शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव

 


वाघ म्हणजे रुबाब, वाघ म्हणजे सौंदर्य, वाघ म्हणजे जंगलची शान. निसर्गाच्या अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांचे जगणे सुकर करण्यासाठी जंगलतोडीवर कडक निर्बंध आणणे क्रमप्राप्त आहे. आपले क्षेत्र सोडून वाघ दुसरीकडे अतिक्रमण करत नाही. या गोष्टी माणसासाठीही बोधप्रद आहेत.  महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पाविषयी थोडक्यात करून दिलेला हा परिचय.

२९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून जगात आणि आपल्या देशात वाघाचे जतन व संवर्धन होण्यासाठी अनेक पावले उचलली गेली. आज वाघांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २०१०मध्ये पारंपरिक औषध तयार करण्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आले. जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या जंगलाच्या राजाला वाचवणे ही काळाची गरज आहे. सध्या भारतात ५० वाघ प्रकल्प आहेत. भारतात बंगाल टायगर्स ही सर्वाधिक आढळणारी वाघांची प्रजाती आहे. त्यांना रॉयल बंगाल टायगर्स असेही संबोधले जाते. जगातील सर्वात जास्त वाघ प्रजाती या भारतात आढळतात. २०१८च्या गणनेनुसार २१६७ वाघ भारतात होते. सध्याच्या घडीला (मार्च २०२१पर्यंत) भारतात '२९६७ इतकी वाघ लोकसंख्या' नोंदली गेली आहे.

महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. मेळघाट, ताडोबा -आंधारी, पेंच, नवेगाव, सह्याद्री, बोर या प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी इथला निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देश-विदेशी पर्यटक वाघ प्रकल्पात गर्दी करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली आहे. शिवाय वाघ रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष वाघ दलाची स्थापना करण्यात आली आहे.

१) ताडोबा– आंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी प्रकल्प (जिल्हा चंद्रपूर) म्हणजे वाघांचे राज्य असलेली भूमी. येथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पाची निर्मिती झाली. या वाघ प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.

याठिकाणी वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. शिवाय वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही पहायला मिळतात.

२) मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प (जि.अमरावती) फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठ्या वाघ प्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट वाघ प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे.

याठिकाणी पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील पहायला मिळतात.

३) पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प (जि.नागपूर) हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा जैवविविधतेने संपन्न प्रदेश आहे. याठिकाणी वाहत असणाऱ्या पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला वाघ प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.

या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यासारखे प्राणी बघायला मिळतात.

४) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. हा प्रकल्प कान्हा, पेंच आणि ताडोबा वाघ प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. २०१३ साली हा प्रकल्प अस्तित्वात आला. नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौ.कि.मी), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौ.कि.मी), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौ.कि.मी), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौ.कि.मी) आणि कोका वन्यजीव अभयारण्या (९७.६२४) चे क्षेत्र मिळून तयार झाले आहे.

या प्रकल्पात ढाण्या वाघासमवेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर आदी वन्यजीवांचे दर्शन होते.

५) बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्प हा बोर धरण यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बोर व न्यू बोर अभयारण्याचा भाग असून हे वर्धा व नागपूर जिल्ह्यात व्यापलेले आहे. या प्रकल्प १३ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.किमी) क्षेत्रावर वसलेला आहे. बोर वाघ प्रकल्पाची सफारी करताना पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वले, रानडुकर, नीलगाय, सांबर, चितळ, भेडकी, रानकुत्री, खवले-मांजराचे दर्शन होते.

६) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. त्यातून सह्याद्री वाघ प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्याद्री वाघ प्रकल्प तयार केला आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे १ हजार १६६ चौरस किलोमीटरचे सह्याद्री वाघ प्रकल्पाचे क्षेत्र आहे.

येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी नजरेस पडतात.

 आपण सर्वांनी जंगलाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय अवैध शिकार करणाऱ्यांवर कडक निर्बंध घालणे तसेच कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे.

- विकास पांढरे,९९७०४५२७६७ 

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बहिण-भावानी माळरानावर फुलवली वनराई

 


माणदेश म्हटले की डोळयासमोर येतो तो दुष्काळ, दूरदूरपर्यंत ना झाडं दिसतं, ना सावली, ना पाणी, ना बागायती शेती.. दिसतं फक्त कुसळी गवत, शुष्क माळरान अन माळरानावर चरणाऱ्या मेंढया. अशा या माळरानावर वनराई फुलवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या आणि पर्यावरण संरक्षक म्हणून काम हाती घेतलेल्या बहिण-भावाची  ही प्रेरणादायी गोष्ट.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ‘गोंदवले खुर्द’ या गावातील रोहित आणि रक्षिता बनसोडे या बहिण भावांची जोडी गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या माण परिसरातील माळरानावर वनराई फुलवण्यासाठी झटत आहे.

अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते‘ या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन रोहितने वनसंवर्धनाचे काम हाती घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी सुरू झालेल्या श्रमदानाचे हे व्रत गेली चार वर्षे सतत सुरू आहे. दररोज आपल्यासोबत श्रमदानासाठीचे साहित्य कुदळ, खोरे, पाण्याची बाटली घेऊन त्याचा हा प्रवास सुरू आहे. यात त्याची बहिण रक्षिताची साथ मिळाली. या भावडांनी मिळून उजाड माळरानावर आतापर्यंत पाच हजाराहून जास्त झाडे लावून वनसंवर्धनाचे मोठे कार्य केले आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी दूरदूरवरून डोक्यावरून पाणी वाहून झाडांना पाणी घालून झाडे जगवली आहेत. या भावडांच्या ध्येयवेड्या कामामुळे आज गोंदवले गावाच्या माळरानावर हिरवाई नटल्याचे सुंदर दृश्य नजरेस पडते.

विशेष म्हणजे, या भावडांनी आपल्या श्रमदानातून ३५ सीसीटी बांध आणि एक माती बांध तयार करण्याचे अवघड कार्य या दोघांनी पूर्ण केले आहे. या बांधामध्ये सुमारे १ कोटी लिटर पाणी मुरेल इतकी क्षमता आहे. हे कार्य करत असताना रोहितला अनेक संकटांशी सामना करावा लागला. एकदा त्याच्यावर लांडग्यांचा हल्ला झाला. त्यातून तो बचावला.


रोहित कोणाचेही आर्थिक पाठबळ न घेता, महाविद्यालयाच्या वेळा, अभ्यास सांभाळून दररोज ५ तास वनसंवर्धनाचे काम करत असतो. आज रोहित २० आणि रक्षिता १७ वर्षाची आहे. या वयातील मुले मोबाईलच्या व्यसनात अडकत आहेत. अशावेळी या दोन ध्येयवेड्या भावडांनी वनसंवर्धनाचे महान कार्य हाती घेऊन पर्यावरण संरक्षक बनले आहेत.

रोहित आणि रक्षिता यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संस्था व संघटनांकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

“प्रत्येकाला जास्तीजास्त नैसर्गिक प्राणवायू मिळवून देण्यासाठी, सर्वांना मोकळाश्वास उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीजास्त झाडे लावून ती जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पावसाळ्यात सर्वांनी झाडे लावण्यासाठी पुढे आले पाहिजे, किमान स्वतःसाठी लागणारे आँक्सिजन निर्माण करण्यासाठी आपल्या उपलब्ध परिसरात जास्तीजास्त झाडे लावण्यावर भर देऊ”

रोहित बनसोडे

रोहित आणि रक्षिता शंकर बनसोडेची ही छोटेशी गोष्ट वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून देतेच शिवाय पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्यासाठी प्रेरणा ही देते.

  • विकास पांढरे


कृषिसेवाव्रती-डॉ.बी.व्ही.निंबकर

शेळी व मेंढ्यांचा सूक्ष्म अभ्यास व संशोधन करणारे, वसंत ज्वारी, करडई, कापूस बियाणांच्या संशोधनात बहुमोल योगदान देणारे पद्मश्री डॉ.बनबिहारी विष्णू निंबकर यांची २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्राणज्योत मालवली. ‘नारी संस्था’ व ‘निंबकर सीड्स’च्या माध्यमातून कृषक समाज उत्थनाासाठी कार्य करणाऱ्या या कृषिसेवाव्रतीच्या कार्याविषयी उजाळा देणारा हा लेख. 

महाराष्ट्रात आजही शेती हाच प्रमुख उद्योग आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती शेतीवर अवलंबून आहे. शेतीतील प्रगती ही प्रामुख्याने पाणी, खते, बियाणे, पशू, कीटकनाशके व मागशतीचे तंत्रज्ञान या गोष्टींवर अवलंबून आहे. या घटकांत भरीव संशोधन झाले पाहिजे, शेतीची प्रगती झाली पाहिजे हा ध्यास घेऊन कार्यरत राहणारे महाराष्ट्रात जी कृषिसेवाव्रती होऊन गेले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे पद्मश्री डॉ.बनबिहारी निंबकर हे होय. डॉ.निंबकर यांचा जन्म १७ जुलै १९३१ रोजी मडगाव (गोवा) येथे झाला. शालेय व माध्यममिक शिक्षण भारतात झाले, पुढील शिक्षण त्यांनी अमेरिकेत घेतले. १९५६ साली अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातून एम.एस्सी (कृषी) पदवी संपादन केली. त्यानंतर १९५७ साली ते मातीचे पांग फेडण्यासाठी भारतात परतले. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण या अवर्षणग्रस्त भागातील १०० एकर जमीन कसण्यास घेतली. या संपूर्ण जमिनीत त्यांनी नवक्रांतीचे बीज पेरले.

