माणुसकीच्या धाग्यात माणसांना गोवाणारा, हातात हात देणारा हीच साहेबरावची जीवन जगण्याची खुबी.

सा.विवेकसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल साहेबरावचा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, सरसंघचालक सुदर्शनजी आदीच्या हस्ते गौरव करण्यात आला. अणदूर व परिसरातील युवक व विद्यार्थ्यांमध्ये वैचारिकता वाढावी यासाठी केशव वाचनालयाची केलेली निर्मिती, त्यासाठी साहेबरावला करावा लागलेला संघर्ष हे मी जवळून अनुभवला आहे. आज ते पक्षीय संघटनात्मक बांधणीत अग्रेसर असतात.२०१२ साली पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अणदूर सारखा काँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांचा विरोधक माजी आमदारच्या घरातील असल्याने साहेबराव विजयी होईल अशी कुणाला खात्री नव्हती. प्रामाणिक व सच्चा कार्यकर्त्याला जनता भरभरून मत देते हे साहेबरावच्या विजयानंतर लक्षात आले.

 तुळजापूर पंचायत समितीमध्ये त्यांनी केलेले काम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. साहेबरावच्या सहवासामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन झाले. त्याचबरोबर पदवीधर आमदार श्रीकांत जोशी यांची 'तरुण भारत' साठी पान एकसाठी मुलाखत घेता आली.

अन् मी 'विवेक' शी जोडलो

     माझ्या वाचनात जी जी मराठी मासिके आणि साप्ताहिके वाचनात आलीे, त्यामध्ये सा.विवेकचे स्थान मोठे आहे. नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथीेल बालाघाट कॉलेजमध्ये शिकत असताना तिथे 'विवेक'चा 'तुमचा नातू हिंदू राहील का' विशेषांक वाचण्यात आला. त्या अंकामुळे 'विवेक' नियमित वाचू लागलो. या  विशेषांकाची धाराशिव जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त नोंदणी त्यांनी केली होती. प्रत्येक गावात, शाळा-महाविद्यालयात आणि वाचनालयात हा अंक पोहोचण्यात साहेबरावचा मोठा वाटा आहे. 'विवेक' वाढावा यासाठी साहेबरावनी घेतलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे.

साहेबरावबद्दल एक किस्सा  सांगितला जातो - मे २००५मध्ये साहेबरावांचे लग्न झाले. याच काळात 'विवेक'च्या वतीने पू.सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. साहेबराव हा ग्रंथ तामलवाडी ( ता.तुळजापूर) येथील एका कंपनीत द्यायचा होता. साहेबरावच्या अंगावरची हळदही निघाली नव्हती, येणाऱ्या
 परिणामांची पर्वा न करता तो अणदूरहून तामलवाडीला निघाला. तामलवाडीत आल्यानंतर त्यानी एक भाड्याने सायकल घेऊन कंपनीच्या दिशेने निघाला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य आग ओकत होता, शरीर  घामाघूम झालं होतं. कसल्याही परिस्थितीत हा ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्याचा हेतू होता.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एँड. मिलिंद पाटील हे आपल्या कारने सोलापूरकडे जात होते,   ऍड. मिलिंद पाटलांची नजर साहेबरावकडे गेली. त्यांनी लागलीच आपली गाडी थांबवली. ते साहेबरावांना म्हणाले, ''एवढ्या उन्हात सायकलीवरून कुठे निघालात?" साहेबरावनी सर्व  हकीकत सांगितली.
त्याच दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ बटू यांना ग्रंथ देण्यासाठी साहेबराव धाराशिवला पोहोचला.

"अरे,साहेबराव! तुझं लग्न होऊन आठ दिवसही झाले नाहीत, अंगावरची हळदही निघाली नसताना तू उन्हातान्हात कुठे निघालास? गुरुजींचा ग्रंथ नंतरही पाठवला असता'' साहेबराव,तू घेत असलेल्या मेहनतीबद्दल मला अभिमान वाटत असल्याचे उद्गगार संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ बटू यांनी काढले.

साहेबरावचा हा किस्सा अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळतो. काळाच्या ओघात आज अनेक वैचारिक मासिके आणि साप्ताहिके बंद पडत आहेत. पण आज सत्तरीतही सा.विवेक तग धरून आहे. दिवसेंदिवस 'विवेक' कलाकलाने वाढतोय तो अशा निःस्पृहपणे काम करणाऱ्या व्यक्तीमुळे. विवेक वाढण्यासाठी असे अनेक निःस्पृह हात मदत करत आहेत. अशा व्यक्तींच्या सहवासात मला राहता आल्याने मी आज 'विवेक' चा उपसंपादक होऊ शकलो.

कुठेही मोठेपणा न  मिरवणारा हा साधा माणूस मला सदैव मोठ्या भावासारखा पाठीराखा राहिला.  मी देवाला प्रार्थना करतो की, साहेबराव सारखा माणूस सदैव माझ्या डोळ्यासमोर असू दे. हे देवा माझ्या या भावाला उदंड आयुष्य लाभो दे.

©विकास पांढरे, ( उपसंपादक, सा.विवेक)

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...