तो दिवस आजही मला स्पष्टपणे आठवतोय. त्या दिवशी घरात एक नवीनच असा प्रसंग घडत होता. तो आमच्या वाट्याला कधीही असा आला नव्हता.. त्या प्रसंगाने आई आणि नानाच्या चेहर्यावर ‘हसू आणि अश्रू’ हे दोन्ही भाव दाटून आले होते. घरातला एक आर्थिक कोपरा ढासळू पाहत होता. नाना पहिल्यांदाच घरात असं येरझार्या मारत होता... नानाच्या पायाला पाणी सुटलं होतं..घराच्या भिंती ओल्या झाल्या होत्या. सारखं ट्रगतलं कागद शोधत होता.. त्या ट्रगतले छोटे छोटे कागद काढत होता.. पण एक कागद सापडत नव्हता म्हणून आतून चिडत होता..
त्या कागदाच्या माध्यमातून आपण घरातली एक मौल्यवान वस्तू विकतोय या विचारानं नाना एकदम बैचेन झाला होता.. या सगळ्या प्रसंगामुळे आमच्या रोजच्या जगण्यातले क्षण विखुरले गेले होते.. त्याला कारण ही मीच होतो..
****
माझ्यामुळे आई आणि नानाला खूप वनवास सोसावा लागला. मी लुळा होऊन पडलो होतो.. माझा इलाज व्हावा म्हणून नाना रोज एका दवाखान्यात जात होता.. आठवड्यातून तीन-चार वेळा सोलापूरला नाना मला घेऊन जात असे.. डॉक्टर माझी नाडी बघत, आणि पैसे उकळत.. हे रोजच होत चाललं होतं.. माझ्यात कसलाही फरक जाणवत नव्हता. ‘आपलं पोरगं आज ना, उद्या तुरूतुरू चालेल, उठेल!’ या आशेने नाना दवाखान्याला पाण्यासारखा पैसा ओतत होता..
डॉक्टर म्हणायचे, ‘मुलगा बरा व्हायचा असेल तर त्याच्या पायाचे ऑपरेशन केलं पाहिजे. त्यासाठी दहा-पंधरा हजार रूपये लागतील..’
डॉक्टराचे म्हणणे ऐकून नानाची कंबर बसली होती. एवढे पैसे आणायचे कुठून? शेतीचा काही आधार नव्हता..ना कुठल्या रोजगाराचा.. ना घरात कुणी कमावत.. पै-पाहुणे ही मदतीला धावून येतील अशी त्यांची ही परिस्थिती नव्हती.. आता काय करावे? या विचाराने नाना अधिकच चिंतेत पडला होता.
दुपार झाली होती.. माथ्यावर आलेला सूर्य अधिकच चटका देत होता..दावणीला बांधलेली जनावरं हंबरंडा फोडायला लागली होती. जनावरांना चारापाणी करून येतो, म्हणून नाना, शेताकडे गेला.. जनावरांना लवणाला पाणी पाजून, त्यांना चिंचेच्या झाडाखाली बांधली. नानाच यात कशातच मन लागत नव्हतं. शेवटी घराकडं घासभर खाऊन येण्यापेक्षा आंब्याच्या झाडाखाली येऊन बसला.
दिवस मावळतीला आला.. रानात चरायला गेलेली गुरे-ढोरे गावाच्या दिशेने निघाली होती.. नाना मात्र माझ्याच विचारात गुंग होता. या विचाराच्या तंद्रीने नानाला अस्वस्थ करून टाकलं होतं.
गावातल्या सावकाराला एकरभर शेत विकायचं आणि माझं ऑपरेशन करायचं! असं नानाच्या मनात घोळू लागलं. पदारात चार लेकरं आहेत.. पुढं त्याचं कसं व्हायचं? शेवटी काही तरी केलेच पाहिजेच ना.. हा इचार सतत नानाला भेडसावत होता.
आपली 'शेतीमाय' इकायची नाही, असं दुसरं मन ही नानाला सावरत होतं. मागचा-पुढचा इचार करत नाना मोठ्या कष्ठानं घेतलेलं दुर्गाच्या (नळदुर्ग) तुळजाभवानी साखर कारखान्याचं ‘शेअर्स’ विकायचं मनात ठरवलं. नानाला हा इचार पटला हेाता. यातून आपलं काही मोठं आर्थिक नुकसान होणार नाही. असे मनोमनी नानाला पटले. यामुळे नानाला मोठा धीर आला होता.
सांज झाल्यावर नाना घराकडं आला.. आई चुली समोर बसून काठवटीत भाकरी थापत होती. ती कोरडं पिठं पसरून दोन्ही हात काठवटीत गोल गोल फिरवत बडबड करत होती.
कवा आलावं? ‘कायबी करा माझं पोरंग चांगलं करा...’
नानाचा चेहरा हळवा झाला होता.. ‘माझ्या चितेला अग्नि देती का आता?’ ‘मला काय समजत नाय? रानात गेलो तर,तिथं मन लागतं नाय? माळावर जनावरं राखायला घेऊन गेलो की तिथं बी करमत नाय?’ ‘पोराचं कसं होईल? हाच इचार मनाला सतावत हाय?’
नाना गहिवरून म्हणाला..
नानाचं आणि आईचं थोडं ‘तू तू मैं मैं झाली..’
मी कारखान्याचं शेअर्स इकायचं ठरवलंय? गावात कुणी शेअर्स घेतं का बघून येतो. नानाच्या मनाच्या मोठेपणाचं आईला कौतुक वाटलं. आपल्या पोराच्या सुखासाठी बापाचं काळीज सुपाएवढं झालेलं पाहून आईला मनोमन आनंद झाला होता.
***
नानाला, ना दारूचे व्यसन होते ना, कसल्या विकाराचे..पण माझ्यामुळे नानाला चितेंच्या विकाराने ग्रासले होते. आपण शेअर्स विकतोय? यात कोणी फसवणुक करू नये? यासाठी सल्लामसलत म्हणून जाणत्या माणसाकडे जाऊन विचारपूस केली. आपण 'शेअर्स' विकतोय कारणामुळे नानांनी पाच-सहा रात्री जागून काढल्या असतील.
नानाची अशी धावपळ सुरू झाली होती, दरम्यान एक दिवस आमच्या शेताच्या बाजूल्या असलेल्या एका कारखान्याच्या मालकाला आमच्या घरची होणारी तारांबळ लक्षात आली. नानाची आणि त्या मालकाची अगोदरपासून ओळख होती. दुपारच्या वेळेस त्या मालकांनी नानाला ऑफिसमध्ये बोलवून घेेतले. मालकांनी माझ्या पायाची विचारपूस केली. त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल निश्चित राहा, असं बोलून, मालकांनी नानाला धीर दिला.
मालकाच्या धीराच्या बोलण्याने नानालाही थोडं बरं वाटलं.
दत्तोबा, ‘तुमची परिस्थिती लक्षात घेता मी शेअर्स घ्यायला तयार आहे.’, असं मालक म्हणाला.
नानाला, शेअर्स विकतोय? हे मालकाला कोणी सांगितलं? याचा थांगपत्ता लागला नाही. आपल्या संकटात, देवच आपल्यासाठी धावून आला. या विचाराने नानांनी मालकाला शेअर्स विकत असल्याचा होकार दिला.
‘सध्याची शेअर्सची किंमत पाहता मी दहा हजार रूपये द्यायला तयार आहे.’, असं तो मालक म्हणाला.
नानाला ही रक्कम कमी वाटली.
‘मालक दहा हजार रूपयांत पोराचं ऑपरेशन कसं होणार? सोलापूरचे डॉक्टर म्हणतायेत, ऑपरेशनसाठी कमीतकमी पंधरा हजार रूपये लागतील.’ असं नाना मालकाला म्हणाला.
मालक म्हणाला, दत्तोबा, ‘तुम्हाला एवढे पैसे कोणी देणार नाही. तुमची नड पाहून मी तुम्हाला जास्तीचे पैसे देतोय. त्यापुढे मला जास्त किंमत देता येणार नाही.’
नाना या गोष्टीला तयार होत नव्हता. त्यासाठी मालकानी नानाला आपल्या स्वतःच्या कारने सोलापूरला घेऊन गेला. नानाला माझ्या पायाच्या ऑपरेशनसाठी ओळखीच्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचे आश्वासने दिले. त्यामुळे नानाला थोडा धीर आला.
नानाचा बदलेला मूड लक्षात येताच मालकाने एक संधी साधली.
दत्तोबा, ‘‘शेअर्स विकून काय होणार नाही. तुझं साळीचं तुकडं मला विक..पाच-पन्नास हजार सहज देईन. तुझी, यातून सहज गरज भागेल.. शिवाय शिल्लक राहिलेल्या पैशातून घरासाठी काही करता येईल?'’
नानाला मालकाचा हा 'भांडवली डाव' लक्षात आला. संकटात असलेल्या माणसाचा 'धुर्त माणसं' कसं फायदा उचलतात, हे नानाच्या लक्षात आले.
‘‘मालक आम्ही गरीब असलो, म्हणून काय झालं? आता आमची नड हाय,म्हणून कारखान्याचे शेअर्स इकतोय. कारखान्याकडून हा शेअर्स घेताना मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. डगमगलो नाही, मी खरा शेतकरी आहे. शेती आमची माय आहे. या मायेला तुमच्या स्वाधीन करणं माझ्या इचारत नाय. तुम्ही माझं शेअर्स विकत घ्या अथवा न घ्या. मला त्याची पर्वा नाय.. मी दुसरा चांगला माणूस शोधतो.. तो घेईल माझं शेअर्स..’’
नानांची ही खंबीरता लक्षात आल्यानंतर त्या मालकाने आपला विचार बदलला आणि शेअर्स घेण्यासाठी स्वतःहून नानांपुढे विणवणी करू लागला. नानाचा स्वभाव दिलेला शब्द पाळणारा होता. रितसर पध्दतीने नानांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले ‘शेअर्स’कवडीमोलाने त्या मालकाच्या घश्यात घातले.
नाना मनातल्या मनात पुटपुटत होता, कस काय? आपण या मालकाच्या साखळीत अडकलो हे कळलेच नाही? आयुष्यात 'परवड' झालेल्या माणसाला कोणकोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. हे ह्या प्रसंगावरून नानाच्या लक्षात आलं होतं.
माणसाला आपलं मिळालेलं आयुष्य गोड मानून 'तडजोड' करत जगता आलं पाहिजे, असं म्हणतं नानांनी त्या मालकासोबत ‘शेअर्स' बद्दलचा व्यवहार पूर्ण केला. आज त्या शेअर्सची किंमत 'लाखात' आहे, असं थोडं लक्षात आलं की मागचं सारं आठवतं राहतं.
(अपूर्ण )
विकास पांढरे -९९७०४५२७६७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा