१७२४ ते १९४८ याकाळात भारतात हैदराबाद (निजाम) संस्थान कार्यरत होते, असे असले तरी मध्येच १८५३ ते १८६० या दरम्यान नळदुर्ग जिल्हा ( सध्या उस्मानाबाद जिल्हा) हा तैनाती फौजेच्या महसुलीच्या बदल्यात इंग्रजांना देण्यात आला होता. त्यामुळे साहजिकच या भागाशी काही काळापुरता का होईना इंग्रजांशी या ना त्या कारणांमुळे संबंध आलाच. काही इंग्रज अधिकारी, लेखक या भागात येऊन गेले होते असे अनेक ऐतिहासिक संदर्भ सापडतात.
तुम्हाला 'द स्टोरी "द स्टोरी ऑफ माय लाईफ','टिपू सुलतान' 'तारा','सीता','नोबल क्वीन','द पीपल ऑफ इंडिया', 'कन्फेशन ऑफ ए ठग' या पुस्तकाचे लेखक माहिती असतीलच ना? बरं, पुढे सांगतो..जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेणी जगापुढे आणणारे हेच ते ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले फिलीप मेडोज टेलर.
घरच्या गरीब परिस्थितीमुळे ते भारतात आले. तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य सचिव विल्यम न्यूहॅम यांनी हैदराबाद संस्थानचे रेसिडंट सर चार्ल्स मेटकाफ यांच्या शिफारशीने फिलीप टेलर यांची निजामाच्या औरंगाबाद येथील सैन्यात लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली (१८२४). येथील कार्यकाळात त्यांना कॅप्टन, कर्नल आदी पदांवर पदोन्नती मिळाली. पुढे कर्नाटकातील निजामाच्या अखत्यारीतील शोरापूर या संस्थानात पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.
येथील यशस्वी कामगिरीमुळे त्यांची नळदुर्ग जिल्ह्यात प्रशासक म्हणून नियुक्ती झाली (१८५३-५७). कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून जरी त्यांची ख्याती असली, तरी स्थानिक लोकांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांनी फारसी व भारतीय भाषांवर प्रभुत्व मिळविले ; त्याचबरोबर भारतीय चित्रकला, मंदिरस्थापत्य व संगीत या विषयांमध्ये त्यांना विशेष आवड होती.
नळदुर्ग जिल्ह्याची प्रशासक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी दळणवळणच्या फारशी व्यवस्था नसलेल्या,शांत वातावरण व हिरवाईने नटलेल्या एका टेकडीवर टेलरने काही काळ वास्तव केले, त्या ठिकाणाच्या परिसरास आज 'टेलरनगर' नाव पडले आहे.
होय,हे सत्य आहे. तुळजापूर तालुक्यातील इटकळ गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या 'टेलरनगर' गावाच्या नावातील व्युत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा शोध थेट महान लेखक फिलीप मेडोज टेलर यांच्या नावाशी साधर्म्य साधताना दिसतोय.
टेलरनगर हे एका ऐतिहासिक पाऊलखुणाचे साक्षीदार आहे. साधारण ४०० ते ५०० लोकसंख्या असलेले हे छोटेसे गाव. शंभर एक वर्षांपूर्वी याठिकाणी घनदाट जंगल होते. यामुळे इथे वाटमाऱ्या व्हायच्या. दिवसा इकडे कोणी फिरकत नसत.
निजामकालीन इटकळ पोलीस ठाण्याच्या पोलीस या ठिकाणी पहारा देत असत, असं स्थानिक नागरिक सांगतात.
मेडोज टेलर नळदुर्ग वास्तव्यास आले तेव्हा त्यांना इटकळ परिसरातील टेकडीचे रम्य वातावरण आवडले आणि काही काळ त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले, असं स्थानिक लोकाचं म्हणणं आहे.
या टेकडीवर महादेवाचे एक मंदिर आहे. या मंदिराच्या इतिहासावरून गावाच्या पाऊलखुणा अधिक स्पष्ट होतात. आजूबाजूला दिसणारा हिरवागार निसर्ग मनप्रसन्न करतो. त्यामुळे टेलर साहेब या ठिकाणी रमले.
विशेष म्हणजे निजामशाहीच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी नवीन आयुष्य अनुभवले. या काळात त्यांना लेखन,भाषा, चित्रकला शिकण्यासाठी मोकळा वेळ मिळाला. त्यामुळे शांत, निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी त्यांची प्रतिभा अधिक फुलून यायची. त्यामुळे स्थानिक लोकांनी तर टेलरला महादेवबाबा हे टोपणनाव दिले होते. येथूनच नळदुर्ग- तुळजापूर-उस्मानाबाद, सोलापूर-अक्कलकोट असा त्यांचा प्रवासाचा मार्ग असायचा. त्यामुळे इटकळ येथे विश्रामगृहे बांधण्यात आली. विशेष म्हणजे इटकळ येथील निजामकालीन पोलीस चौकीच्या विश्रामगृहांनी शंभरी पूर्ण केली आहे.
"टेकटीवर टेलर यांचा नियमित प्रवास होत असे. कालांतराने इटकळ, अरबळी,येवती,काटगाव आदी ठिकाणवरचे स्थानिक शेतकरी, पशुपालक टेकडीच्या बाजूला वस्ती करुन राहू लागले. याठिकाणी टेलर साहेब पूर्वी राहत असल्यामुळे ही वस्ती 'टेलरनगर' नावाने ओळखू लागली. महान लेखक फिलीप मेडोज टेलर यांचे नाव आमच्या गावाला असल्याचे पाहून मोठे समाधान वाटते" असे टेलरनगरचे पोलीस पाटील विजय वाघमारे यांनी सांगितले.
"फिलीप मेडोज टेलर याठिकाणी वास्तव्यास होते असा अंदाज बांधणे कठीण असले तरी त्यांचा एकूण इतिहास पहिल्यानंतर असे लक्षात येते की, लेखन व शिकारीचा छंद जोपासण्यासाठी ते याठिकाणी येत असावेत" असा अंदाज काटगाव येथील शिक्षक महादेव पाटील यांनी व्यक्त केला.
टेलर साहेबांच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर या परिसराविषयी आणखीन माहिती मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.
टेलरनगरचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर इटकळ, खानापूर, काटगाव, अरबळी,दिंडेगाव या पाच गावाच्या सीमेवर वसलेले छोटे गाव तयार झाले आहे. गावाला मेडोज टेलरचा इतिहास सोडला तर बाकी कोणताही इतिहास नाही. स्थानिक लोक हे आजूबाजूच्या गावातून आलेले आहेत. गावाला वेस नाही, जुने दगडी घरे नाहीत. एकेकाळी झोपडीवजा हे गाव होते. आता लोकांचे जीवनमान उंचावले असल्याने पक्की घरे बघायला मिळतात. सध्या वाघमारे, पटेल, मकानदार, गवळी, गायकवाड आडनावाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे.
तुळजापूर- इटकळ मार्गे- अक्कलकोट देवदर्शनासाठी कधी तुम्ही याल वाटेत या गावाची पाटी तुम्हाला अवश्य नजरेस पडेल तेव्हा फिलीप मेडोज टेलरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
विकास पांढरे
मु.पो.इटकळ ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद
संपर्क-९९७०४५२७६७




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा