सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ‘गोंदवले खुर्द’ या गावातील रोहित आणि रक्षिता बनसोडे या बहिण भावांची जोडी गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या माण परिसरातील माळरानावर वनराई फुलवण्यासाठी झटत आहे.
अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते‘ या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन रोहितने वनसंवर्धनाचे काम हाती घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी सुरू झालेल्या श्रमदानाचे हे व्रत गेली चार वर्षे सतत सुरू आहे. दररोज आपल्यासोबत श्रमदानासाठीचे साहित्य कुदळ, खोरे, पाण्याची बाटली घेऊन त्याचा हा प्रवास सुरू आहे. यात त्याची बहिण रक्षिताची साथ मिळाली. या भावडांनी मिळून उजाड माळरानावर आतापर्यंत पाच हजाराहून जास्त झाडे लावून वनसंवर्धनाचे मोठे कार्य केले आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी दूरदूरवरून डोक्यावरून पाणी वाहून झाडांना पाणी घालून झाडे जगवली आहेत. या भावडांच्या ध्येयवेड्या कामामुळे आज गोंदवले गावाच्या माळरानावर हिरवाई नटल्याचे सुंदर दृश्य नजरेस पडते.
विशेष म्हणजे, या भावडांनी आपल्या श्रमदानातून ३५ सीसीटी बांध आणि एक माती बांध तयार करण्याचे अवघड कार्य या दोघांनी पूर्ण केले आहे. या बांधामध्ये सुमारे १ कोटी लिटर पाणी मुरेल इतकी क्षमता आहे. हे कार्य करत असताना रोहितला अनेक संकटांशी सामना करावा लागला. एकदा त्याच्यावर लांडग्यांचा हल्ला झाला. त्यातून तो बचावला.
रोहित आणि रक्षिता यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संस्था व संघटनांकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
“प्रत्येकाला जास्तीजास्त नैसर्गिक प्राणवायू मिळवून देण्यासाठी, सर्वांना मोकळाश्वास उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीजास्त झाडे लावून ती जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पावसाळ्यात सर्वांनी झाडे लावण्यासाठी पुढे आले पाहिजे, किमान स्वतःसाठी लागणारे आँक्सिजन निर्माण करण्यासाठी आपल्या उपलब्ध परिसरात जास्तीजास्त झाडे लावण्यावर भर देऊ”
रोहित बनसोडे
रोहित आणि रक्षिता शंकर बनसोडेची ही छोटेशी गोष्ट वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून देतेच शिवाय पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्यासाठी प्रेरणा ही देते.
- विकास पांढरे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा