गावगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गावगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

सोलापूरच्या 'हौसाबाई'ची गोष्ट

आज दुपारी फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होतो. तसा हा रस्ता नेहमी गजबजलेला. कपड्याची, चपलाच्या दुकानात गर्दी बरीच दिसली. मी विमनस्क मनस्थितीत हा रस्ता पार करत पुढे जात होतो.माथ्यावर ऊन वाढत होतं. रस्त्याच्या कडेला उखळ, जात विकणाऱ्या वृद्ध महिलेकडे माझी नजर गेली. बराच वेळ ती गिऱ्हाईकाची वाट पाहत होती. कोणी तरी यावं आणि आपल्या वस्तू घ्याव्यात, असं तिला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं. म्हणून ती चिडलेली होती. तिच्या बोलण्यात सोलापूर भाषेचा लकब होता. मी ही याच भागातला असल्यानं तिच्या जवळ थांबून बोलू लागलो. "आजी नाव काय तुझं?" हौसाबाई - हौसाबाई धोत्रे "गाव कुठलं?" "सोलापूर"
"अस्स.. मला वाटलचं..तुझी भाषा सोलापूरी..." मध्यम उंची, भेदक नजर, नऊवारी साडी, उतारवयाकडे झुकलेले शरीर.. डोक्यावर पिकलेले पांढरे केस.. हौसाबाईचं बाह्यरूप..हौसाबाईच्या अंतरंगाचा शोध घेणं ही एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. हौसाबाईचा अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. वस्तू घेतात आणि निघून जातात. पण तिच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. म्हणून ती थोडी चिडली..मी ही सोलापूरकडचा आहे म्हटल्यावर नरमाई घेतली.. आणि बोलू लागलो..

 "आजी, पुण्यात कधीपासून राहते आणि कुठे राहते?' मी म्हणालो- ती म्हणाली, "चाळीस वर्षे होऊन गेली. दुष्काळाच्या भयानं पुणं गाठलं. सुरवातीला पाल करून राहत होतो.. आता आम्ही वनदेवी (कर्वेनगर) परिसरात राहतोय. लेकर लहानाची मोठी इथेच झाली. आमचं वडारच काम. पाटा,वरवंटा, जात, उखळ, खलबत्ता तयार करणं आमचं काम" दगडावर छन्नी हातोडीचे घाव घालून त्याला आकार देणाऱ्या हौसाबाईच्या संसाराला याच व्यवसायाने आकार दिला. 

हौसाबाई म्हणाल्या, "४०-५० वर्षांपूर्वी सोलापूर एक गावचं होतं. पोट भरणं मुश्किल होतं. डोक्यावर दगड घेऊन गावोगावी भटकत राहिली. आम्ही नवराबायको दगडाचे वरवंटे, पाटे, खलबत्ते घडवले. पुण्यात संसार मांडला, फुलला, स्वतःचं हक्काचं घर घेतलं" कधीही शाळेची पायरी न चढलेल्या हौसाबाई पैशाचा व्यवहार चोखपणे करतात. माझ्याकडे दुर्लक्ष करून ती गिऱ्हाईकडे लक्ष देऊ लागली. तिचं व्यवहारशास्त्र तिच्या मेहनतीचे फळ होतं. "व्यवसायाला लॉकडाऊन फटका कसा बसला?" असं मी प्रश्न विचारला. हौसाबाई म्हणाली, " काय सांगू बाबा! एवढा मोठा रोग मी कधी बघितला नाही. दुष्काळात माणसं शहराकडे धावत होती. कोरोनानं माणसं गावाकडे धावू लागली. आता वर्ष होत आलं. अजूनही माणसं गावाकडे हायती!"
पुढे म्हणाली, "महाकाय संकटामुळे आमचा धंदा कोलमडून पडला. परिस्थिती ओसरली असली तरी या धंद्यात म्हणावा तसा पैसा येत नाही. आता आमचा निभाव कसा लागेल..?" "असं का?" मी म्हणालो. "दगड काढणं, दगडाची गिट्टी फोडणं अशी सर्व कामं आज यंत्रानं होत आहेत. दगडाचं सर्व काम वड्डर समाजाच्या हातून निघून गेली आहेत. ज्याच्याकडं यंत्र आहेत. त्या महागड्या वस्तू म्हणून कोणी घेत नाही. काबाडकष्ट करून जगणाऱ्या या समाजाचं कसं होईल?" हौसाबाई आपल्या समाजाची चिंता बोलून दाखवली. 

वडार समाज गावगाड्यातील (जागतिकीकरणामुळे गावगाडा संपला आहे) एक महत्त्वाचा घटक आहे. हा समाज बांधकाम क्षेत्रात काही अंशी स्थिरस्थावर झाला असला तरी, गाव-खेड्यात राहणाऱ्या समाजाची अवस्था बिकट आहे. जे शहरात आले आहेत, त्यांच्या समोर नवीन आव्हाने उभे आहेत. हे हौसाबाईच्या कथेतून लक्षात आलं. 
 © विकास पांढरे बुधवार, ३ मार्च २०२१ पुणे

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आठवणीतला येळवस


आज आमच्या भागात (उस्मानाबाद) शेती मातीशी नातं सांगणारा 'येळवस'सण साजरा केला जातोय, यातून लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपल्या जात आहेत. या सणांविषयी मला नेहमीच आकर्षण राहिले आहे, गेल्या तीन-चार वर्षांपासून या सणाचा आनंद घेता आला नाही. यानिमित्ताने काही आठवणी ताज्या झाल्या.

मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्या दिवशी 'येळवस' सण साजरा केला जातो. गावातला जमीनदार, संपन्न शेतकरी, गरीब कुणबी, मजूर शेतकरी येळवसाचा सण जिव्हाळ्याने साजरा करतो.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरेमध्ये एक मिलाफ आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरा या मिळत्या जुळत्या आहेत. ह्या परंपरा शेतीशी निगडीत आहेत. थंडीचा महिना सुरू झाला की, पिकं पोटर्यात आले की आम्हा पोरांना 'येळवस'ची चाहूल लागायची, गावात कुंभार आला की या सणाची उत्सुकता शिगेला पोहोचायची, असा हा सण.

कृषी संस्कृतीतला एक महत्त्वाचा सण म्हणून ‘येळवस' ओळखला जातो. या सणात कुंभाराच्या मडक्यापासून ते रानभाज्या, फळापर्यंत समावेश असतो. येळवसाला लागणाऱ्या भाज्या आणण्यासाठी रानात जायाचो, भाजी खुडण्यासाठी आईला मदत करायचो, चिंचेच्या झाडावर चढून गाबुळ्या चिंचा काढायचो! गोड बोरीची झाड शोधायचो... 

आई सकाळी लवकर उठून मडक्यात आबिंल भरायची मडक्यात भरलेले अंबिल नानाच्या (वडील) डोक्यावर घेऊन शेतात जात.. शेतातल्या झाडाला कडब्याच्या पेंड्याची खोप करून बांधत असत आजही परंपरा अशीच आहे. समोर दगडाचे पाच पांडव व एक द्रौपदी ठेवत, या दगडाला चुना व कावाने रंगवले जात, दगड रंगवण्याचे काम माझ्याकडे असायचे. नवैद्य म्हणून भज्जी,अंबिल,बाजारीचे उंडे, भात, वांग्याचे भरीत, केळ आणि जांब पाच पांडवासमोर ठेवली जात. रानातल्या पिकांचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करायचो..


शेतकरी सुखा व्हावा, शेतात बरकत यावी म्हणून, "ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे ! यासाठी हर हर महादेव,चावर चावर चांगभलं ! म्हणतं एका ताब्यात आबिंल घेऊन रानभर पिकांवर शिंंपडायचो, रानात डोलणाऱ्या पिकांवर रोग पडू नये अशी यामागील धारणा आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार देवाच्या नावाने दुमदुमून जात, प्रत्येकाच्या शेतातून ही हाक कानी पडायची...


शेताजवळच्या म्हसोबाला...महादेवाला.. विहिरीला, बोअरला, इंजिनाला, पाण्याच्या मोटारीला, नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे असायची.

नैवेद्य दाखवली की, सगळेजण एकत्र बसून निसर्गाच्या सान्निध्यात जेवण करायचो, रात्रभर जागरण करून आई शेंग्याच्या पोळ्या, बाजरीचे उंडे, वरण भात, खिचडी, भज्जी तयार करून ठेवायची. मला भज्जी खूप आवडायची, आजही आवडते. ही भज्जी म्हणजे सर्व पालेभाज्या व फळभाज्या एकत्र करून केलेली भाजी होय. जेवण झाल्यावर प्यायला आबिंल मिळायचे, रानातचं आई दगडाची चूल तयार करायची, रानाल्या गवर्या गोळा करून एका मडक्यात दूध तापवायला ठेवायची.


दुपारच्या येळला दोस्तांबरोबर शिवारात मोहोळ झाडत फिरायचो, त्यासाठी सगळे शिवार पालथे घालायचो, एकदा मला म्हवळाची माशी चावली होती.. क्षणात डोळा सुजला.. तरीही धुराचा ठेंभा करून मोहोळ झाडतच फिरलो. यादिवशी मध खाल्ले पाहिजे अशी धारणा आहे.

कुणाच्या तरी शेतात हुरडा असेल तर याचाही आस्वाद घ्यायचो, विहिरीत पोहायचो, सुरपारंबा खेळायचो, विंडी दांडू खेळायचो..अशा कितीतरी आठवण आजही फक्त मनात घर करून बसल्या आहेत.
कडूस पडले की गावचा पाटील हेंडगा घेऊन मारुतीच्या देवळासमोर यायचा, गावातली सगळी पोरं गोळा व्हायची, हेंडग्याच्या पाठीमागे आम्ही पोरं उभे राहून चांगभलं म्हणतं, मंदिराला प्रदक्षिणा घालायचो,थंडीपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून मारुतीच्या देवळासमोर हेंडगा ठेवला जातो. कडूसं पडलं की एकेक शेतकरी रानातून घराकडे परतत असत, आबालवृद्धांच्या चेहर्यावर तेज दिसून येत असत.


निसर्ग आणि शेती यांच्यात आदिम नाते आहे. लोकसंस्कृती नेहमी निसर्गन्मुख जीवनशैलीतून साकार झाली आहे. शेतकरी नेहमीच मातीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगत आला आहे. पाणी, पशु - पक्षी, झाडे, नद्या यांच्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होते, याची जाणीव शेतकर्यांना असते.

म्हणूनच येळवस हा सण आजही टिकून आहे. त्याचे मूळ आदिम आहे. या सणाचे अंश आमच्या पिढीमध्ये पाझरत आहेत. म्हणूनच शहरात राहूनही, विज्ञानाने सारे कवेत घेतले असतानाही या सणांविषयी यत्किंचितही महत्त्व कमी झाले नाही. ही नाळ अधिकाधिक घट्ट राहील,अस प्रयत्न करत राहीन.
©विकास पांढरे
फोटो- समाज माध्यमातून
(५जानेवारी२०१९)

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

काठावर किती काळ असं बसायचं?