 निंबकर कृषी संधोधन संस्थेची उभारणी व कार्य 

 महाराष्ट्रात नवीन उन्नत पीक-बियांणाची निर्मिती व्हावी, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून डॉ.निंबकर यांनी फलटण येथे १९६८ साली ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’ची स्थापना केली. प्रसिद्ध संशोधक डॉ.आनंद कर्वे यांच्या मदतीने संस्थेने अनेक वाणांच्या जाती विकसित करून कृषी संशोधानात भर घातली. या काळात देशात संकरित बियाणे निर्माण करणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या होत्या. पण त्या सरकारी संशोधनातून निर्मिलेल्या वाणांचीच विक्री करत असत. एखाद्या बीजोत्पादक कंपनीने स्वतः संशोधित केलेले वाण बाजारात आणावे यासाठी १९७१ साली ‘निंबकर सीड्स प्रा.लि.कंपनी’ची स्थापना केली. या दोन्ही संस्थांमुळे गेल्या चाळीस वर्षांत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. डॉ.निंबकरांनी कापूस, सूर्यफूल, करडई, ज्वारी, मका यासारख्या पिकांच्या विविध जाती निर्माण केल्या. कापसाचे नवे वाण विकसित करून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचे दार उघडले. 

  वसंत -१ वाणाची निर्मिती

निंबकर सीड्सने विकसित केलेले ‘वसंत-१ व २’ हे ज्वारीचे वाण महाराष्ट्रात फारच लोकप्रिय झाले. यासोबत गोड ज्वारीवरही संशोधन करण्यत आले होते. या ज्वारीच्या धाटात उसाप्रमाणे साखर साठविण्याची क्षमता होती. उन्हाळी व खरीप हंगामात धाटे उंच वाढत असल्याने त्यांच्यापासून साखर काढावी व हिवाळ्यात हे पीक बुटके राहात असल्याने त्याच्या खोडव्यापासून धान्य पीक घ्यावे, अशा प्रकारचे वाण कंपनीकडून विकसित करण्यात आले होते.

  को-७४० ऊस वाण 

 १९६९ ते १९७२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या ‘को-७४० ऊस’ वाणाची निर्मिती करण्यात आली होती. पण या वाणावर सर्वत्र मोझेक व्हायरसचा प्रार्दुभाव झाला होता. पुढे या संस्थेत कार्यरत असलेले संशोधक डॉ.आनंद कर्वे यांनी व्हायरसवर संशोधन करून व्हायरसमुक्त रोपे तयार केली. पुढे या प्रयोगाचा बोलबाला झाला. या वाणांचे बेणे तयार होऊन विक्री करण्यात आली. सरकारी चौकटीबाहेर राहून शेतकरी वर्गाच्या उपयोगी पडेल अशा प्रकारचे कृषिसंशोधन करणारी निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्टिट्यूट ही त्यावेळी एकमेव संस्था असावी. 

  करडई

कोरडवाहू व अल्पसिंचन गटातील शेतकऱ्यांचा विचार करून करडई पिकाचा सर्वांगीण अभ्यास करण्यात आला. निंबकर संस्थेतील शास्त्रज्ञांनी करडईच्या सुमारे १३०० वाणांचा अभ्यास करून त्यापैकी कोणत्या वाणांमध्ये रोग व कीटकांचा प्रतिकार करण्याची क्षमता असते याचा सूक्ष्म अभ्यास करून ‘करडई मातृ-पितृ’ हे वाण विकसित केले. डॉ.निंबकर यांनी फलटण परिसरात कमी पाण्यात येणारे, कमी लांबीच्या धाग्याच्या कापूस लागवडीचा प्रयोग ही राबविला. त्यासाठी आपल्या संस्थेत कापूस पिकांवर संशोधन केले.

  पशु-संवर्धन विभागाची स्वतंत्र स्थापना

   उत्तम दूध देणारी, उत्तम पैदास देणारी व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दरामध्ये अल्पखर्चात सहजरित्या सांभाळता येईल अशी जात निर्माण करण्यासाठी कार्य सुरू केले. १९९० मध्ये निंबकर कृषी संस्थेत पशु-संवर्धन विभागाची स्वतंत्र स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी डॉ.निंबकर यांची १९८८ मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉ.निंबकर यांना ‘शेळी व मेंढीपालनामधील समस्या व उपाय’ या आयोगावर अध्यक्षपदी नेमले. या आयोगाच्या अभ्यासातून महाराष्ट्र शेळीव मेंढी संशोधन व विकास संस्थेची निर्मिती झाली. विशेष म्हणजे लोकप्रिय दुग्धपेयाला 'एनर्जी'हे नावही त्यांनीच दिले.

शेळ्यांच्या जाती विकसित

महाराष्ट्रात उस्मानाबादी व मडग्याळ या जातीच्या शेळ्या-मेंढया होत्या. डॉ.निंबकर यांनी १९९३ मध्ये ऑस्ट्रोलिया सरकारच्या सहकार्याने बोअर शेळ्यांचे भ्रूण व वीर्यमात्रा आणल्या. या भ्रूणांचे रोपण स्थानिक ‘सिरोही’ शेळ्यांमध्ये करून १९९४ च्या सुमारास संस्थेचा ‘पहिला बोअर शेळ्यांचा कळप’ विकसित केला. पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागातील ‘गरोला’ मेंढयाच कळप फलटण येथील प्रकल्पात आणून त्यांची पैदास व संवर्धन सुरू केले. सतत १० वर्षे सातत्याने संशोधन करून जुळी कोकरे देणाऱ्या नारी सुवर्णा या वाणाची निमिर्ती केली गेली. 

  जलव्यवस्थापनात मौलिक कार्य 

 वीर धरण हे महाराष्ट्रातील नीरा नदीवरचे मोठे धरण आहे. या धरणापासून नीरा डावा व नीरा उजवा असे दोन कालवे निघतात. यापैकी नीरा उजवा कलवा हा खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यांमधून जातो. उजवा कालव पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे यासाठी डॉ.निंबकर यांनी नीरा खोरे पाणी योजना कार्यक्रम अंतर्गत सहकारी तत्त्वावर पाणी पुरवठा योजना तयार करून या भागातील शेकडो हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याचे महान कार्य डॉ.निंबकर यांच्यामुळे शक्य झाले.



 ‘निंबकर कृषी संशोधन संस्था’ व ‘निंबकर सीड्स प्रा.लि.’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले तर तर ‘मॅफको’, महाराष्ट्र ‘शेळी व मेंढी आयोगा’चे अध्यक्ष, ‘सेंट्रल बॅक ऑफ इंडिया’च्या कृषी विभाागचे संचालकपद ही सहजपणे भूषवली. त्यांचे हे सर्व कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने २००६ चा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. 

 डॉ.निंबकर यांचे शेती, संशोधनातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी हे जे कार्य केले आहे, ते त्यांच्या पश्चात अधिक जोमाने व समर्थपणे चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे संशोधनपर लेखन, निंबकर संस्थेचे संशोधित कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रकाशात आणणे हे आपले उत्तरदायित्व असले पाहिजे हीच डॉ.निंबकर यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. 

मुंबई तरूण भारत, आसमंत पुरवणी
२९/०८/२०२१

  -विकास पांढरे, ९९७०४५२७६७

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

सोलापूरच्या 'हौसाबाई'ची गोष्ट

आज दुपारी फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होतो. तसा हा रस्ता नेहमी गजबजलेला. कपड्याची, चपलाच्या दुकानात गर्दी बरीच दिसली. मी विमनस्क मनस्थितीत हा रस्ता पार करत पुढे जात होतो.माथ्यावर ऊन वाढत होतं. रस्त्याच्या कडेला उखळ, जात विकणाऱ्या वृद्ध महिलेकडे माझी नजर गेली. बराच वेळ ती गिऱ्हाईकाची वाट पाहत होती. कोणी तरी यावं आणि आपल्या वस्तू घ्याव्यात, असं तिला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं. म्हणून ती चिडलेली होती. तिच्या बोलण्यात सोलापूर भाषेचा लकब होता. मी ही याच भागातला असल्यानं तिच्या जवळ थांबून बोलू लागलो. "आजी नाव काय तुझं?" हौसाबाई - हौसाबाई धोत्रे "गाव कुठलं?" "सोलापूर"
"अस्स.. मला वाटलचं..तुझी भाषा सोलापूरी..." मध्यम उंची, भेदक नजर, नऊवारी साडी, उतारवयाकडे झुकलेले शरीर.. डोक्यावर पिकलेले पांढरे केस.. हौसाबाईचं बाह्यरूप..हौसाबाईच्या अंतरंगाचा शोध घेणं ही एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. हौसाबाईचा अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. वस्तू घेतात आणि निघून जातात. पण तिच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. म्हणून ती थोडी चिडली..मी ही सोलापूरकडचा आहे म्हटल्यावर नरमाई घेतली.. आणि बोलू लागलो..

 "आजी, पुण्यात कधीपासून राहते आणि कुठे राहते?' मी म्हणालो- ती म्हणाली, "चाळीस वर्षे होऊन गेली. दुष्काळाच्या भयानं पुणं गाठलं. सुरवातीला पाल करून राहत होतो.. आता आम्ही वनदेवी (कर्वेनगर) परिसरात राहतोय. लेकर लहानाची मोठी इथेच झाली. आमचं वडारच काम. पाटा,वरवंटा, जात, उखळ, खलबत्ता तयार करणं आमचं काम" दगडावर छन्नी हातोडीचे घाव घालून त्याला आकार देणाऱ्या हौसाबाईच्या संसाराला याच व्यवसायाने आकार दिला. 

हौसाबाई म्हणाल्या, "४०-५० वर्षांपूर्वी सोलापूर एक गावचं होतं. पोट भरणं मुश्किल होतं. डोक्यावर दगड घेऊन गावोगावी भटकत राहिली. आम्ही नवराबायको दगडाचे वरवंटे, पाटे, खलबत्ते घडवले. पुण्यात संसार मांडला, फुलला, स्वतःचं हक्काचं घर घेतलं" कधीही शाळेची पायरी न चढलेल्या हौसाबाई पैशाचा व्यवहार चोखपणे करतात. माझ्याकडे दुर्लक्ष करून ती गिऱ्हाईकडे लक्ष देऊ लागली. तिचं व्यवहारशास्त्र तिच्या मेहनतीचे फळ होतं. "व्यवसायाला लॉकडाऊन फटका कसा बसला?" असं मी प्रश्न विचारला. हौसाबाई म्हणाली, " काय सांगू बाबा! एवढा मोठा रोग मी कधी बघितला नाही. दुष्काळात माणसं शहराकडे धावत होती. कोरोनानं माणसं गावाकडे धावू लागली. आता वर्ष होत आलं. अजूनही माणसं गावाकडे हायती!"
पुढे म्हणाली, "महाकाय संकटामुळे आमचा धंदा कोलमडून पडला. परिस्थिती ओसरली असली तरी या धंद्यात म्हणावा तसा पैसा येत नाही. आता आमचा निभाव कसा लागेल..?" "असं का?" मी म्हणालो. "दगड काढणं, दगडाची गिट्टी फोडणं अशी सर्व कामं आज यंत्रानं होत आहेत. दगडाचं सर्व काम वड्डर समाजाच्या हातून निघून गेली आहेत. ज्याच्याकडं यंत्र आहेत. त्या महागड्या वस्तू म्हणून कोणी घेत नाही. काबाडकष्ट करून जगणाऱ्या या समाजाचं कसं होईल?" हौसाबाई आपल्या समाजाची चिंता बोलून दाखवली. 

वडार समाज गावगाड्यातील (जागतिकीकरणामुळे गावगाडा संपला आहे) एक महत्त्वाचा घटक आहे. हा समाज बांधकाम क्षेत्रात काही अंशी स्थिरस्थावर झाला असला तरी, गाव-खेड्यात राहणाऱ्या समाजाची अवस्था बिकट आहे. जे शहरात आले आहेत, त्यांच्या समोर नवीन आव्हाने उभे आहेत. हे हौसाबाईच्या कथेतून लक्षात आलं. 
 © विकास पांढरे बुधवार, ३ मार्च २०२१ पुणे

गोष्ट कर्नल मेडोज 'टेलरनगर' ची

प्रत्येक छोट्या-मोठ्या गावाला ज्ञात-अज्ञात इतिहास असतो. एखाद्या गावाचे नाव हे का पडले याचा शोध घेण्यासाठी इतिहासात डोकावल्यास कित्येक अनाकलनीय गोष्टींची उकल होते. इतिहासाच्या अनेक घडामोडी अन् पाऊलखुणांनी सजलेलं गावं आपल्या महाराष्ट्रात असूनही आपण अनेकदा त्यापासून अनभिज्ञ असतो. आज आपण अशाच एका अनाकलनीय गोष्टीचा उलगडा करून घेणार आहोत.

१७२४ ते १९४८ याकाळात भारतात हैदराबाद (निजाम) संस्थान कार्यरत होते, असे असले तरी मध्येच १८५३ ते १८६० या दरम्यान नळदुर्ग जिल्हा ( सध्या उस्मानाबाद जिल्हा) हा तैनाती फौजेच्या महसुलीच्या बदल्यात इंग्रजांना देण्यात आला होता. त्यामुळे साहजिकच या भागाशी काही काळापुरता का होईना इंग्रजांशी या ना त्या कारणांमुळे संबंध आलाच. काही इंग्रज अधिकारी, लेखक या भागात येऊन गेले होते असे अनेक ऐतिहासिक संदर्भ सापडतात. तुम्हाला 'द स्टोरी "द स्टोरी ऑफ माय लाईफ','टिपू सुलतान' 'तारा','सीता','नोबल क्वीन','द पीपल ऑफ इंडिया', 'कन्फेशन ऑफ ए ठग' या पुस्तकाचे लेखक माहिती असतीलच ना? बरं, पुढे सांगतो..जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेणी जगापुढे आणणारे हेच ते ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले फिलीप मेडोज टेलर.
घरच्या गरीब परिस्थितीमुळे ते भारतात आले. तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य सचिव विल्यम न्यूहॅम यांनी हैदराबाद संस्थानचे रेसिडंट सर चार्ल्स मेटकाफ यांच्या शिफारशीने फिलीप टेलर यांची निजामाच्या औरंगाबाद येथील सैन्यात लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली (१८२४). येथील कार्यकाळात त्यांना कॅप्टन, कर्नल आदी पदांवर पदोन्नती मिळाली. पुढे कर्नाटकातील निजामाच्या अखत्यारीतील शोरापूर या संस्थानात पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

येथील यशस्वी कामगिरीमुळे त्यांची नळदुर्ग जिल्ह्यात प्रशासक म्हणून नियुक्ती झाली (१८५३-५७). कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून जरी त्यांची ख्याती असली, तरी स्थानिक लोकांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांनी फारसी व भारतीय भाषांवर प्रभुत्व मिळविले ; त्याचबरोबर भारतीय चित्रकला, मंदिरस्थापत्य व संगीत या विषयांमध्ये त्यांना विशेष आवड होती. नळदुर्ग जिल्ह्याची प्रशासक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी दळणवळणच्या फारशी व्यवस्था नसलेल्या,शांत वातावरण व हिरवाईने नटलेल्या एका टेकडीवर टेलरने काही काळ वास्तव केले, त्या ठिकाणाच्या परिसरास आज 'टेलरनगर' नाव पडले आहे.
होय,हे सत्य आहे. तुळजापूर तालुक्यातील इटकळ गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या 'टेलरनगर' गावाच्या नावातील व्युत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा शोध थेट महान लेखक फिलीप मेडोज टेलर यांच्या नावाशी साधर्म्य साधताना दिसतोय. टेलरनगर हे एका ऐतिहासिक पाऊलखुणाचे साक्षीदार आहे. साधारण ४०० ते ५०० लोकसंख्या असलेले हे छोटेसे गाव. शंभर एक वर्षांपूर्वी याठिकाणी घनदाट जंगल होते. यामुळे इथे वाटमाऱ्या व्हायच्या. दिवसा इकडे कोणी फिरकत नसत. 

निजामकालीन इटकळ पोलीस ठाण्याच्या पोलीस या ठिकाणी पहारा देत असत, असं स्थानिक नागरिक सांगतात. मेडोज टेलर नळदुर्ग वास्तव्यास आले तेव्हा त्यांना इटकळ परिसरातील टेकडीचे रम्य वातावरण आवडले आणि काही काळ त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले, असं स्थानिक लोकाचं म्हणणं आहे. या टेकडीवर महादेवाचे एक मंदिर आहे. या मंदिराच्या इतिहासावरून गावाच्या पाऊलखुणा अधिक स्पष्ट होतात. आजूबाजूला दिसणारा हिरवागार निसर्ग मनप्रसन्न करतो. त्यामुळे टेलर साहेब या ठिकाणी रमले.
विशेष म्हणजे निजामशाहीच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी नवीन आयुष्य अनुभवले. या काळात त्यांना लेखन,भाषा, चित्रकला शिकण्यासाठी मोकळा वेळ मिळाला. त्यामुळे शांत, निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी त्यांची प्रतिभा अधिक फुलून यायची. त्यामुळे स्थानिक लोकांनी तर टेलरला महादेवबाबा हे टोपणनाव दिले होते. येथूनच नळदुर्ग- तुळजापूर-उस्मानाबाद, सोलापूर-अक्कलकोट असा त्यांचा प्रवासाचा मार्ग असायचा. त्यामुळे इटकळ येथे विश्रामगृहे बांधण्यात आली. विशेष म्हणजे इटकळ येथील निजामकालीन पोलीस चौकीच्या विश्रामगृहांनी शंभरी पूर्ण केली आहे. "टेकटीवर टेलर यांचा नियमित प्रवास होत असे. कालांतराने इटकळ, अरबळी,येवती,काटगाव आदी ठिकाणवरचे स्थानिक शेतकरी, पशुपालक टेकडीच्या बाजूला वस्ती करुन राहू लागले. याठिकाणी टेलर साहेब पूर्वी राहत असल्यामुळे ही वस्ती 'टेलरनगर' नावाने ओळखू लागली. महान लेखक फिलीप मेडोज टेलर यांचे नाव आमच्या गावाला असल्याचे पाहून मोठे समाधान वाटते" असे टेलरनगरचे पोलीस पाटील विजय वाघमारे यांनी सांगितले. 

"फिलीप मेडोज टेलर याठिकाणी वास्तव्यास होते असा अंदाज बांधणे कठीण असले तरी त्यांचा एकूण इतिहास पहिल्यानंतर असे लक्षात येते की, लेखन व शिकारीचा छंद जोपासण्यासाठी ते याठिकाणी येत असावेत" असा अंदाज काटगाव येथील शिक्षक महादेव पाटील यांनी व्यक्त केला. टेलर साहेबांच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर या परिसराविषयी आणखीन माहिती मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले. 

टेलरनगरचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर इटकळ, खानापूर, काटगाव, अरबळी,दिंडेगाव या पाच गावाच्या सीमेवर वसलेले छोटे गाव तयार झाले आहे. गावाला मेडोज टेलरचा इतिहास सोडला तर बाकी कोणताही इतिहास नाही. स्थानिक लोक हे आजूबाजूच्या गावातून आलेले आहेत. गावाला वेस नाही, जुने दगडी घरे नाहीत. एकेकाळी झोपडीवजा हे गाव होते. आता लोकांचे जीवनमान उंचावले असल्याने पक्की घरे बघायला मिळतात. सध्या वाघमारे, पटेल, मकानदार, गवळी, गायकवाड आडनावाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. तुळजापूर- इटकळ मार्गे- अक्कलकोट देवदर्शनासाठी कधी तुम्ही याल वाटेत या गावाची पाटी तुम्हाला अवश्य नजरेस पडेल तेव्हा फिलीप मेडोज टेलरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

  विकास पांढरे मु.पो.इटकळ ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद संपर्क-९९७०४५२७६७

शनिवार, २२ मे, २०२१

आदिवासींना 'वनौषधा'चा आर्थिक आधार

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेने प्रधानमंत्री वनधन विकास योजना व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु केलेल्या वनधन केंद्रामार्फत गौणवनउपजावर प्रक्रिया करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. या संस्थेला आता एक कोटी सत्तावन्न हजार रूपयांचा गुळवेल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे आदिवासी समूहातील कुटुंबियांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडला आहे. 

 वैदिक काळापासून आपल्या देशात वनौषधींचा वापर होत आलेला आहे. मुख्य म्हणजे ऋषिमुनींनी 'आयुर्वेद' ही जगाला दिलेली देणगी आहे. जंगल ही वनौषधी निर्मितीची मुख्य केंद्र आहे. भारतातील जंगलात सुमारे ४५ हजार वनस्पतीचे प्रकार आढळतात. शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा,कळलावी, सफेद मुसळी, वेखंड, ब्राह्मी, गुळवेल, गुंज, वावाडिंग, रक्तचंदन, बिवळा, बिबा, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, ऐन, सीताअशोक, अर्जुन, केवडा त्यातीलच काही वनस्पती आहेत. आजही आदिवासी समूह आपला उदरनिर्वाह या उपजांच्या माध्यमातून करत असतात. सध्या कोरोनासंकटामुळे वनौषधींना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलती जीवनशैली, तणावाखालील जीवन, फास्ट फूड, दूषित वातावरण यामुळे अनेक रोग निर्माण झाले असून त्याच्या उपचारांवर औषधी वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. जागतिक पातळीवर वनौषधींना मोठी बाजारपेठ आहे. आता जगातील अनेक देशही त्याकडे आकर्षित झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत वनौषधींची मागणी चौदा अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. या बाजारपेठेत चीनचा वाटा १९ टक्के आहे, फ्रान्स ६० टक्के, जर्मनी ७ टक्के तर भारताचा वाटा मात्र ९ टक्क्यांवर आहे. केंद्र सरकारने वनौषधीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आदिवासी डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ व केंद्रीय जनजाती केंद्रीय मंत्रालय (ट्रायफेड) यांच्या मार्फत पंतप्रधान वनधन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. देशात अकराशे वन धन केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशनने (TRIFED)कोकण विभागात रायगड १५, रत्नागिरी ९,ठाणे १५ आणि पालघर जिल्ह्यात ३० प्रस्थापित वनधन विकास केंद्रे मंजूर केली आहेत. सध्या वन गौण उपज संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेला वनधन केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे.

  ध्येयवादी तरुणांमुळे घडून आला बदल 

 शहापूर तालुक्यातील खरीड या वाडीत कातकरी समूह मोठ्या प्रमाणात राहतो. दीड वर्षांपूर्वी रोजगासाठी इथला कातकरी बांधव शहरात स्थलांतर करत असे. महिला वीटभट्टयावर काम करत.आर्थिक अडचणींमुळे अनेकांच्या इच्छा आणि गरजा ही पूर्ण होत नसत. आर्थिक परिवर्तन घडवून आणल्याशिवाय समाजाला स्थिरता प्राप्त होणार नाही हे वाडीतील २७ वर्षीय सुनील पवार या तरूणाने ओळखले. दहा-बारा तरूण सजग मित्राच्या मदतीने आदिवासी एकात्मिक विकास संस्थेची स्थापना केली. यामुळे कातकरी समूहात नवी जाणीव जागृत निर्माण झाली.
सुनील यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण घेतले आहे. त्यांचे विचार व त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. कातकरी समूहाचा उत्कर्षाचा मार्ग कसा गवसला याविषयी सांगताना सुनील म्हणतात, "माझं बालपण खरीड या कातकरी वाड्यावर गेलं. आईवडील वीटभट्टी व खडी फोडण्याचं काम करत. पाड्यावरचे सर्वच लोक रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतर करत. हे वास्तव मी लहानपणापासून पाहत होतो. पुढे वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आलो. मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. आदिवासी एकात्मिक विकास संस्थेची स्थापना केली. एकदा मी नाशिक इथं आदिवासी भवनात प्रधानमंत्री वनधन विकास योजनेची माहिती घेतली. शबरी आदिवासी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी विश्वास दाखवून वनोउपज जमा करण्यास प्रोत्साहित केले.पहिल्यांदा २९ कातकरी मुले या कामाशी जोडलो गेलो.आता ८५ कातकरी वाड्यावरचे दोन हजार कातकरी या कामात सहभागी झाले आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. दिंगबर मोकाट ( वनशास्त्र विभाग) प्रशिक्षण देतात. ठाणे येथील मजूर फेडरेशनचे संचालक अरूण पानसरे यांनी विनामोबदल्यात संस्थेच्या कार्यालयासाठी जागा दिली. 

  सहा वनधन केंद्राची स्थापना 

 शहापूर तालुक्यातील ३०० कातकरी कुटुंब वनधन केंद्राशी जोडले गेले आहेत.शहापूर, मोखावणे, ढाकणे, वेहळोली, खरीड व अल्याणी या सहा आदिवासी पाड्यावर वनधन केंद्र सुरू आहेत. सर्व केंद्रांना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे. केंद्राच्या माध्यमातून पळस, रुई, आघाडा, पिंपळ, शमी,खैर,उंबर,दर्भ, दुर्वा अशा नवग्रह समिधा विक्री होते. तर हिरडा, बेहडा, आवळा, गुळवेल, मोहफुले, शिकेकाई, गोखरू, नागमोथा असे जवळपास ३५० वनोउपज खरेदी व विक्री केले जातात.
महिलांसाठी बचत गट स्थापन करून पत्रावळी प्रशिक्षण दिले जाते. मेणबत्ती व अगरबत्ती तयार करणे, पापड बनविणे,औषधी, पावडरी तयार करणे अशी विविध प्रशिक्षणे या केंद्राच्या माध्यमातून दिली जातात. या वनधन विक्री केंद्रातून अनेक मोठे उपक्रम चालवले जातात तसेच गुळवेल पावडरसह ३५ हून अधिक उत्पादनांची व प्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री होते. आज अनेक महिला मुंबई येथे वनोउपज घेऊन जात असतात. त्यामुळे महिलांचे स्थलांतर थांबले आहे. 

  गुळवेलातून रोजगार निर्मिती

गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात. त्यामुळे बाजारात यास मोठी मागणी आहे. विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. त्याशिवाय मधुमेहावर देखील हे प्रभावी औषध मानले जाते. त्याचा अर्क, द्रव, भुकटी किंवा मग त्याचा गर काढून वापरला जातो. सुनील पवार सांगतात, "गुळवेल पावडर बनवण्याच्या या प्रक्रियेत कातकरी बांधव स्वतः झाडावर चढून गुळवेल तोडून घेतात. त्यानंतर आठ ते दहा दिवस ती सुकवली जाते. ही सुकवलेली गुळवेल शहापूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणून दळून घेतली जाते. नंतर त्याची पाकिटे बनवून, शिक्के मारून अनेक दुकानांच्या माध्यमातून खरेदीदारांना विकली जाते. २०२०वर्षी ३४ टन तर यंदा जवळपास १००टनापेक्षा गुळवेल संकलन करण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षात या संस्थेने बारा लाख चाळीस हजार रुपये किमतीची गुळवेल पावडर विकले आहे तर सहा लाख दहा हजार रुपयांची कच्ची गुळवेल विक्री केली आहे. मार्च २०२० ते २०२०जूनच्या मध्य या कालावधीत वनधन विकास केंद्र शहापूरने स्थानिक आदिवासींकडून ३४,००किलोग्रॅम हून अधिक गुळवेल खरेदी केली आहे. प्रत्येक महिन्याला तीन ते चार लाखाची विक्री होत असते" 

  दीड कोटीची ऑर्डर्स 

 संस्थेने डाबर, बैद्यनाथ, हिमालय, विठोबा, शारंगधर, भूमी नॅचरल प्रोडक्ट्स यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना गुळवेल विक्री केली आहे. सुनील सांगतात, "वनधन केंद्र व शबरी आदिवासी महामंडळाच्या सहकार्यामुळे गुळवेल पावडर व कच्च्या मालाची विक्री होत आहे.
यंदा कोरोनाच्या संकट काळातही हिमालया (३००टन), डाबर (२५०टन), भूमी नॅचरल प्रोडक्स कंपनी (४००टन) यासारख्या नामवंत कंपन्यानी एक कोटी सत्तावन्न लाख रुपयांच्या गुळवेल पुरवण्याच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. स्थानिक बाजारपेठा आणि औषधी कंपन्यांपुरते मर्यादीत न राहता आम्ही डी-मार्टसारख्या मोठ्या किरकोळ साखळ्यांच्या मदतीने गूळवेलीला दूरच्या बाजारपेठेत नेण्याची योजना आखली आहे. आम्ही एक संकेतस्थळही तयार करत आहोत. लॉकडाऊन कालावधी दरम्यान ऑनलाइन विक्री त्याद्वारे होत आहे. उत्पादनांची वाहतूक आणि विक्री कोणत्याही अडथळ्याविना करता यावी आणि म्हणून आम्हाला पास देण्यासाठी सरकार मदत करत आहे”

  दोन लाख गुळवेल रोपांचे उद्दिष्ट

"एकेकाळी कातकरी बांधव गुळवेलाचा सरपण (जळण) म्हणून वापर करायचे आता हेच बांधव गुळवेलचा एकक तुकडा जमा करण्यासाठी धडपड आहेत. एकूणच कातकरी बांधवांना गुळवेलाचे महत्त्व लक्षात आले आहे.गुळवेल या औषधी वनस्पतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी दोन लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे"असेही पवार यांनी सांगितले.

वनौषधी उद्योगात संधी
 

 "कोकण,विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात त्या त्या मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन वनौषधी शेती विकसित करण्यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे त्या त्या भागात वनौषधी आधारित छोटे उद्योग उभे करण्यास संधी राहणार आहे" असे सुनील पवार यांनी सांगितले. 

  सरकारने काय करावे?

१) वनौषधी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना संघटित करणे. २)महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वनौषधी शेतीचे महत्त्व पटवून देणे आणि वनस्पतींची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करणे. ३) औषधी वनस्पतीची व्यापारी तत्त्वावर शेतीत लागवड करताना उत्तम बियाणे, अनुकूल वातावरण व तांत्रिक माहितीची आवश्‍यकता उपलब्ध करून देणे. ४)औषधी वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी, आरोग्यतज्ज्ञ आणि विविध औषधी उत्पादक कंपन्यांमध्ये नियोजनबद्ध समन्वय साधणे. आदिवासी कातकरी समूहाच्या वनधन केंद्राची ही यशकथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि आत्मनिर्भर संकल्पनेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून समोर येत आहे.
  © विकास पांढरे, ९९७०४५२७६७ 

  संपर्क सुनील पवार (अध्यक्ष, आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था, शहापूर जि.ठाणे) 
मो.नं:-+91 73789 56592 ईमेल आयडी :- adivasiass@gmail.com sunil.pawar.sp129@gmail.com

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...