शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

उद्याचा दुष्काळ टाळण्यासाठी...



राज्यावर अस्मानी संकट उभे राहिले आहे.पिके करपली आहेत, पाणी आटले आहे, जनावरांचा चारा महागला आहे, दावणीचे गुरे सांभाळणे मुश्किल झाले आहे, शेतकऱ्यांचे मने कोमजली गेली आहेत. सरकारपुढे आव्हान उभे राहिले आहे. दुष्काळ सांगून येत नसला तरी तो आमच्याच वाट्याला का येतोय? यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. उत्तरे शोधली पाहिजेत, नाहीतर येणारा काळ आपणाला माफ करणार नाही.

सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाची गडद छाया आहे. १८० तालुक्यात अस्मानी संकट उभे राहिले आहे. रब्बीची जमतेम पेरणी झाली आहे. खरीप हाताला लागणे कठीण आहे. मराठवाड्यात ही भीषणता अधिक आहे. काही गावात पाणीटंचाई सुरू आहे. परंड्यात पाच रूपयेला घागरभर पाणी मिळत आहे. राज्यात लातूरसारखी परिस्थिती उद्भभवू शकते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता उर्वरित जिल्ह्याला काही प्रमाणात दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात  फळबागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपडतोय. सध्याचा काळ कठीण असला तरी हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी शर्थीचे प्रयत्न करतोय. अशीच भीषणता एप्रिल-मे पर्यंत राहिली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार आहे. हे वर्ष उजाडले की लगेचच लोकसभा-विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे दुष्काळ हा राजकारणाचा मुद्दा बनेल.दुष्काळाला मूठमाती देण्यासाठी कुणाचेही लक्ष नसेल. आता सजग नागरिकांनी पुढे आले पाहिजे, दुष्काळावर विजय मिळवला पाहिजे.

आपल्याच वाटयाला दुष्काळ का येतोय?

 मानवी जीवाला जगण्यासाठी निसर्ग, पाणी व माती हे तीन घटक अतिशय महत्वाच्या असतात. नैसर्गिक घटक जिवंत असतील तर मानवी जीवन सुखकर असते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीतून वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचे महत्व विशद केले आहे.

नगरेची रचावी ! जलाशये निर्मावी
महावने लावावी ! नानाविधे

१२व्या शतकात जे ज्ञानेश्वर महाराज यांनी कळले होते ते समजून घेण्यासाठी आपल्याला ८००वर्षे लागत आहेत. आज पाणी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे.आपल्याकडील काही राज्यकर्त्यांनी लहान मोठ्या जलाशयांची, कालव्यांची, धरणांची, बारवांची सामाजिक गरजेनुसार निर्मिती केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ब्रिटिश राजवटीत १८६७साली स्वतंत्र पाटबंधारे विभागाची स्थापना झाली. १८७०मध्ये कृष्णा कालवा सिचंन कामाला सुरूवात झाली. महाराष्ट्रातील पहिले सिंचन प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात लहानमोठ्या मिळून ४००च्या आसपास नद्या आहेत. गोदावरी, तापीसारख्या नद्यावर धरणे उभारली गेली आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात निम्यांहून अधिक धरणे आहेत. तरीही या राज्याच्या वाटयाला दुष्काळ असेल तर तो दुष्काळ अस्मानी नसून तर नियोजनाचा, सरकारी अनास्थेचा दुष्काळ आहे. गोदावरी नदीवरच केवळ दोनच ठिकाणी पाणी अडविले जाते. बाकीचे पावसाचे पाणी आंध्र -तेलंगणामध्ये जाते. कृष्णा आणि भीमा नदीचे हे असेच आहे. या नद्यांचे पाणी कर्नाटक जाते. उन्हाळा आला की महाराष्ट्र कोरडा असतो. त्यामुळे ना जनावरांना पाणी मिळते ना नागरिकांना. पुन्हा दुष्काळ जाहीर करावा लागतो, असे कित्येक वर्षांपासून चालत आले आहे. ना निसर्गाचे पाणी अडवता येते ना धरणातल्या पाण्याचे नियोजन करता येते.

आपल्या देशात सरासरी ५०से.मी पाऊस पडतो. बदलत्या हवामानांमुळे हे प्रमाण कमी झाली आहे, असो. इस्त्रायल हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षा खूप लहान देश आहे. या देशात केवळ १६से.मी इतकाच सरासरी पाऊस पडतो. तरीही हा देश अन्नधान्य आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. कृषि क्षेत्रात अव्वल तर दुध उत्पादनात अग्रेसर आहे. इतकेच नव्हेतर धान्य निर्यातही एक पाऊल पुढे आहे. भारतात पावसाचे प्रमाण सरासरी ५० से.मी म्हणजे इस्त्रालय देशाच्या पाचपट असूनदेखील आपल्याकडे दरसाल दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी इस्त्रायल धडपडत आहे. ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करून शेती क्षेत्रात अभिनव प्रयोग घडवून आणण्यात आहे. इस्त्रायल मध्येही दरसाल दुष्काळ पडतो. हा देश दुष्काळाचे राजकारण न करता शाश्वत सिंचनावर विचार करतात, त्यासाठी सर्व क्षेत्रातील जाणते एकत्र येतात, चर्चा करतात, कायदा करतात. आपल्याकडे असे का होत नाही?  एका अभ्यासाद्वारे असे लक्षात आले की, भारतात ४००दशलक्ष हेक्टर पाऊस पडतो व २०दक्षलक्ष पाऊस हेक्टर पाणी बाहेरून वाहून येते या ४२०दक्षलक्ष लिटरपैंकी नद्यांमध्ये १६०व ६७दक्षलक्ष हेक्टर लिटर पाणी भूजलाच्या रूपात आहे. २४७ दक्षलक्ष हेक्टर पाण्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याच्या वापराबद्दल व पाण्याच्या दुरूपयोगात भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे पाणी वापराबाबत या देशात एकसारखा कायदा नाही.यावरुन आपण इस्त्रायलपेक्षा किती मागासलेले आहोत हे लक्षात येते. म्हणूनच आजपर्यंत भारत दुष्काळावर मात करू शकला नाही.

आपल्याकडे भूगर्भाताील पाणी उपसव्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळेच देशातील पाणी प्रश्न अधिक बिकट बनला आहे. आपल्यासारख्याच दक्षिण अफ्रिकेत दुष्काळ पडतो. या देशाने १९९८ साली नॅशनल वॉटर ऍक्ट तयार केला आहे. या ऍक्टनुसार गंभीर दुष्काळ पडला असला शेतीला पाणी वापरता येत नाही. लोकसंख्येच्या मागणीनुसार पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येते. युनायटेट स्टेट्समधील राष्ट्रे पर्जन्यमान, पाणी वापर आणि पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत खूप जागृत आहेत. हे देश दुष्काळी राज्यात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करतात.शेतीसाठी शाश्वत पाण्याचा शोध घेतात. नुसत्या सांडपाण्यावर ऑस्ट्रोलियात ४२०० हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. या सांडपाण्यावरच जनावरे पुसली जातात. ऑस्ट्रोलिया हा असा देश आहे  की  ७५टक्के पाण्याचा पुनर्रवापर करण्याचा प्रयत्न करतोय.

शेतीला शाश्वत सिंचनाची जोड हवीच

मराठवाडयात सिंचनाची सुविधा केवळ १८टक्के शेती क्षेत्राला उपलब्ध आहे. उर्वरित ८२टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्राचे ४८टक्के तर विदर्भाचे २८टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमीच आहे. सिंचन सुविधेच्या अपुऱ्या विकासामुळे विदर्भ-मराठवाडा हा भाग मागे आहे. आंध्रप्रदेश हा देशातील पहिले राज्य आहे की ज्या राज्याने भविष्यातील जलसिंचन संदर्भात नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणले. हिमाचल प्रदेशमध्ये 'कोहीली' शेतकऱ्यांमार्फत सिंचन व्यवस्था केली जाते. शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन केली जाणारी पध्दत हिमाचल प्रदेशमध्ये प्रसिध्द आहे. हा पध्दतीत शेतकरी काम करतात. जवळजवळ एक शतकाहून अधिक काळ ही पध्दत रूढ आहे.

महाराष्ट्राला 'जाणते'नेते लाभूनही सिंचनात आपण स्वयंपूर्ण बनू शकलो नाही. राळेगणसिध्दी, शिरपूर, हिवरेबाजार, पळसखेडा, कडवंची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे पाणलोट कामात अग्रेसर आहेत. या गावांनी पाण्यातून प्रगती साधली आहे उर्वरित गावांचे काय? याकामात सरकार कमी पडत आहे की लोकांची इच्छाशक्ती. सिंचनासाठी आतापर्यंत ५आयोगांनी काम पाहिले आहे. आयोगाच्या शिफारशी राज्यकर्त्यांनी स्विकारल्या का? पाणलोट अंतर्गत जी कामे झाली ती बहुतेक ठिकाणी 'माथ्याकडून पायथ्यांकडे' या तत्वानुसार कामे न करता जिथे जागा मिळेल त्याठिकाणी कामे केली गेली आहेत. मृद व जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार आहे याविषयी प्रभावी शिक्षण-प्रशिक्षण होण्याची गरज होती, ती गरज पूर्ण झाली नाही. रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या पाणलोट कामांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना ही तात्कालिक उपाययोजना ठरत आहे असे काही जलतज्ज्ञांचे मत आहे. हे वास्तव आहे.कारण जलयुक्त शिवार योजनेतून झालेली सर्व कामे ही लहानसहान नाला-ओढयांवर झालेली आहेत. एखाद्या वर्षात पाउस नाही पडला तर  ते पात्र कोरडे पडते. हे आजच्या दुष्काळावरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळावर रामबाण उपाय नाही.त्यामुळे सरकारला ठोस उपाययोजना हाती घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्यातील भौगोलिक रचना, पर्जन्यमान, भृपृष्ठ स्थिती, लोकांचे पाणी वापराचे नियोजन, बाष्पीभवनाचे नियोजन या घटकांचा विचार करून पाणी अडवा, पाणी जिरवा, माथा ते पायथा सारख्या कार्यक्रमांचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
चितळे आयोगाच्या अहवालानुसार ''राज्यातील लागवडी योग्य क्षेत्रांपैंकी १३टक्के क्षेत्र पाण्याच्या दृष्टिने अतितुटीचे,३२टक्के क्षेत्र तुटीचे ३४टक्के क्षेत्र सर्वसाधारण पाणी उपलब्धतेचे,६टक्के क्षेत्र विपूल पाणी असलेले तर १५ टक्के अति विपूल पाण्याचे आहे. अतितुटीच्या खोऱ्यात जास्तीचे पाणी असलेल्या खोऱ्यातील पाण्याचे वहन करण्याच्या योजना राबविण्याची गरज आहे.''

''राज्यातील कृषिक्षेत्र हे केवळ पावसावर अवलंबून न राहता, सिचंनाच्या आधारावर शेती केली जावी असे कौटिल्याचे मत होते. त्यासाठी तलाव बांधणे, सिंचन व्यवस्थांचे संरक्षण करणे, पाण्यानुसार पीक पध्दत आखणे.'' असे विचार कौटिल्याने मांडले होते.

रंगनाथन समितीच्या अहवालनानुसार मराठवाडयातील६९ टक्के भाग हा दुष्काळी आहे. सध्यास्थितीत १००हून अधिक प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. मराठवाड्याचा गोदावरी खोऱ्यात ८८टक्के भाग येतो तर कृष्णा खोऱ्यात १०टक्के भाग येतो. नैसार्गिक न्यायाने मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे, आजपर्यंत तसे झाले का? त्यामुळे दुष्काळ हा मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाही. एकूणच महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करायचे झाले तर शेतीसाठी शाश्वत पाणी शोधणे, नद्या वाचवणे, झाडे लावणे,
पाण्याचे समन्यायी वाटप करणे,  सिंचन विकास, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याचे ताळेबंद तयार करणे, ठिंबक सिंचनाचा प्रभावी वापर करणे,शेडनेटचा वापर करणे, आदींचा गंभीर विचार करणे आवश्यक आहे तरच उद्याचा दुष्काळ टळणार आहे.
-विकास पांढरे,९९७०४५२७६७



मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

काठावर किती काळ असं बसायचं?


विकास पांढरे
आजचा ग्रामीण तरुण आळशी झालाय, तो शेती करत नाही, बायकोला मस्तपैकी कामाला लावून आपण मात्र स्टँडवर गप्पा मारत पत्ते खेळत बसतोय, अशी सध्या सोशल मीडियात साधकबाधक चर्चा होताना दिसतेय. यामध्ये ग्रामीण युवकांविषयी काही आशेची, विश्वासाची चार-सहा वाक्यंही वाचायला मिळतात. सारेच तरुण आळशी, चैनी, व्यसनी आहेत असं नाही. आज लाखो तरुण स्वतःच्या पायवर उभं राहून शेती-मातीच्या प्रश्नांना भिडताहेत, दुधासारख्या जोडधंद्यात चार पैसे कमवून आपलं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे असंख्य तरुण कमालीचे आळशी बनत चालले आहेत, त्यांना शेती कामाची लाज वाटतेय. आजचा ग्रामीण युवक मोबाइल युगात आकंठ बुडालाय असं चित्र जरी असलं, तरी वास्तव मात्र वेगळंच आहे.
त्रिं.ना. अत्रे यांचा 'गाव-गाडा' हा महाराष्ट्रीय ग्रामीण जीवनाचा समाजशास्त्रीय दस्तऐवज असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याला आता शतकभराचा काळ लोटून गेलाय. या ग्रंथातला गावगाडा आज राहिला नाही. बदलत्या काळानुसार गावगाडयात राजकारण, शेती व्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राहणीमान यात स्थित्यंतरं होत गेली. पूर्वीची आलुतदार, बलुतेदार मंडळी आता दिसत नाहीत. जागतिकीकरणामुळे शेती व्यवसाय तोटयात येऊ लागला. शहरातली व्यापारी मंडळी गावात येऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून नफा मिळवून देणारी शेती करताहेत. काही तरुण गावगाडयात राहून शेती करताहेत, काही तरुण शहरांकडे धाव घेऊ लागलेत, तर काही तरुण आळशी होत चालले आहेत. या तरुणाचं टोळकं सदोदित स्टँडवर, पारावर बसून बाष्कळ गप्पा मारतानाचं चित्र नजेरस पडतं.
सोशल मीडियातला ग्रामीण आळशी युवक
लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून सोशल मीडियाकडे अर्थात समाज माध्यमांकडे पाहिलं जातंय. अनेकांना वेगवेगळया विषयांवर अभिव्यक्त होण्याची संधी मिळतेय, अभिव्यक्त झालेल्यांना चटकन प्रतिसादही मिळतोय, ही एक सकारात्मक बाब आहे. सोशल मीडियातून ग्रामीण तरुणांवर चर्चा होताना दिसते आहे. ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चालला असून तो फक्त फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर रात्रंदिन पडीक असतो, तोंडात तंबाखू, मावा, डोक्यात नुसतं राजकारण, हातात कुणाचातरी झेंडा, बॅनरवरची पब्लिसिटी आणि नेत्याचा खांद्यावर हात असावा याला ग्रामीण युवक भविष्य म्हणून पाहतोय, घरातील स्त्री शेतावर राबत असताना हा आत्मा स्टँडवर उभा राहून आपल्या मानसन्मानाच्या गप्पा झोडत असतो, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या यात तो गुंग असतो, शेतात काम कर म्हटलं की नाक मुरडायला लगेच तयार असतो, अशा पोस्ट्स वाचायला मिळताहेत. यावरून ग्रामीण भागातील तरुण पिढी कशी बिघडत चालली आहे, हे लक्षात येतं. खरंच, ही पोस्ट सुसंगत आहे. सध्या गावगाडयात असंच काहीसं चित्र आहे. आज अनेक तरुण स्वतःचं सत्त्व हरवून बसलेत, व्यसनी बनले आहेत, शिवाय नेतेमंडळी तरुणांचा चांगला उपयोग करून घेताना दिसताहेत. ग्रामीण तरुणांची होणारी वाताहत चिंताजनक आहे. तरुणांच्या आळशीपणाला कोण जबाबदार आहेत, त्याची कारणं कोणती आहेत, यांचा संशोधनात्मक अभ्यास करताना कोणी नजरेस पडत नाहीत.
ग्रामीण युवकांची दुसरी बाजू
जागतिकीकरण, शेतीवरचं अस्मानी संकट, शेतीमालाचे घसरलेले दर आदी कारणांमुळे गावगाडा ठप्प होतोय. यामुळे छोटा शेतकरी नव्हे, तर अगदी मोठा शेतकरीही अडचणीत येतोय. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठया प्रमाणावर बेरोजगार होतोय. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागलेत. त्यामुळे खेडयापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनत चाललीय. गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून वेळेवर न पडल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. मान्सून ठीक तर गावगाडा नीट असतो. मात्र काही दशकांपासून असं काही घडताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण गावगाडयाचं स्वरूप बदलून गेलंय. काही शेतकरी काळया आईची इमानेइतबारे सेवा करताना दिसताहेत. पण पेरणीसाठी जेवढे पैसे खर्च झाले, तेवढे पैसे त्याच्या पदरात पडत नाहीत. त्यामुळे शेती हा आतबट्टयाचा व्यवहार झालाय. मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, घर-संसार कसा सांभाळायचा म्हणून असंख्य जीव झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करताहेत. हे दुःख उरात ठेवून आजचा तरुण वाममार्गाला लागतोय. स्टँडवर गप्पा मारणारे तरुण बहुतांशी सधन घरातले आहेत. प्रादेशिक भागाचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडयात गावंच्या गावं ओस पडलेली दिसतील. पोटासाठी सर्वांची धाव शहराकडे लागली आहे. जिथे मोठी धरणं आहेत, तेथे आणि साखरपट्टा समजल्या जाणाऱ्या प. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आळशी तरुणांचं टोळकं नजरेस पडेल. याच भागात आटपाडी, माण, खटाव, जत, सांगोला व मंगळवेढा भागात दुपारी गेला तर माणूसही नजरेस पडणार नाही. शेतकऱ्याचं सहा-सात वर्षाचं पोरगंसुध्दा शाळेच्या वेळेपर्यंत रानात बापाबरोबर राबताना दिसतं. शेर्डीकर्डीला गवत काडी आणतं. या सगळया गोष्टी बघायला गावात जावं लागतं. शहरात बसून चार-दोन टाळक्यांचं वर्णन करून संपूर्ण शेतकऱ्यांच्या पोराचं वर्णन करणं चुकीचं आहे. खेडयातला कोंबडा शहरात आरवत नसतो. तसं करायचं झालं, तर शहरातील पोरांबाबतही करावं लागेल. त्यामुळे सगळीच पोरं आळशी आहेत असं नाही. आजचा तरुण शेतकरी निसर्गाशी झुंज देत डाळिंब, द्राक्ष, संत्रे, आंबा अशा फळबागा पिकवत आहे. मात्र बाजारात बसलेल्या चोरांमुळे त्यांच्या घामाचा दाम चोरला जातोय. उधारीवर आणलेल्या कीडनाशकांचे व खतांचे पैसे देण्याइतपत त्याला या बागेतून मिळत नाहीत, तरीही तो आलेल्या संकटांशी सामना करतोय.
आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून
दुष्काळी नव्हे, तर बागायती भागातही तरुणांची परवड होते आहे. आज अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन नोकरीअभावी गावगाडयात खितपत पडताहेत. एक ना एक दिवस आपल्याला नोकरी लागेल, आपण शहरी बाबू बनू अशी त्यांना खात्री आहे. त्यांना शेती करणं कमीपणाचं वाटतं. इतकं शिकून परत मातीतच राबायचं तर शिकायचं कशाला? अशी त्यांची मानसिकता बनत चाललीय. मराठवाडयातल्या माझ्या एका मित्राची शेती आणि त्याचं शिक्षण बघून त्याला शेजारच्या गावातील मुलगी दिली, पण शेतीत त्याचं मन रमत नव्हतं. नोकरीसाठी सगळीकडे अर्ज करत होता. प्रत्येक वेळी संस्थाचालकांकडून डोनेशनची मागणी होत होती. शेवटी सततचा दुष्काळ, द्रारिद्रय आणि बेरोजगारी यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. अशा असंख्य तरुणांच्या व्यथा आहेत. नोकरी लागत नाही म्हणून हताश झालेल्या चांगदेव गित्ते या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी इथल्या तरुणाने चक्क फार्मसीची पदवी विकायला काढल्याची बातमी मध्यंतरी प्रसिध्द झाली होती. त्याची घरची परिस्थिती जेमतेम होती. शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने ती तोटयात आली होती. तरीही शिक्षणासाठी घरच्यांनी खर्च केला. मात्र शिक्षण घेऊन घरचा भार उचलता येत नाही, म्हणून हताश झालेल्या चांगदेवने डिग्री विकायला काढल्याची बातमी वाचनात आली होती. आजच्या घडीला असंख्य ग्रामीण तरुणांना नोकरी मिळत नाही. अनेक युवक आपला अमूल्य वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करताहेत. परंतु एवढं शिकूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांची समाजात अवहेलना होते. त्यामुळे तरुणांमधील व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय. काही तर जीवनयात्रा संपवताहेत. ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण शिकलेल्या मुलींना जोडदार मात्र खेडयातला तरुण शेतकरी नकोय. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय आतबट्टयाचा व्यवहार होत चाललाय, त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. त्यामुळे गावगाडयातल्या मुलीला शेतकरी नवरा नकोसा झालाय. आपला नवरा एखाद्या कंपनीत कमी पगारात काम करत असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे, अशी मुलींची आणि पालकांची मानसिकता बनत चालली आहे. एका सर्वेक्षणाच्या पाहणीतून सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात शेकडो तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावात तिशी उलटलेल्या तरुणांनी विवाहाची आशाच सोडून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमध्ये तब्बल 3 हजारांपेक्षा जास्त तरुणांचे विवाह रखडले आहेत. हे सर्व तरुण शेतीसंबंधित काम करताहेत आणि खेडयात राहतात म्हणून मुलींनी त्यांना नकार दिल्याचं समोर आलंय. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचंही दिसून येतंय. यातील अनेक तरुणांच्या कहाण्या काळजाच्या चिंध्या करणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य काय? या तरुणांचा आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि सरकारी व्यवस्था यांनी साथ नाही दिली, तर असंख्य ग्रामीण तरुणांची कशी वाताहत होतेय, याचं वास्तव चित्र यावरून स्पष्ट होते.
नवनवीन शिकाल तरच टिकाल
सरकार रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप यासारख्या नवीन उद्योग प्रणाली तरुणांना आकर्षित करताहेत. प्रत्येक ग्रामीण तरुणाने काळाप्रमाणे बदल करून बदलत्या जगाप्रमाणे आपणही अपडेट राहायला शिकलं पाहिजे, नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, तरच आपला निभाव लागणार आहे. आज नवनवीन कन्सेप्ट्स उदयाला येताहेत, त्या आत्मसात करायला शिकलं पाहिजे. गावात बसून शेतीपूरक व्यवसाय करता येतो, अशीही उदाहरणं आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांनी आळस झटकून नवा इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं आहे की, 'काठावर किती काळ असं बसायचं? त्यापेक्षा पोहणं शिकून घ्या. होडीचं कुणी सांगावं? ती परतेल, न परतेल....' ग्रामीण तरुणांनो, आळसाच्या काठावर किती काळ बसणार आहात? आता जागतिकीकरणाच्या समुद्रात पोहायला शिका, नाहीतर संकट आ वासून उभं राहील.
99970452767
विवेक मराठी  04-Sep-2017

मराठवाडयाचे इस्रायल - 'कडवंची' गाव

मराठवाडा म्हटले की सततचा दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दोन गोष्टी प्रकर्षाने डोळयासमोर येतात. या भागात ज्या ज्या वेळी जलव्यवस्थापनाचा विषय निघतो, तेव्हा इस्रायल देशाचे उदाहरण समोर ठेवले जाते. आश्चर्याची गोष्ट अशी की, शासन व जनता यांच्या एकजुटीने गावाचा कसा कायापालट होतो आणि 'मराठवाडयाचे इस्रायल' म्हणून गावाची ओळख कशी निर्माण होऊ शकते, याचे उदाहरण जालना जिल्ह्यातच आहे. मृद्संधारण आणि जलसंधारण या दोन्हीच्या आधारे या गावाचा अविश्वसनीय कायापालट करण्यात आला आहे. 'कडवंची' असे त्या गावाचे नाव. त्याची ही यशोगाथा.
 गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाडयात यंदाच्या पावसाने दिलासादायक चित्र निर्माण केले असले, तरी मार्चच्या पुढे हे चित्र असे दिसेलच असे नाही. उन्हाळयात पुन्हा पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. यास जालना जिल्हाही अपवाद नाही. या जिल्ह्यात वार्षिक सरासरी 650 ते 750 मि.मी. पावसाचे प्रमाण असले, तरी 350 ते 450 मि.मी. इतकाच पाऊस पडतो. इथून गोदावरी नदी वाहत असली, तरी तिचा फायदा दक्षिणेच्या सीमेलगतच्या गावांना होतो. दुधना, कुंडलिका, पूर्णा या उपनद्या या जिल्ह्यात असल्या, तरी दुष्काळामुळे त्या कोरडयाच असतात. अंबड, घनसांगवी, मंठा व जालना तालुक्यात पाण्याचे क्षेत्र जेमतेम असल्याने मोसंबीच्या बागा पाहायला मिळतात. उर्वरित जिल्ह्यात पावसाळयानंतर ओसाड माळरान नजरेस पडते. अशा जालना शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रस्त्यावर कडवंची गावच्या हद्दीत प्रवेश केल्यावर मात्र आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळेल.
साधारण तीन हजार लोकसंख्येचे हे गाव. मराठा, धनगर, माळी, कुंभार व मातंग समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. वीस वर्षापूर्वीपर्यंत कडवंची हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जात होते. या वर्षीचा अपवाद वगळता या गावात आतापर्यंत 300 मि.मीटरच्यावर कधी पाऊस झाला नाही. त्यामुळे कापूस आणि तूर या पिकांवर अवलंबून असणारे येथील शेतकरी उन्हाळयात पोटापाण्यासाठी शहराकडे स्थलांतर करत असत. गावात बेकार तरुणांचे थवे पाहायला मिळत. अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते. शिक्षणाचे प्रमाणही कमी असल्यामुळे गावात परिवर्तन घडवू पाहणारे नेतृत्व उदयास आले नव्हते. अज्ञानाच्या अंधारात अडकलेल्या इथल्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळ आ वासून उभा राहत होता. या अनुभवामुळे अनेक कुटुंबांचा शेतीवरचा विश्वास उडाला होता. असे हे गाव शेतीच्या माध्यमातून समृध्द होण्यासाठी 1993 साली, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडवंची येथे मराठवाडा शेती साहाय्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी जलसंधारणाच्या प्रकल्पाची तयारी करण्यात आली. 1994 साली शासनाच्या वतीने जालना कृषी विज्ञान केंद्राने मृद्संधारणाचे काम हाती घेतले. याचा पहिला प्रयोग कडवंची गावात सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे 1.36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे विजय बोराडे यांनी हे काम 1.22 कोटीत पूर्ण केले. या प्रयोगशील कामासाठी पंडित वासरे या कर्तव्यदक्ष कृषी अभियंत्याची निवड झाली. वासरे यांना शेतीविषयी आत्मीयता असल्याने त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मृदेच्या व पाणलोटाच्या कामाविषयी शेतकरी उदासीन होते. नंतर कृषीभूषण विजयअण्णा बोराडे व कृषी अभियंता वासरे यांनी कडवंचीच्या ग्रामस्थांना मृदा आणि जल यांच्या संधारणाचे महत्त्व पटवून दिले आणि या गावाचे रूप पालटले.

मृदा व जल यांच्या संधारणाच्या कामांची फलश्रुती
गेल्या चाळीस वर्षांत मराठवाडयात दुष्काळ निवारणाच्या कामासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चा कार्यक्रम झाला. मात्र या कामाची फलश्रुती काय? याचे उत्तर सर्वांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या परस्पर सहकार्यातून गाव सुजलाम् सुफलाम् कसे होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठवाडयातलेच कडवंची हे गाव. मृद्संधारण व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे 200 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडणारे गाव दुष्काळाच्या वणव्यातही सुरक्षित राहू शकते, हे कडवंची गावाने दाखवून दिले आहे. जालना कृषी विज्ञान केंद्राने इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात वीस वर्षांपूर्वी कडवंची गावात काम सुरू केले. माथा ते पायथा उपचारामध्ये सुरुवातीला मृद्संधारणासाठी डोंगरमाथ्यावरून पाणलोटाच्या पायथ्याकडे कामे केली. पुढे पडिक जमिनीवर सलग समतल चर, खासगी वहिती जमिनीवर बांधबंदिस्ती केली. नॅशनल ब्युरो ऑॅफ सॉईल सर्व्हे ऍंड लँड यूज प्लॅनिंग या संस्थेने जमिनीची धूप झाल्याने पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यानुसार प्रतिहेक्टरी सरासरी 25 टन माती दर वर्षी वाहून जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही माती जमिनीचा वरचा थर असल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी लागणारे मुख्य घटक (नत्र, स्फुरद, पालाश) वाहून घेऊन जाते व त्याचा परिणाम जमिनीच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे पिकांचे उत्पादन 25-40 टक्क्यांनी कमी होते. या सर्व नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून कडवंची पाणलोट क्षेत्रात प्रचलित पध्दतीतील निव्वळ तांत्रिक निकष न वापरता शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे तांत्रिकदृष्टया योग्य शेत बांधबंदिस्ती करण्यात आली. शेतबंदिस्ती सरासरी 300 मीटर प्रतिहेक्टर करून जास्तीचे पाणी सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी प्रत्येक बांधाला पाईपचे व दगडाचे सांडवे करण्यात आले आहेत. अशा प्रकारची बांधबंदिस्ती 1500 हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे. मृद्संधारणातून साध्य होणाऱ्या जलसंधारणाबरोबरच कडवंची गावात लहान-मोठे दगडी आणि 705 सिमेंटचे नालाबंधारे बांधण्यात आले, तर 700 समतल चर घेण्यात आले. गावाच्या चारही बाजूंनी झाडे लावण्यात आली. याचा परिणाम म्हणजे कडवंची गावातील माती वाहून जाण्याचे थांबले, शिवाय पाणी पातळीतही वाढ झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांना मृद्संधारण व पाणलोट कामांविषयी विश्वास वाढला. आता या गावात गेल्या चार वर्षांपासून गावातील 206 विहिरींतील पाण्याची पातळी वाढली आहे.


