आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय महाराष्ट्राच्या समृध्दीला कारणीभूत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची निर्मिती हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे ‘दुष्काळी जिल्हा’ हा सोलापूर जिल्ह्यावर मारलेला शिक्का पुसला गेला. उजनी धरणनिर्मितीबद्दलचा विशाल दृष्टिकोन आणि पुनर्वसन संबंधित विचाराबाबत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिशादर्शक विचार मांडले होते. आज उजनी धरणामुळे 52 गावे विस्थापित झाले आहेत. या गावांचा अद्याप मूलभूत विकास झाला नाही. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या विचारांतून विस्थापित गावांचा विकास होणे गरजेचे आहे.
यशवंतरावांचे स्मरण
आपल्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला दिशा देण्याचे आणि समतोल व जातीभेदरहित राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य स्व. चव्हाण यांनी केले. शेती, सहकार, पंचायत राज, साहित्य, उद्योग, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अतुलनीय असे योगदान दिले. त्यामुळेच त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हटले जाते. 12 मार्च हा त्यांचा जन्मदिवस. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी जलायशाच्या निर्मितीमागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.
उजनी धरणाची निर्मिती
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात 7 मार्च 1966 मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उजनी धरण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर 1976 मध्ये धरण पहिल्यांदा भरले. तेव्हापासून आजपर्यंत या महाकाय धरणाच्या लाभक्षेत्रात सातत्याने पाणीसाठा होत गेला आणि गावच्यागावे पाण्याखाली गेली. सुंदर पुरातन आणि देखण्या वास्तू, मंदिरे धरणग्रस्तांना जशाच्या तशा सोडून जाव्या लागल्या होत्या. त्याअगोदर सोलापूरवर ‘दुष्काळी जिल्हा’ असा शिक्का होता. तो पुसण्याचे कार्य स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 117 टीएमसी एवढ्या विशाल पाणी क्षमतेचे उजनी धरण बांधून सुरू केली.
![]() |
| उजनी धरणाचे संग्रहीत चित्र |
![]() |
| उजनी धरण विस्थापित |
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आज पाण्यामुळे ऊस कारखानदारी वाढली आहे. लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील 52, पुणे 22, अहमदनगर जिल्ह्यांतील तीन या विस्थापित गावांची काय अवस्था आहे? सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 52 गावात उजनी धरणामुळे विस्थापित झालेले लोक राहतात. त्यांच्या वाट्याला सुलतानी कारभारामुळे संघर्षच उभा राहिला आहे. पंढरपूर तालुक्यातील सहा विस्थापित गावांना ग्रामपंचायती व 11 गावांना महसुलीचा दर्जा मिळाला नाही. धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे पंढरपूर, मोहोळ, माढा या तालुक्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.
यशवंतरावांच्या दूरदृष्टितून विकास
करमाळे तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली चालली आहेत आणि इंदापूर तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली जात आहेत. आणखीही काही गावे जाणार असतील. या सगळ्या गावांच्या पुनर्वसनाची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पण हे सर्व घडेल आणि हे काम पुरे होईल, असा माझा स्वतःचा विश्वास आहे. या घटनेस चाळीस वर्षे पूर्ण झाली पण आपल्या राज्यकर्त्यांनी स्व. यशवंतरावांनंतर धरणग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. विस्थापित गावांची ससेहोलपट दूर करण्यासाठी आजच्या लोकप्रतिनिधींनी व सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
■ राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उजनी धरणाची निर्मिती झाली. विस्थापितांना राज्यकर्त्यांनी वार्यावर सोडू नये, त्यांचा मूलभूत विकास करावा, असे विचार होते. आज या घटनेस 40 वर्षे उलटून गेले तरी विस्थापित 52 गावांचा विकास होऊ शकला नाही. राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण झाले झाले आहे. विस्थापित गावांना बारमाही पाणी देणे आवश्यक आहे, तसे होत नाही. शेती व उद्योगांना कॅनॉलमधून 1 जुलै ते 28 फेब्रुवारीपर्यंत पाणी देण्याची तरतूद आहे. या सर्व नियमांचे पालन होत नाही.
शिवाजी बंडगर, अध्यक्ष उजनी धरणग्रस्त समिती
© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(साभार दैनिक पुढारी, सोलापूर १२ मार्च २०१७)




प्रतिक्रिया
उत्तर द्याहटवावरील लेखास ज्येष्ठ पत्रकार अरुण दिक्षीत यांनी योग्य मत मांडले आहे. हा दस्ताऐवज महाराष्ट्रातील पत्रकारांच्या व्हाटसअप ग्रुपमध्ये फिरत असताना हाती लागला. फेसबुक मित्रांसाठी हा लेख सादर करत आहे.
टिप : फक्त मी ज्येष्ठ नाही बाकी ठीक
मा.विकास पांढरे,जेष्ठ पत्रकार उपसंपादक दै.पुढारी-(सोलापूर आवृत्ती) यांचा,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरांव चव्हाण यांच्या जयंती दिनी " दूरदृष्टीतून व्हावा उजनी विस्थापितांचा विकास" या शिर्षकां- खाली प्रसिध्द झालेला लेख वाचला. वास्तवतेचे दर्शन घडविणारा हा चिंतनशील लेख लक्षवेधी ठरतो.
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासांत माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा ठरतो हे त्रिकालबाधित सत्य ठरते."दुष्काळी जिल्हा "ही सोलापूर जिल्ह्याची ओळख कायमस्वरूपी संपुष्टांत आणावी यासाठी,यशवंतराव चव्हाण यांनी,जातीने पुढाकार घेतला व आपल्या विशाल ,दूरदृष्टीकोनांतून "उजनी धरण "निर्मितीचा संकल्प पूर्णत्वास नेला ही वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ७ मार्च १९६६ मध्ये स्व. यशवंतरावचव्हाणयांच्यासंकल्पनेतील उजनी धरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.१९७६ साली धरण पहिल्यांदा भरले.तेव्हा पासून ते आज पर्यत या महाकाय धरणांच्या लाभ क्षेत्रांत सातत्याने पाणीसाठा होत आहे.११७ टीएमसी एवढी विशाल क्षमता या उजनी धरणाची आहे. उजनीच्या पोणलोट क्षेत्रांत आज पाण्यामुळे ऊस कारखानदारी वाढली आहे.लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे.शेतकरी आणि शेती समृद्ध व्हावी हा उजनी धरण निर्मिती मागील यशवंतराव चव्हाण यांचा उद्देश सफल झाला आहे पण विस्थापितांच्या विकासाचा प्रश्र्न ४०वर्षे उलटून गेली तरी, आजही अनुत्तरीत रहावा हीच या यशस्वी प्रकल्पांची दुर्देवी शोकांतिका ठरली आहे.
विशाल उजनी धरण प्रकल्प निर्मितीत,५२ गांवे विस्थापित झाली. सुंदर पुरातन आणि देखण्या वास्तू, मंदिरे विस्थापिताना जशाच्या तशा सोडून जावे लागले.विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत स्व.यशवंतरांव चव्हाण यांनी दिशादर्शक भूमिका स्षष्ट केली होती.त्या दिशादर्शक विचारांतून विस्थापितांचा विकास अपेक्षित होता.सोलापूर जिल्ह्यातील ५२,पुणे जिल्ह्यातील २२,व अहमदनगर जिल्ह्यातील ३ या विस्थापित गावांची आजमितीस दारूण अवस्था आहे.सोलापूर जिल्ह्या तील जवळपास ५२ गावांत उजनी धरणामुळे विस्थापित झालेले राहतात त्याच्या वाटाल्या सुलतानी कारभारा मुळे ,संघर्षच उभा राहिला आहे. पंढरपूर तालुक्यातील ६ विस्थापित गावांना ग्रामपंचायती व ११गावांना महसुलीचा दर्जा मिळालेला नाही. धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे पंढरपूर,मोहोळ,माढा या तालुक्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे.करमाळा तालुक्यातील २० गांवे आणि इंदापूर तालुक्यातील २० गांवे या योजनेखाली जात आहेत.आणखी ही काही गांवे जाण्याची शक्यता आहे.विस्थापिताना राज्यकर्त्यानी वार्यावर सोडू नये असे स्पष्ट निर्देश स्व.यशवंतराव चव्हाण यांनी दिले होते पण ४० वर्षे उलटून गेली तरी विस्थापित गावांचा विकासराज्यकर्त्या नी केलेला नाही.विस्थापित गावांना बारमाही पाणी देणे आवश्यक होते पण प्रत्यक्षांत बारमाही पाणी दिले जात नाही.शेती व उद्योगांना कॅनाल मधून १जुलै ते२८ फेब्रेवारीपर्यत पाणी देण्याची तरतूद आहे .या व अन्य नियमांचे पालन केले जात नाही. राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विस्मरण झाले आहे. ही अत्यंत दुर्देवी व खेदजनक बाब ठरली आहे.प्राप्त परिस्थितीत विस्थापितांची ससेहोलपट दूर करण्यासाठी आजच्या लोकप्रतिनिधीनी व शासनाने गांभिर्याने दखल घेऊन तत्परतेने उचित कार्यवाही करणे नितांत गरजेचे आहे.उजनी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष शिवाजी बंडगर यांच्या प्रतिक्रियेचा संदर्भ देत , लेखनकृतीत दिलेली सविस्तर माहिती संबंधित घटकांचे लक्षवेधणारी व त्यानाअंतर्मुख करणारी ठरते हे मात्र तितकेच खरे !————————पत्रकार अरूण दीक्षित खोपोली. १२/३/२०१७ ( ९४२२६९४६६६)