![]() |
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१
कोल्हापूरची रणरागिणी
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१
भटके विमुक्त: सद्यस्थिती आणि उपाय
.
३१ ऑगस्ट रोजी, भटके विमुक्त दिवस साजरा झाला. त्यानिमित्त एक आठवण जागी झाली. टाळेबंदीची दुसऱ्या लाट येण्यापूर्वी भटके विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी आम्ही काही समविचारी मंडळी एकत्रित आलो होतो. यानिमित्त भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्याचा विचार सुरू होता. पण टाळेबंदीमुळे ती घेता आली नाही. ' भटके विमुक्त: सद्यस्थिती आणि उपाय' या विषयावर मी पेपर लिहिला होता. तो इथे शेयर करत आहे.
आज भारताला स्वातंत्र मिळून तब्बल ७५ वर्षे झाले तरी, भटक्या विमुक्त जमाती विकासाच्या
प्रक्रियेपासून शेकडो मैल दूरच राहिल्या आहेत. महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या
४९ जाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. यांना ना हक्काची जमीन
आहे ना घर, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या
लोकांच्या जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. भटक्या विमुक्तांच्या काही
जमातींवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. याच धरत्रीचे
पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. राजकीय उपेक्षा, पोलिसांचा
जाच, याबरोबरच जात पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या
या समाजाच्या दैन्यावस्था अजूनही संपल्या नाहीत. या समाजातील स्त्रियांचे दु:ख ही
भेदक आहेत.
विमुक्त जातीं (व्हिजे)
महाराष्ट्रात विमुक्त जातींची (व्हिजे) संख्या
१४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे. बेरड, बेस्तर, भामटा, कैकडी, कंजारभाट, कटाबू, बंजारा, राज पारधी, राजपूत
भामटा, रामोशी, वडार, वाघरी, छप्परबंद
(मुस्लिम धर्मीयासह) जातीचा समावेश होतो.
भटक्या जमातीं (ब)
भटक्या जमातींची (ब) (एनटी-बी) संख्या ३८ असून
या प्रवर्गास २.५% आरक्षण आहे. यात गोसावी, बेलदार, बेलदार
,भुते, भराडी, चित्रकथी, गारुडी, लोहार, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मैराळ, मसनजोगी, नंदीवाले, पांगूळ, रावळ, सिक्कलगर, वैदू, वासुदेव
,भोई, बहुरुपी, ठेलारी, ओतारी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले, गिहारा/गहरा, गुसाई/गोसाई, मुस्लिम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर, भारतीय
इराणी, गवळी, मुस्लिम गवळी, गवलान, ग्वालवंश गोपाल-गवळी गवळी- गोपाल,दरवेशी, वाघवाले-
शाह (मुस्लिम धर्मीय), अस्वलवाले, बागडी या जमातींचा सामवेश होतो.
भटक्या जमाती (क) (एनटी-सी)
भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या
एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे. अहिर, धनगर अहिर,डांगे,गढरी, हंडे, तेलवर,
हटकर, हाटकर, शेगर, सगर, सेगर, खुटेकर, तेलंगी, ठेलारी,
कोकणी-धनगर,कानडे, वऱ्हाडे, धनगर, झाडे, झेंडे, कुरमार, माहुरे, लाडसे, सनगर, धनवर,
गडारिया, गड्री, गढरी, डंगेधनगर व डोंगरी धनगर, गडरिया/ गडारिया या जमातींचा समाविष्ट
होतो.
भटक्या जमातींची (ड)
भटक्या जमातींची (ड) (एनटी-डी) संख्या १ (वंजारी) असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे
आज डोंबारी , बहुरूपी , कलंदर , वैदू मरीआईवाले , नाथपंथी , नंदीवाले , बेलदार , कोल्हाटी , रामोशी , पाथरवट , उचले यांच्या आयुष्याची तर फारच दैना झालेली आहे. या शिवाय राज्यातला इतर भटका बांधव अनेक शासकीय लाभापासून वंचित आहे. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात अजूनही बदल झाला नाही. आजही ते लाजलेले व बुजलेले वाटतात. भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी १४ मार्च २००५ ला केंद्र सरकारने बाळकृष्ण रेणके आयोगाची स्थापना केली होती. आयोगाच्या अहवालानुसार आजही या जमातीतील ९८ टक्के लोकांकडे रेशनकार्ड नाही, ७२ टक्के लोक भूमिहीन आहेत आणि ९८ टक्के लोकांना कोणत्याही प्रकारचे बँकेचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. या प्रवर्गातील लोक हे देशातील सर्वात दुर्बल घटक आहेत. अहवालानुसार विकास मात्र अजूनही झाला नाही. १९ फेब्रुवारी २०१४ च्या केंद्र सरकारच्या राजपत्रानुसार दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली एका नवीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. इदाते यांच्याकडून वंचित घटकांचा विकास होईल, अशी अपेक्षा करूया.
या समूहाचे उत्थान करायचे असेल तर प्रथम अन्न, निवारा, शिक्षण आणि महिलांच्या प्रश्नांचा शोध घेऊन त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत.
रेशनकार्ड व आधारकार्ड
उपाय
२)भटक्या समाजापर्यंत रेशनकार्ड व आधारकार्ड
पोहोचण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि रेशन दुकानदार आशा तीन जणांची टीम तयार करुन
भटक्या समाजातील लोकांना रेशनकार्ड व आधारकार्ड
उपलब्ध करून देणे.
भटक्या समाजातील महिला व पुरुषांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते. तसेच पुरुषसत्ताक जातपंचायतीमध्ये या महिलांना दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यासाठी महिलांना योग्य सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
१)भटक्या विमुक्त जमातीतील महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांना अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्याचे विशेष संरक्षण द्यावे आणि भटके विमुक्त जमातींना जातीचा दाखला काढण्यासाठी १९६१ सालच्या वास्तव्याच्या पुराव्याची अट रद्द करणे.
२) एस.एसटी प्रमाणे अत्याचार प्रतिबंधक कायदा भ.वि.जा.ज यांना देखील संरक्षण देणे.
३)भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी अॅक्टचे
संरक्षण मिळाले पाहिजे.
भटक्या समाजातील धनगर घटकांचा आरक्षणाचा विषय नेहमी चर्चेत असतो. या समूहाला कायदेशीर मार्गाने सवलत मिळणे आवश्यक आहे.
उपाय
जात-जमात कोणत्या वर्गात समाविष्ट आहे हे
दर्शविणारी तीन परिशिष्टे घटनेत जोडली आहेत. यातील परिशिष्ट नंबर दोन (अनुसूचित
जमातीची यादी)मध्ये छत्तीस क्रमांकावर ओरान आणि धनगड या जातींचा उल्लेख आहे. यातील
धनगड म्हणजेच धनगर होय. भारताची घटना इंग्रजी व हिंदीत लिहिली आहे. भाषा
शास्त्रानुसार जसे ताकारी यांचे ताकाडी, जाखरचे जाखड, गुरगावचे गुडगाव
होते तसेच धनगरचे धनगड झालेले आहे.
१) ‘र’ आणि ‘ड’चे खुसपट काढून धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे.
२) मेंढपाळाना संरक्षण देणे व गायरान - वनक्षेत्रातील जमीन मेंढपाळांना उपलब्ध करून देणे.
३) धनगर समाजासाठी १० हजार घरे, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलती अशी एक हजार कोटी रूपयांची योजना भाजपा सरकारने जाहीर केली होती त्यावर काम देखील सुरू होते मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वरील सर्व योजना बंद केल्या. या सर्व योजना -सवलती तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे.
कैकाडी व ठकारी जातीसाठी
उपाय
२)विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी
समाजात रोटी बेटीचे व्यवहार होतात, त्यामुळे हे दोन्ही समाज एकच आहेत. राज्यातील
कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवणे आवश्यक.
या शिवाय शासनाने वंचित समाजाच्या विविध परंपरांची माहिती संकलित करणे गरजेचे आहे, त्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, मुख्य म्हणजे या समूहाच्या प्रश्नांकडे बघण्याची सरकारची व समाजाची दृष्टी न्यायसुसंगत असली पाहिजे.
छायाचित्र -आंतरजालावरून
विकास पांढरे,९९७०४५२७६७
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१
उजनीकाठाचे सौंदर्य - कोकरे आयलॅन्ड
मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. कुगावचे कोकरे आयलॅन्ड हे त्यापैकीच एक. इतिहासाचा झालेला स्पर्श आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या होणाऱ्या दर्शनामुळे कोकरे आयलॅन्डची सफर अविस्मरणीय होऊन जाते.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता.माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश-विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवाॅटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे.
