गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

शेतकरी चळवळ आणि मराठी साहित्य


शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणारा,जगाचा पोशिंदा शेतकरी दुःखी असतो, त्याचे प्रश्न, त्याच्या वेदना समजून घेतले नसल्यामुळे शेती अर्थव्यवस्थेचा चिरा ढासळत चालला आहे. अठराव्या शतकाच्या पूर्वाधात महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवू पाहणारे लेखन केले. हाच शेतकऱ्यांचा मोठा एल्गार होता. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हरितक्रांती झाली पण त्याचे फ ळे शेतकऱ्यांना कधीच मिळाले नाहीत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, सरकारचा नाकर्तेपणामुळे आमचा शेतकरी कर्जातच जगतो आणि कर्जातच मारतो.हे चित्र बदलण्यासाठी शेतकरी चळवळी उभ्या राहिल्या.
मराठी साहित्यात शेतकऱ्यांचे दैन्याचे प्रतिबिंब उमटू लागले. शेतकरी चळवळीला वेग येऊ लागला. शेतकऱ्यांचे पोरं लिहिते होऊ लागले. काळाच्या ओघात शेतकरी चळवळी मंदावली, शेतीतील भयवाह वास्तवाचे चित्रण मराठी साहित्यात जोरकसेपणे पुढे येत नसल्याचे सध्याचे वास्तव आहे.

इथल्या प्रत्येक माणसांचा शेती आणि मातीशी संबंध आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगला आहे. १६ व्या शतकात पडलेल्या दुष्काळाचे चित्रण ते आपल्या अभंगातून करतात. ही परंपरा महात्मा फुल्यापर्यंत सुरू असल्याचे दिसून येते. १८६५ च्या कालखंडात सूंपर्ण भारत दुष्काळाने होरपळून निघाला होता. जमीनदारांचे पिळवणूक आणि ब्रिटिश सरकारचे जुलूमी कायद्यापुढे शेतकरी अधिकाधिक कंगाल होत चालला होता. महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात कृषी अर्थव्यस्थेचे पडझडीचे चित्रण केले.



याविषयी डॉ. अशोक चौसाळकर म्हणतात, '' जोतीरावांच्या पुढे हा मुख्य प्रश्न होता की दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणारा, जगाचा पोंशिदा शेतकरी दुःखी आणि सरकारचा कामचोर,लाचखाऊ नोकरशहा सुखी असे का व्हावे? अवयव आणि बुध्दी सारखीच असताना समाजात विषमता का आहे? हा प्रश्न त्यांना पडला होता. आपल्या 'गुलमागिरी', ' शेतकऱ्यांचा आसूड', 'इशारा' वगैरे पुस्तकांतून त्यांनी यासंबंधी आपले विचार मांडले.''(१)
महात्मा फुले यांनी आपले शेती विषयासंदर्भातील क्रांतिकारक विचार आपल्या पुस्तकांतून मांडून शेतकऱ्यांची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी श्रीकांत देशमुख यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे, ते म्हणतात-'' महाराष्ट्रात नव्हे तर एकूण देशाच्या संदर्भात म.फुले हे शेतकरी आणि शेती प्रश्नाचे पहिले प्रवक्ते. शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर संपूर्ण समाजरचनेचा कणा असून जोपर्यंत त्याची स्थिती सुधारित नाही तोवर कोणतेही मौखिक स्वरूपाचे सामाजिक परिवर्तन होण्याची शक्यता नाही, हे भाकित फुल्यांनी शंभर वर्षापूर्वी केले.आपल्या लेखनातून त्यांनी शेती आणि शेतकरी यासंबंधी जे विचारसूत्र मांडले त्याला प्रमाण मानूनच नंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात शेती प्रश्नाचा विचार होऊ लागला.''(२)

देशमुख यांच्या मतातून शेतकरी चळवळीच्या उदयाची पार्श्वभूमी लक्षात येते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात देशाच्या विविध भागांत शेतकरी चळवळीने आकार घ्यायला सुरूवात केली. त्यातूनच देशातील पाहिली शेतकरी संघटना पंजाबमध्ये उद्यास आली. शहीद भगतसिंग यांचे चुलते सरदार अजितसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबचे शेतकरी एकत्र आले. या शेतकरी चळवळीच्या अनेक शहरात परिषदा झाल्या.

१९०७ साली मधील ल्यालपूर शेतकरी मेळाव्यात 'पगडी संभाल ओ जटृा'ही शेतकऱ्याला स्वाभिमनाची शिकवण देणारी देशातील शेतकरी आंदोलनाची पहिली घोषणा दिली.देशातील पहिले मोठे आंदोलन मात्र महाराष्ट्रात झाले. १८७५ मधील डेक्कन रायट्स किंवा दख्खनचा उठाव हे ते पहिले आंदोलन होय. दीडशे रूपयांच्या कर्जापायी काळूराम सावकाराने पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील करडे गावातील प्रतिष्ठित शेतकरी बाबासाहेब देशमुख यांची शेतीवाडी, स्थवर व जंगम मालमत्ता जप्त केली. सावकारांच्या जाचाविरूध्द पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्हयांतील शेतकऱ्यांनी उठाव केला होता. करडे येथील घटनेची प्रतिक्रिया म्हणून ९ सप्टेंबर १८७५ रोजी पहिला संघर्ष झाला.

वि. रा. शिंदे यांनी शेतकरी वर्गाची हालखीची स्थिती लक्षात घेऊ न ती कशी सुधारावी यासाठी प्रयत्न केला. ही आस्था प्रमाण मानून वि.रा.शिंदे युरोपीय राष्ट्रात गेले तिथे त्यांनी शेतीची आणि शेतकरी वर्गाची अवस्था काय आहे याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी शेतकरी परिषदा घेतल्या. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ लागली. १९२७ मध्ये गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी साराबंदीची अपूर्व चळवळ उभी केली. या चळवळीमुळे संबंध देशातील शेतकरी जागा झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूध व शेतमालाला योग्य दर आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी शेतकरी आंदोलने झाली. १९६० च्या दशकात देशात हरितक्रांती झाली. पंजाबपासून ते तामीळनाडूपर्यंतचा शेतकरी सुखू होत असल्याचे अभासी चित्र निर्माण केले. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील, केशवराव जेंधे, आण्णासाहेब शिंदे यांनी शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले.

 १९७२ च्या दुष्काळात देशातील शेतकरी उध्दवस्त झाला. महाराष्ट्रात ही तिच परिस्थिती होती. जिथे पाणी आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला भाग अधिक संपन्न तर जिथे पाणी नाही असा विदर्भ व मराठवाडयातला शेतकरी कंगाल असल्याचे भौगोलिक चित्र निर्माण झाले. सुखी असलेला प.महाराष्ट्रातला शेतकरी ऊ साला भाव नाही म्हणून ओरडू लागला तर विदर्भ व मराठवाडयातला शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देत आहोत म्हणून आपला घसा कोरडा करू लागला. महाराष्ट्रात उरणचे आंदोलन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून चिरडले होते, विदर्भात, तेलंगणात भूमिहिनांचा, शेतकऱ्यांचा लढा झाला होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे शेतकरी आंदोलन गाजले होते. १९९१-९२ साली आलेल्या जागतिकीकरणामुळे संबंध शेतकरी वर्ग यात भरडला गेला. सगळयाचे प्रश्न एकसारखेच झाले. १९७२ पासून ग्रामीण समाजात लोकप्रिय असलेले 'बळीराजा' हे पुण्याहून निघणारे शेतीविषयक मासिकाने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरूणाचे व्यासपीठ झाले. अनेक सुशिक्षित तरूण आपले शेतीविषयक अनुभूव या मासिकातून मांडू लागले. शेती,ग्रामीण समाज आणि साहित्य याबाबतचे प्रतिबिंब मासिकात उमटू लागले.या काळात शेतकरी चळवळ व ग्रामीण साहित्य चळवळीचे बळीराजा हे मासिक मुखपत्र बनले होते.

१९७२ च्या दुष्काळाने संपूर्ण ग्रामीण जीवनाकडे बघण्याकडे तरूण सुशिक्षितांचा दृष्टिकोन बदलला होता यातूनच फार मोठे स्थित्यंतर घडले. शेती, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण माणसांच्या जीवनासंबधी विचार होऊ लागला. व्यंकटेश माडगूळकर (बंडगरवाडी) रा.रं.बोराडे (पाचोळा,चारापाणी), विश्वास पाटील (झाडाझडती,पांगिरा), आनंद यादव (झोंबी), भास्कर चंदनशिव (लाल चिखल),सदानंद देशमुख (बारोमास,तहान), कृष्णात खोत (गावठाण), उत्तम बंडू तुपे (खुळी), द.ता.भोसले सारखे साहित्यिक शेतीचे भयावह वास्तव साहित्यातून प्रकट करू लागली. एकूणच मराठी साहित्याच्या क्षेत्रात ग्रामीण जीवन, साहित्य चळवळीविषयक एक पोषक वातावरण तयार झाले होते. गंभीरपणे शेती विषयांचे चिकित्सिकपणे चर्चा करणारे सुशिक्षित तरूण साहित्यिक पुढे येत होती.

याविषयी द.ता.भोसले म्हणतात,''आजच्या ग्रामीण साहित्यात भूक, द्रारिद्रय,अज्ञान,शोषण आणि उपेक्षा या गोष्टीतून उध्दवस्त झालेल्या जीवनाचे चित्रण येते आहे. या प्रेरक घटनांचा संदर्भ वेगळा असेल, भूक किंवा दारिद्रयाचे स्वरूप भिन्न असेल, त्याची तीव्रता कमी अधिक असेल, पण शेवटी त्या भावना म्हणून तशा एकच म्हणाव्या लागतील. या पाच बाबीचे चित्रण म्हणजे ग्रामीण साहित्य म्हणावे लागेल.''(3)

द.ता. भोसले यांच्या मताचा खोल विचार केल्यास खेडयातले बदलते जीवन, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक वास्तव साहित्यात उमटू लागले होते. शेती संदर्भात शेतकरी चळवळी उभी राहत होती. त्यातून नवे व वेगळे साहित्य जन्माला येत होते. १९८० च्या दशकात शेतकरी संघटनेचे प्रेणेते शरद जोशी यांनी ऊस, तंबाखू, कांदा, दूध, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून दर आंदोलन हाती घेतले. शरद जोशी यांच्या 'भीक नको, घेऊ घामाचे दाम' या घोषणेने संबंध देशातील शेतकरी जागा झाला.

या चळवळीचे मूल्यमापन करताना श्रीकांत देशमुख म्हणतात,'' शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे ग्रामीण महाराष्ट्रात गतिमानता निर्माण झाली. लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेची अधिवेशने भरू लागली. शेतकरी संघटनेने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याच मुलभूत आर्थिक मागण्यावर भर दिला. सर्वच राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अशी धारणा शेतकऱ्यांत रूजवली. त्यामुळे शेतकऱ्यांत अभूतपूर्व एकजूट निर्माण झाली. शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावी, एवढया एका महासूत्रावर आधारित या चळवळीचे तत्वज्ञान आहे. त्यामुळे ही चळवळ अज्ञ, अडाणी, शेतकऱ्यांना सहज कळते, आपलशी वाटते.''(4)

शेती आणि शेतकरी याविषयी शरद जोशी यांनी आपल्या चळवळीतून अर्थशास्त्रीय भूमिका मांडली. आजपर्यंत तसा विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या पिढीतील साहित्यिक ही वास्तव भूमिका घेउन लिहिते झाले. भूमि अधिग्रहण, सेझ, बाजारभाव हे सर्व विषय साहित्यातून येत राहिली. 1995-2015 अशा वीस वर्षाच्या काळ शरद जोशी यांनी आपल्या शेतकरी आंदोलनाचा दरारा कायम ठेवला होता. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनात एकवाक्यता, एकजिनसीपणा असलेली शेतकरी चळवळीकडे पाहिले जात होते. शरद जोशी यांच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य अंधारात सापडले आहेत. पाशा पटेल, राजू शेटटी, सदाभाउ खोत, रघुनाथदादा पाटील अनेक जाणते हे स्वतंत्र चूल निर्माण केल्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मर्यादा पडत आहेत. नुकत्याच झालेल्या पुणतांबा शेतकरी आंदोलनावरून हे सिध्द होते.

शेतकरी चळवळीच्या भवितव्याविषयी गंगाधर मुटे म्हणतात,'' आज शेतकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये कुठेही एकवाक्यता नाही. कुणी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबाजावणीची मागणी करतो, कुणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, असा अजेंडा पुढे रेटू पाहतो, तर कुणी शेतकऱ्यांनी सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतीचे प्रश्न सुटणार नसल्याची हाकाटी पिटतो.शेतीचे अर्थशास्त्र समजून न घेताच बेताल वक्तव्ये करण्याचेही सध्या पेवच फुटलेले आहे. डॉ.आंबेडकरांच्या निधनानंतर रिपब्लिकन चळवळीच्या वाटयाला आला, तसाच भोग शेतकरी चळवळीच्या वाटयाला येतो की काय, असा संभ्रम होण्यासारखी स्थिती आहे.''(5)

मुटे यांचे मत विचारता घेता, एकीकडे शेतकरी चळवळीची अशी वाताहात होत असतानाच शेतीसमारेचे प्रश्न आणखी बिकट होत चालल्याचे दिसून येते. आज शेती चळवळ जशी मंदावली आहे तशीच शेती प्रश्नावर अधिक सकस व वास्तववादी लिखाण होताना दिसत नाही. या मर्यादा का आहेत याचा शोध शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व साहित्यिकांनी घेतला पाहिजे.

विदर्भ व मराठवाडयात शेती व शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याविषयी तीव्रपणे आंदोलन होताना दिसत नाही. केवळ कर्जमाफी देवून हा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे असे आमचे साहित्यिक का सांगत नाहीत. भाजपाचे सरकार येण्यापूर्वी सिंचन घोटाळा निघाला. तो शेतीशी निगडीत आहे. हा प्रश्न समजून घेवून आमचे साहित्यातून याचे चित्रण येणे आवश्यक होते, तसे होताना दिसत नाही.यवतमाळ जिल्हयात कपासावर फवारणी मारताना अनेक शेतकरी दगावली. अनेक जणांना कायमचे अंधत्व आले याचा शोध आमचे साहित्यिक घेताना दिसत नाहीत.

आजचा तरूण शेतकरी चळवळी पासून दूरावला गेला आहे तो का दुरावला गेला आहे ? हे साहित्यिक कधी समजून घेणार. साहित्य हा समाजजीवनचा आरसा समजला जातो, आज शेतकरी चळवळ मंदावली असली तरी साहित्यिक कमी नाहीत, त्यांनी हया गोष्टींचा विचार करून साहित्याचे दालन समृध्द करणे आवश्यक आहे. औरंगाबादचा सरदार जाधव हा 'दूध'याविषयावर कादंबरी लिहितोय. ही प्रकाशित झाल्यास मराठी सारस्वताना या कादंबरीची नोंद घ्यावी लागेल. ऊस दर आंदोलन, कापूस,तूर,सोयाबीन आंदोलन सरकारकडून दडपली जात आहेत,या मागाचा राजकीय हेतू लक्षात घेउन साहित्यकृती जन्माला येणे गरजेचे आहे.

विकास पांढरे,9970452767
'(सदर लेख सोलापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादासाठी लिहिला होता. काही तांत्रिक कारणांमुळे सदर परिसंवाद रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा लेख ब्लॉगवर वापरत आहे.)

संदर्भ :-

-1) डॉ.अशोक चौसाळकर, महात्मा फु ले री चळवळ, लोकवाड्ःमय गृह प्रकाशन.पृष्ठ क्रं.1

2) श्रीकांत देशमुख, ग्रामवेद संपादक गणेश देशमुख पृष्ठ क्रं.173

3) तैत्रव, पृष्ठ क्रं182

4) द.ता.भोसले, ग्रामीण साहित्य ः एक चिंतन, मेहता प्र.पृ.क्रं.111

5) गंगाधर मुटे, लेख शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने महाराष्ट्र टाइम्स, 2 डिसेंबर 2016

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

मरणकळा



 ना वेळ ना काळ...
तू चोरपावलासारखा येतोस
अन् सर्वस्व हिरावून घेतोस
तुझा कालचा गारपिटीचा मारा मात्र अस्वस्थ करणारा होता
उभं पिकं क्षणात आडवं तिडवं केलंस
थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा मारल्या
कुठं तासभरात काश्मीर अवतरलं
विदर्भ, मराठवाड्यात तसं नकारात्मक दिसतं,असो

तुझ्या येण्यानं कुठं माणसं मेली, कुठं जनावरे दगावली, कुठं गहू लोळला तर कुठं हरभरा भिजला, कुठं तुरीचं ढीग झालं, कुठं आब्याचं मोहोर गळलं, ज्वारीचं तर अथंरुणच झालं

मी मात्र गुडघ्यात डोकं घालून तासनतास एकटक बघत होतो
आता कुठे वर यायची स्वप्ने बघत होतो
दिवसरात्र राबराब राबून हाडाच काडं केलं होतं
वाटलं होतं यंदा तरी सुगीचे दिवस येतील ?
खळ्यावर टाकलेली ताडपत्री सांगत होती, गारपिटीच्या तडाख्यात आपलं स्वप्नंही झाकलेलं

चर्चेचा काटा ग्लोबल वाँर्मिगकडे वळतोय
मला मात्र विज्ञानतलं कुठं कळतंय, गारांचा पाऊस मात्र माझा जीवघेणा खेळ करतोय

या प्रवासात अनेक स्थित्यंतरे पाहिली
जुना भारत आणि नवा भारत
या दोन देशांना जोडणारा
पूल म्हणजे माझी पिढी

ग्लोबलायझेशनचा जन्म पाहिला
पुढे वर्षे उलटली
धक्के,चटके बसले,ते सोसले
मल्टी नँशनल कंपन्या उभ्या राहिल्या
वारूळातल्या कोट्यावधी मुंग्या बाहेर पडल्या, नजरेत नजर घालून पुढे जात होत्या
मी मात्र तसाच उभा होतो- बुजगावण्यासारखं
आजही तसाच...!

ना थंडीची,ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची
शेतीच्या संकटातून रोज नव्याने संधी शोधून होतो
आता तर वाटेवर गारपिट नावाचा ऋतूचा जन्म होतोय

आता सरकारी यंत्रणेकडून मोजदाद होईल
वरून खाली, खालून वर पाहिलं जाईल
राजकारणी मात्र नेहमीप्रमाणं डाव साधतील
शेतकरी हेच सत्तेचे सूत्र समजतील
सोबत बदलत्या हवामानाचा फैलाव आहेच..!

आता कोणत्या सृजनाची वाट पाहू ?
गारपीटसह इतर मरणकळा कुठवर सोसणार
आता मलाच बदलावे लागणार
ध्येयाची क्षितिजे मलाच बदलावी लागणार

कवी : विकास पांढरे, मुंबई
९९७०४५२७६७

( टीप : 'मरणकळा' ही माझी आजवरची दुसरी कविता. त्यामुळे कविता लेखनाचे तंत्र जमले असेल नसेल तरी त्यातील भाव लक्षात घ्यावा, आवडल्यास शेअर करावे,सोबत सुचनांचे स्वागत आहे.)

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

मुखवट्यांचे जग







ठिकाण तुळजापूर वेस,वार मंगळवार, सकाळची वेळ,  थोडीशी घाईबडीची, नोकरदार, कामगारांना कामांवर जाण्याची गडबड ... रस्त्यात एक चारचाकी बंद पडलेली...  अचानक दोन पोलिस येतात... गाडीला परवाना नाही... तुमच्याकडे लायन्सेस नाही, अटक व्हा नाहीतर लाच द्या... नाष्टा माझ्याकडे बील तुमच्याकडे.... मोबाईल नंबर 99 सतरा कुठेही उतरा... लोकसंख्या दीडशे पुढारी तीनशे..... दंगल झाली की चाललो घरला... अशा एकाहून एक हजरजबाबी विनोदाने तुळजापूर वेस मधील नागरिक पोटभरून हसत होते, बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद मिळत होती. हा प्रसंग दोन वर्षापूर्वीचा सोलापूर शहरातला आहे.

महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या ४२जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. कुठेच हक्काची जमीन नसलेल्या,पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजनातू प्रबोधन करणाऱ्या बहुरूपी समाजाच्या लोककलेला शिवकाळापासून मानाचे स्थान आहे. छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला.

हा समाज संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरी राज्यवार आणि विभागवार यांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत नाही. या सर्व गटांसह महाराष्ट्रात विखुरलेल्या बहुरूपी जमातीची लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ हजार असावी असा अंदाज आहे.

 छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला
मराठवाडय़ात या बहुरूपींना राईरंग म्हणतात, नळदुर्ग शहराच्या बाजूला येडोळा गावात हा समाज मोठ्या प्रमाणात राहतोय. उमरगा चौरस्ता वर समाजाचे दर्शन होते. सोलापूर शहरात समाजाचे वास्तव आहे. भंडारा जिल्ह्य़ात यांना भिंगी म्हणतात. पात्राला (भूमिकेला) अनुसरून आपला वेश जलदपणे बदलण्यात हे पटाईत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. काही गट हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माचे आचरण गुण्यागोविंदाने करतात. अमरावतीचे बहुरूपी यांच्यापैकीच आहेत. या जमातीच्या बहुतेक महिला ठिगळांच्या साडय़ा नेसलेल्या दिसतात. पुरुषांच्या वेशाचे धोतर व बंगाली टोपी हे वैशिष्टय़ आहे. बहुरूपी समाजातील महिलांचे स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येते पण चर्चेत सहभागी होता येत नाही.


बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता.

शिवशाही काळापासून आपल्या कलेमधून लोकांचे मनोरंजन करत असलेल्या बहुरूपी समाज आज दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वीची काळी अभंग, भारूड हे जरी यातून मनोरंजन होत असले तरी, यामध्ये अधात्म जास्त होत असे, त्यामुळे सर्वसामान्य, अडाणी लोकांना बहुरूपी समाजाचे विविध रूपे हेच मनोरंजनाचे मुख्य साधने होती. सकाळ, दुपार अन संध्याकाळची एखाद वेळ साधायची नि घराघरात, दुकानात थेट धडक द्याचयी, अन गावचा पोलीस पाटील,सरपंच, कारभारी यांना गोळा करून, उपस्थितांचे मनोरंजन करायचे, कधी हनुमान तर कधी वाघ, पोटात खुपसलेल्या सुरा आणि विविध मुखवटे धारण करणारा हा बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता. 
 बहुरूप्यांच्या सोंगाना तितकीच दाद मिळायची अन बिदागी ही.आज गाव असो, वा शहर बहुरूप्यांना सोंगाना कुणी विचारत नाही. कारण आजच्या आत्याधुनिक मनोरंजनाच्या दुनियेत बहुरूप्यांची पारंपारिक कला जवळजवळ लोप पावत असून, केवळ हा सोंगात बाद झाला नाही तर गावगाडयातील या समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. हा समाज फिरस्ता असला तरी, त्याला हक्काचे घर आहे ना जागा, पोटासाठी सतत स्थलांतर होत असल्याने, ना कुटुंबाकडे लक्ष देता येत ना मुलांच्या शिक्षणाकडे. उपजत कलागुणांचा कलाविष्कार असताना चित्रपट माध्यमकर्मींचे लक्ष ही त्यांच्याकडे जात नाही. त्यातच मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे बहुरूपी समाज आणि त्याच्या कलेकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


बहुरूपी सुदाम साळुंखे,संतोष शिंदे

शतकानुशतकापासून कलेवर पोट भरणाऱ्या बहुरूपी समाजाला आज अनेक संकटांना तोंड दयावं लागत आहे. स्वत:चे दु:ख लपवून लोकांचे मनोरंजन करणे ठीक आहे. या कलेतून पूर्वीसारखी बदागी मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे प्रश्न सोडवणे कठिण जात आहे. विशेष म्हणजे मुलं हुशार असूनही त्यांना म्हणावे तसे शिक्षण देता नाही अशी खंत बहुरूपी सुदाम साळुंखे यांनी व्यक्त केली.



बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद 
  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाचे साधने वाढली असली तरी, आमच्या मुलांना पारंपारिक कला जिवंत राहावी यासाठी आम्ही त्याना धडे देत असतो, नवव्या पिढीपासून ही परंपरा जोपसण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया बहुरूपी संतोष शिंदे यांनी दिली.
 मागील ६५ वर्षापासून हा समाज विशिष्ट भागात स्थायिक झाला नाही. भटक्या अवस्थेत राहिल्याने शासन दरबारी या समाजाची नोंद नव्हती.समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला पण यानंतरही शासकीय योजनांपासून हा समाज वंचित आहे. अद्यापही या समाजाला सरकारकडून कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. यामुळे हा समाज आजवर उपेक्षित राहिला आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( सदर लेख सोलापूर तरुण भारत मध्ये दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

मंगळवेढ्यात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची गरज


सध्या सोलापूरसह मराठवाड्यात हुरडा पार्ट्या दिसू लागल्यात. विशेष म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीची चवच न्यारी असल्याने मुंबई पासून ते नागपूर पर्यंतचे खवय्ये या भागात येऊन हुरडा पार्टीचा आस्वाद घेताना दिसतात. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत मंगळवेढा तालुक्यात पाहुण्यांची वर्दळ असते. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला जीआय ( भौगोलिक) मानांकन मिळाले असले तरी याचा इथल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. विद्यमान सरकारने या भागात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे.
आपल्या देशात ११ टक्के जमिन क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर पुणे, नगर जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड, लातूर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिध्द आहे.

जिल्ह्यात सोलापूर - हैदराबाद महामार्गावर मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले ) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सुरू आहे. त्यामुळे या भागात ज्वारी उत्पादनाचा विकास झाला आहे. १९८५ साली सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यात रब्बी ज्वारीसाठी पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. त्यासाठी २५ टक्के बागायती व २० टक्के बागायती जमिन क्षेत्राचा विचार करून 'मालदांडी'व उन्नत 'स्वाती'चा समावेश केला गेला होता. बार्शी तालुक्यात शाळू जातीची ज्वारी उत्पादन घेतली जाते तिलाही राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे.
मंगळवेढा हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. येथील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. एकरी ८ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीत १५ ते २० आणि चांगल्या जमिनीत २५ ते ३० क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते.
ज्वारीचे आयुर्वेदात देखील खूप महत्व सांगण्यात येते. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवेढा ज्वारीला भौगोलिक मानांकन दिले आहे. यामुळे मंगळवेढ्याची ज्वारी आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करता येणार आहे. दोन वर्षापूर्वी या ज्वारीला जीआय (भौगोलिक)मानांकन मिळाले होते. याबाबतची सविस्तर बातमी मी सोलापूर तरुण भारत मध्ये दिली होती. या मानांकनामुळे मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी सातासमुद्रापार जाईल व उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशा आशयाची ती बातमी होती. या बातमीला येत्या मार्च २०१८ मध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. ना इथली ज्वारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचली ना इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. जीआय मानांकनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो? हा एक संशोधनाचा विषय आहे.
गेल्या पंधरा वीस वर्षापासून राज्यात कधी दुष्काळ तर कधी सुकाळ असतो. त्यामुळे ज्वारी उत्पादनात कमालीची घट होत आहे. यास सोलापूर जिल्हा ही अपवाद नाही.
राज्यात ज्वारीचे क्षेत्र २४ ते ३२ लाख हेक्टर असून उत्पादन ७ ते २४ लाख टन आहे. सध्या रब्बी ज्वारीचे ८ ते १०लाख हेक्टरने क्षेत्र कमी झाली. शेती क्षेत्रात ही चिंताजनक बाब आहे. धान्य आणि कडबा ही दोन्ही महत्वाच्या गरजा आहेत. ज्वारीच्या शाश्वत वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यात मालदांडी, दगडी, ज्योती, परभणी मोती,यशोदा या जातींचे उत्पादन होते.मंगळवेढा तालुक्यात मालदांडी ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ज्वारी आणि कडब्यास दर मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी डाळिंब फळबागेकडे वळल्याने ज्वारीचे क्षेत्र कमी होत गेले. ज्वारीला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळाले असले तरी इथला शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी ज्वारी प्रक्रिया उद्योगाची दालने खुले करून देणे गरजेचे आहे. ज्वारीचे प्रक्रियायुक्त केलेले पीठ, लाह्या, पापड, पोहे,मोतीकरण, स्टार्च,ग्लुकोज पदार्थ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन असा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

आपल्या देशात ज्वारी पासून इथेनॉल उत्पादनासंबंधी केंद्र सरकार कमी पडत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या पुढाकाराने इथेनॉल उत्पादनासंबंधी प्रथम निर्णय झाला होता. आज देशात आणि राज्यात भाजपाची एक हाती सत्ता आहे. या सरकारने ज्वारी पासून इथेनॉल निर्मिती केले तर शेतकऱ्यांचे दारिद्रय संपल्याशिवाय राहणार नाही.
सप्टेंबर २०१७ मध्ये मंगळवेढ्यात वारी परिवार, कृषीक्रांती व आत्मा ( कृषी विभाग) संयुक्त विद्यमाने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ज्वारी व मका महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्वारीचे कोठार असलेल्या मंगळवेढ्यात ज्वारीवर आधारित उद्योग सुरु करण्यात यावा,असा सूर निघाला होता. विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. देशमुख यांच्या कार्यकाळात ज्वारी प्रक्रिया उद्योग उभारला गेला तर सोलापूर जिल्ह्यातील सहकार उद्योगाला आणखी झळाळी प्राप्त होईल.
© विकास पांढरे, मुंबई
९९७०४५२७६७

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

कहाणी एका शाकाहारी गावाची

 

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास, भूगोल आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्टयपूर्ण परंपरा अशी अनेक गावे जपत आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा परंपरा जपणाऱ्या गावांचा हेवा वाटतो. आज आपण परंपरेने शाकाहारी राहिलेल्या गावाची ओळख करून घेणार आहोत. धाराशिव जिल्ह्यात जोतिबाची वाडी हे गाव आहे. साधारण सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे. आजही या गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. वाचून आश्चर्य वाटले असेल, तरी हे सत्य आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्याची ऐतिहासिक व आध्यात्मिक अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला, येडशीतील निसर्गरम्य श्री रामलिंग देवस्थान, कुंथलगिरीतील जैन मंदिर, तेर, धाराशिव लेणी आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात. गेल्या दोन दशकांपासून हा जिल्हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देताना दिसतोय. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयांतल्या या जिल्ह्याच्या बातम्या माध्यमांत नेहमी वाचायला मिळतात.

जोतिबाची वाडी

जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथून 16 किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. साधारण सतराशे लोकसंख्या. गावात जोतिबाचे जागृत मंदिर आहे. 95 टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजाची चार घरे आहेत. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. गावातील साठ तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. 

निसर्गाची साथ मिळत नसली, तरी इथला शेतकरी समाधानी आहे. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातले तंटयाचे/मतभेदाचे विषय गावातच मिटविले जातात. आजपर्यंत कुणीही तक्रार नोंदविण्यासाठी  पोलीस ठाण्यात गेले नाही. सर्व जण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. गावात देशी दारूचे व बिअरचे दुकान नाही. मटनाचे दुकानही कोसावर कुठे लावण्यात आले नाही. त्यामुळे हे गाव आजही गुण्यागोंविदाने नांदत असताना दिसते. या गावात जुन्या पध्दतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक प्रमाणात पाणी आहे. गावकरी याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. दुष्काळात या आडाचे कधीही पाणी आटले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नाही.
जोतिबाच्या वाडीतील चित्र

जागृत मंदिर व शाकाहाराची आख्यायिका

जोतिबाची वाडी हे गाव दोन कारणांसाठी प्रसिध्द पावले आहे. पहिले कारण म्हणजे येथील बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्री जोतिबाचे जागृत मंदिर व दुसरे या मंदिरामुळे गावकऱ्यांची शाकाहारी राहण्याची परंपरा. मांसाहार करणे आरोग्यासाठी चांगले नाही या विचाराने गावकरी शाकाहारी राहिलेले नाहीत, तर गावाला असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठानामुळे ते मांसाहार करत नाहीत. त्यामागे एक कहाणी आहे. ही कहाणी आजच्या काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवतेला जोडणारा सेतू आहे.

कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून जोतिबाची वाडी येथील जागृत जोतिबा मंदिर देवस्थान ओळखले जाते. हे देवस्थान लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवास मांसाहार चालत नाही. दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी गावात मोठा उत्सव भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे माहात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. यात्रेला अहमदनगर, धाराशिव, बीडसह राज्यातील लाखो भाविक येतात.

 श्री जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. गावात अजूनही एकाही चुलीवर, गॅसवर व स्टोव्हवर मटन शिजलेले नाही. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी ज्येष्ठ नागरिक आबासाहेब पवार व शिक्षक शिवाजी भराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे जागृत मंदिर असल्यामुळे गावात कोणी आतापर्यंत कुणी कोंबडे व बकरे कापले नाही. जोतिबावर असलेली श्रध्दा ही आजपर्यंत चालत आली आहे.''

जोतिबाची वाडी निजाम राजवटीतले गाव. या परिसरातील गावांत रझाकाराच्या सैनिकांनी मोठा छळ केला. मात्र जोतिबाचे जागृत देवस्थान असल्यामुळे रझाकाराने या गावाला कधीही त्रास दिला नाही, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे व त्या श्रध्देपोटी गावकरी पिढयान्पिढया शाकाहारी राहिले आहेत. शाकाहाराची ही परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे, पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत.

रगावी जाऊन मांसाहार

संपूर्ण गाव शाकाहारी आहे. काही जण माळकरी आहेत. जे काही लोक आहेत, त्यापैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटन खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. असे लोक आंघोळ करूनच गावात प्रवेश करतात. पुणे-मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.

श्रावणमासातील तिसऱ्या रविवारी यात्रेचे स्वरूप

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या जोतिबाच्या वाडीत श्री जोतिबाचे जागृत मंदिर असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरला जातो. या दवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केलीहोती . श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. अर्धा कोटीच्या लोकवर्गणीतून जोतिबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

पंचक्रोशीत जोतिबाची वाडीचा लौकिक


जोतिबाची वाडी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने जरी लहान असले, तरी हे गाव शुध्द शाकाहारी गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. गावात व्यसनाचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आबासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. या छोटयाशा गावातून एवढया मोठया संख्येने भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन आजूबाजूच्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दर वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. या निमित्ताने स्पर्धेकरिता उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू या छोटयाशा गावात येतात. या स्पर्धेमुळे अनेक गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे.

काळाच्या ओघात जोतिबाची वाडीच्या ग्रामस्थांनी शाकाहारी राहण्याचे वेगळेपण आजही जपलेच आहे, शिवाय पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचेही कार्य ते करत आहेत. जोतिबाची वाडीचे कार्य अनुकरणीय आहे.

विकास पांढरे

99970452767
 (सदर लेख साप्ताहिक विवेक, वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे.)

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

दंगलीतले दोन दिवस


मंगळवार,२ जानेवारी २०१८

कार्यालयीन कामासाठी मी १ जानेवारी पासून नगर जिल्ह्याच्या (उत्तरेला) ग्रामीण भागात फिरत होतो. मजल-दरमजल करत या गावाहून त्या गावात जाऊन काही महनीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन पुढचा रस्ता शोधत होतो. रात्रभर प्रवास सुरु होता. रात्री श्रीरामपूरला मुक्काम ठोकला. सकाळी सात वाजताच उठलो. अंघोळ केली. पुन्हा शहरातील काही व्यक्तींची भेट घेऊन पुढच्या प्रवासाचा बेत आखला.  श्रीरामपूर बसस्थानक समोरच्या कँटीनमध्ये नाष्टा केला. सोबत स्थानिक जिल्हा दैनिक जिल्ह्यातील घडामोडी नजरेत भरत होतो. चहावाला चहा करत होता, पानवाला पानाला कात लावत होता, भज्जीवाला कडईत भजी तळत होता, बाजारहाटसाठी परगावचे लोक येत होती, शाळा,काँलेजला जाण्यासाठी विद्यार्थी एसटीमधून उतरत होती,अशी काही लगबग सुरु होती. खरेतर, श्रीरामपूर हे व्यापारी पेठ. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच. 

दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात मध्यमगती गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या झहीर खानचे हे गाव. त्यामुळे या शहराविषयी उत्सुकतेने  कँटीन चालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. "झहीर खान हा आमच्या गावचा आहे,त्याचा मला अभिमान आहे." सध्या झहीरचे कुटुंब मुंबईत राहते, काही वर्षांपूर्वी त्याचे वडील श्रीरामपूरला आले होते, असे ऐकायला मिळते.
खरे,सांगायचे झाले तर श्रीरामपूरला ना मोठा इतिहास आहे ना भूगोल. इंग्रजी काळात  मध्य रेल्वेचे जंक्शन (बेलापूर) निर्माण झाल्यामुळे येथे मानवी वस्ती वाढली. पुढे साखर कारखाना सुरु झाल्याने झपाट्याने श्रीरामपूरचे गावात,शहरात, तालुक्यात आणि आता जिल्ह्याचे रूप धारण करत आहे. गुजरात, मध्यप्रदेश मधून मारवाडी जैन आले,गुजरात, राजस्थान च्या सीमाभागातून काही मुसलमान आले,  ख्रिश्चन मिशनाऱ्याने आपले बस्तान बसवले, पंजाब हरियाणा मधून शीख बांधव आले असे हे संमिश्र शहर आहे.

 महाराष्ट्रीयन समाजाचे स्थान क्वचित मोठे आहे पण आर्थिक स्थिती सक्षम नाही,असे तो कँटीनचालक सांगत होता. बघता बघता घड्याळात दहा वाजून गेले हे कळलेच नाही. मला ऊसतोड कामगार हाँस्पिटल परिसरात एकाची भेट घेऊन मुलाखत घ्यायची होती. मी संभाषण कमी करून रस्ता धरला. अचानक भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली असून एका युवकाचा बळी गेला असल्याची वार्ता हाहा म्हणताच श्रीरामपूर मध्ये धडकली. सकाळी अकरा वाजपर्यंत शांत असलेले शहर अचानक अशांत झाले. भीमा कोरेगावचे पडसाद श्रीरामपूर मध्ये उमठले. या प्रकरणाची शाहनिशा न करता काही  तरूणांनी दगडफेक केली. शहरातील मध्यवर्ती (शिवाजी चौकात) ठिकाणी काही तरूण एकत्र जमा होऊन घोषणाबाजी करत होते. श्रीरामपूर शहर बंद करत आले. टिव्ही चँनल आणि समाज माध्यमात भीमा कोरेगाव प्रकरणावरून तुंबळ वादसंगर चालू झाला. कोण, कुणाची डोके भडकवत होता? कोण,कुणाला शांत करत होता ? कुणी, पराचा कावळा करून दोन मने दुभंग करत होता. यामागचा हेतू काय आहे  कळायला मार्ग नव्हता.

    शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. चौकाचौकात पोलिसांचा पहारा उभा होता. हा गोंधळ लक्षात घेऊन मी बसस्थानकात येऊन बसलो शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसस्थानकात जमले होते. एसटी विभागाने बससेवा बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थी मित्राच्या घरी,काही विद्यार्थी होस्टेलवर,कुणी नातेवाईकांकडे राहण्याचा बेत करत होते. ज्याला कुणीच नाही, असे बसस्थानकात ताटकळत बसले होते. गावावरुन कुणी तरी आपणाला न्यायला येईल, या विचारात काही विद्यार्थी मग्न होते. शहर रिक्षा बंद असल्यामुळे इच्छित स्थळी कसे पोहोचावे, असाही प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.दंगलीबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने काही काळ शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दुग्ध संस्था व आरोग्य सेवा वगळता तातडीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. संपूर्ण शहरात कफ्यू लावण्यात आली होती. त्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते पण अनामिक भीती वाटत होती. पण सर्व जण जीवाच्या आकांताने सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. एक ज्येष्ठ नागरिकांनी श्रीरामपूर मध्ये १९८६ साली झालेल्या दंगलीचे कथन केले. तर एकाने २०१६ साली श्रीरामपूर दंगलीत ३४ दुकाने कशी जाळली गेली, आणि ती धग संपत असताना अचानक घडलेल्या अघटीत घटनेचे भाव त्या इसमावर उमठले होते. एक महिला आपल्या शेतातील भाजी विकण्यासाठी श्रीरामपुरात आली होती. दंगलीच्या पडसादामुळे ती ना बाजारात पोहचली ना तिची कुणी भाजी घेतली. गावाकडे कसे जायचं हा तिच्यापुढे उभा राहिला होता. जसजशा सूर्य माथ्यावर येऊ लागला तसतसे रस्तावर कुणी नजरेस पडत नव्हते. दुकाने बंद झाली होती, घोटभर पाणी प्यावे म्हटले तर हाँटेल ही बंद झाली होती. दिवसाढवळ्या रस्ते ओस पडू लागली होती. मी एका रिक्षाचालकास आगाऊ पैसे देऊन एका घरी पोहोचलो.

बुधवार, ३ जानेवारी २०१८

भीमा कोरेगावची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला. आदल्या दिवशीच श्रीरामपूरहून बेलापूरला जायचे ठरवले. दुपारचे चार वाजले असतील शहरात बंद शांतता होती. श्रीरामपूरहून बेलापूर आठ किलोमीटरवर आहे. त्यामुळे हा प्रवास सोयीचा वाटला. एका खासगी वाहन चालकास विणवणी केल्यामुळे तो मला बेलापूरला सोडायला तयार झाला. त्या आठ किलोमीटर अंतरासाठी शंभर रुपये मोजावे लागले,असो. रात्रीचा मुक्काम पुण्यनगरीचे वार्ताहर विष्णु डावरे यांच्याकडे केला. सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक जिल्हा दैनिक वाचत असताना एक बातमी नजरेत भरली. त्या बातमीने मी खूप अस्वस्थ झालो.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे श्रीरामपूर मध्ये शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. मॉडेल इंग्लिश स्कूल मधील तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रद्धा आदिक (८वर्ष) ही विद्यार्थिनी घरी पोहचलीच नसल्याची ती बातमी होती.
शाळेतील स्कूल बसने संबंधित मुलीला खानापूर येथे सोडले होते. शाळा लवकर सोडल्याची कल्पना शाळा प्रशासनाने पालकांना दिली नाही. तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेत या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता ही मुलगी पनवेल येथे सुखरूप सापडली,असे बातमीचे शेवट आहे. एका दंगलीचा या निरागस बालिकेने कसा सामना केला असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे राहताना अंगावर काटा उभा राहतो.

बेलापूरहून मला पुणतांब्याला यायचे होते. बेलापूर सारखे छोटे गाव बंद होते. विष्णुपंत डावरे यांच्या दुचाकीवरून कोल्हारला गेलो. तिथे  आदल्यादिवशी बंद पुकारण्यात आला होता.  दुपारचे तीन वाजले होते.हळूहळू रस्त्यावर वाहने दिसू लागली होती. त्या जिल्हा रस्त्यावर दंगलीची धग तेवढी जाणवत नव्हती. मला पुणतांबा येथे जाण्यासाठी श्रीरामपूरला यावे लागले. श्रीरामपूर ते पुणतांबा अंतर १८ किलोमीटर आहे. हे अठरा किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार तास लागले. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतली असल्याची बातमी समाज माध्यमातून कळली,तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

शाहीर पठ्ठे बापूराव

मराठी शाहीर परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव. बापूराव यांची यंदा दिडशेवे जयंती वर्ष सुरु आहे. या शाहीराच्या कलेचे स्मरण व्हावे म्हणून हा प्रपंच.

शाहीर पठ्ठे बापूराव
 मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि परंपरा म्हटले की,संत, पंत आणि तंत परंपरेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. शाहीर पठ्ठे बापूराव हे मराठी शाहीर परंपरेचे मुकुटमणी समजले जातात. असंख्य लावण्या, कवने, पदे भेदिक लिहून मराठी साहित्य परंपरेच्या दालनात मोलाची भर घातली. संत साहित्याच्या खालोखाल लावणीतून, अध्यात्माची जाणीव देणारे पठ्ठे बापूराव हे खरे 'लावणीसम्राट' होत.
पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांना ताला-सुरांचा साज चढून  त्याला तमाशात पेश करायचे काम पवळाने केले म्हणून १९ शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्याकडे पाहिले जाते.

 पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे वाळवे तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या छोट्याशा गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले हे पोरं. लाडाने त्याला बापू म्हणत. पुढे हाच बापू तमाशा क्षेत्रातला तेजस्वी तारा बनला. जेमतेम चौथी पर्यंत शिकलेले हे पोरं शब्दरचना करण्याच्या नादात औंध संस्थानातील नोकरी सोडून तमाशाच्या फडात कवने करू लागला. बापू ( श्रीधर) ने तमाशाचा नाद सोडवा, यासाठी त्याच्या कुटुंबाने खूप प्रयत्न करून पाहिले. यातून बाहेर काढण्यासाठी शिंगणापूरच्या शंभू महादेव बडव्याची मुलगी सरस्वती हिच्याशी श्रीधरचे  लग्न उरकून टाकले. लग्नानंतरही संसाराच्या जबाबदारीत बापूला आपले कवित्व स्वस्थ बसू देत नव्हते. त्याकाळी त्याने सरळ मुंबई गाठून किसनदादा गवळी,  आशन्ना कामाठी यांच्या तालमीत काम करू लागला. बालपणापासून कवितेची आवड असलेल्या बापूचे नाव अल्पावधीतच मुंबापुरीत गाजू लागले. बापू अनेक लढती जिंकू लागल्याने रसिक प्रेक्षकातून 'शाब्बास पठ्ठे ! बापूराव शाब्बास' अशी आरोळी ऐकू येऊ लागली.

 तेव्हापासून मराठी लोक परंपरेत पठ्ठे बापूराव हे नाव परिचित झाले. याच काळात हिरकणी पवळा हिच्याशी त्याची ओळख झाली.  तमाशात हे दोघे जोडीने काम करू लागले. पुढे हीच जोडी १९ व्या शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. संगमनेरजवळील हिवरगावच्या तबाजी महाराची ही मुलगी. देवाला मुरळी म्हणून सोडलेली पवळा दिसायला गोरीपान होती.
पवळा

ऐन तारुण्यात पठ्ठे बापूराव आणि पवळा यांची जोडी जमली. बघता बघता या दोघांची अदाकारी पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होऊ लागली. पुढे एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रितीरिवाज पाळण्याच्या काळात बापूराव आणि पवळाची प्रेमकहाणी गाजत होती. बापूराव ब्राह्मण तर पवळा महार. यामुळे लोकांत वितंडवाद झाला. भारतीय जातीव्यवस्थेची बळी पवळा ही सुद्धा ठरली.

 या प्रकरणामुळे बापूराव - पवळाचा फड काही दिवस बंद पडला. हातावरचे पोट असलेल्या बापूरावांनी कंञाटदारांना एकञ बोलावून शेवटी म्हणाले, "आम्हाला विकत तरी घ्या किंवा आमचा लिलाव करा" शेवटी एल्फिन्स्टन थिएटरचे मालक अबुशेट यांनी बापूराव -पवळा यांचा दरमहा नऊशे रूपयांवर लिलाव घेतला. कलावंत साथ देत नसल्याने बापूराव हतबल झाले. बापूराव,अबूशेटला म्हणाले, आम्हाला नुसते बघायलाही लोक फार येतात.  तेव्हा आम्हा उभयतांना पाहाण्यासाठी तिकिट लावले तरी गल्ला जमेल, असे सांगितले.अबूशेटने तसेच केले आणि दोन आण्याच्या तिकिटांची दररोज दोन चारशे रुपयांचा गल्ला जमू करू  लागले. गर्दी वाढू लागल्याने बंदोबस्ताची गरज भासू लागली.  त्यातच लोकात बाटला की न बाटलाचा वाद चालू होता. पोलिसात तक्रारी गेल्या आणि या सार्‍याला कारणीभूत तुम्ही आहात, तुम्हाला हद्दपार का करू नये, अशी नोटीस होऊन खटला कोर्टात गेला. ११ आॅक्टोबर १९०५ पर्यंत हा खटला चालला. पुढे कोर्ट स्वतः बापूरावांचा तमाशा बघायला आले. बापूरावांनी यावेळी स्टेजवर स्वतःचे जीवन चरित्रे सांगितले.

 "ब्राह्मणाचे महार होता येईल ; पण महाराचा ब्राह्मण होता येणार नाही. नामचंद पवळाने मला महार होण्याची अट घातली आणि ती मान्य केली, हे फक्त जाणते लोकच जाणतील. मग ती आता महार झालो आहे, तो ठीक आहे". याची प्रचिती म्हणून काय, पवळाने बापूरावाला आपल्या हाताने जेऊ घातले. मग हा वाद संपला. पुढे या दोघांनी मिळून  'मिठराणी' हा सुप्रसिद्ध वग तयार केला. कोल्हापूरात छञपती शाहू महाराजांच्या समोर हा वग सादर करून महाराजांचे मन जिंकले. या दोघांनी पुण्यात काही काळ राहून रेठर्‍यात आले. पवळाने बापूला बाटवले म्हणून तिचा तिरस्कार होऊ लागला. पवळा नाराज होऊन पुण्याला निघून गेली. गावकर्‍यांनी वर्गणी करून तीन हजार जमा करून  बापूरावाला काशीला जाऊन धर्मांतर शुध्द होऊन जातीत यावे म्हणून पैसे दिले. बापूराव काशीला न जाता पुण्याला आले. त्यांनी ते तीन हजार रूपये पवळाला दिले आणि म्हणाले, "एकदा महार झालो तो झालो. आता धर्मांतराची जरूरी काय? पण पवळाचे मन विटले होते. या दर्दभरी कहाणीचा शेवट शोकात्म होत होता.  दोघांमध्ये चिडचीड सुरू होऊ लागली आणि एकदिवशी हे दोन पाखरे विभक्त झाली. पवळाने तमाशाला रामराम ठोकून आयुष्य जगू लागली. पुढे हे दोघेही अत्यंत हलाखीत जीवन कंठीत होते.स्वतःचे जीवन लावणीत सांगताना पठ्ठे बापूराव म्हणतात :-
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण, असूनी सोवळे ठेवले घालून घडी !
मशाल धरली हाती तमाशाची लाज लाविली देशोधडी !
असे जीवन चरित्र असलेल्या पठ्ठे बापूरावाची लावणीरचना दोन लाखांहून अधिक आहे. तर रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्या. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली.
संग्रहीत चित्र

पवळा हिच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. पवळाच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते. तमाशाप्रेमी बाबूराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात  याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तर बापूरावविषयी प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील म्हणतात, शाहीर पठ्ठे बापूराव-ज्यांचा उल्लेख सार्थपणे 'लावण्यांचे विद्यापीठ' असा केला जातो, त्या बापूरावांच्या एका गौळणीतील शृंगार तर मला 'ओलेती' या चित्रकृतीच्या दर्जाचा वाटतो. ज्या अवीट गौळणीत शृंगाराच्या तप्त ज्वाला आहेत; मात्र तीत छछोर बाजारूपण नाही. रंगाची उधळण आहे, खुलेपणा आहे, पण बीभत्सपणाचा लवलेशही नाही. त्या गौळणीची धुंदावणारी चाल, पारंपरिक स्वरसाज... सारेच काही और!
"श्रीरंग सारंगधरा, लाजुनी धरिते उरा
चला नेते माझ्या मंदिरा
हो, उडवा रंग, रंग, रंग
तुम्ही माझ्या महाली चला ना
थाट विलासी केला भला ना
गुलाबाच्या फुलांचा झेला
जागोजागी मी खोविला पहिला
तुम्हा पचला, तर मग उचला
नचला नंग नंग नंग, उडवा रंग रंग रंग...'
त्या निःसंग, ढंगदार रात्रीचे वर्णन करता करता बापूराव राधा-कृष्णाचा हा शृंगार "मग आनंद मारील चिपळ्या, करील दंग दंग दंग' अशा बेहोषीच्या उंचच उंच झुल्यावर नेऊन ठेवतात.
यावरून तमाशा क्षेत्रातील पहिल्या अजरामर जोडीचे महत्त्व लक्षात येते.

लेखक - विकास पांढरे,९९७०४५२६७
       
शाहीर पठ्ठे बापूराव
जन्म नोव्हेंबर ११, १८६६
रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली
मृत्यू२२ डिसेंबर १९४५
पुणे


संदर्भ :-
 १)मराठीचे लोकनाट्य तमाशा  कला आणि साहित्य : लेखक नामदेव व्हटकर
२) प्रतिष्ठान खंड २

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...