ना वेळ ना काळ...
तू चोरपावलासारखा येतोस
अन् सर्वस्व हिरावून घेतोस
तुझा कालचा गारपिटीचा मारा मात्र अस्वस्थ करणारा होता
उभं पिकं क्षणात आडवं तिडवं केलंस
थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा मारल्या
कुठं तासभरात काश्मीर अवतरलं
विदर्भ, मराठवाड्यात तसं नकारात्मक दिसतं,असो
तुझ्या येण्यानं कुठं माणसं मेली, कुठं जनावरे दगावली, कुठं गहू लोळला तर कुठं हरभरा भिजला, कुठं तुरीचं ढीग झालं, कुठं आब्याचं मोहोर गळलं, ज्वारीचं तर अथंरुणच झालं
मी मात्र गुडघ्यात डोकं घालून तासनतास एकटक बघत होतो
आता कुठे वर यायची स्वप्ने बघत होतो
दिवसरात्र राबराब राबून हाडाच काडं केलं होतं
वाटलं होतं यंदा तरी सुगीचे दिवस येतील ?
खळ्यावर टाकलेली ताडपत्री सांगत होती, गारपिटीच्या तडाख्यात आपलं स्वप्नंही झाकलेलं
चर्चेचा काटा ग्लोबल वाँर्मिगकडे वळतोय
मला मात्र विज्ञानतलं कुठं कळतंय, गारांचा पाऊस मात्र माझा जीवघेणा खेळ करतोय
या प्रवासात अनेक स्थित्यंतरे पाहिली
जुना भारत आणि नवा भारत
या दोन देशांना जोडणारा
पूल म्हणजे माझी पिढी
ग्लोबलायझेशनचा जन्म पाहिला
पुढे वर्षे उलटली
धक्के,चटके बसले,ते सोसले
मल्टी नँशनल कंपन्या उभ्या राहिल्या
वारूळातल्या कोट्यावधी मुंग्या बाहेर पडल्या, नजरेत नजर घालून पुढे जात होत्या
मी मात्र तसाच उभा होतो- बुजगावण्यासारखं
आजही तसाच...!
ना थंडीची,ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची
शेतीच्या संकटातून रोज नव्याने संधी शोधून होतो
आता तर वाटेवर गारपिट नावाचा ऋतूचा जन्म होतोय
आता सरकारी यंत्रणेकडून मोजदाद होईल
वरून खाली, खालून वर पाहिलं जाईल
राजकारणी मात्र नेहमीप्रमाणं डाव साधतील
शेतकरी हेच सत्तेचे सूत्र समजतील
सोबत बदलत्या हवामानाचा फैलाव आहेच..!
आता कोणत्या सृजनाची वाट पाहू ?
गारपीटसह इतर मरणकळा कुठवर सोसणार
आता मलाच बदलावे लागणार
ध्येयाची क्षितिजे मलाच बदलावी लागणार
कवी : विकास पांढरे, मुंबई
९९७०४५२७६७
( टीप : 'मरणकळा' ही माझी आजवरची दुसरी कविता. त्यामुळे कविता लेखनाचे तंत्र जमले असेल नसेल तरी त्यातील भाव लक्षात घ्यावा, आवडल्यास शेअर करावे,सोबत सुचनांचे स्वागत आहे.)
