.......स्वामी विवेकानंदजी ने म्हटले आहे की, ""मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत,आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर मी हा पूर्ण देश बदलून टाकेन" आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरूण आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपीठ हवं आहे. त्यातील एक ध्येयवेडा तरूण म्हणजे उमाकांत मिटकर. यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास परिषदेच्या एकलव्य व पालावरच्या शाळेला जोडलेला हाडाचा कार्यकर्ता. त्यांचा पालावरच्या झोपडीपासून ते सरकारी खुर्चीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. अशा या ध्येयवेड्या तरूणाला महाराष्ट्र सरकारचा राज्यस्तरीय 'प्रेरणा युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने उमाकांत मिटकर यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत...!
महाराष्ट्रात भटके विमुक्त,पारधी, बहुरुपी, मसणजोगी, वडारी, कोल्हाटी, गोपाळ अशा जवळपास 52 जातीं-जमाती. ज्यांची पाळमुळं रुजली आहेत,संस्कृतीच्या गडद-गूढ अंधारात. या अंधारलेल्या समाजाला प्रकाशात आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेला यमगरवाडी (ता.तुळजापूर) येथील एकलव्य प्रकल्प.
ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांनी या ‘यमगरवाडी पॅटर्न’चा पाया रचला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि परिषद या दोन संस्थांच्या आधारे 1993 साली हे कार्य सुरू झाले. रानावनात हुंदडणारी ही रानपाखरं. यमगरवाडीच्या त्या झोपडीवजा शाळेत पालापालांवरून एकत्र आणली गेली आज यमगरवाडीत जवळपास चारशे- पाचशे विद्यार्थी आहेत. हे चारशे विद्यार्थी म्हणजे चारशे कहाण्या आहेत,अंगावर शहारे उमटणार्या. अशा या माणूसपणाच्या शाळेविषयी प्रत्येकाला लळा लागणे साहजिकच आहे. पण ज्याची संवेदनशीलता अधिक तीव्र आहेत अशीच युवक समाजसेवेत येत असतात. त्यामध्ये उमाकांत मिटकर मोडतात. नळदुर्गच्या बालघाट शिक्षण संस्थेत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पोटपाण्यासाठी धडपडत यमगरवाडीपर्यंत पोहोचलेला युवक पूर्णपणे वैचारिक दृष्ट्या बदलतो, समाजाच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी विचार करू लागतो, तो युवक म्हणजे उमाकांत मिटकर. साधारण 35 वर्षाचा युवक. आज ते समाजसेवेतील विविध शिखरे पादाक्रांत करत आहेत. संघटनेने सुरू केलेल्या पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. त्यात उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटके विमुक्तांना शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला. अनेक मुलांमध्ये त्यांच्यातले नैसर्गिक गुण हेरून त्यांना उत्तेजन दिले.
गेल्या दशकापासून उमाकांत मिटकरांचे काम पाहण्याची संधी मिळत आहे. यमगरवाडीचा एकलव्य प्रकल्प आणि पालावरच्या शाळेचा हा पूर्णवेळ कार्यकर्ता. पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. यास उमाकांतने घेतलेली मेहनत मी अनुभवलो आहे. M.A,M,ed असलेले उमाकांतआता कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून यमगरवाडी येथे 2002 पासून कामास प्रारंभ केले. यमगरवाडी प्रकल्प, उमरगा, बीड, किल्लारी या भागामध्ये मसणजोगी वस्तीत राहून समाजसेवेला त्यांनी वाहून घेतले.
त्याचबरोबर किनवट, धर्माबाद, नांदेड भागातील भिल्ल, आंध,कोलाम समाजावर त्यांनी काम केले या समाजातील जाणिवा, प्रश्न यांचा सखोल अभ्यास करून पालावरची शाळा हा अभिनव प्रयोग उदयास आला. त्यासाठी उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटका समाज हा शिक्षणापासून पूर्णपणे अंधारात होता. त्यास मूळ प्रवाहात आणण्यासाठी पालावरच्या शाळेचा महत्वाचा वाटा आहे. आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये 35 समाजांमध्ये 48 पालावरच्या शाळा आहेत. यातून शिक्षण, आरोग्य,आत्मसन्मान, स्वावलंबन अशा गोष्टींवर धडे दिले जातात. सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने ही याची दखल घेतली. त्याचबरोबर युनायटेट नेशन्स अॅन्ड कल्चरल ऑरगयायझेशन (युनिस्को) या संस्थेतर्फे अशिया पॉसिफिक विभागाकडून देण्यात येणारा एज्युकेशन इनोव्हेशन पुरस्कार ही मिळाला आहे.
उमाकांतजी आता येथेच थांबत नाहीत पालावरची शाळा, व्यसनमुक्ती, आरोग्य, बचतगट या कामाबरोबरच त्यांच्यावर आता राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण,महाराष्ट्रा शासन समिती सदस्यपदाची जबाबदारी आली आहे. पोलिस अत्याचार, गुन्हेगार आदी गुंतांगुंतीच्या विषयावर ते सक्षमपणे काम करत आहेत. सतत ग्राऊंड लेव्हलला काम करणार्या या तरुणाला महाराष्ट्र सरकारचा 2014-15 साठी देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रेरणा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील 35 वर्षाच्या आतील युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी या पुरस्कार दिला जातो. गेल्या सोळा वर्षा पासून भटके विमुक्त जाती-जमातींच्या कल्याणासाठी झटत असलेला ध्येयवेडा युवक उमाकांत मिटकर यांना मार्च 2017 च्या चौथ्या आठवड्यात महामहीम राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थित मुंबई विद्यापीठात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख५००००/-,गौरवपत्र,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मिटकर यांना यापूर्वी जिव्हाळा संस्थेचा (पुणे) राज्यस्तरीय समाजरत्न, हरित मित्र परिवार (पुणे)आदर्श नेतृत्व पुरस्कार, राज्यस्तरीय युवा चेतना पुरस्कार, आदर्श सामाजिक कार्यकर्ता,ऊस्मानाबाद आयकाॕन असे विविध नामंकित पुरस्कार मिळाले आहेत. अशा या ध्येयवेडा तरूणाला सलाम..!
विकास पांढरे,सोलापूर

Career and job of Umakant is very different. It is outstanding work. It is inspiring idol for youth of India.
उत्तर द्याहटवा