विकास पांढरे
आजचा ग्रामीण तरुण आळशी झालाय, तो शेती करत नाही, बायकोला मस्तपैकी कामाला लावून आपण मात्र स्टँडवर गप्पा मारत पत्ते खेळत बसतोय, अशी सध्या सोशल मीडियात साधकबाधक चर्चा होताना दिसतेय. यामध्ये ग्रामीण युवकांविषयी काही आशेची, विश्वासाची चार-सहा वाक्यंही वाचायला मिळतात. सारेच तरुण आळशी, चैनी, व्यसनी आहेत असं नाही. आज लाखो तरुण स्वतःच्या पायवर उभं राहून शेती-मातीच्या प्रश्नांना भिडताहेत, दुधासारख्या जोडधंद्यात चार पैसे कमवून आपलं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे असंख्य तरुण कमालीचे आळशी बनत चालले आहेत, त्यांना शेती कामाची लाज वाटतेय. आजचा ग्रामीण युवक मोबाइल युगात आकंठ बुडालाय असं चित्र जरी असलं, तरी वास्तव मात्र वेगळंच आहे.
त्रिं.ना. अत्रे यांचा 'गाव-गाडा' हा महाराष्ट्रीय ग्रामीण जीवनाचा समाजशास्त्रीय दस्तऐवज असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याला आता शतकभराचा काळ लोटून गेलाय. या ग्रंथातला गावगाडा आज राहिला नाही. बदलत्या काळानुसार गावगाडयात राजकारण, शेती व्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राहणीमान यात स्थित्यंतरं होत गेली. पूर्वीची आलुतदार, बलुतेदार मंडळी आता दिसत नाहीत. जागतिकीकरणामुळे शेती व्यवसाय तोटयात येऊ लागला. शहरातली व्यापारी मंडळी गावात येऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून नफा मिळवून देणारी शेती करताहेत. काही तरुण गावगाडयात राहून शेती करताहेत, काही तरुण शहरांकडे धाव घेऊ लागलेत, तर काही तरुण आळशी होत चालले आहेत. या तरुणाचं टोळकं सदोदित स्टँडवर, पारावर बसून बाष्कळ गप्पा मारतानाचं चित्र नजेरस पडतं.
सोशल मीडियातला ग्रामीण आळशी युवक
लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून सोशल मीडियाकडे अर्थात समाज माध्यमांकडे पाहिलं जातंय. अनेकांना वेगवेगळया विषयांवर अभिव्यक्त होण्याची संधी मिळतेय, अभिव्यक्त झालेल्यांना चटकन प्रतिसादही मिळतोय, ही एक सकारात्मक बाब आहे. सोशल मीडियातून ग्रामीण तरुणांवर चर्चा होताना दिसते आहे. ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चालला असून तो फक्त फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर रात्रंदिन पडीक असतो, तोंडात तंबाखू, मावा, डोक्यात नुसतं राजकारण, हातात कुणाचातरी झेंडा, बॅनरवरची पब्लिसिटी आणि नेत्याचा खांद्यावर हात असावा याला ग्रामीण युवक भविष्य म्हणून पाहतोय, घरातील स्त्री शेतावर राबत असताना हा आत्मा स्टँडवर उभा राहून आपल्या मानसन्मानाच्या गप्पा झोडत असतो, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या यात तो गुंग असतो, शेतात काम कर म्हटलं की नाक मुरडायला लगेच तयार असतो, अशा पोस्ट्स वाचायला मिळताहेत. यावरून ग्रामीण भागातील तरुण पिढी कशी बिघडत चालली आहे, हे लक्षात येतं. खरंच, ही पोस्ट सुसंगत आहे. सध्या गावगाडयात असंच काहीसं चित्र आहे. आज अनेक तरुण स्वतःचं सत्त्व हरवून बसलेत, व्यसनी बनले आहेत, शिवाय नेतेमंडळी तरुणांचा चांगला उपयोग करून घेताना दिसताहेत. ग्रामीण तरुणांची होणारी वाताहत चिंताजनक आहे. तरुणांच्या आळशीपणाला कोण जबाबदार आहेत, त्याची कारणं कोणती आहेत, यांचा संशोधनात्मक अभ्यास करताना कोणी नजरेस पडत नाहीत.
ग्रामीण युवकांची दुसरी बाजू
जागतिकीकरण, शेतीवरचं अस्मानी संकट, शेतीमालाचे घसरलेले दर आदी कारणांमुळे गावगाडा ठप्प होतोय. यामुळे छोटा शेतकरी नव्हे, तर अगदी मोठा शेतकरीही अडचणीत येतोय. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठया प्रमाणावर बेरोजगार होतोय. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागलेत. त्यामुळे खेडयापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनत चाललीय. गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून वेळेवर न पडल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. मान्सून ठीक तर गावगाडा नीट असतो. मात्र काही दशकांपासून असं काही घडताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण गावगाडयाचं स्वरूप बदलून गेलंय. काही शेतकरी काळया आईची इमानेइतबारे सेवा करताना दिसताहेत. पण पेरणीसाठी जेवढे पैसे खर्च झाले, तेवढे पैसे त्याच्या पदरात पडत नाहीत. त्यामुळे शेती हा आतबट्टयाचा व्यवहार झालाय. मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, घर-संसार कसा सांभाळायचा म्हणून असंख्य जीव झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करताहेत. हे दुःख उरात ठेवून आजचा तरुण वाममार्गाला लागतोय. स्टँडवर गप्पा मारणारे तरुण बहुतांशी सधन घरातले आहेत. प्रादेशिक भागाचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडयात गावंच्या गावं ओस पडलेली दिसतील. पोटासाठी सर्वांची धाव शहराकडे लागली आहे. जिथे मोठी धरणं आहेत, तेथे आणि साखरपट्टा समजल्या जाणाऱ्या प. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आळशी तरुणांचं टोळकं नजरेस पडेल. याच भागात आटपाडी, माण, खटाव, जत, सांगोला व मंगळवेढा भागात दुपारी गेला तर माणूसही नजरेस पडणार नाही. शेतकऱ्याचं सहा-सात वर्षाचं पोरगंसुध्दा शाळेच्या वेळेपर्यंत रानात बापाबरोबर राबताना दिसतं. शेर्डीकर्डीला गवत काडी आणतं. या सगळया गोष्टी बघायला गावात जावं लागतं. शहरात बसून चार-दोन टाळक्यांचं वर्णन करून संपूर्ण शेतकऱ्यांच्या पोराचं वर्णन करणं चुकीचं आहे. खेडयातला कोंबडा शहरात आरवत नसतो. तसं करायचं झालं, तर शहरातील पोरांबाबतही करावं लागेल. त्यामुळे सगळीच पोरं आळशी आहेत असं नाही. आजचा तरुण शेतकरी निसर्गाशी झुंज देत डाळिंब, द्राक्ष, संत्रे, आंबा अशा फळबागा पिकवत आहे. मात्र बाजारात बसलेल्या चोरांमुळे त्यांच्या घामाचा दाम चोरला जातोय. उधारीवर आणलेल्या कीडनाशकांचे व खतांचे पैसे देण्याइतपत त्याला या बागेतून मिळत नाहीत, तरीही तो आलेल्या संकटांशी सामना करतोय.
आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून
दुष्काळी नव्हे, तर बागायती भागातही तरुणांची परवड होते आहे. आज अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन नोकरीअभावी गावगाडयात खितपत पडताहेत. एक ना एक दिवस आपल्याला नोकरी लागेल, आपण शहरी बाबू बनू अशी त्यांना खात्री आहे. त्यांना शेती करणं कमीपणाचं वाटतं. इतकं शिकून परत मातीतच राबायचं तर शिकायचं कशाला? अशी त्यांची मानसिकता बनत चाललीय. मराठवाडयातल्या माझ्या एका मित्राची शेती आणि त्याचं शिक्षण बघून त्याला शेजारच्या गावातील मुलगी दिली, पण शेतीत त्याचं मन रमत नव्हतं. नोकरीसाठी सगळीकडे अर्ज करत होता. प्रत्येक वेळी संस्थाचालकांकडून डोनेशनची मागणी होत होती. शेवटी सततचा दुष्काळ, द्रारिद्रय आणि बेरोजगारी यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. अशा असंख्य तरुणांच्या व्यथा आहेत. नोकरी लागत नाही म्हणून हताश झालेल्या चांगदेव गित्ते या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी इथल्या तरुणाने चक्क फार्मसीची पदवी विकायला काढल्याची बातमी मध्यंतरी प्रसिध्द झाली होती. त्याची घरची परिस्थिती जेमतेम होती. शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने ती तोटयात आली होती. तरीही शिक्षणासाठी घरच्यांनी खर्च केला. मात्र शिक्षण घेऊन घरचा भार उचलता येत नाही, म्हणून हताश झालेल्या चांगदेवने डिग्री विकायला काढल्याची बातमी वाचनात आली होती. आजच्या घडीला असंख्य ग्रामीण तरुणांना नोकरी मिळत नाही. अनेक युवक आपला अमूल्य वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करताहेत. परंतु एवढं शिकूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांची समाजात अवहेलना होते. त्यामुळे तरुणांमधील व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय. काही तर जीवनयात्रा संपवताहेत. ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण शिकलेल्या मुलींना जोडदार मात्र खेडयातला तरुण शेतकरी नकोय. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय आतबट्टयाचा व्यवहार होत चाललाय, त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. त्यामुळे गावगाडयातल्या मुलीला शेतकरी नवरा नकोसा झालाय. आपला नवरा एखाद्या कंपनीत कमी पगारात काम करत असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे, अशी मुलींची आणि पालकांची मानसिकता बनत चालली आहे. एका सर्वेक्षणाच्या पाहणीतून सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात शेकडो तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावात तिशी उलटलेल्या तरुणांनी विवाहाची आशाच सोडून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमध्ये तब्बल 3 हजारांपेक्षा जास्त तरुणांचे विवाह रखडले आहेत. हे सर्व तरुण शेतीसंबंधित काम करताहेत आणि खेडयात राहतात म्हणून मुलींनी त्यांना नकार दिल्याचं समोर आलंय. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचंही दिसून येतंय. यातील अनेक तरुणांच्या कहाण्या काळजाच्या चिंध्या करणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य काय? या तरुणांचा आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि सरकारी व्यवस्था यांनी साथ नाही दिली, तर असंख्य ग्रामीण तरुणांची कशी वाताहत होतेय, याचं वास्तव चित्र यावरून स्पष्ट होते.
नवनवीन शिकाल तरच टिकाल
सरकार रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप यासारख्या नवीन उद्योग प्रणाली तरुणांना आकर्षित करताहेत. प्रत्येक ग्रामीण तरुणाने काळाप्रमाणे बदल करून बदलत्या जगाप्रमाणे आपणही अपडेट राहायला शिकलं पाहिजे, नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, तरच आपला निभाव लागणार आहे. आज नवनवीन कन्सेप्ट्स उदयाला येताहेत, त्या आत्मसात करायला शिकलं पाहिजे. गावात बसून शेतीपूरक व्यवसाय करता येतो, अशीही उदाहरणं आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांनी आळस झटकून नवा इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं आहे की, 'काठावर किती काळ असं बसायचं? त्यापेक्षा पोहणं शिकून घ्या. होडीचं कुणी सांगावं? ती परतेल, न परतेल....' ग्रामीण तरुणांनो, आळसाच्या काठावर किती काळ बसणार आहात? आता जागतिकीकरणाच्या समुद्रात पोहायला शिका, नाहीतर संकट आ वासून उभं राहील.
99970452767
विवेक मराठी  04-Sep-2017

मंगळवार, १० जुलै, २०१८

पुणतांब्याच्या पाऊलखुणा...!


एक गाव मनात घर करून राहिले आहे. ते मनातून जाता जात नाही. तिथला निसर्ग, तिथले ऐतहासिक,धार्मिक वैभव पाहताना सुखद अनभुव येतो. काही दिवसांपासून या गावाविषयी लिहावे असे  मनात घोळत होते,पण की-बोर्डवर उतरत नव्हते, या गावाला आपण विसरून तर गेलो नाही ना? असा भास झाला. आज पुन्हा त्या गावाची आठवण आली आणि लिहायला बसलो. आजच्या 'ग्लोबल' युगातले हे गाव काळाच्या ओघात आपल्या पाऊलखुणा जपत आहे. होय, मी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पुणतांबा ( ता.कोपरगाव जि.नगर) या गावाविषयी बोलतोय!

सा.'विवेक'च्या कामानिमित्त जानेवारी (सन २०१८)महिन्यात नगर जिल्ह्यात प्रवास करता आला. या प्रवासात 'पुणतांबा' या गावात जाणे झाले. अलीकडच्या काळात शेतकरी आंदोलनामुळे हे गाव प्रसिध्द पावले. माध्यमांतून या गावातल्या शेतकरी संपाविषयी, आंदोलनाविषयी बातम्या वाचायला मिळत होत्या. या गावात जाता येईल, असे वाटले नव्हते. जेव्हा या गावात उतरलो तेव्हा इथला शेतकरी कसा असेल? पीक-पाणी कसे असेल याविषयी मनात प्रश्न उभे राहिले. पण आंदोलनाविषयी कोणी बोलत नव्हते.

शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. रेल्वे मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाची उत्तम सोय आहे. गावाच्या अंतरंगात शिरू लागलो. तेव्हा पडझड झालेल्या तटबंदी दिसू लागल्या. संपूर्ण पुणतांबा गावाला तटबंदी आहे. ठिकठिकाणी वेशी दिसू लागल्या. या तटबंदी,वेशी आपल्या जुन्या आठवणी सांगत होत्या. अकरा वेशीने बनलेले हे गाव असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. माझ्या नजरतले असे हे पहिलेच गाव. गोदातरी वसलेल्या या गावाची कहाणी मला अधिक भावत गेली. मनात घर करत राहिली. बालकवींनी शब्दबध्द केलेल्या 'औदुंबर' कवितेची आठवण झाली. हिरवेगार शेतमळे, नागमोडी वळणे घेत घाट, मंदिराकडे जाणारी गोदामाईची पायवाट पाहताना मनात चैतन्य खळाखळते.  काळाश्या डोहात पाय ठेवताना मन पवित्र होते. गोदामाईचे पाणी गोड आहे. या गोडव्यामुळे या गावाला वैभव प्राप्त झाले असावे.
गोदातीर
 प्रतिष्ठित नागरिक सुभाष वहाडणे यांनी पुणतांब्याची सफर घडवली. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आणि गोदातीरावर हे गाव वसले आहे. विशेष म्हणजे या गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी राजा विक्रमादित्य यांची राजधानीचे हे गाव होते. अशी मौखिक माहिती मिळते. चांगदेव महाराजांची समाधी मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, मामा-भाच्याचे मंदिर, खंडोबा मंदिर,कालभैरव मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, संत गंगागीर महाराज मंदिर असे गावात जवळपास ४००पेक्षा जास्त पुरातन मंदिरे आहेत. संत साईबाबा व संत जनार्दन स्वामी यांचे काही वर्षे पुणतांब्यात वास्तव होते. पेशवाईच्या काळात या गावाला वैभव प्राप्त झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट व मंदिराची उभारणी करून गावाला धार्मिक वैभव प्राप्त करून दिले. आजही हे घाट व मंदिर सुस्थितीत आहे.

गावात आलुतेदार-बलुतेदार पूर्वीपासून गुण्यागोंविदाने राहतात. धनगरवाडा, कुंभारवाडा, बामणवाडा अशा वेगवेगळया आळया आढळतात. काळाच्या ओघात जीवनपध्दती बदलत गेल्यामुळे आळया ( गल्ली) हा प्रकार राहिला नाही. पुणतांबेकर, वहाडणे, शेंडगे, चितळकर, मुळे, रोकडे, कुलकर्णी अशा विविध आडनावाचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या २० हजारपेक्षा जास्त असली तरी शहराचे रूप गावाने पाघरले नाही. सका-सकाळी शेताकडे गुरे-ढोरे घेऊन जाणारे पशुपालक- शेतकरी नजरेस पडतात. गावात राष्ट्रीय व शेडयूल बँका आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्याची शाळा आहे. व्यापारी संकुल देखील आहे. सायंकाळी गावात भाजीपाल्याचा बाजार भरतो. भाजी विकण्यासाठी आसपासच्या गावातील शेतकरी पुणतांब्यात येतात.

पुणतांबा व्यापारी संकुल


पुणतांबा - भाजीपाला बाजार

मी पहिल्यांदा श्री.खड्गधारी खंडेराय मंदिरात गेलो. झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' मलिकेत या मंदिराचा उल्लेख आला होता. त्यामुळे या मंदिराविषयी उत्सुकता होती. मंदिर छोटेच आहे.

कृत युगात पुरातन काळी मनी आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी ऋषी मुनींचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मनिचल पर्वतावर मोठे युध्द केले त्या युध्दात मनी दैत्य शरण आले आणि मल्ल दैत्याचा वध झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या अवतरला मल्हारी मार्तंड असे नाव मिळाले. ती विजय तलावर (खड्ग) देवाने भक्तांसाठी पुणतांबा गावास भेट दिली आहे. त्यात त्यांचा अंश आहे. अशी अख्यायिका असल्याची माहिती पुजारी शेंडगे यांनी दिली.
खंडोबा मंदिरातील विजयी तलवार समवेत मी आणि सुभाष वहाडणे
गोदावरी नदीत मल्हारी मार्तंड अंघोळीसाठी गेले असता तिथे ही विजयी तलवार त्यांनी पाण्यात फिरवली. आज त्या ठिकाणी चौकानी आकाराचा खड्डा पडला आहे. खरेच, अशा प्रकारचा खड्डा गोदावरी नदीत पहायला मिळतो. मी जेव्हा विजयी तलवार हातात घेतलो ती खूपच जड होती. दोन्ही हाताने उचलावी लागली. तलावर उंची ७ ते ८ फूट असावी.

गोदातीराच्या बाजूला अंबाबाईचे पुरातन मंदिर आहे. एखाद्या राजवाडयासारखे दिसणारे हे मंदिर पर्यटकांना मोहित करते. मंदिराची इनामी शेती आहे. शेतीत विविध पीके घेतली जातात. मंदिराच्या जीर्णोद्वाराची माहिती एका शिलालेखाद्वारे मिळते. मंदिराची आतील बाजू तितकीची चांगली दिसत नसली तरी बाहेरून हे मंदिर बघण्याजोगे आहे.
देवी मंदिर
मंदिराच्या इनामी जमीनीत बहरलेले गव्हाचे पीक

नदीच्या तीरावर कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे. अहिल्यादेेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला. घडीव व कोरीव दगडाचे हे मंदिर आहे.मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही, त्याचे काही धार्मिक कारणे आहेत पण त्रिपुरारी र्पोर्णिमा व कृतिका नक्षत्रांत महिलांना देवाचे दर्शन घडते.  मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला नवग्रह मंदिराचे दर्शन घडते. काशीविश्वेश्वरांचे मंदिर ही सुस्थितीत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भलीमोठी पिंड आहे. नदीपात्रातील या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविक गर्दी करत असतात. दूरवरून ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलेला  दगडी पुल दिसतो. आजही हा पुल भक्कम स्थितीत आहे.
कार्तिक स्वामी मंदिर


काशी विश्वेश्वर मंदिर
पुरातन पिंड

ब्रिटिश कालीन रेल्वे पुल

पुणतांबा गावातच महायोगी चांगदेव महाराजांची समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज या गावातून गेले होते असे असल्याचे सांगण्यात आले. चांगदेवानी ज्यांना गुरू केले त्या संत मुक्ताबाईचे मंदिर इथेच आहे. या गावात मामा- भाच्याचे एक मंदिर आहे. मामा-भाचे या दोघांच्या प्रेमाची कहाणी इथे सांगितले जाते. देशात मामा-भाचे एक मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही.आगळेवगळे मंदिर असावे. सध्या या मंदिराची दुरावस्था झाली आहे. मंदिरातील मूर्त्या अडगळीला पडल्या आहेत. नंदीबैलाच्या मूर्तीची नासधूस झाली आहे. मंदिराची देखभाल करायला कोणी नाही.
चांगदेव मंदिर
समाधी दर्शन
मामा-भाचे मंदिर

अडगळीत पडलेली मूर्ती

मूर्तीची दुरावस्था

गावाची आध्यात्मिक परंपरा लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट बांधला आहे. हा घाट आजही उत्तम स्थितीत असून घाटावर उभारून गोदातीराचे विलोभनीय दर्शन घडते. घाटावर अनेक धार्मिक होतात. गावातच होळकरांचा मोठा वाडा आहे. आज या वाडयाची मोठी पडझड झाली आहे. होळकरांच्या वंशजांनी हा वाडा दुसऱ्या एका व्यक्तीला विकला असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले.

होळकर वाड्याची दुरावस्था


घाट

या गावाचे आणखीन वैशिष्टय म्हणजे दिवंगत संगीतकार सी.रामचंद्र, स्व.माजी खा.सूर्यभान वहाडणे, स्व.जगन्नाथ बारहाते, बाबुराव चतुर्भुज हे दोन माजी आमदार या गावातीलच होती. संगीतकार सी.रामचंद्र यांचे बालपण या गावतच झाले. ते ज्या वाडयात राहत होते. तो वाडा आजही सुस्थितीत आहे. आज या वाडयात त्यांचे पुतणे राहतात. माजी खा.सूर्यभान वहाडणे यांनी आपले कुलदैवत खंडेरायाचे मंदिर स्वतःच्या जागेत स्थापन केले आहे.

संगीतकार सी.रामचंद्र यांचा वाडा

सी.रामचंद्र यांच्या पुतण्यासमवेत


वहाडणे कुटुंबियांचे खंडोबा मंदिर

पुणतांबा गावाला जे वैभव प्राप्त झाले आहे. त्या वैभवाचे जतन व संवर्धन करणे आपली व सरकारची जबाबदारी आहे. पुणतांबा गावाचा विकास होण्यासाठी सरकारने हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आणले  पाहिजे. कारण इथला सर्व भाग हा पर्यटनाने व्यापला आहे. पुणतांब्याचे हे वैभव पर्यटकांना आकर्षित करील, हे मात्र नक्की.

-विकास पांढरे,९९७०४५२७६७

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

कहाणी एका शाकाहारी गावाची

 

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास, भूगोल आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्टयपूर्ण परंपरा अशी अनेक गावे जपत आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा परंपरा जपणाऱ्या गावांचा हेवा वाटतो. आज आपण परंपरेने शाकाहारी राहिलेल्या गावाची ओळख करून घेणार आहोत. धाराशिव जिल्ह्यात जोतिबाची वाडी हे गाव आहे. साधारण सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे. आजही या गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. वाचून आश्चर्य वाटले असेल, तरी हे सत्य आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्याची ऐतिहासिक व आध्यात्मिक अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला, येडशीतील निसर्गरम्य श्री रामलिंग देवस्थान, कुंथलगिरीतील जैन मंदिर, तेर, धाराशिव लेणी आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात. गेल्या दोन दशकांपासून हा जिल्हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देताना दिसतोय. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयांतल्या या जिल्ह्याच्या बातम्या माध्यमांत नेहमी वाचायला मिळतात.

जोतिबाची वाडी

जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथून 16 किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. साधारण सतराशे लोकसंख्या. गावात जोतिबाचे जागृत मंदिर आहे. 95 टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजाची चार घरे आहेत. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. गावातील साठ तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. 

निसर्गाची साथ मिळत नसली, तरी इथला शेतकरी समाधानी आहे. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातले तंटयाचे/मतभेदाचे विषय गावातच मिटविले जातात. आजपर्यंत कुणीही तक्रार नोंदविण्यासाठी  पोलीस ठाण्यात गेले नाही. सर्व जण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. गावात देशी दारूचे व बिअरचे दुकान नाही. मटनाचे दुकानही कोसावर कुठे लावण्यात आले नाही. त्यामुळे हे गाव आजही गुण्यागोंविदाने नांदत असताना दिसते. या गावात जुन्या पध्दतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक प्रमाणात पाणी आहे. गावकरी याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. दुष्काळात या आडाचे कधीही पाणी आटले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नाही.
जोतिबाच्या वाडीतील चित्र

जागृत मंदिर व शाकाहाराची आख्यायिका

जोतिबाची वाडी हे गाव दोन कारणांसाठी प्रसिध्द पावले आहे. पहिले कारण म्हणजे येथील बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्री जोतिबाचे जागृत मंदिर व दुसरे या मंदिरामुळे गावकऱ्यांची शाकाहारी राहण्याची परंपरा. मांसाहार करणे आरोग्यासाठी चांगले नाही या विचाराने गावकरी शाकाहारी राहिलेले नाहीत, तर गावाला असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठानामुळे ते मांसाहार करत नाहीत. त्यामागे एक कहाणी आहे. ही कहाणी आजच्या काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवतेला जोडणारा सेतू आहे.

कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून जोतिबाची वाडी येथील जागृत जोतिबा मंदिर देवस्थान ओळखले जाते. हे देवस्थान लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवास मांसाहार चालत नाही. दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी गावात मोठा उत्सव भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे माहात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. यात्रेला अहमदनगर, धाराशिव, बीडसह राज्यातील लाखो भाविक येतात.

 श्री जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. गावात अजूनही एकाही चुलीवर, गॅसवर व स्टोव्हवर मटन शिजलेले नाही. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी ज्येष्ठ नागरिक आबासाहेब पवार व शिक्षक शिवाजी भराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे जागृत मंदिर असल्यामुळे गावात कोणी आतापर्यंत कुणी कोंबडे व बकरे कापले नाही. जोतिबावर असलेली श्रध्दा ही आजपर्यंत चालत आली आहे.''

जोतिबाची वाडी निजाम राजवटीतले गाव. या परिसरातील गावांत रझाकाराच्या सैनिकांनी मोठा छळ केला. मात्र जोतिबाचे जागृत देवस्थान असल्यामुळे रझाकाराने या गावाला कधीही त्रास दिला नाही, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे व त्या श्रध्देपोटी गावकरी पिढयान्पिढया शाकाहारी राहिले आहेत. शाकाहाराची ही परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे, पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत.

रगावी जाऊन मांसाहार

संपूर्ण गाव शाकाहारी आहे. काही जण माळकरी आहेत. जे काही लोक आहेत, त्यापैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटन खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. असे लोक आंघोळ करूनच गावात प्रवेश करतात. पुणे-मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.

श्रावणमासातील तिसऱ्या रविवारी यात्रेचे स्वरूप

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या जोतिबाच्या वाडीत श्री जोतिबाचे जागृत मंदिर असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरला जातो. या दवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केलीहोती . श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. अर्धा कोटीच्या लोकवर्गणीतून जोतिबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

पंचक्रोशीत जोतिबाची वाडीचा लौकिक


जोतिबाची वाडी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने जरी लहान असले, तरी हे गाव शुध्द शाकाहारी गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. गावात व्यसनाचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आबासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. या छोटयाशा गावातून एवढया मोठया संख्येने भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन आजूबाजूच्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दर वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. या निमित्ताने स्पर्धेकरिता उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू या छोटयाशा गावात येतात. या स्पर्धेमुळे अनेक गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे.

काळाच्या ओघात जोतिबाची वाडीच्या ग्रामस्थांनी शाकाहारी राहण्याचे वेगळेपण आजही जपलेच आहे, शिवाय पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचेही कार्य ते करत आहेत. जोतिबाची वाडीचे कार्य अनुकरणीय आहे.

विकास पांढरे

99970452767
 (सदर लेख साप्ताहिक विवेक, वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे.)

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

प्रतापगडचा अविस्मरणीय अनुभव

मी आजपर्यंत बोटावर मोजण्याइतके प्रेक्षणीय स्थळे व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. त्यामध्ये नळदुर्ग, परंडा, औसा, दौलताबाद (देवगिरी), सिंहगड ऐतिहासिक गडकिल्लाचा व महाबळेश्वर,पाचगणी आणि येडशी येथील निसर्ग सौंदर्याचा समावेश आहे. परवा 'विवेक'समूहाबरोबर महाबळेश्वर-वाई-भिलार-प्रतापगडची सहली केली.

महाबळेश्वर मधले फिरणे.. थंडगार हवा.. अद्भभूत स्पाँट.. जितका आनंद तितकाच कमी.. देशातले पहिले पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारगावाची भेटही नव्या विश्वात घेऊन जाणारी ठरली.प्रतापगडची सहल माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. मराठी मुलुखावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्याच्या पायथ्याशी केला. त्यामुळेच लहानपणापासून 'किल्ले प्रतापगड'ने मनात घर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असलेल्या 'प्रतापगड'च्या पायरीला मस्तक ठेकताना अंगावर काटे आले आहे.

                                                               इतिहासात डोकावताना 

चंद्रराव मोरे याचा पराभव करून छ.शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तेव्हा नीरा आणि कोयनेच्या काठावर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जावळीच्या खोऱ्यात असलेल्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा शिवाजी महाराजांनी मोरोपंतांनी दिली. मोरोपंतांनी आपले कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद किल्ला तयार केला. हाच तो प्रतापगड. पार आणि किनूश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्लाची बांधणी झाली आहे. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा प्रचंड विस्तार आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे.


या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाढत चालली शक्ती पाहून १६५७ साली आदिलशहाने वाईचा सरदार अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराज आपल्या गमिनी काव्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.  खानाचा साथीदार सय्यद बंडा यांने राजेंवर तलवार उगारली तेव्हा जिवा महाला या धाडसी मावळ्यांने सावधगिरीने सय्यद बंडाला मारले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा"या म्हणीच्या रूपाने गडाचा इतिहास अजरामर झाला आहे. त्याचे इतिहासात वर्णन आहे. 

                                    
                                                                                      सफर 

प्रतापगडची सफर पायथ्यापासून सुरू होते. गडाच्या खाली डाव्या बाजूला दर्गा शरीफला जाण्याची एक पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर.



 सध्या येथे पोलिसांचा पहारा असल्यामुळे येथे जाता येत नाही. त्यामुळे दूरवरून फोटो घेता आला. किल्लाचा थोडा पायथा चढून वर गेल्यावर महाद्वार लागतो.श्री तुळजाभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. आज गडावर छोटे गाव वसले आहे


प्रतापगडावरून सह्याद्रीचा अद्भभूत निसर्ग पाहता आला. सह्याद्रीच्या कुशीत गडावरचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहतोय. 'हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी' ची गुंज दऱ्याखोऱ्याला जागी करते. पुन्हा पुन्हा इथल्या मातीला, इथल्या निसर्गाला,  इथल्या पशुपक्ष्यांन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देते.

                                                                    शिवकालीन शौचालये 

       किल्ल्याची पाहणी करताना माझ्यातला पत्रकार जागा झाला. कोणकोणती कामे सुरू आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. किल्लात सध्या विविध कामे सुरु आहेत. चाळीस वर्षापूर्वी किल्ल्यावर वीज कोसळल्याने एक तटबंदी कोसळली आहे. या तटबंदीचे काम होणे आवश्यक आहे पण फार जिकिरीचे हे काम आहे. गडाच्या माथ्यावर असलेल्या ध्वजस्तंभापर्यंतचा रस्ता सध्या माती आणि दगडाने भरून गेला आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली पायऱ्या आहेत. या पायऱ्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
  या ढिगाऱ्याखाली शिवकालीन जातं निघाले आहे.  विशेष म्हणजे, किल्ल्याची जी तटबंदी आहे. त्या तंटीबंदीमध्ये जवळपास दीडशेहून अधिक शौचालयाचा शोध लागला असल्याची माहिती अभियंता अमन कांबळे यांनी दिली.




आज लोकांना शौचालयाचे महत्त्व किती आहे  कळू लागले आहे. ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर शिवकालीन शौचालयांची निर्मिती केली होती. हे पाहून मी भरावून गेला. किल्लात अनेक ठिकाणी शिवकालीन पाण्याच्या टाक्या आहेत.त्याचा शोध घेणे सुरू आहे.

                                                         ७२ वर्षाचा उत्साही गाईड 

 शिवकालीन इतिहासापासून ते प्रतापगडाच्या पायथ्थापासून ते माथ्यापर्यंत,  इंत्थभूत माहिती असणारा एकमेव गाईड म्हणून जनार्दन जंगम (पाटील) उल्लेख केला जातो. या माणसाचे सध्याचे वय आहे बहात्तर. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ ते गाईडशीप करत आहेत. सध्या ते विद्यमान सरपंच आहेत. ५० वर्षापूर्वी किल्ल्याची माहिती कशी द्यायची याविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, साहित्यिक गो.निं.दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

गाईडशीप करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळ्या भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. विविध प्रांतांतून, देशांतून आलेल्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत ही माहिती दिली तर इतिहास जास्त कळतो,असे गो.निं.दांडेकर म्हणायचे, त्यासाठी मी मराठी, हिंदी, कन्नड, पंजाबी, तेलगू, कच्छ या भाषेतून मार्गदर्शन करतो असे जनार्दन जंगम (पाटील) यांनी सांगितले.गाईड जनार्दन पाटील यांच्या तोंडून प्रतापगडाचा इतिहास समजावून घेणे, हाच मुळी मोठा आनंददायी, माहिती आणि ज्ञानात भर टाकणारा असतो. त्यामुळे पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील बरचसे पर्यटक गाईड म्हणून पाटील यांना पसंती देतात.


जनार्दन पाटील हे अर्धशतक प्रतापगडाशी एकरूप झाले आहेत. यामुळेच सत्तरीतही तरूणांना लाजवणारा अखंड उत्साह त्यांच्याजवळ आहे. किल्ल्यावर चढणे,खाली उतरणे ही मोठी कसरत असते. हा अवलिया बहात्तराव्या वर्षी ही कसरत लिलया पार करतोय. मर्द मावळ्याचे रक्त काय असते हे गाईड जनार्दन पाटील यांच्याकडे पाहून लक्षात येते. पुरातत्व विभागाने त्यांना गाईडशीपचे अधिकृत ओळखपत्र दिले आहे. या अवलियाची माझी भेट झाली हाच एक अविस्मरणीय अनुभव होता.

महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो हे आमचे भाग्य आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजासारख्या महापुरुषांच्या पराक्रमी वास्तुला स्पर्श होणे म्हणजे परमोच्च आनंद. या महापुरुषांच्या पराक्रमाचे जागर करणे हे आमचे कर्तव्य आहे नव्हे ते आद्यकर्तव्य आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, ३ जुलै, २०१७

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव!




तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. संत तुकाराम महाराज यांनी आपल्यासमवेत 1400 वारकरी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आता याच वारीचे रूप दिवसेंदिवस वाढतच आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या दिंडयांची संख्या लक्षणीय होत आहे. या वर्षी राज्यभरातील तब्बल 331 संख्या सहभागी झाल्या आहेत.

देहू म्हटले की संत तुकोबाराय डोळयासमोर येतात. वारकरी संप्रदायातील त्यांचे स्थान अढळच आहे. त्यांच्या घराण्याची पांडुरंगावरची श्रध्दा पूर्वावर चालत आली आहे. पांडुरंगाने विश्वंभरबाबांना दिलेल्या दृष्टान्तातून विठ्ठलभक्तीचे महत्त्व लक्षात येते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सान्निध्याने पुनित झालेल्या देहू गावात असंख्य दिंडया सहभागी होऊन पंढरीकडे प्रस्थान करतात. देहू ते पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये 331 दिंडया सहभागी झाल्या आहेत. सोहळयाचे हे 332वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळयात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झालेले आहेत. देहू गावाच्या दिंडीचे स्वरूप, वारीची परंपरा, इतिहास, जोडणारे संत, व्यवस्थापन कसे असते? याविषयी घेतलेला धांडोळा...!

दिंडीचे स्वरूप

दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा समूह. महाराष्ट्र व बाहेरून अशा हजारो दिंडया एकत्र येऊन पालखी तयार होते. तशी प्रत्येक संतांची पालखी वेगळी असते. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायी पायी चालत जातात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक 'वीणेकरी' असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेकऱ्यानंतर टाळकऱ्यांचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे 5 ते 10पर्यंत ध्वज असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष, काही वेळा आख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होत आहे. ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात, त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात.

दिंडीचा इतिहास

पंढरीची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु, पंढरपूरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. याविषयी संतसाहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे एके ठिकाणी सांगतात - ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, तर त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची मिराशी होती. ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून पंढरीच्या वारीला जाण्याचा प्रघात होता. परंतु, पहिली दिंडी ही पंढरपुराहून आळंदीला आली आहे. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा मनोदय जेव्हा व्यक्त केला, तेव्हा संत नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार, नरहरी सोनार आदी संत मंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या गावाहून, म्हणजे पंढरपुराहून संत मंडळी माउलींच्या समाधी सोहळयासाठी आळंदीस आले. ज्ञानेश्वर माउलींच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता, पण दिंडी नव्हती. आता दिंडी सुरू झाली आणि ही पंढरपुरी पायी जाणारी मंडळी दिंडीत सहभागी झाली. त्या काळच्या साधू-संतांनी हा प्रघात चालू ठेवला. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर आदी संत परंपरेने हा पुण्यमार्ग वाढविला.

देहू संस्थानाचा इतिहास


धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटीवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. देहूला असे आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान लाभले आहे.

आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमच्या गावी आलो असल्याचे सांगून देव आंब्याच्या वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंब्याच्या वनात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल-रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात मूर्तींची स्थापना केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. प्रतिवर्षी देवाचा महोत्सव होऊ लागला. महोत्सवाच्या खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुध्द एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभरबाबांचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्रवृत्तीकडे वळले.

तुकाराम महाराजांची वारी

तुकोबारायाचे घराणे सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढयान्पिढया विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती, साव-सावकारकी, व्यापारधंदा होता. दोन वाडे होते. एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या अठव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्नीचा मृत्यू. ते घरदार सोडून संन्यासी झाले होते.

पुढे दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहत झाली. गुरेढोरे मेली. साव-सावकारकी बुडाली. व्यापार धंदा बसला. लोकांतील मानमान्यता गेली. प्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने मृत्यू झाला. त्यामुळे तुकोबाही एकांतात राहू लागले. भंडारा येथील डोंगरात पांडुरंगाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगदोध्दाराकरिता कवित्व करण्याचे काम सांगितले. पुढचा इतिहास आपणास ज्ञात आहे. गावातील विठ्ठल मंदिराचा जीर्णोध्दार केला.

संत तुकाराम महाराज आण्ाि हजरत महंमद शेख

श्रीगोंदा येथील हजरत महंमद शेख हे मुस्लीम विचारवंत होते. त्यांची आणि संत तुकाराम महाराजांची घनिष्ठ मैत्री होती. हजरत शेख महंमद हे कुरआन प्रवचन करायचे. त्याला संत तुकाराम महाराजांची आवर्जून उपस्थिती असायची. कुरआनचे कित्येक दाखले तुकारामांच्या गाथेत अभंग स्वरूपात सापडतात. त्यांची ही मैत्री त्यांच्या मृत्यूनंतरदेखील टिकून आहे. देहू गावातून निघणारी दिंडी आजही श्रीगोंदा येथे शेख महंमद यांच्या दफनस्थळी तीन दिवस मुक्कामाला असते, इतका हजरत शेख महंमद यांचा मान आहे असा काहीसा संदर्भ मिळत आहे.

तुका झालासे कळस

संतकृपा झाली, इमारत फळा आली

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस

संत ज्ञानदेव व नामदेव महाराज पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी अधिष्ठान दिले. नामदेव महाराजांनी संप्रदायाची खरी ओळख पंजाबपर्यंत पोहोचवली, तर तुकोबा महाराज या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले. तुकोबांनी आपल्या अभंगातून लोकांचे प्रबोधन केले. पंढरीच्या पांडुरंगांची त्यांनी भक्ती केली नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंगाला खडे बोल करणारे पहिले संत होत.

तुकोबांच्या वैकुंठगमनानंतरची वारी

तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली आणि त्यानंतर वारीच्या परंपरेची आणि सांप्रदायाची धुरा तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून 'ज्ञानोबा-तुकाराम' असे भजन करीत पंढरपूरला जाण्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली आणि वारीला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले. तेव्हापासून ज्ञानोबा-तुकाराम भजनाची निर्मिती झाली. आजतागायत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या नामघोषाने भजनपरंपरेची सुरुवात होते. पालखी सोहळा वाढल्यानंतर दोन्ही पालख्या विभक्त झाल्या. पुढे हैबतबाबा यांनी ज्ञानोबारायाची पालखी सुरू केली.

दिंडयांच्या संख्येत वाढ

संत तुकाराम महाराज यांनी आपल्यासमवेत 1400 वारकरी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आता याच वारीचे रूप दिवसेंदिवस वाढतच आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या दिंडयांची संख्या लक्षणीय होत आहे. या वर्षी राज्यभरातील तब्बल 331 संख्या सहभागी झाल्या आहेत. पालखी रथाचा मान यंदा वडगाव मावळ येथील बाबुराव वायकर यांच्या 'थैमान-संज्या' या आणि वाडे बोल्हाईच्या पंढरीनाथ तुकाराम पठारे यांच्या 'सोन्या-हिरा' या बैलजोडीला प्राप्त झाला आहे.

दिंडीचे व्यवस्थापन

वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातला अलौकिक असा हा वारीचा सोहळा जगाच्या कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. दिंडीचे व्यवस्थापन हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

दिंडीचा एक कार्यक्रम निश्चित केलेला असतो. पालखी निघण्यापूर्वी जेव्हा माउलींच्या पादुकांची पूजा केली जाते, तेव्हा पालखी निघण्याची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी पाच-दहा मिनिटांच्या अंतराने तीन वेळा कर्णा होतो. पहिला कर्णा झाला की वारकारी निघण्याच्या तयारीला लागतात. अशा प्रत्येक गोष्टीचे अचूक नियोजन करण्यात येत असते. दिंडीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्यासाठी आर्थिक व्यवस्थापन करणे आवश्यक असते. संत तुकाराम महाराजाची पालखी ही स्वयंपूर्ण आहे. धान्य, रॉकेल, सरपण, चहापान, दूध, कपडे, इतर वस्तू, हे सामान वाहून नेणाऱ्या बैलगाडीच्या व रथाच्या बैलास कडबा, पेढया, पेंड लागते. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली असते.


दिंडीतील चोपदार

चोपदार हा दिंडीचा मुख्य व्यवस्थापक. मखमली कापडाचा अंगरखा, डोक्यावर फेटा आणि खांद्यावर चांदीचा राजदंड, असा चोपदारांचा पोषाख असतो. व्यवस्थापनाची सर्व कामे तो करतो. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात परंपरेने चालणारी परभणीतील पाथरी तालुक्यातील माई दिंडी, बीडची कानसूरकर दिंडी आणि अंबेजोगाई येथील देशमुख दिंडी या तिन्ही दिंडयांचे चोपदार हे सोहळयातही प्रमुख चोपदार म्हणून सेवा देत आहेत. यामध्ये माई दिंडीचे ह.भ.प. काकामहाराज गिराम हे सेवा देत असून, त्यांची ही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील निवृत्तीमहाराज व आजोबा यांनीही सेवा दिली. कानसूरकर दिंडीकडून कानसूरकर सेवा देत असून, अंबेजोगाई येथील देशमुख दिंडीकडून देशमुख मंडळींची सेवा सुरू आहे. तर, काळूस येथील नारायण खैरे हे संस्थानचे चोपदार म्हणून सेवा देत आहेत. त्यांचीही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील शंकर लक्ष्मण खैरे यांनी चोपदारकी केली.

दिंडीतील वीणेकरी

वीणेकरी हा दिंडीतील प्रमुख. वारकऱ्यांना वीणा प्रिय आहे. 'तो' विठ्ठलाचे रूप आहे. ती वीणा असे वारकरी म्हणत नाहीत. 'तो' वीणा असे म्हणतात. दिंडी निघताना वीणेची पूजा करतात. विणेकरी विठ्ठल होतो. तो दिंडीचे नेतृत्व करतो.

दिंडीतील हरकरा

हरकरा म्हणजे काम करणारा हरकाम्या. दिंडीतील हरकरा पुढे पत्र घेऊन जातो. तो तेथील सर्व प्रमुख मंडळींना भेटतो. दिंडीचे आगमन, निवास, भोजन, कीर्तन, प्रवचन, पूजा, आरती व मिरवणूक अशा सर्व बाबींचे व्यवस्थापन करतो.

दिंडीतील रिंगण

दिंडीचा प्रवास सुरू असताना वारकरी थकतात. ही मरगळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी 'रिंगण' नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मेंढयाचे रिंगण, अश्वरिंगण, उभे रिंगण आदी रिंगण प्रकार होतात. हे ठरावीक गावातच होतात. उदा., अश्वरिंगण इंदापुरात होते. यात आधी झेंडेकऱ्यांचे, तुळशीधारक महिलांचे, विणेकरी व नंतर मानाच्या अश्वाचे रिंगण असा कार्यक्रम साधारणत: असतो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काटेवाडी गावात दाखल झाल्यावर पहिले रिंगण मेंढयाचे असते. या वेळी परीट समाजाकडून धोतराच्या पायघडया घालून स्वागत करण्याची परंपरा आहे. 136 वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

दिंडीचे बदलते स्वरूप

देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे दिंडीच्या बदलत्या स्वरूपाविषयी बोलताना म्हणाले, ''वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. इतक्या समूहाने समाज एकवटत आहे. त्याचे नेतृत्व करणारा एकमेव विठ्ठल आहे. ज्ञानोबा माउली आणि तुकोबा - एक या वारीचा पाया आहे, तर एक कळस आहे. एक ज्ञानाचा राजा आहे, तर दुसरा जगद्गुरू आहे. या वारीमध्ये तरुणांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वारीमध्ये असलेला तरुणांचा सहभाग आध्यात्मिकतेला वाव देणारा आहे.''

विकास पांढरे , 9970452767

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

दिंडेगावचा प्राचीन वारसा


प्राचीन संस्कृतीचे संदर्भ दाखवणारे दिंडेगाव ( ता.तुळजापूर ) येथील अत्यंत सुंदर बांधकाम असलेले यादवकालीन शिवशंकर व कालभैरवनाथ मंदिरास भेट देण्याचा योग आला. हे गाव 'संत शिवरामबुवा 'यांच्या सान्निध्याने नटलेले आहे. पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त म्हणून शिवरामबुवाची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी विठ्ठल भक्तीचा अविष्कार दाखविला. पुढे मराठवाडय़ाची 'धाकटी पंढरी' म्हणून या गावचा लौकिक वाढला. महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भााविक मोठ्या संख्येने येत असतात.


या गावावर वारकरी संप्रदायाचा जसा प्रभाव आहे. तसा इथला प्राचीन वारसा आपल्या अस्तित्वाताच्या पाऊलखुणा जपत आहे. राजा रामदेवराय यांच्या मंत्रीमंडळातील हेमाद्री पंडित नावाच्या प्रधानांनी या दोन प्राचीन मंदिराची उभारणी केली असल्याची अख्यायिका स्थानिक नागरिकांकडून ऐकायला मिळाली.

काळभैरवनाथ म्हणजे शिव शंकराच्या जटा मधून निर्माण झालेले अष्टभैरव. त्यातीलच हा एक काळभैरवाचे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन असून गावाचे ग्रामदैवत आहे. श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे.



मंदिराभोवती फिरत असताना असे दिसून आले की, हे मंदिर हेमांडपंथी पध्दतीच्या स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून कलावैभव, सौंदर्य आणि चौरसाकृती छत ही मंदिराचे वैशिष्ट्ये. शिवाचे उग्ररुप असणारा कालभैरवनाथ हा भीषणाचे प्रतिक मानले जाते. तर शंकर हे अनचा उग्ररुप आहे. अनु म्हणजे विध्वसंक, रौद्ररुप दाखवणे हा आहे. या दोन्ही मूर्तीच्या पाठीमागे भीषण व रौद्ररुप दाखवणे हा मूर्तीच्या निर्मितीमागचा उद्देश असावा, असे दिसून येते.


शिवलिंग
गाभाऱ्यातील शिवलिंग प्रचंड आकाराचे असून, मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर विविध कलात्मक मूर्त्या आहेत. मंदिराचा गाभारा भव्य असून त्याचबरोबर दगडावर कोरल्या गेलेल्या शिल्पकृतीमध्ये देव आणि दानव यांच्यातील युद्धाच्या प्रसंगांचे चित्रण करण्यात आले आहे. यावरून राजा रामदेवराय यांच्या सामर्थ्याचे, संपत्तीचे, शिवभक्तीचे चित्र स्पष्ट होते.


आकर्षक मूर्ती

मंदिराच्या भिंतीवर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. उत्कृष्ट भित्तीचित्रे, प्रमाणबध्द शरीरे, बोलके डोळे, भावपूर्ण चेहरे, सुचक हालचाली व विविध विषयांवरून त्या काळातील चित्रकलेच्या विकासाच्या प्रगतीचे आपल्याला ज्ञान होते. या मूर्त्या उत्कृष्ट कलाकुसरीने युक्त अशा प्रभाव लयाने अंगालि चिकटून बसलेल्या पारदर्शक वस्त्राने व उष्णीवात गोळा केलेल्या विशिष्ट केशरचनेमुळे कलात्मक नयन मनोहर व चित्ताकर्षक हालचालींमुळे मूर्तीच्या चेहऱ्यावर अध्यात्मिक भाव दिसून येतो. त्यामुळे या मूर्ती आजही सजीव वाटतात.



आजच्या सारख्या क्रेन्स, ट्रक्स नसतानाही त्या काळातील चित्रकार, मूर्तीकारांनी एखाद्या प्रचंड शिळीची ने -आण करुन मंदिराची निर्मिती कशी केली असेल याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. भारतीय समाजातील चढ-उतारांचा साक्षीदार असलेली ही दोन मंदिराच्या आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. काळभैरवनाथ व शंकर देवाचे मंदिर दिंडेगावचे भूषण नाहीतर संबंध मानव जातीचा वारसा ठरतील आशा आहेत.

काळाच्या ओघात मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीना तडे पडले असून पुढील काळात मंदिर पडण्याची भीती आहे. पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण  हा प्राचीन वारसा इतिहासाचे संशोधन करणाऱ्या संशोधकास नक्कीच संशोधनाचा विषय ठरू शकतो.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७ 



कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...