रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

जलव्यवस्थापनाच्या नंदादीप - अहिल्यादेवी होळकर




  • महापुरुष हे जीवनदायी मेघाप्रमाणे असतात.  त्यातील एक महापुरुष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. आपल्या अल्पायुषी जीवनात अहिल्यादेवींनी धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कामे केली. 'जलव्यवस्थापन' हा एक त्यांच्या कामाचा बिंदू होता. या कार्याकडे इतिहासकारांनी दुर्लक्षच केले आहे, असो. काळाच्या ओघात त्यांनी निर्माण केलेल्या विहिरी, तलाव, कुंड आणि घाटाचे अस्तित्व टिकून आहे आणि स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहेत. असे म्हटले जाते की, अहिल्यादेवी जर इंग्लड किंवा अमेरिकेत जन्माला आल्या असत्या तर त्या जागतिक किर्तीच्या पहिल्या जलव्यवस्थापक ठरल्या असत्या, जलव्यवस्थापनाच्या मुख्य सूत्रधार बनल्या असत्या, त्या  राष्ट्रांच्या मूर्तिमंत उदाहरण ठरल्या असत्या, असो, भारतातील प्रत्येक जण अहिल्यादेवींच्या सत्यस्वप्नांचा, ध्येयाची पूजा करेलच असे नाही. कदाचित त्यांच्या कामाचा विसरही पडला असेल.गेल्या पाच सहा वर्षांपासून जलसंधारणाच्या कामाला वेग वाढला आहे. सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत पण जलव्यवस्थापनाच्या कामात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नंदादीप आहेत, हे कुणीही नाकारू शकत नाही. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य फार मोठे आहे.  त्यांनी केवळ ३० वर्षे कारभार केला. पंढरपूरपासून ते काशीपर्यंत, उज्जैनपासून परळी-वैजनाथपर्यंत, महेश्वरपासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंत, अयोध्या पासून ते नाशिक पर्यंत त्यांनी सामान्य जनतेच्या सोयीसाठी बारव (विहीर),तलाव, कुंड,घाट,धर्मशाळा, देवालयाची निर्मिती केली. भगवान शंकरावर त्यांची जशी अफाट श्रध्दा होती तशीच श्रध्दा प्रजेवर होती. 'जल' या क्षेत्रात त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. 'पाणी' हे लोकांसाठी, जनतेसाठी आहे, याची जाणी त्यांनी निरंतरपणे ठेवली. केवळ भाविकांसाठी पाण्यावर हक्क नाही,तर या पाण्याचा उपभोग घेणाऱ्या समाजातील प्रत्येक नागरिकांचा आहे, आहिरे-नाहिरे वर्ग सुद्धा आपली तहान भागवू शकतात, इतका उदात्त हेतू या निर्मिती मागील होता. अहिल्याबाईंच्या निधनानंतर भयाण दुष्काळात अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या बारव आणि तलावातून जनतेची तहान भागली,अशा नोंदी सापडतात. बारव, कुंड, तलाव आणि घाट यातील पाण्यावर जसा भाविकांचा हक्क आहे तसाच सामान्य जनतेला आपली तहान भागवता येत असे. हे पाणी सर्वांसाठी होते, आहिरे-नाहिरे सुध्दा पाणी वापरत,शेतकरी शेतीसाठी पाणी वापरत. 

अहिल्यादेवींचे गुणगौरव करताना थोर विचारवंत आचार्य विनोबा भावे म्हणतात, "आम्ही जिथे जिथे गेलो तिथे तिथे त्या त्या भूप्रदेशातील लोकांकडून आम्ही अहिल्याबाईंची स्तुती ऐकली, शस्त्रबलाने दुनियेला जिंकणारे अनेक राजे, महाराज होऊन गेले पण प्रेमाने आणि धर्मशक्तीने भारतातील सर्व प्रांताना जिंकणार्‍या अहिल्यादेवी ह्या एकमेव महाराणी होत्या."


