विश्‍वनाथ बुक्के गुरूजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विश्‍वनाथ बुक्के गुरूजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

समाजसेवेचा वसा घेतलेले गुरुजी




ज्याला काही करून दाखवयाचे असते तो, कुणाची वाट पाहत बसत नाही. दृढनिश्‍चयी मनुष्य आणि धबधबा हे आपला मार्ग आपणच काढत पुढे जात असतात.हेच पहा ना नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक विश्‍वनाथ बुक्के गुरूजी हे सामाजिक भान असलेले हाडाचे शिक्षक.  नांदेड आणि आष्टुर परिसरात लोक त्यांना 'गुरूजी' नावाने ओळखतात. समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन, आपले जीवन समाजासाठी वाहिलेले आहे. संत गाडगेबाबा महाराजाचा वसा चालण्याचे काम ते गेल्या साठ हून अधिक वर्षापासून करतात. प्रसिध्दीपासून चार हात लांब राहणारे विश्‍वनाथ बुक्के गुरूजी यांचे कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारे आहे.

 नांदेड जिल्ह्यातील आष्टूर या गावात एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्मा झाला. वडील तिसरी असताना वारले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठे आभाळ कोसळले. जगण्याची परवड न करता त्यांच्या आईने मोठ्या हिंमतीने आपल्या मुलांना शिक्षण शिकवले. विश्‍वनाथ हे तिसरे अपत्य. मुलांचे पाय पाळण्यात दिसावे, तसे त्यांचे व्यक्तिमत्व दिसून येत येते. शाळेत ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचे. गावात भजन असो इतर धार्मिक कार्यक्रम त्यात ते सहभागी असायचे विशेष: म्हणजे संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज हे आष्टूर व परिसरात प्रवचनास आले की, ते नेहमी हजर असायचे.त्यामुळे त्यांना लहानपणीच वैचारिक भान आले. 

सातवी आठवीत असतानाच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन, विश्‍वनाथ गुरूजी यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन ’भारत वाचनालय’ची स्थापना केली. गीता, रामायण, दासबोध, हरिपाठ, ज्ञानेश्‍वरी या धार्मिक ग्रंथाबरोबरच महापुरूषांचे चरित्र व इतर वैचारिक ग्रंथ याठिकाणी वाचनात आल्यामुळे विश्‍वनाथ गुरूजीचे जडणघडण होत गेली. "आधी केले मग सांगितले" या उक्तीनुसार महाराष्ट्रातील ज्या संताने जनसमूहाला हाती टाळ- मृदृग नव्हे तर झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले ते म्हणजे संत गाडगेबाबा. गाडगेबाबांचे स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन त्यांनीही गाव स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला. दहावीत शिकणारा हा पोरं. शिकून मोठे व्हायचं सोडून हातात झाडू घेऊन गावभर हिंडत असल्याचे पाहून बुक्के कुटुंबिय वैतागून गेले होते.

अशिक्षित आणि सुशिक्षित दोन्ही समाजाला खर्‍या अर्थाने सुसंस्कृत करण्यासाठी विश्‍वनाथ बुक्के गुरूजीचे ही धडपड आजही अविरत चालू आहे. शिक्षकी पेशीतून सेवानिवृत्त होऊन, त्यांना वीस वर्षे झाले,  आज त्याचे वय 79 आहे. प्रकृती मात्र ठणठणीत आहे. प्राणायाम, योगासन ते न चुकता रोज करतात.  नांदेडहून दर सोमवारी आष्टुर मध्ये येऊन खराटा घेऊन गाव स्वच्छ करण्याचे अखंड वृत्त ते आजपर्यंत जोपासत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आष्टूर गावातील महिला घरातील कचरा रस्त्यावर कधीच टाकत नाहीत. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर आहे. गावात एकीचे वातावरण आहे. एवढेच काय राजकीय पुढारी देखील त्यांचे शब्द प्रमाण मानून गावाचा विकास कसा होईल, विचार करतात. गावातील प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होत असतात. त्यामुळे ते कधीच पेरके वाटत नाहीत. 

 'स्वाध्याय'परिवाराच्या माध्यमातून गावातील लोकांना संस्कारित करण्याचा प्रयत्न ते करतात. बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून बाल मनावर चांगले संस्कार रूजवण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. कोणत्याही विषयाच्या मनात भय न आणता विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे असे ते सांगतात. विविध महापुरूषांच्या गोष्टी, संस्कारक्षम विचार, लोकगीते, साने गुरूजींच्या कथा अत्यंत रसाळपूर्ण वाणीत ते सांगत असल्यामुळे आबालवृध्दाचे लाडके बनले आहेत. गुरूजींच्या सहवासामुळे गावात भक्तींचे वातावरण निर्माण झाले आहे. एकादशीचे भजन, भक्तिफेरी, भगवद्गीतेवरील प्रवचन असे विविध कार्यक्रम होत असतात. गावातील तरूणांना एकत्रित करून, त्यांनी विधायक कामात कसे झुकून द्यावं याविषयी मागदर्शन करतात. अनेक तरूण गुरूजींच्या कार्याची प्रेरणा घेऊन श्रमदान, व्यसनमुक्ती चळवळ अंधश्रध्दा चळवळीसह राजकारणात यशस्वीपणे काम करत आहेत. आष्टुर गावाला बुक्के गुरूजीमुळे वैचारिक परिपक्वता आली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही हतबल न होता दोन हात करण्याची प्रेरणा बुक्के गुरूजींच्या प्रेरणेतून मिळत असल्याचे गावात समाजसेवा करत असलेला तरूण बाबासाहेब पाटील बाबर यांनी सागितले.



प्रत्येकाने आपले तीर्थक्षेत्र स्वत:च शोधायचे असते आणि तेही अंतस्थताच तोच आपला अंतर्यामी गाभारा आहे, असे साधं तत्वज्ञान सांगतात. सध्या प्रसिध्दीचा जमाना आहे. कणभर काम करायचे आणि मणभर प्रचार करायचा असा नवा पायंडा अनेकांनी आपलासा केला आहे. परंतु विश्‍वनाथ बुक्के गुरूजींनी प्रसिध्दीपासून दूर राहून आयुष्यभर निरपेक्षपणे समाजजागृतीचे मणभर काम करत आहेत. साठ वर्षापूर्वी हातात झाछू हाती घेतला. परंतु,फोटो कधी काढला नाही, कुणी काढला तर त्यास विरोध केला. कुणी बातमी करण्याचा प्रयत्न केला असता, मला प्रसिध्दीची हौस नाही, कृपया वर्तमानपत्रात माझ्या कार्याचे वृत्त प्रसिध्द करू नका, असे गावातील लोकांनाा तेे सांगतात. हे एक महान कार्य आहे. लोकांनी यात स्वच्छेने सहभागी व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. समाजाकडून तसेच मुलांकडून शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षक हा सर्वांगीण विकास आणि विविध जबादार्‍यांच्या भाराने दबल्याचे आज दिसत आहे. त्यामुळे आजचा शिक्षक बहुआयामी असला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. 

आज शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त होऊन, घरी बसणारे भरपूर आहेत. अनंत काणेकरांच्या दोन मेणबत्ता लघुनिबंधात वाक्य आहे, स्वत:साठी जगलास तर मेलास, दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, जगणं आणि मरणं म्हणजेच माणुसकी. सतत दुसर्‍याच्या सुखासाठी झटणारे, प्रसिध्दीपासून दूर राहून समाजासाठी व्रतस्थपणे काम करीत राहणारे विश्‍वनाथ बुक्के गुरूजी कार्य प्रेरणादायी आहे. 32 वर्षे नोकरी सांभाळली असली तरी संत गाडगेबाबा महाराज यांचा कार्यकर्ता म्हणून काम पाहले. गुरूजींच्या कार्याममुळे आष्टूर गावाला एक नवी दिशा मिळाली आहे.आदर्श समाजसेवक कसा असावा याचे मूर्तीमंत उदारहण सर्वासमोर ठेवले आहे.

लेखक - विकास पांढरे, 9970452767
विश्‍वनाथ बुक्के गुरूजी : 8605028190
(पूर्वप्रसिध्द ज्येष्ठपर्व त्रैमासिक)


कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...