![]() |
| उजनी धरण |
सोलापूर, नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या उजनी धरणाला लागूनच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. तसेच दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर, कुर्डुवाडीपासून भिगवणपर्यंतच्या पट्ट्यातूनच गेली आहे. दळणवळणाच्या या सोयीसोबतच परिसरातील अनेक गोष्टी पर्यटनवाढीला मदत करणाऱ्या आहेत. उजनी जलाशयावर मुक्त विहार करणारे पक्षी, मच्छीमारांच्या नौका, अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे विलोभनीय प्रतिबिंब पाहण्याची मजा काही औरच आहे. यामुळे हे विस्तीर्ण जलाशय अलीकडच्या काळामध्ये पर्यटकांना आकर्षित करत आहे. धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येथे येतात. त्यामुळे अलीकडच्या काळात उजनी जलाशय व उजनी बॅकवाॅटर ची ख्याती देशभर झाली आहे. याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेण्याची गरज आहे.
गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकत होत आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही.अशाच एका बेटाबद्दल आणि आयलॅन्डबद्दल (कृषि पर्यटन केंद्र) आज तुम्हाला माहिती सांगणार आहे.
कुगाव एक निसर्गरम्य बेट
उजनी पाणलोट क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले. त्यापैकीच एक गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील कुगाव. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला मोठा इतिहास आहे. हनुमानाची जन्मभूमी म्हणून गावाची ओळख आहे. याबाबतचा 'भीममहात्म्य' या पौराणिक ग्रंथातील ३३ व्या अध्यायात उल्लेख आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी कुगाव येथे भूईकोट किल्ला बांधला आहे. सध्या या ठिकाणीला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर जलसमाधी लाभली आहे. धरणातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पाडतो. भारतातीतील हनुमान भक्त, शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नागराज मुंजळे यांच्या सैराट चित्रपटातील काही प्रसंगाचे चित्रिकरण या ठिकाणी करण्यात आले आहे.
![]() |
| कुगावचे हनुमान मंदिर |
संपूर्ण गावाला भीमा नदीच्या पात्राने तिन्ही बाजूने वेढा घातला आहे. त्यामुळे हा परिसर बेटासारखा भासतो. या ठिकाणी जमीन मार्गाने येण्यासाठी एकच मार्ग (प्रजिमा ११) आहे; हा मार्ग ही तितकासा सोपा नाही. त्यासाठी स्थानिक गावकरी, हनुमान भक्तांना व प्रवाशांना सुमारे १२० किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. तर उर्वरित चार मार्ग पुणे जिल्ह्यातील कळाशी, गंगावळण, कालठण व शिरसोडी गावातून पाण्यामार्गे येणारे आहेत. हा मार्ग सोपा होण्यासाठी कळाशी (ता.इंदापूर)ते कुगावपर्यंत पुल तयार झाला तर मराठवाड्याला जोडणारा हा जवळचा मार्ग होणार आहे. उजनी बॅकवाॅटर परिसरातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळू शकते.
कुगावचा कोकरे आयलॅड
उजनी लाभ क्षेत्रातील वैभव लक्षात घेऊन कुगाव येथील प्रगतशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे हे फेब्रुवारी २०१९ पासून पाच एकरांवर कोकरे आयलॅन्ड नावाने कृषि पर्यटन केंद्र विकसित करत आहे.
![]() |
| कोकरे आयलॅन्ड |
कोकरे आयलॅन्ड उभारणीबाबत धुळाभाऊ कोकरे म्हणाले, "आमच्या कोकरे परिवाराची उजनी बॅकवाॅटर परिसरात जमीन आहे. त्यामध्ये ऊस आणि केळी ही मुख्य बागायती पिके आहेत. आमच्या कुगावला मोठा पौराणिक इतिहास तर आहेच; शिवाय इथला निसर्ग जगाच्या नकाशावर यावा, स्थानिक पदार्थांना वाव मिळावा आणि शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून कोकरे आयलॅन्डची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्रातून केवळ आमचा विकास होणार नाही तर यातून स्थानिक लोकांनाही रोजगार मिळणार आहे. या आयलॅन्डचा आकार एखाद्या द्विपसमूहासारखा आहे. या तिनही बाजूंनी विस्तीर्ण जलाशय, देशी विदेशी पक्ष्यांचा संचार, नीरव शांतता ही या पर्यटन स्थळाची जमेची बाजू आहे. त्यामुळेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात. सध्या हे केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे."
नयनरम्य दृश्य
हिवाळ्याची चाहूल लागताच उजनी जलाशयावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगोसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात होते. कुंभारगाव, डिकसळ,भादलवाडी, डाळज, पळसदेव, गंगावळण, आगोती, कुगाव, भिगवण या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागतात. त्यानंतर पर्यटकांची पावले उजनी पाणलोट क्षेत्राकडे वळू लागतात. पक्ष्यांचे आगमन हे पर्यटक,पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमीसाठी पर्वणीच ठरते.
![]() |
| फ्लेमिंगोचे विहंगम दृश्य |
कोकरे आयलॅन्डच्या संचालिका व माजी सरपंच तेजस्विनी कोकरे सांगतात, " पर्यटकांना जलविहार करता यावे, यासाठी नौका विहारची सोय करण्यात आली आहे. जलाशयावर विहार करणारे फ्लेमिंगो (रोहित-अग्निपंख), पेंटेड स्टॉर्क ग्रे हेरॉन राखी बगळा,(मोर बगळा), कॉमन कूट (चांदवा), ब्लॅक हेडेड आयबिस, ब्राऊन हेडेड गल (तपकिरी डोक्याचा कुरव), ब्लॅक हेडेड गल (काळ्या डोक्याचा कुरव), एशियन ओपनबिल (मुग्धबलाक), पर्पल स्वॅम्पहेन (जांभळी पाणकोंबडी) पर्पल हेरॉन (जांभळा करकोचा), लिटल कॉर्मोरंट (छोटा पाणकावळा), ग्रेट कॉर्मोरंट (मोठा पाणकावळा), रुडी शेल्डक (चक्रवाक), नॉर्दर्न शॉवेलर थापट्या), युरोपिअन स्पूनबिल (चमचा) यांसारखे अनेक प्रकारचे पक्षी आणि पक्ष्यांचे दर्शन होते.
![]() |
| विस्तीर्ण जलाशयावर नौकाविहार |
उजनी जलाशयाचा पसारा सहा किमी रुंद तर १४० किमी लांब असा भीमानगर ते दौंड पट्ट्यापर्यंत प्रचंड मोठा आहे. त्यामुळे नौकाविहार करण्याचा एक अविस्मरणीय अनुभव येथे येतो. पक्षी पाहण्यासाठी येणारे अनेक पर्यटक किमान एकदा तरी नौकाविहार करतातच. तसेच अनेक मच्छीमार तरुण नौकाविहार आणि पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देतात. विस्तीर्ण जलाशयामुळे जलविहार करण्यासाठी येथे मोठी संधी आहे. जलविहार करत जलाशयावरील पक्ष्यांच्या विलोभनीय कवायती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्याच असतात.
![]() |
| आनंदी गोपाळ |
![]() |
| सूर्यास्त दर्शन |
त्यासोबतच मच्छिमारांच्या होड्या, मासळीचे खमंग जेवण आणि सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनमोहक दृश्यही या ठिकाणावरून बघता येते. जलाशयात भरपूर खाद्य उपलब्ध असल्यानं पक्ष्यांसाठी ही पर्वणीच असते. तिन्ही ऋतूमध्ये नितांत सुंदर अनुभव येतोच; पण येथे दडलेल्या जैवविविधता व निसर्ग नवलांमुळे पर्यटकांची मजा द्विगुणित होते.
देशी झाडे व वनस्पतींचे संवर्धन
या पर्यटन केंद्रात निसर्गाचा अधिवास जपणे,जैवविविधतेचे रक्षण करण्याबरोबरच विविध दुर्मिळ वृक्ष,देशी झाडांची रोपांची लागवड करण्यात आली आहे.
![]() |
| जैवविविधतेने नटलेला उजनी बॅक वॉटर |
आंबा, चिंच, नारळ, सुपारी, चिक्कू, कडुलिंब, बाभूळ, सिताफळ, वड, पिंपर,जांभूळ, पेरू, उंबर त्याचबरोबर पाणफुटी, तुळस, गुळवेल, अश्वगंधा, कोरफडीसारख्या वनौषधी पहायला मिळतात. या केंद्रात ऊस, केळी, मका, गहू, वांगे, टोमॅटो, अशी नानाविध पिकांचेही दर्शन होते.
शिवारफेरीतून कृषि दर्शन
या आयलॅन्डच्या ठिकाणावरून उजनीकाठाचे सौंदर्याबरोबर ग्रामीण- कृषि जीवन संस्कृतीचे दर्शन ही पर्यटकांना होते. ग्रामीण भागातील लोक शहरात राहिल्यांने बऱ्याचवेळा आपली ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ तुटते ती भरून काढण्याचा प्रयत्न कोकरे आयलॅन्ड करत आहे.
![]() |
| केळीची शेती |
धुळाभाऊ कोकरे म्हणाले, " आम्ही आमचे लक्ष शालेय विद्यार्थ्यांवर केंद्रित केले आहे. मुलांना भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती व्हावी यासाठी परिसर अभ्यास नावाचा भाग असतो. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात 'जलदिंडी' नावाचा धडा आहे. जलदिंडीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा पाण्यामार्गे असतो. आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून या जलदिंडीचा कोकरे आयलॅड येथे विसावा असताना मुलांना याची प्रत्यक्षात पाहणी करत अनुभव घेता येतो. मुलांना निसर्गाचे दर्शन व्हावे आणि ग्रामीण जीवन कळावे म्हणून आम्ही विशेष व्यवस्था करतो. हंगामानुसारचे पीके, ऊस व केळीची डेमो प्लाँट, फळझाडे, वनस्पतीची शिवार फेरीच्या माध्यमातून माहिती देत असतो. विशेष म्हणजे मुलांना त्यांच्या शिक्षकांबरोबर बैलगाडी, ट्रॅक्टर व बोटींगच्या माध्यमातून फेरी मारण्यात येते. मैदानात पारंपरिक पद्धतीचे विटी दांडू, खो खो, कबड्डी असे देशी खेळ शिकवले जातात."
कोकरे आयलॅन्डची वैशिष्ट्ये
१ ) हनुमान जन्मभूमी
२) तिन्ही बाजूंनी उजनी बॅकवाॅटर
३) बोटिंगची सुविधा, पक्षी पाहण्याची संधी
४) शालेय सहलीची शासकीय परवानगी
५) शिवार फेरी,प्रत्यक्ष शेतीची प्रात्यक्षिके.
६) राहण्याची सोय, स्थानिक भोजनाची सोय
![]() |
| नकाशा |
पारंपरिक शेतीला थोडे व्यवसायिक रूप दिले तर जास्तीचे उत्पन्न मिळू शकते हे कोकरे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे.या व्यवसायासाठी शहरात वा अन्य ठिकाणी जाऊन स्थलांतर करण्याची गरज नाही हे विशेष म्हणजे आपल्या गावात, शेतात राहून कृषिसेवा करता येते.
"कोरोनाचा कृषि पर्यटनाला फटका"- तेजस्विनी कोकरे
"गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या चाललेल्या खेळाचा मोठा फटका ग्रामीण अर्थकारणाशी निगडित असलेल्या कृषि पर्यटन केंद्रांना बसला आहे. चालू वर्षात कृषि पर्यटनाला बसलेला फटका भरून निघेल अशी आशा होती. हल्लीचा कोरोना काळ संपवावा आणि तीन चार दिवस बाहेर कुठे तरी जाऊन यावे असे प्रत्येक पर्यटकांना वाटत आहे; पण याही वर्षी टाळेबंदीमुळे पर्यटक घराबाहेर पडू शकत नाहीत. कोरोनाच्या तडाख्यातून हळूहळू का होईना; पण जगाची सुटका होणे आवश्यक आहे. तरच पर्यटन केंद्रांना पुन्हा एकदा झळाळी मिळेल."
- कार्यकारी संचालिका, कोकरे आयलॅन्ड, कुगाव (ता.करमाळा)
© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
संपर्क
कोकरे आयलॅन्ड, कुगाव
मो नं:-७७४४००००८४
शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१
महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव
वाघ म्हणजे रुबाब, वाघ म्हणजे सौंदर्य, वाघ म्हणजे जंगलची शान. निसर्गाच्या अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांचे जगणे सुकर करण्यासाठी जंगलतोडीवर कडक निर्बंध आणणे क्रमप्राप्त आहे. आपले क्षेत्र सोडून वाघ दुसरीकडे अतिक्रमण करत नाही. या गोष्टी माणसासाठीही बोधप्रद आहेत. महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पाविषयी थोडक्यात करून दिलेला हा परिचय.
२९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून जगात आणि आपल्या देशात वाघाचे जतन व संवर्धन होण्यासाठी अनेक पावले उचलली गेली. आज वाघांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २०१०मध्ये पारंपरिक औषध तयार करण्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आले. जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या जंगलाच्या राजाला वाचवणे ही काळाची गरज आहे. सध्या भारतात ५० वाघ प्रकल्प आहेत. भारतात बंगाल टायगर्स ही सर्वाधिक आढळणारी वाघांची प्रजाती आहे. त्यांना रॉयल बंगाल टायगर्स असेही संबोधले जाते. जगातील सर्वात जास्त वाघ प्रजाती या भारतात आढळतात. २०१८च्या गणनेनुसार २१६७ वाघ भारतात होते. सध्याच्या घडीला (मार्च २०२१पर्यंत) भारतात '२९६७ इतकी वाघ लोकसंख्या' नोंदली गेली आहे.
महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. मेळघाट, ताडोबा -आंधारी, पेंच, नवेगाव, सह्याद्री, बोर या प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी इथला निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देश-विदेशी पर्यटक वाघ प्रकल्पात गर्दी करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली आहे. शिवाय वाघ रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष वाघ दलाची स्थापना करण्यात आली आहे.
१) ताडोबा– आंधारी व्याघ्र प्रकल्प
ताडोबा अंधारी प्रकल्प (जिल्हा चंद्रपूर) म्हणजे वाघांचे राज्य असलेली भूमी. येथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पाची निर्मिती झाली. या वाघ प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.
याठिकाणी वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. शिवाय वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही पहायला मिळतात.
२) मेळघाट व्याघ्र प्रकल्प
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (जि.अमरावती) फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठ्या वाघ प्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट वाघ प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे.
याठिकाणी पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील पहायला मिळतात.
३) पेंच व्याघ्र प्रकल्प
पेंच व्याघ्र प्रकल्प (जि.नागपूर) हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा जैवविविधतेने संपन्न प्रदेश आहे. याठिकाणी वाहत असणाऱ्या पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला वाघ प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.
या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यासारखे प्राणी बघायला मिळतात.
४) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. हा प्रकल्प कान्हा, पेंच आणि ताडोबा वाघ प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. २०१३ साली हा प्रकल्प अस्तित्वात आला. नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौ.कि.मी), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौ.कि.मी), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौ.कि.मी), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौ.कि.मी) आणि कोका वन्यजीव अभयारण्या (९७.६२४) चे क्षेत्र मिळून तयार झाले आहे.
या प्रकल्पात ढाण्या वाघासमवेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर आदी वन्यजीवांचे दर्शन होते.
५) बोर व्याघ्र प्रकल्प
बोर व्याघ्र प्रकल्प हा बोर धरण यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बोर व न्यू बोर अभयारण्याचा भाग असून हे वर्धा व नागपूर जिल्ह्यात व्यापलेले आहे. या प्रकल्प १३ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.किमी) क्षेत्रावर वसलेला आहे. बोर वाघ प्रकल्पाची सफारी करताना पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वले, रानडुकर, नीलगाय, सांबर, चितळ, भेडकी, रानकुत्री, खवले-मांजराचे दर्शन होते.
६) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
हिरव्यागार वनराईमुळे पश्चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. त्यातून सह्याद्री वाघ प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्याद्री वाघ प्रकल्प तयार केला आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे १ हजार १६६ चौरस किलोमीटरचे सह्याद्री वाघ प्रकल्पाचे क्षेत्र आहे.
येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी नजरेस पडतात.
आपण सर्वांनी जंगलाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय अवैध शिकार करणाऱ्यांवर कडक निर्बंध घालणे तसेच कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे.
- विकास पांढरे,९९७०४५२७६७
कुशल व्यवस्थापक
असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...
-
'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ...
-
गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा न...
-
साहेबराव :- हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय... सरकार : ......