                         तलाव

अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर बारव,कुंड,तलाव, घाट यांची निर्मिती केली.  या विषयाकडे धार्मिक अंगाने न पाहता जलव्यवस्थापनाच्या परिप्रेक्ष्यातून पाहणे आवश्यक आहे. 'तलाव निर्मिती' हा त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अद्भभुत नमुना होता. हा नुमना आपणास विविध ठिकाणी पहायला मिळतो. अहिल्यादेवींनी त्र्यंबकेश्वर येथे भाविक व स्थानिक नागरिकांसाठी तलाव बाधंला आहे. हा तलाव मोती तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण तलाव दगडी आहे. चांदवड हे होळकरांच्या जाहगिरीचे मुख्य ठिकाण. या गावात तलाव बांधला आहे. या तलावाची लांबी ४७०००मीटर व रूंदी २८६ आहे. दुष्काळात या तलावाचा फायदा झाला होता. स्थानिक नागरिक आजही तलावाचा पाण्यासाठी वापर करतात. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे तलाव बांधला आहे. तलावाच्या चारी बाजूने दगडी बांधकाम आहे. हा तलाव जामघाट नावाने ओळखला जातो. सध्या हा तलाव अहिल्यादेवी होळकर नावाने ओळखला जातो.



 अहिल्यादेवी होळकर यांच्या स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे जेजुरी येथील तलाव. या तलावास 'मल्हार-गौतमेश्वर तलाव'नावाने ओळखले जाते .१७७० साली अहिल्यादेवींनी या तलावाची निर्मिती केली. १८ एकर मध्ये पसरलेला हा तलाव आजही मजबूत स्थितीत आहे.

 या तलावात उतरण्यासाठी पाच ठिकाणी पायऱ्या आहेत. आज या तलावातील पाण्याचा शेतीसाठी वापरला जातो. तलाव्याच्या उत्तर व दक्षिण बाजूला दोन चौकोनी आकारच्या बारव आहेत. या बारवातील पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो. परळी वैजनाथ येथे तलावाची निर्मिती केली आहे. हा तलाव आजही सुस्थितीत आहे.

                           बारव

भारतीय जलसंस्कृतीचा अभिमान वाटावा, असा हजारो वर्षाचा बारव इतिहास आणि वारसा आहे. बारव म्हणजे आजच्या परिभाषेत विहीर. अहिल्यादेवी होळकर यांनी बारवांचे महत्त्व ओळखून काही बारवांचे पुनरुज्जीवन केले. अहिल्यादेवींनी शास्त्रशुद्ध पद्धतीने बारवा बांधल्या आहेत. धार्मिक व लोकोपयोगासाठी लोकोपयोगी विहीर बांधल्या आहेत. वाफगाव (जि.पुणे )गावात दोन विहीरी बांधल्या आहेत. एक विहीर होळकर वाडयात आहे. या विहीरीला ७० पायऱ्या असून आजही स्थानिक नागरिक पाण्यासाठी वापर करतात. दुसरी विहीर विष्णू मंदिराच्या पाठिमागे बांधली आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर ठिकाणी एक रेखीव दगडाची विहीर बांधली आहे. या विहीरीत उतरण्यासाठी ५५ पायऱ्या बांधल्या आहेत. विहीरीत एक गोमुख तीर्थ आहे. त्यातून सतत पाणी पडत असते. शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे एक सुंदर विहीर बांधली आहे.या विहीरीला १५० पायऱ्या आहेत व १३ अप्रितम कमानी आहेत. नाशिक जिल्हयातील सकरगाव, नगर जिल्हयातील कसबे ओझर, जामनेर तालुक्यातील पाळधी, जेजुरी, उज्जैन, भीमाशंकर, वेरूळ येथे विहीरी बांधल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा  येथे भव्य बारव बांधली. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राणी अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी निर्माण केलेली विहिर आहे. ही विहीर नातेपुते-शिंगणापूर मार्गावर स्थित आहे. सातारा जिल्ह्यातील गुरसाळे गावात रामलिंग बारवची निर्मिती होळकरांनी केली. स्थापत्य शैलीचा अद्भभूत नमुना या बारवेत आहे.  जालना, वेरुळ, अंबाजोगाई याठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी विहिरीची निर्मिती केली.
चांदवड येथील रंगमहाल - होळकर वाड्यातील विहिरीतून १९७२च्या दुष्काळात ८०खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता,अशी माहिती मिळते.

 आपल्या देशात बारव बांधकामाची परंपरा अहिल्यादेवी होळकर यांच्यापर्यंत टिकून राहिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी काशीमार्गावर पांथस्थ अन्‌ प्राण्यांसाठी बारवांची निर्मिती केली. ही निर्मिती धार्मिक आहे तशीच सामाजिक देखील आहे. काळाच्या ओघात काही बारवांचे अस्तित्व नष्ट होत आहे. अनेक बारवांचे बांधकाम ढासळले आहे. चिरेबंदी भिंतीत झाडे-झुडुपे फुटल्याने निखळत चालल्या आहेत. त्यातील पाणी वापरले जात नसून दुर्गंधीचे अन्‌ रोगराईचे स्रोत बनलेत. नागरिक कचरा टाकत आहेत. अशा बारवांचे वैभव जतन आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

                           घाट व कुंड

अहिल्यादेवी होळकर यांच्या जलव्यवस्थापन कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या विविध तीर्थक्षेत्र ठिकाणी पाणी अडवून केलेली घाट निर्मिती केली. महेश्वर राजधानीच्या ठिकाणी अहिल्यादेवींनी नर्मदा नदीच्या काठावर २८ घाट बांधले आहेत. पेशवा हा घाट आकाराने सर्वात मोठा आहे. त्याची लांबी १२१ फूट व रूंदी १५० फूट  आहे. पूर्वेला नर्मदानदीचा प्रवाह असून त्याला अडवण्याचे काम या घाटाने केले आहे. या घाटावर जायला एक मोठे महाद्वार व प्रवेशद्वार आहे.
उज्जैन येथील क्षिप्रा नदीच्या काठावर तर बऱ्हाणपूर येथील तापी नदीवर, ब्रहमक्षेत्र पुष्कर , दक्षिणेतील गया येथे आकर्षक व सुंदर घाट निर्मिती अहिल्यादेवींनी केले. त्यास गयातीर्थ नाव आहे. अयोध्या येथे शरयू नावाचा घाट बांधला.मथुरा येथील चीरहरण घाट व कालीदेह घाट बंधला. हरिद्वार येथे कुशवार्त घाट, प्रयाग येथील फाल्गुन घाट, कुरूक्षेत्र येथे एक घाट बांधला. चौंडी येथील सीना नदीवर सुंदर घाट निर्मिती केली आहे. काळया दगडाचा हा घाट ६८ फूट लांब ३८ फूट रूंद आहे. पैठण येथे गोदावरी नदीवर सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेल्या नागघाटाची अहिल्यादेवींनी पुनर्बांधणी केली.वर्तमान घाट बांधला आहे. नागपंचमीला या घाटावर यात्रा भरते.  बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर एक घाट आहे. या घाटाचे जीर्णोद्वार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. असा उल्लेख सापडतो. नाशिक येथील घाट, पुणतांबा येथील गोदावरी नदीच्या काठावर घाट बांधला आहे. या घाटास २८ पायऱ्या आहेत. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवर घाट बांधला आहे. काशी येथील गंगा नदीवर मनकर्णिका व दशाश्वमेध घाट बांधला आहे. या ठिकाणी विहीरी बांधल्या आहेत. 

काशी व पुणतांबा येथील घाट स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहेत. या सर्व घाटाच्या ठिकाणी धार्मिक विधी होत असतात शिवाय पुरापासून गावांचे संरक्षण होत असे. उन्हाळयात या घाटात पाणी मिळत असल्याचे पुरावे सापडतात. अहिल्यादेवींनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाण्याचे कुंड निर्मिती केली. रावेर येथील केशव कुंड, घृष्णेश्वर येथील वेरूळ कुंड, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ येथील हरिहर कुंड, सप्तशृंगी येथील शिवकुंड, जळगाव जिल्हयातील म्हसवे येथील कुंड अशा अनेक कुंडाची निर्मिती देखील अहिल्यादेवींनी केली आहे. 

अहिल्यादेवींचे शेती व जलव्यवस्थापनाचे मूलतत्वे

१) अहिल्यादेवींनी आपल्या जलकार्याचा फायदा शेतीसाठी करून घेतला.  बंधारे बांधून अडविलेले पाणी कालव्याद्वारे सिंचनासाठी वळविले गेले. सिंचनाखालील क्षेत्राचे चार भाग करून प्रत्येक भागाच फड तयार केला. एका फडामध्ये अनेक लाभधारक शेतकरी असत.एका फडामध्ये मात्र एकच प्रकारचे पीक घेतले जात असे. पहिल्या फडामध्ये बारमाही दुसऱ्या फडामध्ये दुहंगामी आणि तिसऱ्या फडामध्ये हंगामी तर चौथ्या फडामध्ये पाणी उपलब्ध असेल तर पीक घेतले जाई. अशी सिंचन व्यवस्थापनातील  आदर्श फड पद्धत होळकर यांच्या कारकिर्दीत सुरू झाली.

२) शेतकर्‍यांना प्राधान्य लक्षात घेऊन बि-बियाणे वाटप करणे, दुष्काळ पडला असेल तर शेतसारा माफ करणे. 

३) पावसाचे पाणी जास्तीत जास्त शिवारात अडवणे.

४) लहानपक्षी व चिमण्यांकरिता दरवर्षी पिकलेले शेत राखीव ठेवत. 

५) प्रत्येक शेतकर्‍याने किमान २०झाडे लावली पाहिजेत. (चिंच,औदुंबर,पिंपळ आदी देशी झाडांचा समावेश होता.)  डोंगराळ भागात भिल्ल, रामोशी यांच्यामार्फत ही झाडे लावण्यात येत असत.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जलव्यवस्थापन कार्याचे मूल्यमापन करताना डॉ. रा.श्री. मोरवंचीकर एके ठिकाणी म्हणतात,-
"जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतामध्ये जे कार्य केले तशा तोडीचे कार्य अन्य कोणत्याही एका व्यक्तीने, इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात यापूर्वी व यानंतर केल्याच्या नोंदी सापडत नाहीत. जनकल्याण, धर्मपरायणता व स्त्रियाविषयी वाटणारी अनुकंपा यामधून देवीनी भारतभर अनेक दुर्गम ठिकाणी नद्यांना घाट बांधले,पूरनियंत्रण, भूस्खलन प्रतिबंध आणि पाणवठ्याची सोय व या भूमिकेतून अहिल्यादेवींनी शेकडो घाट बांधले, ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची दुरुस्ती करून त्या ठिकाणी बुडाची बारव निर्मिती केली. वेरूळच्या घृष्णेश्वराजवळ उभारलेली बारव आणि घृष्णेश्वराचे मंदिर या कालखंडातील स्थापत्य व त्यांचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. वेरूळ येथील अहिल्यादेवींनी उभारलेल्या बारवेची गणना भारतातील उत्तम बारव स्थापत्यात केली जाते. त्यांनी आपल्या व्यक्तिगत संपत्तीमधून,तसेच लोकांना आवाहन करून मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग घेऊन ही निर्मिती केली होती. आजही त्यांनी उभारलेल्या जलव्यवस्थापन पध्दतीपैंकी ९० टक्के उपयोगात आहेत."
 
भविष्याचा वेध

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरी आपण जलव्यवस्थापनात आपले काम अपुरी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या अवघ्या ३०वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण भारतभर जलव्यवस्थापनाचे महान कार्य केले. त्यांच्या राजवटीत नंतर देशात असा राजा होऊन गेला नाही.  आपल्या राज्याचे पाण्याचे नियोजन चुकीच्या मापदंडावर किंवा चुकीच्या तथ्यांवर, गृहितकांवर आणि ठोकताळ्यांवर केले गेल्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनंतरही पाण्याच्या प्रश्‍नाने आपली पाठ सोडली नाही. हे वास्तव आहे.

आज पृथ्वीवर पाण्याचा साठा मर्यादित आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार २०२५ सालापर्यंत जगातील निम्या लोकसंख्येला प्यायला पाणी मिळणार नाही, त्यासाठी प्रत्येकाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

१)शासनाने नव्या जलस्रोतांचा शोध घेण्याबरोबरच होळकरकालीन जलस्त्रोतांचा उपयोग करून घेणे. 

२) होळकरकालीन तलाव, विहिर, कुंड, घाटातील गाळ काढणे, त्यासाठी लोकसहभागाचा वापर करून घेणे.


अहिल्यादेवी होळकरानंतर विश्वेश्वरय्या, छत्रपती शाहू महाराज, जमशेटजी टाटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माधवराव चितळे, पोपटराव पवार सारख्या पाणीदार माणसांनी जलव्यवस्थापनात महत्त्वाचा वाटा उचलला तसाच वाटा प्रत्येक भारतीय नागरिकांनी उचलला पाहिजे.

-© विकास पांढरे-९९७०४५२७६७


कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...