विशेष म्हणजे या वर्षीचा पावसाचा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांत या भागात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यातही जालना तालुक्यातील कडवंची गावात यापेक्षाही कमी पाऊस झाला होता. पण जलसंधारणाचे काम शास्त्रशुध्द पध्दतीने झाल्यामुळे कडवंची गावावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम झाला नाही. पडणाऱ्या पावसाचा एक एक थेंब गावाच्या क्षेत्राबाहेर वाहून जाणार नाही, त्याबरोबर मातीचा कणही धुऊन बाहेर जाणार नाही याची योग्य काळजी घेतल्याने कडवंची गावाला गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्काळाची झळ लागलेली नाही. अलीकडे 2012, 2013 व 2016 साली जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. कडवंचीच्या आजूबाजूची अनेक गावे दुष्काळाने होरपळून निघाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागले. पण कडवंची गाव त्या दुष्काळाच्या वणव्यातही हिरवेगार होते. ही किमया फक्त मृद् व जलसंधारणाच्या कामामुळे झाली. पाणलोट विकासामुळे गावातील बागायती क्षेत्र वाढून शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. मृद्संधारणामुळे गावातील जवळपास अठराशे हेक्टर पडीक जमीनही लागवडीखाली आली आहे. हंगामी व बारमाही सिंचनक्षेत्रात वाढ झाल्याने पिकांच्या उत्पादनात व उत्पन्नातही भरीव वाढ झाली आहे. वीस वर्षांपूर्वी कडवंची गावात सरकारी योजनेद्वारे कधी पाण्याचा एकही थेंब पुरवठा होत नव्हता. आता हेच गाव पाणीदार झाले आहे. वर्षाचे बाराही महिने हे गाव इस्रायलसारखे हिरवेगार असते. या 1800 हेक्टरवर निसर्गाची अवकृपाची असायची. 20 ते 25 इंच पाऊस हाच या गावाच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा जिरवता येईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यायला सुरुवात केली.
पिकांचे योग्य नियोजन व विकासाचे मॉडेल
गावकऱ्यांची एकजूट, पाणलोटाच्या कामाची फलश्रुती यामुळे कडवंची गावात कमी पाण्यातही शेतकऱ्यांनी आपली बाग फुलवली आहे. वीस वर्षांपूर्वी ऊस, केळी, मोसंबी ही पिके घेणारे शेतकरी आता कमी पाण्यात येणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंब पिकांकडे वळले आहेत. पिकांचे शास्त्रीय नियोजन करून कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नामुळे पीक रचनेत बदल झाला. मृद् व पाणलोट प्रकल्प सुरू होण्यापूर्वी या गावात फक्त 3 हेक्टर क्षेत्रावर असलेली फळबाग आज 600 हेक्टर क्षेत्रावर पसरली झाली आहे. यामध्ये 480 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. 200 शेतकरी डाळिंबाकडे वळले आहेत. आले 12 हेक्टर व भाजीपाला 120 हेक्टरवर घेतला जात आहे. कडवंचीच्या द्राक्षांना प्रामुख्याने विदर्भात व मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. येथील शेतकरी माल घेऊन विक्रीसाठी बाजारात कधीच जात नाही, तर स्वत: व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाया जात नाहीत. शेतकऱ्यांना शेतात बसूनच नगदी पैसा मिळू लागल्याने त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
नापिकी, बाजारभाव, दुष्काळ या कारणांमुळे गेल्या वीस वर्षांत कडवंची येथे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. यापूर्वी या गावात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत हे विशेष आहे. या गावातील शेतकरी शेतीमालाला भाव मिळाला नाही म्हणून कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. उलट या गावाच्या मुली ज्या गावात दिल्या आहेत, त्या गावात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यात येते. पाणलोटापूर्वी कडवंची गावचे वार्षिक उत्पन्न 75 लाखांपर्यंत होते. पाणलोटानंतर आज या गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाला जवळपास 55 कोटीपर्यंत पोहोचले आहे. आज गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत द्राक्षाच्या हिरव्यागार बागा नजरेस पडतात. गावात प्रत्येक वर्षी सरासरी फक्त 200 ते 350 मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे द्राक्षासारखे नगदी पीक घेणे ही जोखीम असतानाही येथील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून द्राक्षाच्या बागा फुलवल्या आहेत. अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. सर्वांच्या हाती नगदी पैसा खेळत आहे. पुरेसा पाऊस पडो अथवा न पडो, येथील शेततळी नेहमी भरलेली असतात. पारंपरिक शेतीच्या पध्दतीचा अवलंब न करता, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेडनेटची उभारणी केली आहे. या शेडनेटमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला घेऊन आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांना शासनाचा व इतर सामाजिक संस्थांचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. शेतीमुळे आपल्या जीवनात बदल झाला आहे. काळया आईची रात्रंदिन सेवा करता यावी, यासाठी 80 टक्के शेतकरी शेतात कायमचे राहायला गेले आहेत. त्यामुळे गावाच्या शिवारात अनेक टुमदार बंगले पाहायला मिळतात. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरांसमोर पर्जन्यमापक यंत्र बसविल्याचे चित्र नजरेस पडते. पावसाचे प्रमाण व आर्द्रता शेतकरी शेतात बसूनच पाहतात. पाण्याने भरलेली शेततळी, शेडनेटमधील विविध भाजीपाला, घरासमोर शेतात ट्रॅक्टर, दुभती जनावरे पाहून आपण दुष्काळी भागात आलो आहोत यावर विश्वास बसत नाही.
गावात आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेचा   परिसर जसा स्वच्छ आहे, तसाच विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास घडविण्यासाठी शिक्षक कष्ट घेत असतात. गावात तीन-चार वस्तिशाळा आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे पालकांचे व शिक्षकांचे लक्ष असते. मुख्य शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिकविला जातो व इंग्लिश शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. अनेक विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकले आहेत, हे शाळेत लावण्यात आलेल्या पारितोषिक पदकांवरून लक्षात येते. आज या गावातील अनेक शेतकऱ्यांचे मुले पुढील शिक्षणासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर शहरात आहेत. गावात एकही तरुण बेरोजगार दिसत नाही. त्यामुळे या गावाचे नाव शेतीबरोबर शिक्षणातही अग्रेसर झाले आहे. विशेष म्हणजे पैसा हातात आला म्हणून केवळ मौजमजा करणारे तरुणांचे टोळकेही गावात नजरेस पडत नाही. प्रत्येक तरुण आपापल्या शेतात काम करताना नजरेस पडतो. महिला मजुरांना गावातच बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे. दुपारच्या वेळी गावात फक्त वृध्द नागरिक नजेरस पडतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतला किलबिलाट तेवढाच ऐकू येतो. ''नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे कडवंची गावाचा शाश्वत विकास झाला आहे'' असे शेतकरी रमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
''माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्या वेळी शहरात जाऊन छोटी-मोठी नोकरी करण्याची इच्छा झाली. पण घरची सात एकर शेती होती. गावात मृद् व पाणलोट क्षेत्राखाली अनेकांची शेती आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसत होते. त्यामुळे मी शहरात जाण्याचा निर्णय बदलला. आज माझ्या शेतात द्राक्षाचे नगदी पीक घेतल्याने माझे आर्थिक जीवनमान उंचावले आहे'' असे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले.
''आमच्याकडे आठ एकराचे कोरडवाहू शेत होते. वीस वर्षांपूर्वी या शेतातून कोणतेच धान्य पिकत नव्हते. त्यामुळे आम्ही मेंढपाळाचा आमचा पारंपरिक व्यवसाय करत या गावाहून त्या गावात स्थलांतर करत असू. आज गावाचे चित्र बदलले आहे. आम्हीही भटकंतीचा मेंढपाळाचा व्यवसाय बंद करून कोरडवाहू शेतात द्राक्षाचे व डाळिंबाचे नगदी पीक घेत आहोत. यात चांगला नफा मिळत गेल्याने शेतात चांगले घर बांधले आहे. शेतीकामात समाधानी आहोत'' अशी प्रतिक्रिया अनिरुध्द झारे यांनी दिली.
''मी उन्हाळयात पाण्याचे काटेकर नियोजन करून विविध पिके घेतो. विशेषत: द्राक्ष पिकास आम्ही पसंती देतो. या पिकांतून भरघोस उत्पन्न मिळते. शिवाय व्यापारीही द्राक्ष खरेदीसाठी आमच्याकडे येतो. भाव योग्य मिळाला तर द्राक्षाची विक्री करतो,'' असे शेतकरी भगवान कायंदे यांनी सांगितले.
 कडवंची गावाची प्रगती लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चढाओढ लागली आहे. युनियन बँकेने गावात शाखा उघडली आहे. 1996 ते 2000 या सालात पाणलोट अंतर्गत शेतात बांधबंदिस्तीतून मृद्संधारणाची कामे केल्याचा हा परिणाम आहे. कडवंची गावाने योग्य पाणी व्यवस्थापन करून दुष्काळातही आदर्श शेती नावारूपाला आणली. आज कडवंची हे गाव विकासाचे मॉडेल म्हणून उदयाला आले आहे. हैदराबाद येथील सेंट्रल रिसर्च इन्स्टिटयूट फॉर ड्रायलँड ऍग्रिकल्चर या संस्थेने कडवंची येथील मृद् व पाणलोट कामाचे मूल्यांकन करून अहवालामध्ये प्रशंसा केली आहे.

पाण्याचे आदर्श व्यवस्थापन
कडवंची गावात पाण्याची मुबलकता असली, तरी सर्व शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी 100 टक्के ठिबक सिंचनाचा अवलंब करतात. केळी, ऊस व मोसंबी या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना हद्दपार करण्यात आले आहे. शेतात पाटपाणी देण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे. पाणलोट विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन गावकऱ्यांनी पाणलोट विकास समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शेतकरी भगवानराव क्षीरसागर यांची एकमुखाने निवड करण्यात आली. या समितीत सात सदस्य असून समितीच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याचा काटेकोर वापर करून कमी पाण्यात जास्त नफा मिळवून देणारी पिके घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे शेतकरी जास्त पाण्याचे पीक घेत होते, त्या शेतकऱ्यांनी पीकपध्दतीत बदल करायला सुरुवात केली आहे. आज सर्व शेतकरी या पध्दतीचा अवलंब करतात. उन्हाळयात बागांना पाणी मिळण्यासाठी शेततळे घ्यावे लागते. त्यासाठी कडवंची पाणलोटामध्ये 550 शेततळी आहेत. गेल्या चार वर्षांत सातत्याने दुष्काळ पडून या गावातील कृषी उत्पादनाचा आलेख मात्र वाढताच राहिला आहे. गावच्या परिसरात 26 शेडनेट, जवळपास 206 विहिरी आहेत. यापैकी बहुतांश विहिरींमध्ये उन्हाळयात पाणी असते.
आदर्शवत वाटचाल
राज्यात मराठवाडा व विदर्भ येथील अवर्षणसदृश परिस्थितीचा परिणाम विकासावर होत आहे. दुष्काळ व नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकार विविध पायलट प्रकल्प राबवीत आहे. पण स्थानिक जनतेच्या उदासीनतेमुळे यातले अनेक प्रकल्प अयशस्वी झाले आहेत. परिणामी सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येते. हे निसर्गाचे लहरी चक्र लक्षात घेऊन, शासन व जनता यामध्ये सुसंवाद साधला गेला तर शेतीचा स्वयंपूर्ण विकास करता येतो, हे आपण अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावावरून पाहिले आहे. जलसंधारणाचे आदर्श गाव म्हणून हिवरेबाजाराचा उल्लेख केला जातो. आता हिवरेबाजाराच्या पंक्तीत कडवंची गाव येऊन बसले आहे. मराठवाडयासारख्या दुष्काळी भागातील कडवंची गावाचा आज कायापालट झाला आहे. मृद्संधारणाचे व जलव्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल कडवंची गावामध्ये पाहायला मिळाले असून दुष्काळाशी सामना कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण कडवंचीने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. आता जलव्यवस्थापनाचा धडा शिकण्यासाठी इस्रायलला जाण्याची गरज नाही. इस्रायलचे प्रतिरूप शोभावे असे गाव महाराष्ट्र राज्यातील मराठवाडयासारख्या दुष्काळी भागात आहे हे पाहण्यासाठी विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांनी या गावास भेट देऊन आपल्या शेतीच्या पध्दतीत बदल केला पाहिजे.
2017च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करताना सरकारने शेतकरी, गावे, गरीब, दलित आणि समाजातील अविकसित गटाचे कल्याण कसे होईल याला प्राधान्य दिले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पाणलोट विकास या क्षेत्रांमध्ये खूप मोठे कार्य करण्याची आवश्यकता आहे. 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व शेती क्षेत्राचे चित्र पालटण्यासाठी कडवंचीसारखे पायलट प्रोजेक्ट करण्याकरिता सरकारने 50 गावांची निवड करून ही गावे समृध्द करणे गरजेचे आहे.
गावाच्या विकासाचे पंचसूत्र - पंडित वासरे
''पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय शेतीची उत्पादकता वाढणे, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन कडवंची गावाच्या विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आला. पहिला माथा ते पायथा कार्यक्रम, दुसरा मृद्संधारणातून जलसंधारण राबविणे, तिसरा शास्त्रीय पध्दतीने पीक पध्दतील बदल, चौथा शासनाच्या योजने अंतर्गत शेततळे घेणे आणि शेवटचा पाचवा शंभर टक्के ठिंबक सिंचनाचा वापर करणे या पंचसूत्रीचा वापर केल्यामुळे कडवंचीसारखे कोरडवाहू गाव आर्थिकदृष्टया संपन्न बनले आहे,'' असे जालना कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान- चंद्रकांत क्षीरसागर 

''आज कडवंची गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, याचे श्रेय जालना येथील कृषी विज्ञान केंद्रास जाते. या गावात एप्रिल, मे व जून महिन्यांत शेततळयातून बागांना पाणी देण्यात येते. याच तीन हजार लोकसंख्येच्या गावात 550 शेततळी आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. आज आमच्या गावात कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यामुळे कडवंची गावात सुख, शांती व समृध्दी नांदत आहे,'' असे कडवंची गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांनी संगितले.
9970452767
 विवेक मराठी  16-Dec-2017


कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...