![]() |
कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंचलकरंजी इथल्या दिव्या मगदूम हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. नवऱ्याने सोडून दिलेली म्हणून तिची अवहेलना व्हायची.आज ती परित्यक्ता, कुमारी माता आणि घटस्फोटित महिलांसाठी मायेची सावली बनली आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या सुलतानी धोरणा विरोधात पंचगंगेत आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांच्या समस्यांना वाचा फोडणारी रणरागिणी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. रणरागिणी क्रांती सेना व छत्रपती शासन महिला आघाडीच्या माध्यमातून ती खंबीरपणे नेतृत्व करतीये.
दिव्या ऊर्फ शंकुतला ही वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावाची. गोरा रंग, चेहऱ्यावर तेज, करारी बाणा या गुणवैशिष्ट्यांमुळे ती सर्वांना आपली वाटते. पण तिच्या वाट्याला जे दु:ख आले; ते ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात. ती शोषित असली तरी अन्याय सहन न करणारी आहे. ती एकटी असली तरी ती असंख्य एकल महिलेची साऊली आहे.भय,भीती,भोग,बाईपण हे सर्व तिने सोसले आणि भोगले आहे. या भयाला न डगमगता ती स्वतः च्या पायावर उभी आहे.
दिव्या आपली दिव्यकहाणी सांगताना म्हणाली, "घरची गरीबी. शाळा नीट शिकता आलं नाही. न्हानं आलं तवा बापानं लगीन लावून दिलं. तवा मी १४ वर्षाची असेन. २००२ साल असावं. माहेरात जे सुख मिळालं नाही ते नवऱ्याच्या घरात मिळेल या आशेवर सासर जवळ केलं. पाणावलेल्या डोळ्यांनी माहेर सोडलं; त्याच डोळ्यांच्या धारांनी पुन्हा माहेरी परतावं लागलं. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाच काय? माझं नशीबचं फुटकं. नवी नवरी म्हणून सासरी आली तवा ना नवऱ्याकडून, ना सासू सासऱ्याकडून चांगली वागणूक मिळाली. सर्व सोसत, दु:खाला हसतमुखाने कवटाळत राहिले. तीन-चार महिन्याचे गरोदर होते, तेव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आयुष्यात काहीही भोगायचं शिल्लक ठेवलं नाही ते भोग माझ्या वाट्याला आलं होतं.
आता जायचं कुठं? आईबापाचं अस्सं.. शेवटी मी घरी आले एकदाची. लहान मुलासारखे रडत बसायची. जवळ पैसे नव्हते.कधी कधी जीव देऊन मरुन जावं असं वाटायचं. पोटात गोळा वाढत होता. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. जीवन एकलकोडं होऊन गेलं होतं. मी अगदी ठरवून टाकले होते. जे काय संकट आहे ते आनंदाने स्विकारायचं.
आयुष्याच्या एका टप्प्यावर चांगली माणसं भेटत गेली. त्यांना मला भेटू दिलं. आता जगायचं तर आपल्या बाळासाठी! तेवढाच विरंगुळा. जीव जगण्यासाठी धडपडत होता, ओढ घेत होता.त्यावेळी 'सोडलेली बाई' म्हणून आयाबायाकडून मला हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांच्या नजरा वाईट असायच्या..न डगमगता, सहन करत पुढे जात राहिले. 'अमन नागरी विकास' संस्थेच्या माध्यमातून बचत गटाचे काम करू लागले. सूर गवसला. पैशाची बचत होत गेली. विस्कटलेली घडी सावरू लागली.
तेराशे बचतगटांची स्थापना
महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण होते, हे दिव्याने अल्पावधीतच हेरले.
दिव्या म्हणाली, "बचत गटामुळं असंख्य महिला भेटल्या. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला दिसल्या. या वाटेत अनेकजणी ओळखीच्या झाल्या. त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले. तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेराशे बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच ते सहा लाख महिला बचतगटाशी जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांचा संपूर्ण व्यवहार पारदर्शी असतो"
'जिव्हाळा'ने दिला जगण्याचा आधार
कोल्हापूर जिल्ह्यातील पीडित, शोषित, निराधार, घटस्फोटित महिलांना जगण्याचा आधार मिळावा म्हणून दिव्या मगदूम हिने २०१८साली खोतवाडी येथे जिव्हाळा आश्रमाची स्थापना केली. या माध्यमातून सुमारे तीस महिलांचे पालन केले.
वयोवृद्ध महिला,अपंग महिलांच्या आरोग्याचा प्रश्न स्वतःच्या खर्चातून सोडवण्याचे कार्य तिने केले. शिवाय आश्रमातील महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी लघुउद्योग सुरु केला. बचतगटाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था केली."आश्रम चालवणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी पुरेसा पैसा आणि शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. मला कोणाचेही मदत मिळाली नाही. आश्रम चालवण्या इतपत माझी आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे मला आश्रम बंद करावा लागला. पण आश्रमातील सर्व महिलांना योग्य ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले आहे. या महिलांशी माझं जिव्हाळाशी नातं निर्माण झालं होतं पण परिस्थिती अभावी त्याचं पालन करू शकले नाही" अशी खंत दिव्या हिनी व्यक्त केली.
२२विवाहितेचा सुखाचा संसार उभा
दिव्या हिचं काम केवळ बचतगटापुरते मर्यादित नाही ती महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा पुकारते, संघर्ष करते, न्याय मिळवून देते.
दिव्या म्हणते, "पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढले,जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना केली. या माध्यमातून २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला. माझ्याकडं असंख्य महिला येत असतात, आपली गऱ्हाणी सांगतात. अशिक्षित, अल्पशिक्षित, गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या वाट्याला अनेक दु:खे येतात. त्यांना ना समाजाचे सहकार्य मिळते ना शासनाची मदत. या महिलांची घुसमट ओळखून मी रस्त्यावर उतरते"
दिव्याचे काम आज १३ जिल्ह्यात पसरले आहे. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी लढणारी रणरागिणी बनली आहे.
मायक्रो फायनान्स विरोधात लढा
२०१९ साली कोल्हापूर जिल्ह्याला महापूरचा मोठा फटका बसला. या संकटामुळं सर्वसामान्याचे जगणे मुश्कील झाले असताना मायक्रो फायनान्स या कंपनीने जिल्ह्यातील बचत गटातील महिलांकडून सक्तीचे कर्जाची वसुली केली. कंपनीच्या सुलतानी कारभारात विरोधात दिव्याने लढा उभारला आणि तो राज्यभर गाजला.
याबाबत सांगताना ती म्हणाली, " माझा हा लढा केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हता तर संपूर्ण राज्यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचतगटांना नियमबाह्य कर्ज देऊन सक्तीची वसुली सुरू केली होती. गोरगरीब महिला माझ्याकडे येतं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू वाहत होते. एकीकडे निसर्गाने दगा दिला होता तर दुसरीकडे फायनान्स कंपनी सूड उगवत होती. त्यामुळं मी याविरोधात आंदोलन केले. माझ्या महिला कार्यकर्तीनी पंचगंगेत उडी मारली. कार्यकर्त्यांच्या सजगतेने त्या वाचल्या. पालकमंत्री ते मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करून कंपनीची चौकशी सुरू आहे. यातून बचतगटातील महिलांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे"
छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना
दिव्या हिच्या कामाचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसा तिचा लोकसंग्रह वाढू लागला. दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी तिला पक्षात स्थान देऊन मतांसाठी वापर करून घेतला. खुर्चीचा हव्यास, घाणेरड्या राजकारणाला कंटाळून तिने २०२० साली छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १६८ शाखांत आघाडीचे काम सुरू आहे. जवळपास अडीच लाख महिला दिव्याच्या कामाशी जोडल्या गेल्या आहेत.
छत्रपती शासन महिला बँकेची स्थापना
ग्रामीण महिला, शोषित, पीडित, घटस्फोटित, एकल महिलांना अधिकाधिक बचतीची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कळावे आणि त्यातून स्वावलंबी बनव्यात यासाठी दिव्या मगदूम हिने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१३ एप्रिल२०२१) बचत गटातील महिलांना एकत्रित करून छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आहे.
दिव्या सांगते, " बचत गट व छत्रपती शासन महिला विकास आघाडीच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध करुन देणं एवढेच माझं उद्दीष्ट नसून, त्यांना स्वावलंबनाकडं, आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा माझा उद्देश आहे"
कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीब कुटुंबाचे व वंचित समाजबांधवांचे हाल होऊ नयेत, म्हणून छत्रपती शासन महिला आघाडीने योग्य ती खबरदारी घेतली आहे.टाळेबंदीत सेवा बजावत असलेल्या पोलीस बांधव व अन्य घटकांना भोजन पुरवण्यात येत आहे, असे दिव्या हिने सांगितले.
कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या रणरागिणीला सदिच्छा
© विकास पांढरे, ९९७०४५२७६७



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा